प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
भाषा
१गाथा- ॠग्वेतांत गातुप्रमाणेंच ह्याचा अर्थ ‘गीत’ ‘कवन’ असा आहे. तथापि एका ठिकाणीं (१०.८५,६) मात्र त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे, कारण तेथें हा शब्द नाराशंसी आणि रैभी ह्याबरोबर आला आहे. अथर्ववेदावरील भाष्यकार या प्रकारचीं कांही उदाहरणें दाखवितात (२०,१२७) परंतु ओल्डेनबर्ग म्हणतो कीं ॠग्वेदाकडे पाहिल्यास ही उदाहरणें चुकीची दिसतात. दुसरीकडे पुष्कळ ठिकाणी गाथांचा उल्लेख आला आहे. आणि त्या छंदोबद्ध असतात असें ऐतरेय आरण्यकांत (२.३,६) म्हटलें असून तेथें ॠच्, कुम्ब्या आणि गाथा हे गीतांचे प्रकार आहेत असें म्हटलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (७.१८) ॠच् म्हणजे दैवी आणि गाथा म्हणजे मानुषी असा फरक दाखविला आहे (येथें ओम् ही दैवी गाथा (छंद) व तथा ही मानुष (अंगीकारविषयक) गाथा होय असें सायण भाष्य आहे). ब्राह्मणांमध्ये आणि सूत्रग्रंथांत गाथांचा जरी धार्मिक विधींशी संबंध आढळतो तरी त्या ॠच् यजुस् व सामनयापासून भिन्न आहेत असें स्पष्ट म्हटलें आहे व त्या वैदिक नसून त्यांस मंत्र म्हणत नसत. याप्रमाणेंच यज्ञगाथा या शब्दाचा अर्थ केवळ यज्ञविषयक गीत असाच होत असे. शतपथ ब्राह्मणांत पुष्कळ गाथा आहेत. त्यांत फक्त प्रसिद्ध राजंच्या यज्ञांच्या गोष्टी साररूपानें सांगितल्या आहेत. आणि मैत्रायणी संहितेमध्यें (३.७६) लग्नाच्या वेळी गाथा गात असत असें विधान आहे. कधींकधीं गाथेला नाराशंसी असें म्हणत. म्हणजे ती कोणातरी मोठया दात्याची स्तुति असावी.
२छंदस - ॠग्वेदामध्यें जेथें जेथें हा शब्द आलेला आहे तेथें तेथें ह्या शब्दाचा अर्थ सूक्त असा आहे. छंदस् हा शब्द छंद=संतुष्ट करणें ह्या शब्दापासून बनलेला आहे. व ह्याचा मूळचा अर्थ देवतेवर ज्याचा परिणाम होईल असा मोहक मंत्र असा आहे. ॠग्वेदांतील एका सूक्तांत त्याचप्रमाणें अथर्ववेदाच्या एका सूक्तांत हा शब्द अनेकवचनी “छंदासि” असा आला आहे व त्याच्याच बरोबर ॠक् , सामन् व यजुस् हे शब्द आलेले आहेत. ह्या शब्दाचा मूळ अर्थच ॠग्वेदाच्या ह्या सूक्तांत अभिप्रेत आहे व हा अर्थ अथर्ववेदांतील अभिचारविषयक अर्थास अनुरूप असा आहे. वृत्तबद्ध स्तुति ह्या मूळच्या अर्थापासून पुढें ॠग्वेदांत वृत्तबद्ध गीत असा ह्याचा अर्थ झाला. वृत्तामध्यें गायत्री, त्रिष्टुभ् वगैरे सर्व वृत्तांचा (छंदासि) उल्लेख आलेला आहे. अथर्ववेद व वाजसनेयि संहिता या ऋग्वेदोत्तर संहितामध्ये तीन किंवा सात वृत्तांचा उल्लेख आलेला आहे व शतपथ ब्राह्मणांत (८.३३,६) आठ वृत्तांचा निर्देश आहे. ॠग्वेद प्रातिशाख्याचे वेळीं ह्या वृत्तांची विस्तरशः छाननी झालेली दिसते पण हेंहि लक्ष्यात ठेविलें पाहिजे कीं ह्या प्रातिशाख्याच्या पूर्वी सुध्दां निरनिराळया वृत्तांमध्ये शब्द किती असावे ह्याबद्दल उल्लेख सापडतात. शतपथ ब्राह्मणांत म्हटल्याप्रमाणें ह्या छंदस् शब्दाचा निश्चित अर्थ वैदिक संहिता असा झाला. हा शब्द अथर्ववेदाच्या एका सूक्तांत बृहच्छन्दस् अशा समासाच्या रूपांत येतो. हें सामासिक विशेषण एका घराला लावलें आहे व त्याचा अर्थ मोठें छप्पर असलेला असा असला पाहिजें. ब्लूमफील्डला हा शब्दार्थ कबूल आहे. पण व्हिटनेच्या मतें छंदस्च्या ऐवजी छदिस् हा शब्द अधिक चांगला दिसतो व तसा तो तेथें शोध घालतो.
३पद- ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ श्लोकाचा एक चरण असा आहे. शांखायन ब्राह्मण ग्रंथांत ॠचा, अर्थॠचा, पाद व वर्ण असा अनुक्रम असून कोठें कोठें पद याचा वाक्य असा अर्थ होतो.
४मंत्रकृत- हा शब्द ॠग्वेद व तदनंतरच्या ग्रंथातून आला आहे व त्याचा अर्थ मन्त्र करणारे कवि असा आहे. हें नाम नसून सवत्र विशेषण आहे.
५शक्करी- अनेकवचनी. ह्याचा अर्थ शक्वरी मंत्र, किंवा शाक्वर साम ज्या मंत्रांत गायिलें जातें. ते महानाम्नी मंत्र असा आहे. हा अर्थ ॠग्वेदांत आहेसा वाटतो व तो पुढील ग्रंथांत खात्रीनें आलेला आहे.
