प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
मानवसृष्टि
मानवसृष्टीमध्ये येणा-या विषयांची यादी पूर्वी या प्रकरणाच्या आरंभी दिलीच आहे. यांतील टीपा म्हणजे मानवजातिविषयक सर्व प्रकारच्या हालचालींची माहिती होय. ही माहिती वेदकालीन सामाजिक स्थिति व व्यवहार यांचें ज्ञान होण्यास अतिशय उपयुक्त असें साधन होईल.
मनुष्यनामें [ ऋग्वेद ]
अनु | जगत् | तस्थिवान् |
आयु | १जन | तुर्वश |
कृष्टि | जनित्व | द्रुह्यु |
क्षिति | जनुषि | धव |
चर्षणि | जन्तु | नहुष |
नृ | भुवन | यदु |
नृतम | भूत | लोक |
पंचजन | मनुष्य | विवस्वत् |
२पुंस् | मर्त | विश् |
पुरूष | मृर्त्य | व्रात |
पूरू | ५मर्य | शिक्षानर |
४पूरूष | मानुष | हरि |
पृतना | ||
[ तै. सं. ] | ||
जन | पुरूष | मर्त्य |
नृ | मनुष् | मर्य |
नृतम | मनुष्य | लोक |
पुंस | मर्त | सर्व (पुत्र भत्यदि) |
[ अथर्ववेद ] | ||
कृष्टि | मानुषी | लोग |
जग | लोक | विचर्षणि |
पुंस | लौकया ( लोकसंबंधिनी प्रजा ) | विश् |
पुरूष | सर्वजन्मन् (जग) | |
मानुष | ||
[ संहितेतर ] | ||
६प्राणभृत् |
जन -- जन या शब्दाचा मनुष्यव्यक्ति हा अर्थ असून हा शब्द समुदायावाचकहि आहे. ऋग्वेदामध्ये व पुढील ग्रंथांत अनेक लोकांचा समुदाय किंवा जात अशा अर्थानें हा आलेला आहे. उदाहरणार्थ ' पंचजना: ' किंवा ' पंच जनास: '. हा शब्द पांच जाती अशा अर्थानें वारंवार आलेला आहे. ऋग्वेदामध्ये एका ऋचेंत यदुवंशांतले लोक ( यादव जन ) व यदु ( यादवा: ) हे समानार्थी शब्द आले आहेत. तसेंच राजा म्हणजें ' जनस्य गोपा: ' म्हणजे लोकांचा रक्षिता असें म्हटलें असून राजा व जन याचें वारंवार उल्लेख आलेले आहेत. भारतजन असाहि शब्द ऋग्वेदांत आलेला आहें. हॉपकिन्सचें असें म्हणणें की, भारतजन या शब्दसमुच्चयांत जन म्हणजे ग्राम-लोक नव्हे-असा अर्थ होतो. पण हें खरें मानण्यास सबळ पुरावा नाहीं. त्या वेळीं लोकांची कशी विभागणी झालेली होती हें निश्चितपणे सांगणे कठिण आहे. ऋग्वेदांत असलेल्या एका स्थलावरून झिमर असे सिद्ध करुं पाहतो कीं, लोकांची विभागणी प्रथम विश् नंतर ग्राम किंवा वृजन (अविभक्त कुटुंबे किंवा कुळे किंवा ग्रामसंस्था) व नंतर एकेक कुटुंब अशा त-हेची होती. त्याचे असे मत आहे की, या चार जाती ऋग्वेदांतल्या वर उल्लेखिलेल्या स्थली जन, धिशू,जन्मन् व पुत्रा: या शब्दानी सुचित आहेत व प्रत्येक ग्रामसंस्था ही पूर्वी नात्यावर स्थापित झालेली होती. पण लोकांची ही विभागणी किती विश्वसनीय धरावी हा एक प्रश्नच आहे. जन हा अनेक विश् मिळून झालेला असे ही गोष्ट बरीच संभवनीय आहे. या मतास ऋग्वेदांतील दुस-या एका स्थलाचा आधार आहे. त्या स्थली विश् म्हणजे लढवय्ये लोकांचें पथक होते असें उल्लेखिले आहे. होमरच्या वेळीं व पूर्वीच्या जर्मन लोकांचे काळीं नात्याच्या