प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
धर्मशास्त्र ( ऋग्वेद )
धर्मशास्त्र ( ऋग्वेद ) |
१ब्रह्महत्या -- ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाचा वध. यजु:संहितेंतून व ब्राह्मणग्रंथांतून हा अत्यंत गर्हणीय असा अपराध आहे असें म्हटलें आहे. असा वध करणा-यास ब्रह्महन् असें म्हणतात.
२वीरहत्या -- तैत्तिरीय आरण्यकांत उल्लेखिलेल्या गुन्ह्यांपैकी हा एक गुन्हा आहे. जुन्या संहितांग्रंथांत वीरहन् ( मनुष्याला मारणारा ) ह्या शब्दाचा वारंवार उल्लेख आलेला आहे.
३दिव्य -- हा शब्द अथर्ववेद व मागाहून झालेल्या वाङमयात ( पंचविश ब्राह्मण ) आलेला आहे. पण वैदिक वाङमयांत दीव्य करण्याच्या चालीचे कित्येक उल्लेख आलेलें आहेत. अथर्ववेदांमध्यें अग्नीचें दिव्य केल्याबद्दल उल्लेख आहे असें स्क्लॅजिंटवेट, वेबर, लुडविग, झिमर इत्यादि लोकांचे मत आहे. पण तसा उल्लेख नाहीं असें ग्रिल, ब्लूमफील्ड व व्हिटनें ह्यांचे मत आहे. पण पंचविश ब्राह्मणांत ह्या अग्नीच्या दिव्याचा उल्लेख आलेला आहे; आणि तो तेजोमय परशूसह दिव्याचा उल्लेख (ते दिव्य चोरीच्या आरोपाच्या बाबतींत केल्या बद्दल) आला आहे. गेल्डनेरचें असें मत आहे कीं, हा दिव्याचा प्रचार ऋग्वेदांत सुद्धां आलेला आहे. पण हें बरेंच असंभाव्य दिसतें. लुडविग व ग्रिफिथ यांच्या मतानें दीर्घतमाला अग्नीचें व जलाचें दीव्य करावें लागलें असा ऋग्वेदांत उल्लेख आलेला आहे. पण ह्या म्हणण्याला अधार बिलकुल नाहीं. वेबरच्या मतें तुला करण्याच्या दिव्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत आलेला आहे.
४पुंसवन -- अथर्ववेदांत एका सूक्तांमध्यें हा शब्द आला असून ह्याचा अर्थ 'पुरूषोत्पादक' संस्कार असा आहे. हें सूक्त मुलगा होण्याकरितां केलेल्या संस्कारामागून म्हणावयाचें असतें. व ह्याच कामाकरितां ह्या सूक्ताचा कर्मामध्यें उपयोग केलेला आहे.
५गोदान -- शतपथाप्रमाणें ह्याचा अर्थ मिशाचे कल्ले असा दिसतो. तेथें अभिषेक केला जाणारा पुरूष प्रथम आपला उजवा व नंतर डावा कल्ला काढून टाकतो. पुढील ग्रंथांत गोदानविधि अथवा श्मश्रु करविणें हें लग्नाच्या आधीं व मनुष्य वयांत आला म्हणजे मुख्य कर्तव्य असे; परंतु अथर्ववेदांत हा विधि जरी आहे तरी त्याचे गोदान असें नांव तेंथे नाहीं.
६पिंड -- हें पिंड अमावस्येच्या दिवशी अपराण्हकाळीं पितरांस अर्पण केले जात. हा शब्द निरूक्तांत व सूत्रांत अनेकदां आलेला आहे.
७प्रायश्चित, प्रायश्चिति -- याचा अर्थ तप, प्रायश्चित, परिमार्जन असा असून, नंतरच्या संहिता व ब्राह्मणांत हा नेहमीं येतो. प्रत्येक नैतिक धार्मिक बारिक सारिक विधीला सुद्धां कांही प्रायश्चित सांगितलेंलें आहे. सातविधान ब्राह्मणांत प्रायश्चितांची संपूर्ण यादीं दिली आहे.
८स्नातक -- शतपथ ब्राह्मणांत व सूत्रग्रंथांत गुरूच्या हाताखालीं शिक्षणक्रम पुरा केल्यावर त्याची खूण म्हणून ज्यानें स्नान केलें आहे अशा विद्यार्थ्यास हा शब्द लाविला आहे.