६शपथ- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यामध्यें याचा अर्थ शाप न्याय कचेरींत घेण्याची शपथ असा नव्हें असा आहे. पण अशा त-हेची शपथ पूर्वी घेतली जात असें हें दाखविणारा ॠग्वेदांत एक उल्लेख आहे व त्या उल्लेखांत एक वक्ता (बहुतकरून हा वसिष्ठच) असें म्हणतो कीं आपण जर चेटुक करणारे असलों तर आपणाला मरण प्राप्त होवो व आपण जर तसे नसलो तर आपल्या शत्रूवर मृत्यूचा घाला पडो (७.१४४,१५). ह्या शपथ शब्दाचा अर्थ अथर्ववेदांत कांही ठिकाणीं आक्रोश व कांहीं ठिकाणीं शाप असा केलेला आढळतो. ॠग्वेदांमध्यें हा शब्द तसाच ठेवून दिलेला आहे. परंतु नैरुक्तामध्यें ‘शापाभिशापौ’ असें शपथ शब्दाचें अभिशापाहून पृथक्त्व दाखविलेलें आहे. अर्थात शपथ शब्दाचा अर्थ प्रतिज्ञा असा होतो. व व्यवहारांतहि शपथ शब्दाचा अर्थ ‘प्रतिज्ञा, आण’ असाच घेतला जातो.
७ससर्परी- ॠग्वेदांतील दोन ॠचांत हा शब्द आला आहे. मागाहूनचा अर्थ स्वीकारल्यास या शब्दावरून विश्वामित्रानें जमदग्नीपासून संपादन केलेलें वाणींतील नैपुण्य असा अर्थबोध होतो. हें भाषाचातुर्य काय होतें समजत नाहीं.
८प्रश्न- याचा अर्थ विचारपूस, चर्चात्मक, प्रश्न असा आहे. ‘प्रश्नम् एति’ या वाक्याचा अर्थ तो वादात्मक मुद्यासंबंधानें निर्णायात्मक निकाल मागतो असा तैत्तिरीय संहितेंत (२.५,८,५) आहे व तसाच इतरत्रहि आहे. व यावरूनच ऐतरेय ब्राह्मणांत, प्रश्न म्हणजे ‘निकाल’ ‘ठाम मत’ अशा अर्थानें हा शब्द आढळतो. यजुर्वेदातींल पुरुषमेध प्रसंगीच्या बळींच्या यादींत ‘प्रश्निन्’ ‘अभिप्रश्निन्’ आणि प्रश्नविवाक हे शब्द सांपडतात. यावरून असें वाटतें की, दिवाणी दाव्यांतील तीन पक्ष वादी, प्रतिवादी आणि मध्यस्थ (मध्यमशी) किंवा न्यायाधीश यांचा उल्लेख देण्याचा येथें उद्देश असावा.
९प्रलाप- अथर्ववेदांत व ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द ‘बडबडणें’ या अर्थाच्या आणखी इतर शब्दाबरोबर सांपडतो. ‘ऐतशप्रलाप’ या समासांत हा शब्द अथर्व वेदाच्या कांही वचनांचें नांव म्हणून आढळतो. मूल ग्रंथांत या नांवाला कांही आधार नाहीं.
१०वेद- अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथांत पवित्र ज्ञान या अर्थानें हा शब्द आला आहे. अनेकवचनी या शब्दाचा निश्चित अर्थ ॠक्, यजुः व साम असे तीन वेद असा आहे.
११वाच्- मैत्रायणी संहितेंत हा शब्द आला आहे. वैदिक ग्रंथांत वाच् हा शब्द बराच महत्त्वाचा आहे. पण त्यांतला
बराच भाग काल्पनिक व पौराणिक दंतकथासंबंधाचा आहे. शतपथ ब्राह्मणांत वाचेचे चार प्रकार सांगितलेले आहेत. मनुष्यांची, जनावरांची, पक्ष्यांची व सरपटणा-या लहान प्राण्यांची वाचा असें ते चार प्रकार होत. तैत्तिरीय व मैत्रायणी संहिता ग्रंथांत वाचा उत्पन्न करण्याचें श्रेय इंद्राला दिलेलें आहे. तूणव, वीणा, दुंदुभिसारख्या वाद्यांच्या आवाजाचा उल्लेख आलेला आहे व एका संहितेंत रथाच्या कण्याच्या ध्वनीचाहि उल्लेख आला आहे. कौषीतकि ब्राह्मणांत असें लिहिलें आहे कीं, कुरुपंचाल व उत्तरेकडील देश येथें राहणा-या लोकांची भाषा इतकी उत्तम होती कीं, इतर ठिकाणचे लोक तेथें भाषेचा अभ्यास करण्यास जात असत. उलटपक्षीं तेथल्या मूळच्या लोकांत बोलताना ग्राम्यपणा येई तो टाळण्यात येत असे. वाचेच्या विभागणीचा एक प्रकार म्हणजे दैवी व मानुषी हा होय. त्याचें उदाहरण म्हणजे ओम् व तथा इत्यादि. ब्राह्मणाला हे दोन्ही प्रकार माहीत पाहिजेत. या दोन भाषेतला फरक सायणाचार्य म्हणतात त्या प्रमाणें संस्कृत व अपभ्रष्ट भाषेंतला फरक व मानता सूक्तातील व कर्मपद्धतीमधील संस्कृत भाषा आणि नेहमींच्या प्रचारांतील भाषा यामधील फरक समजणें बरें. आर्य व ब्राह्मणाची भाषा याचा उल्लेख आलेला आहे त्यावरून अनार्य लोकांच्या भाषेच्या उलट संस्कृत भाषा असा अर्थ असावा. व्रात्य लोक स्वतः आदीक्षित असले तरी ते दीक्षित वाणी उच्चारीत व जें उच्चारण्यास सोपें असे त्यासहि दुरुक्त म्हणजे उच्चारण्यास कठीण असें म्हणत. याचा अर्थ अनार्य लोकांचा प्राकृत भाषा बोलण्याकडेच जास्त कल वहात होता. पण असा अर्थ स्वीकारतांनां आपणास एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे की शतपथ ब्राह्मणांत जिचा संबंध आलेला आहे ती भाषा बोलणारे व व्रात्य हे एकच असावेत.
