प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
पैतृकनामें (संहितेतर) |
१अजीगर्तसौयवसि - ऐतरेय ब्राह्मणांत (७.१५) शुनःशेपाच्या बापाचें नांव म्हणून हा शब्दं आला आहे. हा सूयवस्चा मुलगा असावा.
२अभ्यग्नि ऐतशायन- याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत (६.३३) आला आहे. याच्या बापाचें नांव ऐतश. आपल्या मुलापुढें कांही मंत्रपठण करीत असतां ते मंत्र अश्लील आहेत असें समजून त्याचा मुलगा अभ्याग्नि यानें त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याचे मंत्रपटण बंद पाडलें त्यामुळें यानें रागवून तुझें कुल अत्यंत पापी होईल असा शाप दिला व त्याप्रमाणें सर्व और्व कुलांतील त्या ऐतशायन पुत्र अभ्यग्नीला व त्याच्या संततीला पापिष्ट समजूं लागलें असें तेथे म्हटलें आहे. शांखायन ब्राह्मणांत (३०.५) वरील प्रमाणेंच गोष्ट असून तेथें ऐतशायनाला और्वकुलोत्पन्न न म्हणतां भृगुकुलोत्पन्न म्हटलें आहे. और्य व भृगु यांचा अगदीं निकट संबंध अथवा एकाच कुलाच्या या दोन शाखा असाव्या. ॠग्वेदापासून यांचा एकत्र उल्लेख आढळतो.
३अश्वतरअश्वि- ऐतरेय ब्राह्मणांत (६.३०) हें बुलिल याचें पितृप्राप्त नांव आहे. सायणतानें हा अश्व याचा मुलगा व अश्वतर याचा वंशज आहे. सत्रांतील कांही शंसनासंबंधी गौश्ल याच्याबरोबर याचा कांही संवाद झाल्याबद्दल तेथें उल्लेख आहे.
४आत्रेय- बृहदारण्यकोपनिषदांत (२.६,३) मांटीचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (८.२२) अंग राजाचा पुरोहित म्हणून एका आत्रेयाचा उल्लेख आहे. शतपथ ब्राह्मणांत (१.४,५,१३) गर्भाला अत्रि म्हटलें आहे व गर्भरूप ॠतूचा स्राव होणा-या (ॠतुमती) स्त्रीला आत्रेयी म्हटलें आहे.
५आरुणि- उद्दालक याचें हें पैतृक नांव आहे. याचा उल्लेख जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण (२.४,१) आणि काठक संहितेंत (१३.१२) आहे.
६आरुणेय- औपवेशि याच्या कुलांतील उद्दालक आरुणि याचा मुलगा श्वेतकेतु याचें हें पितृप्राप्त नांव आहे. याचा शतपथ ब्राह्मण (१०.३,४,१) व छांदोग्य उपनिषद् (४.३,१) यात उल्लेख आहे.
७आर्तभागीपुत्र- बृहदारण्यकोपनिषदांत (६.५२) हा शौंगीपुत्र याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. आर्तभागी पुत्र व शौंगीपुत्र ही दोनहि नांवे मातृप्राप्त म्हणजे मातेच्या नांवावरून आलेलीं आहेत.
८आविक्षित- मरुत्त याचें पितृप्राप्त नांव. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत (१३.५,४,६) व ऐतरेय ब्राह्मणांत (८.२१) आला आहे. या मरुत्ताचें कामप्रि असें दुसरें नांव होतें.
९आश्वत्थ्य- अहीना याचें पितृप्राप्त नांव. याला सावित्राग्नीसंबंधी ज्ञान असल्याबद्दल तैत्तिरीय ब्राह्मणांत (१०.९,१०) उल्लेख आहे. तेथें हा सावित्राग्नीच्या ज्ञानानें, हिरण्मय रूप होऊन स्वर्गास गेल्याचा उल्लेख आहे.
१०आह्नेय- शोच याचें मातृप्राप्त नांव. स्वाध्यायासंबंधी जे नियम आहेत त्यांत ग्रामाच्या बाहेर जाऊन अध्ययन करावें असा नियम आहे. परंतु ग्रामाबाहेर जाणें शक्य नसेल तर ग्रामांतच अध्ययन करावें असें मत याचें असल्याचा तैत्तिरीय आरण्यकांत (२.१२) उल्लेख आहे.
११उद्दालकआरुणि-अरुणाचा मुलगा उद्दालक हा मोठा प्रसिद्ध अध्यापक होऊन गेला. शतपथ ब्राह्मणांत (११-४,१२) उल्लेखिल्याप्रमाणे तो कुरुपंचालापैकी ब्राह्मण होता या विधानाला तो प्रोतिकौसुरू बिंदिकौशांबि (शतपथ १२, २,२,१३) याचा गुरू असून त्याचा मुलगा श्वेतकेतु हा पंचालांच्या सभेंत प्रवाहणपुत्र जैवलि राजा याच्या बरोबर वाद करावयास गेल्याबद्दल बृहदारण्यकांत (६.२,१) जो उल्लेख आहे त्यानें दृढता येते. याचा पिता अरुण हा पातंजल काव्य याचा शिष्य असून प्रसिद्ध याज्ञवल्क्य वाजसनेय आणि कौषीतकि याचा शिष्य होता. (बृह. ३.७,१) दुस-या एका स्थलीं याला (बृह. ३.७,२२) याज्ञवलक्याने निरुत्तर केल्याचा उल्लेख आहे. यानें प्राचीनयोग्य शौचेय (शतपथ ११.५,३,१) आणि अजातशत्रव भद्रसेन (शतपथ ५.५.५.१४) यांनां वादांत जिंकिल्याचा उल्लेख आहे तो गौतम होता अशाबद्दल शतपथ ब्राह्मण (११.५.३.२) आणि कौषीतकि उपनिषद् (११) यांत उल्लेख आहे. त्याची धार्मिक व तत्त्वज्ञानासंबंधी विशिष्ट मतें प्रमाण मानिली जात अशाबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१.१,२,११,३.३,४,१९). बृहदारण्यक उपनिषदांत (३.५,१) छांदोग्य उपनिषदांत (३.११,४) व ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहे. गेल्डनेर म्हणतो कीं, मैत्रायणी संहितेत याचा व याचा बाप अरुण याचाहि उल्लेख आहे. वेबर म्हणतो कीं याचा उल्लेख काठक संहितेंत (७.८) हा दिवोदास भैमसेनि याच्या समकाली असल्याबद्दल व जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत वसिष्ठाला चैकितान याच्याकडे उपदेश घेण्यासाठी गेल्याचा व तेथे त्याला गौतम या नांवानें संबोधिल्याचा (१.४२,१) उल्लेख आहे. तैत्तिरीय संहितेंत (७.२,३१) कुसुरबिंद अद्दालकि (उद्दालक पुत्र) याचा उल्लेख आला आहे आणि तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.११,८) ज्याला भाष्यकार सायण उद्दालक म्हणतात तो नचिकेतस् वाजश्रवस् गोतम याचा मुलगा होता. आपस्तंब सूत्रांत एका गोष्टीत त्याचें मत प्रमाण म्हणून मानलें आहे आणि ही गोष्ट आरुणांच्या कालासंबंधी महत्त्वाची आहे.
