प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.               

पैतृकनामें (संहितेतर)

अजीगर्तसौयवसि - ऐतरेय ब्राह्मणांत (७.१५) शुनःशेपाच्या बापाचें नांव म्हणून हा शब्दं आला आहे. हा सूयवस्चा मुलगा असावा.
अभ्यग्नि ऐतशायन- याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत (६.३३) आला आहे. याच्या बापाचें नांव ऐतश. आपल्या मुलापुढें कांही मंत्रपठण करीत असतां ते मंत्र अश्लील आहेत असें समजून त्याचा मुलगा अभ्याग्नि यानें त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याचे मंत्रपटण बंद पाडलें त्यामुळें  यानें रागवून तुझें कुल अत्यंत पापी होईल असा शाप दिला व त्याप्रमाणें सर्व और्व कुलांतील त्या ऐतशायन पुत्र अभ्यग्नीला व त्याच्या संततीला पापिष्ट समजूं लागलें असें तेथे म्हटलें आहे. शांखायन ब्राह्मणांत (३०.५) वरील प्रमाणेंच गोष्ट असून तेथें ऐतशायनाला और्वकुलोत्पन्न न म्हणतां भृगुकुलोत्पन्न म्हटलें आहे. और्य व भृगु यांचा अगदीं निकट संबंध अथवा एकाच कुलाच्या या दोन शाखा असाव्या. ॠग्वेदापासून यांचा एकत्र उल्लेख आढळतो.
अश्वतरअश्वि- ऐतरेय ब्राह्मणांत (६.३०) हें बुलिल याचें पितृप्राप्त नांव आहे. सायणतानें हा अश्व याचा मुलगा व अश्वतर याचा वंशज आहे. सत्रांतील कांही शंसनासंबंधी गौश्ल याच्याबरोबर याचा कांही संवाद झाल्याबद्दल तेथें उल्लेख आहे.
आत्रेय- बृहदारण्यकोपनिषदांत (२.६,३) मांटीचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (८.२२) अंग राजाचा पुरोहित म्हणून एका आत्रेयाचा उल्लेख आहे. शतपथ ब्राह्मणांत (१.४,५,१३) गर्भाला अत्रि म्हटलें आहे व गर्भरूप ॠतूचा स्राव होणा-या (ॠतुमती) स्त्रीला आत्रेयी म्हटलें आहे.
आरुणि- उद्दालक याचें हें पैतृक नांव आहे. याचा उल्लेख जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण (२.४,१) आणि काठक संहितेंत (१३.१२) आहे.
आरुणेय- औपवेशि याच्या कुलांतील उद्दालक आरुणि याचा मुलगा श्वेतकेतु याचें हें पितृप्राप्त नांव आहे. याचा शतपथ ब्राह्मण (१०.३,४,१) व छांदोग्य उपनिषद् (४.३,१) यात उल्लेख आहे.
आर्तभागीपुत्र- बृहदारण्यकोपनिषदांत (६.५२) हा शौंगीपुत्र याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. आर्तभागी पुत्र व शौंगीपुत्र ही दोनहि नांवे मातृप्राप्त म्हणजे मातेच्या नांवावरून आलेलीं आहेत.
आविक्षित- मरुत्त याचें पितृप्राप्त नांव. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत (१३.५,४,६) व ऐतरेय ब्राह्मणांत (८.२१) आला आहे. या मरुत्ताचें कामप्रि असें दुसरें नांव होतें.
आश्वत्थ्य- अहीना याचें पितृप्राप्त नांव. याला सावित्राग्नीसंबंधी ज्ञान असल्याबद्दल तैत्तिरीय ब्राह्मणांत (१०.९,१०) उल्लेख आहे. तेथें हा सावित्राग्नीच्या ज्ञानानें, हिरण्मय रूप होऊन स्वर्गास गेल्याचा उल्लेख आहे.
