प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
( मनोविकार )
इच्छार्थक ( ऋग्वेद ) |
१अध्वर्यु -- ऋग्वेदांतील एका उता-यांत जे पांच अध्वर्यू सांगितले आहेत ते खरोखरी आध्वार्य नसून यज्ञभूमीच्या ठिकाणी जसें धर्मोपदेशक फिरतात त्याप्रमाणें ह्या पांच फिरणा-या तारका आहेत असें हिलेब्रँटचें मत आहे.
२ऋत्विज् -- यज्ञाच्या वेळीं जे निरनिराळया प्रकारचे आचार्य असतात त्या सर्वांना साधारण असा हा शब्द आहे. हें निर्विवाद आहे की सर्व आचार्य ब्राह्मण होते. यज्ञाच्या वेळीं निरनिराळया विधींना जे आचार्य लागत असत त्यांची ठरीव संख्या ( ऋग्वेदावरून ) सात असें असें दिसते. कारण ऋग्वेदांतील एका जुन्या यादींत त्यांची नांवें दिलीं आहेत; तीं होतृ, पोतृ, नेष्टृ, अग्नीध, प्रशारतृ, अध्वर्यु, ब्रह्मा आणि शिवाय यजमान हीं होत. सात ही संख्या ऋग्वेदांत जो सप्त होतृ हा शब्दसमुच्चय वारंवार येतो त्याचा अर्थ विशद करिते आणि तिचा संबंध बहुधा काल्पनिक 'सप्तर्षय: ह्यांच्यांशीं जोडलेला असावा. आणि इराणांतील ह्याच्या आठ ह्या संख्येशीं तिची तुलना सयुक्तिक होईल. सात आचार्यांपैकी मुख्य होतृ. त्याचें काम मंत्र म्हणणें आणि पूर्वी तो मंत्राची रचनाहि करणारा असे. अध्वर्यु हा मंत्रनिर्दिष्ट तांत्रिक काम करी, आणि काम करतांना प्रार्थनामंत्र आणि अशुभ निवारणार्थ प्रार्थनापठण् करीत असे. त्याचा मुख्य मदतनीस अग्नीध् हा असे आणि हें दोघेजण इतर कोणाच्याहि साहाय्याशिवाय बारीक सारीक होम करीत असत. प्रशास्तृ उपवक्तृ, अथवा त्यांचे दुसरें नांव मैत्रावरूण हें दोघे फक्त मोठमोठया यज्ञांत होत्याला कांही सूचना करण्यांत गुंतलेले असत आणि त्यांच्याकडे सामाजिक प्रार्थनेचें काम सोपविलेंलें असें पोतृ, नेष्टृ आणि ब्रह्मा हें सोमयज्ञाच्या विधीला लागत असत. ब्रह्मा ह्याला ब्राह्मणाच्छंसिन् असें दुसरें नांव पूर्वीच्या विधींवर देखरेख करणा-या आचार्याहून हा निराळा असें दर्शविण्याकरिंतां दिलें होंतें. ब्राह्मणाच्छंसी हा ब्रह्माच्या हाताखालचा स्वतंत्र ऋत्विज आहे. ऋग्वेदांत जे इतर आचार्य उल्लेखिले आहेत ते सामगायन करणारे उद्गातृ व त्याच्या हाताखालचा प्रस्तोतृ हे होत आणि प्रतिहर्तृ या दुस-या साहाय्यकाचें जरी वर्णन नाहीं तथापि त्या वेळेला तो माहीत होता. त्याच्या कामावरून असें वाटतें कीं, ही यज्ञाची किंवा विधीची उत्तर पायरी होय आणि ही पायरी म्हणजे एकपक्षीं यज्ञसंबंधी आव्हानाच्या महत्प्रयासानें केलेल्या मालिकांची वाढ आणि दुसरेपक्षीं सोमवल्लीला उद्देशून गाइलेंली लांब लांब गीतें. अच्छावाक, ग्रावस्तुत, उन्नेतृ आणि सुब्रह्मण्य असे दुसरें आचार्य ब्राह्मणांतील सुधारलेल्या श्रौत विधींत आहेत; आणि अशा रीतीनें सर्व संख्या सोळा होते. विधींच्या दृष्टीनें या संख्येचें चार गट केले आहेत, ते असे: ( १ ) होता, मैत्रावरूण, आच्छावाक आणि ग्रावस्तुत; ( २ ) उद्गातृ, प्रस्तोतृ, प्रतिहर्तृ व सुब्रह्मण्य; ( ३ ) अध्वर्यु, प्रतिप्रस्थातृ नेष्टृ व