आधारावर लष्कराची रचना करीत, त्याप्रमाणेंच वेदकालीहि व्यवस्थ होती असें वरील गोष्टीवरून म्हणतां येते. पण अनेक ग्राम मिहून एक विश् होई हें म्हणणे निश्चयाने खरें म्हणतां येत नाहीं. खुद्द झिमरचेंच असें मत आहे की, ग्राम किंवा वृजन या शब्दांत असा कांही अर्थ नाही की, ते एकत्र केले असतां एक विश् होईल. कारण ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ सशस्त्र लोक इतकाच होतो. खेडेगांवांतील लोक या अर्थी 'व्रा' 'व्राज' हे शब्द आहेत असें झिमर म्हणतो. पण व्रा शब्दाच्या स्थलीं अर्थनिश्चय होत नाहीं व दुस-या स्थलीं लढाईचा बिलकुल संबंध नाहीं. तेव्हां वैदिक काळांत ग्राम, विश् व कुल किंवा गोत्र यांचे संबंध काय होते हें अनिश्चितच आहें. शिवाय ग्राम व विश् यांचे निश्चित अर्थ न कळल्यामुळे तर जास्तच घोटाळा झालेला आहे. विश् याचा अर्थ वर स्थलविभाग असा घेतला तर ग्राम म्हणजे जिल्ह्याचा भाग असे मानतां येईल. पण विश म्हणजे विशिष्ट नात्याचे लोक असा अर्थ घेतला तर एका 'ग्रामा'मध्ये निरनिराळी 'विश्' ची कुटुंबे असूं शकतील, किंवा एक ग्राम म्हणजे एक विश् असूं शकतील, किंवा एका विशचा भागहि असुं शकेल. तें कसेहि असो, मूळ जी वैदिक काळांत व्यवस्था होती तीमध्ये पुढें राजकीय दृष्टीपेक्षा ब्राह्मण वर्णाला महत्व देण्याची जी दृष्टी उत्पन्न झाली तिजमुळें बरेच फेरबदल झाले असले पाहिजेत एवढें खरें. लोकांचे निरनिराळे दोन वर्ग कुल किंवा गोत्र या तत्वावर ठरले जात. एका कुलामध्यें एकच कुटुंब असें व तें एकाच घरांत रहात असें, व त्या घरांत सर्व भाऊ अविभक्त पद्धतीनें किंवा सर्व मुलें आपल्या पित्याच्या आश्रयाखाली रहात असत. गोत्रांत ज्यांचा एकच मूळ पुरूष मानिला जाई ते सर्व लोक समाविष्ट होत असत. गोत्रं, विश् व जन या शब्दांची लॅटिन भाषेंतल्या जेन्स, कुरिआ व ट्राइबस या शब्दांशी व ग्रीक भाषेंतल्या तत्सदृश शब्दांशी तुलना करतां येईल. या तीन जाती पारशी लोकांतहि विश्, झंतु व दक्यु या नांवांवरून दिसतात. विश् या फारशी लोकांमधील जातीवरून असेहि सिद्ध होतें की, हिदुस्थानांत विश् ही जी जन याची विभागणी होती तीमध्ये स्थलापेक्षां रक्तावरूनच नातें ठरलें जात असे व हचि स्थिति टॅसिसने लिहिलेल्या जर्मानिया ग्रंथांत जी राज्यपद्धति वर्णिली आहे तीत दिसून येते. कोणत्या तरी रूपांत असलेली कुलव्यवस्था ही 'जन' याचा तिसरा घटकावयव होती असें ऋग्वेदांतील एका स्थलावरून दिसतें. कारण त्या ठिकाणी गृहांची तुलना जन व विश् यांच्याशी केलेली आहे. ऋग्वेदांत दुस-या एक स्थलीं (७. ८२, १ ) कुलांतला यज्ञ ( अघ्वर ) याची जन-यज्ञ किंवा विश्-यज्ञ यांशीं तुलना केली आहे. झिमर म्हणतो की, या ठिकाणी एका गांवाची दुस-या मोठया भागांशीं तुलना केलेली आहे. परंतु हा अर्थ चुकीचा