१२अथर्वाण- तैत्तिरीय ब्राह्मणांत अंगिरस् शब्द अथर्ववेद दर्शविण्याकरितां योजितात. अथर्वागिरस् हा सामासिक शब्दहि त्याच अर्थी योजितात.
१३अथर्वागिरस्- ब्राह्मण ग्रंथांतील कित्येक उता-यांत अथर्ववेदाचे हें समूहवाचक नांव योजिले आहे. मूळ अथर्ववेदांतच हें नांव एकदां आलें आहे. परंतु सूत्रकालाच्या पूर्वी अथर्ववेद हें नांव अस्तित्वांत नव्हतें. हा समास अर्थवेदांत जीं दोन त-हेची सूक्तें आहेत त्यांचा द्योतक आहे असें ब्लूमफील्ड म्हणतो. पहिला भाग वेदांतील शांतीकर्माकडे (भेषजानि) दिलेला आहे आणि दुसरा भाग वै-यावर यातु (जादु अथवा अभिचार) वगैरे करितात त्याकडे योजिला आहे. ही विचारसरणी घोर आंगरिस् आणि भिषज् आथर्वण हीं जी दोन ॠषींची नांवे येतात त्यांवरून आणि पंचविंश ब्राह्मणांत आथर्वाणः आणि आथर्वणानि यांचा औषधीशी जो संबंध आहे त्यावरून संयुक्तिक दिसतें. शिवाय भेषज् (उपाय) हा शब्द अथर्ववेदांत खुद्द् त्या वेदालाच लाविला आहे असें मॅकेडोनल म्हणतो पण असें वर्णन आढळत नसल्यामुळें हें निराधार आहे आणि शतपंथांतील यातु (जादू) या शब्दांवरूनहि हाच अर्थबोध होतो. अथर्ववेदांतील या दोन त-हेच्या सूक्तांचे कर्तृत्व ज्या दोन ॠषींच्या नांवावर मोडतें त्यांमध्यें स्पष्टपणें काय भेद होता हें समजत नाहीं. तै. ब्रा. १२.८,२ येथें अथर्वागिरस असा सामान्य उल्लेख आहे. मागील वाक्यातून ॠचः यजूंषि अशी मंत्रांनां अनुलक्षण सामान्यपणें नांवे आलीं आहेत. त्या अनुरोधानें अथर्वागिरसः म्हणजे अथर्व किंवा अंगिरस या ॠषींनां दृष्ट झालेले मंत्र असा अर्थ सायणाचार्यांनीं केला आहे आणि तो बरोबर आहे. तैत्तिरीय आरण्यक व उपनिषद यांत असाच सामान्य उल्लेख आहे. बृहदारण्यकोपनिषदांत तीन ठिकाणी अथर्वागिरसः असा तैत्तिरीयांतील उल्लेखाप्रमाणेंच सामान्यपणें उल्लेख आहे. परंतु येथें विशेष असा आहे कीं, या उल्लेखापूर्वी तैत्तिरीयाप्रमाणें ॠच्, यंजूषि अशी सामान्यपणें नावे न येता ॠग्वेदोयजुर्वेद सामवेदः असा वेदपद घटित उल्लेख आला आहे. या वरून बृहदारण्यकोपनिषदकालीं इतर वेदाप्रमाणें आथर्वण मंत्रसमूहाला अथर्ववेद असें नांव मिळालें नव्हतें हेंच अनुमान दृढ होतें. छांदोग्योपनिषद ३.४,१,२ मधील उल्लेख याच अनुमानास पुष्टि देतो. शांखायन श्रौतसूत्रावरून असें दिसतें कीं, अथर्ववेद व अंगिरसवेद असे दोन भेद असून पहिला वेद औषधप्रक्रिया (भेषज्) सांगणारा व दुसरा वेद जारणमारण वगैरे अभिचार-प्रयोग सांगणारा असावा.
१४अनुव्याख्यान- बृहदारण्यकोपनिषदामध्यें ही एक लेखनाची रीति आहे असा उल्लेख आहे. श्रीशंकाराचार्य त्याचा अर्थ मंत्राचें स्पष्टीकरण असा करितात. ज्या अर्थी हा शब्द अनेकवचनांत असतांनां त्याचा अर्थ सूत्रांतील अर्थास अनुसरून असतो त्या अर्थी श्रीशंकराचार्यांचा अर्थ बरोबर दिसतो. सीग अन्वाख्यान याचा अर्थ पुरवणी असा करितो.
१५अनुशासन- हा शब्द शतपथांत अनेकवचनी आला असून मॅकडोनेल त्याचा अर्थ एक वाङ्मयाचा प्रकार असा करितो. सायण भाष्याप्रमाणें याचा अर्थ वेदांग असा आहे.
१६अंतेवासिन् - अन्तेवासिन् म्हणजे जवळ राहणारा. गुरूच्या घरीं जो ब्रह्मचारी राहतो त्याला हा शब्द योजितात. ब्राह्मणग्रंथकालापूर्वी हा शब्द येत नाहीं. अन्तेवासिनखेरीज दुस-यापासून (शास्त्रोक्तशिष्यलक्षणरहिता पासून) विद्या गुप्त ठेवण्यांत जास्त खबरदारी घेण्यांत येई (म्हणजे त्याला विद्या सांगितली जात नसे)
१७अन्वाख्यान- याचा शब्दशः अर्थ पुरवणी असा होतो. शतपथांत हा शब्द तीन ठिकाणीं आला आहे. परंतु यांपैकी दोहोंवरून हा अर्थ निघत नाहीं, तर त्या ठिकाणीं हा शब्द ग्रंथाचा उत्तरार्ध दर्शविण्याकरितां योजिला आहे.
परंतु तिस-या ठिकाणीं मुख्य इतिहास कथा आणि हा शब्द यांच्या अर्थात फरक दाखविला आहे. त्यावरून याचा अर्थ परिशिष्टकथा म्हणजे पुरवणी गोष्ट असा होतो.
