प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
भाषा
१गाथा- ॠग्वेतांत गातुप्रमाणेंच ह्याचा अर्थ ‘गीत’ ‘कवन’ असा आहे. तथापि एका ठिकाणीं (१०.८५,६) मात्र त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे, कारण तेथें हा शब्द नाराशंसी आणि रैभी ह्याबरोबर आला आहे. अथर्ववेदावरील भाष्यकार या प्रकारचीं कांही उदाहरणें दाखवितात (२०,१२७) परंतु ओल्डेनबर्ग म्हणतो कीं ॠग्वेदाकडे पाहिल्यास ही उदाहरणें चुकीची दिसतात. दुसरीकडे पुष्कळ ठिकाणी गाथांचा उल्लेख आला आहे. आणि त्या छंदोबद्ध असतात असें ऐतरेय आरण्यकांत (२.३,६) म्हटलें असून तेथें ॠच्, कुम्ब्या आणि गाथा हे गीतांचे प्रकार आहेत असें म्हटलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (७.१८) ॠच् म्हणजे दैवी आणि गाथा म्हणजे मानुषी असा फरक दाखविला आहे (येथें ओम् ही दैवी गाथा (छंद) व तथा ही मानुष (अंगीकारविषयक) गाथा होय असें सायण भाष्य आहे). ब्राह्मणांमध्ये आणि सूत्रग्रंथांत गाथांचा जरी धार्मिक विधींशी संबंध आढळतो तरी त्या ॠच् यजुस् व सामनयापासून भिन्न आहेत असें स्पष्ट म्हटलें आहे व त्या वैदिक नसून त्यांस मंत्र म्हणत नसत. याप्रमाणेंच यज्ञगाथा या शब्दाचा अर्थ केवळ यज्ञविषयक गीत असाच होत असे. शतपथ ब्राह्मणांत पुष्कळ गाथा आहेत. त्यांत फक्त प्रसिद्ध राजंच्या यज्ञांच्या गोष्टी साररूपानें सांगितल्या आहेत. आणि मैत्रायणी संहितेमध्यें (३.७६) लग्नाच्या वेळी गाथा गात असत असें विधान आहे. कधींकधीं गाथेला नाराशंसी असें म्हणत. म्हणजे ती कोणातरी मोठया दात्याची स्तुति असावी.
२छंदस - ॠग्वेदामध्यें जेथें जेथें हा शब्द आलेला आहे तेथें तेथें ह्या शब्दाचा अर्थ सूक्त असा आहे. छंदस् हा शब्द छंद=संतुष्ट करणें ह्या शब्दापासून बनलेला आहे. व ह्याचा मूळचा अर्थ देवतेवर ज्याचा परिणाम होईल असा मोहक मंत्र असा आहे. ॠग्वेदांतील एका सूक्तांत त्याचप्रमाणें अथर्ववेदाच्या एका सूक्तांत हा शब्द अनेकवचनी “छंदासि” असा आला आहे व त्याच्याच बरोबर ॠक् , सामन् व यजुस् हे शब्द आलेले आहेत. ह्या शब्दाचा मूळ अर्थच ॠग्वेदाच्या ह्या सूक्तांत अभिप्रेत आहे व हा अर्थ अथर्ववेदांतील अभिचारविषयक अर्थास अनुरूप असा आहे. वृत्तबद्ध स्तुति ह्या मूळच्या अर्थापासून पुढें ॠग्वेदांत वृत्तबद्ध गीत असा ह्याचा अर्थ झाला. वृत्तामध्यें गायत्री, त्रिष्टुभ् वगैरे सर्व वृत्तांचा (छंदासि) उल्लेख आलेला आहे. अथर्ववेद व वाजसनेयि संहिता या ऋग्वेदोत्तर संहितामध्ये तीन किंवा सात वृत्तांचा उल्लेख आलेला आहे व शतपथ ब्राह्मणांत (८.३३,६) आठ वृत्तांचा निर्देश आहे. ॠग्वेद प्रातिशाख्याचे वेळीं ह्या वृत्तांची विस्तरशः छाननी झालेली दिसते पण हेंहि लक्ष्यात ठेविलें पाहिजे कीं ह्या प्रातिशाख्याच्या पूर्वी सुध्दां निरनिराळया वृत्तांमध्ये शब्द किती असावे ह्याबद्दल उल्लेख सापडतात. शतपथ ब्राह्मणांत म्हटल्याप्रमाणें ह्या छंदस् शब्दाचा निश्चित अर्थ वैदिक संहिता असा झाला. हा शब्द अथर्ववेदाच्या एका सूक्तांत बृहच्छन्दस् अशा समासाच्या रूपांत येतो. हें सामासिक विशेषण एका घराला लावलें आहे व त्याचा अर्थ मोठें छप्पर असलेला असा असला पाहिजें. ब्लूमफील्डला हा शब्दार्थ कबूल आहे. पण व्हिटनेच्या मतें छंदस्च्या ऐवजी छदिस् हा शब्द अधिक चांगला दिसतो व तसा तो तेथें शोध घालतो.
