प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

 पक्षिनामें [ॠग्वेद]

अद्मसद.-हा शब्द (शब्दश: अर्थ ''भोजनाला बसणारे.'') ॠग्वेदांत ''मेजवानीचा पाहुणा'' अशा अर्थी वारंवार उपयोगांत आणिलेला दिसतो. परंतु गेल्डनेर या शब्दाचा अर्थ ''माशी'' असा करतो. कारण ती अन्नावर बसते.
उलूक.- ॠग्वेद आणि तदुत्तर ग्रंथांत हा शब्द दिवाभीताकडे योजितात. हा पक्षी त्याच्या ओरडण्याविषयीं प्रसिद्ध आहे. आणि त्याचें ओरडणें म्हणजे कांही अशुभाचें द्योतक असावें असें समजतात. अश्वमेधसमयीं दिवाभातें जंगली झाडांनां अर्पण करीत असत. कारण त्यांची वस्ती तेथेंच असे.
कपोत.-बहुतकरुन हें 'पारवा' या पक्ष्याचें नांव ॠग्वेद आणि नंतर आलेलें आहे. कांही कांहीं उता-यांत निर्ॠति (अपघात, अशुभ) याचा दूत उलूक याचेंहि हेंच नांव असावें असें वाटतें. 'अशुभसूचक पक्षि' असा जो पारव्यावर आरोप आहे तो बहुतकरुन प्राचीन समजुतीच्या आधारानें असावा. आणि भरतभूमी पलीकडेहि अशीच समजूत आहे.
कोक.-ॠग्वेद आणि अथर्ववेद या ग्रंथावरुन याचा अर्थ कोकिळ असा आहे. तीन ठिकाणी हा शब्द आला असून त्याचा अर्थ सायणमताप्रमाणें चक्रवाक असा आहे. अथर्ववेदांतील शब्दाचें भाषांतर विनाशक अन्योपजिवी प्राणी असें रॉथ करितो.
गृध्र.-'गिधाड,' 'गिधार' ॠग्वेद व नंतर हा शब्द आला आहे. त्याची शीघ्र गति आणि खराब मांस खाण्याची प्रीति हीं प्रामुख्यानें वर्णिलीं आहेत. साधारणपणें हा शब्द कोणच्याहि हिंस्त्र पक्ष्याला लावतात आणि गृंध्रामध्यें श्येन (गरुड) हा वरिष्ठ समजला जातो.
चक्रवाक.-बहुतकरुन आवाजावरुन पडलेलें हें बदकाचें नांव असावें. हिंदींत त्याला चक्वा आणि इंग्रजींत ब्राह्मणी डक् असें म्हणतात. हें नांव ॠग्वेदांत आणि यजुर्वेदांतील अश्वमेधींय बळींच्या यादींत आलें आहे. हें नांव अथर्ववेदांत वैवाहिक प्रेमाचें व विश्वासाचें द्योतक आहे. तसेंच रोमन व ग्रीक वाङ्मयांत त्याचें हेंच स्वरुप दाखविलें आहे.
चाष.-याचा अर्थ निळया रंगाचा काष्ठकूट पक्षी असा आहे. याचा उल्लेख ॠग्वेदामध्यें व त्याच प्रमाणें यजुर्वेदामध्यें अश्वमेध यज्ञाचे वेळीं जे प्राणी बलिदानास विहित म्हणून सांगितले आहेत त्यांमध्यें आहे.
चिच्चिका.- चिच्चिका हा शब्द ॠग्वेदांतल्या एका ॠचेंमध्यें आलेला आहे व त्याचा उल्लेख वृषारव या तितक्याच अप्रसिद्ध शब्दाबरोबर केलेला आहे. हे शब्द पक्षि शब्दाचे बोधक आहेत. या चिच्चिका शब्दाची दारिल यानें कौशिक सूत्रावर केलेल्या टीकेंत उल्लेख केलेल्या 'चिठ्ठ्क' शब्दाशीं तुलना करतां येईल.
तक्वन् -'तक्ववी' या दोन शब्दांचा अर्थ ॠग्वेदामध्यें 'जलद उडणारा पक्षी' असा आहे. सायणमतानें तक्वन्चा अर्थ जोरानें व जलद चालणारा तरतरीत घोडा असा आहे.
