प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.     
               
नक्षत्रांचीं नांवें.- ॠग्वेदांत आलेल्या दोन नांवाखेरीज अथर्व- अथर्ववेदामध्यें अगोदरच्या ज्येष्ठघ्नी (मागाहून ज्याला जेष्ठा हें नांव पडलें) व विचृतौ (ज्यांचा निकट संबंध आहे असें म्हटलें आहे), त्याच प्रमाणें रेवती (अनेक वचनी) व कृत्तिका यांची नांवे आली आहेत. 'अग्न्याधान' या समारंभाला योग्य काल अशा संबंधानें काठकसंहिता, मैत्रायणी संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यांमध्यें कृतिका, रोहिणी, फल्गुनी, हस्त ही नांवे आली आहोत. तैत्तिरीय  ब्राह्मणांत पुनर्वसू हें नवीन नांव आलेलें आहे व अधिक खुलाशांत पूर्वाफल्गुनी वगळून त्याच्या बद्दल उत्तराफल्गुनीचा उल्लेख केलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत मृगशीर्ष व चित्रा यांचा उल्लेख आला आहे. उलटपक्षी पुनराधानाला अनुकूल म्हणून पुनर्वसू नक्षत्र सर्व ग्रंथांनाच मान्य आहे. हें अग्नीचें पुनराधान पहिल्या अग्नीच्या योगानें यज्ञ करणा-याचा मुख्य उद्देश (त्याची भरभराट) ज्या वेळी साध्य होत नाही अशा वेळी करावयाचें असतें. काठकसंहितेच्या मतें अनूराधा हेंहि, नक्षत्र पुनराधानास योग्य आहे. अग्निचयन समारंभाच्या वेळी ज्या विटा मांडावयाच्या असतात त्यांत नक्षत्रांइतक्याहि कांही असतात. या विटांची संख्या ७५६ असते व ही संख्या २७ मुख्य नक्षत्रें व २७ गौण नक्षत्रें यांच्या गुणाकारा इतकी (हा गुणाकार ७२९ असा न समजतां ७२० समजावयाचा) समजावयाची व या ७२० संख्येत अधिक महिन्याचे ३६ दिवस मिळवावयाचे म्हणजे एकंदर संख्या ७५६ होते. हें जें विटांचे संख्यावर्णन (शतपथ १०.५,४,५) आलेले आहे त्यावरुन निश्चित अशी कांहीच माहिती मिळत नाही. पण या समारंभासंबंधानें यजुर्वेद संहितांमध्यें २७ नक्षत्रें आलेलीं आहेत व त्यांच्या याद्या सविस्तर खालीं दिल्या प्रमाणें आहेत.

