प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.    
                
नक्षत्रांचीं स्थाने.- ही नक्षत्रें आकाशांत कोणकोणत्या स्थानीं स्थित आहेत याबद्दल वैदिक वाड्·मयांत निश्चित माहिती उपलब्ध नाहीं. पण मागाहून झालेल्या ज्योतिष ग्रंथांत या नक्षत्रांच्या स्थानांचे बरोबर वर्णन आलेलें आहे व पूर्वीच्या ग्रंथांत जी माहिती आलेली आहे तिच्याशी ही पुढील ग्रंथांत आलेली माहिती बरीच जुळते. तरीपण वेबरला याबद्दल बरीच शंका आहे. पुढें जी माहिती दिली आहे तिला सूर्यसिध्दांतावर दिलेल्या व्हिटनेच्या टीपांचा आधार आहे.

(१) कृत्तिका.- या नक्षत्रपुंजांत आलेल्या सांत ता-यांचीं नांवे यजुर्वेदांत आलेली आहेतच व त्या नांवांत अभ्रयंती (ढग उत्पन्न करणारी) मेघयंती (मेघाच्छादित करणारी) वर्षयंती (पाऊस पाडणारी) अशीं नांवे आली आहेत. कृत्तिका या शब्दाचा अर्थ कदाचित् जाळें (कृत्-सूत काढणे या शब्दापासून) असा असावा.
 
(२) रोहिणी.- याचा अर्थ तांबूस रंगाचे असा आहे. हें नक्षत्र कोणतें हें ओळखण्यास ऐतरेय ब्राह्मणांतील (३.३३) प्रजापतीची कथा उपयोगी पडते. या कथेंत असें वर्णन आलें आहे कीं प्रजापति कामासक्त होऊन आपल्या मुलीचा पाठलाग करुं लागला असतां मृगव्याधानें त्रिकांड बाणानें त्या मारलें. प्रजापति म्हणजे नि:संशय मृगपुंज होय. मृगशिर: हें मृगपुंजाच्या डोक्यावर असलेल्या लहानशा पुंजास नांव दिलेलें आहे.

(३) मृगशीर्ष किंवा मृगशिरस्.- यालाच इन्वका किंवा इन्वगा म्हटलें आहे. अथर्ववेदाच्या शांतिकल्पामध्यें यांना अंधका म्हटलें आहे व त्यांचें हें नांव पडण्याचें कारण त्या अंधुक दिसतात हें आहे.

(४) आर्द्रा.- या शब्दाचा मूळ अर्थ ओला किंवा दमट असा आहे पण ज्याअर्थी शांखायन गृह्यसूत्रांत व नक्षत्रकल्पांत अनेक वचनी आर्द्रा: असें नांव आलेलें आहे व तैत्तिरीय ब्राह्मणांत द्विवचनी बाहू असें नांव आलें आहे त्यावरुन या नक्षत्रपुंजांत दोन किंवा दोहोंहून अधिक तारे असावेत असें दिसतें. ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे की या आर्द्रा नक्षत्राला सद्दश असलेल्या चिनी सिऔ मध्यें सात तेज:पुंज तारे आहेत व हे तारे म्हणजे मृगपुंजाचे खांदे, मेखला व गुडघे होत.

(५)  पुनर्वसू (जे पुन:संपत्ति देतात ते).- या नांवावरुन दोन ता-यांचा बोध होतो. या नांवाचा नि:संशय अश्विनांच्या परोपकारी स्वभावाशीं संबंध आहे व यांचें त्यांच्याशी साम्य आहे.

(६) तिष्य किंवा पुष्य.- हा एक अंधुक गट आहे. हा शब्द एकवचनी वापरला आहे हें आश्चर्यकारक आहे. कारण प्रथमत: पुष्य या शब्दानें एका ता-याचा बोध होत असावा असें म्हणावें तर या गटांत एकहि नक्षत्र स्पष्ट दिसणारें नाही.

(७)  आश्रेषा: किंवा आश्लेषा.- कांही ग्रंथांत हे शब्द आश्रेषा किंवा आश्लेषा असेहि आलेले आहेत. या शब्दांचा अर्थ आलिंगन देणारा असा आहे व हे शब्द तद्दर्शित तारकापुंजाला पूर्णपणें जुळतात.