१०आह्नेय- शोच याचें मातृप्राप्त नांव. स्वाध्यायासंबंधी जे नियम आहेत त्यांत ग्रामाच्या बाहेर जाऊन अध्ययन करावें असा नियम आहे. परंतु ग्रामाबाहेर जाणें शक्य नसेल तर ग्रामांतच अध्ययन करावें असें मत याचें असल्याचा तैत्तिरीय आरण्यकांत (२.१२) उल्लेख आहे.
११उद्दालकआरुणि-अरुणाचा मुलगा उद्दालक हा मोठा प्रसिद्ध अध्यापक होऊन गेला. शतपथ ब्राह्मणांत (११-४,१२) उल्लेखिल्याप्रमाणे तो कुरुपंचालापैकी ब्राह्मण होता या विधानाला तो प्रोतिकौसुरू बिंदिकौशांबि (शतपथ १२, २,२,१३) याचा गुरू असून त्याचा मुलगा श्वेतकेतु हा पंचालांच्या सभेंत प्रवाहणपुत्र जैवलि राजा याच्या बरोबर वाद करावयास गेल्याबद्दल बृहदारण्यकांत (६.२,१) जो उल्लेख आहे त्यानें दृढता येते. याचा पिता अरुण हा पातंजल काव्य याचा शिष्य असून प्रसिद्ध याज्ञवल्क्य वाजसनेय आणि कौषीतकि याचा शिष्य होता. (बृह. ३.७,१) दुस-या एका स्थलीं याला (बृह. ३.७,२२) याज्ञवलक्याने निरुत्तर केल्याचा उल्लेख आहे. यानें प्राचीनयोग्य शौचेय (शतपथ ११.५,३,१) आणि अजातशत्रव भद्रसेन (शतपथ ५.५.५.१४) यांनां वादांत जिंकिल्याचा उल्लेख आहे तो गौतम होता अशाबद्दल शतपथ ब्राह्मण (११.५.३.२) आणि कौषीतकि उपनिषद् (११) यांत उल्लेख आहे. त्याची धार्मिक व तत्त्वज्ञानासंबंधी विशिष्ट मतें प्रमाण मानिली जात अशाबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१.१,२,११,३.३,४,१९). बृहदारण्यक उपनिषदांत (३.५,१) छांदोग्य उपनिषदांत (३.११,४) व ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहे. गेल्डनेर म्हणतो कीं, मैत्रायणी संहितेत याचा व याचा बाप अरुण याचाहि उल्लेख आहे. वेबर म्हणतो कीं याचा उल्लेख काठक संहितेंत (७.८) हा दिवोदास भैमसेनि याच्या समकाली असल्याबद्दल व जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत वसिष्ठाला चैकितान याच्याकडे उपदेश घेण्यासाठी गेल्याचा व तेथे त्याला गौतम या नांवानें संबोधिल्याचा (१.४२,१) उल्लेख आहे. तैत्तिरीय संहितेंत (७.२,३१) कुसुरबिंद अद्दालकि (उद्दालक पुत्र) याचा उल्लेख आला आहे आणि तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.११,८) ज्याला भाष्यकार सायण उद्दालक म्हणतात तो नचिकेतस् वाजश्रवस्  गोतम याचा मुलगा होता. आपस्तंब सूत्रांत एका गोष्टीत त्याचें मत प्रमाण म्हणून मानलें आहे आणि ही गोष्ट आरुणांच्या कालासंबंधी महत्त्वाची आहे.
१२ऐभावत- इभावताचा वंशज. हें प्रतीदर्श याचे पितृप्राप्त नांव असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१२.८,२३) उल्लेख आहे.
१३ऐरावत- इरावताचा वंशज. धृतराष्ट्र सर्पासुर याचे हें पितृप्राप्त नांव असल्याबद्दल पंचविंश ब्राह्मणांत (२५, १५,३) उल्लेख आहे. त्यांत वर्णिलेल्या सर्पसत्रांत हा ब्रह्मा नामक ॠत्विज होता.
