प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
नातें गोतें
अपत्यनामें [ ऋग्वेद ] |
१तनय -- हा शब्द ऋक्संहितेंत मुलेंबाळें किंवा वंशज अशा अर्थानें आलेला आहे, व त्याच ग्रंथांत कांही ठिकांणी तोक शब्दाबरोबर त्याचें विशेषण म्हणून आला आहें. तोक म्हणजें पुत्र, मुलें व तनय म्हणजे पौत्र किंवा नातू असा अर्थ घेण्याचें कांही एक कारण नाहीं.
२तान्व -- ऋग्वेदाच्या एका संदिग्ध लेखांत ह्या शब्दाचा अर्थ औरस किंवा धर्मपत्नीजात मुलगा ( जो मुलगा आपला वारसा-ऋक्थ-आपल्या बहिणींस देत नाहीं तो ) असा आहें. निश्चित अर्थ या लेखांतून काढणें शक्य नसलें तरी येवढें म्हणतां येईल कीं पूर्वी बापाच्या मिळकतीवर मुलीचा हक्क नव्हतां. एखादी मुलगी जर अविवाहित राहिली तर तिच्या भावानें तिच्या हयांतीत तिची पोटापाण्याची व्यवस्था केली पाहिजें. पण ती स्वतंत्रपणें हक्क सांगून संपत्तीचा वाटा घेऊं शकत नसे.
३तुच -- ऋग्वेदांत हा शब्द प्रसंगानें आला आहे, व त्याचा अर्थ मुलें असा आहें. तसाच तुज हा शब्द ह्याच अर्थानें जास्त वेळां आलेला आहें.
४तोक -- तोक ह्याचा अर्थ मुलें किंवा वंशज असा ऋग्वेदांत व इतरत्र आलेला आहें. हा शब्द तनय शब्दाशी वारंवार जोडलेला असतो.
५नपात -- वैदिक वाङमयात ह्याचा अर्थ वंशज व संहिता ग्रंथांत नातू असा आहें. ब्राह्मणांत ह्याचा अर्थ वंशज असा नसून नातू किंवा पणतू असाहि आहे ( पुत्रान, पौत्रान, नप्तृन् ). अथर्ववेदांत व नंतरच्या ग्रंथांत पौत्र या शब्दानें नातू असा अर्थ व्यक्त होतो. ऋग्वेदांत सुद्धां पणतू ह्या शब्दाकरितां प्रणपात व नातू ह्या शब्दाकरितां नपातू असे शब्द आहेत. नप्ती हा स्त्रीलिंग शब्द फक्त संहिताग्रंथांतच येतो व त्याचा अर्थ मुलगी असा होतो. वेदांत हा जो शब्दप्रयोग आलेला आहे त्यावरून मूळ शब्दाचा कसा प्रयोग होत होता ह्याची कल्पनां होत नाहीं.
६प्रणपात् -- याचा ऋग्वेदांत पणतू असा अर्थ आहें.
७वीर -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यामध्यें शक्तिमान व शूर मनुष्य या अर्थी हा शब्द आलेला आहे. एकवचनीं सामुदायिक अर्थानें ह्या शब्दावरून पुरूष, अपत्य असा बोध होतो. हा मुलगा वैदिक काळच्या लोकांनां मोठा स्पृहणीय वाटे. पंचविश ब्राह्मणांत एका राजाच्या आठवीरांचा उल्लेख आला आहे व ते राज्याचें आधारस्तभ असल्याचें वर्णन आहे.
८शेषस् -- ऋग्वेदांत ह्याचा अपत्य असा अर्थ आला आहे.
९सूनु -- ऋग्वेद व तदुत्तर सर्व ग्रंथांत हा शब्द पुत्र ह्या अर्थानें नेहमीं येतो. ह्याचा व्युत्पत्यर्थ जन्माला आलेला असा आहे व नंतर 'उत्पन्न केलेला ' असा झाला. पण सूनु ह्याचा उपयोग ऋग्वेदांमध्यें बापाच्या संबंधानें ब-याच वेळा व आईच्या संबंधानें फारच क्वचित आलेला आहे. उदाहरणार्थ बाप हा पुत्राला ( सूनुला ) सूपायन म्हणजे सहज जवळ जाण्याजोगा, असें वर्णन आलेलें आहें. दुस-या एका लेखांत पृथ्वीला आई या अर्थानें सूपायन हा शब्द वापरलेला आहे. व त्याठिकाणीं मुलगा या अर्थानें पुत्र हा शब्द आलेला आहे. ह्यावरून आईची सत्ता किती होती ह्या बद्दल काहींच अनुमान काढतां येणार नाहीं.
१०कना, कन्या -- ह्या दोन्ही शब्दांपैकी पहिलां क्वचित ऋग्वेदांत, परंतु दुसरा ऋग्वेदांनंतर सर्वसाधारण उपयोगांत आलेला आहें. याचा अर्थ 'कुमारी' अथवा 'तरूण स्त्री' असा आहे. कनीनका ह्या शब्दाचाहि अर्थ तसाच होतो किंवा डोळयांतील बुबुळ हा होतो हें सांगतां येत नाहीं. परंतु कनीनका किंवा कनीनिका ह्यांचा अर्थ बुबुळ असा उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ह्यांत मात्र निश्चित झाला आहें.
११जनि, जनी -- ह्या शब्दाचा अर्थ लग्नाची बायको असा आहे. सामान्यत: स्त्री या अर्थाबद्दल शंका आहे. कारण उषेला जेव्हां सुजनी असें म्हटलें आहे तेव्हां भार्या हा अर्थच विवक्षित असला पाहिजे. त्याचप्रमाणे डेलब्रुकनें दुसरा एक ऋग्वेदांतला उतारा घेतला आहे त्यांत 'पुत्रकृथेनजनय:' असा उल्लेख आहे. या ठिकाणी पुत्रजन्माचा संबंध असल्यामुळें जनय: याचा अर्थ बायको असाच घेतला पाहिजें. ज्याअर्थी हें शब्द अनेकवचनी येतात त्या अर्थी त्यांचा अर्थ कदाचित् लग्नाच्या बायका असा नसून उपस्त्रिया असाहि असूं शकेल अशी शंका कांही पाश्चात्य पण्डित काढतात. पण मॅकडोनेल असें म्हणतो की, हा अर्थ संभवत नाहीं, कारण ऋग्वेदांत 'पत्युर्जनित्वम' ( नव-याची बायको होणें ) व 'जनयो व पत्नी:' ( गृहस्वामिनी स्त्रियाप्रमाणे ), वगैरे लग्नाचा संबंध दाखविणारी पुष्कळ वाक्यें आलेंली आहेत. यम व यमी यांच्या संवादांत फक्त जनी हा एकवचनी शब्द आलेला आहें.
१२जनितृ व जनित्री -- हें शब्द नेहमींचें आहेत. तें ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत बाप ( उत्पादक ) व आई ( प्रसविणारी ) ह्याबद्दल आलेंलें आहेंत.
१३ जन्मनः- ह्या शब्दांत ऋग्वेदामध्ये दोन ठिकाणी नातेवाईक लोक हा अर्थ असावा. दुस-या स्थली नातेवाईक हा अर्थ समुच्चयाने घ्यावा लागतो.
१४जन्य -- ऋग्वेदांत व अथर्ववेदांत ह्या शब्दाचा 'करवला' हा विशिष्ट अर्थ आहें.
१५जामातृ -- जावई या अर्थी हा शब्द ऋग्वेदांत फार थोडे वेळां आला आहें. ऋग्वेदांत विजामातृ असा एक शब्द आला आहें. व त्याचा अर्थ अप्रिय जावई म्हणजे एक तर बायको करिंतां पुरेशी रक्कम न देणारा किंवा इतर दोष अंगीं असल्यामुळें बायकोबद्दल ज्याला पैसे भरावें लागतात तो असा होतो. ऋग्वेदांत जावई व सासरा ह्यांचे संबंध असल्याचा उल्लेख आलेलें आहेत.
१६जामि -- ह्या शब्दाचा मूळचा अर्थ एक रक्ताचा किंवा सपिंड असा असून अनेक वेळा स्वसृ--बहीण अशा अर्थानेंहि आला आहें. पहिल्या अर्थानें अथर्वांत एके ठिकाणी हा शब्द आला आहें. 'उदाहरणार्थ 'अभ्रातर इव जामय:'. ऐतरेय ब्राह्मणांत एक वाद चालला असतां हा शब्द आलेला आहें. हा वाद एका व्रतांत राका ( भगिनी ) व देवपत्नी ह्यामध्यें कोणाला प्रथम हवि द्यावा ह्याबद्दल आहें. एका पक्षाचें असें म्हणणें आहे की, बहिण ही बायकोपेक्षां अधिक पसंत करणें बरें ( जाम्यै वै पूर्व पेयम् ) कारण बहीण भाऊ हें एका रक्ताचें असतात व बायको ही 'अन्यतोदार्या' असल्यामुळें ती आपल्या नव-याशीं एकरक्त होऊं शकत नाहीं. नपुसंकलिंगी जामि ह्या शब्दाचा अर्थ नातें असा आहे. व तो ऋग्वेदांत आला आहें.
१७जाया -- ह्या शब्दांचा अर्थ लग्नाची बायको असा आहे. पत्नी व जाया ह्या शब्दांत असा फरक आहे की जाया म्हटलीं म्हणजें ती नव-याच्या प्रेमाचा विषय असते; कारण पुढें वंश चालविण्यास ती कारणीभूत होते, असा अर्थ पत्नी या शब्दावरून होत नाहीं. जाया हा शब्द एखाद्या ब्राह्मणांच्या किंवा द्यूतकाराच्या बायकोस ऋग्वेदांत लाविला आहे व ह्या शब्दाला पति हा शब्दहि वारंवार जोडलेला ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत आढळून येतो. दुसरा एक भेद पत्नी व जाया ह्या दोन शब्दांत असा आहे की ज्या वेळीं बायको यज्ञामध्यें सहधर्मचरिणी असते त्या वेळीं तिला पत्नी म्हटलेंलें आहें. ती जेव्हां तशीं नसतें तेव्हां तिला जाया म्हणतात. एवढें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे की, ह्या दोन शब्दांतील भेद सापेक्ष आहें. कारण एका ग्रंथांत मनूच्या बायकोला जाया तर दुस-या ग्रंथांत पत्नीं असें म्हटलें आहें. पुढें पुढें जाया ह्या शब्दाच्या ऐवजी दारा हा शब्द आला आहे.
१८जास्पति -- ऋग्वेदांत 'कुटुंबाचा मुख्य' अशा अर्थानें हा शब्द आलेला आहें. ह्या शब्दापासून झालेला भाववाचक शब्द 'जास्पत्य' ( मुलावरील आधिपत्य ) हा सुद्धां ऋग्वेदांत आला आहें.
१९ज्ञाति -- ( पुल्लिंगी ) ह्याचा मूळ अर्थ 'परिचय' असा होता असें दिसतें. पण ऋग्वेदांत व पुढीलं ग्रंथांत या शब्दाचा अर्थ नातेवाईक असा होऊं लागला. विशेषत: बापाच्या बाजूनें एका रक्ताचा संबंध असलेला असा अर्थ जरी हाच अर्थ प्रत्येक ठिकाणी अभिप्रेत नव्हता तरी प्रचारांत येऊं लागला. हाच अर्थ विशेष लोकप्रसिद्ध होण्याचें कारण वैदिक समाजांतली मूळपुरूषानुबद्ध कुटुंबपद्धति हें होय.