३पद- ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ श्लोकाचा एक चरण असा आहे. शांखायन ब्राह्मण ग्रंथांत ॠचा, अर्थॠचा, पाद व वर्ण असा अनुक्रम असून कोठें कोठें पद याचा वाक्य असा अर्थ होतो.
४मंत्रकृत- हा शब्द ॠग्वेद व तदनंतरच्या ग्रंथातून आला आहे व त्याचा अर्थ मन्त्र करणारे कवि असा आहे. हें नाम नसून सवत्र विशेषण आहे.
५शक्करी- अनेकवचनी. ह्याचा अर्थ शक्वरी मंत्र, किंवा शाक्वर साम ज्या मंत्रांत गायिलें जातें. ते महानाम्नी मंत्र असा आहे. हा अर्थ ॠग्वेदांत आहेसा वाटतो व तो पुढील ग्रंथांत खात्रीनें आलेला आहे.
६शपथ- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यामध्यें याचा अर्थ शाप न्याय कचेरींत घेण्याची शपथ असा नव्हें असा आहे. पण अशा त-हेची शपथ पूर्वी घेतली जात असें हें दाखविणारा ॠग्वेदांत एक उल्लेख आहे व त्या उल्लेखांत एक वक्ता (बहुतकरून हा वसिष्ठच) असें म्हणतो कीं आपण जर चेटुक करणारे असलों तर आपणाला मरण प्राप्त होवो व आपण जर तसे नसलो तर आपल्या शत्रूवर मृत्यूचा घाला पडो (७.१४४,१५). ह्या शपथ शब्दाचा अर्थ अथर्ववेदांत कांही ठिकाणीं आक्रोश व कांहीं ठिकाणीं शाप असा केलेला आढळतो. ॠग्वेदांमध्यें हा शब्द तसाच ठेवून दिलेला आहे. परंतु नैरुक्तामध्यें ‘शापाभिशापौ’ असें शपथ शब्दाचें अभिशापाहून पृथक्त्व दाखविलेलें आहे. अर्थात शपथ शब्दाचा अर्थ प्रतिज्ञा असा होतो. व व्यवहारांतहि शपथ शब्दाचा अर्थ ‘प्रतिज्ञा, आण’ असाच घेतला जातो.
७ससर्परी- ॠग्वेदांतील दोन ॠचांत हा शब्द आला आहे. मागाहूनचा अर्थ स्वीकारल्यास या शब्दावरून विश्वामित्रानें जमदग्नीपासून संपादन केलेलें वाणींतील नैपुण्य असा अर्थबोध होतो. हें भाषाचातुर्य काय होतें समजत नाहीं.
