प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

  धान्यनामें ( ऋग्वेद )

धान्य -- हा शब्द नपुंसकलिंगी असून तो 'धाना' शब्दापासून झालेला आहें. ह्याचा अर्थ मराठीत प्रसिद्धच आहें. हा शब्द ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांत आलेला आहें. बृहदारण्यकोपनिषदांत दहा प्रकारचीं ( जमीन नांगरून काढलेंली ) धान्यें ( ग्राम्याणि ) आहेतं. तें दहा प्रकार म्हणजे तांदूळ, यव ( व्रीहियवा: ) तिल, उडीद,  ( तिलमाषा: ), अणु, प्रियंगव, मका ( गोधूमा: ), मसूर ( मसुरा: ), खल्व व खालकुल असें होत. ऐतरेय व शतपथ ब्राह्मणं ह्यांत घोडयाला धान्याद म्हणजे धान्य खाणारा असें म्हटलें आहें. ऋग्वेदामध्यें माणसांना धान्य करणारें ( धान्यकृत् ) असें म्हटलें आहें.
बीज -- याचा अर्थ बीं. ऋग्वेदांत आणि तदुत्तर ग्रंथांत पेरणीचा पुष्कळ वेळां उल्लेख येतो. हा शब्द अलंकारिक रीतींनें उपनिषद् ग्रंथांतून उपयोगांत आणिला आहें. तेथें जन्माप्रमाणें झालेल्या जातींना हा शब्द लावला आहें. छांदोग्योपनिषदाप्रमाणें ह्या जाती तीन आहेत, पण ऐतरेय अरण्यकाप्रमाणें चार आहेत. पहिल्या यादींत अण्डज, जीवज आणि उद्भिज्ज असें तीन प्रकार आहेत, व दुस-या प्रमाणें स्वेदज हा आणखी चौथा प्रकार आहें. स्वेदज म्हणजें हवेंतील उष्ण ओलाव्यामुळें उत्पन्न झालेंलें. यांत कीटक, माशा इत्यादिकांचा समावेश होतो.
यव -- ऋग्वेदांत कोणतेहिं धान्य या अर्थी हा शब्द आढळतो. अथर्वांत आणि नंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ जव किंवा सातू हा आहें. जवाचा हंगाम वसंतानंतर उन्हाळ्यांत येतो.
अणु -- वाजसनेयि संहिता आणि बृहदारण्यकोपनिषद ह्यावरून हें एका धान्याचें नांव असावें असें दिसतें.
आम्ब -- तैत्तिरीय आणि काठक संहितांत व शतपथ ब्राह्मणांत ज्याला नाम्ब म्हणतात त्या धान्याचें हें नांव आहें.
खल्व -- एक जातीचें धान्य किंवा द्विदल जातीचें रोप. वेबरच्या मताप्रमाणें बहुतकरून वाजसनेयि संहितेंतील सर्व प्रकारच्या धान्याच्या यादींत याचाहि निर्देश आहें. आणि 'दृषंद' च्या योगानें त्याची डाळ करितात असा उल्लेख अथर्वांत आहें. बृहदारण्यकोपनिषदांतहि हा शब्द आला आहें. आणि श्रीशंकराचार्य त्याचें निष्पाव असें स्पष्टीकरण देतात.
गर्मुत -- तैत्तिरीय संहितेंतील एक प्रकारच्या रानवाटाण्याचें नांव. काठक संहितेंत गार्भुत म्हणजें 'वाटाण्याचा केलेला' हें विशेषण आहें.
गोधूम -- गोधूम म्हणजें गहूं. यजुसंहिता व ब्राह्मण हयांत अनेक स्थळीं हा शब्द आला असून ह्याची व्रीहि व यव यांपासून भिन्नता दर्शविली आहें. ह्या धान्यापासून 'सक्तुः' देखील करीत असत. शतपथ ब्राह्मणांत हा शब्द एकवचनीं आला आहें.
जर्तिल -- ह्याचा अर्थ रानतीळ असा असून हे तीळ यज्ञाच्या वेळीं हवनांस अयोग्य म्हणून तैत्तिरीय संहितेंत सांगितलें आहें. शतपथांत हें तीळ खाल्ले असतां शरीराची वाढ होण्यासारखे गुण त्यामध्यें आहेत असें म्हटलें आहें.
१०तिल -- अथर्ववेदांत व तदुत्तर ग्रंथांत ह्याचा अर्थ तिल किंवा तिळाचें झाड ( ज्याच्या पासून चांगलें तेल निघतें असें ) असा आहें. ह्याचा उडीदाबरोबर नेहमीं उल्लेख केला जातो. तैत्तिरीय संहितेंमध्यें ही दोन्हीं धान्यें हेमंत व शिशिर या ऋतूंत होतात असें म्हटलें आहें. तिळाच्या झाडाची चिपाडें जळणाच्या उपयोगीं येत व तिळाचा अन्नाकरितां ( तिलौदन ) उपयोग होई.
११नीवार -- अरण्यांतला तांदूळ. हा शब्द यजुर्वेदांत व ब्राह्मणग्रंथांत आलेला आहें.
१२मसूर -- द्विदल धान्य. हा शब्द तैत्तिरीय संहिता, वाजसनेयि संहिता व बृहदारण्यकोपनिषदांत आला आहें.