२०ज्येष्ठ -- ह्याचा नेहमीचा अर्थ 'सर्वात मोठा' असा आहे; व विशिष्ट अर्थ ऋग्वेदांमध्यें 'सर्वांत थोरला भाऊं' असा आहें. ह्याचा दुसरा एक अर्थ 'सर्वात वडील मुलगा' असा आहे. हा अर्थ वरील अर्थाचाच दुसरा प्रकार आहें.
२१तत -- ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत बापाकरितां म्हणून हें लाडकें नांव आलेंलें आहें.
२२दं-पति -- ऋग्वेदांत 'गृहाचा मालक' अशा अर्थानें हा शब्द आलेला अहे. पण बहुतकरून हा शब्द द्विवचनीं आला असून त्याचा अर्थ गृहस्वामी व गृहस्वामिनी असा आहें. ह्यावरून पूर्वीच्या स्त्रियांच्या दर्जाची कल्पना येते.
२३दुहितृ -- ऋग्वेदांपासूनच्या ग्रंथांत मुलगी या अर्थी हा शब्द आहें. हा शब्द 'दुह्' म्हणजें दूध काढणें या शब्दापासून आलेला आहें, व याचा अर्थ मुलास खाऊ घालून वाढविणारी असा आहें. याचा पूर्वीच्या काळीं दूध काढण्याचें काम करणारी कुटुंबातील एक स्त्री किंवा 'वासरू' असा अर्थ कोणी करतात तो चुकीचा आहें.
२४देवर-देवृ -- हा शब्द वैदिक वाङमयात क्वचितच येतो व त्याचा अर्थ दीर असा आहें. ह्याचा समावेश नणंदांमध्यें केला आहे, अर्थात् ज्यांवर भावजयीचा अधिकार चालतो अशा ह्या नणंदा होत. आणखी असें आहे की, भावजयीनें तिचा नवरा हयात असतांना त्या दिराशी प्रेमानें व मित्रत्वानें वागलें पाहिजे. तिचा नवरा मेला तर तिच्याशीं दिरानें रममाण होऊन आपल्या भावाकरितां तिच्या पोटी पुत्र उत्पन्न करावयाचा असतो. देवृ शब्दास सदृश असा बायकोच्या भावास निराळा शब्द आलेला नाहीं.
२५नना -- आईबद्दल हे नांव आलेंलें आहें. त्याचप्रमाणें तत हें बापाबद्दल आलेंलें आहें. हे दोन्ही शब्द ऋग्वेदाच्या एका ऋचेंत आढळून येतात, व या ऋचेंत कवीच्या आई-बापाचें धंदे वर्णिलें आहेंत.
२६ननांदृ -- ऋग्वेदांत हा शब्द एकदांच आला आहे. सायणाचार्यांच्या मतें ह्याचा अर्थ ' भावजयीचा ताबा असलेली नणंद' असा आहे व हाच खरा दिसतो. कारण ऐतरेय ब्राह्मणांत अविवाहित व आपल्या भावाच्या येथें राहिलेल्या स्त्रीचें अशाच प्रकारचें वर्णन आलें आहें.
२७नह् -- ऋग्वेदांत एका ठिकाणी आलेल्यां 'नद्भ्य:' या पदांत मूळ शब्द नह् हा आहें. असें रॉथ व ग्रासमन यांचे मत आहे. व नह् याचें नद्भ्य: हें चतुर्थीचें रूप् आहे. सीजच्या मतानें याचा बहिणींची मुलें असा अर्थ होतो. परंतु या चतुर्थ्यंत पदाचा 'नातवांना' असा अर्थ करणें बरें.
२८नारी -- 'स्त्री'. ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द वारंवार आलेला आहे. ऋग्वेदांत याचा लग्नाची बायको असा अर्थ आहे. कारण अनेक ठिकाणी हा शब्द लग्नाचे संबंध व्यक्त करण्यासाठीच आला आहे. उत्तरकालीन वैदिक वाङमयात हा शब्द फारसा आलेला नाहीं पण कधीं कधीं याच अर्थाने आलेलां आहे. डेलब्रुक म्हणतो की, या शब्दावरून वैवाहिक संबंध दाखविले जात नसून नर व नारी मिळून बनणा-या मनुष्यजातींपैकीं स्त्री जात असा या शब्दाचा अर्थ आहें.
२९पति पत्नी -- सेंटपीटर्सबर्ग कोशांत या शब्दाचा प्रथम यजमान व यजमानीण असा अर्थ होता व नंतर नवरा व बायको असा झाला असें विवेचन केलें आहें. स्त्री-पुरूषसंबंध वैदिककालीं कसे होते हें आपण पाहूं.
बालविवाह -- पूर्वी वेदिक कालांत पुरूष व स्त्री पूर्णपणें वयांत आल्यावरच त्यांची लग्नें होत असत. या गोष्टीस पुरावा म्हणजें वैदिक ग्रंथांत अविवाहित स्त्रियाबद्दलचें आलेंलें अनेक उल्लेख होत. या अविवाहित स्त्रिया बापाच्या घरीं वाढत असत. आणि लग्न होऊन चांगला नवरा मिळावा यासाठी स्वत:स नटवीत असत. त्याच प्रमाणें पुरूषांनी व स्त्रियांनी एकमेकांना आपणावर प्रेम करण्यास भाग पाडण्याकरितां अथर्ववेदामधल्या मंत्राचा ( एका कथेंत उपयोगांत आणिलेल्या तोडग्याचा ) उपयोग करण्याची चाल होती. खुद्द ऋग्वेदांतच एका प्रियकारानें आपल्या प्रेमविषयक स्त्रीची भेट घेण्याचें वेळी तिच्या घरच्या सर्व मंडळीस निद्रावश करण्याकरितां मंत्रप्रयोग केला असल्याचा उल्लेख आहें. बालवधूंच्या विवाहाचा उल्लेख प्रथम सूत्रग्रंथांत आलेला आहे. तरीपण रजोदर्शन होण्याच्या अगोदर किती मुलींचा विवाह होत असें हें सूत्रग्रंथावरून नक्की ठरवितां येणें कठिण आहे. लग्नाचें जे विधी आहेत त्यांवरून सुद्धां लग्न म्हणजे स्मृतिग्रंथाप्रमाणे बाहुलाबाहुलींचे लग्न नव्हें तर खरें खुरें लग्न होय. कारण लग्नांतील मुख्य विधि म्हणजे वधूला तिच्या नव-याच्या घरी नेऊन पोचवावयाची व तेथें त्या दोघा वधूवरांनी एक शय्या करावयाची हा होय.
लग्नसंबंधी बंधनें -- पूर्वी कोणत्या अटीवर विवाह होत असत हें निश्चित सांगणें कठिण आहें. यम व यमी यांचा ऋग्वेदांत जो संवाद आलेला आहे. त्यावरून बहीण व भाऊ यांच्यामध्यें विवाह होत नसत हें स्पष्ट दिसतें. पूर्वी बहीणभावांत लग्नें होत असून पुढें ही चाल बंद पडली असें जें वेबरचें मत तें सर्वस्वी चुकींचे आहे. गोभिल सूत्रांत आईच्या व बापाच्या सोळा पिढयांत एकमेकांशी विवाह करणें निषिद्ध मानलें आहे. पण शतपथ ब्राह्मणांत तिस-या किंवा चवथ्या पिढींत लग्न लावण्याची परवानगी दिली आहे. तिसरी पिढी हरिस्वामिन्च्या मतानें कण्वसंमत व चवथी सौराष्ट्रसंमत होय. दाक्षिणात्य लोकांत मामाच्या मुलींशीं किंवा आतेच्या मुलाशीं लग्न लावण्याची चाल होती. त्यावेळी वरील गोभिलसूत्रांतील निषेध विशेष मानिला जात नसें असें दिसतें. तरी पण विषमगोत्रविवाह बरेच होत असत. त्याचप्रमाणें जात हीं लग्नाचे बाबतींत विशेष गणली जात नसे. कारण धर्मसूत्रामध्येंच अन्यवर्णविवाह संमत मानिले आहेत. उदाहरणार्थ ब्राह्मणांला खालील वर्णापैकी कोणत्याहि वर्णातील स्त्रींशीं विवाह करण्याची मुभा होती. त्याचप्रमाणें क्षत्रियानें आपल्या जातींतील अथवा खालच्या वर्णातीलं स्त्री विवाहास पसंत करावी आणि वैश्यानेहिं वैश्य व शुद्र या जातींतील स्त्री विवाहास पसंत करावी अशी मोकळींक होती. ही अनुलोम विवाहपद्धति होय. याच्या उलट खालील जातींतील पुरूषानें वरच्या जातींतील स्त्रींशीं लग्न करणें ही प्रतिलोम पद्धति मात्र प्रचारांत नव्हतीं. पुढें पुढें वरच्या वर्णांना शुद्र स्त्री पूर्णपणे विवाहास अयोग्य मानली जाऊं लागली. असे मिश्रविवाह महाभारतांत पुष्कळ झालेंलें आढळतात. बृहद्देवतेंत ते सामान्य नियम म्हणून गणलें आहेत. थोरल्या भावाचें किंवा बहिणीचें लग्न झाल्याशिवाय धाकटया भावाचें अथवा बहिणीचें लग्न होणें शिष्टसंमत गणलें जात नव्हतें. उत्तरकालीन संहिता व ब्राह्मणग्रंथांत अशा शिष्टासंमत विवाहितांची नांवे आलेंली आहेत व असे लोक पापाचें वाटेकरी होतात असें म्हटले आहें. अशा विवाहितांची नांवे म्हणजें 'परिविविदान' किंवा 'अग्रेदधु: ( धाकटा असून थोरल्या भावाच्या अगोदर लग्न करणारा ), 'दिधिषु' ( थोरल्या बहिणीचें लग्न होण्यापूर्वी तिच्या धाकटया बहिणींशीं लग्न लावणारा ) आणि 'दिधिषु:पति' ( धाकटया बहिणीचें आधी लग्न होऊन अविवाहित राहिलेल्या अशा थोरल्या बहिणींशीं लग्न लावणारा ). वर निर्दिष्ट केलेल्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांत प्रथम जन्मास येईल त्यानेंच प्रथम लग्न केलें पाहिजे असें स्पष्ट म्हटलें नाहीं; तरी पण वर जीं नांवें आलीं आहेत त्यावरून अशा त-हेने नियम मोडून विवाह होत असत हें सिद्ध होतें.
