प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
पर्वतनामें [ॠग्वेद]
पर्वतनामें / दिग्वाचक / स्थलविशेष / स्थलदर्शक विशेषणें / विभागदर्शक [ॠग्वेद] |
१गिरी.- 'पर्वत' अथवा 'उंची' ॠग्वेदांत हा शब्द बराच वेळ आला आहे. टेकडीवरील झाडांच्या उल्लेखामुळें त्याला वृक्षकेशा: असें म्हटलें आहे. तसेंच डोंगरापासून नद्या निघून समुद्राला मिळतात असा उल्लेख आहे. या शब्दाचा पर्वत या विशेषणार्थी शब्दाशीं संबंध असलेला दिसून येतो. पर्वत हें गिरि शब्दाचें विशेषण आहे. हे दान्ही शब्द मेघवाचक आहेत ही गोष्टहि येथें ध्यानांत ठेवली पाहिजे. सायणाचार्यानीं ॠग्वेद ६.६६,११ येथें भाष्यांत गिरि शब्दाचा मेघ असा अर्थ केला आहे. ॠग्वेदांत डोंगरांतील पाणी व अथर्ववेदांत बर्फाच्छादित पर्वत यांचा उल्लेख आहे. पर्वतांचीं खरीं नांवें मूजवन्त, त्रिककुद्, हिमवंत ही क्वचितच सांपडतात. तैत्तिरीय आरण्यकांत क्रौच, महामेरुं, मैनाग हीं पर्वतांची नांवें आली आहेत. नावप्रभ्रंश हें नांवहि आढळतें पण तें विशेषनाम आहे असें म्हणतां येणार नाही.
२पर्वत.- ॠग्वेद व अथर्ववेद यांत ह्या शब्दाचा संयोग नेहमी गिरि या शब्दाशीं होत असून त्याचा अर्थ पर्वत किंवा टेंकडी असा आहे. ॠग्वेदापासून पुढील ग्रंथांत लहान डोंगरांत वाहणा-या नद्यांच्या पाण्याच्या संबंधांत वरील अर्थी हा शब्द रुढ आहे. पर्वतांनां पंख असल्याबद्दलच्या कथेचा उल्लेख वाजसनेयि संहितेंत (३६.९) आहे. कौषीतकि उपनिषदांत दक्षिण व उत्तर पर्वत ह्यांचा उल्लेख आलेला आहे; व हे पर्वत म्हणजे विन्ध्य व हिमालय पर्वत होत ह्यांत संशय नाहीं. अथर्ववेदामध्यें ओषधी व सुगंधी पदार्थ (अंजन) हे पर्वतांवर सांपडतात असें व ॠग्वेदामध्यें पर्वतावर खनिज पदार्थ सांपडतात असें म्हटलेलें आहे. अथर्व. ९.१,१८, या ठिकाणीं पर्वत व गिरि यांत कांही भेद असावा असें दिसते. अथर्व. १२.१,११ हेंहि स्थल पाहण्यासारखें आहे. पर्वत आणि पाणी यांचा उल्लेख एकत्र आला आहे. परंतु त्यावरुन लहान आणि मोठा असा भेद दिसून येत नाही. त्यांच्या हलण्याविषयीं मात्र कांही ठिकाणीं (ॠ.१.३९,५) उल्लेख आहे आणि त्या ठिकाणीं ह्या बहुतेक टेकडया असाव्या असा तर्क करणें विशेष युक्त आहे. सायणाचार्यांनी ॠग्वेद असा तर्क करणें विशेष युक्त आहे. सायणाचार्यांनी ॠग्वेद भाष्यांत पर्वतांनां सपक्ष म्हटलें आहे (ॠ.२.१२,२; १७,५). ॠ.१.५२,२. येथें पर्वतावरुन नद्या वहात याविषयीं आधार द्दष्टीस पडतात. कांही ठिकाणीं (ॠ.१.५५,१; १९,१;९;) पर्वत शब्दाचा अर्थ अगदींच भिन्न घेतात. यास्काचीहि (१.२०) तशा अर्थास संमति आहे. कांही (ॠ ७.३६,११ वगैरे) स्थलीं पर्वत आणि अय् यांचा संबंध एकत्र आला आहे; म्हणून त्यांचा संबंध होता वगैरे अनुमान निघतें. परंतु त्यांत विशेष तात्पर्य नाही.
ॠग्वेदांतील ४.५४,५ हें स्थल या अनुमानास बरेंच चांगलें आहे यांत संशय नाहीं; तथापि तें अनुमानच आहे.
३त्रिककुद् किंवा ३त्रिककुभ._ह्याचा अर्थ 'तीन शिखरें असलेला' असा असून तो शब्द अथर्ववेद व पुढील ग्रंथ यांत हिमालयांतील एका पर्वताचें (हल्लींच्या त्रिकूटाचें) नांव म्हणून आलेला आहे. ह्यापासूनच अंजन (उत्पन्न करणारे मलम) आलें; व ह्याबद्दल दंतकथा अशी आहे कीं, हें वृत्राच्या डोळयापासून उत्पन्न झालें.
४नग.- (न हलणारा पर्वत). हा शब्द अथर्ववेदाच्या (१९.८,१) मागाहूनच्या कांडांत आलेला असून नंतर सूत्रग्रंथांतहि आलेला आहे. पुढल्या संस्कृतामध्यें वृक्षालाहि हा शब्द लावलेला आहे.