१२ऐभावत- इभावताचा वंशज. हें प्रतीदर्श याचे पितृप्राप्त नांव असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१२.८,२३) उल्लेख आहे.
१३ऐरावत- इरावताचा वंशज. धृतराष्ट्र सर्पासुर याचे हें पितृप्राप्त नांव असल्याबद्दल पंचविंश ब्राह्मणांत (२५, १५,३) उल्लेख आहे. त्यांत वर्णिलेल्या सर्पसत्रांत हा ब्रह्मा नामक ॠत्विज होता.
१४ओदन्य- उदन्य अथवा ओदन याचा वंशज. शतपथ ब्राह्मणांत (१३.३,५.४) ब्रह्महत्येसंबंधी प्रायश्चित सांगणारा मुंडिभ याचें हें पितृप्राप्त नांव आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.९,१५;३) याचाच उल्लेख आहे परंतु तेथे तो भ्रूणहत्येच्या पातकसंबंधी प्रायश्चित सांगणारा म्हणून आला आहे.
१५औदुंबरायण- उदुंबराचा वशज. निरुक्तांत (१.१) एक वैयाकरणि म्हणून याचा उल्लेख आहे.
१६औपमन्यव- हें नांव पुष्कळ अध्यापकांनां लावललें आढळून येतें. बौधायन श्रौतसूत्रांत (२२.१) एका मंत्राच्या पठणासंबंधी नियम सांगणारा म्हणून याचा उल्लेख आला आहे. यास्काचार्याच्या निरुक्तांत एक व्याकरणकार म्हणून याचा उल्लेख ब-याच ठिकाणीं आला आहे. पक्ष्यादिकांची जीं नावें पडतात तीं त्या पक्ष्याचा जो ध्वनि असतो त्यावरून पडतात या मताचा औपमन्यव यानें तेथें निषेध केला आहे.
१७औपवेशि- उपवेशाचा वंशज. उद्दालकपिता अरुण याचें हें पितृप्राप्त नांव. याचा उल्लेख काठक संहितेंत (२३.१०) आला आहे.
१८ओपोदिति- उपोदित याचा वंशज. तैत्तिरीय संहितेंत तुमिंजय याचें हें पितृप्राप्त नांव आहे. (१.७,२;१) बौधायन श्रौतसूत्रांत कुरूंचा स्थपति (सेनानी) व्याघ्रपाद याचा मुलगा गौपालायन याचें हें पितृप्राप्त नांव आहे. शतपथ ब्राह्मणांत (१.९,३;१६) उपोदिता नामक स्त्रीचा मुलगा म्हणून औपोदितीचा उल्लेख आला आहे.
१९और्णवाभ-ऊर्णवाभीचा वंशज. बृहधारण्यकोपनिषदांत (४.५,२६) कौण्डिन्य याच्या शिष्याचें हें नांव आहे. यास्काच्या निरुक्तांत याचा उल्लेख आलेला आहे. तेथे दोन ठिकाणीं (७.१२) तो नैरुक्त नामक व्याकरणकारांच्या मताचें अनुकरण करतो व दोन ठिकाणीं (६.१३,१२,१) ऐतिहासिक यांच्या मताचें अनुकरण करतो. यावरून सीज म्हणतो कीं, हा सर्व संग्राहक असा होता.
२०कूशां व स्वायवलातव्य- पंचविंश ब्राह्मणांत (८.६,८) याचा उल्लेख आला आहे. याचें स्पष्ट नांव म्हणजे लातव्य कुलांतील स्वायूचा मुलगा कूशाल्य असें आहे. तेथें एका सामासंबंधानें याचा उल्लेख आला आहे.
२१काक्षसेनि. कक्षसेनपुत्र, पंचविशब्राह्मणांत (१.१.१२) अभिप्रतारिन् याचें पितृप्राप्त नांव म्हणून उल्लेख आहे. याचा दृत ऐंद्रोत याच्याबरोबर ज्ञानी व अज्ञानी लोकांच्या संबंधी संवाद झाल्याचा उल्लेख आहे.
२२कात्यायनीपुत्र- गौतमीपुत्र व कौशिकीपुत्र यांचा हा शिष्य असल्याद्दल बृहदारण्यकोपनिषदांत (६.५,१) उल्लेख आहे. शांखायन आरण्यकांत (८.१०) जातूकर्ण्य नामक एका कात्यायनीपुत्राचा उल्लेख आहे.
२३कापिलेय- ऐतरेय ब्राह्मणांत (७.१७) शुनःशेपाला विश्वामित्रानें मृत्यूपासून सोडविल्यानंतर आपल्या मांडीवर घेतलें. त्याचा बाप अजीगर्त हा शुनःशेपाला परत मांगू लागला असतां शुनःशेप हा माझा मुलगा आहे व हे कापिल आणि बाभ्रव याचें बंधु आहेत असें विश्वामित्रानें उत्तर दिल्याचा तेथें उल्लेख आहे., यावरून कापिल व बाभ्रव हे विश्वामित्राच्या कुलांतील असावेत असें दिसतें.
२४काप्य- (कपिवंशज) जैमिनीय ब्राह्मणांत (३.२,३३) बिभिंदुकीय यांच्या सत्रांत आर्त्विज्य करणा-या सनक आणि नवक यांचे पैतृक नांव. बृहदारण्यकोपनिषदांत (३.२,१) पातंचल यांचेहि काप्य हें पैतृक नांव आहे.
२५काबन्धि- कबन्धाचा वंशज. गोपथब्राह्मणांत (२.१०,१८) याचा उल्लेख आहे. तेथें याला अथर्वण असें म्हटलें असून पहिल्या उता-यांत (२.९) मातेच्या आज्ञेवरून तो मांधाता यौवनाश्व नामक सार्वभौम राजाच्या यज्ञाला गेला आणि तेथे त्यानें यजमान व ॠत्विज यांनां कांही प्रश्न विचारल्याचा उल्लेख आहे आणि दुस-या उता-यांत (२.१८) अग्न्याधानांसबंधी आख्यायिकेंत जलापासून उत्पन्न झालेल्या ज्या अश्वापासून चारहि वेद भीति पावले त्या अश्वाचें या काबन्वीनें शमन केल्याचा उल्लेख आहे. याला विचारिन् असेंहि दुसरें नांव आहे.
२६कामलायन- कमलाचा वंशज. उपकोसल याचें पितृप्राप्त नांव. ह्या उपकोसलानें सत्यकाम जाबाल याच्या घरी बारा वर्षे अध्ययनासाठीं राहूनल त्याच्या अग्नीची परिचर्या केली. परंतु सत्यकामानें याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला नाहीं. शेवटीं अग्नीनें प्रसन्न होऊन याला उपदेश केला.
