प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
मानवविशेष [ ऋग्वेद ]
ऋग्वेदांतील मानवविशेष, राजे, मानवी स्त्रिया यांच्या संबंधी माहिती पूर्वी दाशराज्ञयुद्ध या प्रकरणांत येऊन गेली असल्यामुळें त्याशब्दांवर येथें टीपा दिल्या नाहींत.
मानवविशेष [ ऋग्वेद ] |
१तुमिजऔपोदिति -- तैत्तिरीय संहितेंमध्यें ( १. ७, २,१ ) सत्राचें वेळी होता ( पुरोहित ) व सुश्रवस् बरोबर वादविवाद करण्यांत गुंतलेल्या एका माणसांचें हें नांव आहें.
२दंडऔपर -- उपराचा वंशज. याचा उल्लेख तैत्तिरीय संहिता ( ६. २, ९, ४ ) व मैत्रायणी संहिता ( ३. ९, ७ ) या ग्रंथांत कोणतेंस व्रत केल्यामुळें आला आहें.
३नाभानेदिष्ठमानव -- ऋग्वेदोत्तर संहिता व ब्राह्मण ग्रंथ यामध्यें याचा बाप मनु यानें आपल्या मिळकतीची वांटणी केली तेव्हां या नाभानेदिष्ठाला प्रथम वांटणीत अजीबात वगळलें पण वडिलांच्या सत्त्यावरून त्याला आंगिरसाकडून जेव्हां गायी मिळाल्या तेव्हां त्याचें समाधान झालें. शांखायन श्रौत्रसूत्रांत हें जें अद्भुत कृत्य आंगिरसांनी केलें त्याची तुलना सूक्तांत आपल्या आश्रयादात्यांची महती गाणा-या इतर द्रष्ट्यांच्या अद्भूत कृत्यांशी केलेली असून या आंगिरसांच्या अद्भूत कृत्यानें ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलांतील बासष्टावें सूक्त निर्माण झालें असेहि म्हटलें आहे. नाभानेदिष्ठाच्या सूक्तांचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथांत वारंवार आलेला आहे. पण हा या सूक्ताचा कर्ता आहें. या पलीकडे दुसरी कांही एक माहिती त्या सूक्तांत मिळत नाहीं. संहिताग्रंथांत एके ठिकाणी तो कवि होता असें म्हटलें आहे. पण हा लेखच जरा संदिग्ध दिसतो. व्युप्तत्तिशास्त्रदृष्ट्या नाभानेदिष्ठ याचा अवेस्तामधील नवानझ्दिष्ट याच्याशी संबंध असावा व त्यावरून पओइरियो-ट्कएषचा फ्रवशी नबानझ्दिष्टचा फ्रवशी यांचाहि संबंध असावा असें वाटते. लॉरेनच्या मतानें या कथेंत इराणी व आर्य लोक यांची जी फारकत झाली तिचा उल्लेख असावा. पण असा उल्लेख असणें अगदीं अशक्य आहे असें रॉथचें ठाम मत आहे त्याच्या मतें नाभानेदिष्ठ याचा अर्थ 'जवळचा नातलग' इतकाच होतो. वेबरनेहिं असें सिद्ध केलें आहे की, या शब्दावरून कोणी कोणापासून शब्द घेतले हें समजणें अशक्यच आहे; पण अवेस्तामध्यें 'जवळचा नातंलग' हा मूळचा अर्थ कायम राहिला आहें. ऋग्वेदांमध्ये हा शब्द विशेषनामच होऊन बसला.
४प्रवर -- होमाचें प्रसंगी आपलें काम कारण्यास्तव अग्नीला कलेलें पाचारण असा वास्तविक याचा अर्थ होतो. परंतु तै. संहितेंत अग्नीला पुरोहितांच्या पूर्वजांच्या नांवानें बोलावीत असत असा उल्लेख आहे. पण तेथें प्रवर शब्दाचा अर्थ दिला नाहीं, 'आर्षेयं वृणीते' असेच शब्द आहेत. प्रवराचा अर्थ 'पूर्वजांची मालिका' असा पुष्कळांनी केला आहे तो आम्हांस मुळींच संमत नाहीं. या विषयीं सविस्तर विवेचन पुढें येईलच.
५बबरप्रावाहणी -- प्रवाहणाचा वंशज. तै. संहितेंत एका मनुष्यांचे हें नांव आहे. आपण मोठा वक्ता व्हावें असें याच्या मनांत होतें; व त्याला भाषासौंदर्यशक्ति, साहित्यज्ञान व वक्तृत्वकला पंचविश नामक यज्ञामुळें मिळाली.
६तक्षक वैशालेय -- (विशाला हिचा वंशज). अथर्ववेदांमध्यें विराज याचा मुलगा म्हणून याचा उल्लेख आहे. पंचविश ब्राह्मणांतहि सर्पसत्रांतील एक ब्राह्मणांच्छसी नामक पुरोहित असा याचा उल्लेख आहे.
७धृतराष्ट्र -- 'ज्याचे राष्ट्र भक्कम पायावर बसलेलें आहे' असा याचा अर्थ आहे. अथर्ववेद व पंचविश ब्राह्मण यामध्यें ऐरावत हें पितृप्राप्त नांव असलेल्या एका सर्परूपी राक्षसांचे हें नांव आहे.
८पुरूदम -- अथर्ववेदामध्यें हा शब्द अनेकवचनी आलेला असून हें स्तोत्यांचे नांव आहे असें लुडविगचें मत आहे. पण रॉथ व व्हिटने याचा अर्थ पुष्कळ घरांचा स्वामी असा करितात.