१३माष -- म्हणजे उडीद. हें नांव तैत्तिरीय संहिता व तदुत्तर ग्रंथ यांतून आलें आहें. हें धान्य हल्लीं सुद्धां प्रसिद्धच आहे. अथर्वांत त्याची डाळ कांडल्याचा उल्लेख आहें. हेमंतांत म्हणजे हिवाळयांत ह्याचें बीज पक्क होई. श्रौतकर्मप्रसंगी यज्ञार्थ नररूंड २९ माषाला विकत घेत असत. या शब्दाचा अर्थ धातूचें वनज असा कांही वाटत नाहीं. परंतु असा अर्थ नंतरच्या ग्रंथांत सापडतो. यजु:संहितेंत माष त्याज्य मानलेला आढळतो.
१४मुद्र -- म्हणजे मूग. हें नांव तैत्तिरीयसंहितेंत भाजांच्या यादींत आढळतें. शांखायन आरण्यकांत आणि सूत्रांत द्विदलासहित तांदुळाच्या रश्श्याचा उल्लेख केलेला आढळतों.
१५व्रीहि -- म्हणजे तांदूळ. हा शब्द ऋग्वेदांत कधीहि आला नाहीं, पण अथर्व वगैरे उत्तरवाङमयात वारंवार आढळतो. तांदूळ हिंदुस्थानच्या आग्नेय भागांत प्रथम उत्पन्न होत असावेत, म्हणून ऋग्वेदांत त्याचा उल्लेख आलेला नाहीं. तैत्तिरीय संहितेंमध्यें पांढरा व काळा तांदूळ याची तुलना केली आहे, व ह्या संहितेंत काळा, लवकर होणारा ( आशु ) व मोठा तांदूळ ( महव्रिहि ) असें वर्णन आलें आहें. कदाचित हा लवकर वाढणारा तांदूळ म्हणजे पुढें ज्याला वार्षिक ( साठ दिवसांत तयार होणारा असें नांव मिळालें ) तो असावा. व्रीहि व यव यांची जोडी संहिता ग्रंथांत आढळते.
१६श्यामाक -- म्हणजें सांवा. हा शब्द उत्तरकालीन संहिता व ब्राह्मणांत आलेला आहें. ह्या धान्याच्या हलकेपणाबद्दल अथर्वात उल्लेख आलेला आहें. कारण त्यांत असें म्हटलें आहे की, 'ते बीं वा-यानें सहज उडून जाई. हें कबूतरांचे अन्न आहे असाहि उल्लेख तेंथें आला आहें. छांदोग्यउपनिषदांत श्यामाक व त्यांचे बीं (तंदुल) ह्यांचा उल्लेख आलेला आहे, व त्याचा अर्थ मॅक्समुल्लर केनेरी बी असा करितो.
१७तण्डुल -- अथर्ववेद वगैरे पुढील वाङमयात याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदांत तण्डुलाचा उल्लेख नाहीं व ऋग्वेदकालांत तांन्दुळाची लागवड होत असल्याचाहि उल्लेख नाहीं. तैत्तिरीय संहितेंत कर्ण ( फुटलेला ) तांदूळ व अकर्ण ( न फुटलेला ) तांन्दुळाचा उल्लेख आहें.
१८बिस -- अथर्ववेदकालीं कमलांतील अत्यंत कोमल तंतूचां लज्जतदार पदार्थ म्हणून उपयोग करीत असत. याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मण व ऐतरेय आरण्यक यांमध्यें आहें.
१९मुलालिन् -- अथर्ववेदांत उल्लेखिलेल्या खावयाच्या कमळाच्या एका भागाचें हें एक नांव आहें.
२०शालि -- पुढील वाङमयात याचा अर्थ तांन्दूळ असा झाला. परंतु रॉथची अशी कल्पना आहे की अथर्ववेदांतील 'शारिशाका:' शब्दातींल 'शारि' याला तुल्य असा हा शब्द आहें. सायणाचार्यांच्या मतानें 'शारिशाका' हें एका प्राण्याचें नांव आहें. तेव्हां त्यांतील शारि हें पद वेगळें काढून त्याचा शालि असा अर्थ करणें ठीक नव्हें.
२१सस्य -- अथर्ववेद व तदुत्तर ग्रंथांत याचा सर्वमान्य अर्थ धान्य असाच आहे. अवेस्तामधील 'हह्य' शब्दाप्रमाणें हा शब्द आहें.
२२कुल्माष -- छांदोग्य उपनिषदांत हा शब्द अनेकवचनीं असून टीकांकारांनी त्याचा अर्थ 'कुत्सिता माषा'   ( घाणेरडे वाटाणें ) असा केला आहें. बोथलिंग यानें आपल्या कोशांत हाच अर्थ दिला आहें. लिटल हा निरूक्तावरून याचा अर्थ अंबट कांजी असा देतो.
२३खलकुल -- हा शब्द बृहदारण्यकोपनिदषांत आलां असून सायणांनी 'कुलत्थ' एक प्रकारचें कडधान्य असें त्याचें स्पष्टीकरण केलें आहें.
२४नाम्ब -- शतपथ ब्राह्मणांत उल्लेख असलेल्या एका धान्याच्या जातीचें हें नांव आहें. तैत्तिरीय व काठक संहितेंत आंब असें रूप आढळतें.
२५प्लाशुक -- हा शब्द शतपथ ब्राह्मणांत व्रीहि ( तांदूळ ) याचें विशेषण म्हणून आला आहें. व तेथें त्याचा अर्थ लवकर उगवणारा असा आहें.
२६मसूस्य -- हा शब्द तैत्तिरीय ब्राह्मणांत येतो. टीकाकांरांच्या मतानें हें एका उत्तरदेशीय धान्याचें नांव आहें.