२७ काश्यप- हें एका विस्तृत अशा कुलाचें नांव आहे. शतपथ ब्राह्मण (७.५,१.५) प्रजापतीनें उत्पन्न केलेल्या सर्वच प्रजा काश्यप (कश्यपकुलोत्पन्न) आहेत असें म्हटलें आहे.
२८कृष्ण देवकीपुत्र- छांदोग्योपनिषदांत (३.१७, ३) पुरातन अशा घोर आंगिरसाचा हा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. ग्रेअर्सन, व्हानथोडर आणि दुसरे कांही लेखक म्हणतात की, मागाहून जो अवतारी कृष्ण झाला आहे तो व छांदोग्योपनिषदांतील देवकीपुत्र कृष्ण हे एकच त्यांच्या मतें हा मागील कृष्ण ब्राह्मणधर्मविरोधक व क्षत्रियधर्म प्रवर्तक असा होता(?) हें विधान अत्यंत शंकनीय आहे. ही जी दोन नांवांची सम्यता दिसते ती आकस्मिक घडून आली असावी. अवतारा कृष्ण आणि उपनिषदांतील कृष्ण यांचा सेंटपीटर्सबर्ग कोशाप्रमाणें एकवाक्यता करणें अगदीं अयोग्य आहे.
२९कौत्स- कुत्सवंशज. शतपथ ब्राह्मणांत (१०.६, ५, ९) महिस्थि याचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे. निरुक्तांत (१.१५) वेद अनर्थक (अर्थरहित) आहेत या कौत्साच्या मताचा निषेध दाखविला आहे.
३०कौशांबय- कुशांब वंशज. सेंटपीटर्सबर्ग कोश व शतपथ ब्राह्मणाप्रमाणें (१२,२,२,१३) प्रोती याचें पितृप्राप्त नांव पंचविंश ब्राह्मणांताह (८.६,८) एका कुशांबु नामक मनुष्याचा उल्लेख आहे. तेथे त्यावरील टीकाकार हरिस्वामि हा याला कौशांबी नगरीचा रहिवासी असें म्हणतो व तें बरोबर दिसतें.
३१कौशिक- कौशिक हे कुलनाम पुष्कळ लोकांनां लावल्याचें आढळतें. कांहीं ठिकाणीं इंद्राला कुशिक म्हटलें आहे व विश्वामित्रालाहि कुशिकपुत्र म्हटलें आहे. बृह. उपनिषदांतील परंपरेत कौण्डिन्य याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
३२कौषारव- मैत्रेय यांचे पितृप्राप्त नांव ऐतरेय ब्राह्मणांत (८.२८) याचा उल्लेख आला आहे. यानें सुत्वनकैरिशि भार्गायण नामक राजाला शत्रुविनाशक असा परिमर नामक विशिष्ट कर्माचा उपदेश केला.
३३कौषीतकि- कुषीतक वंशज. याच्या नांवावर कौषितकी ब्राह्मण आरण्यक, शांखायन थ्रौत व गृह्य सूत्रें इत्यादि ग्रंथ असून त्यांतून याच्या मतांचा उल्लेख येतो. या शिवाय याचा शतपथ ब्राह्मणांत (२.४,३,१) उल्लेख आहे. कौषीतकीच्या मताला कौषीतकि मत असें म्हणतात. कौषीतकीच्या शिष्यांनां ‘कौषीतकिः’ असें म्हणत आणि लुशाकपि यानें या शिष्यासह कौषीतकीला शाप दिल्याबद्दल पंचविंश ब्राह्मणांत (१७.४, ३) उल्लेख आहे.
३४कौसुरूबिन्दि- शतपथ ब्राह्मणांत प्रोति कौशाम्बेय याचें पैतृक नांव म्हणून याचा उल्लेख आहे. गोपथ ब्राह्मणांत (१,४, २४) एका कौशाम्बंय कौसुरूबिंदूचा उल्लेख आला आहे.
३५क्षेमधृत्वन्पौण्डरीक- यानें सुदामन् नदीच्या तीरावर यज्ञ केल्याबद्दल पंचविश ब्राह्मणांत (२२, १८, ७)उल्लेख आहे.
३६खंडिक औद्भारि- शतपथ ब्राह्मणांत (११.८,४, १) आणि मैत्रायणि संहितेत (१.४,१२) केशिन यनें खंडिक औद्भारि याचा पराभव केल्याबद्दल उल्लेख आहे. बौधायन श्रौतसूत्रांतहि केशिन् याचा शत्रु असलेल्या एका खण्डिकाचा उल्लेख आहे.
३७गार्ग्य-बृहदारण्यक (२.१,१) आणि कौषीतकी आरण्याक (२.१) यांत बालाकि याचें पितृप्रप्त नांव म्हणून उल्लेख आला आहे तैत्तिरीय आरण्यकांत गार्ग्य हा पंचकर्ण वात्स्यायन व सप्तकर्ण प्लाक्षि यांनां योगमार्गानें महामेरूवर जाण्यास सांगत असल्याचा उल्लेख आहे. (१. ७,३) गार्ग्याचा उल्लेख निरुक्तांत आणि धर्मसूत्रांतहि आढळतो.
३८गैरिक्षित् औच्चामन्य व- हा उच्चामन्यूचा वंशज. याचा पंचविंश ब्राह्मणांत (१०.५,७)उल्लेख आहे. तेथे याचा अभिप्रतारिन् काक्षसेनी याच्याबरोबर संवाद झाल्याचा उल्लेख आहे.
३९गिरजबाभ्रव्य- ऐतरेय ब्राह्मणांत याचा उल्लेख आहे. (७.१)हा श्रुत नामक ॠषीचा मुलगा असून संत्रांतील यज्ञिय पशूचे इडारूप अवयव (हविःशेष) सर्व ॠत्विजांनीं कस कसे वाटून घ्यावे याची माहिती त्याला एका गंधर्वा (अमनुष्य) पासून मिळाली व ती त्यानें पुढें सर्व लोकांनां विदित केली असा उल्लेख आहे.
४०गौतम-हें एका कुलाचें अथवा गोत्राचें नांव आहे. बृहदारण्यकोपनिष्द, छांदोग्य उ. वंशब्राह्मण, व जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण यांतील वंशांत गौतम कुलांतील अनेक ॠषींचा उल्लेख आला आहे.
४१गौपालायन- मैत्रायणी संहितेंत (३.८,१०,४) व ऐतरेय ब्राह्मणांत (३.४८) शुचिवृक्ष याचें हें पितृप्राप्त नांव आहे. या शुचिवृक्ष गौपालायनानें वृद्धद्युम्न नामक राजाच्या यज्ञांत एक विशिष्ट योग समुच्चयरूपानें करून त्या राजाला संतति व संपत्ति प्राप्त करून दिल्याचा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहे. बौधायन श्रौतसूत्रांत कुरूंचा जो स्थपति त्याचें देखील हें पितृप्राप्त नांव आहे. पंचविश ब्राह्मणांत (१२.१३,११) उपोदिति अथवा औपोदिति याचें गौपालेय असें पितृप्राप्त नांव आहे.
