प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.     

भूषणें (ॠग्वेद)

भूषणें (ॠग्वेद)

आनूक - गेल्डनार म्हणतो हा शब्द ॠग्वेदांत एकदांच आआ असून त्याचा अर्त भूषण असा आहे, रॉथ ल्युडविग व ओल्डेनबर्ग हे त्याचा क्रियाविशेषणाप्रमाणें अर्थ करतात.
ओपश- ॠग्वेद अथर्ववेद व पुढीलहि ग्रंथांत हा शब्द आला आहे परंतु याचा अर्थ मात्र संशयित आहे. बहुतेककरून सामान्यतः त्याचा अर्थ स्त्रियाची वेणी असा होतो. जुन्याकाळी कधी कधी पुरषांच्या केसालाहि हा शब्द लावीत असत. सिनीवालि दयतेला स्वौपशा असें म्हटलें आहे. परंतु हें विशेषण संशयित आह. झिमर म्हणतो कीं, कृत्रिम वेण्यांचा उपयोग वैदिक कालीं अगदीच माहीत नव्हता असें नाहीं. पृथुस्तुक (रुंद वेण्या असलेली;) विषतिस्तुका (मो ळया वेण्या असलेली) आणि ओपश यांतील फरक काढतां येत नाहीं. गेल्डनेर म्हणतो कीं या शब्दाचा शिंग असा अर्थ होतो. परंतु इंद्राला हा शब्द लावला म्हणजे त्याचा मुकुट असा अर्थ होतो. सायणांनीं बहुतेक ठिकाणीं ओपश याचा आकाश व कोठें मेघ असा अर्थ केला आहे.
कर्णशोभन- पुरुषांच्या करितां कर्णभूषण असा याचा अर्थ आहे. दुस-या एका उता-यांत (ॠ. .१२५ १४) एका देवतला हिरण्यर्कण असें म्हटलें आहे. हॉपकिन्स म्हणतो मकीं कर्णभूषणें हीं कंठभूषणें व मणिबंधभूषणें यांच्या नंतर उपयोगांत आली असावी.
कुरीर- ॠग्वेदांतील व अथर्ववेदांतील विवाहसंबंधी ॠचेतील वधूच्या भूषणाच्या वर्णनांत ओपश व कुम्ब यांच्या बरोबर हा शब्द आला आहे. यजुर्वेद संहितेंत सिनीवालि देवीचें सुकपर्दा, सुकुरीरा, स्वौपशा (उत्तमप्रकारचा) पोषाख डोक्यावर चढवलेली) असा अर्थाचे वर्णन आलें आहे. गेल्डनेरच्या मतें याचा अर्थ शिंग असा होतो. परंतु हा अर्थ संशयास्पद आहे.
कृशन- मोती. ॠग्वेदांत सवितृ देवतेचा रथ सुशोभित करण्याकरितां व घोडयाच्या अलंकारांत मोत्यांचा उपयोग करीत असत आणि म्हणूनच घोडयाला ‘कृशनाव’ असें म्हटलें आहे. अथर्ववेदांत मोत्यांचा उल्लेख आहे आणि समुद्रातून काढलेल्या मोत्यांच्या शिंपल्यांचा (शंखःकृशनः) उपयोग भारलेल्या ताईताप्रमाणें करीत असत असाहि उल्लेख आहे. निघंटूकोशांत कृशनाचा सुवर्ण असा अर्थ आहे.
खादि- ॠग्वेदांत साखळया, कडी, तोडे व कधीं कधीं हातांतील आंगठया अशा अर्थी हा शब्द आला आहे. मॅक्समुल्लर याचा अर्थ कड असा करतो.
निष्क- ॠग्वेद व पुढील ग्रंथांतून येणा-या निष्कवण्ठ, नीलग्रीव या शब्दावरून निष्क याचा अर्थ गळयांतील सोनेरी दागिना असा होतो. पंचविंश ब्राह्मणांत (१७.१.१४) रुप्याचें निष्क होतें असें म्हटलें आहे. ॠग्वेद कालापासूनच निष्क हें नाणें होतें असे दिसतें कारण एका स्तोत्यानें शंभर निष्क व शंभर थोडे मिळाल्याबद्दल स्तुति गाइली आहे.  या गायकाला निष्क हे केवल स्वतःच्या दागिन्याकरतांच पाहिजे असतील असें दिसत नाहीं. तदुत्तर ग्रंथांत निष्क हें नाण्याचें प्राचीन नांव आहे असें उल्लेखिलेलें आढळते.
न्योचनी- ॠग्वेदांतील विवाहसूक्तांत स्त्रियांचा एक अलंकार या अर्थी हा शब्द आला आहे. सायणमतानें याचा अर्थ दासी असा होतो.
