प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
दान
दातृनामें (ॠग्वेद) |
१दान- दान म्हणजे देणगी, या अर्थानें ॠग्वेदांत विशेषतः दानस्तुतींत हा शब्द आलेला आहे. ब्राह्मणाच्या विशिष्ट लक्षणांपैकी दक्षणा घेणें व ती दक्षणा इतरांनां आपणांस देण्यास भाग पाडणें हें असे. कन्येचे दान करणें हा एक लग्नाचा (ब्राह्मविवाह) प्रकार आहे. कारण त्या प्रकारांत पिता किंवा कन्येचा भाऊ तिला एखाद्याला दान म्हणून देत असतो. दान या शब्दाचा ‘वांटणे’ या अर्थानें ॠग्वेदांत पुष्कळ ठिकाणीं उपयोग केलेला आढळतो. यज्ञांत देवतांनां हवि अर्पण केला जातो त्यालाहि कोठें कोठें दान हा शब्द योजिला आहे. ॠग्वेदांत सायणांनी एका ठिकाणीं (८.३३,८) दान याचा अर्थ ‘मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थळांतून वाहणारा मद’ (मदजलानि) असा केला आहे. ॠ. २.१३,७ या ठिकाणी रॉथच्या मतें दान याचा अर्थ कुरणाची जमीन असा आहे. व या ठिकाणीं हा अर्थ सायणांनांहि मान्य आहे. ॠ. ५. २७, ५; ७.१८, २३;८. ४६, २४ या तीन ठिकाणीं रॉथच्या मतें दान याचा अर्थ रथाचा घोडा असा असावा. परंतु या स्थलीं देणगी हाच अर्थ योग्य दिसतो.