प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
पितर व पितरसंबंधीं [ॠग्वेद]
१अग्निदग्ध | कव्य | पितृतम |
अग्निश्वात्त | दक्षपितृ | पितृवत् |
अंगिरस् | दशग्व | पितृवित्त |
अंगिरस्वत् | दशग्विन् | पितृषद् |
अथर्वन् | देववंद्य | पित्र्य |
अनग्निदग्ध | नाराशंस | पित्र्यवती |
ऊम | पज्र | भृगु |
ॠव्क | पितुकृत्तर | साध्य |
[तै.सं.] | ||
अग्निश्वात्त | चित्रसेन | सतोवीर |
अमृध्र | पितर | सुदेष |
इंषुबल | बर्हिषद् | सोमप्रतीक |
उरु | ब्राह्मण | सोम्य |
ऊम | क्योधस् | स्वभानु |
कृछ्रेश्रित् | व्रातसाहस् | स्वादुषंसद |
गमीर | शक्तिवत् | |
( अथर्व वेद ) | ||
अग्नितप्त | पितृ | वधूदर्श (वधूला पाहणारे) |
अग्निदग्ध | पितृमत् | |
अनग्निदग्ध | पितृसदन | सनीड |
उक्थशस | पूर्वज | स्वंग |
कव्यवाहन | पृथिविसद् | हविरद |
धर्मसद् | बर्हिषद् | हविष्प. |
दिविषद् | रातिषाच् |
१अग्निदग्ध - हें नांव (अग्निना दग्धं) चितेमध्यें जाळून जी मृत शरीरें भरुम होत होतीं त्यांनां लावलें जात असे. प्रेतांची जी दोन प्रकारची व्यवस्था लावतात त्यांपैकी ही एक आणि दुसरी पुरणें (अनग्निदग्ध-अग्नीनें न जळलेलें) ही होय. प्रेतांची व्यवस्था करण्याच्या आणखी दोन पद्धती अथर्ववेदांत सांगितल्या आहेत एक फेंकून देणें (परोप्ता:) आणि दुसरी प्रेतांनां उघडया जागेंत ठेवणें (उद्धिता:). ह्या शब्दांचा बरोबर खात्रीलायक अर्थ सांगतां येत नाही. झिमर म्हणतो कीं इराणी लोकांत पशूंनां खाण्याकरितां म्हणून प्रेत फेंकून देण्याची जी चाल आहे तिचें आणि पहिल्या शब्दाचें साम्य आहे आणि दुसरा शब्द निराश्रित म्हातारे (ॠ. ८.५१,२) जेव्हां निष्काळजीपणानें वागविले जातात त्यांनां लागूं पडतो. व्हिटने म्हणतो की दुसरा शब्द कसल्यातरी उंच चबुत-यावर मृत शरीर ठेवतात त्याला लागू पडतो. असें स्पष्ट दिसतें की मृत मनुष्यास त्याच्या कपडयांसह त्याच्या हातांत धनुष्य देऊन पुरीत असत. आणि बहुतकरुन रानटी लोकांत बायकोला नव-याबरोबर जाळावयाची जी चाल आहे तीदेखील त्या वेळी अमलांत होती असें वाटतें. परंतु वैदिक कालांत ह्या दोन्ही चालीत बंरीच सुधारणा झाली आहे. मृताचा मुलगा मृताच्या हातांतून धनुष्य काढून घेतो आणि मृताच्या पत्नीला मृतापासून मृताचा भाऊ अथवा त्याचे आप्त यांनीं दूर न्यावयाची चाल वैदिक कालीं असल्याचें आढळतें. मृत मनुष्य व जिवंत माणसें यांनां वेगळें करण्याकरितां त्यांच्यामध्यें एक दगड ठेवीत असत. अथर्व वेदांत (१८.२,२५) प्रेतें ठेवण्याच्या पेटीचा संबंध आलेला आहे. दोन्ही संहितेंत मातीचें घर (भूमिगृह) असा उल्लेख केलेला आढळतो. ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणें मृतांस जाळल्यानंतर त्यांची हाडें राहतात तीं पुरावयाची म्हणून पुरणें हा शब्द योजिला आहे परंतु हा अर्थ धरुन पुरणें आणि जाळणें यांतील फरक नाहींसा करणें अयोग्य आणि अशक्य आहे कारण जाळणें आणि पुरणें ही दोहीं कामें एकाच वेळी ग्रीस देशांत पुष्कळ वषेंपर्यंत होत होतीं. तथापि प्रेताला अग्नि देणें ही चाल देखील सर्वसाधारण होती व ती पुढें वाढत गेली. कारण परलोक मिळविण्याकरितां प्रेताला दही लेपून, कपडे घालून आणि भूषणें चढवून जाळण्याची जी चाल होती ती चुकीची होती असें छांदोग्य उपनिषदांत वर्णन आहे आणि वाजसनेयी संहितेंत जे प्रेतसंस्काराचे मंत्र दिले आहेत त्यांत फक्त दहनाचाच विचार केला आहे. येथें पुरणें यासंबंधी जे मंत्र आहेत त्यांत फक्त स्मशानांत राख पुरण्याबद्लचाच उल्लेख केलेला आढळतो. ॠग्वेदांत जें प्रेतसंस्कारविषयक सूक्त आहे त्यावरुन आपणांस असें आढळतें की प्रेताला चरबींत ठेवीत असत आणि प्रेताला परलोकाचा रस्ता दाखविण्याकरितां प्रेताबरोबर एक बकरा जाळीत असत. प्रेताला परलोकीं जातांना बसून जाण्याकरितां त्याच्या बरोबर एक बैल जाळीत असत असा अथर्व वेदांत (१२.२,४८) उल्लेख आहे. जरी मृताचे डोळे सूर्याकडे जातात, श्वास वायूकडे जातो अशी कल्पना होती तरी मृत मनुष्य पुन्हा सर्व अवयवांसह जिवंत होतो असाहि समज असल्याबद्ल शथपथ ब्राह्मणांत (४.६,१,१) उल्लेख आहे. प्रेतानें पुन्हा पृथ्वीवर येऊं नये म्हणून त्याला जाळण्यापूर्वी अथवा मूठमाती देण्यापूर्वी त्याच्या पायाला फासा किंवा बिडी अडकवीत असल्याबद्ल अथर्ववेदांत (५.१९,१४) उल्लेख आहे.