प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
पर्वतनामें [ॠग्वेद]
पर्वतनामें / दिग्वाचक / स्थलविशेष / स्थलदर्शक विशेषणें / विभागदर्शक [ॠग्वेद] |
१गिरी.- 'पर्वत' अथवा 'उंची' ॠग्वेदांत हा शब्द बराच वेळ आला आहे. टेकडीवरील झाडांच्या उल्लेखामुळें त्याला वृक्षकेशा: असें म्हटलें आहे. तसेंच डोंगरापासून नद्या निघून समुद्राला मिळतात असा उल्लेख आहे. या शब्दाचा पर्वत या विशेषणार्थी शब्दाशीं संबंध असलेला दिसून येतो. पर्वत हें गिरि शब्दाचें विशेषण आहे. हे दान्ही शब्द मेघवाचक आहेत ही गोष्टहि येथें ध्यानांत ठेवली पाहिजे. सायणाचार्यानीं ॠग्वेद ६.६६,११ येथें भाष्यांत गिरि शब्दाचा मेघ असा अर्थ केला आहे. ॠग्वेदांत डोंगरांतील पाणी व अथर्ववेदांत बर्फाच्छादित पर्वत यांचा उल्लेख आहे. पर्वतांचीं खरीं नांवें मूजवन्त, त्रिककुद्, हिमवंत ही क्वचितच सांपडतात. तैत्तिरीय आरण्यकांत क्रौच, महामेरुं, मैनाग हीं पर्वतांची नांवें आली आहेत. नावप्रभ्रंश हें नांवहि आढळतें पण तें विशेषनाम आहे असें म्हणतां येणार नाही.
२पर्वत.- ॠग्वेद व अथर्ववेद यांत ह्या शब्दाचा संयोग नेहमी गिरि या शब्दाशीं होत असून त्याचा अर्थ पर्वत किंवा टेंकडी असा आहे. ॠग्वेदापासून पुढील ग्रंथांत लहान डोंगरांत वाहणा-या नद्यांच्या पाण्याच्या संबंधांत वरील अर्थी हा शब्द रुढ आहे. पर्वतांनां पंख असल्याबद्दलच्या कथेचा उल्लेख वाजसनेयि संहितेंत (३६.९) आहे. कौषीतकि उपनिषदांत दक्षिण व उत्तर पर्वत ह्यांचा उल्लेख आलेला आहे; व हे पर्वत म्हणजे विन्ध्य व हिमालय पर्वत होत ह्यांत संशय नाहीं. अथर्ववेदामध्यें ओषधी व सुगंधी पदार्थ (अंजन) हे पर्वतांवर सांपडतात असें व ॠग्वेदामध्यें पर्वतावर खनिज पदार्थ सांपडतात असें म्हटलेलें आहे. अथर्व. ९.१,१८, या ठिकाणीं पर्वत व गिरि यांत कांही भेद असावा असें दिसते. अथर्व. १२.१,११ हेंहि स्थल पाहण्यासारखें आहे. पर्वत आणि पाणी यांचा उल्लेख एकत्र आला आहे. परंतु त्यावरुन लहान आणि मोठा असा भेद दिसून येत नाही. त्यांच्या हलण्याविषयीं मात्र कांही ठिकाणीं (ॠ.१.३९,५) उल्लेख आहे आणि त्या ठिकाणीं ह्या बहुतेक टेकडया असाव्या असा तर्क करणें विशेष युक्त आहे. सायणाचार्यांनी ॠग्वेद असा तर्क करणें विशेष युक्त आहे. सायणाचार्यांनी ॠग्वेद भाष्यांत पर्वतांनां सपक्ष म्हटलें आहे (ॠ.२.१२,२; १७,५). ॠ.१.५२,२. येथें पर्वतावरुन नद्या वहात याविषयीं आधार द्दष्टीस पडतात. कांही ठिकाणीं (ॠ.१.५५,१; १९,१;९;) पर्वत शब्दाचा अर्थ अगदींच भिन्न घेतात. यास्काचीहि (१.२०) तशा अर्थास संमति आहे. कांही (ॠ ७.३६,११ वगैरे) स्थलीं पर्वत आणि अय् यांचा संबंध एकत्र आला आहे; म्हणून त्यांचा संबंध होता वगैरे अनुमान निघतें. परंतु त्यांत विशेष तात्पर्य नाही.
ॠग्वेदांतील ४.५४,५ हें स्थल या अनुमानास बरेंच चांगलें आहे यांत संशय नाहीं; तथापि तें अनुमानच आहे.
३त्रिककुद् किंवा ३त्रिककुभ._ह्याचा अर्थ 'तीन शिखरें असलेला' असा असून तो शब्द अथर्ववेद व पुढील ग्रंथ यांत हिमालयांतील एका पर्वताचें (हल्लींच्या त्रिकूटाचें) नांव म्हणून आलेला आहे. ह्यापासूनच अंजन (उत्पन्न करणारे मलम) आलें; व ह्याबद्दल दंतकथा अशी आहे कीं, हें वृत्राच्या डोळयापासून उत्पन्न झालें.
४नग.- (न हलणारा पर्वत). हा शब्द अथर्ववेदाच्या (१९.८,१) मागाहूनच्या कांडांत आलेला असून नंतर सूत्रग्रंथांतहि आलेला आहे. पुढल्या संस्कृतामध्यें वृक्षालाहि हा शब्द लावलेला आहे.