४२गौश्रायणि- कौषीतकि ब्राह्मणांत (२३.५) जाबासत्रांत चित्र गौश्रायणी नामक एका पुरोहिताचा उल्लेख आहे.
४३चेलकशाण्डिल्यायन- शतपथ ब्राह्मणांत एका विशिष्ट कर्मासंबंधी मताचा प्रवर्तक म्हणून याचा आलेला उल्लेख (१०.४,५,३) आहे.
४४चैकितानेय- जैमिनीय उपनिषद बाह्मणांत (१,४२,१) वासिष्ठ चेकितानेय या नांवाचा एक सामविद्येचा अध्यायक असल्याचा उल्लेख आहे. बृहदारण्यकोपनिषदांत (१.३, २४) सामासंबंधीं उल्लेखांत वसिष्ठ चैकितानेयाचा नामनिर्देश केलेला आढळतो. याचा षड्विंश ब्राह्मणांतहि उल्लेख आहे. उपनिषदांत शंकराचार्य टीकेमध्यें हा शब्द वडिलांच्या नांवावरून झाला आहे आहें म्हणतात. महाभारतांत चैकितान असें गांव आढळतें. कदाचित् त्यावरूनहि चैकितानेय हें नांव झालें असावें.
४५जनशार्कराक्ष्य- शतपथ ब्राह्मण (१०.६,१,१) व छांदोग्योपेनिषदांत (५.११,१) याचा उल्लेख आहे. हा औपवेशि व त्याचा मुलगा उद्दालक आरुणि याचा समकालीन होता.
४६जलजातू कर्ण्य- शांखायन श्रौतसूत्रांत (१६.२९,६) यानें काशी, विदेह व कोसल या लोकांचं अथवा राजांचें पौरोहित्य केल्याबद्दल उल्लेख आहे.
४७जातूकर्ण्य- हें ब-याच ॠषीचें पितृप्राप्त नांव आहे.जातूकर्ण्य हें नांव आसुरायण व यास्क यांच्या शिष्यांनां दिलेलें बृहदारण्यकांत आढळतें. शांखायन आरण्यकांत हा जातूकर्ण्य कात्यायनीचा मुलगा असल्याचा उल्लेख आहे. (८.१०) कौषीतकी ब्राह्मणांत (२६.५) अलीकयु वाचस्पति व इतर ॠषि यांचा हा समकालीन असल्याचा उल्लेख आहे. ऐतरेय आरण्यक व शांखायन श्रौतसूत्रांत याचा उल्लेख आलेला आहे.
४८जान- याचा पंचविंश ब्राह्मणांत (१३.३१२) उल्लेख आला आहें हें वृष यांचें पितप्राप्त नांव आहे. हा वार्श नामक सामाचा द्रष्टा आहे. सायणांनीं (क्र. ५.२) या सूक्तांवरील भाष्यांत शटयायन ब्राह्मणांतील एक आख्यायिका दिली आहे. तीमध्यें वृष हा इक्ष्वाकुकुलोत्पन्न त्रसदस्यु नामक राजाचा पुरोहित होता. एकदा वृष राजासह रथ हांकीत असतां त्या रथाच्या चक्राखालीं चेंगरू एक ब्राह्मणांचे मूल मृत झालें. हें मूल कोणाच्या हातून मारलें गेलें याबद्दल राजा व पुरोहित यांमध्यें थोडा वादविवाद होऊन शेवटीं पुरोहिताच्या हातूनच तें मारलें गेलें असा निर्णय ठरल्यामुळें वृषनाकम पुरोहितानें तें मूल वार्श नामक साम पठण करून जीवंत केलें असा उल्लेख आहे पंचविंश ब्राह्मणांतहि हीच आख्यायिका थोडया फरकानें आली आहे.
४९जानश्रुतेय- ऐतरेय ब्राह्मणांत (१.२५)हें उपावि नामक ॠषीचें मातृप्राप्त नांव आहे तेथें उपसद इष्टी संबंधीं विधि सांगणा-या दुस-या एका ब्राह्मणग्रंथांतील श्रोत्रिय ब्राह्मण प्रशंसा केलेलें एक वाक्य दिलें आहे. शतपथ ब्राह्मणांत (५.१,५) जान तेय हें औपावि याचें पितृप्राप्त नांव आहे. व तेथें त्यानें वाजपेयानंतर बृहस्पतिसव यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत हें उलुक्य, नगरिन् व साधक यांचें पितृप्राप्त नांव आहे.
५०जानंतपि - ऐतरेय ब्राह्मणांत (८.२३) महाभिषेक विधि सांगितला आहे.तेथें जानंतपि हा राजा नसतां त्याचा गुरु सात्यहव्य यानें त्याला महाभिषेक केल्यामुळे जानंतपीनें सर्व पृथिवी जिंकिल्याबद्दल उल्लेख आहे.
५१जाबाल- महाशाल व सत्यकाम यांचें हें मातृप्राप्त नांव असल्याचा शतपथ ब्राह्मणांत (१०,३,३,१;१३,५,३,१) उल्लेख आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत याचा दोन ठिकाणीं (३.७,२,९,९) उल्लेख असून कौषीतकी ब्राह्मणांत (२३.५) जाबाल गृहपतीच्या सत्राचा उल्लेख आहे.
५२ज्वालायन- जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत (४.१६,१) गौषूत्कीचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे. ॠग्वेदांतील यासूक्ताचा गौषूक्ति हा द्रष्टा असल्याचा सर्वानुक्रमणींत उल्लेख आहे.
५३दातेंय- या दातेंयाचा पंचविश ब्राह्मणांत (२५.३, ६) यज्ञासंबंधी यथार्थ असें मत देणारे म्हणून उल्लेख आहे. याच्या वाक्याला आप्तवाक्य असें नांव. आहे दृति व वातर्वत या नांवाच्या ॠषीचें हें पितृप्राप्त नांव आहे. यांनीं खांडववनांत सत्र केल्याचा उल्लेख आहे.
५४दाधीच- दधीच वंशज च्यवनाचें हें पितृप्राप्त नांव आहे पंचविंश ब्राह्मणांत (१४.६) याचा उल्लेख आहे हा च्यवन अश्वींचा उपासक असे. अति जरठ असलेल्या या च्यवनाला अश्वींनी पाण्यांत बुडवून त्याची जरा नाहीशी करून त्याला तरुण केलें असा उल्लेख आहे.
५५दाल्भ्य- दल्भाचा वंशज. हा शब्द दार्भ्य याचा पर्याय असावा हें पंचविंश ब्राह्मणांत (१३. १७,८) केशांचे; छांदोग्य उपनिषद (१.८,१) व जै. उ. ब्राह्मणांत २.३८,१ चैकितायेनाच आणि छांदो. उप. (१.२, १३) व काठक संहिता (३०.२) यांत बक-याचें पितृप्राप्त नांव आहे.
