प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.    
               
प्राणी.
खालील प्राणिवाचक शब्दांकडे पाहिलें असतां अश्व व गो यांस असलेली अनेक नांवें व अश्वसंबद्ध अनेक पारिभाषिक व इतर शब्द यांवरुन त्या कालीं या दोन पशूंचें महत्व किती होतें याची कल्पना होते. पक्षांच्या नांवांमध्यें आज आपणास परिचित अशींहि कांही नांवें आढळतात. पक्ष्यांनां नांवें त्याचें रंग, शब्द व गीतें वगैरे गुणांवरुन पडत असत असें दिसतें. सर्पांनां तैत्तिरीय संहितेंत जीं अनेक नांवें आढळतात त्यावरुन त्या कालींहि या मानवशंत्रूचें महत्व तत्कालीन लोकांस पटलें होतें असें दिसतें. चतुरक्ष हें यमाच्या कुत्र्याचें नांव पर्शुभारतीय काळाची आठवण करुन देतें. महाहस्तिन् या शब्दावरुन एखाद्याला गजेन्द्राची किंवा दुस-या एखाद्या मॅमथची आठवण होण्यास जागा आहे! आज सामान्यत: परिचित असणारे प्राणी त्या कालींहि ज्ञात होते असें दिसतें. मुष्काबर्ह या शब्दावरुन अथर्ववेदकाळीं बैल बडवीत असत हें स्पष्ट होतें. व्याघ्र हा शब्द ॠग्वेदांत आढळत नसून अथर्ववेदांत आढळतो यावरुन भरतखंडांतील वसाहतीच्या काळासंबंधीचें व वेदांच्या पौर्वापर्यासंबंधी अनुमान काढण्यास एक जागा मिळते. तसेंच प्राण्यासंबंधी जीं विशेषणें आढळतात त्यावरुन प्राण्यांच्या गुणांविषयीचें तत्कालीन ज्ञान नजरेस येतें.

 अश्वनामें  / अश्वसंबंधी [ॠग्वेद]

अश्व.-ॠग्वेदापासून वैदिक वाङमयांत हा शब्द 'घोडा' या अर्थी नेहमीं योजिलेला आढळतो. घोडयाला आणखी दुसरीं पुष्कळ नांवें आहेत:- अत्य-धांवणारा; अर्वत् -जलद; वाजिन्- ओढण्यामध्यें मजबूत; सप्ति-पळणारा; आणि हय-वेगवान्; घोडीला अश्वा, अत्या, अर्वती, वडवा, इत्यादि बरींच नांवें आहेत. निरनिरांळया रंगाचे घोडे निरनिराळया नांवानीं संबोधितात:- करडा (हरित,हरि), तांबूस (अरुण, अरुष, पिशंग,रोहित), तपकिरी (श्याव), पांढरा (श्वेत) इत्यादि. पांढ-या घोडयाला काळे कान असले म्हणजे तो फार किंमतवान असतो असें अथर्ववेदांत वर्णन आहे. घोडयांची किंमत फार असूनहि ते कमी होते असें नाहीं. कारण दानस्तुतींत ४०० घोडे दिल्याचें वर्णन आहे. कारणप्रसंगीं त्यांच्यावर सोन्यामोत्याचें दागिने चढवीत असत. रथ ओढण्याकडे घोडयाच उपयोगांत आणीत असत. कारण त्या चपल व खात्रीच्या असत. त्यांचा गाडया ओढण्याकडेहि उपयोग करीत असत पण तो क्वचितच. युध्दांत घोडयावर बसत असत किंवा नाहीं याचा जरी उल्लेख नाहीं तरी दुस-या कारणाकरितां घोडयांचा उपयोग होत असे. घोडयांनां पागेंत बांधून चारा पाणी देत असत; त्यांनां बाहेरहि चरावयाला सोडीत असत. परंतु त्यावेळेला त्यांचे पायांनां खोडा घालीत असत. शर्यतीनंतर त्यांनां पाणी पाजीत असत. त्यांच्या मोतद्दारांनां अश्वपाल, अश्वप, अश्वपति, म्हणत असत. घोडे केव्हां केव्हां खच्ची करीत (वध्रि). या शिवाय लगाम (रश्मय:), काढणी (अश्वाभिदानी), चाबूक (अश्वाजनि), यांचा उल्लेख आहे. सिंधुनदीकांठचे आणि सरस्वतीच्या काठचे घोडे फार मौल्यवान् असत.
