प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

 पक्षिनामें [ॠग्वेद]

अद्मसद.-हा शब्द (शब्दश: अर्थ ''भोजनाला बसणारे.'') ॠग्वेदांत ''मेजवानीचा पाहुणा'' अशा अर्थी वारंवार उपयोगांत आणिलेला दिसतो. परंतु गेल्डनेर या शब्दाचा अर्थ ''माशी'' असा करतो. कारण ती अन्नावर बसते.
उलूक.- ॠग्वेद आणि तदुत्तर ग्रंथांत हा शब्द दिवाभीताकडे योजितात. हा पक्षी त्याच्या ओरडण्याविषयीं प्रसिद्ध आहे. आणि त्याचें ओरडणें म्हणजे कांही अशुभाचें द्योतक असावें असें समजतात. अश्वमेधसमयीं दिवाभातें जंगली झाडांनां अर्पण करीत असत. कारण त्यांची वस्ती तेथेंच असे.
कपोत.-बहुतकरुन हें 'पारवा' या पक्ष्याचें नांव ॠग्वेद आणि नंतर आलेलें आहे. कांही कांहीं उता-यांत निर्ॠति (अपघात, अशुभ) याचा दूत उलूक याचेंहि हेंच नांव असावें असें वाटतें. 'अशुभसूचक पक्षि' असा जो पारव्यावर आरोप आहे तो बहुतकरुन प्राचीन समजुतीच्या आधारानें असावा. आणि भरतभूमी पलीकडेहि अशीच समजूत आहे.
कोक.-ॠग्वेद आणि अथर्ववेद या ग्रंथावरुन याचा अर्थ कोकिळ असा आहे. तीन ठिकाणी हा शब्द आला असून त्याचा अर्थ सायणमताप्रमाणें चक्रवाक असा आहे. अथर्ववेदांतील शब्दाचें भाषांतर विनाशक अन्योपजिवी प्राणी असें रॉथ करितो.
गृध्र.-'गिधाड,' 'गिधार' ॠग्वेद व नंतर हा शब्द आला आहे. त्याची शीघ्र गति आणि खराब मांस खाण्याची प्रीति हीं प्रामुख्यानें वर्णिलीं आहेत. साधारणपणें हा शब्द कोणच्याहि हिंस्त्र पक्ष्याला लावतात आणि गृंध्रामध्यें श्येन (गरुड) हा वरिष्ठ समजला जातो.
चक्रवाक.-बहुतकरुन आवाजावरुन पडलेलें हें बदकाचें नांव असावें. हिंदींत त्याला चक्वा आणि इंग्रजींत ब्राह्मणी डक् असें म्हणतात. हें नांव ॠग्वेदांत आणि यजुर्वेदांतील अश्वमेधींय बळींच्या यादींत आलें आहे. हें नांव अथर्ववेदांत वैवाहिक प्रेमाचें व विश्वासाचें द्योतक आहे. तसेंच रोमन व ग्रीक वाङ्मयांत त्याचें हेंच स्वरुप दाखविलें आहे.
चाष.-याचा अर्थ निळया रंगाचा काष्ठकूट पक्षी असा आहे. याचा उल्लेख ॠग्वेदामध्यें व त्याच प्रमाणें यजुर्वेदामध्यें अश्वमेध यज्ञाचे वेळीं जे प्राणी बलिदानास विहित म्हणून सांगितले आहेत त्यांमध्यें आहे.
चिच्चिका.- चिच्चिका हा शब्द ॠग्वेदांतल्या एका ॠचेंमध्यें आलेला आहे व त्याचा उल्लेख वृषारव या तितक्याच अप्रसिद्ध शब्दाबरोबर केलेला आहे. हे शब्द पक्षि शब्दाचे बोधक आहेत. या चिच्चिका शब्दाची दारिल यानें कौशिक सूत्रावर केलेल्या टीकेंत उल्लेख केलेल्या 'चिठ्ठ्क' शब्दाशीं तुलना करतां येईल.
तक्वन् -'तक्ववी' या दोन शब्दांचा अर्थ ॠग्वेदामध्यें 'जलद उडणारा पक्षी' असा आहे. सायणमतानें तक्वन्चा अर्थ जोरानें व जलद चालणारा तरतरीत घोडा असा आहे.
१०मयूर.- 'मोर' हा शब्द सामासिक शब्दांत ॠग्वेदांत येतो. येथें तयाचा अर्थ इंद्राचे घोडे (मयूररोमन् म्हणजे मोराच्या पिसाप्रमाणें केस असलेले) किंवा मयूर शेप्य=मोराच्या शेपटीसारख्या असलेले) असा आहे. यजुर्वेद संहितेंतील अश्वमेध प्रसंगींच्या दिलेल्या बळीच्या यादींत मोरांचाहि समावेश झाला आहे. लांडोरी ('मयूरी') चा अथर्ववेद व ॠग्वेद यांतून उल्लेख केला आहे व तोहि तिचा विषावर कांही उतार म्हणून केला आहे. मोरांच्या पिसांबद्दल सांप्रतकाळींहि कांही लोकांत एक प्रकारचा तिटकारा दिसतो.
११रोपणाका.-ॠग्वेदामध्यें व अथर्ववेदामध्यें एका पक्ष्याचें हें नांव आहे. तेथें याचा सारिका असा अर्थ असावा. पण कौशिक सूत्रावरील टीकाकार केशव याचें असें मत आहे कीं या शब्दाचा अर्थ एका प्रकारचें लांकूड असा असावा.
१२वर्तिका.-ॠग्वेदामध्यें लांडग्याच्या पंजांतून हिला आश्विनांनी सोडविली असा उल्लेख आलेला आहे. यजुर्वेदामध्यें अश्वमेधांचे वेळीं बलि दिले जाणा-या प्राण्यांचे यादींत हिचें नांव आलेलें आहे.
१३वायस.- ॠग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें मोठा पक्षी अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. 'कावळा' असा या शब्दाचा अर्थ फक्त षडिंश ब्राह्मणांत आलेला आहे.
१४शकुन.-'पक्षी,' हा शब्द ॠग्वेदामध्यें व तदुत्तर ग्रंथांत वारंवार आलेला आहे. याचा नेहमींचा अर्थ मोठा पक्षी किंवा शुभाशुभ सूचक पक्षी असा आहे. झिमर, या शब्दाची ग्रीस मधल्या शुभाशुभ दर्शविणा-या पक्ष्याक्षीं तुलना करतो.
१५शकुनि.-हा शब्द शकुन पक्ष्याप्रमाणेंच आलेला आहे. पण या शब्दावरुन भविष्यज्ञानाचा विशेष स्पष्ट बोध होतो. हा पक्षी श्येन किंवा सुपर्ण यांच्याहून लहान होता. तो खुणा सांगत असे व अशुभाची वार्ता अगोदर सांगे. ज्या ठिकाणीं याचा उल्लेख अश्वमेध यज्ञाचे वेळीं बलि दिले जाणा-या प्राण्यांच्या यादींत येतो त्या वेळीं या शब्दानें निराळया जातीच्या पक्ष्याचा उल्लेख केला असला पाहिजे. पुढें पुढें त्याला नहिरीससाणा म्हणूं लागले. पण दग्धकाक (डोमकावळा) असाहि याचा अर्थ असूं शकेल. तैत्तिरीय संहितेवरील भाष्यकाराच्या मतें कावळा असा याचा अर्थ आहे. इतरत्र हा शब्द अनेकदां आलेला आहे.
१६शुक.-'राघु.' हा शब्द ॠगवेदामध्यें आलेला आहे व त्यांत अशी इच्छा प्रकट केलेली आहे कीं, काविळीचा पिवळेपणा हा शुक व रोपणाका यांच्याकडे जावा. यजुर्वेद संहितेमध्यें अश्वमेधाचे वेळीं बलि दिले जाणा-यांच्या यादींत या पक्ष्याचें नांव आलेलें आहे. हा पीतवर्ण असतो व त्याला मनुष्यासारखी वाणी असते असें वर्णन तैत्तिरीय व मैत्रायणी संहितेंत आलेलें आहे असें कांही पाश्चात्य पंडितांचें मत आहे. ब्लूमफील्डचे मतानें अथर्ववेदांतल्या शारिशाका या अस्पष्टार्थी शब्दाच्या शाका या शब्दार्थाबद्दल शुक हाच शुद्ध पाठ बरा दिसतो.

X शुशुलूक.-- ॠग्वेदांत शुशुलूकयातु या समासांत हा शब्द आलेला आहे व तो एका राक्षसाच्या नांवाचा दर्शक आहे. सायणाच्या मतानें या शब्दाचा अर्थ लहान घुबड असा आहे. मैत्रायणी संहितेंत अश्वमेधाचे वेळीं बळि दिले जाणा-यांच्या यादींत 'शुशुलूका' या स्त्रिलिंगी रुपांत हें नांव आलेलें आहे.