५६दृतिएंद्रोत- पंशविंश ब्राह्मणांत (१४.१, १२; १५) अभिप्रतारिन याचा समकालीन म्हणून उल्लेख आहे. याच ग्रंथात (२५.३,६) दृती वातबंतौ असा जो उल्लेख आहे त्यांतील दृति व हा दृति हे बहुतेक एकच असावेत. महाव्रत नामक एका श्रौतकर्माच्या सतत आचरणानें दृतीचा उत्कर्ष झाल्याचा उल्लेख आहे याच्या नांवावर एक सत्र चालू असल्याचा श्रौतसूत्रांतून उल्लेख आहे.
५७दृप्तबालाकिगार्ग्य- बृह. उपनिषदांत (२.१,३) काशीच्या अजातशत्रू नामक राजाचा हा समकालीन असल्याचा व या राजाला उपदेश करण्यासाठीं तो गेल्याचा उल्लेख आहे.
५८दैय्यांपति- शांडिल्यायनानें याला अग्निचितीच्या इष्टका (विटा) कशा मांडाव्या याची माहिती दिल्याचा शतपथ ब्राह्मणांत (९,५,१,१४) उल्लेख आहे. तैतरिय ब्राह्मणांत (३.१०,९, ३, ५) अत्यंहसाचा समकालीन प्लक्ष याला तैय्यापति हेंच पितृप्राप्त नांव दिलें आहे.
५९दैवल- असिताचें पितृप्राप्त नांव. यांचा पंचविशं ब्राह्मणांत (४.११,१८) उल्लेख येतो. हा एका सामाचा द्रष्टा आहे. या सामाच्या योगानें याला भूः भुवः स्वः या तीन लोकांचें अंतर्ज्ञानानें अवलोकन करण्याचें सामर्थ्य प्राप्त झालें.
६०पांचि- शतपथ ब्राह्मणांत (१,२,५,९) सोमयज्ञांतील वेदि तीन अंगुलें खणण्याचा प्रघात यानें सुरू केल्याचा उल्लेख आहे.
६१पार्वति- दक्षाचें पितृप्राप्त नांव. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत (२,४,४,६) असून यानें दाक्षायण यज्ञ करून राज्य संपादन केलें असें म्हटलें आहे.
६२पैंग्य- पिंगाचा वंशज. कौषितकी ब्राह्मणांत अनेक ठिकाणीं यज्ञकर्मासंबंधी त्याच्या मताचा स्वीकार केलेला आहे. याच्या मताला पैंग्यमत असेंच म्हटलें आहे. शतपथ ब्राह्मणांत (११.७,२,८) याचा उल्लेख असून तेथें त्याला पैंग्य मधुक असें म्हटलें आहे. याच्या अनुयायांनां निदान (४.७) आणि अनुपद या सूत्रांत (१.८) पैंगिन् म्हटलें आहे. आपस्तंब श्रौतसूत्रांत. (५.१५,८) याचा पैंगायणीब्राह्मण असा उल्लेख आहे. आत्रेयी शाखेच्या अनुक्रमणींत पैंग्य हें यास्काच्या वंशाचें नांव असल्याचा उल्लेख आहे. अश्वलायन गृहयसूत्रांत ब्रह्मयज्ञांग तर्पणांत याचा उल्लेख आहे.
६३पौंडरीक- पंचविश ब्राह्मणांत (२२.१८,७) क्षेमनधृत्वन याच्या वंशाचें नांव आहे. यानें सुदाम्नी नामक नदीच्या उत्तर तीरावर यज्ञ केल्याचा उल्लेख आहे.
६४पौरुशिष्टि- तैत्तिरीय उपनिषदांत (१९.१) तपोनित्याचें हें पितृप्राप्त नांव आहे. तपाचरण हेंच सर्वात श्रेष्ठ होय, असें याचें मत आहे.
६५पौष्करसादि- तैत्तिरीय प्रातिशाख्य (७.१७) व शांखायन आरण्यक यांत (१.७) याचा उल्लेख येतो. आपस्तंब धर्मसूत्रांत इतरत्र पुष्करसादीचा उल्लेख येतो.
६६प्राजापत्य- प्रजावान् याचें पितृप्राप्त नांव. ऐतरेय ब्राह्मणांत (१.२१) याचा उल्लेख आहे. ॠग्वेदांतील (१०.१८३) या सूक्ताचा हा द्रष्टा असून प्रवर्ग्य नामक अनुष्ठानांत हें सू्क्त पठण केलें असतां संतति प्राप्त होतें असें तेथें म्हटलें आहे.
६७प्रावहि- कौषीतकी ब्राह्मणांत (२६.४) यज्ञ विधिसंबंधी कर्मविपर्यासाबद्दल प्रायश्चित सांगणारा म्हणून याचा उल्लेख आहे.
६८प्रैयमेध- प्रियमेधाच वंशज अथवा त्या कुलांताल लोकांचें नांव. ऐतरेय ब्राह्मणांत (८.२२) अंग राजाचा पुरोहित उदमय याचें पौरोहित्य या प्रैयमेघांनी केल्याचा उल्लेख आहे. काठक व मैत्रायणी संहितेंत याचा उल्लेख असून याला यज्ञकर्मासंबंधी विशेष माहिती होती असें म्हटलें आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत (२.१,९,१) तीन प्रैयमधांचा उल्लेख आहे. गोपथ ब्राह्मणांतही (१.३,१५) तीन प्रैयमधांचा उल्लेख आहे. त्यापैकी एकजण अग्निहोत्र होम एक वेळच (सकाळीं) करीत असे, दुसरा दोन वेळ (सकाळ संध्याकाळ) करीत असे आणि तिसरा तीन वेळ (सकाळ, दुपार व संध्याकाळ) करीत असे. पुढें त्यांच्यामध्यें वाटावाट होऊन दोन वेळ अग्निहोत्रहोम करण्याचें निश्चित ठरलें. तैत्तिरीय ब्राह्मणांतहि थोडया फरकानें ही कथा आली आहे.
६९बुधसोमायण- सोमाचा वंशज. पंचविश ब्राह्मणांत (२४.१८,६) यानें दीक्षा ग्रहण केल्याचा उल्लेख आहे.
७०बौधायन- सूत्रांचा कर्ता. याच्या नांवावर बौधायन श्रौत, स्मार्त व धर्म ही सूत्रें असून बौधायन श्रौतसूत्रांत याचा अनेक स्थलीं उल्लेख आहे.
७१भद्रसेन आजातशत्रव- शतपथ ब्राह्मणांत (५.५,५,१४) याचा नाश होण्यासाठी उद्दालक आरुणि यानें अभिचार कर्मरूप एक याग केल्याचा उल्लेख आहे.
७२भारद्वाजायन- पंचविंश ब्राह्मणांत (१०.१२ १) यांचा उल्लेख आहे. या नांवाच्या ॠषींनीं सत्र आरंभिलें असतां या सत्रांतील प्रत्येक दिवसाच्या अनुष्ठानांसंबंधी प्राप्त होणा-या फलाविषयी ब्रह्म लोकांनी यांनां प्रश्न विचारल्याचा उल्लेख आहे.