आजि.- शर्यतींतील चपळ घोडयांनां (वाजिन्, अत्य) धुवून भूषणें चढवीत असत. पिशेल म्हणतो कीं एका शर्यतींतील घोडीचें नांव विश्पला असें होतें. तिचा मोडका पाय शर्यतींत आश्विन् यांनी पुन्हां जोडला होता. परंतु विश्पला हें स्त्रीचें नांव असावें. ॠग्वेदांत जें मुद्रल सूक्त आहे त्यांत अश्वरथ शर्यतीची एक गमतीची गोष्ट आहे. परंतु गेल्डनेरनें दिलेली ही कथा चुकीची आहे असें ब्लूमफील्ड म्हणतो. पिशेल यानें या शर्यती यज्ञादिकांत होत असत असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याचा पुरावा अपूर्ण आहे असें मॅक्डोनेल्ड म्हणतो. तथापि राजसूय यज्ञाचे वेळीं व वाजपेय ऋतूंत शर्यती होत असत.
एत.- अनेक वचनीं (एता:).मरुत् यांचे घोडे असा या शब्दाचा अर्थ होतो. ते शीघ्रगामी हरिणांच्या जातीचे असावे. त्यांचा उल्लेख ॠग्वेदांत पुष्कळ वेळां आला असून त्यांची कातडी मरुत् आपल्या खांद्यावर घेत असत असेंहि म्हटलें आहे. त्यांनां एकदां पृथुबुध्न हें विशेषण ॠग्वेदांत लाविलेलें आहे, आणि त्या शब्दाचे निरनिराळे अर्थ केले आहेत. उदा० 'रुंद-खुराचे,' 'रुंद-छातीचे,' 'रुंद-पृष्ठभाग असलेले.' यावरुन ते हरिण असतील हें संभवत नाहीं.
तार्क्ष्य.-दैवी अश्व-कदाचित् अश्वरुपी सूर्य या अर्थानें-हा शब्द ॠग्वेदांत आलेला आहे. पण फॉय म्हणतो कीं, त्रसदस्यूचा वंशज तृक्षी हां ॠग्वेदांत व पुढेंहि प्रसिद्ध आहे व तृक्षीपासूनच 'तस्य इदं' अशा प्रकारें हा तद्धित शब्द झालेला आहे. तेव्हां तार्क्ष्य म्हणजे तृक्षीचा घोडा असा अर्थ असावा. परंतु हा अर्थ बरोबर आहे असें निश्चितपणें मानतां येत नाहीं.
परस्वत्.-याचा अर्थ मोठें रानटी जनावर असा असून रॉथच्या मतें रानांतलें गाढव असा याचा अर्थ आहे. ॠग्वेदामध्यें वृषाकपि सूक्तांत, अथर्ववेदांत दोनदां व यजुर्वेद संहितेमध्यें अश्वमेधाचे वेळीं बली दिले जाणा-यांचे यादींत याचें नांव आलें आहे. या सर्व ठिकाणीं रानांतलें गाढव हा अर्थ चांगला जुळतो. कौषीतकि उपनिषदांत परश्वा (न्) याचा अर्थ (भाष्यकाराचे मतानें याचा अर्थ साप असा आहे) काय असावा याविषयीं बराच संशय आहे. हा परश्वा व परस्वत् यांचा परस्पर संबंध कदाचित् कांही नसेल. बुल्हरच्या मतें यांचा संबंध पाली भाषेंतल्या पलासाद (गेंडा) या शब्दाशीं असूं शकेल.
