प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

पुण्य, पाप व प्रशस्य

पापनामें (ॠग्वेद)

अत्क- ॠग्वेदांत जरी हा शब्द वारंवार येतो तरी त्याचा निश्चित असा कांहीच अर्थ सांगता येत नाहीं. याचा ॠग्वेद ५. ५५,६ (काढून टाकणें) १.१२२, २ व्यूत (विणलेले); सुरभि वसान (धारण केलेलें) ६.२९,३. या व अशाच प्रकारच्या अनेक उता-यावरून रॉथ, ग्रासमन, लुडविग, झिमर व आणखी काहीं पंडित वस्त्र असा अर्थ करितात (सायण मतानें ॠग्वेदांत अत्क याचा रूप असाच सर्वत्र अर्थ आहे.) दुस-यापक्षीं पिशेल हा अर्थ मुळीच मान्य करीत नाहीं. ॠग्वेद ५.५५, ६; ६.३३, ३;१०.४९,३; ९९,९ या ठिकाणीं तो अत्क याचा कु-हाड असा अर्थ करतो.
अधीवास- वैदिक काळातील आर्य लोकांच्या उत्तरीय वस्त्राला हा शब्द लावीत असत. हें उत्तरीय वस्त्र कोणत्या प्रकारचें असें याची बरोबर कल्पना होत नाहीं. शतपथ ब्राह्मणांत राजसूयाच्या प्रसंगी राजाला जी वस्त्रें परिधान करावयाचीं त्यात प्रथम अधीवस्त्र, वस्त्र, उत्तरीयवस्त्र अशा प्रकारें वस्त्रें परिधान करावयाची असतात. यावरून अधीवास हा शब्द वरील झगा या अर्थी असावा. शतपथ ५.३,५,१९ येथें राजसूयांत राजानें परिधान करावयाच्या वस्त्रांचा अनुक्रम तार्प्य, पाण्डव व अधीवास असा आहे. (सायणानीं भाष्यांत अधीवास याचा अर्थ ‘कंचुकादि’ असाच  दिला आहे.)
द्रापि- ॠग्वेदांत हा शब्द झगा किंवा पायघोळ आंगरखा या अर्थानें आलेला आहे. सायणांनी बहुतेक सर्व ठिकाणी द्रापी याचा कवच असाच अर्थ केला आहे. परंतु हाच अर्थ घेण्याची विशेष जरूरी नाहीं. तरी पण याच काय अर्थ असावा हें निश्चित सांगता येत नाहीं.
पेशस् - ॠग्वेद व तदनंतरच्या ग्रंथांत वेलबुट्टीचे, कशिदा काढलेले वस्त्र असा याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ नाचणा-या स्त्रीचें वेलबुट्टी कावलेले वस्त्र (सायणांनी बहुतेक ठिकाणीं पेशस्  याचा रूप असाच अर्थ केला आहे मात्र ॠ. २.३,६ येथे विशेष त-हेचे विणलेले वस्त्र असा अर्थ सायण मतानें होऊ शकतो) असल्या प्रकारची हिंदू लोकांची वस्त्रासंबंधी आवड मेगेस्थेनीस व एरियन या लोकांच्या  लक्षांत आली होती. तसेच ॠग्वेद १०, १६ येथें वस्त्राला पेशन म्हटलेलें आढळतें रॉथ हा पेशन याची रोमन लोकांच्या व्हॅस्टिस कोलोरिबस  इंटेक्स्टा याशी मोठी गोड तुलना करतो. सायणांनी वरील स्थलीं पेशनानि या पदाचा अर्थ ‘हिरण्मय कांतियुक्त वस्त्रें’ असा केला आहे. असल्या प्रकारची वस्त्रें करणें हा एक बायकांचा नित्याचा उद्योगच असे. आणि पेशस्कारी (वेलबुट्टीचें काम करणारी बायको) या शब्दावरून हा अर्थ उघड होतो. हा शब्द यजुर्वेदसंहितेंत पुरुषमेधप्रसंगी आला आहे. परंतु तैत्तिरीय ब्राह्मणावरील (३.३,४,५) टीकाकार त्याचा सुवर्णकाराची बायको असा अर्थ करतात पिशेल याच्या मतानें पेशस्  याचा रंग अथवा आकार याहून दुसरा अर्थ होऊ शकत नाहीं.
