प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि
जीवसृष्टि (मानवेतर).
कोणत्या प्राण्याचें आणि वनस्पतीचें ज्ञान वेदकालीन लोकांस व्यावहारिक रीत्या झालें होतें हें जाणणें म्हणजे प्राचीनकालचें प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र जाणणें होय. पशूंचें निर्दालन व गृह्यीकरण हीं संस्कृतीचा विकास दाखवितात, त्याचप्रमाणें नित्योपयोगी वनस्पतींचें उत्पादन आणि आरण्य वनस्पतींच्या नैमित्तिक उपयोगाचें ज्ञान हींहि संस्कृतीचा विकास दाखवितात. या दृष्टीनें जीवसृष्टिविषयक वैदिक शब्दांची यादी महत्त्वाची आहे.
पुढें दिलेल्या वनस्पतींच्या यादीवरुन आपणांस तत्कालीन वनस्पतिविषयक ज्ञानाबद्दल बरेंचसें अनुमान करतां येतें. उत्तानपर्ण, अश्वपर्णा, इत्यादि वनस्पतींच्या नांवांवरुन ॠग्वेदकालीं झाडांनां नांवें देण्याची एक पद्धति म्हणजे त्यांच्या पानांच्या आकारावरुन असे. अपुष्पा, अफला, पुष्पवती, फलिनी, सुफला इत्यादि गुणांवरुनहि वनस्पतींचें नामकरण केलेलें दिसतें. घास हा शब्द गवत या अर्थी ॠग्वेदकालींहि रुढ होता. बुध्र्, वल्शा, शाखा, पर्ण, पर्वन् इत्यादि झाडांच्या अवयवांचें वाचक शब्दहिं आढळतात. अथर्ववेदामध्यें वनस्पतींचीं नांवें व प्रकार ॠग्वेदापेक्षां अधिक आढळतात व त्यांतील कांही नांवें आजहि प्रचलित असलेलीं दृष्टीस पडतात. तसेंच बरीच नांवें वनस्पतींच्या गुणांवरुन ठेवलेलीं आढळतात.