प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
यज्ञविशेषनामें ( ऋग्वेद )
यज्ञविशेषनामें ( ऋग्वेद ) |
१राजसूय -- तैत्तिरीय संहितेंत, अथर्ववेदांत आणि नंतरच्या वाङमयात ज्यांत अभिषेक केला जातो अशा एका यज्ञाचें नांव आहे. सूत्रामध्यें या विधींचे बरेंच लांबलचक वर्णन दिलें आहे. परंतु त्याचें मुख्य स्वरूप् ब्राह्मणामध्यें रेखाटलेंलें आहे आणि त्या विधीच्या प्रसंगी म्हणावयाचें मंत्र यजुर्वेदाच्या संहितेंत दिलें आहेत. सामान्य विधीशिवाय या यज्ञाच्या प्रसंगी लौकिक विधीहि करीत अशाविषयीं उल्लेख सांपडतात. उदाहरणार्थ राजाला त्याच्या दर्जाची वस्त्रें घालीत, आणि राजसत्तेची धनुष्यबाण ही जीं चिन्हें तीं त्याच्या हातीं देत; नंतर त्याला अभिषेक करीत, नंतर तो एखाद्या नातेवाईकाच्या लटक्याच गाई हरण करी, किंवा एकाद्या राजन्याशी लटुपटीचें युद्ध करी. नंतर तो फांसे खेळे, व तेथें तो हरत असे. आपण सर्व जगाचे मालक आहोत हें दाखविण्याकरितां तो आकाशाच्या सर्व दिशांकडे जाई, व व्याघ्राचें बळ आणि पुढारीपणा दाखविण्याकरितां तो व्याघ्रचर्मावर उभा राही. ऐतरेय ब्राह्मणांत अभिषिक्त राजांची यादी दिलेली आहे. तेथें इंद्राच्या अभिषेकाला महाभिषेक म्हटलें आहे. शतपथ ब्राह्मणांत आणि शांखायन श्रौतसूत्रांत अश्वमेध करणा-यांची यादी दिलेली आहे तिच्याशी ही जुळते.
२वाजपेय -- तैत्तिरीय संहितेंत याचा उल्लेख असून शतपथ ब्राह्मण व पुढें झालेल्या ग्रंथांत ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनीच करण्याच्या यज्ञाचें हें नांव आहे. ह्याच ब्राह्मण ग्रंथांत असें म्हटलें कीं, हा यज्ञ राजंसुय यज्ञापेक्षां श्रेष्ठ आहे. पण इतर सर्व ग्रंथ एक मतानें असें म्हणतात कीं, हा वाजपेय यज्ञ करणारा जर ब्राह्मण असेल तर हा यज्ञ बृहस्पतिसव यज्ञाच्या अगोदरचा ( म्हणजे कमी महत्वाचा ) यज्ञ आहे. यज्ञ करणारा जर क्षत्रिय असेल तर तो राजसूय यज्ञाच्या अगोदर करावयाचा, यज्ञ आहे, व खुद्द शतपथ ब्राह्मणग्रंथांला हें कबूल आहे कीं, बृहस्पतिसव व वाजपेय यज्ञ हें एकच आहेत या यज्ञांतील मुख्य भाग म्हणजे रथाची शर्यत होय व ह्यांत यज्ञ करणाराला यश प्राप्त होतें. शांखायन श्रौतसूत्रावरून अस दिसतें कीं, हा यज्ञ कोणीहि आर्यानें करावा. हिलेबँटची ह्या वाजपेय यज्ञाची ग्रीक लोकांच्या ऑलिंपिक खेळांशी तुलना करण्यापर्यंत मजल गेली आहे. पण अशी तुलना करण्यास फार थोडी जागा आपणांजवळ आहे. आर्य लोकांत रथाची शर्यत लावण्याची मूळची चाल होती. तिचीच सुधारून वाढविलेली आवृत्ति म्हणजे हा यज्ञ होय व हा यज्ञ केला म्हणजे तो करणा-याला त्या यज्ञाच्या प्रभावानें यश मिळतें. वास्तविक पहातां वाजपेय हा एखाद्या ब्राह्मणांस अगर क्षत्रियास पुरोहितत्वाचा अगर राजपदाचा अभिषेक होण्यापूर्वी त्यानें करावयाचा यज्ञ, असें जें एगलिंग म्हणतो तें खरें दिसतें. कुरूवाजपेय हा यज्ञ त्यावेळीं विशेष प्रसिद्धीस आलेला होता.