१०मयूर.- 'मोर' हा शब्द सामासिक शब्दांत ॠग्वेदांत येतो. येथें तयाचा अर्थ इंद्राचे घोडे (मयूररोमन् म्हणजे मोराच्या पिसाप्रमाणें केस असलेले) किंवा मयूर शेप्य=मोराच्या शेपटीसारख्या असलेले) असा आहे. यजुर्वेद संहितेंतील अश्वमेध प्रसंगींच्या दिलेल्या बळीच्या यादींत मोरांचाहि समावेश झाला आहे. लांडोरी ('मयूरी') चा अथर्ववेद व ॠग्वेद यांतून उल्लेख केला आहे व तोहि तिचा विषावर कांही उतार म्हणून केला आहे. मोरांच्या पिसांबद्दल सांप्रतकाळींहि कांही लोकांत एक प्रकारचा तिटकारा दिसतो.
११रोपणाका.-ॠग्वेदामध्यें व अथर्ववेदामध्यें एका पक्ष्याचें हें नांव आहे. तेथें याचा सारिका असा अर्थ असावा. पण कौशिक सूत्रावरील टीकाकार केशव याचें असें मत आहे कीं या शब्दाचा अर्थ एका प्रकारचें लांकूड असा असावा.
१२वर्तिका.-ॠग्वेदामध्यें लांडग्याच्या पंजांतून हिला आश्विनांनी सोडविली असा उल्लेख आलेला आहे. यजुर्वेदामध्यें अश्वमेधांचे वेळीं बलि दिले जाणा-या प्राण्यांचे यादींत हिचें नांव आलेलें आहे.
१३वायस.- ॠग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें मोठा पक्षी अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. 'कावळा' असा या शब्दाचा अर्थ फक्त षडिंश ब्राह्मणांत आलेला आहे.
१४शकुन.-'पक्षी,' हा शब्द ॠग्वेदामध्यें व तदुत्तर ग्रंथांत वारंवार आलेला आहे. याचा नेहमींचा अर्थ मोठा पक्षी किंवा शुभाशुभ सूचक पक्षी असा आहे. झिमर, या शब्दाची ग्रीस मधल्या शुभाशुभ दर्शविणा-या पक्ष्याक्षीं तुलना करतो.
१५शकुनि.-हा शब्द शकुन पक्ष्याप्रमाणेंच आलेला आहे. पण या शब्दावरुन भविष्यज्ञानाचा विशेष स्पष्ट बोध होतो. हा पक्षी श्येन किंवा सुपर्ण यांच्याहून लहान होता. तो खुणा सांगत असे व अशुभाची वार्ता अगोदर सांगे. ज्या ठिकाणीं याचा उल्लेख अश्वमेध यज्ञाचे वेळीं बलि दिले जाणा-या प्राण्यांच्या यादींत येतो त्या वेळीं या शब्दानें निराळया जातीच्या पक्ष्याचा उल्लेख केला असला पाहिजे. पुढें पुढें त्याला नहिरीससाणा म्हणूं लागले. पण दग्धकाक (डोमकावळा) असाहि याचा अर्थ असूं शकेल. तैत्तिरीय संहितेवरील भाष्यकाराच्या मतें कावळा असा याचा अर्थ आहे. इतरत्र हा शब्द अनेकदां आलेला आहे.
१६शुक.-'राघु.' हा शब्द ॠगवेदामध्यें आलेला आहे व त्यांत अशी इच्छा प्रकट केलेली आहे कीं, काविळीचा पिवळेपणा हा शुक व रोपणाका यांच्याकडे जावा. यजुर्वेद संहितेमध्यें अश्वमेधाचे वेळीं बलि दिले जाणा-यांच्या यादींत या पक्ष्याचें नांव आलेलें आहे. हा पीतवर्ण असतो व त्याला मनुष्यासारखी वाणी असते असें वर्णन तैत्तिरीय व मैत्रायणी संहितेंत आलेलें आहे असें कांही पाश्चात्य पंडितांचें मत आहे. ब्लूमफील्डचे मतानें अथर्ववेदांतल्या शारिशाका या अस्पष्टार्थी शब्दाच्या शाका या शब्दार्थाबद्दल शुक हाच शुद्ध पाठ बरा दिसतो.