१७श्येन.--ॠग्वेदामध्यें हें एका प्रबळ हिंस्त्र पक्ष्याचें नांव आलेलें आहे. बहुतकरुन हा पक्षी म्हणजे गरुडपक्षी असावा. वैदिक कालानंतरच्या वाङ्मयांत याचा अर्थ बहिरीससाणा किंवा त्याच्या सारखा एखादा पक्षी असा असावा. हा सर्व पक्ष्यांत अतिशय जलद चालतो व त्यामुळें लहान पक्ष्यांत भीतिदायक असतो; याच्या अंगांत शक्ति अतिशय असते. त्यामुळें तो पक्ष्यांच्या समुदायालासुद्धां भारी होतो; त्याचा पहारा मनुष्यावरहि असतो (नृचक्षस्); अशा प्रकारचे उल्लेख ॠग्वेदांत आहेत. यावरुन तो आकाशांत उंचावरुन जातो हें अनुमान निघतें. तो स्वर्गातून सोम आणतो असाहि उल्लेख आहे.
१८सुपर्ण.-'चांगले पंख असलेला'. हें एका हिंस्त्रपक्ष्याचे नांव आहे व तें नांव गरुडपक्षी किंवा गिधाड याचें असून ॠग्वेदामध्यें व उत्तरकालीन ग्रंथांत आलेलें आहे. ज्या ठिकाणी 'मृताचें मांस खाणारा' असा अर्थ अभिप्रेत आहे त्या ठिकाणीं या शब्दाचा गिधाड असा अर्थ घेतला पाहिजे. जैमिनीय ब्राह्मणामध्यें क्रौंचपक्ष्याप्रमाणें नीरक्षीरविवेक करणा-या गरुडपक्ष्याचा उल्लेख आला आहे. ॠग्वेदामध्यें सुपर्णाला श्येनाचा पुत्र म्हटलें असून दुस-या एका ठिकाणीं हे निराळे आहेत असें म्हटलें आहे. यावरुन झिमरला असें वाटलें कीं, बहिरीससाणा असा याचा अर्थ असावा. अथर्ववेदामध्यें या सुपर्णाच्या ओरडण्याचा उल्लेख आलेला आहे व तो डोंगरांत रहातो असेंहि याचें वर्णन आलें आहे.
१९हंस.--ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यामध्यें हा शब्द आलेला आहे. पक्षी नीलपृष्ठ आहेत, ते जमावानें राहतात, पाण्यांत पोहोंतात, मोठा आवाज काढतात व रात्रीं जागृत असतात असें त्यांचे वर्णन आलेलें आहे. हंस पक्ष्याला सोम नीर विवेक (पुढें नीर क्षीर विवेक अशी त्याची ख्याती झाली) आहे असें यजुर्वेदांत म्हटले आहे. अश्वमेधाचे वेळीं तो बली दिले जाणा-यांपैकीं एक आहे असेंहि त्याच्याबद्दल म्हटलें आहे.
२०हारिद्रव.--ॠग्वेदामध्यें पिवळया रंगाचा अशा अर्थी एका पक्षाचें हें नांव आलें असून हा पक्षी म्हणजे पिवळा जलखंजन पक्षी असावा. गेल्डनेर या पक्ष्याची ग्रीक लोकांतल्या Xapadpios या पक्षाक्षीं तुलना करतो.
२१क्रुञ्च, क्रौंञ्च-'चोंच व पाय लांब असलेला व आंखूड शेंपटीचा पक्षी', अथवा 'पाणलावा' याच्या दर्शक हीं निरनिराळीं रुपें आहेत. दूध आणि पाणी एकत्र केलें असतां पाण्यापासून दूध निराळें काढावयाचें हा जो मागाहून हंसाचा म्हणून प्रसिद्ध गुण, तो गुण पूर्वी वरील पक्ष्याचें अंगीं असे, असें म्हणत.
२२तित्तिर किंवा तित्तिरी-ज्याला मराठींत कवडा म्हणतात त्याचे हें नांव असून तें मागाहून झालेल्या संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांमध्यें आलेलें आहे. या पक्षाचें तित्तिर नांव त्याच्या ध्वनीवरुन पडलेलें आहे, या पक्ष्याचें बहुतरुन (निरनिराळया रंगाचे पंख असलेला) असें वर्णन आलेलें आहे. या पक्ष्यालाच दुसरें नांव कपिंजल व कलविंक असें आहे.
२३विदीगय.-तैत्तिरीय संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यांमध्यें हा शब्द एका प्राण्याचें नांव म्हणून आलेला आहे. तै.सं.वरील भाष्यांत याचा अर्ध कुक्कुटविशेष म्हणजे एक प्रकारचा कोंबडा असा केलेला आहे, व तै. ब्राह्मणावरील टीकेत त्याचा अर्थ पांढरा बक (श्वेत वक:) असा दिलेला आहे.
२४शितिकक्षि.-तैत्तिरीय संहितेमध्यें सायण याचा अर्थ शुभ्र पोटाचा (पांढरोदर) गृध्र असा करितात. हा शब्द नुसतें विशेषणहि असूं शकेल.
२५सघन.-हें एका पक्ष्याचें नांव आहे. कदाचित् गरुडपक्षी किंवा गृध्र असावा. हा शब्द तैत्तिरीय संहिता व तै. ब्राह्मण यांमध्यें आलेला आहे.
२६मशक.-'चावणारी माशी' अथवा 'चिलट.' अथर्ववेदांत याला तृप्रदंशिन् (म्हणजे फार लवकर चावणारी) असें म्हटलें आहे. या माशीला एक जहरी नांगी असते व ती या नांगीचा उपयोग बहुधा हत्तीवर करते. या प्राण्याचा उल्लेख इतरत्रहि आढळतो.
२७रघट.-अथर्ववेदांत पैप्पलाद शाखीय संहितेंत रघट: हा पाठ आहे. रॉथच्या मताप्रमाणें रघव हा पाठ बरोबर आहे. ब्लूमफील्डनें या शब्दाचा अर्थ श्येन असा केला असून त्याला रॉथचा तर्क मान्य आहे. लुड्विग मधमाशी हा अर्थ सुचवितो. परंतु पक्षी हा अर्थ बरोबर असावा असें वाटतें.
२८वयस् .-अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यांत पक्षी या अर्थी सामान्य नाम म्हणून हा शब्द आला आहे. वरील ग्रंथातच जनावरें व माणसें यांचें वय अशा अर्थानेंहि या शब्दाचा उपयोग केला आहे.
२९शरभ.-या शब्दाचा अर्थ टोळ असा असून अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखीय संहितेंत शरभ हा पाठ आहे. हा पाठ घेतला म्हणजे अर्थहि चांगला होतो असें व्हिटनेचें मत आहे.  
३०कोकिल.-हा शब्द आर्षकाव्यें व तदनंतरचे ग्रंथ यांमध्यें बरेच वेळां आलेला आहे. वैदिक काळांत काठक अनुक्रमणींतील एका राजपुत्राच्या नांवावरुन तो निघाला असावा.
३१मटची.-हा शब्द छांदोग्योपनिषदांत आला आहे व तेथें कुरुंवर मटचीनीं गर्दी उडविली असा उल्लेख केला आहे. शंकराचार्य याचा अर्थ 'वज्र' (अशनय:) असा करतात. आनंदतीर्थ आपल्या टीकेत याच ठिकाणीं पाषाणवृष्टय: (म्हणजे गारांचा वर्षाव) असा दुसरा पाठ देतात; शब्दकल्पद्रुम याचें मत सुद्धां आनंदतीर्थाप्रमाणेंच आहे; व त्यांत मटची म्हणजे एक लाल पक्षी (रक्त वर्ण, क्षुद्र पक्षि विशेष:--पाठ-पक्षी असा) अर्थ दिला आहे. या शब्दाचा 'टोळ' असा अर्थ असावा असें जेकब म्हणतो.

 

 सर्पनामें [तै.सं.]

कंकपर्वन् .-अथर्ववेदांत हा शब्द सर्पाला लावलेला आहे. कदाचित् याचा 'विंचू' असाहि अर्थ असेल. पैप्पलाद संहितेंत याचा निराळाच पाठ आहे. कदाचित् तो पाठ अशुद्ध असावा.
कसर्णील.-अथर्ववेदांत हें एका सर्पाचें नांव आहे. त्याचें दुसरें रुप कसर्णीर हें असून, तैत्तिरीय संहितेंत मंत्रद्रष्टा करसणींर काद्रवेय असा त्यावर मनुष्यधर्माचा आरोप केला आहे.