३सर्व वेदस् -- तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणग्रंथ ह्यांमध्यें 'ज्यामध्यें यजमान आपलें सर्वस्व उपाध्यायांनां देतो तो यज्ञ' किंवा 'एखाद्या माणसाची सर्व मिळकत' असें याचे दोन अर्थ आलेंलें आहेत.
४विषूवत् -- अथर्ववेद व तदुत्तरचे ग्रंथ हयांमध्ये वर्षभर टिकणा-या सत्रांतला मध्यमदिन असा याचा अर्थ आहे. कै. लोकमान्य टिळकांच्या मतानें विषूवाना शब्दश: अर्थ 'ज्या दिवशी रात्र व दिवस सारखे असतात तो दिवस म्हणजे विषुव दिन होय, व हाच खरा अर्थ आहे. पण हें मत अद्यापि ग्राह्य ठरलें नाहीं. विषूवान हा शब्द अथर्ववेदामध्यें एका घराच्या वर्णनांत आलेला आहे. ह्याचा अर्थ छपराचा दांडा किंवा आढें असा दिसतो.
५बृहस्पतिसव -- हें एका यज्ञाचें नांव आहे. तैत्तिरीय उपनिषदाप्रमाणें जो उपाध्याय पुरोहित होऊं इच्छितो तो तें पद या यज्ञानें मिळवितो. आश्वलायन श्रौतसूत्राप्रमाणें राजा राजसूय यज्ञ करीत असतां उपाध्यायानें वाजपेयानंतर हा यज्ञ करावयाचा असतो. शतपथ ब्राह्मणांत, उलटपक्षीं, बृहस्पतिसव व वाजपेय हे एकच असें म्हटलें आहे. परंतु हें साम्य खास पुरातन नव्हें.
६सर्वचरू -- ऐतरेय ब्राह्मणांत एका ठिकाणीं हा शब्द आलेला आहे. तो कौषीतकी ब्राह्मणांतहि असून त्या ठिकाणी देव सर्वचरौ नांवाचा यज्ञ करीत आहेत असा उल्लेख आलेला आहे. पीटर्सबर्गकोशाप्रमाणें हें एका मनुष्याचें नांव असावें. हें एखाद्या स्थळाचें नांव असेल किंवा विशेषण सुद्धां असण्याचा संभव आहे. ऐतरेय ब्राह्मणांत सायणमतानें सर्वचरू हें एका स्थलाचें नांव आहे.
७धर्म -- अश्विनांना देण्याकरितां दूध ज्या भांडयांत तापवितात तें भांडें असा अर्थ ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत आहे. ह्या शब्दाचा ह्यावरून गरम दूध किंवा दुसरें कांही तरी तापविलेलें पेय असा अर्थ होतो. प्रयोग शास्त्राप्रमाणें हें एका विधीचें नांव आहे ( वेदविद्या पृ. १२४ व ३९८ पहा ).
८मेध -- ऋग्वेदाच्या वालखिल्य ऋचेंत हा शब्द आलेला आहे पंरंतु अर्थ संदिग्ध आहे. पीटर्सबर्गकोशाप्रमाणें हें एका याज्ञिकाचें नांव आहे. यज्ञालाहि सामान्यत: मेध असें म्हटलें आहे.
९प्रस्तर -- ऋग्वेदांत व तदनंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ 'यज्ञप्रसंगी बसविण्याकरितां गवताचें विणलेंलें आसन' असा आहे.