१४ओदन्य- उदन्य अथवा ओदन याचा वंशज. शतपथ ब्राह्मणांत (१३.३,५.४) ब्रह्महत्येसंबंधी प्रायश्चित सांगणारा मुंडिभ याचें हें पितृप्राप्त नांव आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.९,१५;३) याचाच उल्लेख आहे परंतु तेथे तो भ्रूणहत्येच्या पातकसंबंधी प्रायश्चित सांगणारा म्हणून आला आहे.
१५औदुंबरायण- उदुंबराचा वशज. निरुक्तांत (१.१) एक वैयाकरणि म्हणून याचा उल्लेख आहे.
१६औपमन्यव- हें नांव पुष्कळ अध्यापकांनां लावललें आढळून येतें. बौधायन श्रौतसूत्रांत (२२.१) एका मंत्राच्या पठणासंबंधी नियम सांगणारा म्हणून याचा उल्लेख आला आहे. यास्काचार्याच्या निरुक्तांत एक व्याकरणकार म्हणून याचा उल्लेख ब-याच ठिकाणीं आला आहे. पक्ष्यादिकांची जीं नावें पडतात तीं त्या पक्ष्याचा जो ध्वनि असतो त्यावरून पडतात या मताचा औपमन्यव यानें तेथें निषेध केला आहे.
१७औपवेशि- उपवेशाचा वंशज. उद्दालकपिता अरुण याचें हें पितृप्राप्त नांव. याचा उल्लेख काठक संहितेंत (२३.१०) आला आहे.
१८ओपोदिति- उपोदित याचा वंशज. तैत्तिरीय संहितेंत तुमिंजय याचें हें पितृप्राप्त नांव आहे. (१.७,२;१) बौधायन श्रौतसूत्रांत कुरूंचा स्थपति (सेनानी) व्याघ्रपाद याचा मुलगा गौपालायन याचें हें पितृप्राप्त नांव आहे. शतपथ ब्राह्मणांत (१.९,३;१६) उपोदिता नामक स्त्रीचा मुलगा म्हणून औपोदितीचा उल्लेख आला आहे.
१९और्णवाभ-ऊर्णवाभीचा वंशज. बृहधारण्यकोपनिषदांत (४.५,२६) कौण्डिन्य याच्या शिष्याचें हें नांव आहे. यास्काच्या निरुक्तांत याचा उल्लेख आलेला आहे. तेथे दोन ठिकाणीं (७.१२) तो नैरुक्त नामक व्याकरणकारांच्या मताचें अनुकरण करतो व दोन ठिकाणीं (६.१३,१२,१) ऐतिहासिक यांच्या मताचें अनुकरण करतो. यावरून सीज म्हणतो कीं, हा सर्व संग्राहक असा होता.
२०कूशां व स्वायवलातव्य- पंचविंश ब्राह्मणांत (८.६,८) याचा उल्लेख आला आहे. याचें स्पष्ट नांव म्हणजे लातव्य कुलांतील स्वायूचा मुलगा कूशाल्य असें आहे. तेथें एका सामासंबंधानें याचा उल्लेख आला आहे.
२१काक्षसेनि. कक्षसेनपुत्र, पंचविशब्राह्मणांत (१.१.१२) अभिप्रतारिन् याचें पितृप्राप्त नांव म्हणून उल्लेख आहे. याचा दृत ऐंद्रोत याच्याबरोबर ज्ञानी व अज्ञानी लोकांच्या संबंधी संवाद झाल्याचा उल्लेख आहे.
२२कात्यायनीपुत्र- गौतमीपुत्र व कौशिकीपुत्र यांचा हा शिष्य असल्याद्दल बृहदारण्यकोपनिषदांत (६.५,१) उल्लेख आहे. शांखायन आरण्यकांत (८.१०) जातूकर्ण्य नामक एका कात्यायनीपुत्राचा उल्लेख आहे.