विधवा विवाह -- विधवेच्या विवाहाला शास्त्राची आडचण नसे. विधवेला दुसरें लग्न करावयाचे असेल तर मृतपतीपासून संतति नसलीं म्हणजे तिनें आपल्या दिराशीं किंवा पतीच्या अगदीं जवळच्या नातलगाशीं लग्न लावावें व तें संतति उत्पन्नकरण्यासाठीच लावावें. हाच विधवाविवाह प्रचाराचा पाया होय. निदान ऋग्वेदांत तरी और्ध्वदेहिक सूक्तांत ( १०. १८, ८ ) अशा अर्थाच्या संदिग्ध उल्लेख आढळतो. हिलेंब्रेंट आणि डेलब्रुक यांच्या मतानें या सूक्ताचा असा अर्थ करणें बरें नव्हें. या सूक्ताचा पुरूषमेध यज्ञाशी संबंध आहे असें त्यांचे मत आहें. परंतु ही केवळ निराधार कल्पनाच होय. आम्ही जो अर्थ दिला आहे त्याला मात्र आश्वलायन गृह्यसूत्राचा आधार मिळतो. शिवाय ऋग्वेदांत दुस-या एका ठिकाणी ( १०. ४०, २ ) एखाद्या विधवा स्त्रीचा दिराशीं विवाह होत असावा ( ज्याला पुढें नियोगविवाहपद्धति म्हणूं लागले ) असें स्पष्ट दिसतें. ही नियोगपद्धति ज्यावेळी विधवेला पहिल्या नव-यापासून एकहि मूल झालें नसेल अशाच वेळीं प्रचारांत येत असें. या पद्धतीला पुनर्विवाहपद्धति असे नांव देता येईल कीं नाहीं. याबद्दल शंका आहे. कारण पुनर्विवाह करणारा दरि हा अगोदरच विवाहित असे. अथर्ववेदांत एका मंत्राचा उल्लेख आला आहे तो मंत्र जपला असतां स्त्रीच्या ( जर तिनें दुसरा पति कल्पिला असेल तर त्या ) दुस-या पतीची परलोकी गांठ पडते. डेलब्रुक म्हणतो त्याप्रमाणें ज्या स्त्रीचा पहिला नवरा जिवंत असून षंढ अथवा पतित आहे अशा स्त्रीलाच हा मंत्र लागू पडतो. तरी पण एक गोष्ट निश्चित आहे की, मागाहून झालेल्या धर्मसूत्रग्रंथांत सामान्य विधवाविवाहाला शास्त्राची संमति मिळाली. पिशेल म्हणतो कीं एखाद्या स्त्रीचा नवरा नष्ट झाला किंवा त्याचा पत्ता नसला तर तिनें खुशाल दुसरें लग्न करावें अशाबद्दल ऋग्वेदांत संमति असल्याचा पुरावा आहे ( ही केवळ कल्पनेची भरारी आहें. मूळ मंत्रांत, सायणभाष्यांत अथवा ग्रिफिथच्या भाषांतरांत वरील कल्पनेचा मुळींच उल्लेख नाहीं).
बहुभार्यात्व -- वैदिककालीन आर्यलोकांना अनेक बायका करण्याची परवानगी होती ही गोष्ट ऋग्वेदांतील अनेक उल्लेखांवरून ( १. ६२, ११; ७, १ वगैरे ) सिद्ध होते. मैत्रायणी संहितेंतील उल्लेखावरून मनूला दहा बायका होत्या असें ठरतें. शतपथ ब्राह्मणांत बहुभार्यात्व पद्धतीचें एका मजेदार कथेनें स्पष्टीकरण केलें आहे. शिवाय राजाला चार भार्या असत. पहिली महिषी, दुसरी परिवृक्ती, तिसरी वावाता आणि चवथी पालागली. शतपथ ब्राम्हणाप्रमाणे महिषी ही प्रथम वरलेली असल्यामुळे पट्टराणी होत असे. परिवृक्तीचा अर्थ टाकून दिलेली असा आहे. वेबर व पिशेल हे म्हणतात की, हिला टाकून देण्याचे कारण हिच्या पोटीं संतान झालेलें नसे. वावाता म्हणजे राजाची विशेष आवडती बायको होय. आणि पालागली म्हणजे वेबरच्या मतें राजपुरूषापैकी जो शेवटला पुरूष असेल त्याची मुलगी होय. हीं नांवे थोडीं चमत्कारिक दिसतात व त्यांचा अर्थहि फारसा सुसंगत नाहीं. पण एवढें मात्र खरें की, जिला प्रथम वरलीं तीच खरी लग्नाची बायको असे व तिलाच पत्नीचें सर्व हक्क असत. या मताला डेलब्रुकनें जोर दिलेल्या मुद्याचा पाठिंबा आहे. तो मुद्दा असा कीं यज्ञामध्यें पत्नी शब्द एकवचनी वापरला आहे व जेथें जेथें अनेकवचनी हा शब्द वापरला आहे तेथें तेथें कांही पौराणिक कारण देण्यांत आलें आहे झिमर असें प्रतिपादन करतो कीं बहुभार्यात्व ऋग्वेदांमध्यें नाहीसें होत चाललें होतें व एकभार्यात्वाची चाल सुरू होत होती. वेबरचें याच्या उलट असें मत आहे कीं, प्रथम एकभार्यात्वाची चाल सुरू होती व बहुभार्यात्वाची चाल मागाहून सुरू झाली.
बहुभर्तृत्व -- वैदिक कांळीं बहुभर्तृत्व नव्हतें. वैदिक ग्रंथांत असा एकहि आधार नाहीं कीं त्यावरून ही चाल सरसहा प्रचारांत होती असें सिद्ध होईल. फारतर एवढें म्हणतां येईल कीं ऋग्वेद व अथर्ववेद यामध्यें प्रसंगानुसार कांही मंत्र असें आलें आहेत कीं ज्यांत एकाच भार्येसंबंधाने अनेक नव-यांचा उल्लेख आलेला आहे. परंतु ऋग्वेदांत १०. ८५, ३७; ३८ या ठिकाणीं जो बहुवचनी उल्लेख आहे तो त्याच सूक्तांतील ४० व्या मंत्रांत सोम, गंधर्व, अग्नि व मनुष्य असें जे चार पती उल्लेखिले आहेत त्यांना अनुलक्षून असावा. या पतीपैकी तीन देवगणांतील असून एकच मनुष्य आहे. अशा अर्थाच्या शब्दांचा वेगवेगळया ठिकाणी काय अर्थ होतो हें सांगणे कठिण आहे. वेबरच्या मताप्रमाणें भर्तार: हा बहुवचनी प्रयोग बहुमानार्थी आहे असें जरी मानलें नाहीं तरी डेलब्रुक हा या अनेकवचनी प्रयोगाचें दंतकथात्मक वर्णन अथवा पौराणिक स्पष्टीकरण देतो ते ग्राह्य मानण्यास बिलकुल हरकत नाहीं. शतपथ ब्राह्मणांतील एका लेखांत हें अनेकवचन व्यापक अर्थानें आलें आहें.
वैवाहिक संबंध -- बहुभार्यात्व जरी वैदिक कालीं प्रचारांत होतें तरी वेबर म्हणतो त्या प्रमाणें वैवाहिक संबंध सैल होते असें म्हणतां येणार नाहीं. प्रत्येक पतीला आपल्या भार्येशा इमानानें वागावें लागत असे. पण हें एकपत्नीव्रत नीतिविषयक कल्पनामुळेंच लोक पाळीत असत किंवा काय हे सांगतां येत नाही. यज्ञप्रसंगी स्त्रीसंगत्यागासंबंधानें व परस्त्रींशीं बिलकुल संबंध ठेवूं नये अशा संबंधानें अनेक स्थलीं स्पष्ट विधान केलें आहे, याचा एवढाच अर्थ होतो की यज्ञ चालू नसतांना परस्त्रीगमन केलें असतां क्षम्य होतें. यज्ञकर्त्यानें व्रती असतांना स्त्रीगमन करूं नये असा उल्लेख आहे. यावरून व्रती नसतांनां परस्त्रीगमन क्षम्य होतें असा अर्थ निघत नाहीं; पण स्त्री या शब्दांत मुलगी, दासी व स्वत:ची बायको यांचा समावेश होत असल्यामुळें सामान्यपणें समाजांत परस्त्रीगमानाकडे कानाडोळा केला जात असे असें म्हणणें चुकींचे होईल. चातुर्मास्य यागांत वरूणप्रघास नावाचें एक पर्व ( कर्म ) आहे त्यांत यागकर्त्या यजमानाच्या बायकोला 'तुझा जार कोण' असा प्रश्न विचारला जाई. परंतु डेलब्रुक म्हणतो त्याप्रमाणे हें व्रत दुस-या एका व्रताचा भाग असून त्याचा उपयोग यज्ञकर्त्याच्या स्त्रीचें अपवित्र आचरणरूप पाप नाहींचे करण्याकरितां होता; यज्ञकर्त्यानें आपल्या बायकोस विचारावयाचा तो प्रश्न नव्हता. शतपथ ब्राह्मणांत याज्ञवल्क्यानें असें मत प्रतिपादिलें आहे कीं आपली स्त्री पतिव्रता आहे कीं भ्रष्ट आहे याबद्दल कोणी पर्वा करीत नाहीं. याचा अर्थ असा कीं जें यज्ञ करणारे असतात त्यांची बायको त्यांच्यापासून दूर असली तरी ते लोक त्याची पर्वा करीत नाहींत कारण देवांच्या बायका देखील विशिष्ट व्रत किंवा यज्ञप्रसंगी देवापासून दूर राहतात. वैदिककालीं एकपत्नीव्रताला बराच मान असें, यावरून उच्च प्रतीच्या नैतिक कल्पना त्या लोकांत रूढ होत्या असें सिद्ध होते. उलटपक्षी इंडो-जर्मन लोकांमध्यें व्यभिचारीपुरूष एखाद्या स्त्रींशीं व्यभिचार कर्म करतांना पकडला गेला तर त्याला बेलाशक ठार मारावें असा सर्वप्रसिद्ध नियम होता तसा वैदिक काळच्या लोकांत होता असें दिसत नाहीं. तरी पण मागाहून झालेल्या धर्म शास्त्रग्रंथांत असा नियम आढळतो. वैदिककालीं स्त्रीपुरूषविषयक नीतिमत्ता विशेष उच्च दर्जाची नव्हती अशाबद्दल हवा तेवढा पुरावा वैदिक वाङमयात सापडूं शकेल.