१०बर्हिस् -- हा शब्द ऋग्वेदांत आणि नंतरच्या ग्रंथांत वारंवार आला आहे. याचा अर्थ गवताचा बिछाना, चटई ( अथवा नुसते दर्भ ) असा आहे. जेथें देवांना आव्हान होई त्या ठिकाणीं ही अंथरीत असत.
११यूप -- ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ यज्ञस्तंभ असा आहे. यालाच यज्ञांतील बळी दिल्या जाणा-या पशूला बांधीत असत. ऋग्वेदाप्रमाणें ( १. ५१, १४ ) घराच्या खांबालाहि हें नांव होते.
१२समिध् -- ऋग्वेद व तदुत्तरचे झालेंलें ग्रंथ ह्यांमध्यें विस्तव पेटविण्याकरितां इंधन असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. गेल्डनरच्या मतानें एका ठिकाणीं, ह्या शब्दावरून पुढें प्रसिद्धीस आलेल्या अग्निध नांवाच्या ऋत्विजाचा बोध होतो.
१३स्वरू -- ऋग्वेद व तदनंतरचे ग्रंथ ह्यांत ह्याचा अर्थ खांब किंवा अगदीं बरोबर अर्थ म्हणजे यज्ञस्तंभाची किंवा यूपाची ढलपी असा आहे.
१४अधिषवण -- सोम दाबण्याकरितां ज्या दोन फळया उपयोगांत आणितात त्यांच्या अर्थी ह्या दोन अधिषवणांचा उपयोग केलेला आहे असे रॉथ आणि झिमर म्हणतात. तथापि हिलेब्रँट त्या विधीवरून म्हणतो कीं, त्या फळ्या एकावर एक ठेविल्या नसून एका मागे एक अशा ठेविलेल्या असत व त्यांच्यावर दगडानें सोम कुटीत. ही मीमांसा त्याचा शब्दश: अर्थ केल्यास बरोबर आहे असें सिद्ध होंतें. आणि त्याचा अर्थ विशेषण धरून जरी केला तरी बरोबर जमतो. परंतु दक्षिणेंत सोमाच्या कांडया पहिल्यांने कातडयावर ठेवितात आणि त्यांवर दोन फळ्यांपैकी एक ठेवून दगडानें ठेंचतात. नंतर त्या कांड्या बाहेर काढून पहिल्या फळीवर ठेऊन त्यावर दुसरी फळी ठेवितात अशी रीति हॉगनें पाहिली आहे.
१५अभ्रि -- अभ्रि म्हणजे खनित्र. वेदांमध्ये वारंवार येणारा हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांत त्याचे निरनिराळे प्रकार आणि पदार्थ सांगितले आहेत. हें बांस, उदुम्बर किंवा विकंकत यांच्या लांकडाचें करितात. तें एक हात लांब असतें. तें पोकळ असून त्याच्या एका किंवा दोन्ही बाजूस तीक्ष्ण धार असते. ह्यावरून असें दिसून येईल कीं, याची कडेची आणि वरची बाजू कोणच्या तरी धातूची केलेली असते. अभ्रि म्हणजे कुदळीसारखें खणण्याचें साधन.
१६कृष्णाजिन -- काळविटाचें ( कृष्ण ) कांतडें असा याचा अर्थ आहे. त्याच्या धार्मिक बाबतींतील उपयोगावरून त्याचा उल्लेख मागाहूनच्या संहिता व ब्राह्मण यांत ब-याच वेळां आला आहें.
१७हविर्धान -- 'हवि ठेवण्याचें स्थल' ह्याचा मूळचा अर्थ ज्यावर सोमवल्ली दाबून रस काढण्याकरितां नेली जात असे ती गाडी. नंतर ज्या ठिकाणीं सोमरसाचें चषक ठेवले जात ती जागा ( हविर्धानमंडप ) अशा अर्थानें हा शब्द प्रचारांत आला.