५हिमवत्.-'बर्फमय' अशा अर्थानें पर्वतांनां लावलेला हा शब्द अथर्ववेदांत, आलेला आहे. या वेदांत ॠग्वेदांत व मागाहूनच्या ग्रंथांत नाम म्हणून हा शब्द आलेला आहे. हा शब्द ज्याला हल्लीं आपण हिमालय म्हणतो त्यालाच अजमासानें लावला होता हें कबूल करणें भाग आहे. तरी पण सुलेमानसारख्या हिमालय पर्वताच्या श्रेणींत असलेल्या, पण हिमालय नांव नसलेल्या पर्वतांनांहि हा शब्द लावलेला असेल.
६नाव प्रभ्रंशन.- याचा नाव घसरणें, असा व्हिटने व रॉथ ह्यांच्या अथर्ववेदाच्या प्रतींत अर्थ घेतला आहे. व वेबर व इतर लोक ह्यांनीं ह्या नांवाचा शतपथ ब्राह्मणांत (१.८,१,६) उल्लेखिलेल्या महाप्रलयाचे वेळीं ज्या डोंगराजवळ मनूची नाव प्रलयाचे जलांत तरंगून राहिली त्या उत्तरेकडील (मनो:अवसर्पण ह्या नांवाच्या) डोंगराशीं संबंध लावलेला आहे. पण ब्लूमफील्ड व व्हिटने हे दोघेहि म्हणतात कीं हा अर्थ अगदीं अशक्य आहे; व हें मत मॅक्डोनेलनेंहि स्वीकारलें आहे. ह्या शब्दाचीं न-अव-प्रभ्रंशन अशीं पदें भाष्यकारांनीं पाडलीं आहेत. ह्या शब्दाचा जहाजाचें अवतरण असा इतरत्र कोठेहि अर्थ होत नाहीं. नौ हा शब्द नाव ह्या रुपानें समासांत पहिला अवयव म्हणून कधीहि येत नाहीं व प्रभ्रंशन 'घसरणें' हा शब्द नावेच्या निसटण्याला कधींहि लावलेला नाही.
७मनोरवसर्पण.- हें शथपथ ब्राह्मणांत ज्या पर्वताला मनूचें जहाज लागलें त्या पर्वताचें नांव आहे. पुराणांत याला 'नौबंधन' हें नांव दिलें आहे. याचा नावप्रभ्रंशन असा उल्लेख अथर्ववेदांत केला आहे.
८मैनाक.- मेनकेचा वंशज. तैत्तिरीय आरण्यकांत हिमालयांतील एका पर्वताचें हे नांव आहे मैनाग असाहि एक पाट आहे. सुदर्शन व कौंच याबरोबर याचा उल्लेख आला आहे.
९दिश- ह्या शब्दाचा अर्थ दिशा असा असून तो ॠग्वेदामध्यें व पुढें झालेल्या ग्रंथांतहि ''आकाशाचा चतुर्थ भाग'' या अर्थानें वारंवार आलेला आहे. सामान्यत: पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार दिशांचा उल्लेख येतो. पण कधी कधीं या दिशांत अधिक दिशांची भर पडून एकंदर संख्या १० पर्यंत गेलेली आहे. पांच दिशांत पहिल्या चार धरुन ऊर्ध्वा या दिशेचा अंतर्भाव होतो; सहामध्यें ऊर्ध्वा, व अवाची; सातांमध्यें ऊर्ध्वा, ज्यावर मनुष्य उभा राहतो ती जमीन म्हणजे ध्रुवा व या दोहोंमधलें अंतरिक्ष म्हणजे व्यध्वा या येतात; आठांमध्ये आग्नेय, नैर्ॠुत्य, वायव्य व ईशान्य ह्या चार दिशा येतात; नवांमध्यें या मधल्या दिशा व ऊर्ध्वा दिशा; व दहांमध्यें ऊर्ध्वा, अवाची या येतात. कधीं कधीं पांच ही संख्या ध्रुवा ही दिशा धरुन दाखवितात; सहा संख्या ध्रुवा व ऊर्ध्वा या मिळून करतात; व बृहती ही कधीं कधीं ऊर्ध्वा हिच्या बदली येते. ॠ.१०.४२,११ येथें मध्यत: असा उल्लेख आहे. वाजसनेयि सं. २२.२४ येथें 'अर्वाची' असा पाठ आहे. वस्तुत: अर्वाची हाच शब्द दिग्वाचक आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्यें पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांचा उल्लेख करुन शिवाय अवाची दिशेचा उल्लेख केला आहे. एकंदरीत तैत्तिरीय आरण्यक, शतपथ ब्राह्मण वगैरे सर्व ग्रंथांत सहा दिशापेक्षां जास्त उल्लेख नाही. परंतु अथर्ववेदांत मात्र प्राची, दक्षिणा, प्रतीची, उदीची, ध्रुवा (पृथिवी), व्यध्वा (अन्तरिक्ष), आणि ऊर्ध्वा (द्युलोक) असा सात दिशांचा स्पष्ट उल्लेख आहे. तो ४.४०,१ येथपासून क्रमानें पहावा. तै.सं. ७.१,५ येथें वरील दिशांचा उल्लेख आहे. चार दिशा, चार उपदिशा व उर्ध्वा अशा नऊ दिशा शांखायन श्रौतसूत्रांत आहेत. अथर्व वेदांतील पहिल्या दोन उता-यांत दिशेसंबंधीं 'पञ्च' या संख्येपेक्षां कांही विशेष उल्लेख नाही. परंतु तिस-या उता-यांत मात्र प्राची, दक्षिणा, प्रतीची, उदीची, ध्रुवा, ऊर्ध्वा (अथर्व. १५.१४,१;१७) असे दिशासंबंधी उल्लेख आले आहेत. वाजसनेयि संहितेंतहि 'पञ्च दिश:' असाच उल्लेख आहे.