तिरश्चराजि, तिरश्चिराजि, तिरश्चीनराजि.-हे सर्व शब्द सापाच्या नांवाचें (अक्षरश: अर्थ --आडवे पाय असलेले) वाचक आहेत, व हे तिन्हीं शब्द ऋग्वेदोत्तर संहिता ग्रंथांत आलेले आहेत.
स्वज -- अथर्ववेद व ऋग्वेदोत्तर संहिता ग्रंथ यांमध्यें याचा अर्थ साप असा आहे. टीकाकारांच्या मतानें स्व-ज, स्वत:पासून जन्मलेला, असा याचा विग्रह आहे. रॉथ, वेबर व झिमर यांचे मत हा शब्द स्वज् ' वेष्टणें' या धातूपासून झाला असावा असें आहे. मैत्रायणी संहितेंमध्यें ( ३. ९, ३ ) हरिण सर्पाला मारतो असें म्हटलें आहे.

  प्राणिविशेष ( ऋग्वेद )

अज, अजा. --ऋग्वेद आणि तदुत्तर ग्रंथ यांत या शब्दाचा उपयोग बक-यांचे व्यावहारिक नांव या अर्थी केलेला सांपडतो. बक-या आणि मेंढया ( अजावय:) हे शब्द नेहमी एकदमच सांपडतात. बकरी वेळेला दोन किंवा तीन कोंकरे प्रसवते असा तैत्तिरीय संहितेंत ( ६. ५, १०, १ ) उल्लेख आहे. आणि तिच्या दुधाचाहि त्याच संहितेंत वारंवार उल्लेख आलेला आहे. अंत्येष्टीचे जे विधी दिले आहेत त्यांत बकरा हा पूषन् याचा बदली किंवा निदर्शक म्हणून त्याला प्राधान्य दिले आहे. गुराखी आणि मेंढपाळ यांच्या धंद्याप्रमाणे केवळ बकरी पाळणें हा एक स्वतंत्र धंदा असे असा वीजसनेयि संहितेंत ( ३. ११ ) उल्लेख आहे. ऋग्वेदांतील अंत्येष्टीसंबंधी मंत्रांत बकरा हा पूषनचा प्रतिनिधि म्हणून प्रेताबरोबर जाळीत असल्याचा उल्लेख नाही.
अथरी. --हा शबद फक्त ऋग्वेदांत आढळतो. त्याचा अर्थ अनिश्चित आहे. रॉथ व इतर कांही पंडित ' भाल्याचें टोक ' असा त्यांचा अर्थ करतात. परंतु पिशेलच्या मतें त्याचा अर्थ ' हत्ती ' असा आहे.
    अदृष्ट. --ऋग्वेद आणि अथर्ववेद यांत हा शब्द एक प्रकारचे कीटक किंवा कीटकांची एक जात दाखविण्याकडे योजिला आहे. सूर्याला देखील अदृष्टन् असें म्हटले आहे; आणि तो अर्थ स्पष्ट करण्याकरितां 'दृष्ट' हा शब्द दिला आहे. एका उता-यांत दृष्ट आणि अदृष्ट हे शब्द कृमी यांनां लाविले आहेत. आणि याचे कारण असें की प्रत्येक रोगाला कृमी असत अशी समजूत होती व जे कृमी सुक्ष्म दृष्टीने दिसणारे त्यांनां दृष्ट व न दिसणारे त्यांना अदृष्ट म्हणत.
     अनव्डाह्-- (शब्दश:-गाडी ओढणारा) गाडया ओढण्याला जे बैल जुंपतात त्यांचे हें व्यावहारिक नांव आहे. हे बैल बहुतकरून बडवलेले असतात. तरी पण ते नेहमी तसे असतातच असें नाही. गाडी ओढण्याकडे क्वचित गायीचाहि उपयोग होत असे.
     अवि. - ( मेंढी ) ऋग्वेद आणि तदुत्तर ग्रंथ यांत अज यांच्याबरोबर मेंढयाचाहि वारंवार उल्लेख आहे. त्यांचा मोठा शत्रु लांडगा हा होय; म्हणून मेंढपाळ त्यांची फार काळजी घेत असत. शत्रूकडून मेंढया आणि गायी जिंकून आणीत असत. सोमरस गाळण्याकरितां जी गाळणी करीत असत ती मेंढयांच्या लोंकरीची असत असा उल्लेख पुष्कळ वेळां केलेला आढळतो (अविमेषी, अव्य, अव्यय ). ज्या अर्थी ऋज्राश्व याने शंभर मेंढे मारले, आणि दानस्तुतीत शंभर मेंढया देणगी दाखल दिल्या असें वर्णन आढळते त्या अर्थी त्याकाळी मेंढयांचे मोठमोठे कळप असले पाहिजेत असें वाटतें ( मेष, वृष्टि ). मेंढा कधी कधी खच्ची करीत असत ( पेख). मेंढयाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे त्यांची लोंकर; म्हणूनच ' उर्णावती ' (लोकरयुक्त) हा शब्द मेंढयाचा द्योतक आहे. वाजसनेयि संहितेंत (१३,५०) मेंढयाला (तो आपल्या लोंकरीने मनुष्यांचे शीत निवारण करतो म्हणून ) मनुष्यें व इतर प्राणी यांचे संरक्षक प्रावरण आहे असें म्हटले आहे. मेंढयांच्या लोंकरीचे कपडे पूषन तयार करतो असें एक ऋग्वेदांत ( १०.२६,६) वचन आहे. मेंढ्या बहुधां कुरणांतच असत;परंतु त्यांनां मेंढवाड्यात ठेवीत असल्याबद्दलचे एक वचन ऋग्वेदात (१.१२६.७) आले आहे. गन्धार मेंढया लोंकरीकरितां प्रसिद्ध आहेत. पुष्कळसे मेंढयांचे कळप ( परूस् ) तीरावर असल्यामुळे त्या नदीस परूष्णी हें नांव मिळाले असे पिशेल म्हणतो.
     अहि.-ऋग्वेद आणि तदुत्तर ग्रंथ यांत सर्प या अर्थी हा शब्द योजिला आहे. सर्पाचा कात टाकण्याबद्दलचाहि उल्लेख आला आहे ( ऋ. ९. ८६,४४  ). सर्पाच्या चमत्कारिक चालीवरून त्याला दत्वतीरज्जु: असें नामाभिधान मिळाले आहे. सर्पाचा विषारी दंश आणि जमिनीवर सरपटत जात असतांना हिवाळयांतील त्याची सुस्ति यांचाहि उल्लेख केला आहे. चोर-प्रतिबंधक तोडगा म्हणून सर्पाच्या कातीचा उपयोग करीत असत (अथर्व १. २७). सर्पापासून रक्षण करण्याकरितां आणि त्याचा नाश करण्याकरितां अश्विन् यांनी पेदूला पैदू नांवाचा घोडा दिला होता असा ऋग्वेदांत उल्लेख आहे. नकुल हा त्याचा कट्टा शत्रु असून विषघ्र झाडाच्या उपयोगामुळे त्याला विषाची मुळींच भीति नाही. मनुष्य त्याला काठीनें किंवा त्याचें डोकें ठेचून मारतो. सर्पाच्या पुष्कळ जाति दिल्या आहेत :- अघाश्व, अजगर, असित, कंकपर्वन्, करिक्रत, कल्माषग्रीव, कसर्णील, तिरश्चराजि, तैमात, दर्वि, दशोनसि, पुष्करसाद, पृदाकु, लोहिताहि, शर्कोट, श्चित्त, सर्प इत्यादी.
     आखु-या शब्दांचा बरोबर अर्थ सांगतां येत नाही. त्याचा अर्थ 'चिचुंद्रि' असा असावा असें झिमर म्हणतो, तर त्याचा अर्थ 'उंदीर' आहे असें रॉथचे मत आहे. ऋग्वेद व उत्तरकालीन संहिता यांतहि या शब्दाचा उल्लेख आहे. पिशेल म्हणतो की, या शब्दाचा चोर हा लाक्षणिक अर्थ आहे; परंतु हिलेब्रँटला हें मत पसंत नाही.