५हिमवत्.-'बर्फमय' अशा अर्थानें पर्वतांनां लावलेला हा शब्द अथर्ववेदांत, आलेला आहे. या वेदांत ॠग्वेदांत व मागाहूनच्या ग्रंथांत नाम म्हणून हा शब्द आलेला आहे. हा शब्द ज्याला हल्लीं आपण हिमालय म्हणतो त्यालाच अजमासानें लावला होता हें कबूल करणें भाग आहे. तरी पण सुलेमानसारख्या हिमालय पर्वताच्या श्रेणींत असलेल्या, पण हिमालय नांव नसलेल्या पर्वतांनांहि हा शब्द लावलेला असेल.
६नाव प्रभ्रंशन.- याचा नाव घसरणें, असा व्हिटने व रॉथ ह्यांच्या अथर्ववेदाच्या प्रतींत अर्थ घेतला आहे. व वेबर व इतर लोक ह्यांनीं ह्या नांवाचा शतपथ ब्राह्मणांत (१.८,१,६) उल्लेखिलेल्या महाप्रलयाचे वेळीं ज्या डोंगराजवळ मनूची नाव प्रलयाचे जलांत तरंगून राहिली त्या उत्तरेकडील (मनो:अवसर्पण ह्या नांवाच्या) डोंगराशीं संबंध लावलेला आहे. पण ब्लूमफील्ड व व्हिटने हे दोघेहि म्हणतात कीं हा अर्थ अगदीं अशक्य आहे; व हें मत मॅक्डोनेलनेंहि स्वीकारलें आहे. ह्या शब्दाचीं न-अव-प्रभ्रंशन अशीं पदें भाष्यकारांनीं पाडलीं आहेत. ह्या शब्दाचा जहाजाचें अवतरण असा इतरत्र कोठेहि अर्थ होत नाहीं. नौ हा शब्द नाव ह्या रुपानें समासांत पहिला अवयव म्हणून कधीहि येत नाहीं व प्रभ्रंशन 'घसरणें' हा शब्द नावेच्या निसटण्याला कधींहि लावलेला नाही.
७मनोरवसर्पण.- हें शथपथ ब्राह्मणांत ज्या पर्वताला मनूचें जहाज लागलें त्या पर्वताचें नांव आहे. पुराणांत याला 'नौबंधन' हें नांव दिलें आहे. याचा नावप्रभ्रंशन असा उल्लेख अथर्ववेदांत केला आहे.
८मैनाक.- मेनकेचा वंशज. तैत्तिरीय आरण्यकांत हिमालयांतील एका पर्वताचें हे नांव आहे मैनाग असाहि एक पाट आहे. सुदर्शन व कौंच याबरोबर याचा उल्लेख आला आहे.
९दिश- ह्या शब्दाचा अर्थ दिशा असा असून तो ॠग्वेदामध्यें व पुढें झालेल्या ग्रंथांतहि ''आकाशाचा चतुर्थ भाग'' या अर्थानें वारंवार आलेला आहे. सामान्यत: पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार दिशांचा उल्लेख येतो. पण कधी कधीं या दिशांत अधिक दिशांची भर पडून एकंदर संख्या १० पर्यंत गेलेली आहे. पांच दिशांत पहिल्या चार धरुन ऊर्ध्वा या दिशेचा अंतर्भाव होतो; सहामध्यें ऊर्ध्वा, व अवाची; सातांमध्यें ऊर्ध्वा, ज्यावर मनुष्य उभा राहतो ती जमीन म्हणजे ध्रुवा व या दोहोंमधलें अंतरिक्ष म्हणजे व्यध्वा या येतात; आठांमध्ये आग्नेय, नैर्ॠुत्य, वायव्य व ईशान्य ह्या चार दिशा येतात; नवांमध्यें या मधल्या दिशा व ऊर्ध्वा दिशा; व दहांमध्यें ऊर्ध्वा, अवाची या येतात. कधीं कधीं पांच ही संख्या ध्रुवा ही दिशा धरुन दाखवितात; सहा संख्या ध्रुवा व ऊर्ध्वा या मिळून करतात; व बृहती ही कधीं कधीं ऊर्ध्वा हिच्या बदली येते. ॠ.१०.४२,११ येथें मध्यत: असा उल्लेख आहे. वाजसनेयि सं. २२.२४ येथें 'अर्वाची' असा पाठ आहे. वस्तुत: अर्वाची हाच शब्द दिग्वाचक आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्यें पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांचा उल्लेख करुन शिवाय अवाची दिशेचा उल्लेख केला आहे. एकंदरीत तैत्तिरीय आरण्यक, शतपथ ब्राह्मण वगैरे सर्व ग्रंथांत सहा दिशापेक्षां जास्त उल्लेख नाही. परंतु अथर्ववेदांत मात्र प्राची, दक्षिणा, प्रतीची, उदीची, ध्रुवा (पृथिवी), व्यध्वा (अन्तरिक्ष), आणि ऊर्ध्वा (द्युलोक) असा सात दिशांचा स्पष्ट उल्लेख आहे. तो ४.४०,१ येथपासून क्रमानें पहावा. तै.सं. ७.१,५ येथें वरील दिशांचा उल्लेख आहे. चार दिशा, चार उपदिशा व उर्ध्वा अशा नऊ दिशा शांखायन श्रौतसूत्रांत आहेत. अथर्व वेदांतील पहिल्या दोन उता-यांत दिशेसंबंधीं 'पञ्च' या संख्येपेक्षां कांही विशेष उल्लेख नाही. परंतु तिस-या उता-यांत मात्र प्राची, दक्षिणा, प्रतीची, उदीची, ध्रुवा, ऊर्ध्वा (अथर्व. १५.१४,१;१७) असे दिशासंबंधी उल्लेख आले आहेत. वाजसनेयि संहितेंतहि 'पञ्च दिश:' असाच उल्लेख आहे.
