प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

यज्ञांतील ॠत्विज (संहितेतर)

यज्ञांतील ॠत्विज (संहितेतर)

अच्युत - जैमिनीय ब्राह्मणांत विभिंदुकीयांनी केलेल्या सत्राचें जें वर्णन आलें आहे. त्यांत हा प्रतिहर्त्याचें काम करीत होता.
अजिर- पंचविंश ब्राह्मणांत (२५.१५) जें सर्पसत्राचें वर्णन आलें आहे, त्यांत सुब्रह्मण्य ॠत्विजाचें काम हा करीत होता.
अनुशिख- पंचविंश ब्राह्मणा (२५.१५) मध्यें जें सर्पसत्राचें वर्णन आलें आहे, त्यांत हा ‘पोतृ’ ह्या ॠत्विजाचें काम करीत होता.
अयस्थूण- शतपथ ११.४,२,१७ येथें म्हटल्याप्रमाणें शौल्बायन हा ज्यांचा अध्वर्यु होता, त्यांचाच हा गृहपति होता. यानें शौल्बायनाला विशिष्ट स्रुव्याचा (पळीचा) उपयोग कसा करावा हें शिकविलें.
अरिमेजय- पंचविंश ब्राह्मण २५,१५ यांत जें सर्पसत्र वर्णिलें आहे, त्यांत ह्यानें आघ्वर्यव स्वीकारलें होते.
अरुणआट्- पंचविंश ब्राह्मण २५.१५ येथें जें सर्पसत्र उल्लेखिलें आहे, त्यांत हा अच्छावाक नामक ॠत्विज होता.
अर्बुद- पंचविंश ब्राह्मण (२५,१५) येथें जें सर्पसत्र वर्णिले आहे त्यांत हा ग्रावस्तुत ह्या ॠत्विजाचें काम करीत होता. ऐतरेय आणि कौषीतकी ह्या ब्राह्मणांत ज्याचा मंत्रद्रष्टा म्हणून उल्लेख आला आहे, तो प्राचीन अर्बुद काद्रवेय व हा अर्बुद हे एकच होते हें उघड आहे.
अर्यल- पंचविंश ब्राह्मणांत (२३,१,५) वर्णिलेल्या सर्पसत्रांत अर्यल हा गृहपति होता व आरुणि हा ‘होता’ होता.
अश्वल-विदेहराजा जो जनक त्याचा हा ‘होता’ असून बृहदारण्यकोपनिषदांत (३.१,२,१०) तो प्रमाण असल्याचा उल्लेख आहे.
१०असितमृग- ऐतरेय ब्राह्मणाप्रमाणें हें एका कश्यप कुलाचें नांव आहे. ह्यांनां जनमेजयानें एका यज्ञांतून वगळलें होते; तथापि ह्यांनीं राजानें नेमिलेल्या भूतवीर नांवाच्या ब्राह्मणांकडून यज्ञाचें नेतृत्व हिसकावून आपणाकडे घेतले. जैमिनीय (१.७५) व षड्विंश (१,४) ब्राह्मणांत असितमृग हे कश्यपाचे पुत्र होते व एकाचें नांव कुसुरुबिन्दु औद्दालकि असें होतें असा उल्लेख आहे.
११आयोगव- आयोगव राजा मरुत्त आविक्षित हा यजमान यज्ञकर्ता होता असा शतपथांत (१३.५,४,६) उल्लेख आहे. त्यांत यज्ञाप्रीत्यर्थ एक गाथा दिली आहे.
१२उदमयआत्रेय- वैरोचन अंग याचा हा पुरोहित होता असें ऐतरेय ब्राह्मण (८.२२) येथें म्हटलें आहे.
१३उपगुसौश्रवस्- पंचविंश ब्राह्मण (१४.६,८) यांत हा कुत्स औरव ह्याचा पुरोहित होता असें म्हटलें आहे. ह्या पुरोहिताने इंद्राला हवि दिला म्हणून त्याच्या यजमानानें त्याला ठार मारिलें.
१४उपाविजानश्रुतेय- उपसद म्हणजे सोमयागांतील इष्टि. हिच्यामध्यें ब्राह्मणवाक्य पठण करणारा हा एक ॠषि होता, असा ऐतरेय ब्राह्मण १.२५ येथें उल्लेख आहे.