२३कापिलेय- ऐतरेय ब्राह्मणांत (७.१७) शुनःशेपाला विश्वामित्रानें मृत्यूपासून सोडविल्यानंतर आपल्या मांडीवर घेतलें. त्याचा बाप अजीगर्त हा शुनःशेपाला परत मांगू लागला असतां शुनःशेप हा माझा मुलगा आहे व हे कापिल आणि बाभ्रव याचें बंधु आहेत असें विश्वामित्रानें उत्तर दिल्याचा तेथें उल्लेख आहे., यावरून कापिल व बाभ्रव हे विश्वामित्राच्या कुलांतील असावेत असें दिसतें.
२४काप्य- (कपिवंशज) जैमिनीय ब्राह्मणांत (३.२,३३) बिभिंदुकीय यांच्या सत्रांत आर्त्विज्य करणा-या सनक आणि नवक यांचे पैतृक नांव. बृहदारण्यकोपनिषदांत (३.२,१) पातंचल यांचेहि काप्य हें पैतृक नांव आहे.
२५काबन्धि- कबन्धाचा वंशज. गोपथब्राह्मणांत (२.१०,१८) याचा उल्लेख आहे. तेथें याला अथर्वण असें म्हटलें असून पहिल्या उता-यांत (२.९) मातेच्या आज्ञेवरून तो मांधाता यौवनाश्व नामक सार्वभौम राजाच्या यज्ञाला गेला आणि तेथे त्यानें यजमान व ॠत्विज यांनां कांही प्रश्न विचारल्याचा उल्लेख आहे आणि दुस-या उता-यांत (२.१८) अग्न्याधानांसबंधी आख्यायिकेंत जलापासून उत्पन्न झालेल्या ज्या अश्वापासून चारहि वेद भीति पावले त्या अश्वाचें या काबन्वीनें शमन केल्याचा उल्लेख आहे. याला विचारिन्  असेंहि दुसरें नांव आहे.
२६कामलायन- कमलाचा वंशज. उपकोसल याचें पितृप्राप्त नांव. ह्या उपकोसलानें सत्यकाम जाबाल याच्या घरी बारा वर्षे अध्ययनासाठीं राहूनल त्याच्या अग्नीची परिचर्या केली. परंतु सत्यकामानें याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला नाहीं. शेवटीं अग्नीनें प्रसन्न होऊन याला उपदेश केला.
२७ काश्यप- हें एका विस्तृत अशा कुलाचें नांव आहे. शतपथ ब्राह्मण (७.५,१.५) प्रजापतीनें उत्पन्न केलेल्या सर्वच प्रजा काश्यप (कश्यपकुलोत्पन्न) आहेत असें म्हटलें आहे.
२८कृष्ण देवकीपुत्र- छांदोग्योपनिषदांत (३.१७, ३) पुरातन अशा घोर आंगिरसाचा हा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. ग्रेअर्सन, व्हानथोडर आणि दुसरे कांही लेखक म्हणतात की, मागाहून जो अवतारी कृष्ण झाला आहे तो व छांदोग्योपनिषदांतील देवकीपुत्र कृष्ण हे एकच त्यांच्या मतें हा मागील कृष्ण ब्राह्मणधर्मविरोधक व क्षत्रियधर्म प्रवर्तक असा होता(?) हें विधान अत्यंत शंकनीय आहे. ही जी दोन नांवांची सम्यता दिसते ती आकस्मिक घडून आली असावी. अवतारा कृष्ण आणि उपनिषदांतील कृष्ण यांचा सेंटपीटर्सबर्ग कोशाप्रमाणें एकवाक्यता करणें अगदीं अयोग्य आहे.

२९कौत्स- कुत्सवंशज. शतपथ ब्राह्मणांत (१०.६, ५, ९) महिस्थि याचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे. निरुक्तांत (१.१५) वेद अनर्थक (अर्थरहित) आहेत या कौत्साच्या मताचा निषेध दाखविला आहे.