१०प्रदिश् .- हा दिश्प्रमाणें सामान्यत: आकाशाचा चौथा भाग किंवा दिशा या अर्थानें उपयोगांत आलेला शब्द आहे. कोठें कोठें ४.५,६ आणि ७ अशी दिशांची संख्या सांगितली आहे. कांही वचनांत हा शब्द 'मधला विभाग' याच अर्थानें उपयोगांत आला असून, हा अर्थ अधिक स्पष्टपणें 'अवांतर दिश्' या शब्दानें निर्दिष्ट केला आहे. इतर ठिकाणी 'चतस्त्र' असा उल्लेख असून ॠ.९,८६,२९ येथें मात्र पञ्च प्रदिश असा उल्लेख आहे.
११अरण्य.- या शब्दाचा अर्थ गांवाच्या बाहेरची पडित जमीन असा असून नेहमीच जंगल असा त्याचा अर्थ असूं शकत नाहीं. ही जमीन घराजवळील जमीन, वाडी, परसूं वगैरे आणि शेतीची जमीन, (कृषि) यापासून पृथक् दाखविली आहे. आणि मनुष्यापासून ती दूर (तिर:) असते असेंहि दर्शविलें आहे. ही जागा म्हणजे चोरांचें वसतिस्थान होय. हींत आणि ग्राम यांत भेद दाखविला आहे. ॠग्वेदांतील एका स्तुतिपर सूक्तांत वनदेवतेच्या (अरण्यानी) वनाचें वर्णन केलें आहे. वनामध्यें मृतांनां मूठमाती देण्याकरितां नेतात आणि भिक्षु अथवा सन्यासी वनांत वास करितात असें वर्णन छांदोग्यउपनिषदांत (८.५,३) आहे. जंगलांत वणवे नेहमीं लागतात असेंहि ॠग्वेदांत वर्णन आहे (१.६५,४;२.१४,२.)
१२क्षिति.-ॠग्वेदांत हा शब्द 'वसतिस्थान' वाचक आला आहे. आणि विशेषत: 'क्षितिर्ध्रुवा' (सुरक्षित वसतिस्थान) या शब्दाचा उल्लेख आला आहे, व संदर्भावरुन तो किल्याप्रमाणें मानलें जाणारें वृजन अथवा ग्राम या अर्थी दिसतो. यावरुन 'एकाद्या वसाहतींत कायम राहणारे लोक' असा याचा अर्थ पुढें होऊं लागला व तो विशेषत: 'पंचक्षितय:' या शब्दांत दिसतो.
१३गोष्ठ.- 'गोठाणें' याचा अर्थ गोठा असा नसून 'गायी चरण्याची जागा' असा आहे असें गेल्डनेर ऐतरेय ब्राह्मण (३.१८,१४,) व वाजसनेयि संहितेंतील (३,२१) महीधराच्या भाष्यावरुन म्हणतो. ॠग्वेदांत ब-याच ठिकाणीं हा शब्द आला असून तेथें तो वरील अर्थांतच चांगला लागू पडतो, व अथर्व वेदांतील एका ॠचेचें भाषांतरहि चांगलें जुळतें. शिवाय दुसरी-कडेहि हाच अर्थ मानिला आहे.
१४द्वीप.- (बेट) हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांत आलेला आहे. पण ज्या बेटांचा येथें उल्लेख आलेला आहे तीं बेटें सिंधु किंवा गंगा या दोन नद्यांच्या पात्रांतील बेटांपेक्षां निराळीं होतीं असें मानण्याचें कारण नाहीं. मेरुपर्वताभोंवती चार, सात किंवा तेरा द्वीपांची पृथ्वी आहे हें जें भूगोलविषयक पौराणिक ज्ञान तें वैदिककालीं लोकांस परिचित नव्हतें.
१५धन्वन्.-'ओसाड अरण्य' हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत आला आहे. अरण्यांत तहानेनें मृत्यु येणें ही गोष्ट (ऐतरेय ब्राह्मणांतील २.१९ उता-यावरुन) तत्कालीन लोकांनां चांगली परिचित होती असें दिसतें. व अशा ओसाड अरण्यांत पाण्याचा एखादा झरा (प्रपा) असणें किती महत्त्वाचें आहे याची लोकांनां कल्पना होती. ॠग्वेदांत सिंधु व शुतुद्रि यांच्या पूर्वेकडील अरण्याचा बहुतेक उल्लेख असावा. ॠ. ५.५३,६ येथें 'धन्वना-गच्छता उदकेन' असा सायणाचार्य अर्थ करितात. अर्वाचीन संस्कृतांत 'प्रपा' याचा पाणपोई असा अर्थ करितात.
१६निवेशन.- (घर) हा शब्द ॠग्वेद व सूत्रग्रंथ यांत आलेला आहे. सूत्रग्रंथांत या शब्दाची तुलना कधी गृह या शब्दाशीं 'जनावरांचें विश्रांतिस्थान' म्हणून केलेली असते.
१७पस्त्यावत् .-ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं हा शब्द सुषोम, शर्यणावत् व आर्जिक ह्यांचेबरोबर सप्तम्यन्त आलेला आहे. ह्याचा अर्थ पिशेल म्हणतो त्याप्रमाणें स्थल असा असला पाहिजे. हें स्थल म्हणजे इतर ठिकाणीं सोमाचें घर असा ज्याचा उल्लेख आलेला आहे. त्यामध्यें 'पस्त्यानाम्' म्हणजे नदीच्या मध्यभागीं असलेल्या स्थलास जुळतें असें कोठें तरी असलें पाहिजे. पिशेल म्हणतो कीं, पत्याळा हें तें स्थल असावें. तरी पण पत्याळा व पस्त्यावत् ह्या नामसाद्दश्यावर तो फारसा जोर देत नाहीं. पत्याळच्या उत्तरेस बरेच डोंगर आहेत व त्यांवर सोमवल्ली उगवत असेल. रॉथच्या मतानें ह्या शब्दाचा अर्थ 'ज्यामुळें सोमवल्लीं दाबली जाते असें यंत्र' असा असावा.