१५ऐषावीर- शतपथांत (११.२ ७,३२) एका यज्ञांमध्यें हे याज्ञकि चालवीत असून वाईट यज्ञकर्तें होते असा उल्लेख आहे. सायणाचार्याच्या मतें हें विशेषनाम (एषवीराचे वंशज) असून त्याचा अर्थ तुच्छ मानलेल्या कुटुंबातील गृहस्थ असा होतो. परंतु वरील उता-यांत  आणि दुसरीकडे रॉथ याचा अर्थ अशक्त अथवा यःकश्चित्  मनुष्य असा करितो.
१६काण्डविय- जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत (३.१०,२) हा उद्गाता होता असें म्हटलें आहे.
१८कापेय- (कपिवंशज) काठकसंहिता (१३.१२) आणि पंचविंश ब्राह्मण (२०.१२,५) यांत कापेय यांनीं चित्ररथाकडून यज्ञ करविला व त्यामुळें चित्ररथ धनसंपन्न झाला. या चित्ररथाच्या कुलांत वडील राजपुत्र गादीवर बसे व त्याचे भाऊ त्याचे अनुचर होत अशीं चाल असल्याचें वर्णिलें आहे.
१९कावषेय- (कवषाचा वंशज) तुर ह्यांचे सर्व ठिकाणीं आलेलें हें पैतृक नांव, ॠग्वेदाच्या ऐतरेय (३.२,६) व शांखायन (८.२) आरण्यकांत तत्त्वज्ञानाचा अध्यापक म्हणून आलें आहे.
२०किरात- पंचविंश ब्राह्मण (१३.१२,५) येथें आलेल्या असमातीच्या कथेंत किरात आणि अकुलि हे दोन पुरोहित गोपायनांच्या विरुद्ध होते, असें म्हटलें आहे.  शतपथ (१.१,४,१४) येथें किलात व आकुलि अशीं नांवे आहेत. हें उघड दिसतें कीं, ऐतिहासिक म्हणून हें नांव उपयोगांत आणलें नसून भांडखोर पुरोहिताला साजेसे म्हणून आलें आहे. कारण किरात ह्या डोंगरी लोकांच्या नांवाशीं यांचे साम्य आहे असें मॅकडोनेल म्हणतो.
२१किलात- ‘किरात’ ह्याचें हें दुसरें स्वरूप आहे. शतपथ, शाटयायनक आणि जैमिनीय ब्राह्मणांत हा शब्द आला आहे.
२२कुषीतक सामश्रवस- पंचविंश ब्राह्मण (१७.४,) येथें उल्लेखिलेल्या कौषीतकीच्या यज्ञसमारंभांतील हा गृहपति म्हणजे यजमान होता.
२३कुषण्ड- पंचविंश ब्राह्मण (२५.१५,३.) येथें उल्लेखिलेल्या सर्पसत्रांत षण्ड नांवाच्या ॠत्विजाबरोबर ह्याचेहि नांव  आलेलें आहे. त्या सत्रांत याच्याकडे अभिगिर (स्तुति) व अपगर (निंदा) नामक कर्म असे.
२४कौकूस्त- शतपथ ब्राह्मण (४.६,१,१३) येथें उल्लेखिलेल्या यज्ञांत यज्ञकर्त्या ब्राह्मणांनां हा दक्षिणा देत असे. काण्व पाठांत कौक्थस्त असें नांव आहे.
२५कौतस्त- पंचविंश ब्राह्मण (२५.१५,३) येथें वर्णिलेल्या सर्पसत्रांत अरिमेजय व जनमेजय. अशी अध्वर्यूची जीं दोन नांवे आली आहेत त्यांचे हें पैतृक नांव असावें, हें एकदा द्विवचनी उपयोगांत आणिले आहे.
२६कुञ्च् आंगिरस- पंचविंश ब्राह्मण (१३.९,११; ११,२०) येथे आलेल्या क्रौश्च सापाच्या द्रष्टत्वाचे हें नांव आहे. मंत्राला मंत्रद्रष्टया ॠषीचें नांव दिल्याचें हें एक उदाहरण आहे. ह्या नियमाला अपवादहि आहेत.