७३भार्गव- हें एका कुलाचे नांव आहे. च्यवन, गृत्समद इत्यादिकांनां हें कुलनाम दिलेलें आढळतें. शतपथ (४.१,५,१), ऐतरेय (८.२१), कौषीतकी (२२. ४) पंचविंश (१२.२, २३) इत्यादि ब्राह्मणग्रंथांत यांचा उल्लेख आहे.
७४भाल्लवेय- भाल्लवीचा वंशज. इंद्रद्युन्म याचें पितृप्राप्त नांव. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत यज्ञविधीसंबंधी मत देतानां अनेक स्थलीं आला आहे. छांदोग्य उपनिषदांत आत्मविचार करणा-या ॠषींबरोबर याचा उल्लेख असून तेथें त्याला महाशाल असें म्हटलें आहे.
७५भौवायन- भुवाचा वंशज. पंचविश ब्राह्मणांत याचा उल्लेख (२०.१३,४) असून कपिवनाचें हें पितृप्राप्त नांव आहे. हा आयुः अतिरात्र नामक यज्ञ केल्याच्या योगानें समृद्ध झाला असा उल्लेख आहे.
७६मद्रगार शौंगायनि- वंशब्राह्मणांत याचा शिष्य कांबोज औपमन्यव असल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही नांवांच्या संबंधावरून कंबोज व मद्रास (मद्रा) या देशांचा संबंध असावा असें झिमर म्हणतो.
७७महाचामस्य- तैत्तिरीय आरण्यकांत (७.५,१) या उल्लेख आहे. भूः भूवः स्वः या ज्या तीन व्याहती त्यामध्यें ‘महः’ या व्याहतीची यानें भर घातल्याचा उल्लेख आहे.
७८महिदासऐतरेय- इतरेचा मुलगा व ऐतरेय ब्राह्मण व आरण्यक यांचा कर्ता. याचा ऐतरेय आरण्यकांत वारंवार उल्लेख येतो. छांद्योग्य उपनिषदांत (३.१६,७) तो एकशें सोळा वर्षें जगल्याचा उल्लेख आहे व तेथें व्याधी (रोग) बरोबर याचा संवाद झाल्याचा उल्लेख आहे.
७९ माण्डव्य- शतपथ ब्राह्मण (१०.६,५,९). शांखायन आरण्यक (७.२) आणि आश्वलायन व शाखांयन गृह्यासूत्रांत याचा उल्लेख येतो. आश्वलायन सूत्रांतील बाह्मयज्ञागर्तपणाविधींत याचा उल्लेख आहे.
८०माण्डूकेय- ऐतरेय आरण्यकांत व शांखायन आरण्यकांत शूरवीर, ऱ्हस्व,दीर्घ, मध्यम, प्रातीबोधीपुत्र याचें हें पितृप्राप्त नाव आहे. ऐतरेय आरण्यकांत एका मताचा प्रवर्तक म्हणून याचा उल्लेख आहे. आश्वलायन गृहय सूत्रांतील ब्रह्मयज्ञाग तर्पणविधीत याचा उल्लेख आहे.
८१माल्य- याचा उल्लेख पंचविश ब्राह्मणांत (१३. ४, ११) आला आहे. हे आर्य याचें गोत्रनाम आहे. शक्करीछदाच्या गानासंबंधी याचें कौणेयाशीं संभाषण झाल्याचा तेथें उल्लेख आहे.
८२मौन- अणीचिन याचें पितृप्राप्त नांव. कौषीतकी ब्राह्मणांत (२३.५) जाबाल गृहपतीच्या सूत्रामध्यें याचा उल्लेख आहे.
८३याज्ञवल्क्य- यज्ञवल्क्याचा वंशज. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मण कांड १ ते ४ व १० ते १४ यांतून यज्ञ कर्मासंबंधी मत देणारा म्हणून उल्लेख आहे. मध्यंतरीच्या ५ ते ९ या कांडामध्ये शाडिल्याची मतें विशेषतः घेतलेलीं आढळतात. बृहदारण्यकोपनिषदांत हा मोठा तत्त्वज्ञानी होता असा उल्लेख असून विदेहाधिपति जनक याच्या दरबारात अनेक तत्ववेत्याशीं याचा वादविवाद झाल्याबद्दलहि उल्लेख आहे. ज्या तत्वज्ञानाबद्दल यात्रवल्क्याचें महत्त्व वर्णिले आहे त्यांत तितकें महत्व आहे असें ओल्डेनबर्ग यास वाटत नाहीं व हें ओल्डेनबर्गचें मत मॅकडोनेल यासही ग्राह्य आहे. याचा उपनिषदांत याचा गुरू जो उद्दालक आरूणि याला यानें वादांत जिंकल्याचा व याला कात्यायनी व मैत्रेयी नांवाच्या दोन बायका असल्याचा उल्लेख आहे. या दोन बायकापैकी मैत्रेयी तत्ववेत्ती होती. याज्ञवल्क्याचा शतपथ ब्राह्मण व ऐतरेय आरण्यक या शिवाय फारसा कोठे उल्लेख नाही. याज्ञवल्वय विदेहप्रांतातील राहणारा असावा असें ओल्डेनबर्गचे मत आहे.
८४राथीतर- तैत्तिरीय उपनिषदांत सत्यवचस् याचें कुलनाम म्हणून याचा उल्लेख आहे (१९,१). बौधायन श्रौतसूत्रांत याच्या मताचा काही ठिकाणी स्वीकार केलेला आहे.
८५राहूगण- गैतमाचें पितृप्राप्त नांव. याचा शतपथ ब्राह्मणांत (१.४,१,१०,१८) विदेध माधव याच्या संबंधांत उल्लेख आहे. ॠग्वेद (१.८१) या सूक्ताचा हा द्रष्टा आहे.
८६लातव्य- गोपथ ब्राह्मणांत (१.१३५)इंद्राने प्रजापतीला ओंकारासंबंधी माहिती विचारली असतां त्यामध्यें ओंकाराचे गोत्र लातव्य असल्याचें त्यानें सांगितलें. पंचविश ब्राह्मणांत (८,६,८) कूशांध स्वायव याचें हें पितृप्राप्त नांव आहे.
८७लामकायन- याचा लाट्यायन (४.९,२२) व निदान (३.१५,२३) या सूत्रांत यज्ञाकर्मासंबंधी यथार्थ मत सांगणारा म्हणून उल्लेख आहे. वंशब्राह्मणांत संसर्गजित् याच्याबरोबर याचा उल्लेख आला आहे.
८८लौहित्य- हें एका कुलाचें नांव आहे. या कुलांतील ब-याच व्यक्तीचा जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत उल्लेख येतो. यावरून या ब्राह्मणग्रंथाचें अध्ययन या कुलांत बरेच होत असावें असें वाटतें.
८९वाजरत्नायन- सोमशुष्मन् याचे पितृप्रा्त नांव. यानें सत्राजितपुत्र शतानीक याला महाभिषेक केल्याबद्दल ऐतरेय ब्राह्मणांत (८.२१) उल्लेख आहे.