मणि- ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत एक रत्न असा याचा अर्थ आहे व जादूच्या ताइताप्रमाणें सुखदुःख निवारणार्थ त्याचा उपयोग करीत असत असा अथर्ववेदांत उल्लेख आहे. याचा खरा अर्थ हिरा की मोत्यें हें समजत नाहीं. मात्र ही गोष्ट  खरी कीं, हा मणि दो-यांत ओवला जात होता व मणि ओवण्याच्या सूत्राचा पंचविंश ब्राह्मणांत उल्लेख आहे. हा मणि गळयांत बांधीत असत हें मणिग्रांव या शब्दावरून स्पष्ट होते. शांखायन आरण्यकांत (१२.१८) बिल्वाच्या मण्याचें वर्णन बरेंच आहे व तेथें असल्या ताइतांचे बरेच प्रकार वर्णिले आहेत. रत्नकार (मणिकार) याचा उल्लेख यजुर्वेदांतील पुरुषमेधामध्यें बलि दिले जाणा-यांच्या यादीत आला आहे.
१०रत्न- ॠग्वेदांत व पुढील वैदिक वाङ्मयांत मौल्यवान पदार्थ या अर्थी व तदुत्तर वाङ्मयांत मणि या अर्थी हा शब्द आला आहे.
११शिम्बल- ॠग्वेदांत याचा अर्थ सायणमतानें शाल्मली वृक्षाचें फूल असा आहे.
१२स्तुका- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत केसांचा किंवा लोंकरीचा गोंडा या अर्थी हा शब्द आला आहे.
१३स्रज्- लग्नाचे व इतर मंगलप्रसंगी शोभा देण्यासाठीं धारण केलेली माळ अशा अर्थानें हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर वाङ्मयांत आला आहे.
१४प्रवर्त- हा शब्द तैत्तिरीय संहितेंत आला असून त्यावरील टीकाकारांच्या मतें त्याचा अर्थ अलंकार असा आहे. अथर्वांतील व्रात्यांच्या वर्णनांतहि हा शब्द येतो. सेंटपीटर्स बर्ग कोशांत याचा ‘गोल आकाराचा अलंकार’ असा अर्थ दिला आहे.
१५कुम्ब- अथर्ववेदांत स्त्रियांनीं डोक्यावर घालावयाचा एक दागिना या अर्थानें हा शब्द आला आहे. गेल्डनेरच्या मतें ओपश, कुरीर या शब्दाप्रमाणें याचाहि शिंग असाच अर्थ होतो. परंतु हा अर्थ संशयास्पद आहे. वेणीत घालण्याचा स्त्रियांचा दागिना असाच अर्थ हिंदुस्थानांत परंपरागत चालत आला आहे.
१६नीनाह- अथर्ववेदांत हा शब्द एकदांच आला असून त्याचा नड या धातूपासून निघालेला अर्थ कमरपट्टा असा दिला आहे.
१७सीमन् (न्त)- अथर्ववेद व तदुत्तर ग्रंथ यांत केसांतील भांग असा याचा अर्थ आहे.
१८प्राकाश- हा शब्द तैत्तिरीय ब्राह्मणांत आला असून त्याचा अर्थ धातूचा अलंकार अथवा आरसा असा आहे. गेल्डनेर म्हणतो कीं, मैत्रायणी संहितेंतील (४.४,४) प्रावेष या शब्दाचाहि हाच अर्थ होतो.
१९फण- याचा उल्लेख कौषीतकी उपनिषदांत आला आहे व त्याचा एक अलंकार असा अर्थ दिला आहे परंतु ‘फलहताः’ हा पाठ चुकीचा दिसतो ‘फलहस्ताः’ असा तो पाठ असावा असें वाटतें.
२०लोहमणि- याचा छान्दोग्य उपनिषदांत बोथलिंगनें म्हटल्याप्रमाणें तांब्याचा ताईत असा अर्थ आहे.
मॅक्समुल्लर यानें म्हटल्याप्रमाणें सोन्याची लगडी (तुकडा) असा नव्हे.
२१विमुक्ता- याचा अर्थ मोती असा असून षड्विंश ब्राह्मणांत याचा उल्लेख आलेला आहे.
२२स्थागर- तैत्तिरीय ब्राह्मणांत हा शब्द आला असून एक प्रकारचा अलंकार असा  याचा अर्थ आहे.