उन्नेतृ; ( ४ ) ब्रह्मा, ब्राह्मणाच्छंसिन्, आग्रीध्र आणि पोतृ. या आचार्याशिवाय एक पुरोहित म्हणून असे आणि त्याचें काम म्हणजे राजाला धार्मिक बाबतींत उपदेश करावयाचा. गेल्डनेर म्हणतो कीं, जेव्हां पुरोहित यज्ञांत काम करीत असे तेव्हां तो ब्रह्मा या आचार्याचें काम करी. म्हणजे त्यानें सर्व विधीवर देखरेख ठेवावयाची असा नियम असें. या त्याच्या म्हणण्याला आधार म्हणजे ऋग्वेदांतील आणि तदनंतरच्या वाङमयातील बरेचसे उतारे ( कीं, ज्यांत ब्रह्मा आणि पुरोहित हें एकच होत असे ) दिलें आहेत; तथापि सयुक्तिक दृष्टीनें ओल्डेन्बर्ग म्हणतो कीं, जुन्या काळीं अशीं गोष्ट नव्हती. त्या वेळेला पुरोहिताचें काम म्हणजें गीतें गाणाराचें होत्याचें काम होतें. ऋग्वेदकाळाला विधींची देखरेख करणारा ब्रह्मा हा माहीत नव्हता. त्यानंतर ब्रह्मा या ऋत्विजाची जागा निर्माण झाली. ब्रह्मा अध्वर्यु, व होता यांना स्वतंत्र ऋत्विक्पद केव्हां प्राप्त झालें याबद्दल विभाग दोन यांत सविस्तर विवेचन आलें आहे. आणि याचें काम म्हणजे यापूर्वी पुरोहित जें करीत असें तेंच; आणि हा पुरोहित इष्टि वगैरेंनी व मंत्रातंत्रांनीं राजाचें आणि राक्षसांपासून यज्ञाचें रक्षण करण्यांत वाकबगार असे. मनुष्यांचा मुख्य पुरोहित जो अग्नि हा देखील होतृ आहे ही गोष्ट आणि वरील विधान यांची एकवाक्यता आहे आणि आप्री सुक्तांतील दोन दैवीहोतृ ह्यांनां ईश्वरी पुरोहित असें म्हणत. दुस-यापक्षीं ऐतरेय ब्राह्मणांत असा कडक नियम आहे कीं, क्षत्रियाजवळ ब्राह्मण पुरोहित असला पाहिजे; आणि तैत्तिरीय संहितेंत वशिष्ठकुलाला ब्रह्मा या पुरोहिताच्या जागेचा खास मान असे. कदाचित् यज्ञसंबंधीं विधींत होतृ याची कामें ब्रह्म्याकडे देणारे हेच पहिले पुरोहित असावेत याचे हें चिन्ह किंवा द्योतक असावे. पुष्कळ वेळां यज्ञ एका विवक्षित मनुष्याकरितां करीत असत. सत्रें किंवा लांबविलेलें याज्ञिक विधी त्यांत भाग घेणा-या सर्व आचार्यांच्या फायद्याकरितां करीत असत. परंतु त्यांच्यामध्यें जे दीक्षित म्हणजे दीक्षा घेतलेले असत त्यांनांच फक्त त्याचा फायदा मिळत असे. राष्ट्राकरिंतां म्हणून यज्ञ होतच नसत. राजाकरितां म्हणंन जो यज्ञ करण्यांत येत असे तो प्रजेच्या कल्याणाकरितांहि असे हें जरी खरें आहे; तथापि कल्याणार्थ म्हणून जी प्रार्थना करीत तिच्यांत फक्त राजा आणि आचार्य यांचींच नांवे असत. केव्हां केव्हां त्यांत अप्रत्यक्ष रीतीनें प्रजेची गुरेंढोंरें व शेती यांची भरभराट व्हावी असाहि उल्लेख असे.
३क्रवण -- हा शब्द ऋग्वेदांत एकदांच आला असून लुडविग्च्या मताप्रमाणे तो होतृ या उपाध्यायाचें किंवा यष्टयाचें नांव असा अर्थ दर्शवितो. रॉथ म्हणतो कीं, हा शब्द विशेषण असा अर्थ दर्शवितो. पहिल्यानें त्याचा अर्थ दिला नाहीं आणि नंतर भित्रा, नामर्द असा अर्थ दिला आहे. सायणाचार्य म्हणतात कीं, त्याचा अर्थ 'पूजा करीत' असा आहे. ओल्डेनबर्ग म्हणतो कीं, याचा अर्थ निश्चित नाहीं. परंतु 'बलींचे हनन करणारा' असा अर्थ असूं शकेल.
