प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

नातें गोतें

 अपत्यनामें [ ऋग्वेद ]

तनय -- हा शब्द ऋक्संहितेंत मुलेंबाळें किंवा वंशज अशा अर्थानें आलेला आहे, व त्याच ग्रंथांत कांही ठिकांणी तोक शब्दाबरोबर त्याचें विशेषण म्हणून आला आहें. तोक म्हणजें पुत्र, मुलें व तनय म्हणजे पौत्र किंवा नातू असा अर्थ घेण्याचें कांही एक कारण नाहीं.
तान्व -- ऋग्वेदाच्या एका संदिग्ध लेखांत ह्या शब्दाचा अर्थ औरस किंवा धर्मपत्नीजात मुलगा ( जो मुलगा आपला वारसा-ऋक्थ-आपल्या बहिणींस देत नाहीं तो ) असा आहें. निश्चित अर्थ या लेखांतून काढणें शक्य नसलें तरी येवढें म्हणतां येईल कीं पूर्वी बापाच्या मिळकतीवर मुलीचा हक्क नव्हतां. एखादी मुलगी जर अविवाहित राहिली तर तिच्या भावानें तिच्या हयांतीत तिची पोटापाण्याची व्यवस्था केली पाहिजें. पण ती स्वतंत्रपणें हक्क सांगून संपत्तीचा वाटा घेऊं शकत नसे.
तुच -- ऋग्वेदांत हा शब्द प्रसंगानें आला आहे, व त्याचा अर्थ मुलें असा आहें. तसाच तुज हा शब्द ह्याच अर्थानें जास्त वेळां आलेला आहें.
तोक -- तोक ह्याचा अर्थ मुलें किंवा वंशज असा ऋग्वेदांत व इतरत्र आलेला आहें. हा शब्द तनय शब्दाशी वारंवार जोडलेला असतो.
नपात -- वैदिक वाङमयात ह्याचा अर्थ वंशज व संहिता ग्रंथांत नातू असा आहें. ब्राह्मणांत ह्याचा अर्थ वंशज असा नसून नातू किंवा पणतू असाहि आहे ( पुत्रान, पौत्रान, नप्तृन् ). अथर्ववेदांत व नंतरच्या ग्रंथांत पौत्र या शब्दानें नातू असा अर्थ व्यक्त होतो. ऋग्वेदांत सुद्धां पणतू ह्या शब्दाकरितां प्रणपात व नातू ह्या शब्दाकरितां नपातू असे शब्द आहेत. नप्ती हा स्त्रीलिंग शब्द फक्त संहिताग्रंथांतच येतो व त्याचा अर्थ मुलगी असा होतो. वेदांत हा जो शब्दप्रयोग आलेला आहे त्यावरून मूळ शब्दाचा कसा प्रयोग होत होता ह्याची कल्पनां होत नाहीं.
प्रणपात् -- याचा ऋग्वेदांत पणतू असा अर्थ आहें.
वीर -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यामध्यें शक्तिमान व शूर मनुष्य या अर्थी हा शब्द आलेला आहे. एकवचनीं सामुदायिक अर्थानें ह्या शब्दावरून पुरूष, अपत्य असा बोध होतो. हा मुलगा वैदिक काळच्या लोकांनां मोठा स्पृहणीय वाटे. पंचविश ब्राह्मणांत एका राजाच्या आठवीरांचा उल्लेख आला आहे व ते राज्याचें आधारस्तभ असल्याचें वर्णन आहे.
शेषस् -- ऋग्वेदांत ह्याचा अपत्य असा अर्थ आला आहे.
सूनु -- ऋग्वेद व तदुत्तर सर्व ग्रंथांत हा शब्द पुत्र ह्या अर्थानें नेहमीं येतो. ह्याचा व्युत्पत्यर्थ जन्माला आलेला असा आहे व नंतर 'उत्पन्न केलेला ' असा झाला. पण सूनु ह्याचा उपयोग ऋग्वेदांमध्यें बापाच्या संबंधानें ब-याच वेळा व आईच्या संबंधानें फारच क्वचित आलेला आहे. उदाहरणार्थ बाप हा पुत्राला ( सूनुला ) सूपायन म्हणजे सहज जवळ जाण्याजोगा, असें वर्णन आलेलें आहें. दुस-या एका लेखांत पृथ्वीला आई या अर्थानें सूपायन हा शब्द वापरलेला आहे. व त्याठिकाणीं मुलगा या अर्थानें पुत्र हा शब्द आलेला आहे. ह्यावरून आईची सत्ता किती होती ह्या बद्दल काहींच अनुमान काढतां येणार नाहीं.
