प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
यज्ञ करणारें ( तै. सं. )
यज्ञ करणारें (तै.सं.) / यज्ञिय विशिष्टस्थलें (तै.सं.) / सोमनामें (ऋग्वेद) / सोमविशेषणे (ऋग्वेद) / सोम वसोमाभिषव संबंधी (ऋग्वेद) |
१उपर -- हा शब्द पिशेलच्या मताप्रमाणें साधारणपणें दगड या अर्थी आहे. परंतु याचा अर्थ सोमरस काढण्याच्या वेळीं सोम ज्याच्यावर ठेवून रस काढतात तो दगड असा आहे. हा शब्द क्वचित उपयोगांत आला आहे. ऋग्वेदांत तीन वेळां आणि अथर्ववेदांत एक वेळ येतो.
२द्रप्स -- ऋग्वेदांपासून पुढील ग्रंथांत 'थेंब' या अर्थानें व सायणाचार्याच्या मताप्रमाणें स्तोक म्हणजे लहान थेंब ह्याच्या उलट मोठे थेंब अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. म्हणूनच दधि-द्रप्स हें शब्द वारंवार आले आहेत. ऋग्वेदांत ह्या शब्दाचा नेहमींचा अर्थ सोमरसाचे घट्ट थेंब किंवा प्रत्यक्ष सोमरस असा आहे. दोन उता-यांत रॉथ याचा अर्थ निशाण असा करितो व तो ओल्डेनबर्गनेंहि स्वीकारला आहे. गेल्डनेरच्या मतें याचा अर्थ धूळ असा असावा. पण हें संभवनीय दिसत नाहीं. मॅक्ममुल्लर ह्या शब्दाचा अर्थ एके ठिकाणीं पावसाचा थेंब असा करितो.
३धिषणा -- पीटर्सबर्ग कोशाप्रमाणें ह्या शब्दाचा अर्थ सोमरस तयार करतांनां उपयोगांत आणलेंलें भांडें म्हणजे कटोरी किंवा लांबट पात्र असा व लक्षणेनें प्रत्यक्ष सोमरस असाहि आहे. हा शब्द द्विवचनी आला तर लक्षणेनें याचा अर्थ स्वर्ग व मृत्यूलोक असा होतो. हिलेब्रँटच्या मतानें ह्या शब्दाचें एकवचनीं पृथ्वी, द्विवचनी स्वर्ग व पृथ्वी, व अनेकवचनी स्वर्ग, अंतरिक्ष व पृथ्वी, असे अर्थ होतात. कांही ठिकाणीं धिषणा ह्याचा अर्थ वेदी असा केला आहे, पण याबद्दल शंका आहे. पण एवढी गोष्ट खरी कीं, वाजसनेयि व तैत्तिरीय संहिता ह्यांमध्यें ज्या दोन फळ्यांमध्यें सोमवल्ली दाबली जात असे त्या फळ्या ( अधिषवणफलकें ) असा अर्थ केलेला आहे. पिशेलच्या मतें धिषणा ह्याचा अर्थ अदिति किंवा पृथिवी लक्ष्मी असा आहे.
४पवित्र -- ऋग्वेद व मागाहूनचे ग्रंथ यांमध्यें सोमरस शुद्ध करण्याकरिंतां उपयोगी पडणारी चाळणी असा आहे. सोमरस शुद्ध करण्याचा हा एकच प्रकार ऋग्वेदकांली लोकांस खात्रीनें ठाऊक होता. हें पवित्र मेंढयाच्या लोकरींचे बनविलेंलें असें असें स्पष्ट दिसतें. पण हीं लोंकर विणलेली असे किंवा हिच्या घडया करून त्यापासून पवित्र बनविले जाई हें नक्की सांगतां येत नाहीं. कारण जे शब्द आलेंलें आहेत ते अगदीं संदिग्ध आहेत तरी पण झिमरचें असें मत आहे कीं, 'व्हरांसि' ह्या शब्दावरून लोंकरीच्या घडया करूनच हें पवित्र बनविलें जाई.
५विप् -- रॉथच्या मतानें ऋग्वेदांत अनेक ठिकाणीं ह्याचा अर्थ सोम गाळण्याच्या भांडयाचा तळ ज्या काठयांनी तयार केला जाई व ज्यांवर ताणावयाचें कापड ताणलें जाई त्या काठया असा आहे. पण हें स्पष्टीकरण फारच संशयात्मक आहे.
६पूतीका -- सोमवल्लीच्या ऐवजीं उपयोगांत आणावयाच्या एका वेलींचे नेहमी येणारें नांव. तैत्तिरीय संहितेंत असें म्हटलें आहे कीं, इचा दही विरजणाच्या कामांत उपयोग होतो. हिचा किंवा पर्णवल्क याचा एकमेकांच्या ऐवजीं उपयोग होतो.
७राजपति -- राजपति म्हणजे राजांचा ईश. हें सोमाचें नांव म्हणून शतपथ ब्राह्मणांत आहे. हा शब्द इतरत्र राजाच्या सार्वभौम सत्तेबद्दल योजिलेला नाहीं.