मल- ॠग्वेदांत एकाठिकाणीं मुनींनीं धारण करावयाचें वस्त्र असा अर्थ होतो. सेंटपीटर्सबर्ग कोश याचा चर्मवस्त्र असा अर्थ देतो. परंतु लुडविग व झिमर यांच्या मतें याचा अर्थ ‘भिजलेली वस्त्रें’ असा होतो व हा अर्थ त्याच्या मूळ शब्दार्थाला धरूनच आहे. दीर्घकेशिन्  मुनीच्या स्वभावास व अथर्ववेदांतील ॠचेस (६.११५,३) धरून तो आहे असे वाटते.
वसन- ॠग्वेद व तदुत्तरच्या ग्रंथांत पोषाख या अर्थी हा शब्द आला आहे.
वस्त्र- ॠग्वेद व तदुत्तरच्या ग्रंथांत कपडे, पोषाख या अर्थी हा शब्द येतो.
वाधूय- याचा अर्थ नव-यामुलीनें नेसलेलें वस्त्र असा असून लग्न झाल्यावर मुलीनें तें वस्त्र एखाद्या ब्राह्मणास द्यावयाचें असतें.
वासस् - ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत कपडा (अंगावर घेण्याचें अथवा परिधान करावयाचें वस्त्र) अशा अर्थी हा शब्द आला आहे. कपडे मेंढयावरील लोंकरीचे बनविलेले असत. पूषन देवाला कपडे विणणारा (वासोवाय १०. २६,६) म्हटलें आहे. कारण निरनिराळे आकार देण्यांत त्याचा संबंध असे जीं वस्त्रें वापरली जात त्यावर वेलबुट्टी काढलेली असे, मरुत् हे सोनेरी वेलबुट्टी असलेली वस्त्रें वापरीत असा उल्लेख (१०.१५५,६ हिरण्ययान्  अत्कान् ) आहे. ज्यावेळीं वस्त्रें दान करणाराचें ( व सोदा) नांव, सोनें व घोडे दान करणार बरोबर उल्लेखिलें जातें तेव्हां त्याचा तो उल्लेख उच्च प्रकारच्या वस्त्राविषयीं असावा. लोकांनां दागिन्यांची फार आवड होती असें ॠग्वेदांतील अनेक उल्लेखावरून दिसून येतें व ही गोष्ट मेगेस्थेनिसच्या कालांतहि होती. ॠग्वेदांत सुरभि व सुवसन (म्हणजे चांगलें शोभणारें व अंगाला नीट बसणारें वस्त्र) अशीं विशेषणें आलीं आहेत. वैदिक लोक तीन प्रकारची वस्त्रें वापरीत असत. एक नीवी, (आंतील वस्त्र) दुसरें वस्त्र, व तिसरें अधीवास (वरचं वस्त्र) व वस्त्रालाच दापि व अत्क हीं नांवें आहेत. हें वस्त्रांचें वर्णन शतपथ ब्राह्मणांतील वर्णनांशीं जुळणारें आहे. ब्राह्मणग्रंथांत तार्प्य (रेशमी वस्त्र) पांडव अधीवास यांचा उल्लेख आहे. या शिवाय डोक्यास गुंडाळावयाचें जें वस्त्र त्याची टोकें मानेच्या बाजूस गांठी मारून पुढें आणून खोचलेली असत. ही त-हा नेहमीच्या प्रचारांतल्या त-हेहून वेगळी होती. पण ती यज्ञाच्या वेळची असल्यामुळे त्यांत वैशिष्टय होते. अथर्ववेदांत (८.२,१६) व शतपथ ब्राह्मणांत (५, २,१८) बायकांच्या वस्त्रांचा असाच प्रकार वर्णिला आहे. (शतपथ ब्राह्मणांतील वर्णनांत वस्त्रांच्या गाठी कोठें माराव्या व टोकें कोठें खोंचावी याबद्दल उल्लेख वरील स्थलीं आढळत नाहीं. ) पुरुषांच्या व बायकांच्या पोशाखांत फरक काय होता हें निश्चित सांगतां येत नाहीं. वेदकालीन लोकांनां विरक्त स्थितीमुळे दिगंबर (नग्न) असणा-या यतीसारख्या लोकांशिवाय  प्रत्येक मनुष्यानें वस्त्र धारण केलेंच पाहिजे ही गोष्ट कबूल होती हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.