 यजुर्वेद संहितांमध्यें २७ नक्षत्रें आलेलीं आहेत
व त्यांच्या याद्या सविस्तर खालीं

तैत्तिरीय ब्राह्मणांत जी नक्षत्रांची यादी आली आहे ती संहिता ग्रंथांत आलेल्या यादीशीं सामान्यत: जुळतें. ती यादी अशी.- कृत्तिका: रोहिणी, इन्वका:, बाहू (द्विव.) तिष्य, आश्लेषा:, मघा:,पूर्वेफल्गुनी, उत्तरे-फल्गुनी, हस्त, चित्रा, निष्टया, विशाखे, अनूराधा:, रोहिणी, मूलबर्हणी, पूर्वा अशाढा:, उत्तरा अशाढा: श्रोणा, श्रविष्ठा:, शतभिषज् पूर्वेप्रोष्ठपदा:, उत्तरेप्रोष्ठपदा:, रेवती, अश्वयुजौ, अपभरणी: इ. मागाहून झालेल्या ग्रंथांतील या यादींत २८ संख्या आलेली आहे व १४ संख्येनंतर पूर्णिमाहि आलेली आहे व सौरमासाशीं (३० दिवसांच्या) चांद्र (नक्षत्र) मासाचें साम्य आणण्याकरितां २८ संख्येनंतर अमावास्याहि घातलेली आहे. या मागाहून दिलेल्या यादींतील नांवे संहिताग्रंथांत दिलेल्या यादींतील नांवांशी पुढे दिलेले अपवाद खेरीजकरुन जुळतात. कृत्तिका नक्षत्राचे सात तारे. त्यांची नांवे अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती, व चुपुणीका अशीं आहेत. ही नांवे तैत्तिरीय व काठक संहितांमध्यें सुद्धां आलेलीं आहेत. मृगशीर्ष व इन्वका यांचाहि उल्लेख आलेला आहे. नंतर आर्द्रा, पुनर्वसु, तिष्य, आश्रेषा:, मघा:, (या शिवाय अनघा:, अगदा: व अरुंधती:) यांचाहि उल्लेख आलेला आहे. फल्गुन्य: (पण इतरत्र फल्गुन्यौ) हस्त, चित्रा, निष्टया, विशाखे, अनूराधा:, ज्येष्ठा, मूल, अशाढा:, अभिजित्, श्रोणा, श्रविष्ठा:, शतभिषज्, प्रोष्ठपदा:, प्रोष्ठपदा:, रेवती, अश्वयुजौ, भरण्य: अपभरणी सुद्धां. अभिजित् हें नांव ब्राह्मणग्रंथाच्या पूर्व भागांत हि आलेलें आहे पण तें कदाचित् प्रक्षिप्त असावें. वेबरचा असा मुद्दा आहे की यादीत अभिजित् हें नांव अनवश्यक आहे कारण ब्राह्मणग्रंथांत याचा उल्लेख २८ वें नक्षत्र म्हणून आलेला आहे. पण हा मुद्दा बराच लंगडा पडतो कारण मैत्रायणी संहितेंतील (२.१३,२.) यादीत अभिजित् धरुन २८ नक्षत्रांचीं नांवें आलेलीं आहेत व अगदीं शेवटी निराळें ब्राह्मण या नांवाचें एक नक्षत्र आलेले आहे (ही गोष्ट वेबर यास कदाचित् माहीत नसावी). तैत्तिरीय ब्राह्मणांत (१.५.२.७) नक्षत्रांचे दोन गट केले आहेत. एक गट देवनक्षत्रांचा, त्यांत १ ल्या पासून १४ व्यापर्यंत नक्षत्रें आलेली आहेत. दुस-या गटांत १५ व्यापासून २७ व्यापर्यंत नक्षत्रें आलेलीं आहेत व त्यांत अभिजित् नक्षत्र वगळलें आहे. या दुस-या गटाचें नांव यमनक्षत्रें असें आहे. ही नक्षत्रांची विभागणी त्या ग्रंथांतील तिस-या भागांत दिलेल्या विभागणीशीं जुळते. या ठिकाणीं पौर्णिमेचा व अमावास्येचा दिवस हे नक्षत्राबरोबर दिलेले आहेत. या ब्राह्मण ग्रंथांत पहिल्या, पौर्णिमेच्या दिवसांनां सद्दश असलेल्या, नक्षत्रांना दक्षिण असें मानिलें आहे व अमावास्येच्या दिवसांना सद्दश असलेल्या नक्षत्रांना उत्तर असें मानिलें आहे. पण अशा त-हेच्या कल्पनेचा वस्तुस्थितीशीं कांही संबंध नाही. अथर्व वेदाच्या १९ व्या कांडांत एक नक्षत्रांची यादी आलेली आहे. त्या यादीत अभिजिताचेंहि नांव आहे. यांत आलेली नावें अशी.- कृत्तिका, रोहिणी, मृगशिरस्, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा:, पूर्वा फल्गुन्यौ, हस्त, चित्रा, स्वाति, (पुल्लिंगी) विशाखे, अनुराधा, ज्येष्ठा, मूला, पूर्वा अशाढा:, उत्तरा, अशाढा:, अभिजित्, श्रवण, श्रविष्ठा:, शतभिषज्, द्वयाप्रोष्ठपदा, रेवती, अश्वयुजौ, भरण्य :.