एका स्त्रीवर सर्व लोकांची सत्ता -- जारासंबंधी प्रेम व अशा प्रकारचें प्रेम करणा-या स्त्रीपुरूषांच्या प्रेमापासून झालेल्या संततीचा त्याग याबद्दल ऋग्वेदांत पुष्कळ उल्लेख आलेलें आहेत. हें उल्लेख विशेषत: परावृज या नांवानें निर्दिष्टिलेल्या इन्द्राच्या आश्रितासंबंधानें आहेत. वाजसनेयि संहितेंत 'कुमारीपुत्र' असा शब्द आलेला आहे. असा जो कोणी अविवाहित स्त्रीपासून झालेला मुलगा असेल त्याला मातृप्राप्त नांव द्यावयाचें अशी चाल होती असें उपनिषद् ग्रंथांवरून वाटतें. बृहदारण्यकोपनिषदांत ज्या गुरूंच्या याद्या ( वंश ) आल्या आहेत त्यांमध्यें मातृप्राप्त नावें येण्याचें कारण हाच प्रचार असावा असें वाटतें. वाजसनेयि संहितेंत शूद्र व आर्य ( स्त्री व पुरूष दोन्ही वर्ग ) यांचे अशास्त्रीय संबंध घडल्याचें उल्लेख आढळतात. व पुरूषमेधांत बलि दिल्या जाणा-यांच्या यादींत अतीत्वरी ( वारयोषित् ) व अतिष्कद्वरी ( भ्रूणहत्या करणारी ) अशा स्त्रियांची नांवे आलीं आहेत व रजयित्री स्त्री ही विषयोपभोगालाच वाहिलेली असे असें म्हटले आहे. पिशेल व गेल्डनेर यांच्या मतें अनेक पुरूषांची एका स्त्रीवर सत्ता असे अशाबद्दल ऋग्वेदांत पुष्कळ उल्लेख आहेत व विशेषतः उषा देवी ही अशाच प्रकारची स्त्री होती असे ते म्हणतात (उषा ही दैनंदिन कालांतील एक अवस्था आहे व तिच्या संबंधी असलेले वर्णन रुपकात्मक आहे). निदान एवढे तरी खरे आहे की ऋग्वेदामध्ये एके ठिकाणी उल्लेखिलेली नृतू (नाचणारी स्त्री) ही जीच्यावर सर्व पुरूषांची सत्ता होती अशी स्त्री होती. स्त्रिया ‘समना’(भेटण्याची जागा) कडे जात असत असे म्हटले आहे तेव्हा त्या स्त्रिया अशाच प्रकारच्या असल्या पाहिजेत. अनीतिमार्गाचे पूर्णपणे अवलंबन करणा-या स्त्रीपुरूषांची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आली आहेत. बाप व कन्य़ा यांच्यामधील संबंध प्रजापतीच्या कथेत दाखविला आहे व त्यासंबंधाने स्पष्टपणे निषेध प्रगट केला आहे. अशा प्रकारचे अयोग्य संबंध समाजांत घडत असत असा उल्लेख अथर्ववेदांतहि आलेला आहे. ज्याचे आईबाप किंवा भाऊ नष्ट झाले आहेत अशा मुलीच्या हातून अनीतीच्या मार्गाने उदरनिर्वाह केला जाण्याचा बराच संभव असे.
लग्नाचे प्रकार -- वैदिककालीं जी समाजस्थिति होती त्यावरून असें दिसतें कीं स्त्री असो किंवा पुरूष असो दोघांनांहि विवाहसमयीं आपला जन्माचा सोबती निवडण्याची मुभा होती. निदान वयांत आलेला मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाहाच्या भानगडीत आईबाप पडत नसत. तरीपण बहुधा आईबाप वधूवरांचा विवाह जुळवून आणीत असत. ज्यांचे लग्न व्हावयाचें त्यांचे आपआपसांत ठरल्यावर एका मध्यस्थाच्या मार्फत-बहुतेक हा वर असावा-हें लग्न जमत असें. त्या वेळच्या समाजांत कन्याविक्रय थोडया प्रमाणांत असें ( ह्या मताच्या पुराव्यासाठी तै. सं. व तै. ब्रा. यांतील उल्लेख मॅकडोनेलनें दिलें आहेत परंतु मूळांत तसा अर्थ संभवत नाहीं. ) पण अशा प्रकारच्या कन्याविक्रयाबद्दल समाज आपली नापसंति व्यक्त करीत असें व असलें जावई असत ते बहुधा चिक्कू असत. उलटपक्षीं ज्या वेळीं मुलींमध्यें कांही व्यंग असेल अशा वेळीं मुलीच्या बापाकडून वराला हुंडा दिला जात असें. प्रसंगानुसार मुलींना पळवून आणून त्यांचें पाणिग्रहण करण्याची चाल होती. पण असले प्रकार म्हणजे वीरांची अद्भुत कृत्यें म्हणून घडत असत. उदाहरणार्थ ऋग्वेदांतील कथेत विमदान पुरूमित्राच्या इच्छेविरूद्ध त्याच्या कन्येचें हरण केल्याचा उल्लेख आहे पण या विमदाच्या कृत्याला पुरूमित्राच्या कन्येची संमति होती असेंहि वर्णन आहे. मागाहून झालेंलें धर्मग्रंथ व महाभारत या ग्रंथांमध्यें विवाहाचे निरनिराल प्रकार सविस्तर वर्णिलें आहेत. परंतु हें सर्व प्रकार पुढील तीन वर्गात समाविष्ट करतां येतील. (१) उभयत: वधूवरांच्या संमतीनें झालेंलें तें प्राजापत्य. (२) वधूची किंमत देऊन केलेंलें आसुर. (३) आर्ष ( म्हणजे ऋषीसंबंधी ब्राहय किंवा दैव (४) व ज्यांत वधूचें हरण करून लग्न केलें जाते ते क्षात्र किंवा राक्षस होत. या सर्व प्रकारांचा उल्लेख वैदिक वाङमयात सांपडतो. याशिवाय जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतील च्यवनाची गोष्ट किंवा बृहद्देवतेंतील श्यावाश्वाची गोष्ट यावरून कोणी एखाद्यानें कांही विशेष गोष्ट केल्यास अथवा दुस-या उखाद्या हेतूस्तव ( कामगिरीचा मोबदला म्हणून ) आपली मुलगी बक्षिस देण्याची चाल होती.
लग्न समारंभ -- लग्न प्रसंगी जें समारंभ होत असत. तें समारंभ आणि इंडो-जर्मन व इतर लोकांतील समारंभ यांत फारच साम्य असें. हें समारंभ फार मोठे असून त्यामुळें वधूवरांचे ऐक्य कायम होत असून सुफलदायी होत असें. या समारंभाला प्रथम सुरूवात वधूच्या घरीं होई व तिच्या घरी वर, त्याचें नातेवाईक व स्नेही सोबती मोठया थाटानें जात व तेथें गेल्यावर वधूच्या नातेवाईकांची व त्यांची भेट होई. या जमलेल्या व-हाडी मंडळींना मेजवानी देण्यासाठीं गायी मारल्या जात. वरानें वधूला एका दगडावर ( अथवा बोहल्यावरील सहाणेवर ) नेल्यावर तिचें पाणिग्रहण करून घरांतील जो मुख्य अग्नि ( गृह्याग्नि ) त्याच्या भोवती वर वधूच्या हातास धरून प्रदक्षिणा करतो. हा विधि झाल्याशिवाय लग्न पुरें झालें असें समजत नाहींत आणि म्हणून या विधिला 'हस्तग्राभ' ( पाणिग्रहण ) असे नांव दिलें आहे. हें विधि आटोपल्यावर वर आपल्या विवाहित स्त्रीस मोठया थाटानें रथांत मिरवणूक काढून आपल्या घरीं घेऊन जातो व हा समारंभ चालू असतां कांही मंत्र पठण केले जातात. घरीं गेल्यावर त्याच रात्री वधुवरांची एकशय्या होत असते.
स्त्रीची मिळकत व तिचा दर्जा -- लग्नांनंतर कायद्याच्या दृष्टीनें नवराबायकोचें परस्परसंबंध कसे होते याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाहीं. वधूच्या पित्याकडून वरास जी वरदक्षिणा किंवा हुंडा मिळे त्यावर व वधूची जी इतर कांही मिळकत असें तीवरसुद्धां तिच्या नव-याचाच हक्क असे असें मानण्यास हरकत नाहीं. महाभारतांत सुद्धां स्त्रीधनाचा हक्क हळूहळू कबूल होऊं लागला होता. ज्याप्रमाणे एखादा धनी आपल्या गुलामाचा पूर्ण मालक असे त्याप्रमाणेच नव-याचा आपल्या बायकोवर ताबा असे असें मानणें चुकीचें होईल. तरीपण अठराव्या शतकामध्यें इंग्लंडांत नव-यास बायकोला शिक्षा करण्याचा जो अधिकार असे तेवढा अधिकार वैदिक काळच्या लोकांना आपल्या स्त्रीवर गाजवितां येत असे. त्यांचे कौटुबिक ध्येय उच्च दर्जाचें होतें व तें प्रत्यक्ष अमलांत आणिलें जात असे हीहि गोष्ट आपणांस नाकारितां येणार नाहीं. शिवाय आपल्या नव-याच्या घरीं आल्यावर स्त्रीला महत्व प्राप्त होई. तिचा अधिकार तिच्या सास-यावर, दिरावर व तिच्या नव-याच्या अविवाहित बहिणीवर चालत असें. कदाचित वरील वर्णन कुटुबांतील थोरल्या बायकोस लागू पडण्यासारखे असेल. आईबाप वृद्ध झाल्यावर घरांतील कर्तृत्व सर्वात थोरल्या मुलाकडें जाई व अर्थातच त्याच्या बायकोस घरधनीणींचें महत्व प्राप्त होई. कारण अविभक्त कुटुंबात तिच्या इतर दिरांचे व नणदांचे लग्न झालेंलें नसें. तरी पण ज्यावेळीं सासरा धडधाकट असून कुटुंबांतील कर्ता पुरूष गणला जाई त्यावेळीं त्याला सर्वजण मान देत असत व थोरला मुलगा त्याचेंच अमलाखालीं रहात असे, असें जे इतरत्र वर्णन आलें आहे तें विसंगत दिसत नाहीं. जर थोरल्या मुलानें वेगळें घर करून निराळा संसार थाटला असेल तर त्यालाहि असाच मान मिळत असे. शिवाय पत्नी यज्ञप्रसंगी सहधर्माचारिणी अशी मानिली जाई, व म्हणूनच तिला ब्राह्मणंग्रंथांतून 'पत्नी हें अन्वर्थक नांव दिलें आहे. याच ग्रंथांत जाया या शब्दाचा फक्त लग्नाची बायको इतकाच अर्थ दिला आहे. यज्ञकर्मातींल वाटेकरीण असा याचा अर्थ होत नाहीं. या बाबतींत तिची योग्यता कमी कमी होत चालली होती. उदाहरणार्थ शतपथ ब्राह्मणांत एका व्रताचा ( हवि:करणाराचा ) उल्लेख आहे त्यांत तें कर्म करण्यास प्रथम पत्नीस बोलवित असत. परंतु नंतर उपाध्यायासच त्या कर्मासाठी बोलवूं लागले. त्याच ब्राह्मण ग्रंथांत स्त्रियांचा दर्जा कमी होत चालला होता