४नेष्टृ, नेष्टा -- ऋग्वेदांत व तदनंतरच्या ग्रंथांत सोमयज्ञाचे वेळीं हजर असलेल्या उपाध्यायांपैकी एकाचें हें नांव आहे. यजमानपत्नीच्या कर्माशीं याचा जास्त संबंध येतो.
५पोतृ -- हें एका ऋत्विजाचें नांव आहे. यज्ञकर्मांत असणा-या उपाध्यायांपैकी हा एक ऋत्विज म्हणून यांचे नांव ऋग्वेदांत आलें आहे व त्याचा ब्राह्मणांतून वारंवार उल्लेख येतो. परंतु ओल्डेनबर्गच्या मतें पूढील वाङमयात 'पोतृ' हा कांही महत्वाचा ऋत्विज समजला जात नव्हता. तो केवळ नाममात्र जिवन्त राहिला होता. नुसत्या व्युत्पत्तीवरूनच ठरवावयाचें असतें तर पू=शुद्ध करणें या धातू पासून हा शब्द झाला असल्यामुळें असें वाटतें कीं, सोमपवनाच्या ( शुद्ध करण्याच्या ) वेळीं याचा सोमाची स्तोत्रें गाण्याकडे उपयोग करीत असावेत. पोत्र याचा पोत्याचें पद आणि सोमाचें भांडे असा दुहेरी अर्थ होतो. ऋग्वेदांत सर्व ठिकाणीं 'पोता पावयिता' असा अर्थ केला आहे व तोच योग्य दिसतो.
६प्रशास्तृ -- हें नांव यज्ञाच्या वेळच्या एका याज्ञिकाचें नांव आहे. लहानसहान यज्ञांत हा कांही भाग घेत नाहीं. परंतु हा सोमयज्ञ व पशुयज्ञ यांत भाग घेतांना आढळतो. स्तुतिपाठाच्या ऋचा गातेवेळीं दुस-यांत हा एकटाच व पहिल्यांत होत्याचा मुख्य मदतनीस म्हणून सूक्तें म्हणण्याचें काम करतो. ऋग्वेद व तदुतर ग्रंथ यांतून हा आपल्या नांवानेच उल्लेखिला गेला आहे. याला सुद्धां ऋग्वेदांत उपवक्ता म्हटलें आहे व या शब्दाची उत्पत्ति प्रशास्त्याप्रमाणे ( प्रैष ) आज्ञा करणें, दुस-या पुरोहितावर हुकूम सोडणें या अर्थांत आहे. त्याचें दुसरें नांव मैत्रावरूण असें होतें. कारण त्यानें केलेली स्तुति मुख्यत: मित्र आणि वरूण यांनांच उद्देशून म्हटली जात असे. मित्र आणि व वरूण हे शब्द ऋग्वेदातहि आढळतात. ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणें आप्रीं सूक्तांतील दोन स्वर्गीय होते हें स्वर्गांतील 'होतृ व प्रशास्तृ' या अर्थी आलेलें प्रतिशब्द होत.
७ब्रह्मन् -- हा शब्द ऋत्विज या अर्थी ऋग्वेदाच्या ब-याच ऋचांतून व तदनंतरच्या वाङमयातून नेहमी आढळतो. ऋग्वेदाच्या ब-याच ऋचांतून तो देवांची स्तुति स्तोत्रें गात आहे असा उल्लेख आला आहे. इतरत्र उपाध्याय हे नांव त्याला सार्थ आहे. एक दोनच नव्हें, तर अनेक ठिकाणीं उपाध्यायपणा हा एक धंदा होता असें स्पष्ट म्हटलें आहे. त्याचप्रमाणें कित्येक ठिकाणीं या शब्दाला एक विशिष्ट अर्थहि आहेच व तो अर्थ म्हणजे 'उपाध्यायमंडळाचा एक घटक' हा होय. परंतु यज्ञकर्मात भाग घेणारा उपाध्याय या विशिष्ट अर्थी हा शब्द कोठें कोठें घ्यावयाचा याबद्दल मात्र बराच मोठा प्रश्न आहे. हा शब्द या अर्थी उपयोगांत आला आहे याबद्दल खरी ग्वाही मूर व रॉथ यांनी असल्या प्रकारचीं स्थलें शोधून काढून दिली आहे. गेल्डनर यास मात्र हा अर्थ ब-याच ठिकाणीं घेतांनां फार शंका वाटते. त्याचें म्हणणें असें आहे कीं, पुरोहित हा साधारणत: ब्राह्मण ( संकुचित अर्थांत मात्र ) असें. ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणे यापैकीं बहुतेंक सर्व ठिकाणीं ब्रह्मन्=उपाध्यायच. ( पुरोहित हा तत्वत: याज्ञिक चालविणा-या सामान्य उपाध्यायांपैकी बहुधा नसे. ) यज्ञांत काम करीत असे व तें बहुधा होत्याचेंच असें. हें पौरोहित्य पुढे ब्रह्म्याकडे आलें. हा फरक घडून येण्याचें कारण त्याच्या मताप्रमाणें ऋचांचे महत्व उत्तरोत्तर कमी होत गेलें व यज्ञकर्मांत सर्व व्यवस्था पाहणा-या उपाध्यायावर जास्त जास्त बोजा पडूं लागला व तो आपल्या मांत्रिक शक्तीनें चुकांची दुरूस्ती करूं लागला हें होय. पुढील वाङमयात हे दोन्ही अर्थ अगदीं परिचित असे झाले आहेत.