X शुशुलूक.-- ॠग्वेदांत शुशुलूकयातु या समासांत हा शब्द आलेला आहे व तो एका राक्षसाच्या नांवाचा दर्शक आहे. सायणाच्या मतानें या शब्दाचा अर्थ लहान घुबड असा आहे. मैत्रायणी संहितेंत अश्वमेधाचे वेळीं बळि दिले जाणा-यांच्या यादींत 'शुशुलूका' या स्त्रिलिंगी रुपांत हें नांव आलेलें आहे.

१७श्येन.--ॠग्वेदामध्यें हें एका प्रबळ हिंस्त्र पक्ष्याचें नांव आलेलें आहे. बहुतकरुन हा पक्षी म्हणजे गरुडपक्षी असावा. वैदिक कालानंतरच्या वाङ्मयांत याचा अर्थ बहिरीससाणा किंवा त्याच्या सारखा एखादा पक्षी असा असावा. हा सर्व पक्ष्यांत अतिशय जलद चालतो व त्यामुळें लहान पक्ष्यांत भीतिदायक असतो; याच्या अंगांत शक्ति अतिशय असते. त्यामुळें तो पक्ष्यांच्या समुदायालासुद्धां भारी होतो; त्याचा पहारा मनुष्यावरहि असतो (नृचक्षस्); अशा प्रकारचे उल्लेख ॠग्वेदांत आहेत. यावरुन तो आकाशांत उंचावरुन जातो हें अनुमान निघतें. तो स्वर्गातून सोम आणतो असाहि उल्लेख आहे.
१८सुपर्ण.-'चांगले पंख असलेला'. हें एका हिंस्त्रपक्ष्याचे नांव आहे व तें नांव गरुडपक्षी किंवा गिधाड याचें असून ॠग्वेदामध्यें व उत्तरकालीन ग्रंथांत आलेलें आहे. ज्या ठिकाणी 'मृताचें मांस खाणारा' असा अर्थ अभिप्रेत आहे त्या ठिकाणीं या शब्दाचा गिधाड असा अर्थ घेतला पाहिजे. जैमिनीय ब्राह्मणामध्यें क्रौंचपक्ष्याप्रमाणें नीरक्षीरविवेक करणा-या गरुडपक्ष्याचा उल्लेख आला आहे. ॠग्वेदामध्यें सुपर्णाला श्येनाचा पुत्र म्हटलें असून दुस-या एका ठिकाणीं हे निराळे आहेत असें म्हटलें आहे. यावरुन झिमरला असें वाटलें कीं, बहिरीससाणा असा याचा अर्थ असावा. अथर्ववेदामध्यें या सुपर्णाच्या ओरडण्याचा उल्लेख आलेला आहे व तो डोंगरांत रहातो असेंहि याचें वर्णन आलें आहे.
१९हंस.--ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यामध्यें हा शब्द आलेला आहे. पक्षी नीलपृष्ठ आहेत, ते जमावानें राहतात, पाण्यांत पोहोंतात, मोठा आवाज काढतात व रात्रीं जागृत असतात असें त्यांचे वर्णन आलेलें आहे. हंस पक्ष्याला सोम नीर विवेक (पुढें नीर क्षीर विवेक अशी त्याची ख्याती झाली) आहे असें यजुर्वेदांत म्हटले आहे. अश्वमेधाचे वेळीं तो बली दिले जाणा-यांपैकीं एक आहे असेंहि त्याच्याबद्दल म्हटलें आहे.
२०हारिद्रव.--ॠग्वेदामध्यें पिवळया रंगाचा अशा अर्थी एका पक्षाचें हें नांव आलें असून हा पक्षी म्हणजे पिवळा जलखंजन पक्षी असावा. गेल्डनेर या पक्ष्याची ग्रीक लोकांतल्या Xapadpios या पक्षाक्षीं तुलना करतो.
२१क्रुञ्च, क्रौंञ्च-'चोंच व पाय लांब असलेला व आंखूड शेंपटीचा पक्षी', अथवा 'पाणलावा' याच्या दर्शक हीं निरनिराळीं रुपें आहेत. दूध आणि पाणी एकत्र केलें असतां पाण्यापासून दूध निराळें काढावयाचें हा जो मागाहून हंसाचा म्हणून प्रसिद्ध गुण, तो गुण पूर्वी वरील पक्ष्याचें अंगीं असे, असें म्हणत.