प्रष्टि.-याचा प्रष्टयाप्रमाणेंच 'पार्श्वाश्व' असा अर्थ आहे. जुंपलेल्या घोडयांच्या बाजूनें धांवणारा घोढा एवढाच नुसता याचा अर्थ नसून, घोडयांच्या पुढें, घोडयांचा नायक म्हणून जुंपलेला घोडा असाहि त्याचा अर्थ आहे. कारण ॠग्वेदांत पृष्टीला उल्लेखून हा शब्द आला असतां त्याचा अर्थ वर दिल्याप्रमाणें असावा असें वाटतें. या ठिकाणी प्रष्टि हा शब्द मरुतांच्या अश्वांनां वाहणारे (वहति रोहित:) अशा अर्थानें लागू पडतो. एका अथर्ववेदाच्या संदिग्ध वचनांत प्रष्टीचा 'पंचवाही' पांचांनी ओढलें जाणारें, अशा अर्थानें उल्लेख आला आहे. परंतु याचा नीट अर्थ काय हें समजणें फार कठिण आहे. प्रष्टि हा इतरत्रहि बरेंच वेळा येतो. एका वचनांत 'धुयौ' आणि 'प्रष्टयौ' हे शब्द एकत्र आलेले आहेत. धुरीला जोडलेल्या घोडयांच्या दोन्ही बाजूस हे दोन घोडे बांधीत असत असें दिसतें. प्रष्टिमंत, प्रष्टिवाहन्, प्रष्टिवाहिन् ही सर्व विशेषणें 'रथाचीं' आहेत; व त्यांचा अर्थ जुंपलेल्या अश्वांच्या पुढें किंवा बाजूला जुंपलेल्या घोडयांनीं ओढला जाणारा रथ असा आहे.
मर्य.- ॠग्वेदांत पुष्कळ ठिकाणीं हा शब्द आला असून त्याचा अर्थ खच्ची न केलेला घोडा, वळू असा आहे. याचें एके ठिकाणीं 'पस्त्यावत्' 'तबेल्यांत ठेवलेला घोडा' असें वर्णन आलें आहे-म्हणजे फार काळजीपूर्वक पोसलेला, बाहेर चरावयास न सोडलेला, असा घोडा.
मेना.-ॠग्वेदांतील कांही मंत्रांत या शब्दाचा स्त्री हा अर्थ आहे. घोडी किंवा गाय या अर्थी कांही ठिकाणीं या शब्दाचा उपयोग केला आहे.
रोहित्.-ॠग्वेदाच्या कांही ॠचांत तांबडी घोडी व पुढील ग्रंथांत तांबडी हरिणी असा सेंटपीटर्सबर्ग कोशाप्रमाणें या शब्दाचा अर्थ आहे.
१०वाजिन्.-ॠग्वेदामध्यें अनेक ठिकाणी याचा अर्थ घोडा असा आहे. कारण त्याचे अंगी चापल्य व बल हीं दोन्ही असतात. लुडविग म्हणतो त्याप्रमाणें एके ठिकाणीं बृहदुक्थाच्या मुलाचें हें विशेषनाम आहे. पण हा अर्थ ओढाताणीचा दिसतो.
११सप्ति.-ॠग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें याचा अर्थ चपळ घोडा असा आहे.
१२स्यूमगृभ्- ॠग्वेदामध्यें (६.३६,२) हा शब्द घोडयाला लाविलेला असून लगाम तोडून पळून जाण्यास उत्सुक झाल्यामुळें आपल्या दातांनीं लगाम चावणारा घोडा असा याचा अर्थ आहे.
१३अभीशु.- रथाच्या घोडयाचा लगाम दर्शविण्याकरितां हा शब्द वैदिक काळांत (ॠग्वेदांत) प्रचारांत असे. बहुधा दोन, चार किंवा पांच घोडे रथाला लावीत असत म्हणून अनेकवचनीं शब्द वापरला असावा (दशाभीशु).