१८पार.- 'पृ' या शब्दापासून हा शब्द झाला असून याचा अर्थ नदी किंवा ओढा यांच्या पलीकडील तीर असा असावा व' याच अर्थानें हा शब्द ॠग्वेद व मागाहून झालेल्या ग्रंथांत आला आहे. ॠ. १०.१५५,३ या ठिकाणीं 'समुद्रामध्यें किंवा समुद्राच्या तीरावर तरंगते' असा याचा अर्थ असावयास पाहिजे. ऐतरेय ब्राह्मणांत 'शेवटचा दिवस' या अर्थानें हा शब्द आला आहे.
१९पृशन.- लुड्विगच्या मतें हें एका रणक्षेत्राचें नांव आहे. याचा उल्लेख ॠग्वेदाच्या एका मंत्रांत आला आहे. सायणाचार्य याचा 'बाहुयुद्ध' असा अर्थ करतात.
२०प्रवत्.-'उंची' हा शब्द निवत् म्हणजे खोली-दरी याच्या उलट अर्थाचा आहे. ॠग्वेद व इतर ग्रंथांत हा अनेक स्थलीं आढळतो.
२१प्रवात.-'वा-याची जागा' हवाशीर जागा. हा शब्द ॠग्वेदांत जेथें विभीतक (बेहडा) नांवाची कठिण कवचीचीं फळें होत असत, व जी अक्ष म्हणून (फांसे) खेळण्यास घेत असत त्या जागेचें नांव म्हणून आलेला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत नासक्या (जीर्ण) वस्तू टाकण्याची जागा अशा अर्थी ह्या शब्दाचा उल्लेख आला आहे. सायणाचार्य मात्र प्रवात देश म्हणजे प्रवण देश असा अर्थ करितात. यास्कहि तसाच करतो. प्रवण देशांवर सपाटयाचे वारे सरळ त-हेनें वहात नाहींत.
२२रन्ध्र.- ॠग्वेदांत 'उक्ष्णोरंन्ध्र' हा समास एका जागेचें नांव म्हणून आलेला आहे. परंतु हा अर्थ संशयास्पद आहे. पंचविंश ब्राह्मणांत (१३.९,१३) उक्ष्ण हें मनुष्याचें नांव आहे.
२३वन.- ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत ह्या शब्दाचा अर्थ अरण्य असा आहे. आतां अरण्य म्हणजे वृक्षयुक्त स्थळ एवढेंच नव्हे तर निर्जन, ओसाड देश असा अर्थ घेतला पाहिजे. सोमयागाचे वेळीं उपयोगांत आणलेलें 'लांकडी पात्र (चमस) असाहि त्याचा अर्थ होतो. एके ठिकाणीं 'रथाचा एक भाग' असाहि अर्थ ह्या शब्दाचा कदाचित् होऊं शकेल. ॠग्वेदांत क्वचित् स्थलीं वन शब्द बहुवचनीं आला आहे व त्याचा अर्थ अरण्य असा सायणाचार्यांनीं केला आहे. वैदिक काली वन शब्द पाणीवाचक नव्हता असें कांहीं लोक अनुमान काढतात. परंतु निरुक्त ५.१६ या स्थलावरुन तें चुकीचें आहे असें दिसतें. अर्वाचीन संस्कृतमध्यें वन शब्द जल या अर्थानें प्रचारांत आहे. ॠ.१.५५,४ या ठिकाणीं सायणाचार्य वन शब्दाचा 'अरण्य' असा अर्थ करतात. परंतु ॠ. २.१४,९ येथें मात्र लांकडाचा पेला असा वैकल्पिक अर्थ त्यांनीं सुचविला आहे.
२४शर्यणावत्.-ॠग्वेदामध्यें अनेक ठिकाणीं हा शब्द आलेला असून ह्या शब्दावरुन एका स्थलाचा बोध होतो असें सायणाचार्यांचें मत आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणें 'शर्यणा:' हें कुरुक्षेत्रांतील एका देशविभागाचें नांव आहे व कुरुक्षेत्राच्या मागच्या बाजूस ह्या शर्यणाजवळ शर्यणावत् हें सरोवर आहे. सायणाचार्यांच्या लेखांत इतरत्र दिसून न येणारी सुसंगति येथें दिसून येत असल्या मुळें हेंहि एखाद्या स्थलाचें नांव असावें. शिवाय कुरुक्षेत्रामध्यें 'अन्यत: प्लक्ष' हें सरोवर होतें, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. रॉथच्या मतें दोन ठिकाणीं ह्याचा अर्थ सरोवर असा आहे. अगदीं शब्दश: अर्थ म्हटला म्हणजे 'वेताचें जाळें असलेलें पाणी' असा आहे. झिमरला हा अर्थ संमत आहे. उलटपक्षीं पिशेलला सायणाचें मतच पसंत आहे. हिलेब्रँटला सुद्धां हें स्थलाचें नांव असावें असें वाटतें. पण हें स्थल म्हणजे पांच जाती जेथें रहात होत्या तें असावें असें त्याला वाटतें व हें हिलेब्रँटचें मत अगदींच सायणांच्या मताविरुद्ध नाहीं. कारण पुरु लोकांचा द्धरु लोकांशीं असलेला संबंध प्रसिद्ध आहे. अथवा तो म्हणतो त्याप्रमाणें हें सरोवर म्हणजे काश्मिरांतलें अलीकडील वूलर सरोवर हें असावें. पण हें संभवनीय दिसत नाहीं. शर्यणावत् ही मागाहून प्रसिद्धीस आलेली पूर्वेकडील सरस्वती नदी होय हें जें लुडविग्चें म्हणणें, तें तर अगदींच असंभाव्य दिसतें. बर्गेनच्या मतें हें नांव सोम तयार करण्या-या दैवी माणसाचें आहे. ॠ. ८.५३,११ हें स्थल 'शर्यणावत्' सरोवर नक्की कोणच्या स्थलीं होतें याचा निश्चय करण्यास फारच चांगलें आहे. आर्जीकीय देशांत (कुरुक्षेत्रांत) सुषोमा नदीच्या काठीं शर्यणावत् सरोवर आहे. आर्जीकीया नदी आणि विपाट् नदी एकच असें यास्काचें मत मागें गेलेंच आहे. आर्जीकीय देश नदीच्या भोंवतालचा प्रदेश होय असें अनुमान निघतें. कुरुक्षेत्र जर निश्चित असेल (तें निश्चित आहे) तर कुरुक्षेत्राच्या पश्चिमेस हें शर्यणावत् सरोवर असावयास पाहिजे.