     इभ. -- हा शब्द संदिग्ध अर्थाचा आहे. तो फक्त संहिता आणि मुख्यत्वेंकरून ऋग्वेद यांतच आढळतो, रॉथ आणि लुडविग् यांच्या मतें या शब्दाचा अर्थ ' आश्रित ' असा होतो; आणि झिमर म्हणतो की, या शब्दांत फक्त आश्रित आणि सेवक यांचाच नव्हे, तर राजवंश आणि मोठमोठया घराण्यांतील कनिष्ठ शाखेचे तरूण मनुष्य यांचाहि समावेश होतो. पिशेल आणि गेल्डनर यांच्या मताने त्याचा अर्थ 'हत्ती' असा आहे. या मताला भाष्यकार सायण आणि महीधर यांचाहि पाठिंबा आहे. निरूक्त अर्थ देखील या शब्दाचा अर्थ 'हत्ती' असाच आहे असे प्रतिपादन करतें. मेगॅस्थेनीस आणि नोआर्कस हे असे सांगत की, हत्ती बाळगण्याचा अधिकार फक्त राजासच असे; आणि म्हणूनच तत्साधित इभ्य या शब्दाचा 'श्रीमंत' असा असावा
     उपजिव्हिका, उपजीका, उपदीका. -- हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून ते एका जातीच्या मुंगीचे द्योतक आहेत. अथर्ववेदाप्रमाणे व्याधिप्रतिबंधक गुण ज्या पाण्यांत असतात त्या पाण्यापर्यंत जमिनीत शिरण्याची शक्ति या मुंग्यांना असते; आणि म्हणूनच कोणत्याहि विषाला उतारा म्हणून या मुंग्यांचा उपयोग करीत असत त्या रोगप्रतिबंधक असतात ही जी समजूत आहे ती बहुधां त्यांच्या वारूळाच्या मातीच्या गुणावरून, व त्यांत जें पाणी असतें त्यावरून निघाली असावी.
     १०उरा. -- मेंढया या अर्थी हा शब्द ऋग्वेदांत योजिला आहे. याचा दोन ठिकाणी उल्लेख आलेला असून त्यांच्यापैकी एका उल्लेखांत लांडग्यापासून मेंढयांना भीति असते असे म्हटले आहे ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. उरामयि ' अज मारणे ' हे लांडग्यांचे विशेषण ऋग्वेदांत एकदांच आलेले आहे; आणि हे दोनहि उल्लेख संहितेच्या एकाच मंडळात ( आठव्या ) आलेले आहेत. ही गोष्ट, उरा या शब्दाची उत्पति एखाद्या स्थानिक पोट भाषेमध्ये झालेली असें दर्शविते,
     ११उष्ठि, उष्ट्र. -- हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे असावेत. यांपैकी पहिला क्वचितच उपयोगांत येतो. रॉ आणि आफ्रेबर म्हणतात की, ऋग्वेद आणि ब्राह्मणे यांत त्यांचा अर्थ ' वशिंड असलेला पोळ ' किंवा ' म्हैस ' असा असावा; परंतु रॉथ म्हणतो की, वाजसनेयि संहितेत हा अर्थ थोडा संशयास्पद दिसतो, तेथें या शब्दाचा उंट हा अर्थ असावा; व हापकिन्सनें हाच अर्थ ग्राहय धरला आहे. हा प्राणी ओझें ओढण्याचें कामी (चार चार मिळून) उपयोगांत आणीत असत. ऐतरेय ब्राह्मणांत उष्ट्र व गो यांचा एकाच ठिकाणी उल्लेख असल्यामुळे उंट व बैल हे निरनिराळे प्राणी होते असें ठरतें.
     १२ऋक्ष. -- या शब्दाचा अर्थ ' अस्वल ' असा आहे. ऋग्वेदांत फक्त एकच वेळ आणि तदनंतर हा शब्द क्वचितच आढळतो. कारण, वेदकालीन आर्य लोक ज्या देशांत रहात असत तेथें अस्वलें दुर्मिळ असत. सप्त ऋषि या नांवाचा जो तारकापुंज आहे त्याला ' सात अस्वल ' हें नांव दिलें आहे. अस्वल हा शब्द अनेक वचनांत फारसा आलेला नाही.
     १३ऋश्य. -- या रूपांत हा शब्द ऋग्वेद आणि तदनंतरचे वाड:मय यांत येतो. अथर्ववेदांत ऋश्य व मैत्रायणी संहितेंत ऋष्य असा हा शब्द आढळतो, पण ऋष्य हेंच रूप बरोबर दिसते. या शब्दाचा अर्थ काळवीट असा आहे आणि त्याचे स्त्रीलींग रोहित असें आहे. हरिण सामान्यत: खाडयांत ( ऋश्यद ) पकडति असत. काळवीटाची प्रजोत्पादनक्षमता प्रसिद्ध आहे (आर्श्यवृष्ण्य).
    १४कपि -- वृषाकपि याच्यासमोर इंद्र आणि इंद्राणी यांच्या संवादांत वृषाकपि ' नर-वानर ' अशा संबंधात हा शब्द एकदां आलेला आहे. वानराचा रंग पिंगट असतो असें तेथे लिहिलें आहे. वानर केंसाळ असून, तो कुत्र्याचा शत्रु आहे असें अथर्ववेदांत म्हटलें आहे. माकडे माणसाळवीत असत असें ' वृषाकपि ' सूक्तांतील स्थलावरून आणि तैत्तिरीय संहितेंतील वनवासी मयु याच्या उल्लेखावरून दिसते.
     १५कशीका -- या प्राण्यांचे नांव ऋग्वेंदांत एकदां आलें असून भाष्यकार सायण त्याचा अर्थ ' वीजल ' असा करितो. फिकच्या मतें केसाळ मांजर व गेल्डनेरच्या मतें नकुली असा याचा अर्थ आहे.
     १६कुषुंम्भक -- ऋग्वेदांतील एका उता-यांत हा विशारी प्राणी होता असें लिहिले असून, अथर्ववेदांत कुषुम्भक म्हणजे विषाची पिशवी असें म्हटलें आहे. हा प्राणी ' मुंगुस ' (नकुल) होय असे सायणाचार्य म्हणतात.
     १७कोष्टृ -- (कोल्हा) शब्दश: याचा अर्थ 'हेल' 'गळा काढून रडणारा' असा आहे. कोल्हा किंवा खोंडक हे रानडुकराप्रमाणे स्वभावत:च भित्रे असतात असें ऋग्वेंदांत म्हटले आहे. हा प्राणी शवभक्षक आहे असें अथर्ववेदांत म्हटले आहे. वाजसनेयि संहितेत देखील हा शब्द आला असून भाष्यकार शृगाल असे दुसरें नांव देतो.
     १८क्ष्विका -- हिंस्त्र पक्षी या अर्थाने हा शब्द ऋग्वेदांत एकदां आला आहे. तैत्तिरीय संहितेतील अश्वमेधीय बळींच्या यादींतहि हा शब्द उल्लेखिला आहे, व तेथें त्याचा अर्थ भाष्यकारांनी रक्तमुखी वानरी असा केला आहे.
     १९गर्दभ -- गाढव हा घोडयापेक्षां कमी दर्जाचा असतो असें ऋग्वेदांत म्हटलें आहे.  तैत्तिरीय संहितेंत देखील तो घोडयाच्या खालच्या दर्जाचा प्राणी आहे, परंतु तो सर्व प्राण्यांत भार वाहण्यांत (भार-भारितम) श्रेष्ठ आहे असे म्हटलें आहे. त्याच ग्रंथांत गर्दभाचा घोडीबरोबर व तसेच गाढवीबरोबर संयोग होतो म्हणून, त्याला द्विरेतस् 'दुप्पट बीज असणारा' असें म्हटलें आहे. गाढवीच्या पिलाचा ठेंगणेंपणा, आणि त्याची बहुभक्षण्  शक्ति, या दोहींचाहि (तै. सं. ५. १, ५, ५) उल्लेख केला आहे. त्याच्याअप्रिय ओरडण्याचा उल्लेख अथर्ववेदांत (८. ६, १०.) केला आहे; आणि गाढवाच्या याच गुणामुळे ऋग्वेदांत हें नांव निंदापूर्वक एका गवयाला लाविले आहे. एका गवयाला शंभर गर्दभ देणगी दिल्याबद्दल वालखिल्य सूक्तांत उल्लेख आहे. खेंचर ( अश्वतर ) हें गाढव आणि घोडी यांच्यापासून उत्पन्न होते आणि म्हणून घोडीला द्विरेतस् 'दोन बीजे धारण करणारी' असे म्हटले आहे गाढवाला रासभ असे एक दुसरेहि नांव आहे. बृहदारण्यक उपनिषद् आणि अथर्ववेद यांत गर्दभी हे नांव आले आहे.
     २०गवय. -- एका जातीच्या बैलाचे नांव म्हणून हा शब्द ऋग्वेदापासून आला आहे. वाजसनेयि संहितेंत गौर आणि महिष यांच्याबरोबर याचाहि उल्लेख आहे; आणि तेथें जंगली गवयाचा देखील उल्लेख केला आहे.
     २१त्सरू. -- एखाद्या सरपटणा-या प्रा-यांचे नांव या अर्थी हा शब्द ऋग्वेदांत आला आहे. उत्तरकालीन ग्रंथांत चमसाची मूठ या अर्थाने हा शब्द आला आहे. अथर्ववेदांत व मागाहून झालेल्या संहिता ग्रंथांत याच अर्थाने हा शब्द नांगराचे ( लांगलाचे ) वर्णन करतांना आलेला आहे.