१४गभस्ति.-ॠग्वेदांतील देवांच्या वाहनाचें स्यूम-गभस्ति (दांडयासारखे लगाम) या विशेषणांत रथाच्या धुरांडया असा या शब्दाचा अर्थ आहे असें रॉथ म्हणतो. तैत्तिरीय ब्राह्मणांत हा अनेकवचनांत स्वतंत्र शब्द आहे. तथापि अर्थबोध बरोबर होत नाहीं. रॉथ म्हणतो कीं, स्यूमगभस्ति म्हणजे एक प्रकारचा दुहेरी लगाम. ॠ.७.७१,३ या ठिकाणी गभस्ति याचा अर्थ लगाम असा सायणभाष्यांत दिला आहे. 'स्यूमगभस्तिम् -सुखरश्मिं स्यूतरश्मिं वा' सायण. ॠ. १.१२२,१५ येथें गभस्ति याचा अर्थ सायण दीप्ति म्हणजे तेज असा देतो. तैत्तिरीय ब्राह्मणांत 'गभस्ति' हा शब्द गभस्तय: असा अनेक वचनांत आला आहे व त्याचा तेथें तेजवान् (दीप्तिमत्) असा अर्थ आहे.
१५पडीश.-घोडयाच्या पायांतला पायबंद असा या शब्दाचा अर्थ पांच ठिकाणीं-ॠग्वेदामध्यें दोन ठिकाणीं व बहदारण्यक, छांदोग्य उपनिषद् व शांखायन आरण्यक यांत-आलेला आहे. इतर ठिकाणीं त्याचा उपयोग लक्षणेंनें आलेला आहे. रॉथचे मतानें याचा शब्दश: अर्थ पाय बांधणें असा आहे. पद्=पाय व बीश हें पद वाजसनेयि संहितेंत वीश् असें लिहिलें असून लॅटिन् भाषेतल्या व्हिन्सिरे-बांधणें या शब्दाशीं सदृश आहे, पाय बांधून ठेवणें असा अर्थ करणें चुकांचें होईल असें पिशेल म्हणतो. कारण, ज्या खुंटीला सिंधू नदीवरील उमद्या घोडयाचा पाय बांधला होता ती खुंटीच तो उपटीत होता असा विलक्षण अर्थ उपनिषदामध्यें करावा लागेल. तेव्हां पायाला खोडा घालणें हा या शब्दाचा अर्थ असावा असें तो सुचवितो.
१६मधुकशा, मधो:कशा.- ज्या योगानें आश्विन् यज्ञाला मधुरपणा, गोडी आणीत अशा अश्विनांच्या 'मधाच्या चाब्रकाचें, हें एक नांव आहे. रॉथ मोठया कल्पनेनें म्हणतो कीं, माथ्याच्या कल्पनेवरुन ही कल्पना सुचली असावी.
१७प्रतोद.-पंचविंशब्राह्मण आणि अथर्ववेद यांत याचा अर्थ व्रात्यांचा 'अंकुश' असा केला आहे. व्रात्य म्हणजे मूळचा रहिवाशी, ब्राह्मणविरहितआर्य-ब्राह्मणाखेरीज इतर आर्य. लाटयायन श्रौत्रसूत्र ८.६,७ या ठिकाणी प्रतोद शब्द आहे व 'प्रतुद्यतेऽनेनेति प्रतोद:' म्हणजे चाबूक असा अर्थ त्या ठिकाणीं आहे. शां. श्रौतसूत्र १४.७२,३ या ठिकाणी सप्रतोद: असा शब्द आहे. सप्रतोद म्हणजे सह प्रतोदेन. या ठिकाणीं प्रतोद याचा अर्थ चाबूक असाच आहे. अथर्ववेद १५.२,७ या ठिकाणींहि प्रतोद शब्दाचा अर्थ चाबूक असा आहे. व्रात्य म्हणजे कोण याविषयीं सायणाचार्य अथर्ववेदाच्या १५ व्या कांडाच्या भाष्यारंभाचे वेळीं 'व्रात्यो नाम उपनयनादिसंस्कारहीन: पुरुष: | सोऽर्थाद् यज्ञादिवेदविहिता: क्रिया: कंर्तु नाधिकारी |  न स व्यवहारयोग्यश्च |’ असें म्हणतात.