९०वाजश्रवस- शतपथ ब्राह्मणांत (१०.५,५;१) कुश्रीचे व तैत्तिरीय ब्राह्मणांत(३,११,८,१) नचिकेताच्या बापाचें पितृप्राप्त नांव आहे याचे उशन् असेहि नांव आहे. परंतु सायण ते विशेषण मानितात.
९१वाजसनेय- बृह. उपनिषद व जैमिनीय ब्राह्मण यांत याज्ञवल्क्याचे पितृप्राप्त नांव म्हणून उल्लेख आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसेनिय शाखेचा हा प्रवक्ता होय. याचा अनुपद सूत्रांतहि (७.११) उल्लेख आहे.
९२वात्स्यायन- वत्स्याचा वंशज. मनुष्याच्या मस्तकांत असलेले सप्तप्राण हे सप्तसूर्य होत असे काही विद्वानाचें मत आहे. हे सप्तसूर्य मी प्रत्यक्ष पाहिले असे पंचकर्ण वात्स्यायन म्हणत असल्याचा तैत्तिरीय आरण्यकांत (१.७,२) उल्लेख आहे. वात्स्यायन हा प्रसिद्ध कामशास्त्रावरील सूत्राचा कर्ती आहे.
९३वरूप- बिरूपाचा वंशज. पंचविश ब्राह्मणांत (८.९,२१) अष्टाद्रष्टांचे पितृप्राप्त नांव म्हणून उल्लेख आहे. हा निपुत्रिक होता परंतु सामाच्या पटनाने याला संतति लाभल्याचा उल्लेख आहे.
९४ वैशंपायन- याचा उल्लेख तैत्तिरीय अरण्यांत (१.७,५) आला आहे. श्रोतकर्मात ज्या सप्त होत्यांचा उल्लेख येतो ते सात सूर्य असावेत असें ‘सप्तदिशोनानासूर्याः’ या ॠग्वेदांत उल्लेखिलेल्या मंत्रांतील अर्थावरून कांहींचे मत आहे व वैशंपायन तर हजारो सूर्ग आहेत असे (यद्यावइंद्र० सहस्त्रंसूर्याअनु या मंत्रावरून) म्हणत असल्याचे तैं. अरण्यकांत उल्लेखिलें आहे. आश्वलायन गृह्यसूत्रांत (३.३) ब्रह्मयज्ञांग तर्पणामध्यें याचा उल्लेख येतो.
९५शाकल्य- शतपथ ब्राह्मणांत (११.६, ३,३) विदग्धाचें व ऐतरेय आणि शांखायन आरण्यकांत स्थविराचें हें पितृप्राप्त नांव आहे. (सायन मतानें स्थविर हें शाकल्याचें पितृप्राप्त नांव असून विशेषण आहे.) निरुक्तांत (६.१८) ॠग्वेदाचें विवरण करणारा म्हणून याचा उल्लेख आला आहे. वेबरच्या मतानें ॠग्वेदपदपाठाचा कर्ता म्हणून प्रसिद्ध असलेला शाकल्य व विदग्ध हे एकच होत. ओल्डेनबर्ग म्हणतो हा शाकल्य ब्राह्मणग्रंथकालानंतर झाला असावा. गेल्डनेरच्या मतानें दोन्ही एकच पण हें मत फारसें संभवनीय नाहीं.
९६शाण्डिल्य- हें अनेक व्यक्तींचे कुलनाम आहे. सर्वात प्रसिद्ध शाण्डिल्य म्हणजे शतपथ ब्राह्मणांत ज्याचा यज्ञविधीसंबंधी मत देणारा म्हणून अनेक वेळां उल्लेख आला आहे तो होय. शतपथ ब्राह्मणांतील पांचव्या व पुढील कांडात यज्ञविधीसंबधी विधींत मत देणा-यामध्यें याचाहि उल्लेख येतो. शतपथ काण्ड दहा यांतील यादींत कुष्श्रीचा शिष्य व वात्स्याचा गुरू म्हणून याचा उल्लेख आहे. बृहउपनिषदांतील गुरुशिष्यपरंपरेंत हा कैशोर्य काप्य. वैष्ठपुरेय, कौशिक, गौतम, बैजबाप, आनभिम्लात याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
९७शाटयायन- याचा उल्लेख शतपथब्राह्मणांत व जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत येतो. याला शालायनाचा शिष्य म्हटलें आहे. शाटयायन नावाचें एक ब्राह्मण असून त्यातहि याचा उल्लेख येतो. आंअर्टेलनें असें सिद्ध केलें आहे कीं, हा ब्राह्मणग्रंथ जैमिनीय ब्राह्मणा इतकाच जुना असावा.
९८ शाकराक्ष्य- शतपथ ब्राह्मणांत व छादोग्य उपनिषदांत जन याचें पितृप्राप्त नाव आहे. ऐतरेय आरण्यक व तैत्तिरीय आरण्यक यांत याचा अनेकवचनी रूपांत उल्लेख आला आहे.
९९ शिखण्डिन्यज्ञसेन- याच उल्लेख कौषीतकी ब्राह्मणांत आला (७.३,) आहे. हें केशिन् दाल्भ्य याचें पितृप्राप्त नांव आहे. तेथें याचा यज्ञदीक्षेसंबंधी काहीं लोकांशीं संवाद झाल्याचा उल्लेख आहे. येथें उलवार्ष्णिवृद्ध व इटन्तकाव्य यांचहि वरील गोष्टीशीं संबंध असल्याचा उल्लेख आहे.
१००शैलालि- शिलालीचा वंशज. शतपथ ब्राह्मणांत (१३.५,३.३) यज्ञविधीसंबंधीं नियम सांगणारा म्हणून याचा उल्लेख आहे. आपस्तंब सूत्रांत (०.३,७) एका शैलालि ब्राह्मणाचा उल्लेख आहे. अनुपम सूत्रांतहि (४.५) याचा उल्लेख आहे.
१०१शौनक- हें अनेक व्यक्तीचें कुलप्राप्त नांव आहे. शतपथ ब्राह्मणांत इंद्रोत व स्वैदायन याचें हे पितृप्राप्त नांव आहे. बृहदारण्यकोपनिषदांत रौहिणायनाचा गुरू म्हणून एका शौनकाचा उल्लेख आहे. कौषीतकी ब्राह्मणांत (४.७) एका शौनक नामक यज्ञाचा उल्लेख आहे. छादोग्य उपनिषदांत (१.९,३) शौनकाचा गुरू अतिधन्वन् होता असा उल्लेख आहे.जैमि. उ. ब्राह्मणांत अभिप्रचारिन् काक्षसेनी याच्या समकालीन एका शौनक कापेयाचा उल्लेख आहे. सूत्रग्रंथ व बृहद्दवेता याग्रंथांत व्याकरणकार व धार्मिक विधीसंबंधी प्रमाणभूत मत देणारा म्हणून एक शौनकाचा उल्लेख आहे.