२२तित्तिर किंवा तित्तिरी-ज्याला मराठींत कवडा म्हणतात त्याचे हें नांव असून तें मागाहून झालेल्या संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांमध्यें आलेलें आहे. या पक्षाचें तित्तिर नांव त्याच्या ध्वनीवरुन पडलेलें आहे, या पक्ष्याचें बहुतरुन (निरनिराळया रंगाचे पंख असलेला) असें वर्णन आलेलें आहे. या पक्ष्यालाच दुसरें नांव कपिंजल व कलविंक असें आहे.
२३विदीगय.-तैत्तिरीय संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यांमध्यें हा शब्द एका प्राण्याचें नांव म्हणून आलेला आहे. तै.सं.वरील भाष्यांत याचा अर्ध कुक्कुटविशेष म्हणजे एक प्रकारचा कोंबडा असा केलेला आहे, व तै. ब्राह्मणावरील टीकेत त्याचा अर्थ पांढरा बक (श्वेत वक:) असा दिलेला आहे.
२४शितिकक्षि.-तैत्तिरीय संहितेमध्यें सायण याचा अर्थ शुभ्र पोटाचा (पांढरोदर) गृध्र असा करितात. हा शब्द नुसतें विशेषणहि असूं शकेल.
२५सघन.-हें एका पक्ष्याचें नांव आहे. कदाचित् गरुडपक्षी किंवा गृध्र असावा. हा शब्द तैत्तिरीय संहिता व तै. ब्राह्मण यांमध्यें आलेला आहे.
२६मशक.-'चावणारी माशी' अथवा 'चिलट.' अथर्ववेदांत याला तृप्रदंशिन् (म्हणजे फार लवकर चावणारी) असें म्हटलें आहे. या माशीला एक जहरी नांगी असते व ती या नांगीचा उपयोग बहुधा हत्तीवर करते. या प्राण्याचा उल्लेख इतरत्रहि आढळतो.
२७रघट.-अथर्ववेदांत पैप्पलाद शाखीय संहितेंत रघट: हा पाठ आहे. रॉथच्या मताप्रमाणें रघव हा पाठ बरोबर आहे. ब्लूमफील्डनें या शब्दाचा अर्थ श्येन असा केला असून त्याला रॉथचा तर्क मान्य आहे. लुड्विग मधमाशी हा अर्थ सुचवितो. परंतु पक्षी हा अर्थ बरोबर असावा असें वाटतें.
२८वयस् .-अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यांत पक्षी या अर्थी सामान्य नाम म्हणून हा शब्द आला आहे. वरील ग्रंथातच जनावरें व माणसें यांचें वय अशा अर्थानेंहि या शब्दाचा उपयोग केला आहे.
२९शरभ.-या शब्दाचा अर्थ टोळ असा असून अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखीय संहितेंत शरभ हा पाठ आहे. हा पाठ घेतला म्हणजे अर्थहि चांगला होतो असें व्हिटनेचें मत आहे.  
३०कोकिल.-हा शब्द आर्षकाव्यें व तदनंतरचे ग्रंथ यांमध्यें बरेच वेळां आलेला आहे. वैदिक काळांत काठक अनुक्रमणींतील एका राजपुत्राच्या नांवावरुन तो निघाला असावा.
३१मटची.-हा शब्द छांदोग्योपनिषदांत आला आहे व तेथें कुरुंवर मटचीनीं गर्दी उडविली असा उल्लेख केला आहे. शंकराचार्य याचा अर्थ 'वज्र' (अशनय:) असा करतात. आनंदतीर्थ आपल्या टीकेत याच ठिकाणीं पाषाणवृष्टय: (म्हणजे गारांचा वर्षाव) असा दुसरा पाठ देतात; शब्दकल्पद्रुम याचें मत सुद्धां आनंदतीर्थाप्रमाणेंच आहे; व त्यांत मटची म्हणजे एक लाल पक्षी (रक्त वर्ण, क्षुद्र पक्षि विशेष:--पाठ-पक्षी असा) अर्थ दिला आहे. या शब्दाचा 'टोळ' असा अर्थ असावा असें जेकब म्हणतो.