८प्रश्न- याचा अर्थ विचारपूस, चर्चात्मक, प्रश्न असा आहे. ‘प्रश्नम् एति’ या वाक्याचा अर्थ तो वादात्मक मुद्यासंबंधानें निर्णायात्मक निकाल मागतो असा तैत्तिरीय संहितेंत (२.५,८,५) आहे व तसाच इतरत्रहि आहे. व यावरूनच ऐतरेय ब्राह्मणांत, प्रश्न म्हणजे ‘निकाल’ ‘ठाम मत’ अशा अर्थानें हा शब्द आढळतो. यजुर्वेदातींल पुरुषमेध प्रसंगीच्या बळींच्या यादींत ‘प्रश्निन्’ ‘अभिप्रश्निन्’ आणि प्रश्नविवाक हे शब्द सांपडतात. यावरून असें वाटतें की, दिवाणी दाव्यांतील तीन पक्ष वादी, प्रतिवादी आणि मध्यस्थ (मध्यमशी) किंवा न्यायाधीश यांचा उल्लेख देण्याचा येथें उद्देश असावा.
९प्रलाप- अथर्ववेदांत व ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द ‘बडबडणें’ या अर्थाच्या आणखी इतर शब्दाबरोबर सांपडतो. ‘ऐतशप्रलाप’ या समासांत हा शब्द अथर्व वेदाच्या कांही वचनांचें नांव म्हणून आढळतो. मूल ग्रंथांत या नांवाला कांही आधार नाहीं.
१०वेद- अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथांत पवित्र ज्ञान या अर्थानें हा शब्द आला आहे. अनेकवचनी या शब्दाचा निश्चित अर्थ ॠक्, यजुः व साम असे तीन वेद असा आहे.
११वाच्- मैत्रायणी संहितेंत हा शब्द आला आहे. वैदिक ग्रंथांत वाच् हा शब्द बराच महत्त्वाचा आहे. पण त्यांतला
बराच भाग काल्पनिक व पौराणिक दंतकथासंबंधाचा आहे. शतपथ ब्राह्मणांत वाचेचे चार प्रकार सांगितलेले आहेत. मनुष्यांची, जनावरांची, पक्ष्यांची व सरपटणा-या लहान प्राण्यांची वाचा असें ते चार प्रकार होत. तैत्तिरीय व मैत्रायणी संहिता ग्रंथांत वाचा उत्पन्न करण्याचें श्रेय इंद्राला दिलेलें आहे. तूणव, वीणा, दुंदुभिसारख्या वाद्यांच्या आवाजाचा उल्लेख आलेला आहे व एका संहितेंत रथाच्या कण्याच्या ध्वनीचाहि उल्लेख आला आहे. कौषीतकि ब्राह्मणांत असें लिहिलें आहे कीं, कुरुपंचाल व उत्तरेकडील देश येथें राहणा-या लोकांची भाषा इतकी उत्तम होती कीं, इतर ठिकाणचे लोक तेथें भाषेचा अभ्यास करण्यास जात असत. उलटपक्षीं तेथल्या मूळच्या लोकांत बोलताना ग्राम्यपणा येई तो टाळण्यात येत असे. वाचेच्या विभागणीचा एक प्रकार म्हणजे दैवी व मानुषी हा होय. त्याचें उदाहरण म्हणजे ओम् व तथा इत्यादि. ब्राह्मणाला हे दोन्ही प्रकार माहीत पाहिजेत. या दोन भाषेतला फरक सायणाचार्य म्हणतात त्या प्रमाणें संस्कृत व अपभ्रष्ट भाषेंतला फरक व मानता सूक्तातील व कर्मपद्धतीमधील संस्कृत भाषा आणि नेहमींच्या प्रचारांतील भाषा यामधील फरक समजणें बरें. आर्य व ब्राह्मणाची भाषा याचा उल्लेख आलेला आहे त्यावरून अनार्य लोकांच्या भाषेच्या उलट संस्कृत भाषा असा अर्थ असावा. व्रात्य लोक स्वतः आदीक्षित असले तरी ते दीक्षित वाणी उच्चारीत व जें उच्चारण्यास सोपें असे त्यासहि दुरुक्त म्हणजे उच्चारण्यास कठीण असें म्हणत. याचा अर्थ अनार्य लोकांचा प्राकृत भाषा बोलण्याकडेच जास्त कल वहात होता. पण असा अर्थ स्वीकारतांनां आपणास एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे की शतपथ ब्राह्मणांत जिचा संबंध आलेला आहे ती भाषा बोलणारे व व्रात्य हे एकच असावेत.