अशाबद्दल इतर पुरावा सांपडतो. हा दर्जा कमी होण्याचे कारण बहुत करून व्रताच्या प्रसंगी अग्रमानींच्या महत्वाची वाढती जाणीव हें असाव. मैत्रायणी संहितेंत सुद्धां स्त्रियांना द्यूत व मद्य यांच्या वर्गात ढकललें असून ही तीनहि महापातकें गणलीं आहेत, तसेंच स्त्रीला 'अनृतं' असें म्हटलें असून तिचा संबंध निर्ऋति म्हणजे आपत्ति इच्याषी जोडला आहे. तैत्तिरीय संहितेंत स्त्रीला एखाद्या वाईट मनुष्याहून कमी गणलें असून काठक संहितेत तर 'स्त्री आपल्या नव-याशी गोड गोड गोष्टी करून त्याजपासून आपणांस पाहिजे त्या वस्तू मागून घेते' असें तिचें उपरोधिक वर्णन केलेंलें आहे उलटपक्षीं स्त्रियांची स्तुति केलेलीहि पुष्कळ ग्रंथांतून आढळते. स्त्रीला नव-याची अर्धांगी म्हटलें असून तिच्या मुळेंच नव-याला पूर्णत्व प्राप्त होतें असेहि आहे. ऋग्वेदांत स्त्रियांच्यावर जी टीका आलेली आहे तिजबरोबर त्यांच्या सदगुणांचेहि वर्णन आलेंलें आहे. तरी पण आपण जर ब्राह्मणग्रंथ काळजीपूर्वक वाचले तर आपणांस एवढे कळून येईल कीं स्त्रियांचा दर्जा पुरूषांपेक्षां हळूहळू कमीं होत चालला होता. कारण त्यात असा एक नियम आढळतो कीं स्त्रियांनी पुरूषांच्या ( आपल्या नव-याच्या ) मागाहून जेवावें. एखादेवेळीं नवरा रागानें बायकोस शिव्या देत असें; व नव-याला उलट उत्तर न देणा-या ( अप्रतिवादिनी ) स्त्रीची स्तुतिहि केलेली आहे. स्त्रियांना राजकारणांत पडण्याची परवानगी नव्हतीं. सभेला पुरूषच जात; स्त्रिया जात नसत अशाबद्दल मैत्रायणी संहितेंत स्पष्ट उल्लेख आहे. उलटपक्षीं शिक्षणप्रसार जसजसा जास्त होऊं लागला तसतशी स्त्रियांची शिक्षणविषयक गोष्टींत प्रगति होऊं लागली. उदाहरणार्थ याज्ञवल्क्याच्या दोन स्त्रियाच घ्या. यापैकी एकीने तत्वज्ञानविषयांत बरीच प्रगति करून घेतली होती. उपनिषद्ग्रंथांत ब-याच स्त्रियांचा गुरू म्हणून उल्लेख आला आहे. परंतु या विवाहित होत्या कीं नाहीं हें निश्चित सांगतां येत नाहीं. पण स्त्रीचा जो विवाह व्हावयाचा त्याचा मुख्य हेतु म्हटला म्हणजें प्रजोत्पादन हा होय. या हेतूचा उल्लेख ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथांतून वारंवार केलेला आढळतो. संततीबद्दल इच्छा असणें हें ज्या समाजांत बापाच्या बाजूनें ''ति......खिलें जात होते त्या समाजास अगदीं स्वाभाविक आहे. या इच्छेचें रूपांतर शेवटी असं झालें कीं पुत्रानेंच बापाचें सर्व औध्वदेहिक कर्म करावें व बापाचा वंश पुढें चालू ठेवावा. औरस संतती नसल्यास दत्तक घेण्याची परवानगी होती. परंतु ही चाल ऋग्वेदकालीं संमत नसावी. कारण एखाद्या स्त्रीचा नवरा मृत झाला किंवा हयांत असून त्याला संतति नसेल तर त्याच्या भावानें त्याच्या बायकोशीं संबंध ठेवून संतति उत्पन्न करावी अशा प्रकारची नियोगविवाहपद्धति ऋग्वेदकाली रूढ होती असें वाटतें. अपुत्रता व संपत्तिविरहितता ( अवीरता व अमति ) या अवस्था सारख्याच गणल्या जात व त्यांपासून रक्षण करावें ( हीं स्थिति नसावी) म्हणून अग्नीचीं प्रार्थनां केलेली आहें. एखाद्याला मुलगी झाली तर त्याबद्दल कोणी कौतुक करीत नसे परंतु मुलगा होण्याबद्दल अथर्ववेदांतील एका सूक्तांत देवाची प्रार्थंना केली आहे आणि मुलगी झाल्याबद्दल दु:ख प्रगट केंलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत एक गाथा आलेली आहे तींत पुत्र हा परलोकांतील प्रकाश [ ज्योतिर्हपुत्र: परमे व्योमन ] असून मुलगी हे संकट ( कृपण ह दुहिता ) होय असें म्हटलें आहे. पण वैदिककाला मुलाचं संगोपनच करीत नसत असें जें मागाहून झालेल्या संहिता ग्रंथांवरून झिमर व डेलब्रुक यांनी अनुमान काढलें आहे तें सर्वस्वी चुकींचें असून त्याचा बोथलिंगनेहि निषेध केला आहे.
मुलाचा आयुष्यक्रम -- मुलांचे संगोपन करण्याचें काम आईवर सोपविले जात असें. परंतु प्राचीन वाङमया- वरून लहानपणी मुलांचे आयुष्य कसें जात असें हें सांगतां येत नाहीं. गर्भावस्थेचा काल दहा [ चांद्र ] मास गणला जाई. मूल जन्मल्याबरोबर प्रथम त्याला तूप व मध देत असत व नंतर स्तनपान करवीत असत. जन्म झाल्याबरोबर आठव्या दिवशीं मुलास न्हाऊं घातले आहें. दंतोद्रम होणे हा एक महत्वाचा प्रसंग गणला जात असून त्याचें वर्णन अथर्ववेदांतील एका सूक्तांत आलें आहे. मुलांना बोलावयास शिकवीत असत अशाबद्दलहि तैत्तिरीय संहितेंत उल्लेख असून त्याचा काल मुलाच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी सांगितला आहें. ऐतरेय आरण्यकांत 'मुलाचें पहिले तत व तात हें शब्द दद शब्दाप्रमाणें होत' असें म्हटलें आहे. या शब्दावरून बापाला त्यावेळीं जास्त महत्व होतें असें दिसतें. मुलाचें नामकरण हा एक महत्वाचा समारंभ गणला जाई. अथर्ववेदामध्यें तरूण मनुष्याच्या प्रथमश्मश्रुकरणाच्या ( समावर्तनाच्या ) समारंभाचें वर्णन आलेंलें आहें.
सती -- पति निधन पावल्यावर त्याची स्त्री आपखुषीनें अथवा नातलगांनी आग्रह केल्यावरून आपणांस जाळून घेत असे, याला पूर्वी सती जाणें असें म्हणत. ही चाल अस्तित्वांत होती याबद्दल अथर्ववेदांत उल्लेख आहें परंतु ऋग्वेदांत ही चाल नसून उलट विधवेनें आपल्या दिराशी विवाह करावा असें मं. १० सू. १८ वरून अनुमान निघतें. ही सतीचीं चाल विशेषत: क्षत्रिय लोकांत असलेली आढळते. ही गोष्ट जो कोणी इंडोजर्मन लोकांचा इतिहास वाचील त्याला कळून येणार आहे. इतर वर्गात विधवा स्त्रियांनी नव-याच्या पश्चात् जिवंत राहणें हेच अधिक इष्ट होतें. विधवाविवाहाची चाल कांही धर्मग्रंथांत निषिद्ध मानलेली असली तरी ऋग्वेदांत तिचा कांहीसा भास होत आहे. यावरून ऋग्वेदकाली ती रूढ होती असें म्हणण्यास हरकत नाहीं.
३०पितापुत्र -- 'बापलेक' हा समास वैदिक वाङमयात फारच थोडा वेळ ( अथर्ववेद, व शतपथब्राह्मणांत ) आला आहे.
३१पितृ -- ऋग्वेदापासून पुढील ग्रंथांत हा शब्द येणारा असून त्याचा अर्थ बाप असा आहे. पण बाप म्हणजे जन्म देणारा हाच अर्थ सर्वत्र नसून मुलांचे रक्षण करणारा असाहि याचा कोठें कोठें अर्थ होतो व व्युत्पत्तिदृष्ट्या तोच अधिक जुळतो. ऋग्वेदांत जेथें जेंथें बाप हा शब्द आला आहे तेथें तेथें तो चांगला व प्रेमळ आहे असें वर्णन आहे. उदाहरणार्थ अग्नीला पिता म्हटलें असून इंद्र बापाहूनहि अधिक प्रिय आहे म्हटलें आहे. बाप मुलाला हातीं धरून आपल्या मांडीवर बसवितो व मुलगा बापाचें लक्ष आपणाकडें लागावें म्हणून त्याच्या अंगावरील वस्त्र ओढीत आहे असें ( ऋ ३. ५३, २ ) वर्णन आलें आहे. मूल मोठें झाल्यावर तें संकटकालीं बापाच्या मदतीवर अवलंबून राहतें व बापाचें आनंदाने स्वागत करतें असेंहि वर्णन आलें आहे. बापाचा मुलावर ताबा किती असें व तो किती कालपर्यंत असें हें सांगणे कठिण आहे. ऋग्वेदांत धृत खेळल्याबद्दल बाप मुलाला शिक्षा करतो व ऋज्राश्वाला त्याच्या बापानें अंध केलें अशा कथा आलेल्या आहेत. वरील दुस-या कथेवरून रोमन लोकांत ज्याला 'पॅट्रिआ पोटेस्टस्' बापाचें मुलावरील पूर्ण स्वामित्व म्हणत तें वैदिक कालीं पूर्णावस्थेंत होतें असें झिमरचें म्हणणें आहे. पण या अर्धवट दंतकथात्मक व तुटक अशा गोष्टीवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. तथापि बापाचे मुलावरील स्वामित्व बरेंच असावे हे शक्य दिसतें. कारण रोमन लोकांत असलेल्या 'पॅट्रिआपोटेस्टस्' बद्दलच्या पूर्वपक्षाला आपणांपाशी दुसराच पुरावा आहे. मुलाच्या अथवा मुलीच्या लग्नाच्या बाबतींत बापाला कायदेशींर रीतीनें ढवळाढवळ करतां येत असे. याबद्दल जर पुरावा आपणांजवळ नसेल तर त्यावरून असें म्हणंता येईल कीं, ही गोष्ट त्यावेळीं अशक्य कोटींतील नव्हतीं. मुलगा वयांत आल्यावर तो बापाबरोबर राहून संसार करी व त्याची बायको गृहस्वामिनी होई किंवा मुलगा निराळेंच बि-हाड करून राहीं हें सांगतां येत नाहीं. बहुतकरून दोन्ही चाली अमलांत असाव्या. तसेच लग्न झाल्यावर किंवा लग्न न झालें तरी मुलाला अलग जमीन तोडून दिली जाई अथवा बाप मृत झाल्यावर त्याला जमिनीचा भाग मिळें हेहि सांगणे अशक्य आहे. परंतु कांही झालें तरी मुलगा वयांत आल्यावर व बापांचा ताबा सुटल्यावर बापाची सत्ता मुलावर असणें