प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 
                   
नक्षत्रे व महिने.- ब्राह्मणग्रंथांत नक्षत्रांची नांवें तिथी दर्शविण्याच्या कामीं उपयोगांत आणिली जात असत. ही क्रिया दोन त-हेनें केली जाई. नक्षत्राचें मूळचें नांव जर स्त्रीलिंगी नसेल तर तें स्त्रीलिंगी करुन त्याचा पूर्णमासाशीं समास केला जाई. उदाहरणार्थ, तिष्यापूर्णमास म्हणजे तिष्य नक्षत्रांतील पौर्णिमा. पण नेहमीचा प्रकार म्हणजे नक्षत्राच्या नांवाचें विशेषण बनवून त्याचा पूर्णमासी शब्दाबरोबर उपयोग करावयाचा किंवा अमावास्या शब्दाबरोबर करावयाचा (उदाहरणार्थ फल्गुनी पूर्णमासी) किंवा सूत्रांतील प्रमाणें नक्षत्र नामापासून साधलेल्या विशेषणाचाच पौर्णिमा दर्शविण्याकडे उपयोग करावयाचा. नक्षत्राच्या नांवापासून तयार झालेलें नांव महिन्याला दिलें गेलें. पण या प्रकारच्या नांवाचे फक्त फाल्गुन, चैत्र, वैशाख, तैष्य व माघ एवढेच महिने ब्राह्मण ग्रंथांत आलेले आहेत. पूर्ण नांवांची यादी पुढें सांपडते ती अशी आहे-फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, प्रौष्ठपद, अश्वयुज् कार्तिक, मार्गशीर्ष, तैष्य व माघ. खरें पाहिलें असतां हे चांद्रमास असले पाहिजेत. पण चांद्रवर्षाचा उपयोग फार थोडा करीत असत. तैत्तिरीय ब्राह्मण कालापासूनच लोकांमध्यें चांद्रमासाचा द्वादशमासी सौरवर्षाच्या ३० दिवसांच्या महिन्यांशीं मेळ घालण्याकडे कल होता.