(८) मघा (महादान).- या शब्दाच्या बदली 'अनघा' पापरहित असाहि पर्याय शब्द आहे. या अनघा शब्दावरुन या ता-यांच्या पावित्र्याची कल्पना होते.

(९.१०) फल्गुनी फल्गुन्यौ, फल्गू, फल्गुनी:, फल्गुन्य.- हा नक्षत्रपुंज ता-यांच्या दोन पुंजांचा बनलेला आहे व त्या पुंजांनां पूर्वे व उत्तरे अशी नांवे आहेत. वेबरच्या मतें या शब्दाचा अर्थ ॠग्वेदांत आलेल्या अर्जुनी या ता-याच्या पर्यायवाचक शब्दाप्रमाणें शुभ्रवर्ण तारकापुंज असा आहे.

(११) हस्त.- हा हाताच्या पांच बोटांप्रमाणें पांच प्रमुख ता-यांनी बनलेला आहे. गेल्डनेरच्या मतें ॠग्वेदांत (१.१०५,१०) ज्या पांच बैलांचा उल्लेख आलेला आहे तो हा पांच तारे मिळून झालेला तारकागण होय.

(१२) चित्रा (चकचकीत).- हा तारा खरोखर सुंदर आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत इंद्राच्या कथेमध्ये याचा उल्लेख आला आहे व त्याचप्रमाणें शतपथ ब्राह्मणांत (२.१,२,१३) 'दिव्य श्वानौ' दोन स्वर्गीय कुत्रे यांच्या कथेंत आला आहे असें मॅकडोनेल म्हणतो. पण मूळांत 'दिव्यश्वानौ'चा उल्लेख नाही.

(१३) स्वाति किंवा निष्टया.- हें नक्षत्र उत्तरेस आहे अशाबद्दल शांतिकल्पांत उल्लेख आला आहे व त्यांत असें म्हटलें आहे की हें नेहमी उत्तरेस जात असतें (नित्यं उत्तर मार्गगम्). तैत्तिरीय ब्राह्मणांत (१.५,२) प्रजापतीवर एक कल्पना बसविली आहे. तींत चित्रा हें प्रजापतीचें डोकें, हस्त हा त्याचा हात, विशाखे या त्याच्या मांडया, अनूराधा उभें राहण्याची जागा व निष्टया हें त्याचें हृदय अशी ही कल्पना आहे. पण निष्ट्या हें ३० अंश दुर असल्यामुळे या रुपकांतील मजा नाहीशी झालेली आहे. निष्ट्याच्या जागी चित्रा नक्षत्र जर कल्पिलें तर हें प्रजापतीचे रुपक चांगले खुलेल. पण वेबरने असा जरी मुद्दा पुढें आणलेला आहे तरी निष्ट्या हा कन्या राशीतील एक तारा आहे असें व्हिटनेस वाटत नाही. कारण तो असें म्हणतो की निष्ट्या (बहिष्कृत) या शब्दावरुन असें दिसते की हें नक्षत्र वादविषयीभूत इतर नक्षत्रांपासुन दूर असावें

१४) विशाखे.- या तारकाद्वयालाच अमरकोशांत मागाहून राधा असें नांव दिलें आहे व हें थोडेंसें आश्चर्यच आहे की अथर्ववेदामध्यें 'राधे विशाखे' (विशाखे अभ्युदय करणा-या आहेत) असे शब्द यावेत. परंतु राधा हा जो शब्द आहे तो मागाहून घुसडला असावा असें दिसतें. कारण यानंतरच्या नक्षत्राचें नांव अनूराधा असें आहे व त्याचा अर्थ 'राधेच्या मागाहून येणारें' असा चुकीनें केला गेल्यामुळें विशाखे नक्षत्राला राधा नांव दिलें गेलें असावें.

(१५) अनूराधा: किंवा अनूराधा.- (प्रसन्न किंवा अनुग्रह करणारी) हे वृश्चिक राशींतील तारे आहेत.

(१६) रोहिणी - ताम्रवर्णी, ज्येष्ठघ्नी (सर्वांत वडील असेल त्यास मारणारी) किंवा ज्येष्ठा (सर्वांत मोठी). हे वृश्चिक राशींतील तारे आहेत.