१८आख्यान- राजसूयाच्या वेळी होत्याकडून जें शुनःशेपाचे आख्यान सांगितले जातें त्याचा उल्लेख ऐतरेयः ब्राह्मणांत आहे. अश्वमेधांतील घोडा ज्या वेळेस पृथ्वीपर्यटन करण्यास मोकळा सोडीत त्या कालांतील गोष्टींच्या क्रमाला पारिप्लवम् असें म्हणत. ऐतरेय ब्राह्मणांत ज्यांनां दुसरीकडे व्याख्यान म्हणतात अशा सौपर्ण दंतकथा सांगणा-यांनां व्याख्यानविद असें म्हटलें आहे. निरुक्तांत यास्काचार्यांनी ॠग्वेदाचे जे ऐतिहासिक विवेचक आहेत त्यांच्या मतास उद्देशून तो शब्द योजिला आहे.
१९आख्यायिका- वैदिक वाङ्मय आणि तैत्तिरीय आरण्यक यांत हा शब्द फक्त एकदांच आलेला दिसतो. तरी त्याचा अर्थ निश्चित करतां येत नाहीं.
२०आनहस्या- हा शब्द जेव्हा अनेकवचनांत असेल तेव्हां त्याचा अर्थ कामोत्तेजक पद्यें असा आहे. हा शब्द अथर्ववेदांतील कुन्तापसूक्तांच्या एका विभागाचें नांव आहे. ही सूक्तें अश्लील आहेत.
२१उपनिषद्- ब्राह्मणग्रंथांत याचा अर्थ कोणच्या तरी शब्दाचा अथवा वाक्याचा गूढ अर्थ व कधीं कधीं यतीचा गूढ विचार असा केला आहे. परंतु बृहदारण्यकोपनिषदांत एका जातीचे ग्रंथ, या अर्थी अनेकवचनांत उपयोगी आणिला आहे. हे ग्रंथ विषय व स्वरूप या दृष्टीनें उपनिषदांशीं समान असावेत. त्याचप्रमाणें तैत्तिरीय उपनिषदांतील अध्यायाच्या शेवटीं इत्युपनिषद असें शब्द असतात. ऐतरेय आरण्यकाचा तिसरा भाग संहितोपनिषद् हा आहे आहे शांखायन आरण्यकांतहि हेंच नांव आढळतें. याचा मूळ अर्थ काय आहे हें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. मॅक्समुल्लर आणि त्यानंतरचे पंडित व्युत्पत्तीप्रमाणें त्या शब्दाचा अर्थ पहिल्यानें अध्ययनस्थान, त्यावरून पुढें गूढ तत्त्वें आणि नंतर गूढ तत्त्वाचा ग्रंथ असा अर्थ करितात. तथापि ओल्डेनबर्ग म्हणतो कीं, उपासनेला हा शब्द लावीत असत. डॉयसेन म्हणतो कीं, या शब्दाचा मूळ अर्थ गुप्तशब्द, नंतर गुप्तवाक्य आणि तदनंतर गुप्त अर्थ असा होत गेला. परंतु का क्रम अशक्य आहे असें मॅकडोनेल म्हणतो. हॉपकिन्स म्हणतो कीं, उपनिषद म्हणजे पुरवणी ग्रंथ. परंतु हा अर्थ नेहमीचा (गूढ अर्थ असा) जो अर्थ आहे त्याच्याशी विसंगत आहे.
२२ॠग्वेद- ॠचांचा संग्रह. हें नांव पहिल्यानें ब्राह्मणांत आणि त्यानंतर पुष्कळवेळ आरण्यकें व उपनिषदें यांत आढळतें.
२३एकायन- हा शब्द छांदोग्यपनिषदांत विचारार्ह विषय अशा अर्थाचा द्योतक आहे. सें.पी. कोशाप्रमाणें त्याचें भाषांतर एकीचें तत्व (एक अयन) एकेश्वरी मत असा, मॅक्समुल्लरचा अर्थ नीतिशास्त्र असा आणि मोनिअर वुइल्यम्सच्या कोशाप्रमाणें त्याचें भाषांतर व्यावहारिक ज्ञान असें आहे.
२४ऐतशप्रलाप- अथर्ववेदांतील विसाव्या काण्डांत कुंताप नामक जो मंत्रभाग आहे त्यांतील विशिष्ट मंत्रांनां हें नांव आहे. याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत आहे. ऐतश नावाच्या एका ॠषीनें आपल्या मुलापुढें हे मंत्र पठण केले. परंतु सर्व मंत्र पठण करण्यापूर्वीच त्याच्या मुलानें त्याच्या तोंडावर हात ठेवून मंत्र पठण करणें (तें मंत्र प्रलापरूप असल्यामुळें) बंद केलें. तेव्हां त्या ऐतशानें आपल्या मुलांनां तुम्ही पापी व्हाल अस शाप दिला.
२५ऐतिहासिक- जे लोक वैदिकसूक्तांनां निव्वळ इतिहास आहे असें मानीत असत आणि त्याप्रमाणें त्यांचा अर्थ करीत असत त्यांनां उद्देशून हा शब्द योजिला आहे. त्याचीं मतें नैरूक्तांच्या मताहून भिन्न आहेत अथवा विरुद्ध आहेत. सीज म्हणतो कीं, तींच मते निरुक्तांत वैदानाः म्हणून उल्लेखिलेलीं आहेत, यावरून त्यांच्या ग्रंथास निदानाः असें म्हणत असें वाटतें.
२६काठक- कृष्ण यजुर्वेदाच्या कठ शाखेच्या ग्रंथांचे हें नांव आहे असें यास्क याच्या निरुक्तांत आणि अनुपद् सूत्रांत सांगितलें आहे. या नांवाचा संहितेचा कांही भाग श्राडर यानें प्रकाशित केला आहे.
२७कारीरदि- जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत उद्गीथा (सामवेद गीत) वर विशिष्ट मत असलेल्या मनुष्याची नांवे अशा अर्थानें हा शब्द आहे.