१२अथर्वाण- तैत्तिरीय ब्राह्मणांत अंगिरस् शब्द अथर्ववेद दर्शविण्याकरितां योजितात. अथर्वागिरस् हा सामासिक शब्दहि त्याच अर्थी योजितात.
१३अथर्वागिरस्- ब्राह्मण ग्रंथांतील कित्येक उता-यांत अथर्ववेदाचे हें समूहवाचक नांव योजिले आहे. मूळ अथर्ववेदांतच हें नांव एकदां आलें आहे. परंतु सूत्रकालाच्या पूर्वी अथर्ववेद हें नांव अस्तित्वांत नव्हतें. हा समास अर्थवेदांत जीं दोन त-हेची सूक्तें आहेत त्यांचा द्योतक आहे असें ब्लूमफील्ड म्हणतो. पहिला भाग वेदांतील शांतीकर्माकडे (भेषजानि) दिलेला आहे आणि दुसरा भाग वै-यावर यातु (जादु अथवा अभिचार) वगैरे करितात त्याकडे योजिला आहे. ही विचारसरणी घोर आंगरिस् आणि भिषज् आथर्वण हीं जी दोन ॠषींची नांवे येतात त्यांवरून आणि पंचविंश ब्राह्मणांत आथर्वाणः आणि आथर्वणानि यांचा औषधीशी जो संबंध आहे त्यावरून संयुक्तिक दिसतें. शिवाय भेषज् (उपाय) हा शब्द अथर्ववेदांत खुद्द् त्या वेदालाच लाविला आहे असें मॅकेडोनल म्हणतो पण असें वर्णन आढळत नसल्यामुळें हें निराधार आहे आणि शतपंथांतील यातु (जादू) या शब्दांवरूनहि हाच अर्थबोध होतो. अथर्ववेदांतील या दोन त-हेच्या सूक्तांचे कर्तृत्व ज्या दोन ॠषींच्या नांवावर मोडतें त्यांमध्यें स्पष्टपणें काय भेद होता हें समजत नाहीं. तै. ब्रा. १२.८,२ येथें अथर्वागिरस असा सामान्य उल्लेख आहे. मागील वाक्यातून ॠचः यजूंषि अशी मंत्रांनां अनुलक्षण सामान्यपणें नांवे आलीं आहेत. त्या अनुरोधानें अथर्वागिरसः म्हणजे अथर्व किंवा अंगिरस या ॠषींनां दृष्ट झालेले मंत्र असा अर्थ सायणाचार्यांनीं केला आहे आणि तो बरोबर आहे. तैत्तिरीय आरण्यक व उपनिषद यांत असाच सामान्य उल्लेख आहे. बृहदारण्यकोपनिषदांत तीन ठिकाणी अथर्वागिरसः असा तैत्तिरीयांतील उल्लेखाप्रमाणेंच सामान्यपणें उल्लेख आहे. परंतु येथें विशेष असा आहे कीं, या उल्लेखापूर्वी तैत्तिरीयाप्रमाणें ॠच्, यंजूषि अशी सामान्यपणें नावे न येता ॠग्वेदोयजुर्वेद सामवेदः असा वेदपद घटित उल्लेख आला आहे. या वरून बृहदारण्यकोपनिषदकालीं इतर वेदाप्रमाणें आथर्वण मंत्रसमूहाला अथर्ववेद असें नांव मिळालें नव्हतें हेंच अनुमान दृढ होतें. छांदोग्योपनिषद ३.४,१,२ मधील उल्लेख याच अनुमानास पुष्टि देतो. शांखायन श्रौतसूत्रावरून असें दिसतें कीं, अथर्ववेद व अंगिरसवेद असे दोन भेद असून पहिला वेद औषधप्रक्रिया (भेषज्) सांगणारा व दुसरा वेद जारणमारण वगैरे अभिचार-प्रयोग सांगणारा असावा.