१०कना, कन्या -- ह्या दोन्ही शब्दांपैकी पहिलां क्वचित ऋग्वेदांत, परंतु दुसरा ऋग्वेदांनंतर सर्वसाधारण उपयोगांत आलेला आहें. याचा अर्थ 'कुमारी' अथवा 'तरूण स्त्री' असा आहे. कनीनका ह्या शब्दाचाहि अर्थ तसाच होतो किंवा डोळयांतील बुबुळ हा होतो हें सांगतां येत नाहीं. परंतु कनीनका किंवा कनीनिका ह्यांचा अर्थ बुबुळ असा उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ह्यांत मात्र निश्चित झाला आहें.
११जनि, जनी -- ह्या शब्दाचा अर्थ लग्नाची बायको असा आहे. सामान्यत: स्त्री या अर्थाबद्दल शंका आहे. कारण उषेला जेव्हां सुजनी असें म्हटलें आहे तेव्हां भार्या हा अर्थच विवक्षित असला पाहिजे. त्याचप्रमाणे डेलब्रुकनें दुसरा एक ऋग्वेदांतला उतारा घेतला आहे त्यांत 'पुत्रकृथेनजनय:' असा उल्लेख आहे. या ठिकाणी पुत्रजन्माचा संबंध असल्यामुळें जनय: याचा अर्थ बायको असाच घेतला पाहिजें. ज्याअर्थी हें शब्द अनेकवचनी येतात त्या अर्थी त्यांचा अर्थ कदाचित् लग्नाच्या बायका असा नसून उपस्त्रिया असाहि असूं शकेल अशी शंका कांही पाश्चात्य पण्डित काढतात. पण मॅकडोनेल असें म्हणतो की, हा अर्थ संभवत नाहीं, कारण ऋग्वेदांत 'पत्युर्जनित्वम' ( नव-याची बायको होणें ) व 'जनयो व पत्नी:' ( गृहस्वामिनी स्त्रियाप्रमाणे ), वगैरे लग्नाचा संबंध दाखविणारी पुष्कळ वाक्यें आलेंली आहेत. यम व यमी यांच्या संवादांत फक्त जनी हा एकवचनी शब्द आलेला आहें.
१२जनितृ व जनित्री -- हें शब्द नेहमींचें आहेत. तें ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत बाप ( उत्पादक ) व आई  ( प्रसविणारी ) ह्याबद्दल आलेंलें आहेंत.
१३ जन्मनः- ह्या शब्दांत ऋग्वेदामध्ये दोन ठिकाणी नातेवाईक लोक हा अर्थ असावा. दुस-या स्थली नातेवाईक हा अर्थ समुच्चयाने घ्यावा लागतो.
१४जन्य -- ऋग्वेदांत व अथर्ववेदांत ह्या शब्दाचा 'करवला' हा विशिष्ट अर्थ आहें.
१५जामातृ -- जावई या अर्थी हा शब्द ऋग्वेदांत फार थोडे वेळां आला आहें. ऋग्वेदांत विजामातृ असा एक शब्द आला आहें. व त्याचा अर्थ अप्रिय जावई म्हणजे एक तर बायको करिंतां पुरेशी रक्कम न देणारा किंवा इतर दोष अंगीं असल्यामुळें बायकोबद्दल ज्याला पैसे भरावें लागतात तो असा होतो. ऋग्वेदांत जावई व सासरा ह्यांचे संबंध असल्याचा उल्लेख आलेलें आहेत.