२७ग्लावमैत्रेय- मैत्रीचा वंशज छान्दोग्य उपनिषद् (१.१२,१,३) येथें ह्याचा उल्लेख असून हा व वकदाल्भ्य हे एकच आहेत. पंचविंश ब्राह्मण (२५,१५,३) येथें वर्णिलेल्या सर्पसत्रांत हा प्रस्तोता होता. याला उल्लेख षड्विंश ब्रह्मणांतहि आहे.
२८जनमेजय- पंचविंश ब्राह्मणा (२५.१५,३) मध्यें ज्या सर्पसत्राचा उल्लेख आहे, त्यामध्यें हा प्रमुखपणें याज्ञकि चालवीत होता.
२९जर्वर- पंचविंश ब्राह्मण (२५.१५,३०) येथें उल्लेखिलेल्या सर्पसत्रांत हा गृहपति म्हणजे यजमान होता.
३०जित्वन् शैलिनि- बृहदारण्यकांत (४.१,२) अध्यापक म्हणून ह्याचे नांव आलें आहे. जनक आणि याज्ञवल्क्य यांचा तो समकालीन होता. हा वाग्देवतेला ब्रह्म समजत असे.
३१तिमिर्घदौरेश्रुत- दूरेश्रुताचा वंशज. पंचविंश ब्राह्मण (२५,१५.३) येथें वर्णिलेल्या सर्पसत्रांतील अग्निध (अग्नि पेटविणारा) ॠत्विजाचें हें नांव होय.
३२तुरकावषेय- शतपथाच्या दहाव्या कांडाच्या शेवटीं आलेल्या वंशांत हें नांव आलेलें आहे. कारण त्या काण्डामध्यें प्रतिपादिलेल्या तत्त्वाचें जनकत्व याच्याकडे येते. तेथें दिलेल्या गुरुशिष्यपरंपरेत हा आणि शाण्डिल्य यांच्यामध्यें यज्ञवचस्  आणि कुश्री हे दोन गुरू दिलेले आहेत. त्याच ब्राह्मणांत (९.५.२.१५) शाडिल्यानें कारोती नदीवर एक अग्नीची वेदी बांधल्याचा यानें उल्लेख केला आहे. जनमेजय पारिक्षित ह्याचा हा पुरोहित होता व ह्यानेंच त्याला राज्याभिषेक केला असें ऐतरेय ब्राह्मणांत (४.२७;७, ३४;८.३१) म्हटलें आहे. बृहदारण्यकांत (६.५४) व खिलामध्यें (१.९.६).तो पुरातन मुनि असल्याचें म्हटलें आहे. ओल्डेनबर्गच्या मतानें हा वैदिक कालाच्या शेवटीं झाला असावा; व हेच मत मॅकडोनेलला योग्य दिसतें. त्याच्या मतें पंचविंश ब्राह्मणांत (२५.१४.५) उल्लेखिलेल्या देवमुनि जो तुर तो व हा हे एकच असावेत.
३३तष्टा- मैत्रायणी (४.८.१) आणि काठक संहिता (३०.१) यामध्ये असुरांचा पुरोहित वरुत्री यांच्याबरोबर याचा उल्लेख आला आहे.
३४दत्ततापस- पंचविंश ब्राह्मण (२५.१५.३) येथें आलेल्या सर्पसत्रांत होतृपद ह्याच्याकडे होतें.
३५दृढच्युतआगस्ति- (अगस्त्याचा वंशज) जैमिनीय ब्राह्मणांत वर्णिलेल्या विभिंदुकीयांच्या सत्रांत हा उद्गाता होता.
३६देवभागश्रौतर्ष- शतपथ (२.४.४,५) येथें तो सृंजय व कुरू ह्या दोघांचाहि पुरोहित होता असें म्हटलें आहे. यानें गिरिज बाभ्रव्याला यज्ञिय पशूचें विशसन (पशोर्विभाक्ति) कसें करावें हें शिकविल्याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मण (७.१) यांत आला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.१०,९,११) तो सावित्र अग्नीच्या बाबतींत प्रमाणभूत मानला जातो.
३७दौरेश्रवस्- (दूरेश्रवाचा वंशज) पंचविंश ब्राह्मण (२५.१५.३.) येथें उल्लेखिलेलें सर्पसत्र चालविणा-या पृथुश्रव्याचें हैं पैतृक नांव आहे.