शक्य नाहीं; कारण तो वृद्ध झाल्यावर मुलेंच त्याच्या मिळकतींची वांटणी करून घेत किंवा त्याला करून द्यावी लागत असे व सुनेच्या कदरेखाली त्याला रहावें लागत असे. वृद्ध झाल्यावर बापाला टाकून दिल्याचीहि स्पष्ट उदाहरणें आहेत. परंतु वैदिककांली हिंदुस्थानांत ही चाल फारशी प्रचारांत होती. असें मानणें गैरशिस्त होईल, सामान्य नियम म्हटला म्हणजें मुलगा बापाच्या पूर्णपणें आज्ञेत असे. मागाहून झालेल्या सूत्रग्रंथांत मुलानें बापाशी कसें वागावें याबद्दल सविस्तर वर्णन दिलें आहे. मुलानें बापाचें उच्छिष्ट खावें असें त्यांत सांगितलें आहे. उलटपक्षी बापानें मुलाशी प्रेमानें वागावें असेहि म्हटलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत शुन:शेपाची जी गोष्ट आली आहे तीवरून बापाची मुलाबद्दल निर्दयपणाची वागणूक लोकांना कशी नापसंत होती हें सिद्ध होतें. उपनिषदामध्यें बापापासून मुलाची वंशपरंपरा दैविक आहे असें म्हटलें आहे. मुलाचें चुंबन घेणें हें नेहमीच्या परिपाठांतील असून परिणत वयांत सुद्धां तें प्रेमाचें द्योतक गणलें जाई. औरस संततीच्या अभावी दत्तक घेण्याची चाल असें. ही दत्तकाची चाल कधी कधी औरस संतति असतांनांहि असें. पण अशा वेळीं दत्तक घेतला जाणारा मुलगा विशिष्टगुणसंपन्न असाच असे. उदारहरणार्थ विश्वामित्रानें दत्तक घेतलेला शुन:शेप होय. एका जातींतील मुलगा दुस-या जातींतील मनुष्यांस दत्तक घेतां येत असें की नाहीं हें सांगतां येत नाहीं. कारण वेबर म्हणतो त्याप्रमाणें हा ब्राम्हणाच्या मुलाला दत्तक घेणारा विश्वामित्र स्वत: क्षत्रियच होता किंवा काय हेंहि निश्चयात्मक ठरत नाहीं. दत्तक घेण्याची चाल लोकांना विशेष् आवडत नसे. ही चाल क्वचितच अमलांत येई; कारण ऋग्वेदांत ७.४, ७ येथें या चालींचा निषेध केला आहे. एखाद्या मनुष्यालां मुलगा नसून मुलगी असेल व तिला मुलगा होईल तर तो मुलगा तिच्या बापाला दत्तक घेतां येत असें. एकंदरींत या चालींचा उल्लेख यास्कानें केलेला अर्थ स्वीकारला तर ऋग्वेदांतील एका दुर्बोध मंत्रांत ( ३. ३१, १ ) असावा असें वाटतें. शिवाय एखाद्या भ्रातृविरहित कुमारिकेस पती मिळण्याची अडचण पडे. याचें कारण तिच्या बापाच्या तिला पुत्रिका करण्याचा हेतु असावा हें असेल. पुत्रिका म्हणजें तिचा वंश तिच्या बापाच्या वंशांतच रहावा या इच्छेनें दिलेली मुलगी. प्रत्येक कुटुबांत आईपेक्षां बापालाच जास्त मान असे. याच्या उलट डेलब्रुकच्या मतानें कांही कुटुबांत आईलाच जास्त मान असें. सर्व कुटुंब जमिनीची वहिवाट करणारी संस्था होती असें दिसत नाहीं. बेडन पॉवेल यानें असें सिद्ध केलें आहे कीं, हिंदुस्थानातील ग्रामसंस्था हीं कधींहि जमीनदारी संस्था नव्हतीं. पण त्याचें असें म्हणणें आहे की, ज्या अर्थी पित्याची कुटुंबावरील पूर्ण सत्ता ही मागाहून सुरू झाली व अशी सत्ता असण्याची पद्धति हिंदुस्थानांत नव्हती त्या अर्थी ग्रामसंस्थेऐवजी एक कुटुंब हेंच जमीनदार असे. हापकिन्स आपल्या ग्रंथांत असें प्रतिपादन करतो कीं, पूर्वी हिंदुस्थानातील जमिनीवर वैयक्तिक व अविभक्तकौटुंबिक अशीं दोन्ही प्रकारची सत्ता एकवटलेली होती. या दोहोपैकी अविभक्तकौटुंबिकसत्ता ही अगोदरची असून पुढें ती हळू हळू नष्ट होत चालली होती. आणखी तो म्हणतो, कधीहिं रद्द न होणारा असा मुलाला एक हक्क होता. बाप जर वंशपरंपरागत जमीन विंकू लागला तर मुलगा त्या हक्कानें बापास प्रतिबंध करी. कारण जी जमीन सामायिक स्वामित्वाखालीं असें ती विकण्यास सर्व ग्रामाची परवानगी लागत असे. पोलाक व मेटलंड यांनी आपल्या इंग्रजी कायद्याचा इतिहास या पुस्तकांत लिहिल्याप्रमाणें आपण हें लक्षांत घेतलें पाहिजें कीं, पूर्वी मुलाचा हक्क होता यावरून सामायिक सत्ता किंवा कौटुंबिक सत्ता पूर्वी जमिनीवरहि होती असें मानण्याचें कारण नाहीं. तर प्रथम बिनवारशीं मिळकतीवर हक्क सांगण्याची पद्धत होती व तीपासूनच सामायिक किंवा कौटुंबिक सत्ता सुरू झाली असावी. इंग्लंडप्रमाणें हिंदुस्थानात पूर्वीच्या ग्रंथांत समवाईक कुटुंबपद्धति असल्याबद्दल उल्लेख नाहीं. जॉलि आपल्या उपनिषद्ग्रंथ या पुस्तकांत म्हणतो कीं, प्राचीन व अर्वाचीन कालीं कुटुंबातील कर्त्या पुरूषाचा मुलें मोठी झालीं तरी एकमुखी ताबा असे अशाबद्दल स्पष्ट पुरावें मिळतात. हीच स्थिति पूर्वीच्या इंग्लिश व रोमन लोकांच्या कायद्याच्या ग्रंथांत सांपडतें. ग्रीसमध्यें सुद्धां बापाची कुटुंबावर व जमिनीवर पूर्ण सत्ता होती. पितरौ याचा अर्थ आईबाप असाच चोहोंकडे आहे.
३२पुत्र -- सूनु व पुत्र ह्याचा अर्थ ऋग्वेदापासूनच्या सर्व ग्रंथांत स्वत:चा मुलगा असा आहे. ह्या शब्दाचा मूळचा अर्थ लहान किंवा असाच कांही होतो. पुत्रक हा शब्द: स्वत:च्या मुलालाच नव्हें तर आपणाहून लहान माणसालाहि प्रेमानें हाक मारण्याचा आहे. पुत्र व्हावा म्हणून प्रकट केलेल्या इच्छेचा उल्लेख वारंवार आलेला आहे.
३३बंधु -- याचा अर्थ 'नातें' असा आहे. धनवाचकहि अर्थ होतो. सामान्यनाम असतां 'नातेवाईक' असा अर्थ होतो. हा शब्द ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत आढळतो.
३४भर्तृ -- याचा अर्थ 'वहाणारा', याशिवाय आश्रयदाता. स्वामी, असा सुद्धां अर्थ जुन्या वाङमयात आहे. परंतु याचा कोठें एखाद्या ठिकार्णी 'भर्ता' ( नवरा ) या अर्थी उपयोग होतो किंवा नाहीं याबद्दल शंका आहे.. ऋग्वेदांत एका ठिकाणी त्याचा अर्थ 'नवरा' असा असावासें वाटतें, पण डेलब्रुकच्या म्हणण्याप्रमाणें-वतें बरोबरहि दिसतें-त्याचा अर्थ ( बाप ) असा असला पाहिजे.; कारण 'आई' ऐवजीं हा शब्द कांही ठिकाणीं योजिला आहे.
३५भ्रातृ -- ऋग्वेदकालीं व नंतरहि ही बंधुवाचक संज्ञा आहे. हा शब्द कित्येक वेळा नातेवाईक किंवा परम मित्र यासहि लावतात. परंतु भ्रातृ शब्दानें संबोधिलेंलें पुरूष ह्या देवता असून, परस्परांच्या, किंवा त्यांच्या भक्तांच्या, बंधुरूप आहेत. ह्याप्रमाणे पूर्वीच्या वाङमयात ह्या शब्दाचा मूळचा अर्थ लोपला नव्हता. याची व्युत्पति भृ=भरणें ह्या धातूपासून झालीं असावी हें बरोबर दिसतें. याचा अर्थ असा कीं, भाऊं आपल्या बहिणीला आश्रय देत असे. वैदिक ग्रंथांत हाच अर्थ असला पाहिजें ही गोष्ट बाप वारल्यानंतर तिचा सर्व भार भावावर पडत असे, व 'भाऊ वारला तर बहिणीचें दुदैव ओढवतें' इत्यादि वाक्यावरून सिद्ध होते. नातेवाईकांचा दर्जा छांदोग्य उपनिषदांत दाखविला आहे. त्यांत आधीं 'बाप' मग 'आई' नंतर भाऊं, मागाहून बहीण, असें दिलें आहे. भावाभावांतलें भांडण प्रसंगविशेषीं उल्लेखिलें आहे.
३६मातृ -- ऋग्वेदापासून हा आई या अर्थाचा शब्द नेहमीं प्रचारांत आहे. ध्वन्यनुकारा 'मा' या शब्दापासून हें रूप बहुधा सिद्ध झालें असलें पाहिजें. हा शब्द अम्बा आणि नना यांच्या प्रमाणेंच आहे, नवराबायकोची व मातृपुत्रांची नातीं पति ह्या शब्दाच्या सदरांत दिलीं आहेत. आतां येथें एवढेंच सांगावयाचें कीं, सूत्रांत आईविषयीं दाखवावयाच्या आदराविषयीं बराच उल्लेख केला आहे. तसेंच ज्या कार्यातून तिचा संबंध येतो त्याच्याविषयीहिं पुष्कळ माहिती दिलीं आहे. आईलासुद्धां आपल्या मुलाच्या भवितव्यतेबद्दल काळजी असते असें ऐतरेय ब्राह्मणांतील दत्तविधानाप्रीत्यर्थ विकलेल्या शुन:शेपाच्या कथेवरून उघड होते. घरांत आईचा दर्जा बापाच्या खालोखाल होता. कधीं कधीं 'आई-बाप' या अर्थी 'मातारा' हा शब्द 'पितरा', 'मातारा पितरा', आणि मातापितर:ह्याप्रमाणें उपयोगांत आणीत.
३७मित्र -- ऋग्वेदांत आणि नंतरच्या वाङमयात मित्र ह्या अर्थी हा शब्द आला आहे. तैत्तिरीय संहितेच्या मतें स्त्री ही पुरूषाचा मित्र आहे, आणि शतपथांत मित्राचें महत्व विशेष वर्णिले आहे. व मित्रद्रोहाची निंदा केलीं आहे.
३८यम -- यम म्हणजें 'जुळें'. अशा त-हेच्या जन्माचा वेदकालीन वाङमयात फार वेळां निर्देश केलेला आहे. यमौ, मिथुनौ या शब्दांनी निरनिराळया जातींची जुळीं दर्शविली जातात. जुळीं हीं भयंकर आणि वाईट चिन्हदर्शक असतात अशीं नीग्रो आणि इतर जातींमध्यें समजूत असल्याचें पुरावें आहेत. व जुळीं नशींबवान मानली जात असत याविषयींहि पुरावें आहेत.