(१७) विचृतौ (मुक्त करणारे) म्हणजे मूल व मूलबर्हणी (उपटून टाकणारा). हेहि वृश्चिकांतील तारे आहेत.

(१८,१९) अशाढा.- (न जिंकलेलें). यांत दोन भेद आहेत; पूर्वा: व उत्तरा:. कदाचित् या सर्व तारकापुंजांत चतुष्कोणाकार चारच तारे प्रारंभीं समाविष्ट केले असावेत.

(२०) अभिजित्.- हा एक तेज:पुंज असा नक्षत्रपुंज असून तो उत्तर ध्रुवाकडे ६० अक्षांशावर आहे. पण या नक्षत्रपुंजाचें हें स्थान तत्सद्दश आरबी व चिनी नक्षत्रगणाच्या स्थानाशीं मुळीच जुळत नाही. यावरुन ओल्डेनबर्ग यानें असें अनुमान काढिलें आहे की हा पुंज नक्षत्रमालिकेंत मागाहून घुसडलेला असावा. पण हा नक्षत्रगण मैत्रायणी संहितेसारख्या (२.१३,२०) प्राचीन ग्रंथांत सुद्धां आलेला आहे ही गोष्ट त्यानें लक्षांत घेतली नाही व त्यामुळें त्याचें अनुमान आपोआपच लंगडे पडतें. तैत्तिरीय ब्राह्मणांत (१.५,२,३) अभिजिताचें असें वर्णन आलें आहे कीं अभिजित् अशाढांचे वर व श्रोणाचे खालीं आहे. यावरुन वेबरनें असें अनुमान काढिलें आहे की त्याचें आकाशांतील स्थान वैदिक काली आरबी मनाझिल व चिनी सिऔ यांच्या ठिकाणाशीं जुळतें असावें. पण व्हिटनेनें असें सिद्ध केलें आहे की वर व खाली हे शब्द खरोखर अभिजिताच्या यादीतील स्थलाला उद्देशून आहेत, म्हणजे 'अशाढांच्या नंतर व श्रोणाच्या अगोदर अभिजित् आहे' अशा अर्थानें आलेले आहेत.

(२१) श्रोणा (लंगडा) किंवा श्रवण (कान).- वेबरनें अगदी निष्कारण असा एक तर्क बसविला आहे की श्रवण या नांवावरुन दोन कान व त्यामध्यें एक डोकें असा अर्थ होतो. हे नक्षत्र मनाझिल व सिऔ यांच्याशीं अगदी विसद्दश आहे व तें केवळ हिंदी कल्पनेनें निर्माण केलेलें आहे.

(२२) श्रविष्ठा: (अतिशय प्रसिद्ध) किंवा  धनिष्ठा: (अतिशय श्रीमंत).- हा नक्षत्रपुंज हि-याच्या आकारासारखा आहे. श्रोणा किंवा श्रवण या नक्षत्राप्रमाणेंच हें नक्षत्रहि मनाझिल व सिऔ यांच्याशी विसद्दश आहे.

(२३) शतभिषज् किंवा शतभिष.- याचा अर्थ 'शंभर वैद्य असलेला' असा आहे. याच्या भोंवती बरेच तारे असल्यामुळें याला संख्येच्या अजमासानें शतभिषज् असें नांव दिलेलें आहे.

(२४,२५) प्रोष्ठपदा.- (स्त्रीलिंगी अनेक वचनीं). याचा अर्थ 'घडवंचीचे पाय' किंवा (शांतिकल्पांत आलेल्या) भद्र पदा: म्हणजे शुभपाय असा आहे. हे दोन नक्षत्रपुंज असून पूर्वे व उत्तरे अशीं त्यांची नांवें आहेत.

(२६) रेवती.- याचा अर्थ श्रीमंत असा आहे व याच्या योगानें ब-याच ता-यांचा (सुमारें ३२) निर्देश केला जातो.

(२७) अश्वयुजौ.-घोडयावर सरंजाम घालणारे दोन असामी असा याचा अर्थ आहे. अश्विन्यौ व अश्विनी अशी यांची मागाहून प्रचारांत आलेलीं नांवें आहेत.

(२८) अपभरणी:, भरणी:, किंवा भरण्य:- (वाहक) ही नांवे मेष राशींतील उत्तरेकडे असलेल्या त्रिकोण करणा-या ता-यांनां दिलेली आहेत.