९प्रतीपप्रातिसत्वन, अथवा प्रातिसुत्वन -- हें एका मनुष्याचें नांव अथर्ववेदांत आलेलें आहे. झिमरची कल्पकता खालील तुलनेत फारच वाखाणण्यासारखी आहे. अथर्ववेदांत परिक्षित हा कुरूंचा राजा असा उल्लेख आला आहे आणि महाभारतांतील वंशावळीप्रमाणें त्याचा नातू प्रतिश्रवस् व पणतू प्रतीप हा होतां. त्याच्याशीं प्रातिसुत्वन ( बहुधा प्राकृत रूप् प्रतिश्रुत्वन ) यांचे विशेष साम्य आहे परंतु हे साम्य मुळींच खरें मानतां येत नाहीं. अथवा ही वशावळि कदाचित् अथर्ववेदांतूनसुद्धां घेतली असावी. कदाचित् याबद्दल स्वतंत्र दंतकथासुध्दा प्रचलित असावी. बोथलिंक याला प्रतिसत्वमम् (सत्वनांच्या अगदीं विरूद्ध दिशेस'), असें रूप् देतो आणि हें कदाचित् बरोबरहि असूं शकेल.
१०बार्हत्सामा -- हा शब्द नियमाविरूद्ध झालेला आहे. याचा अर्थ बृहत्सामन्ची कन्या असा आहे. अथर्वदांतील एका ऋचेंत हिच्या नांवाचा उल्लेख सुलभ गर्भधारणेविषयी आला आहे.
११शांबु -- अथर्ववेदांतल्या एका लेखांत आंगिरसांबरोबर हा शब्द अनेकवचनी आलेला आहे; व हें नांव प्राचीन गुरूंच्या घराण्याचें आहें. शांबव्याचें एक गृह्यसूत्र हल्लीं प्रचांरांत आहें. यांनां अंगिरसां अपत्यभूतेभ्य असें म्हटलें आहें.
१२कोष्टुकि -- 'क्रोष्टुकवंशज. निरूक्त, बृहद्देवता आणि छंदस् यांत हा एक वैय्याकरणी व अथर्ववेदाच्या परिशिष्टांत एक ज्योतिषी होता असें लिहिलें आहें.
१३यक्ष -- मनुष्याचें नांव. गिरिक्षिताचें वंशज जे यक्ष त्यांचा काठक संहितेंत उल्लेख आलेलां आहें.
१४वैजान -- विजनाचा वंशज. सायणाचें मतें पंचविश ब्राह्मणांत वृषाचें हे पितृप्राप्त नांव आहें. वेबरने म्हटल्याप्रमाणें खरा पाठ वैजान असा आहें.
१५शतद्युन्म -- तैत्तिरीय ब्राह्मणांत म्हटल्याप्रमाणें ( १. ५, २, १ ) यज्ञाला अगदी योग्य वेळ कोणती हें ज्ञान असल्यामुळें मत्स्य नांवाच्या पुरोहितानें ज्याला यज्ञेषु याच्या बरोबर भरभराटीच्या स्थितीत आणून सोडलें त्या माणसाचें हें नांव आहें.
१६शाकटायन -- निरूक्त त्याचप्रमाणें प्रतिशाख्य आणि मागाहून झालेलें ग्रंथ यामध्यें ज्याचा उल्लेख आलेला आहें त्या व्याकरणकाराचें हें पितृप्राप्त नांव आहें
१७शाक-पूणि -- 'शकपूणाचा वंशज' वारंवार उल्लेखिलेल्या व्याकरणकाराचें हें नांव निरूक्तामध्यें आलेलें आहें.
१८शाकायनिन् -- शतपथ ब्राह्मणांत ( ५. ४, ५, १ ) अनेकवचनीं या शब्दाचा अर्थ शाकायनाचें अनुयायी असा आहे.
१९शालावत्य -- 'शालावताचा वंशज' छांदोग्य उपनिषदामध्यें ( १. ८, १ ) शिलकांचे व तैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत ( १. ३, ८, ४ ) गलुनस्र आर्क्षाकायनाचें हें पितृप्राप्त नांव आहें.
२०शैलिन, शैलिनि -- 'शिलिनाचा वंशज.' शतपथ ब्राह्मणांत जित्वन्चें हें पितृप्राप्त नांव आहें. याची शैलन शब्दाशी तुलना करण्यास कांही हरकत नाहीं.
२१श्यापर्णसायकायन -- हें एकाम माणसाचें नांव असून शतपथ ब्राह्मणांत म्हटल्याप्रमाणें यज्ञचिती मांडण्याचें वेळीं ज्या पांचांचा बलि दिला गेला त्यांपैकी हा एक मनुष्य आहे. त्याच ग्रंथांत हा गृहस्थ यज्ञवेदि बांधणारा होय असें म्हटलेलें आहे. त्याचा शल्वाशीं कांही तरी संबंध असला पाहिजें. याच्या गोत्रांतील लोंकांचे वर्णन ऐतरेय ब्राह्मणांत आलेलें आहे. तें असें की, हे श्यापर्ण स्वत:ची छाप पाडणारे उपाध्याय असून जरी त्यांनां विश्वंतर राजांनें आपल्या यज्ञांतून बहिष्कृत केलें होतें तरी त्याचा पुढारी मार्गवे यानें त्या राजाचें मन वळवून त्यांनां पुरोहिताचें काम देवविलें. कोठल्या तरी रातींनें श्यापर्णाचा संबंध कुंती लोंकांनी केलेल्या पंचालांच्या पराजयाशी येतो.