     २२पदि -- ऋग्वेदामध्ये एकदां हा शब्द आला असून सें. पी. कोशांत म्हटल्याप्रमाणे याचा अर्थ एक प्रकारचा प्राणी असा आहे. यास्काचे मतें याचा अर्थ हलणारा प्राणी असा आहे. पण दुर्गाचार्य याचा अर्थ पक्षी असा घेतो. या लेखाचा संबंध जाळ्यामध्यें (? मुक्षिजा पदि ) पकडण्याकडे असूं शकेल.
     २३पिपील. -- या शब्दाचा अर्थ मुंगी असा असून मृतांच्या शरीराचें मांस खाणा-या त्या असतात असें ऋग्वेदांत ( १०. १६,६ ) म्हटले आहे.
     २४ पुन:सर -- एका भुंकणा-या कुत्र्याचे नांव म्हणून हा शब्द ऋग्वेदांत आला आहे. हा कुत्रा चोराला पाहून भुंकतो असें म्हटले आहे. या शब्दावरून कुत्रा भुंकतांना इकडे तिकडे धावत असतो ही जी त्याची संवय तिचा बोध होतो. अथर्ववेदांमध्ये हा शब्द अपामार्ग या वनस्पतीला लाविला आहे; व तेथें त्याचा अर्थ उलट बीज (उलट कांटे ?) असणारी वनस्पति असा आहे.
     २५पेत्व. -- हा शब्द अथर्ववेदांत दोनदां आला आहे. पहिल्या उता-यांत याच्या वाजाचा ( बलाचा ) उल्लेख आलेला आहे; व त्याचा अर्थ 'सामर्थ्य', 'चपलता' असा आहे. परंतु सरळ अर्थ पाहतां पुरूष हाच अर्थ जास्त योग्य दिसतो. कारण, जननसामर्थ्याचा अभाव नाहींसा करण्यासाठी असलेल्या मंत्रांत हाच अर्थ योग्य दिसतो. दुस-या ठिकाणी पेत्वाचा उल्लेख तो घोडयाला जिंकीत असतांनां आला आहे. असल्याच प्रकारचा चमत्कारिक उल्लेख ऋग्वेदांत आला असून तेथें तो सिंहिंणीला वष करीत आहे असें लिहिंले आहे. या प्राण्याचा उल्लेख यजुवेंद संहितेंत अश्वमेध प्रसंगी बळींच्या यादीतहि आला असून, इतरत्रहि मधून मधून आला आहे. याचा अर्थ एडका असा असावा; या शब्दाचा तैत्तिरीय संहिंतेच्या टीकाकारांनी दुसरा अर्थ दिलेला आहे. परंतु या अर्थासंबंधी निर्णयात्मक असा काहीं पुरावा नाही. शिवाय, अथर्ववेदांतील ' वाज ' शब्द असलेल्या उता-यांतील अर्थाशी एडका हाच अर्थ नीट जुळता आहे. हॉपकिन्स याचा अर्थ बकरा असा करतो; परंतु असा अर्थ करण्याचें काय कारण असावें तें नीट समजत नाही. याचा पित्व किंवा पिड् याशी काय संबंध आहे, हे अगदी अनिश्चयात्मक आहे.
     २६प्लुषि. -- हे एका उपद्रवदायक कटिकाचें नांव ऋग्वेदांत आलें. आहे. याचा उल्लेख बृहदारण्यक उपनिषदांतहि आला असून यजुर्वेद संहितेंतील अश्वमेधप्रसंगी द्यावयाच्या बळींच्या यादीत याचा समावेश केला आहे. कदाचित् मुंग्यांचा हा एक प्रकार असावा.
     २७भुज्यु. -- सेंट पीटर्सबर्गच्या कोशांत याचा अर्थ 'साप' असा दिला आहे. हा शब्द ऋग्वेदांत दोन ठिकाणी येतो. वाजसनेयि संहितेंतहि हा शब्द आढळतो. परंतु त्या ठिकाणी या शब्दाचा अर्थ काय असावा हें सांगतां येत नाही.
     २८मंडूक. -- हे एक बेडकाचे नांव ऋग्वेद व तदनंतरचे ग्रंथ यांत आले आहे. यांचें मंडूको हें स्त्रीलिंगी रूप सुद्धां ऋग्वेदांत आलें आहे. ऋग्वेदाच्या या प्रसिद्ध ऋचेंत बेडकांची ब्राम्हणाशी तुलना केली आहे. कारण, पर्जन्यकालाच्या; सुरूवातीस बेडूक जागत होऊन ड्राव ड्राव करावयास सुरूवात करतात. ही ब्राम्हणांची चेष्टा केली आहे असें मॅक्समुल्लर म्हणतो. मॅक्समुल्लर प्रमाणेच गेल्डनर म्हणतो की, ही चेष्टा वसिष्ट ऋषींनी आपले प्रतिस्पर्धी जे विश्वामित्र ऋषि त्यांची केली आहे. परंतु सर्व बाजूंनी विचार करितां पर्जन्यचारूता--पर्जन्यरमणीयता--हा अर्थ करणारांचे मत जास्त सयुक्तिक दिसतें. बेडूक पाण्यांत रहात असल्यामुळे त्यांच्या अंगांत थंडपणाचा गुण जास्त आहे अशी समजूत आहे मृत मनुष्याचें दहन झाल्यावर तेथें बेडकास बोलविण्यांत येतें ( ऋ. १०. १६, १४ ). हेतु हा की, तो बेडूक त्या प्रेतास शांति देईल. त्याचप्रमाणे अथर्ववेदांत बेडकाला तापाचा दाह शांत करण्याकरितां बोलाविलें आहे.
     २९महिश -- मजबूत हा शब्द मृग शब्दाबरोबर अगर त्या शब्दाशिवायहि येतो. मृग म्हणजे रानटी पशु; आणि ऋग्वेद व तदुंत्तर ग्रंथ यांत याचा रेडा असा अर्थ होतो. 'महिषी' हा शब्द मागाहूनच्या संहिता ग्रंथांत येतो.
     ३०मृग -- ऋग्वेदांत आणि तदनंतरच्या ग्रंथांत रानटी पशु या अर्थी हा शब्द येता. याला कधी कधी भमि  ( भयंकर ) हेंहि विशेषण लावितात. इतरत्र म्हशीला महिष ( बलवान् ) हें विशेषण लाविलेले आढळतें; व तेंच पुढे म्हैस वाचक नांव झाले. हरिण जातीच्या जनावराचा बोधक म्हणून बहुधा हा शब्द योजितात. इतरत्र    उता-यांत रॉथच्या मतें पक्षी असाहि अर्थ होतो.
     ३०मृगहस्तिन. -- हात असलेलें जनावर. हा शब्द ऋग्वेदांत हत्ती या अर्थी दोन वेळ समासांत योजिला आहे. यावरून वैदिक काळांतील लोकांना हत्ती प्रथमच माहित झाला होता याचा तो पुरावा होय असें रॉथ म्हणतो, वैदिक काळच्या लोकांना हत्ती हा नवीन परिचित प्राणी होता. या मताला पिशेलनें विरोध केलेला आहे. कारण मृगमहिष आणि मृगसूकर (अथर्व १२. १, ४८) हे शब्द अनुक्रमें म्हैस आणि डुकर या अर्थी योजिलेले आढळतात. परंतु महिष या शब्दाने रॉथच्या मताला दुजोरा येतो. आणि ऋग्वेदांत सूकर असा नुसताच शब्द आढळतो, व मृगसूकर हा अथर्ववेदांत एकाच मंत्रांत वराह शब्दाशी विरोध दाखविण्याकरितां योजिलेला आढळतो.
पुडे हस्ती हें विशेषण हत्ती या जनावरांचे नांव बनले. ऋग्वेदांत हत्तीला मृगवारण ( भयकंर प्राणी ) असेंहि म्हटले आहे वारण हे विशेषण पुढें हत्तीचेंच नांव बनलें. पाळलेल्या हत्तिणीच्या साहाय्याने हत्तींना पकडीत असत असें ऋग्वेदांत वर्णन आलेले आहे हें पिशेलचें मत चुकीचें आहे.
     ३१मेष -- हा शब्द ऋग्वेद आणि तदुत्तर ग्रंथ यांत गेंडा, मेषी, बकरी या अर्थी योजिलेला आढळतो. तसेच दोन्हीहि शब्द लोकर या अर्थी योजिलेले आढळतात. विशेषत: त्याचा उपयोग सोमशुद्धीसाठी केलेला आढळतो. वाजसनेयि संहितेंत रानटी गेंडयाचा उल्लेख आलेला आहे.
     ३२लोध -- ऋग्वेदांतील एका दुर्बोध ऋचेमध्ये हा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ रॉथच्या मतें एखादा रक्तवर्ण प्राणी असा आहे, तर ओल्डेनबर्गच्या मतें तांबडया रंगाचा बकरा असा आहे.