८ब्रह्मपुत्र -- 'उपाध्यायाचा मुलगा' या अर्थानें कांही थोडया ऋचांतून हा शब्द उपयोगांत आणला आहे. सायणाचार्यांच्या भाष्यांत ब्रह्मपुत्र या पदाचा 'ब्राह्मणाच्छंसी' या अर्थी उपयोग केलेला आहे. यांचे काम म्हणजे शस्त्रपठण हें होय. सायणमतानें उपाध्यायाचा मुलगा या अर्थानें हा शब्द आलेला नाहीं.
९शर्मितृ -- ऋग्वेद व मागाहून झालेंलें ग्रंथ हयांमध्यें 'पशूची हत्या करणारा' व कधीं कधीं 'पाकसिद्धी करणारा' असा ह्या शब्दाचा अर्थ आलेला आहे.
१०होतृ -- वैदिक यज्ञांतला अतिशय महत्वाचा व जुना उपाध्याय महणजे होतृ होय; आणि अवेस्ता मधल्या उपाध्यायाप्रमाणें झओतरच्या तोडीचा तो आहे. और्णवाभ म्हणतात. त्याप्रमाणें हा शब्द हू म्हणजे यज्ञ करणे, आव्हान करणें, या धातूपासून साधला आहे. ह्यावरून असा एक काळ होता कीं ज्यावेळीं होतृ हा याजक आणि गायक, सुद्धां होता पण खुद्द ऋग्वेदांतच होतृ याचीं कामे ठरलीं होती. त्याचें मुख्य काम म्हणजे शस्त्राचें पठण होय. तो जुन्या काळीं राजाचा पुरोहितहि होता पण पुढे हें काम अध्वर्युकडे गेलें.
११प्रतिप्रस्थातृ -- ऋग्वेदोत्तर संहितेंतांतून व ब्राह्मणांतून हें एका ऋत्विजाचें नांव आलें आहे. हा अध्वर्यूच्या हाताखाली काम करीत असतो. याचा ऋग्वेदांत उल्लेख येत नाहीं. परंतु ऋक्संहितेंत एकदां अध्वर्यू (दोन अध्वर्यू ) असा उलेख आला आहे. कदाचित् याचा अर्थ पुढील ग्रंथांतून आल्याप्रमाणें अध्वर्यू आणि प्रतिस्थातृ असा असावा. ओल्डेनबर्गच्या मतें येथें अध्वर्यु आणि अग्निधच उद्दिश्य असावेत. व त्याचा हा तर्क कांहीसा साधार आहें.
१२प्रतिहर्तृ -- प्रतिहर्तृ हें नांव उद्रात्याच्या एका मदतनिसाचें असून सोळा पुरोहिताचे यादींत सांपडतें. हें ऋग्वेदोंत्तर संहिता व ब्राह्मण यांत आढळतें.
१३प्रस्तोतृ -- हा उद्रात्याचा मदतीस असे. ह्याचें काम प्रस्ताव म्हणणें, किंवा 'सामन्' छंदांची प्रस्तावना गाणें हें होतें. ऋग्वेदांत याचा नामनिर्देश नाहीं. ही निव्वळ आकस्मिक गोष्ट असावी. कारण याचें प्रस्तोषत् असें रूप ऋग्वेदांत स्पष्ट आलें आहे. ऋग्वेदांनंतरच्या वाङमयात याचें नांव तर अगदीं वारंवार येते. प्रस्तोत्याचे प्रशास्तृ हें आधींचे नांव आहे असें लुडविग् चुकीनें म्हणतो.