२५समुद्र.- (सम्-उद्र.) ह्याचा यौगिकार्थ 'जलांचें मीलन' असा आहे. नंतर समुद्र असा अर्थ होऊन हा शब्द ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ यांमध्यें वारंवार आलेला आहे. या शब्दाचें हेंच महत्त्व आहे कीं, त्यावरुन वैदिक काळच्या लोकांनां समुद्र ही चीज काय आहे हें ठाऊक होतें असें सिद्ध होतें. ही कल्पना व्हिव्हियन डी सेंट मार्टिन ह्यास संमत नाहीं. पण मॅक्समुल्लर व लासेन यांनां कबूल आहे; एवढेंच नव्हे तर समुद्राविषयीं आर्य लोकांचें ज्ञान शक्य तेवढें कमी करणा-या झिमरनेंहि ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं व मागाहूनच्या ग्रंथांत हें ज्ञान वैदिक काळच्या लोकांनां होतें असें कबूल केलें आहे. झिमर म्हणतो कीं, आर्यन् लोकांनां समुद्राच्या भरती ओहोटीची माहिती नव्हती; सिंधु नदीच्या मुखांचा वैदिक वाङ्मयांत बिलकूल उल्लेख नाहीं. ॠग्वेदामध्यें मासे ही खाण्याची वस्तु आहे ही गोष्ट नमूद केलेली नाहीं. पण समुद्र या शब्दाचा उपयोग अनेक ठिकाणीं लक्षणेनें आलेला आहे. उदाहरणार्थ, दोन महासागरांचा; खालच्या व वरच्या महासागरांचा वगैरे. तो इतर लेखांत असेंहि म्हणतो कीं, ज्या ठिकाणीं पंजाबांतल्या इतर नद्या सिंधूला मिळतात त्या ठिकाणापांसून वाहणा-या सिंधु नदीलाच समुद्र हें नांव दिलेलें आहे. पण हें झिमरचें म्हणणें कबूल करणें म्हणजे ज्या आर्यन् लोकांनां सिंधु नदी माहीत होती अशा आर्यन् लोकांचें समुद्रासंबंधी ज्ञान जाणून बुजून कमी करण्यासारखें आहे. समुद्रांतील संचयाबद्दल म्हणजे मोतीं वगैरेंबद्दल व समुद्रापासून होणार फायदे ह्याबद्दल उल्लेख आलेले आहेत. भुज्यूच्या गोष्टीवरुन त्या लोकांनां समुद्रपर्यटनाची कल्पना होती असेंहि अनुमान निघतें. ॠ.१.११६, ५-७; येथें समुद्र असें पदहि दोनदां आलें आहे. शंभर वल्हीं वगैरेंचें उल्लेख समुद्रासंबंधी ज्ञानाच्या दृष्टीनें महत्त्वाचे आहेत. ॠ. १.७१; ७ येथें समुद्राला मिळणा-या सात नद्या असा बोध होतो. सायणाचार्याप्रमाणें १०.७५,५ यांतील सात नद्या घेतल्या तर त्या समुद्राला मिळत नाहींत. म्हणजे पंजाबांतील सात नद्यांखेरीज समुद्रास मिळणा-या सात नद्या आर्य लोकांनां माहीत होत्या की काय? वरील स्थली 'यह्वी:सप्त स्त्रवत: समुद्रं न' हे शब्द मात्र अगदीं स्पष्ट आहेत. सायणाचार्याखेरीज म्हणजे वेदार्थयत्नकार यांच्या मतें या ठिकाणीं 'मेघोदक' असा अर्थ आहे. ग्रिफिथ व मॅक्समुल्लर यांचीं मतेंहि सायणाचार्याप्रमाणेंच आहेत. सिंधूला मिळणा-या पांच आणि सरस्वती व सिंधु, असा सात नद्यांचा हिशोब सायणाचार्य, ग्रिफिथ व मॅक्समुल्लर हे देतात. ॠ.१०.५८,५ या ॠचेंत 'अर्णव' व 'समुद्र' अशीं दोनहि पदें आली आहेत. सायणाचार्यांनी अर्णव म्हणजे जलयुक्त समुद्र, मेघ किंवा समुद्र असा अर्थ केला आहे. यास्कांनीं अंतरिक्ष नामांत समुद्र शब्दाचा पाठ केला आहे, व त्या अर्याचीं दोन उदाहरणेंहि निरुक्तांत आली आहेत (नि.११.४१; १०.३२;). दैवतकाण्डांत 'आदित्य' अशा अर्थानेंहि हा शब्द दिला आहे (नि.१२.३२). मागाहून झालेल्या संहिताग्रंथांत समुद्र हा शब्द वारंवार सागर या अर्थानें आलेला आहे.