३९योषन् -- योषना, योषा, योषित् हे सर्व शब्द तरूणीचें दर्शक आहेत याचा विवाहप्रसंगी मिळणारी वधू असाहि अर्थ आहे. ब्राह्मणांतल्या वृषन् शब्दाशीं ह्या शब्दाचा विरोध आहे; सर्वसाधारण स्त्रीवाचक परंतु बायको, मुलगा किंवा कुमारी या अर्थी सुद्धां हा शब्द वापरलेला आढळतो.
४०वधू -- ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत स्त्री या अर्थी हा शब्द वारंवार आलेला आहे. डेलब्रुकच्या मतें ह्या शब्दाचा अर्थ विवाहित स्त्री, सौभाग्यकांक्षिणी स्त्री, किंवा लग्नाच्या वेळची वधू असा होतो. ह्या शब्दाचा उगम वह या धातूपासून झालेला आहे. वह=वाहून नेणें ह्या धातूपासून असाच दुसरा शब्द म्हणजे 'वहतु'-लग्नाची मिरवणूक - हा होय. पुढें ह्याचा अर्थ 'जिला घरीं नेली जात आहे ती' असा होऊं लागला. झिमरच्या मतानें हें स्पष्टीकरण बरोबर नाहीं. त्याच्या मतें वधू हा शब्द 'लग्न करणें' ह्या अर्थाच्या धातूपासून बनला आहे. ऋग्वेदांत एकेठिकाणीं आलेल्या वधू शब्दाचा अर्थ रॉथ स्त्री म्हणजे स्त्री जात असा घेतो. पण झिमरचें मत असें आहे कीं, त्याचा अर्थ दासी असा असावा. वधू ह्या शब्दाचा उपयोगच जर पाहिला तर हे दोन्ही अर्थ जरा प्रचाराविरूद्ध दिसतात. कारण या शब्दाचें अर्थ वरच्याप्रमाणें कोठेहिं लागू पडत नाहींत. एका ठिकाणीं त्रसदस्यु पौरूकुत्स्य ह्यानें एका गायकाला पन्नास वधू दिल्याचा उल्लेख आलेला आहे. ह्यावरून हा गायक विशेष प्रकारचा बहुभार्याक असावा असें फार तर सिद्ध होईल पण ह्या आमच्या विचारसरणीला एका गोष्टीचा अडथळा आहे. तो असा कीं, ऋग्वेद व अथर्ववेद हयांमध्यें वधूमंत हा शब्द विशेषणार्थी रथ, अश्व, व उष्ट्र या शब्दांनां लावलेला आहे. झिमरच्या मतें येथें रथांतल्या व घोडयावरल्या दासींविषयीं उल्लेख असावा; व ह्या मताला बृहद्देवतेचा आधार आहे. रॉथचें असें म्हणणें कीं ह्या ठिकाणी अवर्षणकालीं योग्य अशा घोडयांचा किंवा रेडयांचा उल्लेख आहे; हें म्हणणें सयुक्तिक नाहीं. वधूचा अर्थ जर स्त्री जात असा असेल तर वधूमंत म्हणजे 'घोडया किंवा म्हशीं हयांसह' हा अर्थ सयुक्तिक दिसतो.
४१वर -- ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत 'लग्न करणारा' अशा अर्थी हा शब्द आला आहे.
४२विधवा -- ह्या शब्दाचा अर्थ 'जिचा नवरा मेला आहे अशी स्त्री असा आहे. ह्या शब्दाचा मूळ अर्थ 'अनाथ झालेली' असा आहे, व हा शब्द विध ह्या धातूपासून आलेला आहे. ऋग्वेदामध्यें समजण्यास कठिण अशा एका ऋचेंत विधव ( पुल्लिंगी ) असा शब्द असावा असें रॉथचे अनुमान आहे. ह्या ठिकाणी मूळामध्यें विधंतम् विधवाम' असा स्पष्टपणें लिंगदोषदर्शक शब्दप्रयोग आलेला आहे. रॉथ म्हणतो कीं, वृत्ताचें सोयीकरिंतां विधवम् ह्याबद्दल विधवाम् असें पद केलेलें आहे व विधवम् ह्याचा अर्थ यज्ञ करणारा विधुर असा त्यानें केलेला आहे. लुडविग्नें अर्थ करतांना विधंताम् हें स्त्रीलिंगी रूप घेतलेंलें आहे. व डेलब्रुक ह्या दोन्ही शब्दांचा 'पूजा करणारा' व 'विधवा स्त्री' असा अर्थ करितो. कदाचित् विधवा व विधुर असा अर्थ घेणेंहि सोयीचें होईल, पण ह्या ठिकाणीं कोणत्या कथेला उद्देशून हे शब्द आलेंलें आहेत हे समजत नाहीं. कारण हें शब्द ज्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी अश्विनांच्या नांवावर असलेल्या कोणत्या तरी अद्भुत कृत्याचा उल्लेख आलेला आहे; व त्या ठिकाणीं घोषा ( भर्तृविरहित ) ह्या स्त्रीचा जो उल्लेख साहजिक झालेला आहे तो असंभाव्य वाटतो. कारण त्याच सूक्तांत अश्विनांनी तिच्या संबंधी केलेल्या अभ्दुत कृत्याचें वर्णन थोडयाच मंत्रांपूर्वी एका मंत्रांत आलें आहें. वैदिक वाङमयात विधवा हा शब्द फारसा आला नाहीं.
४३श्वशुर -- ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांत बायकोचा सासरा असा याचा अर्थ आहे, पण सूत्रकालापासून नव-याचा सासरा असाहि ह्याचा अर्थ होऊं लागला. सुनेनें सामान्यत: आपला सासरा कुटुंबाचा कर्ता पुरूष असतांनां व तो वयानें मोठा असल्याने त्याला मान देणें जरूर असे. जेव्हां सास-याला वार्धक्य येई तेव्हां हीच सून घरधनीण होऊन सासरा व सासू ह्यांवर हुकूमत चालवी. हा शब्द अनेकवचनीं असला म्हणजे ह्याचा अर्थ सासूसासरे असा होतो.
४४श्वथू -- नवरा व बायको ह्या दोघांच्याहि सासूच ह्या शब्दानें बोध होतो. आपला नवरा वार्धक्यामुळें कुटुंबाचा भार वाहण्यास असमर्थ झाल्यावर ही सासू व तिच नवरा हें दोघेहि सुनेच्या हाताखाली रहात पण ए-हवी त्यांनां त्यांचा योग्य मान मिळे. ऋग्वेदांत एक असा उल्लेख आहे की, एक द्यूतकार आपण द्यूत खेळल्यामुळें आपल्यावर आपल्या सासूची खप्पा मर्जी झाली, व हें संकट व आपणावर ओढवलें असें चिंतायुक्त उद्गार काढीत आहे.
४५सखि -- म्हणजें मित्र. ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांत प्रत्यक्ष व अलंकारिक अर्थानें हा शब्द नेहमीं येतो.
४६सजात -- 'एकत्र जन्मलेला'. हा शब्द ऋग्वेदांमध्यें एकदां व नंतरच्या ग्रंथांत वारंवार आलेला असून त्याचा अर्थ नातेवाईक असा असला पाहिजे. अधिक विस्तृत अर्थ म्हणजें समानदर्जाचा मनुष्य असा आहे. पण हें दोन अर्थ इतके सूक्ष्म आहेत कीं दोन्ही जवळ जवळ एकच झालें आहेत. राजाचें सजात म्हणजें राजपूत्र होत; लष्करी माणसाचे सजात म्हणजें क्षत्रिय होत; सामान्य माणसाचें सजात म्हणजे वैश्य होत. पण पुढें प्रचारांत आलेल्या सजाति ( एकाच जातीचा मनुष्य ) शब्दाप्रमाणें सजात शब्दांत जातीचा उल्लेख नाहीं. सजातांचे तंटे चांगलेच प्रसिद्ध असत.
४७सपत्नी -- ऋग्वेदामध्यें सवत या अर्थानें हा शब्द आलेला आहे. पहिल्या व शेवटच्या मंडळांत मत्सर करणारी सवत असा अर्थ आहे. पण वैदिक काळानंतरच्या वाङमयात प्रतिस्पर्धी ह्याला प्रतिशब्द म्हणून हा शब्द आला आहे.
४८सबंधु -- 'एकाच रक्ताचा' या अर्थी हा शब्द आहे. ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांमध्यें 'नाते असलेला' असा अर्थ आहे.
४९सुपित्र्य -- ऋग्वेदामध्यें एकदां हा शब्द आलेला असून हा बहुतकरून विशेषण ( बापाचे गुण पुढें चालू ठेवणारा ) या अर्थी असावा. लुडविगच्या मतें हें एका माणसाचें नांव आहे. पण असें कां मानावें ह्याचें कारण तो सांगत नाहीं.
५०स्त्री -- हा सामान्यत: स्त्रीवाचक शब्द गद्यांत व पद्यांत नेहमीं येतो. नारी ह्या शब्दाला हाच अर्थ आहे, पण पुढील पद्यग्रंथांत हा नाहींसा होतो. 'ग्ना' शब्द फक्त देवांच्या बायकांना लाविलेला आहे. योषित् व तत्सदृश शब्द उपवर झालेल्या तरूण स्त्रियांस लावितात. ऋग्वेदांत पुमान् ह्याच्या उलट स्त्री शब्द आहे: व वृषन् ह्याच्या उलट हा एकदांच आलेला आहे. अथर्ववेदाच्या कालापासून स्त्री ह्या शब्दाचा अर्थ पति ह्या शब्दाच्या उलट विवाहित स्त्री असा होऊं लागला. सूत्रग्रंथांत सुद्धां स्त्री हा जाया शब्दाहून भिन्न अर्थानें वापरला आहे. वैदिककालीं स्त्रीच्या आयुष्यांतला बराच मोठा भाग तिचें लग्न व नव-याशी असलेलें इतर संबंध, यांत जात असे. वैदिककालीं स्त्रियांना पडदां बिलकुल नव्हता, पण महाभारतकालाच्या उत्तरार्धात तो पूर्णपणे सुरू झाला. वैदिक कालीं कुमारी आपल्या बापाच्या घरीं वाढत असे. खेडेगावांतील तरूण पुरूषांशी तिला मोकळेपणानें बोलतां चालतां येत असे व ती घरांतल्या कामाकाजांत लक्ष्य घालीं. तिला शिक्षण घेतां येत असे निदान कांही बायकातरी शिकलेल्या असत; कारण उपनिषद् ग्रंथांत स्त्रियांनी तत्वज्ञानासंबंधाच्या वादविवादांत बराच महत्वाचा भाग घेतल्याचें नमूद आहे. शिवाय पुरूषांपेक्षा स्त्रियांनां योग्य अशा नर्तनादीं कला ज्यांनां शिकविल्या जात. समाजांत कायद्याच्या दृष्टीनें मुलीचा दर्जा काय होता ह्या विषयीं फार थोडे व अपुरे उल्लेख आहेत. ऋग्वेदावरून असें दिसतें कीं, बाप नसल्यास त्याच्या ठिकाणीं भावाला समजून बहीण त्याच्या पासून मदतीची अपेक्षा करी. भ्रातृविरहित कुमारीवर संकटे ओढवण्याची फार भीति असे. तरी पण अशा निराश्रित कुमारीला उपद्रव देणा-यांस भयंकर पाप सांगितले आहे. स्त्रियांनां, मग त्या विवाहित असोत वा नसोत, वडिलार्जित मिळकतीवर हक्क सांगतां येत नसे, व कायद्याच्या दृष्टीनें त्या कधीहिं स्वतंत्र नव्हत्या. लग्नापूर्वी त्या आपल्या बापावर अगर भावावर अवलंबून रहात; व लग्नांनंतर त्या नव-यावर अवलंबून रहात. वैधव्यावस्थेंत त्यांचे आप्त त्यांच्या नव-याची मिळकत घेत व त्यांनां संभाळण्याचें काम करीत केव्हां केव्हां अविवाहित स्त्रिया-उदाहरणार्थ वारांगना जे द्रव्य मिळवीत, त्यावरहि त्यांचे बाप किंवा भाऊ हक्क सांगत.