     ३३लोपाश -- कोल्हा या प्राण्याचे नांव म्हणून हा शब्द बहुधां ऋग्वेदांत आलेला आहे. यजुर्वेद संहितेमध्ये अश्वमेधाचे वेळी बळी दिले जाणा-या पशूंच्या यादीत या लोपाशाचा उल्लेख आहे.
     ३४वम्र व वम्री - ऋग्वेदांत व तदुत्तरकालीन ग्रंथांत मुंगळा व मुंगी यांची नांवे म्हणून हे दोन्ही शब्द आले आहेत. यांचा वाळवी असाहि अर्थ क्वचित असतो.
     ३५वम्रक - ऋग्वेदांमध्ये एके ठिकाणी हा शब्द आलेला असून त्या ठिकाणी त्याचा अर्थ मुंगी असा असावा असें रॉथचे गत आहे. पण पिशेलचे मत भित्र आहे. तो म्हणतो की, हा शब्द विशेषनाम असावा व कदाचित तो वम्र या अर्थी असावा; आणि त्याचा अर्थ मुंग्यांनी खाण्याच्या यातनेपासून ज्याची सुटका झाली, अशा एका कुमारिकेचा मुलगा असा असावा. यासणांचे हेंच मत आहे.
     ३६वराह - हा शब्द ऋग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ यांमध्ये आलेला आहे. 'स्वर्गोतला वराह' असें रूद्राचे वर्णन आलें आहे. वराहाची शिकार करतांना कुत्र्यांचा उपयोग करण्याच्या चालीचा उल्लेख एकदां (ऋ. १०.२६,४) आलेला आहे. त्याच शब्दाचा पर्याय 'वराहु' हा शब्द देवादिकाविषयी अलंकारिक रीतीने बोलण्याशिवाय कोठेहि आलेला नाही.
     ३७वारण. - ऋग्वेदांत दोन ठिकाणी, रॉथ याने हा शब्द मृगाचे विशेषण आहे असें गृहीत घरून त्याने जंगली जनावर असा त्याचा अर्थ केला आहे. परंतु ग्रंथांतरी स्वीकारलेला हत्तीचा हा नेहमीचा अर्थच येथेंहि घेतला पाहिजे असें दिसतें. अथर्ववेदामध्ये वारणी हा स्त्रीलिंग शब्द 'हत्तीण' या अर्थानेंच आलेला आहे.
     ३८वृक -- ऋग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत देखील हा शब्द वारंवार येतो. मेंढया, बकरी, वासरें व मनुष्यें यांचाहि हा शत्रु होता. याचा रंग तांबडा ( अरूण ) आहे असे म्हटलेले आहे. ऋग्वेदांमध्ये वृकी या शब्दाचाहि वारंवार उल्लेख आलेला आहे.
     ३९वृश्चिक -- ऋग्वेद आणि अथर्ववेद यांमध्ये याचा अर्थ विंचू असा आहे. याच्या विषाबद्दल सर्पाच्या विषाप्रमाणे लोकांना भय वाटत असे. हा हिवाळयांत पृथ्वीवर निचेतन पडतो असें वर्णन ( अ. वेद १२. १, ४६ ) आहे.
     ४०वृषारव. -- 'बैलाप्रमाणे ओरडणारा' असा या शब्दाचा अर्थ आहे. ऋग्वेदामध्ये हें एका प्राण्याचें नांव आहें. शतपथ ब्राह्मणांत हा शब्द द्विवचनी आहे व त्याचा अर्थ ठोकणी किंवा टिपरी असा आहे.
     ४१शश -- 'ससा' हा शब्द ऋग्वेदांमध्ये एकदा आलेला आहे, व त्यांतच या शशाने एक दांत किंवा वस्तरा गिळल्याचा उल्लेख आलेला आहे. मागाहून झालेल्या ग्रंथांतहि या प्राण्याचा प्रसंगाने उल्लेख आलेला आहे.
     ४२शिशुमार, शिशुमार -- जलचर प्राण्याचें नांव म्हणून हा शब्द ऋग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथ यांमध्ये आला आहे. हा प्राणी म्हाणजे एक तर मकर असावा किंवा गाधा मासा असावा.     
     ४३ श्वान - ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्ये याचा अर्थ कुत्रा असा आहे व याचें स्त्रीलिंगी रूप् शुनी असें आहे. कुत्रा हा माणसाळलेला प्राणी असे व तो चोर किंवा इतर बाहेरचे लोक यांपासून घराचे संरक्षण करी. वराहाची शिकार करतांना त्याचा उपयोग होत असे; पण सिंहापुढे त्याचा टिकाव लागत नसे. वालखिल्य सूक्तांमध्ये दानस्तुतीत शंभर कुत्र्यांच्या देणगीचा उल्लेख आला आहे. इतर ठिकाणी या कुत्र्याविषयी असा उल्लेख आलेला आहे की, तो गलिच्छ असल्यामुळे यज्ञांतल्या बळीत अयोग्य आहे, व यज्ञमंडपांतून त्याला हांकून देण्यांत येत असे. कुत्र्याचे मांस अगदी निर्वाणीचे वेळी खावयाचें असे. मेजवानीचे वेळी जनावर कापून त्याचे मांस खाल्ल्यावर जी हाडें उरत ती कुत्र्यास चघळण्यास दिली जात असत. ( अथर्व ६. ३७,३ ). ऋग्वेदांत एका दंतकथेमध्ये गायीचा शोध करणा-या इमानी कुत्रीचा म्हणजे सरमेचा उल्लेख आलेला आहे. रूद्राला यजुर्वेदामध्यें श्वपति असें म्हटलेलें असून त्याच संहितेंत पुरूषमेधाचे वेळी बलिदानास योग्य अशा प्राण्यांच्या यादीत श्वानाचा ( कुत्र्याचा रक्षक ) उल्लेख आलेला आहे. कांही ग्रंथांत चतुरक्ष ( चार डोळयांच्या ) कुत्र्यांचा उल्लेख आलेला आहे तो काल्पनिक आहे हे उघड आहे.
     ४४सारमेय - 'सरमेचा वंशज.' एका पौराणिक कथेतल्या इंद्राच्या कुत्र्याचे हें नांव असून ऋग्वेदामध्ये पृथ्वीवरील कुत्र्याला व यमाच्या कुत्र्यालाहि हें नांव दिलेलें आहे.
     ४५सालावृक -- ऋग्वेदामध्ये हा शब्द दोनदां आला असून याचा अर्थ तरस किंवा रानकुत्रा असा आहे. इंद्राने यतीचा नाश केल्याविषयीची कथा तैत्तिरीय संहितेंत आली असून त्या कथेंत हाच अर्थ बरोबर जुळतो. त्या कथेंत असें म्हटले आहे की, इंद्राने या यतींना सालावृकांच्या तोंडात दिले. याच सालावृक शब्दाचा सालावृकेय हा दुसरा पाठ आहे; व त्याचा अर्थ सालावृकाचा वंशज असा आहे. या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप् सालावृकी असें असून त्याचा उल्लेख तै. सं. तेंत आला आहे.
     ४६सिंह -- ऋग्वेदांत व तदुत्तरग्रंथांत याचा अर्थ सिंह असा आहे. सिंहाच्या गर्जनेचा ( नद् ) नेहमी उल्लेख आलेला आहे. व या गर्जनेला स्तनाथ असें नांव आहे. हा नेहमी भटकत असतो ( कुचर ), डोंगरात राहतो      ( गिरिस्थ ); व हा ठार मारणारा भयंकर वनपशु आहे ( मृगो भीम उपहत्नु: ) याची व रूद्राची तुलना केली आहे. पाण्यांत शिरणा-या अग्नीची जेव्हां सिंहाशी तुलना केलेली असते तेव्हा पाणी पिण्याच्या जागेमध्ये जनावरांवर उडी घालण्याच्या सिंहाच्या संवयीचा उल्लेख केला असावा. कोल्हयानें सिंहाचा पराभव करावा हें चमत्कारिक आहे असेंहि वर्णन आलेले आहे. मनुष्यांनां सुध्दा त्याची भयंकर भीति वाटल्यामुळे ते त्याला पिंज-यांत ठेवीत. त्याला पकडण्याकरितां लोक दबा धरून बसत व शिकारी लोक त्याची शिकार करीत अशीहि वर्णने आलेली आहेत. कुत्र्यांनां सिंहाचें भय वाटे. सिंहींण ही सुध्दा तिच्या शौर्याबद्दल प्रसिद्ध आहे. सुदासाच्या शत्रुविरूद्ध त्याला जी इंद्राने मदत केली तिची तुलना मेंढ्याने ( पेत्व ) सिंहिणीच्या केलेल्या पराभवाशी केली आहे. मनुष्यावर हल्ला करतांना सिंहिण आपले जबडे उघडते याचा उल्लेख एैतरेय ब्राह्मणांत आलेला आहे. यजुर्वेद संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत सिंहिणीचा उल्लेख आलेला आहे.