१८धवित्र -- शतपथब्राह्मणांत आणि तैत्तिरीय आरण्यकांत याचा अर्थ 'यज्ञकुंडातला अग्नि प्रफुल्ल करण्याकरितां कच्च्या किंवा कमावलेल्या कातडयाचा पंखा' असा आहे.
१९परिशास -- अग्निकुंडातून यज्ञांतली कढई काढण्याकरितां उपयोगीं पडणारें चिमट्याच्या आकाराचें हत्यार असा याचा अर्थ आहे.
२०मेक्षण -- हवि:पदार्थ ढवळण्याकरितां ब्राह्मणांत निर्देश केलेल्या लांकडाच्या कलथ्याचें नांव.
२१वेष्क -- शतपथब्राह्मणामध्ये यज्ञिय पशु गळा दाबून मारण्याकरितां केलेला गळफास अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
२२दक्षिणा -- हा शब्द ऋग्वेदांत व पुढील ग्रंथांत आलेला असून त्याचा अर्थ यज्ञाच्या वेळीं उपाध्यायानीं दिलेंलें दान असा आहे. हें दोन म्हणजे बहुप्रसवा धेनु. ऋग्वेदांत दानस्तुतींत या शब्दाचें फारच महत्व वर्णिलेंलें आहे व हें महत्व ब्राह्मणग्रंथांत तर जास्तीच वाढत चाललें. एक गोष्ट अशीं लक्षांत ठेवण्यासारखीं आहे कीं, हा जो दानांच्या वस्तूंचा उल्लेख केलेला आहे त्यांत गाई, घोडे, बैल, उंट, दागिने व यांसारख्या जंगम मालाशिवाय जमिनीसारख्या स्थावर मिळकतीचा बिलकूल नामनिर्देश नाहीं. शतपथब्राह्मणांत दक्षिणा म्हणून जमिनीचा उल्लेख केलेला आहे. पण अशा दानास ब्राह्मणग्रंथांची मुळींच संमति नाहीं. कारण सगोत्रजांच्या समंतीशिवाय जमीन दुस-यास द्यावयाची नाहीं असा प्रचार सुरू झाला असावा.
२३निविद -- देवाच्या सन्मानार्थ असलेल्या प्रार्थनाग्रंथांमध्ये असलेली आमंत्रित देवतेची थोडक्यात प्रार्थना म्हणजे निविद् होय. ब्राह्मणग्रंथांत शस्त्रामध्ये घातेलेंलें म्हणून या निविदांचा वारंवार उल्लेख आलेला आहे. ऋग्वेदांत जीं खिल सूक्तें आहेत त्यांमध्येंहि बरेच निविद आहेत. पण असें संक्षिप्त सूत्ररूपाचें निविद मात्र ऋग्वेदांत होते कीं नाहीं याबद्दल शंकाच आहे. तरी पण ऋग्वेदसंहितांमध्यें निविद् शब्द वांरवार आला आहे. पण ब्राह्मणग्रंथातल्याप्रमाणें विशिष्ट अर्थानें नव्हे. मागाहून झालेल्या संहिताग्रंथांत हा विशिष्ट अर्थच रूढ झाला आहे.
२४पावमानी -- ऋग्वेदांमध्यें नवव्या मंडळांत सोमपवमानासंबंधींच्या ( स्वत:ला शुद्ध करणा-या ) ऋचा असा याचा अर्थ आहे. हें नांव अथर्ववेदांत, मागाहूनच्या ग्रंथांत व कदाचित ऋग्वेदांतील एका सूक्तांत आलेंलें आहे.
२५यजुष् -- वेदकालीन वाङमयात ऋक् आणि सामन् यांच्याहून हा निराळा दाखविला आहे. यजुष् हा यज्ञाच्या वेळेस म्हणावयाचा मंत्र आहे. याला गद्याचें किंवा पद्यांचें रूप् असूं शकेल.