२६सिच्.- ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं (१०.९५,७) हा शब्द द्विवचनीं आलेला आहे. त्याचा अर्थ क्षितिज असा आहे (याचा शब्दश: अर्थ स्वर्ग व मृत्यु या मर्यादा असा आहे). सायणाचार्य 'सिचौ म्हणजे द्यावापृथिवी' असें म्हणतात.
२७सूद.-सेंटपीटर्सबर्ग कोशांत याचा अर्थ 'विहीर व शुष्क झालेल्या तळयांतील माती' असा दिलेला आहे. पिशेल यानें असें सिद्ध केलें आहे कीं ज्याच्या योगानें अथवा जें घातल्याच्या योगानें सोमरस पिण्यास योग्य होतो तें म्हणजे गरम दूध असा याचा अर्थ होतो व हाच सर्व वैदिक वाङ्मयांत लागू पडतो. एजलिंग या शब्दाचा विहीर असा अर्थ करतो व ग्रासमन 'मधुर पेय' असा करतो.
२८ह्लद.- ॠग्वेद व मागाहूनच्या वाङ्मयांत सरोवर किंवा तळें या अर्थानें हा शब्द आला आहे असें मॅकडोनेल म्हणतो. पण सरोवर किंवा तळें हा अर्थ बरोबर नाहीं; डोह असा करावयास पाहिजे. 'कुल्या इव ह्लदं' असा जो ॠग्वेदांत उल्लेख आला आहे त्यावरुन कालव्यांचा चांगलाच बोध होतो.
२९आयतन.-हा शब्द तैत्तिरीय संहितेंत स्थान किंवा पवित्र जागा या अर्थानें आला आहे. छांदोग्य उपनिषद् (७.२४,२) ग्रंथांत याचा 'पवित्र जागा' तीर्थ' असा मर्यादित अर्थ केला आहे.
३०काम्पील.-यजुर्वेद संहितेमध्यें एका ठिकाणीं असें लिहिलें आहे कीं, काम्पील-वासिनी हें विशेषण एका स्त्रीला दिलें आहे. कदाचित् अश्वमेधामध्यें मारलेल्या घोडयाजवळ ज्या पटराणीनें निजावयाचें असतें, ती ही असावी. त्या उता-याचा बरोबर अर्थ लागत नाहीं. परंतु वेबर आणि झिमर हे दोघेहि म्हणतात कीं, उत्तरकालीन वाङ्मयांतील मध्यदेशांतील पंचाल ह्यांची राजधानी जी काम्पील्य तिलाच काम्पील असें म्हणत असावे 'काम्पील-वासिनी' या सामासिक शब्दांत काम्पील म्हणजे वस्त्रविशेष असें सायणाचार्य म्हणतात.
३१महापुर.- यजुर्वेद संहितेंत आणि ब्राह्मण ग्रंथांत याचा अर्थ मोठा किल्ला असा आहे. बहुधां पुर आणि महापुर यांत जर कांही अंतर असेल तर तें आकारांत आहे. पुर म्हणजे नगर व महापुर म्हणजे मोठें शहर असाहि अर्थ घेतां येईल.
३२मृगाखर.- तैत्तिरीय संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण ३.९,१७,३ या ग्रंथांत 'हिस्त्र पशूंची गुहा' असा या शब्दाचा अर्थ दर्शविला आहे.
३३पद्.- अथर्ववेदांत व शतपथ ब्राह्मणांत (९.३,२,३) दिशा असा याचा अर्थ आहे. हा अर्थ 'चतुष्पाद प्राण्यांचा एक पाय म्हणजे एक चतुर्थांश या अर्थावरुन' आला असावा.
३४प्रदिव.-तिसरा व सर्वांत श्रेष्ठ असा जो स्वर्गलोक त्या स्वर्गाच्या अर्थानें अथर्ववेदांत हा शब्द आला आहे. याच ठिकाणीं पितर रहात असतात. कौषीतकी ब्राह्मणांत सप्तलोकामध्यें याला पांचवें स्थान दिलें आहे.
३५मर्यादा.- कोसल आणि विदेह या देशांमधील मर्यादेला उद्देशून हा शब्द शतपथ ब्राह्मणांत आला असून बहुधां हा अलंकारिक रीतीनें वापरलेला शब्द आहे. अथर्व वेदांत (६.८१,२) सायणांनीं या शब्दाचा जाया असा अर्थ केला आहे.
३६श्मशान.- ज्या ठिकाणीं मृत माणसांची हाडें पुरुन ठेवली जातात ती जागा असा याचा अर्थ आहे. अथर्ववेद व पुढील ग्रंथांत हा शब्द आला आहे. शतपथ ब्राह्मणांत (१३,८,१,१) असें म्हटलें आहे कीं जो अग्निचित् (अग्निचयन केलेला अग्निहोत्री) असेल त्याच्याकरितां (मयणोत्तर) जो चिनी करावयाचा तो लोष्ठचिति गांवाच्या बाहेर आग्नेयी दिशेस करीत असून तो वेदीच्या आकाराचा व उत्तरेच्या बाजूस उतरता असा करीत असत. प्राच्य लोक आपला चिति वर्तुलाकार करीत असत.