२८कुम्ब्या अथवा कुम्व्या- शतपथ ब्राह्मणांत भाषा पद्धति किंवा स्वरूप दाखविण्याकरितां हा शब्द ॠच, यजुस्, सामन् आणि गाथा या शब्दांच्या नंतर आला आहे. ऐतरेय आरण्यकांत ॠच् आणि गाथा यांच्याबरोबर मोजकें बोलण्याच्या पद्धतीपैकीं एक अशा अर्थानें लिहिलें आहे. शब्दाच्या बरोबर अर्थाविषयी अज्ञानच आहे. वेबर म्हणतो कीं, याचा अर्थ थांबविणें असा आहे.
२९क्षत्रविद्या- ‘अधिकारी वर्गाचे शास्त्र’. छांदोग्य उपनिषदांत हा शब्द आहे. याचा धनुर्वेद, धनुःशास्त्र असा अर्थ शंकराचार्य करितात आणि हा शक्य आहे.
३०खिल- ॠग्वेदाच्या कांही सूक्तास हें नांव सूत्रांत दिलेलें आढळतें. हा शब्द पुरवर्णी या अर्थी आहे.
३१चरकब्राह्मण- या ग्रंथांतून सायणानें आपल्या ॠग्वेदावरील भाष्यांत उतारे घेतले आहेत.
३२छंदोग-याचा अर्थ छंद गाणारा असा असून जे सामगायन करीत त्यांनां हा शब्द लावीत. कारण हे सामगायक सामवेदांत असलेल्या छंदार्चिकेंत सांगितलेल्या क्रमाप्रमाणें मंत्र गात असत. हा शब्द शतपथ ब्राह्मणांत फक्त एकदांच सापडतो व सूत्रांत अनेकदा सांपडतो.
३३ज्योतिष- ज्योतिष शास्त्र असा या शब्दाचा अर्थ आहे. संहिता किंवा ब्राह्मण ग्रंथ यांमध्ये ज्योतिषावरील कोणताहि ग्रंथांत उल्लेख नाहीं. वेदांगज्योतिष म्हणून जो ग्रंथ आहे. त्यांत वेदांतील ज्योतिःशास्त्र आहे. अशी कल्पना आहे. त्यावर वारंवार बरीच चर्चा झाली आहे. त्या ग्रंथाचा काल अनिश्चितच आहे व ग्रंथांतील मजकूर व त्याचें एकंदर स्वरूप यावरून हा ग्रंथ अर्वाचीन असावा असें निःसंशय वाटतें.
३४तापस- उपनिषदाच्या पूर्वी यति या अर्थानें वैदिक वाङ्मयांत हा शब्द येत नाहीं. पंचविंश ब्राह्मणांत वर्णन केलेल्या सर्पसत्रांत होत्याच काम करणा-या ॠत्विजाचें दत्ततापस असें नांव आहे.
३५तैत्तिरीय- कृष्णयजुर्वेदाच्या शाखांपैकी एक शाखेचें हें नांव आहे. पण त्या शाखेचा सूत्रकालापर्यत उल्लेख आलेला नाही. या शाखेची एक संहिता, एक ब्राह्मण, एक आरण्यक व त्या आरण्यकाचा भाग एक उपनिषद् इतके ग्रंथ आहेत.
३६दशतयी- निरुक्तामध्यें हा दहा मंडलांत विभागलेली ॠग्वेदाची संहिता असा याचा अर्थ होतो.
३७दाशतय- दहा मंडलांत विभागलेल्या ॠग्वेद संहितेचा असें हें विशेषण निदान सूत्रांत अध्यायाचें विशेषण म्हणून आहे. कौषीतकी ब्राह्मण व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें या शब्दाचें स्त्रीलिंगी रूपहि आलेले आहे.
३८देवजनविद्या- शतपथ ब्राह्मणांत व छांदोग्योपनिषदांत जी शास्त्रें संगितली आहेत. त्यांपैकी ही एक विद्या आहे.
३९दैव- हा शब्द पुल्लिंगी छांदोग्योपनिषदामध्यें शास्त्रांच्या यादीत आलेला आहे. याचा अर्थ श्रीशंकराचार्य उत्पातज्ञान म्हणजे भविष्यत् गोष्टींचे ज्ञान असा करितात. सें.पी. कोशांत असें सुचविलें आहे कीं, हा शब्द विशेषणार्थी आला आहे व हे मत लिटल व बोथलिंक यांनीं आपल्या भाषांतरांत स्वीकारले आहे. बृहदारण्यकोपनिषदांत पहिल्या दोन वंशामध्ये एक काल्पनिक अथर्वणाचें पैतृक नांव आहे.
४०नक्षत्रविद्या- म्हणजे ज्योतिषशास्त्र. हा शब्द इतर शास्त्रांबरोबर छांदोग्योपनिषदामध्यें आलेला आहे.
४१नाचिकेत- नाचिकेतस् याशीं संबंध असलेलें हें काठक उपनिषदामध्यें एका उपाख्यानाचें नांव आहे. या उपनिषदामध्यें व तैत्तिरीय उपनिषदामध्यें एका विशेष प्रकारच्या अग्नीस हें नांव दिलेलें आहे.
४२नाम- यानें स्थानिक उल्लेख व्यक्त होतो. उदाहरणार्थ, कौशांबेय, गांग्य. पुष्कळदां पैतृक नांवच येत असतें. उदाहरणार्थ, भार्गव, मौद्गल,किंवा दोन पैतृक नांवांचाहि उपयोग केलेला असतो. साधें नांवहि पैतृक नांव असतें. उदाहरणार्थ, त्रसदस्यु हें नांव घ्या. कांही थोडया ठिकाणीं नव-याच्या नावांवरून बायकोचें नांव बनलेलें असत. उदाहरणार्थ उशीनराणी, पुरुकुत्सानी, मुद्रलानी.