३८दौरेश्रुत- (दूरेश्रुताचा वंशज). पंचविंश ब्राह्मणा (२५.१५.३) मध्ये उल्लेखिलेलें सर्पसत्र चालविणा-या तिमिघाचे हें पैतृक नांव होय.
३९नगरिन्जान श्रुतेय- ऐतरेय ब्राह्मण (५.३०) आलेलें हें एका ॠत्विजाचें नांव आहे जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण (३.४०,२.) येथें नगरिन् जानश्रुतेय काण्डि्वय असें नांव आहे.
४०पिशंग- पंचविंश ब्राह्मण २५.१५.३ येथें वर्णिलेल्या सर्पसत्रांत हा उन्नेता नावाच्या पुरोहिताचें काम करीत होता.
४१पृथुश्रवस्  दौरेश्रवस- (दुरेश्रव्याचा वंशज) पंचविंश ब्राह्मण (२५.१५.३) येथें आलेल्या सर्पसत्रांत हा उद्गात्याचें काम करीत होता.
४२प्राचीनशाल औपमन्यव- (उपमन्यूचा वंशज) हें छान्दोग्योपनिषदांत (५.२,१) आलेले एवा वेदान्ती गृहस्थाचें नांव आहे. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण ३.७,२; १०.२ येथें एका प्राचीनशालाचें नांव आढळतें. त्याच ग्रंथांत (३.१०.१) येथें प्राचीन शालांचा उल्लेख आहे.
४३भूतवीर- ऐतरेय ब्राह्मण (७.२७) येथें यांचा उल्लेख आहे. कांही दिवस हें जनमेजयाच्या यज्ञांत पौरोहित्य करीत होते.
४४विभिंदुकीय- जैमिनीय उपनिषद ब्राह्मण ७.२७ येथें उल्लेखिलेल्या सत्रांतील ॠत्विजांच्या समुदायाचें हें नांव आहे.
४५शितिपृष्ठ- (पांढरी पाठ असलेला) पंचविंश ब्राह्मण २५.१५.३ येथें उल्लेखिलेल्या सर्पसत्रांतील मैत्रावरुण ॠत्विजाचें हें नांव आहे.
४६शितिबाहु- जैमिनीय ब्राह्मण १.३६३ येथें ह्याचा यजमान म्हणजे यज्ञकर्ता म्हणून उल्लेख आहे. या यज्ञांतील
हवि एका वानरानें पळविला असा तेथें उल्लेख आहे.
४७शुचिवृक्षगौपालायन. – ऐतरेय ब्राह्मण (३.४८९) येथे उल्लेखिलेल्या वृद्ध द्युम्न अभिप्रतारिन्च्या पुरोहिताचें नांव आहे.
४८शौल्बायन- (शुल्बाचा वंशज) उदंक नांवाच्या अध्यापकाचें हें पैतृक नांव आहे. शतपथ (११.४,२,१७) येथें कोणी एक शौल्बायन अध्वर्यु होता व अयस्थूण हा गृहपति होता असा उल्लेख आहे.
४९पण्ड- पंचविंश ब्राह्मण (२५.२,५३) मध्यें वर्णिलेल्या सर्पसत्रांत हा एक ॠत्विज होता.
५०सत्यहविस्- मैत्रायणी संहिते (१.९,१,५) मध्यें हें एका प्राचीनकाल्पनिक अध्वर्यूचें नांव आलें आहे. असें मॅकडोनेल म्हणतो परंतु ह्याला प्राचीनकाल्पनिक समजण्यास ग्रंथांत कांही पुरावा नाहीं.
५१सुब्रह्मण्य- ब्राह्मण ग्रंथांत उद्गात्याच्या तीन मदतनीसांपैकी हा एक ॠत्विज असल्याचें म्हटले आहे. सुब्रह्मण्य नामक साम पठन करणें हें याचें काम होय.
५२सोमशुष्मन्- (वाजरत्नाचा वंशज) ऐतरेय ब्राह्मण (८.२१,५) येथें आलेलें हें एका पुरोहिताचें नांव आहे. ह्यानेंच शतानीकाला राज्याभिषेक केला.