प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
यज्ञसंबंधीं किरकोळ ( ऋग्वेद )
यज्ञसंबंधीं किरकोळ ( ऋग्वेद ) |
१पूर्त अथवा पूर्ति -- हा शब्द ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांमध्ये आढळतो. याचा अर्थ उपाध्यायास त्याच्या कामाबद्दल दिलेले बक्षीस असा आहे. ऋग्वेदांत ( ६ १६, १८ ) या ठिकाणीं आलेला पूर्त शब्द सायणाचार्याच्या मतें विशेषण असा आहे व त्याचा अर्थ 'पुरून उरणारें अतएव व्यापक' असा ते घेतात ऋग्वेदांत ( ६. १३, ६) या ठिकाणीं आलेल्या पूर्ति शब्दाचा अर्थ सायण भाष्यांत 'परिपूर्णता' असा दिला आहे व ऋग्वेद १०.१०७, ३ या ठिकाणीं सायणभाष्यांत पूर्ति याचा अर्थ पालनी किंवा पूरयित्री असा केला आहे.
२बलि -- हा शब्द ऋग्वेदांत अनेक वेळां येतो त्याचप्रमाणें पुढील ग्रंथांतहि तो वारंवार येतो. त्याचा अर्थ यज्ञातील हवन किंवा राजाला कर देणें असा होतो. झिमरच्या मतें दोन्ही प्रसंगींचे समर्पण आपखुषींचे असे. तो ह्याच्याशी टॅसिटसच्या ग्रंथांत आलेल्या अशाच जर्मन प्रकाराची तुलना करितो. त्या प्रसंगीं त्या जातींचे राजे बक्षीस म्हणून दिलेल्या वस्तू स्वीकारीत असत परंतु हा कांही नेहमींचा कर नसे. परंतु अशा मताला कोणत्याच प्रकारचा आधार नाहीं. राजाचें विशेष हक्क उत्पन्न व्हावयाला प्रथम लोकांची स्वसंतोषाचीं कृत्यें कारण झालीं असलीं पाहिजेत यांत शंकाच नाहीं. परंतु वेदांत उल्लेखिलेंलें लोक जेते असल्यामुळें ते ह्या स्थितींत असतींल असें संभवत नाहीं. वेदकालीन आर्याचें आपल्या देवाविषयीचें धोरण समर्पणाच्या बाबतींत स्वसंतोषाच्या देणग्याशी व तसेच काभारांशी अगदीं जुळतें होतें. परजातीच्या बाबतींत मात्र बलि याचा अर्थ करभार असा ऋग्वेदांतहि केला पाहिजे असें झिमरहि कबूल करितो.
३संहोत्र -- हा शब्द ऋग्वेदांत एकदांच आला असून गेल्डनेरच्या मतानें तेथें त्याचा अर्थ शाखा किंवा संप्रदाय असा आहे. उदाहरणार्थ विधींच्या शिष्यांचा संप्रदाय.
४स्तूप -- ऋग्वेद व मागाहून झालेंलें ग्रंथ ह्यामध्यें याचा अर्थ डोक्याच्या अगदीं वरचा भाग दाखविणारी शेंडीची गांठ असा आहे.