१६जामि -- ह्या शब्दाचा मूळचा अर्थ एक रक्ताचा किंवा सपिंड असा असून अनेक वेळा स्वसृ--बहीण अशा अर्थानेंहि आला आहें. पहिल्या अर्थानें अथर्वांत एके ठिकाणी हा शब्द आला आहें. 'उदाहरणार्थ 'अभ्रातर इव जामय:'. ऐतरेय ब्राह्मणांत एक वाद चालला असतां हा शब्द आलेला आहें. हा वाद एका व्रतांत राका ( भगिनी ) व देवपत्नी ह्यामध्यें कोणाला प्रथम हवि द्यावा ह्याबद्दल आहें. एका पक्षाचें असें म्हणणें आहे की, बहिण ही बायकोपेक्षां अधिक पसंत करणें बरें ( जाम्यै वै पूर्व पेयम् ) कारण बहीण भाऊ हें एका रक्ताचें असतात व बायको ही 'अन्यतोदार्या' असल्यामुळें ती आपल्या नव-याशीं एकरक्त होऊं शकत नाहीं. नपुसंकलिंगी जामि ह्या शब्दाचा अर्थ नातें असा आहे. व तो ऋग्वेदांत आला आहें.
१७जाया -- ह्या शब्दांचा अर्थ लग्नाची बायको असा आहे. पत्नी व जाया ह्या शब्दांत असा फरक आहे की जाया म्हटलीं म्हणजें ती नव-याच्या प्रेमाचा विषय असते; कारण पुढें वंश चालविण्यास ती कारणीभूत होते, असा अर्थ पत्नी या शब्दावरून होत नाहीं. जाया हा शब्द एखाद्या ब्राह्मणांच्या किंवा द्यूतकाराच्या बायकोस ऋग्वेदांत लाविला आहे व ह्या शब्दाला पति हा शब्दहि वारंवार जोडलेला ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत आढळून येतो. दुसरा एक भेद पत्नी व जाया ह्या दोन शब्दांत असा आहे की ज्या वेळीं बायको यज्ञामध्यें सहधर्मचरिणी असते त्या वेळीं तिला पत्नी म्हटलेंलें आहें. ती जेव्हां तशीं नसतें तेव्हां तिला जाया म्हणतात. एवढें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे की, ह्या दोन शब्दांतील भेद सापेक्ष आहें. कारण एका ग्रंथांत मनूच्या बायकोला जाया तर दुस-या ग्रंथांत पत्नीं असें म्हटलें आहें. पुढें पुढें जाया ह्या शब्दाच्या ऐवजी दारा हा शब्द आला आहे.
१८जास्पति -- ऋग्वेदांत 'कुटुंबाचा मुख्य' अशा अर्थानें हा शब्द आलेला आहें. ह्या शब्दापासून झालेला भाववाचक शब्द 'जास्पत्य' ( मुलावरील आधिपत्य ) हा सुद्धां ऋग्वेदांत आला आहें.
१९ज्ञाति -- ( पुल्लिंगी ) ह्याचा मूळ अर्थ 'परिचय' असा होता असें दिसतें. पण ऋग्वेदांत व पुढीलं ग्रंथांत या शब्दाचा अर्थ नातेवाईक असा होऊं लागला. विशेषत: बापाच्या बाजूनें एका रक्ताचा संबंध असलेला असा अर्थ जरी हाच अर्थ प्रत्येक ठिकाणी अभिप्रेत नव्हता तरी प्रचारांत येऊं लागला. हाच अर्थ विशेष लोकप्रसिद्ध होण्याचें कारण वैदिक समाजांतली मूळपुरूषानुबद्ध कुटुंबपद्धति हें होय.
२०ज्येष्ठ -- ह्याचा नेहमीचा अर्थ 'सर्वात मोठा' असा आहे; व विशिष्ट अर्थ ऋग्वेदांमध्यें 'सर्वांत थोरला भाऊं' असा आहें. ह्याचा दुसरा एक अर्थ 'सर्वात वडील मुलगा' असा आहे. हा अर्थ वरील अर्थाचाच दुसरा प्रकार आहें.
२१तत -- ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत बापाकरितां म्हणून हें लाडकें नांव आलेंलें आहें.
२२दं-पति -- ऋग्वेदांत 'गृहाचा मालक' अशा अर्थानें हा शब्द आलेला अहे. पण बहुतकरून हा शब्द द्विवचनीं आला असून त्याचा अर्थ गृहस्वामी व गृहस्वामिनी असा आहें. ह्यावरून पूर्वीच्या स्त्रियांच्या दर्जाची कल्पना येते.