५१स्नुषा -- ह्याचा अर्थ सून असा असून ही सून सासु व सासरा या दोघांचीहि होती. सासूची सून ह्या अर्थानें ऋग्वेदांमध्यें हा शब्द सु-स्नुषा ह्या समासांत आला आहे, व तो वृषाकपायीला लावलेला आहे. सास-याची सून ह्या अर्थी हा शब्द अनेक ठिकाणी आलेला असून सूनेच्या सास-याविषयींच्या आदराचा उल्लेखहि आहे. हा आदर अशा प्रकारचा आहे की, तो सुरेसारख्या पदार्थाच्या सेवनप्रसंगीं कमी होतो.
५२स्याल -- ऋग्वेदांमध्यें फक्त एके ठिकाणी हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ बायकोचा भाऊ म्हणजे मेहुणा असा आहे. हा मेहुणा आपल्या बहिणींचे रक्षण करण्यास, तिला चांगला नवरा पाहून देण्यास तत्पर असा मानला जातो.
५३स्वसृ -- ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांत बहीण ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. ज्याप्रमाणें भ्रातृ शब्द त्या प्रमाणेंच स्वसृ हा शब्द बहिणीशिवाय इतरांनांहि लावतां येईल; उदाहरणार्थ ऋग्वेदामध्येंच ऋतु व हातांची बोटें हयांची बहिणी म्हणून तुलना केलेली आहे, व रात्रीला उषेची बहीण म्हटलें असून ती उषेहून मोठी म्हणून उषेकरिंता आपण आपली जागा सोडीत आहे असें वर्णन आलेंलें आहे. पणी लोक सरमेस आपली बहीण समजण्यास तयार होते. पण अशा त-हेचा ह्या शब्दाचा उपयोग-भ्रातृ शब्दाचा आहे त्या पेक्षां अधिक--सामान्यत: मनुष्यांविषयीं करीत नाहींत. बहीणभावांचे नातें हें अगदी जवळचें असे. पिता मृत अथवा अशक्त असल्यास बहीण आपल्या भावावर आणि भावजयीवर अवलंबून राही असें. ऋग्वेदं व ऐतरेय ब्राह्मणावरून दिसतें.
५४पितामह -- ततामहसारखा ह्याचा अर्थ तैत्तिरीय संहितेपासून पुढील ग्रंथांत बापाचा बाप म्हणजे विशेष अर्थानें बाप असा आहे. पणजा ह्याला प्रतितामह व प्रततामह हें शब्द आहेत. आईचा बाप व आजा ह्यांनां वैदिक भाषेत निराळें शब्द नाहींत हीं लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. पुढील वाङमयात मातामह ह्यासारखे जे शब्द आलेंलें आहेत तें अनुकरणानें बनलेंलें आहेत. डेलब्रुक म्हणतो कीं, ऋग्वेदांमध्यें एके ठिकाणी 'महे पित्रे' असा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आजा असा असावा, व हा अर्थ पुढें नपात् म्हणजे नातू असा जो शब्द आला आहे त्याला जुळणारा आहे. पण एकंदर सर्वच लेखाचा अर्थ संदिग्ध आहे. वैदिक ग्रंथांवरून आजोबाचा दर्जा कुटुंबात काय होता हें सांगणे कठिण आहे. महाभारतांत म्हटल्याप्रमाणें बापासारखाच आजाला मान मिळें ह्यांत शंका नाहीं. कुटुंबाचा भार सहन करण्यास असमर्थ झाल्यावर एखादा आजा आपल्या थोरल्या मुलाबरोबर रहात असे, किंवा तो कुटुंबाचा कर्ता पुरूषहि रहात असे. वैदिक वाङमयात पितामही म्हणजे आजी हा शब्द आलेला नाहीं.
५५प्रपितामह -- प्रपितामह म्हणजे पणजा. हा शब्द तैत्तिरीय संहितेंत व ब्राह्मणांत आलेला आहे.
५६स्वस्त्रीय -- तैत्तिरीय संहितेंमध्यें विश्वरूपाच्या पूर्वजाचें वर्णन करतांना बहिणीचा मुलगा अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
५७पौत्र -- पौत्र म्हणजे मुलाचा मुलगा. अथर्ववेद व पुढील ग्रंथ यांतून हा शब्द नातू या अर्थानें सारखा उपयोगांत आणिलेला आहे. जेव्हां ह्याचा नप्तृ या शब्दाहून वेगळा अर्थ असतो तेव्हां हा शब्द पणतू या अर्थानें योजिलेला असतो.
५८भ्रातृव्य -- हा शब्द अथर्ववेदाच्या एका उता-यांत आला आहे. तेथें तो भाऊं आणि बहीण यांनां लावण्यांत आल्यामुळें तो कांही तरी नात्याचा दर्शक दिसतो. याचा अर्थ बहुधा बापाच्या भावाचा मुलगा महणजे चुलतभाऊ असा असावा. ह्या अर्थावरून इतरत्र संहिता, अथर्ववेद व ब्राह्मण यांतून वारंवार 'प्रतिस्पर्धी' किंवा 'शत्रू' असा जो दुसरा अर्थ ह्या शब्दाचा केला आहे त्याचा उलगडा होतो. कारण अविभक्त कुटुंबांत चुलत भावाचें नातें शत्रुत्वाचें होण्यास साहजीकच कारणें असतात. मूळचा अर्थ कदाचित् 'पुतण्या' असाच असेल. कारण व्युत्पत्तिदृष्ट्या 'भावाचा मुलगा' असाच अर्थ निष्पन्न होतो. परंतु ह्यावरून या शब्दाच्या मागाहून आलेल्या अर्थाचा नीट उलगडा होत नाहीं. काठक संहितेंत चुलतभावाला खोटें सांगण्याबद्दल सांगितलें आहे; व भ्रातृव्याला 'द्वेष करणारा' ( द्विषन् ) 'दुष्ट' ( अप्रिय ), अशीं विशेषणें संहिता व ब्राह्मण ग्रंथांत लाविलेली आहेत. अथर्ववेदांत 'प्रतिस्पर्धी' ह्यास हाकून लावण्याकरितां किंवा त्याचा नाश करण्याकरिंतां बरेच मंत्र दिले आहेत.
५९गृहय -- शतपथाप्रमाणें 'घरांतील किंवा कुटुंबातील सर्व मंडळी' असा या शब्दाचा अर्थ आहे.
६०ज्येष्ठिनेय -- जेष्ठा ह्या शब्दाबरोबर हा शब्द आला असला म्हणजे बापाच्या 'पहिल्या बायकोचा मुलगा' असा याचा अर्थ होतो व अशा अर्थानें ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द आलेला आहे.
६१तात -- बापानें मुलास हांक मारावयाचें हें लाडके नांव आहे. हा शब्द ब्राह्मणग्रंथांत आलेला आहे व तो फक्त संबोधनार्थी आहे; पण चुकीमुळें ह्या शब्दाचा व तत ह्याचा घोटाळा होऊन बाप ह्या अर्थानें ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द आलेला आहे.
६२दार -- 'बायको' ह्या अर्थी हा शब्द सूत्रग्रंथांत, बहुतकरून पुल्लिंगी अनेकवचनीं, व बृहदारण्यकोपनिषदांत एकदां एकवचनी, आला आहे.
६३नप्ती -- हें नपात्चें स्त्रीलिंगी रूप् सामवेद आरण्यकांत आढळतें.
६४पितापुत्रीय -- म्हणजे 'बापलेकासंबंधी' हा शब्द संप्रदानासंबंधानें आलेला आहे. ह्याचा अर्थ, आसन्नमरणावस्थेत बाप ज्यावेळी आपल्या मुलास आपली शारिरीक व मानसिक शक्ति अर्पण करितो तो विधि असा आहे. हा विधि कौषीतकी उपनिषदांत वर्णन केला आहे.
६५पुत्रिका -- उत्तरकालीन वाङमयात पुत्रविरहित मनुष्याची मुलगी असा ह्या शब्दाचा अर्थ आलेला आहे. ही मुलगी तिचा बाप अशा अटीवर लग्नाच्या वेळीं वरास अर्पण करितो कीं, तिला जो मुलगा होईल त्यानें त्याचें और्ध्वदेहिक व श्राध्दें वगैरे केली पाहिजेत; व तो मुलगाहि त्याचाच पुत्र मानला गेला पाहिजे. ही स्थिति व हें नांव यास्काला कबूल असून निरूक्तामध्ये, ह्याचा ऋग्वेदांत उगम आहे, असें म्हटलें आहे. पण ऋग्वेदांतील उल्लेखामध्यें अशा त-हेचा स्पष्टार्थ निघत नाहीं व त्या उल्लेखावरून ही चाल ऋग्वेदकालीं होती असेंहि सिद्ध होत नाहीं.
६६भगिनी -- याचा शब्दश: अर्थ भाग्यवती, चांगल्या भाग्याची असा आहे; कारण तिला भाऊ असणें हें एक भाग्यच आहे असे निरूक्तांत ( ३. ६ ) म्हटलें आहे.
६७भार्या -- पुढील ग्रंथांत सामान्यत: 'बायको' या अर्थानें आलेला हा शब्द याच अर्थी संहितांतून आढळत नाहीं. पीटर्सबर्ग कोशाप्रमाणें हा शब्द प्रथम ऐतरेय ब्राह्मणांत आढळतो. डेलब्रुकच्या मतें हा शब्द तेथें फक्त घरांत राहणा-या मंडळीचा वाचक आहे. परंतु शतपथ ब्राह्मणांत याज्ञवल्क्याच्या दोन्हीं बायकांनां हा शब्द लावला आहे.
६८मातु र्भ्रार्तृ -- हा एक चमत्कारिक रीतींनें झालेला समास आहे. मैत्रायणी संहितेंत हा एकदां येतो व तेथें याचा अर्थ 'मामा' असा आहे. यालाच सूत्रांत 'मातुल' म्हटलें आहे. याप्रमाणें मामासंबंधी वेदकालीन माहिती फार थोडी सांपडते. इतिहास कालापर्यंत तरी काका आणि मामा यांचे तुलनात्मक महत्व पाहतां मामाचें महत्व अधिक असल्याचा पुरावा आढळत नाहीं. यावरून प्राचीन आर्यांची समाजव्यवस्था पितृसत्ताक होती ही गोष्ट धडधडीत दिसून येते.