१०शामुल्य- ॠग्वेदांत विवाहसंस्कारासंबंधी सूक्तांत (१०.८५,२९) याचा वधूनें रात्री नेसावयाचे वस्त्र असा अर्थ आहे.
११सिच्- वस्त्राचा कांठ असा याचा अर्थ आहे. ॠग्वेदांत एका ठिकाणीं (३.५३,२) आपल्या बापाचें लक्ष्य आपणाकडे लागावें म्हणून मुलगा बापाच्या वस्त्राचा कांठ (अथवा पदर) ओढीत आहे व आई आप या मुलाला वस्त्राखालीं झाकून घेत आहे (१०.१८,११) असा उल्लेख आहे. हा शब्द अथर्ववेद (१८.२,५१) व शतपथ ब्राह्मणांतहि (३.२,१,१८) आला आहे.
१२सुवचन-ॠग्वेदांत याचा अर्थ चांगलें वस्त्र असा असून त्याचा विशेषणाप्रमाणें चांगलीं वस्त्रें धारण करणारा या अर्थानें उपयोग केला आहे. सुवासस् म्हणजे चांगलें वस्त्र धारण केलेला असा अर्थ नेहमी असतो.
१३तार्प्य- तैत्तिरीय संहिता व तदुत्तर ग्रंथांत या शब्दाचा अर्थ एक अनिश्चित वस्तूचें वस्त्र असा आहे. शतपथ ब्राह्मण व कात्यायन श्रौतसूत्र यावरील टीकाकारांचे असें मत आहे कीं तें तागाचें किंवा तीन वेळ तुपांत भिजविलेलें वस्त्र असावें, अथवा तप किंवा त्रिपर्ण झाडाचे बनविलेलें असावें परंतु स्वतः ब्राह्मणकारांसहि याचा नीट अर्थ समजला होता की नाहीं याबद्दल वानवाच आहे. गोल्डस्टकरच्या मतें याचा अर्थ रेशमी वस्त्र असा आहे. टीकाकारांनीहि कोठें रेशमी वस्त्र असा अर्थ केला आहे व एगलिंगला तो संमत आहे.
१४तूष- तैत्तिरीय संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथांत हा शब्द वस्त्राचा कांठ या अर्थाने आला आहे.
१५नीवि- हा शब्द तैत्तिरीय संहिता व अथर्ववेद यांत नेसावयाचें मलवस्त्र अशा अर्थी झाला आहे. हें पुरुष व स्त्रिया दोघेहि नेसत. विशेषतः बायकाच याचा जास्त उपयोग करीत.
१६प्रघात- हा शब्द तैत्तिरीय, कठसंहिता व शतपथ ब्राह्मणांत विणलेल्या वस्त्राचा अचळ (पदर) या अर्थानें आला आहे. या पासूनच नीवीचे सुटलेले धागे असतात.
१७प्राचीनतान- कापडाचा ताणा, उभें सूत या अर्थानें हा शब्द तैत्तिरीय संहितेत आला आहे.
१८वातपान- वा-यापासून रक्षण करणारें वस्त्र या अर्थानें हा शब्द तैत्तिरीय संहितेंत आला आहे.