     ४७सूकर -- हा शब्द ध्वन्यनुकारी असावा असें दिसतें. पण हा शब्द फार प्राचीन असून तो इंडो-यूरोपीय कालांतील असावा. लॅटिन भाषेतल्या [ सुक्युलस ] लहान डुकर या शब्दाशी सदृश असून व्युत्पतिशास्त्रदृष्ट्याहि याचा अर्थ बदलला आहे. हा शब्द ऋग्वेदांत व तदुत्तरग्रंथांत आलेला आहे. मृग या शब्दाबरोबर हा शब्द अथर्ववेदांतहि आलेला आहे; आणि हे दोन्ही शब्द मिळून त्यांचा अर्थ रानडुकर असा होतो.
     ४८हरिण -- ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्ये याचा अर्थ एक प्रकारचा काळवीट असा आहे. हा फार जलद चालणारा व भय उत्पन्न करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या शिंगाचा मंतरलेल्या तोडग्यापमाणें उपयोग होतो. याला यव खाण्याचा फार नाद आहे. मैत्रायणी संहितेमध्ये तो स्वज म्हणजे सर्पांना ठार मारतो असें याचे वर्णन आलेले आहे. या शब्दाचें स्त्रीलिंगी रूप् हरिणी असें आहे.
     ४९हस्तिन् - हात असलेला असा याचा मूळचा अर्थ असून मृग म्हणजे जनरवर या शब्दाने युक्त हस्ति अशा अर्थाने हा शब्द ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद आलेला आहे. पुढे पुढे नुसत्या हस्तिन् या विशेषणाचाच हत्ती असा अर्थ होऊं लागला. या प्राण्याची त्याच्या सामर्थ्याबद्दल व जननशक्तीबद्दल प्रसिद्धि होती. या जनावराचा उल्लेख मुखाने जिन्नस उचलणा-या प्राण्यांच्या उलट माणूस व माकड या हातानें उचलणा-या प्राण्याबरोबर आलेला आहे. हस्तिप या शब्दावरून तो माणसाळलेला प्राणी होता हें स्पष्ट आहे. असे माणसाळलेले हत्ती दुसरे हत्ती पकडण्याच्या कामी उपयोगी पडत. पण या हत्तीच्या लढाईचे कामी उपयोग होत असल्याबद्दलचा उल्लेख नाही. तरी पण क्तेसियस व मेगॅस्थिनीझ यांनी हे हत्ती त्यांच्या वेळी उपयोगांत आणले जात असें म्हटलें आहे. हत्तीनां डांसांपासून उपद्रव होई असें अथर्ववेदांत म्हटले आहे.
          ५०कक्कट - हा शब्द यजुर्वेद संहितेंत 'खेंकडा' याचा दर्शक असून कर्कट याचें हें प्राकृत रूप् आहे; व उत्तर वाड्:मयांत कर्कट हा सर्वसाधारण शब्द आहे. तथापि रॉथ म्हणतो की, त्याचा अर्थ पक्षी असा आहे. आणि ककर याच्याशी त्याचें साम्य आहे.
     ५१कश्यप - अथर्ववेद आणि तदुत्तर ग्रंथ यामध्ये हा शब्द वारंवार येतो व त्याचा अर्थ 'कूर्म, कच्छप' असा आहे.
     ५२कुलीकय - हें रूप् तैत्तिरीय संहितेंत एका प्राण्याच्या नांवाचे आहे; आणि महीघर याने आपल्या टीकेंत स्पष्टीकरण दिलें आहे त्यावरून हे एका माशाचे नांव असावें असें दिसतें. याचे वाजसनेयि संहितेंतील नांव कुलीपय आणि अथर्ववेदांतील कुलीकय असें असून, या नांवाचा परिचय नसल्यामुळे बोलतां बोलतां कदाचित् अपभ्रंश झाले असावे.
     ५३कूर्म - याचा अर्थ कांसव. उत्तरकालीन संहिता आणि ब्राह्मण यांत हा शब्द पुष्कळ वेळां आला असून त्याच्या स्वाभाविक धर्माबद्दल काहींच लिहिलेले नाही.
     ५४कृमि -- 'कीटक' ऋग्वेदोत्तर संहिता आणि अथर्ववेद यांत कीटकांचा बराच उल्लेख आला आहे. ते विषारी असतात; पर्वत, वनें, पाणी, झाडे व मनुष्यदेहांत देखील ते असतात. मनुष्य आणि प्राणी यांच्या रोगाची कारणें हे कृमी होत अशी सार्वत्रिक समजूत असें. अथर्ववेदांत या कृमींना प्रतिबंधक उपाय म्हणून तीन सूक्तें आहेत. पहिलें सूक्त सर्वसाधारण आहे. दुसरें गुरांमधील कृमीचा नाश करण्याचे उपाय शिकवितें; आणि तिसरें मुलानां कीटकांपासून कसें बरें करावें हे सांगतें. मनुष्यामध्ये कीटकांची राहण्याची जागा म्हणजे डोकें आणि बरगडया आणि नंतर तेथून डोळे, नाक आणि दांत, त्यांचा रंग काळसर पिंगट असून, शरीराचा पुढचा भाग पांढरा, काळे कान आणि तीन डोकीं असतात. त्यांची विशिष्ट नांवे बरीच आहेत:- अलाण्डु, एजत्क, कष्कण, कीट, कुरूरू, नीलांगु, येवाष, वघ्रा, वृक्षसर्पी शलुन, शवर्त, शिपवित्नुक व  स्तेग.
     ५५गोधा -- या शब्दाचा अर्थ लुडविग आणि वेबर यांच्या मताप्रमाणे 'मगर' असा असावा; कदाचित् रॉथ आणि झिमर म्हणतो त्याप्रमाणे मोठा सरड किंवा पाल असाहि असावा. अथर्ववेदांतहि बहुतकरून याचा अर्थ प्राणीच असावा.
     ५६जष -- जष हें नांव एका जलचराचें किंवा माशाचें म्हणून अथर्ववेद व तैत्तिरीय संहिता यांमध्ये आलेले आहे. तै. संहितेवरील भाष्यांत जष म्हणजे मकर हा प्राणी असावा असें म्हटलें आहे. हा शब्द गोपथ ब्राह्मणांतहि आलेला आहे.
     ५७मुश्कर -- रॉथच्या मताप्रमाणे लहान जनावर किंवा कीटक या अर्थी हा शब्द अथर्ववेदांतल्या एका   उता-यांत आला आहे; परंतु हा उतारा अशुद्ध आहे असे त्याचे मत आहे. पैप्पलाद संहितेत पुष्करम् हा पाठ बरोबर आहे असे ब्लूमफील्ड म्हणतो. तै. संहितेत मुश्कर याचा अर्थ अश्वमेधांतील पशु असा आहे.
     ५८ वृषदंश -- या शब्दाचा अर्थ बळकट दांतांचा असा आहे. यजुर्वेद संहितेमध्ये एका मांजराचे नांव म्हणून हा शब्द आला असून याचा उल्लेख अश्वमेध यज्ञाच्या वेही बळी दिल्या जाणारांच्या यादीत आहे. पंचविश ब्राह्मणांतहि यांचे नांव आहे. या ब्राह्मणांत याच्या शिकेचा उल्लेख आहे. यावरून हे मांजर माणसाळलेले होते असें सिद्ध होते. गेल्डनेर म्हणतो की, अथर्ववेदांतील एका सूक्तांत विचित्र विशेषणांनी ज्याला संबोधिले आहे तो प्राणी बहुतेक घरांतील मांजर असावा. त्या विशेषणांपैकी एक विशेषण म्हणजे वृषदती हे आहे. पण व्हिटने गेल्डनरच्या या मताविरूद्ध आहे.
     ५९शयण्डक -- तैत्तिरीय संहितेमध्ये हे एका प्राण्याचे नांव आहे; पण मैत्रायणी व वाजसनेयि संहिता यांत हें. नांव शयंदक असें लिहिलेले आहे. रॉथचे मताने याचा अर्थ एक प्रकारचा पक्षी असा असावा; पण तैत्तिरीय संहितेवरील टीकाकार याचा अर्थ कृकलास म्हणजे सरडा असा करतो.
     ६०अश्वतर, अश्वतरी -- ही खेचराची पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अनुक्रमे नांवे आहेत. अथर्ववेद आणि तदुत्तर ग्रंथ यांत या प्राण्यांचा बराच वेळ उल्लेख केलेला आहे. यांची उत्पत्ति कमी असे म्हणून यांना घोडयापेक्षां कमी दर्जाचे मानीत असत. परंतु खेंचरांच्या गाडया सर्वसाधारण प्रचारांत होत्या.