२६उपवीत -- यज्ञाच्या वेळीं डाव्या खांद्यावर ब्राह्मणांनी घालावयाचें जानवें. त्याचा तैत्तिरीय संहितेंत व ब्राह्मणांत उल्लेख आलेला आहे. कै. लो. टिळकांचे म्हणणें असें आहें कीं, हें मूळचें जानवें नसून वस्त्र किंवा मृगचर्म होतें. हें म्हणणें संभवनीय आहे.
२७पुरोनुवाक्या -- 'यागारंभीं म्हणावयाचा मंत्र'. ही पारिभाषिक संज्ञा आहे. पुरोनुवाक्येनें परमेश्वरास हवन स्वीकारण्यास निमंत्रण करावयाचे असतें. यानंतर याज्या होते व ती बलिदानाबरोबरच होते. अशा प्रकारचीं अभिमंत्रणें फार क्वचित् प्रसंगी ऋग्वेदांत आढळतात असें ओल्डेनबर्गचें म्हणणें आहे. तीं पुढील वाङमयात आढळतात. प्रत्यक्ष पुरोनुवाक्या हा शब्द नंतरच्या संहितांत व ब्राह्मणांत आढळतो.
२८पुरोरूक् -- ही पारिभाषिक संज्ञा कांही विशिष्ट निविद् मंत्रांची आहे. सकाळीं शस्त्रें किंवा त्यांचा कांही भाग म्हणण्यापूर्वी आज्य व प्रउग शस्त्रपठनप्रसंगी प्रात:कालच्या सोमहवनाच्या वेळेस हें मंत्र म्हणत असत. मागाहूनच्या संहिता व ब्राह्मण यांतून पुरोरूक् आढळून येतात.
२९प्राचीनावीत -- आर्य लोक उजव्या खांद्यावरून डाव्या हाताखाली अशात-हेनें जानवें धारण करीत असत हें उघड दिसतें. कारण प्राचीनावीतिन् हें नांव असें जानवें धारण करणा-यास मिळें. परंतु लो. टिळकांच्या मतें हा शब्द जानव्यास उद्देशून नसून उपरण्यास उद्देशून आहे. तैत्तिरीय संहितेंत निवीत, प्राचीनावीत व उपवीत असे तीन शब्द आलेंलें आहेत. सायणाचार्याच्या मतें हें शब्द जानवें किंवा वस्त्र कोणच्या वेळेस कसें घ्यावयाचें हें सुचवितात. सायणाचार्य म्हणतात-- यत्रोभावपि बाहू न्यग्भूतौ संतो ब्रह्मसूत्रेण वस्त्रेण वा वीयते संवृत्तावाच्छादितौ क्रियेते तत्रीवितम् । प्राचीनो दक्षिणो बाहुराधींयतेऽधस्तात्क्रियते यज्ञ तत्प्राचीनावीतम्!
३०प्रैष्य -- हा उपासनेसंबंधी शब्द आहे व त्याचा अर्थ 'आह्वान', बोलावणे सूचना, असा आहे. हा शब्द ब्राह्मण आणि संहिता यांमध्यें वारंवार आढळतो.
३१याज्या -- यज्ञाचेवेळेस म्हणावयाचे मंत्र. संहितेंत आणि ब्राह्मणांत या शब्दाचा उल्लेख आहे.
३२आष्ट्री -- ऋग्वेदांत याचा अर्थ अग्निकुंड असा केला आहे. अशुभसूचक पक्षी या कुंडावर बसूं नयेत म्हणून त्यांची प्रार्थना करण्यात येते.
३३चषाल -- चषाल या शब्दाचा अर्थ यज्ञस्तंभावरील लांकडी अथवा लोखंडी कडें असा आहे व हा शब्द ऋग्वेदापासून पुढें झालेल्या ग्रंथांत अशा अर्थानें वापरला आहे. शतपथब्राह्मणांत एका ठिकाणीं चषाल गोधूमांनी ( पिष्टानें ) तयार करावा असें सांगितलें आहे.