प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

मानवी स्त्रिया

 सामान्य व विशेष ( ऋग्वेद )

पुरंधि -- ऋग्वेदांमध्यें अश्विनांची आश्रित असलेल्या एका स्त्रींचें बहुतकरून हें नांव असावें. अश्विनांनी हिला एक हिरण्यहस्त नांवाचा पुत्र दिला. पुरंधि हें विशेष नाम नसून तें 'वघ्रिमतो' चे विशेषण आहे. 'वघ्रिमती' हीं राजाची बायको होतीं. परंतु तिचा नवरा नपुंसक होता.
वघ्रिमती -- 'षंढ नवरा असलेली स्त्री.' हा शब्द ऋग्वेदामध्यें एका स्त्रीचें नांव म्हणून आलेला आहें. या बाईच्या नव-याला पुरूषत्व अश्विनांच्या कृपेमुळें आलें व तिला तिच्या नव-यापासून हिरण्यहस्त हा मुलगा झाला. हा शब्द एकंदरीत वर्णनात्मक असावा.
हस्त्रा -- 'हसणारी बायको' पिशेलच्या मतानें ऋग्वेदामध्यें या शब्दाचा अर्थ वारयोषित् असा आहें.
सुभद्रिका -- वाजसनेयि संहितेमध्यें अश्वमेधप्रकरणांत हा शब्द आला आहे. वेबरच्या मतें हें कांपील नांवाच्या राजाच्या बायकोचें नांव आहे; पण महीधराच्या मतानें अनेक तार असलेली स्त्री किंवा वारयोपित् असा या शब्दाचा अर्थ आहे व हा अर्थ रॉथलाहि मान्य आहें. तैत्तिरीय व काठक संहिता यामध्यें ज्या अर्थी सुभद्रिका हा शब्द नसून सुभगे हे संबोधनार्थी रूप् आलेलें आहें त्या अर्थी या शब्दाच्या अर्थाबद्दल संशयच आहें.
मनावी -- 'मनूची बायको' काठक संहिता व शतपथ ब्राह्मण यांत या नावाचा उल्लेख येतों.
अहल्यामैत्रेयी -- 'अहल्यायै जार' या इंद्राच्या विशेषणावरून पुष्कळ ब्राह्मण ग्रंथांत जी गोष्ट एका स्त्री विषयीं आली आहे त्या स्त्रीचें हें काल्पनिक नांव आहें.
आटिकी -- छांदोग्य उपनिषदांत ( १. १०, १ ) उषस्ति याच्या बायकोचें हें नांव आहें.
जबाला -- छांदोग्य उपनिषदामध्यें ( ४. ४, १-४ ) जारजपुत्र सत्यकाम याच्या आईचें जबाला हें नांव आहें.
मांडवी -- मंडूच्या वंशांतील स्त्री बृहदारण्यक उपनिषदांत एका गुरूच्या नावांमध्यें हा शब्द आढळतों. ( ६. ४, ३० ). वात्सी-मांडवी पुत्र हें त्यांचे नांव आहें. हें नांव काण्व बृहदारण्यकांत नाहीं माघ्यंदिनामध्यें असावें.
१०मैत्रेयी -- बृहदारण्यक उपनिषदांप्रमाणें ( २. ४, १; ४. ५, १ ) हें याज्ञवत्ल्क्याच्या दोन बायकांपैकी एकींचे नांव आहें.
११वाचक्नवी -- 'वचक्नूचा वंशज' हें पैतृक नांव असून एका स्त्रीचें आहे; व हेंच गार्गीचे पैतृक नांव होय. ही स्त्री बृहदारण्यक उपनिषदामध्यें ब्रह्माची शिष्या महणून प्रसिद्ध आहें.
१२वावाता -- ऐतरेय ब्राह्मणांत महिषीच्या खालोखाल राजाच्या आवडत्या बायकोचें हें नांव आलेलें आहें.
१३सुकन्या -- शतपथ ब्राह्मणाच्या मताप्रमाणें च्यवनाशी लग्न लावणा-या शर्याताच्या मुलींचें हें नांव आहें.
१४सुदेवला -- बौधायन श्रौतसूत्रामध्यें ( २०. १२ ) ऋतुपर्णाची स्त्री या नात्यानें हें नांव आलें आहें.