३७आश्रम.- 'निवासस्थान' हा शब्द बुद्धकालाच्या पूर्वीचें असें ज्याला खात्रीनें म्हणतां येईल अशा कोणत्याहि उपनिषदांत नाहीं. भारतीयांच्या आयुष्यांतील एक अवस्था अशा अर्थी याचा श्वेताश्वतर उपनिषदांत प्रथमच उपयोग केलेला आढळतो. छांदोग्य उपनिषदांतील एका वचनांत ब्रह्मवारी आणि गृहस्थ या दोन आश्रमांचा उल्लेख आहे आणि गृहस्थाला अध्ययनाचें फल म्हणून प्रजोत्पादन, योगसाधन, अहिंसा, यज्ञ, मोक्षसाधन हीं मिळतात असें सांगितलें आहे. दुस-या स्थळीं तीन आश्रमांचा उल्लेख आहे परंतु अनुक्रमानें नाहीं. ब्रह्मचा-यानें गृहस्थाश्रमी अथवा यति व्हावें अथवा जन्मभर गुरुच्या धरीं वास करावा; त्याचप्रमाणें यतीचे मरण अरण्यांत आणि यज्ञग्रामांत व्हावें असा निर्देश आहे. ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी व यति या तिघांमधील भेद दाखविण्याकरितां जो ब्रह्माला चिकटून राहतो तो उत्तम (ब्रह्मसंस्थ) असें म्हटलें आहे. बृहदारण्यक उपनिषदांत आत्मवेत्त्याची योग्यता अधीत, यज्ञकर्ता आणि दाता, अथवा यति ह्यांच्यापेक्षां जास्त मानली आहे; आणि दुस-या स्थलीं यज्ञकर्ता, दाता, आणि यति अथवा योगी यांच्यांत भेद दाखविला आहे. हें श्रेष्ठपद आणि आश्रमांतील भेद यामुळें एक चौथा आश्रम निघाला. कारण, गुहस्थाला वानप्रस्थाश्रम स्वीकारावा लागतो एवढेंच नाहीं. तर संन्यासिन् (भिक्षु, परिव्राजक) हा आश्रमहि स्वीकारावा लागतो. पहिला ब्रह्मचर्य आश्रम हा अद्यापहि अवश्यक म्हणून सांगितला जातो. परंतु तो आश्रम जन्मभर स्वीकारला जात नाहीं. कारण पहिल्याप्रमाणें आतां तसें राहतां येणें शक्य नाहीं.
३८आसन्दीवन्त्.- जनमेजयाच्या अश्वमेघांतील घोडा ज्या राजधानींत बांधला होता त्या जनमेजयाच्या राजधानीचें हें नांव आहे. दोघेहि प्रमाणभूत ग्रंथकार याच्या सत्यतेबद्दल गाथांचा उल्लेख करतात; परंतु तो विधि कोणच्या उपाध्यायानें पार पाडला याजबद्दल द्विधा मत आहे; शतपथ ब्राह्मणांत तो इन्द्रोत दैवाप शौनक होता असें आहे व ऐतरेय ब्राह्मणांत तो तुर:कावषेय होता असें म्हटलें आहे.
३९त्रिपुर.- याचा अर्थ 'सभोंवार तीन तट असलेला किल्ला' असा असून त्याचा उल्लेख संरक्षण करण्याचें ठिकाण अशा अर्थी ऐ. ब्राह्मण या ग्रंथांत आलेला आहे. पण ज्या ठिकाणीं हा शब्द आलेला आहे ती ब्राह्मणांतील आख्यायिका असल्यामुळें सभोंवती वर्तुलाकार भिंती असलेले किल्ले पूर्वी होते अशाबद्दल पुरावा म्हणून हे लेख कितपत विश्वसनीय मानितां येतील हें सांगणे कठिण आहे. ऐतरेय ब्राह्मण. २.११ या ठिकाणीं त्रिपुर याचा अर्थ 'तीन वेष्टणें' असा दिला आहे. तैत्तिरीय संहिता ६.२.३ या ठिकाणीं 'तिस्त्र: पुर:' असें पद आहे व त्याचा अर्थ तीन शहरें किंवा तीन किल्ले असा सायणाचार्यांनीं केला आहे.
४०दिर्घारण्य.-ऐतरेय व शतपथ ब्राह्मणांत हा शब्द हिंदुस्थानांतील विस्तीर्ण जंगलांस 'विस्तृत अरण्य' या अर्थानें लावला असल्याचें आढळतें. ऐतरेय ब्राह्मणांत असें म्हटलें आहे कीं, पूर्वेकडे गांवें पुष्कळ असून जवळ जवळ आहेत व पश्चिमेकडे ओसाड अरण्य आहे.
४१नगर.-वैदिक वाङ्मयांत या शब्दावरुन साधलेला नगरिन् हा शब्द विशेषनाम म्हणून आला आहे. पण तैत्तिरीय आरण्यकांत (१.११,१८) नगर हा शब्द शहर या अर्थानें आला आहे व पुढील ग्रंथांतहि याच अर्थानें आला आहे.
४२नाडपित्.-शतपथ ब्राह्मणांत भरताची जन्मभूमि या अर्थानें हा शब्द आला आहे. याचा अर्थ नाद-पिती म्हणजे भरताची आई असाहि समजला तरी चालेल. पण हें जरा अनिश्चित आहे.
४३नैतंद्यव.- पंचविंश ब्राह्मण व सूत्रग्रंथ यांत सरस्वती नदीवरील एक स्थल म्हणून याचा उल्लेख आलेला आहे.
४४नैमिश-नैमिषीय.- नैमिषारण्यांत राहणा-या लोकांनां हें नांव दिलेलें आहे. काठकसंहिता व ब्राह्मणग्रंथ यांत ''नैमिषारण्यांत राहणारे लोक विशेष पवित्र होते'' असें म्हटलें आहे. महाभारतांत हि ''हें काव्य नैमिषारण्यांतील ॠषींनां सांगितलें''असें म्हटलें आहे.