४३निदान- हें एका सूत्राचें नांव असून बृहद्देवतेमध्यें भाल्लवी ब्राह्मणांतून ह्यांत उतारा घेतलेला आहे म्हणून याचा उल्लेख आलेला आहे. हा उतारा कोणचा हें हल्लीच्या सूत्राग्रंथांत सांपडत नाहीं.
४४निरुक्त- एखाद्या शब्दाचें किंवा वाक्याचें स्पष्टीकरण. हा शब्द छांदोग्योपनिषदामध्ये प्रथम आलेला आहे. पण उत्तरकालीन उपनिषदापूर्वी एखाद्या ग्रंथाचें नांव म्हणून हा शब्द आलेला नाहीं. तथापि यास्काचें निरुक्त बुद्धपूर्वकालीन असावें.
४५निविदधान- निविद असेलला. हा शब्द अनेक वेळां ब्राह्मण ग्रंथांत एखाद्या सूक्ताचें किंवा मंत्राचें नांव म्हणून आलेला आहे.
४६निर्वचन- तैत्तिरीय आरण्यक व निरुक्त ह्यांमध्यें स्पष्टीकरण, विशेषतः व्युत्पत्तिविषयक स्पष्टीकरण, असा याचा अर्थ होतो.
४७नैदान- निरुक्तामध्यें एका विशिष्ट पंथाच्या वैदिक भाष्यकारांनां हा शब्द लावलेला आहे. रॉथच्या मतानें नैदान म्हणजे व्युत्पत्तिशास्त्रज्ञ होत. पण सीज ह्याचे मताने हे नैदान म्हणजेच ऐतिहासिक होत. निरुक्तामध्यें नैदान हा शब्द वैदिक भाष्यकारांनां लावलेला नसून तो सर्वसामान्य अशा दृष्टीनें आलेला आहे. कारण निदान शब्दाची व्युत्पत्ति निदानमिति ग्रन्थः तद्विदो नैदानाः अशी दिलेली आहे.
४८नैरुक्त- निरुक्तामध्यें ह्याचा अर्थ शब्दाची खरी व्युत्पत्ति जाणून त्याचा अर्थ सांगणारा असा आहे. यास्काचें निरुक्त हा ह्या नैरुक्तांचा शिष्ट संमत ग्रंथ आहे व हा ग्रंथ पूर्वीच्या नैघंटुक नांवाच्या निरुक्तावर टीका आहे.
४९पंडित- हा शब्द उपनिषद् ग्रंथापासून पुढें प्रचारांत येऊं लागतो.
५०पारिप्लव- हा शब्द आख्यान म्हणजे गोष्ट हिला लावलेला असून हें आख्यान अश्वमेधाचे वेळीं सांगावयाचें असतें व वर्षभर कांही ठराविक वेळीं सांगावयाचें असतें. हा शब्द शतपथ ब्राह्मण व सूत्र ग्रंथ ह्यांमध्यें आलेला आहे.
५१परोवर्यविद्- निरुक्तामध्यें दंतकथा जाणणारे ह्या अर्थानें हा शब्द आलेला आहे.
५२पार्षद्- हा शब्दप्रथम निरुक्तांत आलेला असून त्याचा अर्थ वैयाकरणांच्या एका संप्रदायानें मान्य केलेला ग्रंथ असा आहे.
५३पित्र्य- छांदोग्योपनिषदामध्यें आलेल्या शास्त्रांच्या यादींत हा शब्द आलेला आहे. शंकराचार्यांनीं आपल्या टीकेंत म्हटल्याप्रमाणें पितरांची श्राध्दे वगैरे करून पूजा करावयाची त्याबद्दलचें शास्त्र असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. ह्या यादींत पित्र्य ह्याच्या बरोबर हा शब्द आलेला आहे व सें.पी. व कोशांत पित्र्यराशि असा एक शब्द आलेला
आहे पण त्याचा निश्चित अर्थ काय हें समजत नाहीं.
५४पुराण- हा शब्द इतिहासपुराण ह्या द्वंद्व समासांत ब्राह्मणग्रंथापासून पुढील ग्रंथांत वारंवार आढळून येतो. हा कधी कधी एकटाच येतो पण द्वंद्वं समासांत असतांना जो त्याचा अर्थ असतो तोच एकटा शब्द आला असतांना असतो. सायणाच्या मतानें पुराण म्हणजे विश्वाच्या मूळ स्थितीचें व ह्या जगाच्या उत्पत्तीसंबंधी वर्णन करणारी कथा असा अर्थ होय व हा अर्थच बरोबर आहे इतिहास व पुराण हीं निराळी आहेत असें मानण्यास काहीं आधार नाहीं.
५५प्रतिप्रश्न- हा शब्द शतपथ ब्राह्मणांत आढळतो. तो प्रजापतीला लावलेला असून त्याचा अर्थ ‘संशयाचा निर्णय लावणारा’ असा आहे. हा मध्यस्थाल पारिभाषिक शब्द आहे.
५६प्रवचन- तोंडी शिकवण किंवा शिक्षण या अर्थानें हा शब्द शतपथ ब्राह्मणांत आणि तदनंतरच्या ग्रंथांत आला आहे.
५७प्रवल्हिका- म्हणजे ‘कूट’ हें नांव ऐतरेय ब्राह्मणांत अथर्ववेदाच्या काही ॠचांनां दिलें आहे.
५८प्रातरनुवाक- याचा सोमसवनप्रसंगी प्रातःकाळी म्हणावयाची सूक्तें असा ब्राह्मणांत उल्लेख आढळतो.
५९बहुवचन- याचा व्याकरणांत ‘अनेकवाचक’ असा अर्थ आहे. तसाच निरुक्त आणि शतपथ ब्राह्मणांतहि आहे. त्याचप्रमाणें द्विवत् आणि बहुवत् यांचा निरक्तांतील अर्थ “द्विवचनी किंवा बहुवचनी” असा आहे.
६०बहवृच- याचा अर्थ ॠग्वेदाचा अनुयायी. हा शब्द ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पंचविंश ब्राह्मण आणि ॠग्वेदांतील आरण्यक यांतून आढळतो.