दिसतो. हिंदुस्थानांतल्या वैदिक भारतीय लोकांच्या आचारांसंबंधी विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही की, राजाला अग्निहोत्र ठेवतां येत होतें. हें अग्निहोत्र संबंध जातींचे अग्निहोत्र समजत असावेत. परंतु राजा किंवा एखादी व्यक्ति यांच्या अग्निहोत्राखेरीज मधल्या गोत्रादि समूहाचें अग्निहोत्र असल्याचा पुरावा मिळत नाहीं. त्या वेळचे राज्यांतले प्रमुख समाजघटक गोत्र व जन हेच होत. विश् हा तिसरा स्वतंत्र घटक नसून पुढें ज्याला गोत्र म्हणूं लागले तोच जुन्या ग्रंथांत विश् या शब्दाने सूचित होत असावा. वर जी आम्ही विचारसरणी स्वीकारली ती योग्य आहे असें ब्राह्मणकालांत जी समाजरचना होती तिचा विचार केल्यावर आपणांस वाटेल. जन ही कल्पना अजुनहि आहे व ती सर्वत्र गृहित आहे. पण विश् हे जनाचे विभाग आतां नाहींत. हल्ली निरनिराळे वर्ण हे जनाचे विभाग आहेत व हल्ली वर्णच्या जया अनेक पोटजाती झालेल्या आहेत त्यांनां अंशत: मूळ आधार पूर्वीच्या गोत्रांचा आहे.
२पुंस् -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें याचा पुरूष असा अर्थ आलेला आहे. पति या शब्दावरून जसा लग्नाचा बोध होतो व नृ व नर या शब्दांवरून जसा शौर्याचा बोध होतो तसा पुंस् या शब्दावरून लग्नाचा किंवा शौर्याचा बोध होत नाहीं. व्याकरणांत याचा अर्थ पुलिंग असा आहे.
३ पुरूष -- हा ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांमध्यें 'मनुष्य' या अर्थाने योजलेला सामान्य शब्द आहे. मनुष्य हा अथर्ववेदाप्रमाणें पांच तत्वांचा बनलेला आहे व ऐतरेय ब्राम्हणाप्रमाणें सहा तत्वांचा बनलेला आहे. काहींच्या मतें हा सोळा, वीस, एकवीस, चोवीस अथवा पंचवीस तत्वांचा बनलेला आहे. परंतु ही कमी अधिक मोजदाद काल्पनिक आहे. मनुष्य हा श्रेष्ठ प्राणी आहे, परंतु तो तत्वत: सामान्य प्राणीच आहे. मनुष्य़ाची उंची कात्यायन श्रौतसूत्रांत चार अरत्नी दिली आहे (दोन पद = अरत्नि; बारा अंगुले = पद); आणि 'पुरूष' ही संज्ञा सुद्धां पूर्वीच्या ग्रंथांतून 'उंचीचे माप' याच अर्थाने उपयोगांत आणलेली दिसतें. 'पुरूष' याचा उपयोग मनुष्याचें आयुर्मान-पिढी या अर्थानें केलेला आहे. तसेचं डोळयांतील बाहुली आणि व्याकरणशास्त्रांत क्रियेचा कर्ता पुरूष या अर्थानें वरील शब्दाचा उपयोग होतो.
४पूरूष -- पुष्कळ वचनांतून याचा अर्थ हलक्या दर्जाचा 'चाकर माणूस' अथवा परावलंबी असा होतो. असाच अर्थ इंग्रजी 'मॅन' या शब्दाचाहि होतो.
५मर्य -- याचा ऋग्वेदांत मनुष्य असा अर्थ आहे; विशेषत: तरूण पुरूष किंवा प्रेमीजन असाच त्याचा पुष्कळ वेळा अर्थ घेतला आहे. हा नेहमीं युवतीसह उल्लेखिला असतो.
६प्राणभृत् -- याचा अर्थ जिवंत प्राणी 'मनुष्य' असा बृहदारण्यकोपनिषदांत आहे आणि शतपथ ब्राह्मणांतहि हाच अर्थ आहे. 'प्राणि' या शब्दाचाहि हाच अर्थ आहे.