४५परिचक्रा.- शतपथ ब्राह्मणांत पंचाल शहराचें हें नांव असून वेबरच्या मतें हें कांपील शहराजवळचें एकचक्रा (ज्याला मागाहून हें नांव मिळालें तेंच) शहर असावें. याचा परिवक्रा असाहि पाठ आहे.
४६परिष्यंद.- (भोंवतालीं वाहणा-या पाण्यासह) शतपथ ब्राह्मणांत दोन ठिकाणीं (९.२,१,१९; १,१४) नदींतील बेट किंवा वालुकामय प्रदेश (भाटी) असा या शब्दाचा अर्थ आहे.
४७प्राश्रवण.- प्लक्षप्राश्रवण नामक स्थलाचा एक भाग. हें अवत्साराच्या बाबतींत उपयोगांत आणलेलें, कौषीतकि ब्राह्मणांतलें, (प्रश्रवणाचा वंशज या अर्थाचें) पितृवंशिक नांव आहे.
४८प्लक्षप्राश्रवण.-हें एका विवक्षित जागेचें नांव आहे. ही जागा सरस्वती नदी गुप्त झालेल्या जागेपासून ४४ दिवसांच्या अंतरावर आहे. पंचविंश ब्राह्मण व जैमिनीय उपनिषत् ब्राह्मण यांत याचा उल्लेख आलेला आहे. उत्तरकालीन ग्रंथांत भूमध्य हाच काय तो प्लक्षप्राश्रवणाच्या उत्तरेस प्रदेश आहे असें म्हटलें आहे. ॠग्वेदसूत्रांत ह्या प्रदेशाला प्लक्षप्रश्रवण असें म्हटलें असून यावरुन तें स्थळ सरस्वतीचें उगमस्थान असावें असें दिसतें; तिचें पुनदर्शन स्थान नव्हे; उगम स्थानासंबंधींच हा उल्लेख असावा असें दिसतें.
४९बद्वन्.-पंचविंश ब्राह्मणांतील एका वचनांत याचा अर्थ 'बांध-बांधाचा रस्ता' असा आहे. हा सामान्य रस्त्याहून बराच पक्का असतो असें म्हणतात.
५०मुनिमरण.- मुनीचें मरण. पंचविंश ब्राह्मणाप्रमाणें (१४,७) वैखानस मारले गेले ती जागा.
५१रैक्पर्ण.- हा शब्द अनेकवचनीं व पुल्लिंगी असून छांदोग्य उपनिषदांत महावृष देशांतील एका गांवाचें नांव म्हणून आलेला आहे असें झिमरचें मत आहे.
५२रोहितक-कूल.-पंचविंश ब्राह्मणांत हें एका ठिकाणाचें नांव आहे; व ह्याच ठिकाणच्या नांवावरुन एका सामाचें (मंत्राचें) नांव पडलेलें आहे. 'रोहितकुलीय' हें त्या सामाचें नांव आहे.
५३विनशन.-'अदृश्य होणें' ज्या ठिकाणीं सरस्वती नदी वाळूमध्यें अदृश्य झाली त्या जागेचें हें नांव असून हें पंचविंश ब्राह्मण व जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण यांत आलें आहे. हें पंजाबांतील पत्याळ जिल्ह्यांत आहे. सध्यां कच्छाच्या आखातास मिळणारी एक सरस्वती नदी आहे. त्रिवेणीसंगमांतील सरस्वती गुप्त आहे. विनशन म्हणून मानली जाणारी सरस्वती नदी सिंधूस मिळते असें पाश्चात्य पंडितांचें मत आहे व सतलज (शुतुद्रि) हीच सरस्वती होय असेंहि कांही पंडित म्हणतात. सरस्वतीविषयीं सामान्य दिग्दर्शन पुढीलप्रमाणें करतां येईल. (१) सरस्वती- कच्छाच्या आखातास मिळणारी; (२) त्रिवेणीसंगमांत गंगेस मिळणारी; (३) विनशन रुपानें सिंधूस मिळणारी; (४) जिला हल्लीं सतलज म्हणतात ती; (५) ॠग्वेद ७.५,१२ येथें उल्लेख असलेली.
५४वेतसवंत.- (वेत भरपूर असलेलें) पंचविंश ब्राह्मणांत एका स्थलाचें हें नांव आलें आहे. वेबर म्हणतो त्याप्रमाणें 'एकयावन् गांदम' या स्थळाचें हें नांव नव्हे.
५५संगविनी.- ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द आलेला आहे व त्यांत असें म्हटलें आहे कीं, भरतांचीं जनावरें संध्याकाळीं गोष्ठांत (कुरणांत) येत पण मध्यान्हाचे वेळीं संगविनीला येत. ह्यावरुन संगविनी म्हणजे निवा-याची जागा होय; व ह्या ठिकाणीं मध्याह्नकाळीं गायींची धार काढीत असत असें दिसतें.
५६संधि.- ह्याचा अर्थ शतपथ ब्राह्मणांत ज्या ठिकाणीं पृथ्वी व स्वर्ग संलग्न होतात तें ठिकाण म्हणजे क्षितिज असा आहे. प्रकाश व अंधार ह्याचें मीलन म्हणजे संध्याकाळ असा दुसराहि ह्या शब्दाचा अर्थ आहे.
५७साचीगुण.- ह्याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत आलेल्या एका मंत्रांत भरताच्या मुलुखांतलें एक ठिकाण म्हणून आलेला आहे. ल्युमनच्या मतें हें इंद्राचें विशेषण आहे. परंतु त्याच्या मनांत शाचीगु हा शब्द अभिप्रेत असावा व त्यावरुन त्यानें वरील अर्थ केला असावा.