१०२श्वेतकेतुआरण्येय- शतपथ ब्राह्मणांत व छांदोग्य उपनिषदांत कोणा एका आत्रेय श्वेतकेतु गोतमाचा उल्लेख आहे. कौषीतकी ब्राह्मणांत यज्ञविधींत कांही चूक घडल्यास त्याबद्दल प्रायश्चित विधीच्या बाबतींत सदस्याच्या कर्तव्यासंबंधी वादग्रस्त विषयांत प्रमाण म्हणून याचें व याच्या बापाचें (अरूणीचें) मत स्वीकारलें आहे. हा जरा कल्पक डोक्याचा होता असें दिसतें. कारण ब्रह्मचा-यानें मध खाऊ नयें असा निषेध असतां यानें ब्रह्मचा-यानें मध खावा असें मत दिल्याचा शतपथ ब्राह्मणांत (११.५,४,१८) उल्लेख आहे. हा पंचाल लोकांचा राजा प्रवाहणि याचा गुरू व समकालीन होता. हा जनकाचाहि समकालीन होता. जनकाच्या राजदरबारी जे वादविवाद करणारे ब्राह्मण चमकत असत त्यांत हाहि असे. तो जनकाकडे आला त्यावेळीं त्यानें बरोबर काही ब्राह्मण आणले होते. तो विदहांतील राहणारा नसून कुरूपंचालांतील राहणारा होता. शांखायन श्रौतसूत्रांत (१६.२९, ६) याच्या संबंधानें एक गोष्ट आली आहे. जलजातूकर्ण्य हा काशी, कोसल व विदेह या लोकांचा थवा राजांचा पुरोहित झाला. या गोष्टीबद्दल श्वेतकेतुला वैषभ्य वाटून त्याने बापाची निर्भत्सना केली व यज्ञकर्मावर फाजिल श्रद्धा ठेवल्याबद्दल दोष दिला कारण त्याच्या मतानें यज्ञ केल्यापासून कीर्तीचा व द्रव्याचा दुस-यालाच लाभ होतो आणि यज्ञ करणारे यजमान कोरडाच राहतो. त्याच्या बापानें त्याला असें उत्तर दिले कीं, तुझा आरोप मिथ्या आहे. यज्ञविधींची खरी माहिती मलाच आहे. या पुढें तो त्वेमैतत्कृत्सनके ब्रखबंधौ व्यजिज्ञासिषि असें म्हणतो. या वाक्याचा अर्थ नीटसा समजत नाही, परंतु आयुष्यांतील मुख्य ध्येय म्हणजे पौरोहित्य करून धन संपादन करणे हें नसून ज्ञान मिळविणें हें आहे, असा त्याचा भावार्थ असावा असें वाटतें. श्वेतकेतुबद्दल जे उल्लेख आले आहेत ते सर्व वैदिक वाङ्मांतील उत्तर भागापैकी म्हणजे ब्राह्मणें, उपनिषदें, सूत्रें यांतील आहेत. तेव्हां आपस्तंब धर्मसूत्रांत याला अवर म्हणजे अलीकडील असें जे म्हटलें आहें तें ठीकच आहे. याचा काल फार अलीकडीलहि धरणें इष्ट नाहीं. कारण ज्या शतपथ ब्राह्मणांत याचा उल्लेख आहे तें शतपथ ब्राह्मण पाणिनीच्या पूर्वीचे आहे व पाणिनीच्या कालींहि हें ब्राह्मण फार प्राचीन आहे अशी समजूत होती. तेव्हां याचा काल अदमासें ख्रिस्ती शका पूर्वी ७०० वर्षें जरी धरला तरी तो फार प्राचीन न होता अलीकडीलच होईल.
१०३सांजीवीपुत्र- शतपथ ब्राह्मणाच्या दहाव्या कांडांतील वंशावलींत याचा उल्लेख आहे. बृहदारण्यकांत हा एकदां मांडूकायनीचा शिष्य व एकदा आसुरिवंशाचा शिष्य म्हणून उल्लेख आहे. याच्यामध्यें दोन गुरूंच्या दोन शाखा समाविष्ट होतात. एक शांडिल्यापासून सुरू झालेल्या अग्न्यिुपासकांची व दुसरी याज्ञवल्क्याची होय.
१०४सायकायन- शतपथ ब्राह्मणांत (१०.३,६,१०) श्यापर्णाचें हें पितृप्राप्त नांव आहे. बृहदारण्याकोपनिषदांत याला कौशिकायनीचा शिष्य म्हटलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (७.२६) श्यापर्ण कुलाचा उल्लेख आहे. विश्वंतर नामक राजा या कुलाचा द्वेष्टा होता.
१०५सावयस- आषाढाचें पितृप्राप्त नांव. शतपथ ब्राह्मणांत (१.१,१,७;) याचा उल्लेख आहे. यागाच्या पूर्व दिवशीं यजमानानें कांही खाऊं नये कारण त्या दिवशीं, दुस-या दिवशीं होणा-या यागासाठी देवता यजमानाचें घरीं येऊन बसतात. तरीं त्यांनां हवि अर्पण केल्यावाचून यजमानानें खाऊं नये. असें यानें आपलें मत दिलें आहे.
१०६सोमशुष्मसात्ययज्ञि- शतपथ ब्राह्मणांत (११.६,२,१) विदेहाच्या जनकाला भेटलेल्या एका फिरस्त्या ब्राह्मणाचें हें नांव आहे. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत (३.४०,२) सत्ययज्ञाचा शिष्य जो प्राचीनयोग्य त्याचेंहि हें पितृप्राप्त नांव असावें.
१०७सौजातआराहि्ळ- ऐतरेय ब्राह्मणांत (७.२२) आहुती संबंधी विशिष्ट मत देणारा म्हणून याचा उल्लेख आहे.
१०८सौश्रवस्- उपगु याचें पितृप्राप्त नांव. पंचविश ब्राह्मणांत (१४.६,८) याचा उल्लेख आहे. कुत्स नामक राजाचा हा पुरोहित होता. कुत्स राजानें इंद्राला कोणी हवि अर्पण करूं नयें अशी ताकीद आपल्या राज्यातील लोकांनां दिली होती. उपगुसौश्रक्स् हा इंद्रभक्त असल्यामुळें त्यानें चोरून इंद्राला हवि अर्पण केला. तो हवि हातांत घेऊन इंद्र कुत्स राजाकडे जाऊन तुझी आज्ञा निष्फळ झाली. असें म्हणाला कुत्सानें तुला हवि कोणी अर्पिला असें विचारतां ‘उपगूनें’ असें इंद्रानें उत्तर दिलें. हें ऐकतांच रागावलेल्या कुत्स राजानें यज्ञ करीत असलेल्या व सद नामक मंडपांत यजमानाच्या आसनावर बसलेल्या उपगूला औदुंबरी नामक लाकडी दंडानें ताडन कूरन मूर्छित केलें. नंतर इंद्रकृपेनें तो सावध झाला. अशी कथा पंचब्राह्मणांत वरील उता-यांत आली आहे.
१०९स्थौलाष्ठीवि- निरक्तामध्यें (७.१४) एक वैया करणी म्हणून याचा उल्लेख आहे.