६१ब्रह्मपुरोहित- हा शब्द काठक संहिता आणि शतपथ ब्राह्मण यांत आढळतो. त्या ठिकाणी सेंटपीटसबर्ग कोशाप्रमाणें सर्व ब्राह्मण ज्याचे पुरोहित आहेत असा त्याचा अर्थ दिला आहे. परंतु हा अर्थ समाधानकारक नाहीं. बहुधा “ब्राह्मण पुरोहित असलेला” असा त्याचा अर्थ असावा. नाहींतर या शब्दाचा अर्थ नुसता ब्राह्मणांस पूज्य मानणारा असा असावा व तो वेबरच्या म्हणण्याप्रमाणें ‘क्षत्र’ म्हणजे क्षत्रिय जातीचें विशेषण होय.
६२ब्रह्मबंधु- याचा तुच्छतादर्शक अर्थ म्हटला म्हणजे नुसता नांवाचा ब्राह्मण, ब्रह्मतेजहीन व याचक वृत्तीचा असा होतो. ह्या अर्थानें हा शब्द ऐतरेय ब्राह्मण व छांदोग्य उपनिषद् यांत येतो. शांखायन श्रौतसूत्र यांतील ब्रह्मबंधूचा अर्थ ‘ब्राह्मणापसद’ असा नसावा असें त्या प्रकरणावरून दिसतें. भाष्यांत त्याचा काहीं उलगडा केलेला नाहीं.
६३ब्रह्मविद्या- ‘सर्वव्यापी परमेश्वराचें ज्ञान’. छांदोग्य उपनिषदांत दिलेल्या एका शास्त्राचें हें नांव आहे. याचा इतरत्रहि उल्लेख येतो.
६४ब्रह्मोद्य- याचा ब्राह्मण ग्रंथांत वेदान्तविषयक गूढ (कूट) वेदांतग्रंथि असा अर्थ होतो. व तें गूढ वैदिक कर्मातील पुष्कळ प्रसंगी फार महत्त्वाचे असतें. उदाहरणार्थ अश्वमेध प्रसंगी, किंवा दशरात्र प्रसंगी. कौषीतकी ब्राह्मणांत ब्रह्मवद्य हें रूप आढळतें. व तैत्तिरीय संहितेंत सांपडणा-या बह्मवाद्य शब्दाचाहि बहुधा तोच अर्थ असावा.
६५ब्रह्मोपनिषद्- “परमेश्वरासंबंधी गुप्त मत” हें छांदोग्य उपनिषदांत आलेल्या एका वादाला दिलेले नांव आहे.
६६ब्राह्मण- ‘धार्मिक यज्ञ कर्माचें स्पष्टीकरण’ हें एक प्रकारच्या ग्रंथांचे (पुस्तकाचें) नांव आहे व ते ग्रंथ निरुक्त आणि तैत्तिरीय आरण्यक यामध्यें उल्लेखलेले आहेत. नंतर सूत्रांत या ब्राह्मण शब्दाचा उल्लेख येतो व त्यावरून हे ग्रंथ अस्तित्वांत होते असें उघड दिसतें.
६७भाल्लवि- पंचविश ब्राह्मणांत आलेल्या एका शाखेचें हें नांव आहे. ह्या शाखेचा वेळोवेळीं आधार देण्यात येतो.
६८भाषा- वैदिक भाषेच्या विरुद्ध नेहमीची प्रचारातली भाषा या अर्थानें हा शब्द निरुक्त आणि पाणिनी यांत आला आहे.
६९मधुब्राह्मण- ‘मधाचा ब्राह्मण’ शतपथ ब्राह्मणांत हें एका गूढ तत्त्वाचें नांव आले आहे.
७०महासूक्त- (पुलिंगी बहुवचनी) ॠग्वेदाच्या १० व्या मंडळाच्या काहीसूक्तांचे कर्ते. हा शब्द ऐतरेय आरण्यक आणि सूत्रें यांत आला आहे.
७१मान्थाल- तैत्तिरीय ब्राह्मणांत हें एक नांव आले आहे. याचा अर्थ निश्चित नाहीं. (सायणमतानें डोळयापुढें दिसणारे अणुरेणु कण अथवा काजवे असा अर्थ असावा)
७२यजुर्वेद- याज्ञकि मंत्राचा वेद, याचा ब्राह्मणांत आणि उपनिषदांत उल्लेख आलेला आहे.
७३रैभी-हा शब्द स्त्रीलिंगी व अनेकवचनी असून याचा उल्लेख ॠग्वेद व तैत्तिरीय संहितेमध्ये गाथा व नाराशंसी ह्याचें बरोबर वाङ्मयाचा प्रकार म्हणून आलेला आहे. ब्राह्मण ग्रंथांत अथर्ववेदांतील कांही सूक्तें रैभी संज्ञक आहेत असें म्हटलें आहे. पण ॠग्वेदांत व तैत्तिरीय संहितेतहि रैभीसंज्ञक सूक्तें आहेत असें मानणें जरा संशयास्पद आहे.
७५वाकोवाक्य- ब्राह्मण ग्रंथांत वैदिक संहितेमधल्या काहीं भागास हें नांव दिलेले आहे. ह्याचा मूळचा अर्थ दोन माणसामधील संवाद असा आहे. एके ठिकाणी ब्रह्मोद्य ह्याला संवाद म्हटलेले आहे. बहुतकरून सर्वच ठिकाणी ब्रह्मोद्याचा हा अर्थ होतो. गेल्डनेरचें मत निराळें आहे. त्याच्यामते वाकोवाक्यामध्यें इतिहास पुराणाचा मुख्य भाग म्हणजे वृत्तांत वर्णनपरभागाच्या उलट संवादपर किंवा नाटयपर भाग असा अर्थ अभिप्रेत आहे.
७६वेदांग- ॠग्वेदाच्या अभ्यासानंतर मागाहून ज्यांचा अभ्यास करावयाचा असतो त्या ग्रंथांस वेदांग हें नांव आहे. हा शब्द निरुक्त व ॠग्वेद प्रातिशाख्य ह्यांमध्ये प्रथम आलेला आहे.