१९उष्णीष- वैदिककालीं पुरुष व स्त्री हे दोघेंहि जे पागोटें वापरीत असत तें अथर्ववेद आणि पंचविंश ब्राह्मण ह्यांत व्रात्य याच्या पागोटयाचा स्पष्ट उल्लेख आहे. आपल्या पदवीचें चिन्ह म्हणून वाजपेय आणि राजसूय यज्ञाच्या वेळीं राजे लोक उष्णीषाचा उपयोग करीत असत.
२०कम्बल- अथर्व वेदांत लोंकरीचा कपडा अथवा ‘काम्बळा’ अशा अर्थी हा शब्द आहे.
२१दूर्ष- ह्याचा अर्थ एक प्रकारचें वस्त्र असा आहे. व हा शब्द दोनदां अथर्ववेदांमध्ये आलेला आहे. वेबरच्या मतें हें वस्त्र मूळचे अनार्य लोक वापरीत असत.
२२परिधान- ह्याचा अर्थ शरीराच्या खालच्या भागावरलें वस्त्र असा अथर्ववेद व बृ. उपनिषद् मध्यें अर्थ आहे. चंदनचर्चित वस्त्राचा शांखायन आरण्यकांत उल्लेख आलेला आहे.
२३क्षौम- जाड सुताचे कपडे या अर्थानें हा शब्द मैत्रायणी संहितेत आणि सूत्रांत आला आहे.
२४अविक- मेंढयापासून होणारा म्हणजे लोकर हा शब्द एकदां बृहदारण्यक उपनिषदांत आलेला आहे.
२५उपस्तरण- कैषीतकी उपनिषदांतील पर्यकाच्या वर्णनांत ह्या शब्दाचा अर्थ ‘चादर’ आच्छादन असा केला आहे आणि ॠग्वेदांतहि लाक्षणिक अर्थ असाच केला आहे . अथर्ववेदांतहि हाच अर्थ आहे असें वाटतें. तथापि व्हिटनें ह्याचा अर्थ पर्यक असा करितो. परंतु आस्तरण ह्याचा अर्थ ‘उशी’ असा दुस-या उता-यांत करितो.
२६दशा- शतपथ ब्राह्मणांत एखाद्या वस्त्राचें टोंक असा अर्थ याचा आहे. हा शब्द दशा-पवित्र ह्या समसात आलेला आहे व त्याचा अर्थ काठ असलेला कपडा असा आहे.
२७पर्यास- शतपथब्राह्मण कापडाच्या आडव्या विणीला हें नांव दिलेलें असून उभ्या विणीला अनुच्छाद असें नांव दिलेले आहे.
२८पांडव- शतपथ ब्राह्मणांत ह्याचा अर्थ बिन रंगाचें रेशमी वस्त्र असा आहे.
२९प्रवरप्रवार- ‘पांघरूण’ ‘लोकरी कपडा’ या अर्थाचा बृहदारण्यक उपनिषदांतील हा शब्द आला आहे.
३०प्राचीनातान- हा कपडयाचा ‘उभा दोरा’ ह्या अर्थानें ब्राह्मण ग्रंथांतून उपयोगांत आणलेला शब्द आहे.
३१बरासी- याचा अर्थ एक प्रकारचें वस्त्र. हा शब्द काठक संहिता व पंचविश ब्राह्मण यांत आलेला आहे.
३२माहारजन- केशरानें रंगविलेला, बृहदारण्यक उपनिषदामध्यें वस्त्राला हें नांव लाविलें आहे.
३३विवनय- ब्राह्मण ग्रंथांत मंचकावर जसें कापडाचे वगैरे विणकाम किंवा चूणकाम असतें तशा प्रकारचें  काम अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
३४शामूल्य- जैमिनीय उपनिषत्  ब्राह्मणांत ह्याचा अर्थ शामुल्याप्रमाणें लोंबरीचा अंगरखा असा सामान्यपणें आहे. रॉथ ह्या पाठांत शमीला अशी सुधारणा करून त्याचा अर्थ शमीच्या लांकडाचे तुकडे असा करितो.