७७व्याख्यान- शतपथ ब्राह्मणांत एके ठिकाणी ह्याचा अर्थ केवळ गोष्ट असा आहे. उदाहरणार्थ कद्रु व सुपर्णी ह्यांच्या मधील वादाची गोष्ट. सा-या ठिकाणीं ह्या शब्दाचा अर्थ नुसती टीका असा आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्यें ह्या शब्दाचा अनेकवचनी उपयोग आलेला असून त्याचा अर्थ वाङ्मयाचा एक प्रकार म्हणजे टीका (अनेकवचन) असा आहे. तरी पण व्याख्यानाचा अनुव्याख्यानाशीं काय संबंध आहे हें समजणें शक्य नाहीं. सीजच्या मतें व्याख्यानें ही अनुव्याख्यानें ह्याप्रमाणेंच गोष्टींचे प्रकार असावेत.
७८श्लोक- हा शब्द अनेकवचनी आलेला असून बृहदारण्यकोपनिषदांत वाङ्मयाचे प्रकार म्हणून दिलेल्या यादींत सूत्रांच्या अगोदर व उपनिषदानंतर याचा उल्लेख आलेला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्यें श्लोककृत हा शब्द आलेला आहे. हा श्लोककृत म्हणजे मॅक्समुल्लर म्हणतो त्याप्रमाणें कवी होय. रॉथ सेंटपीटर्सबर्ग कोशांत म्हणतो त्याप्रमाणें कवी मोठयानें ओरडणारा असा ह्याचा अर्थ होत नाहीं. खरा अर्थ काय हें सांगणें कठिणच आहे. सामान्यतः श्लोक किंवा कडवीं असा ह्याचा अर्थ असावा. ह्या श्लोकांचें कांही प्रकार ब्राह्मण ग्रंथात उपलब्ध आहेत व त्यांनां श्लोक ही संज्ञा आहे.
७९सर्पविद्या- विदेच्या ज्या शाखा आहेत त्यांपैकी एक म्हणून शतपथ ब्राह्मणांत ही उल्लेखिली आहे. ह्या विद्येचा काहीं तरी एखादा ग्रंथ असावा. कारण ह्या विद्येच्या एक पर्वाचा अभ्यास केल्याबद्दल उल्लेख आलेला आहे. असें मॅकडोनेल म्हणतो. परंतु स्थलाचा उल्लेख करीत नाहीं. गोपथ ब्राह्मणांत सर्पवेद असा शब्द आलेला आहे.
८०सामवेद- गानपद्धति व मोठयानें म्हणावयाच्या ॠचांचा जो समूह त्याला हें नांव ब्राह्मणग्रंथांत दिलेले आहे. साम शब्दाचा ॠग्वेदामध्यें वारंवार उल्लेख आलेला आहे व ॠक् , यजुस् व सामन् ह्या त्रितयाचा उल्लेख अथर्ववेदापासून पुढील ग्रंथांत वारंवार आलेला आहे व ह्या संहिताग्रंथांत देखील साम याचा उल्लेख आहे.
८१सौम्य- उपनिषदामध्यें (सोम्य असा दुसरा पाठ) हें प्रेमानें हाक मारावयाचें नांव आहे.
८२स्वर- उपनिषदामध्यें स्वरोच्चार असा याचा अर्थ आहे. ह्या स्तरांची घोषवंत व बलवंत अशी वर्णनें आहेत. मूक व्यंजनाला शब्द स्पर्श असा आहे व उष्मन् म्हणजे श,ष वगैरे. उष्मवर्ण व स्वर हे शब्द ऐतरेय व शांखायन आरण्यक ह्यांमध्यें आलेले आहेत. अर्ध स्वरांचा उल्लेख अंतष्ट किंवा अक्षर असा त्याच ग्रंथांत आलेला आहे. ऐतरेय आरण्यकांत दुसरी जी विभागणी आली आहे ती घोष उष्मन् व व्यंजन अशी आहे. त्याच आरण्यकांत घोष ह्या शब्दाचा इतर ठिकाणीं अर्थ वर्ण असा सामान्यपणें आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्यें मात्रा, बल व वर्ण ह्यांचा उल्लेख आलेला आहे. व ही तिन्हीं ओम (अ+उ+म् ) ह्या शब्दांत सांपडतात असें इतरत्र म्हटलेले आढळतें. ऐतरेय आरण्यकांत व शांखायन आरण्यकांत ॠग्वेद संहितेमधली ‘प्रतण्ण, निर्भुज व उभयम् अंतरेण’ हीं तीन रूपें (ह्यांचा अर्थ ॠग्वेदांतील संहिता, पद व क्रम पाठ असा आहेः) मान्य केलेली आहेत. त्याच ग्रंथांत मूर्धन्य व दंत्यनकार आणि सकार ह्यामधील फरक महत्त्वाचा आहे असें म्हटले आहे व त्यांत मांडूकेयाच्या पाठ म्हणण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. शिवाय संधिनियमांचाहि विचार त्यांत आलेला आहे. निरनिराळया संहिताग्रंथातल्या प्रातिशाख्यामध्यें व्याकरणाच्या परिभाषेची वाढ झालेली आहे. यास्काच्या निरुक्तामध्यें व्याकरण विषयक माहिती बरीच उपलब्ध आहे. शतपथ ब्राह्मणांत लिंगभेदाचें विवरण आहे व पंचविंश ब्राह्मणांत सामपाठातला शब्दविचार आलेला आहे.
८३स्वाध्याय- ब्राह्मण ग्रंथांत वैदिक संहितांचा अभ्यास किंवा पुनरावृत्ति करणें असा अर्थ आहे. सूत्र ग्रंथांत ह्या स्वाध्यायाचे सविस्तर नियम दिलेले आहेत.
८४हरिद्रविक- याचा निरुक्तांत उल्लेखिलेल्या एका हारि नामक ग्रंथकाराच्या ग्रंथाचें हें नांव आहे.