     ६१आशुंग -- अथर्ववेदाप्रमाणे कोणतातरी प्राणी असावा. याची विशेषणे 'तरूण', 'बालक' ( शिशुक ) ही आहेत. यावरून रॉथ म्हणतो की त्याचा अर्थ एक पक्षी ( जलद उडणारा ), अथवा 'आपल्या आईकडे जाणारे शिंगरू' असाहि असावा. सायण तया विशेषणाचा अर्थ शुशुक म्हणजे प्राणी असा करितो. ब्लूमफील्ड या दोन शब्दाचे भाषांतर ' जलद शिगरूं' 'आशुंग' 'शिशुक' असे करितो.
     ६२उपक्कस -- अथर्ववेदांत याचा बीजाला उपद्रव देणारा प्राणी असा उल्लेख आहे. तथापि सायण तो शब्द अनेकवचनी विशेषण ( अपक्कस: =अदग्धा: ) असा घेतो, परंतु पैप्पलादशास्त्रीय संहितेंत उपक्कस असेच आहे.
     ६३कुरीरिन् -- ( 'कुरीर अललेला' ) हा अथर्ववेदांतील एका संदिग्ध अथवा ह्यर्थी उता-यांत असून त्याचा एक तर ' शेंडी असलेला प्राणी ', - कदाचित झिमरच्याप्रमाणे 'मोर' - असे नाम अथवा अज 'बकरा' याचे विशेषण्, अशा अर्थी त्या शब्दाचा 'श्रृंगी' असा अर्थ होईल. परंतु दुस-या अर्थात शब्दाचा अलंकारिकरीत्या उपयोग असावा असे मानणे सयुक्तिक दिसते. पंचविश ब्राह्मणांत ओपश हा शब्द गुरांची शिंगे या अर्थी उपयोगांत आणिला आहे, यावरून कुरीर म्हणजे ' शिंग ' हे जे गेल्डनेरचे मत आहे, त्याचा स्वीकार करणे जरूर दिसत नाही.
     ६४जगत -- ( हलणारा, चल ) हा शब्द कधी कधी अथर्ववेदांमध्ये व पुढील ग्रंथांत पाळलेल्या जनावरांस (जी श्वापदे रानटी नव्हेत त्याना) लावलेला आहे. कधी कधी जगत् या शब्दाने गाईखेरीज इतर सर्व पाळलेल्या जनावरांचा बोध होत असे.
     ६५ पिपीलिका -- अथर्ववेद व मागाहूनच्या ग्रंथांत याचा मुंगी असा अर्थ आहे. या शब्दावरून मुंगीची लहान जात असा जो मागाहूनच्या कोशांत अर्थ दिला आहे तो खरा नाही. मात्र यावरून मुंगीच्या लहान आकाराचा बोध होतो व तो अल्पार्थवाचक पिपीलिका या शब्दावरून व्यक्त होतो. हे रूप छांदोग्य उपनिषदांत आलें आहे.
     ६६पुरीकय -- अथर्ववेदामध्ये एका जलचर प्राण्याचे हे नांव आले आहे. व हें नांव म्हणजे मैत्रायणी संहितेमध्ये आलेल्या पुलीकयाचे, वाजसनेयि संहितेमध्ये आलेल्या कुलीपयाचें व तैत्तिरीय ब्राम्हणामध्ये आलेल्या कुलीकयाचे अन्य रूप आहे. हा कोणता प्राणी होता हें समजत नाही.
     ६७व्यद्वर -- 'भोक पाडणारा' अथर्ववेदामध्ये एका ठिकाणी हें एका किडयाचें नांव आलेलें आहें. या ठिकाणी व्यध्वर असा पाठ असावा असे काहीं पंडितांचे मत आहे. व्हिटनेचे असे मत आहे की या शब्दाचा संबंध वि--अध्वन याच्याशी असून व्यध् 'भोक पाडणे' याच्याशी नसावा. हिरण्यकेशी गृह्यसूत्रामध्ये हा शब्द मशकाबरोबर आलेला आहे. त्याचप्रमाणे तो अथर्ववेदाच्या दुस-या एका स्थलीहि आला असावा व येथें शंकर पंडित व व्हिटने यांच्या मतें हा शब्द व्यदूर असाच असावा.
     ६८व्याघ्र -- हा शब्द ऋग्वेदांत कधी आलेला नाही पण अथर्ववेदांत वारंवार आलेला आहे, त्याचप्रमाणे सिंह हा शब्दहि आलेला आहे. यावरून रास्त असें अनुमान काढतां येईल की, ज्या वेळी वैदिक्कालचे आर्य लोक बंगाल प्रांताजवळ येऊन आंत शिरले त्या वेळी अथर्ववेद लिहिला गेला असावा. मागाहून झालेल्या ग्रंथांत व्याघ्र हा शब्द अगदी प्रचारांतला झाला. तैत्तिरीय संहितेंत निजलेल्या वाघाला डवचून जागे केल्यावर उत्पन्न होणा-या भयाचा उल्लेख आलेला आहे. या जनावराच्या जीवनाशक स्वभावाचाहि वारंवार उल्लेख आलेला आहे. त्याचप्रमाणे तो पुरूषाद म्हणजे मनुष्यभक्षक असल्याचेहि वर्णन आलेले आहे. सिंहाप्रमाणे वाघहि शक्तिमान गणला गेलेला आहे. कारण राजसूय यज्ञाचे वेळी राजाला सामर्थ्य यावें म्हणून त्याच्या चर्मांवर पाय ठेवावा लागतो.
     ६९शरभ -- अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यांत एका रानटी जनावराचें हें नांव आलेले आहे. उत्तरकालीन काव्यग्रंथांत हा एक काल्पनिक आठ पायांचा, हिमाच्छादित डोंगरांत रहाणारा आणि सिंह व हत्ती यांचा शत्रु असलेला पशु आहे. महीधर टीकाकार याच्या मताने वाजसनेयि संहितेंमध्ये या शब्दाचा हाच अर्थ आहे; पण तो असा अर्थ करण्याचें कारण देत नाहीं. हा प्राणी बक-याप्रमाणें असतो असेहि एके ठिकाणी म्हटलें आहे. कदाचित, हा प्राणी एक प्रकारचा हरिण असावा असें वाटते.
     ७०शर्कोट -- अथर्ववेदामध्ये एका प्राण्याचें हें नांव आलेले आहें. हें नांव रॉथ व झिमरचे मतानें सापाचें आहें व ग्रिल, हेनरी व ब्लूमफील्ड यांच्या मताने विंचवांचे असावें.
     ७१शशयु -- ' सशाचा पाठलाग करणारा ' अथर्व वेदामध्ये एका प्राण्याचें ( मृगाचे ) हें विशेषण आहे. झिमर म्हणतो की, या शब्दाचा अर्थ वाघ असा असावा पण हें शक्य दिसत नाही. रॉथचे मताने एखादा हिंस्त्र पशु असा याचा अर्थ असावा. व्हिटने, भाष्यकाराच्या मतास अनुसरून या शब्दाचा अर्थ ' लपून बसणारा ' असा करितो.
     ७२शारिशाका -- अथर्ववेदामध्ये एके ठिकाणी हा संदिग्ध अर्थाचा शब्द आलेला आहे. वेबरच्या मतें याचा अर्थ शारि पक्ष्याची विष्ठा असा आहे. ग्रिलच्या मतें याचा अर्थ ' छपविलेला कावळा ' हा आहे. रॉथ 'सारि:= शालि: शक इव ' अशी दुरूस्ती सुचवून त्याचा अर्थ : खत घातलेल्या साळीप्रमाणे ' असा करितो. ब्लूमफील्ड ' शारि:शुकेव ' हा पाठ स्वीकारून त्याचा अर्थ सारिका व शुकासारिखा असा करतो.
     ७३शिशूक -- अथर्ववेदामध्ये हें विशेषण आलेलें असून त्याचा अर्थ ' तरूण ' असा आहे. पण ब्लूमफील्ड असें म्हणतो की, याचा अर्थ घोडयाचें शिंगरूं असा आहे. सायण म्हणतो की, हा शब्द शुशुक असा आहे व त्याचा अर्थ शुशुक नांवाचें रानटी जनावर असा आहे.
     ७४समंक -- अथर्ववेदामध्ये दोन ठिकाणी संदिग्ध अर्थांचा हा शब्द आलेला आहे. ब्लूमफील्ड, याचा अर्थ एके ठिकाणी आंकडा असा करितो व दुसरे ठिकाणी धान्याचा नाश करणारा किडा असा करितो.
     ७५-हूडु -- अथर्ववेदामध्ये तक्मन् ( ज्वर ) थाला हा शब्द लावलेला असून याचा अर्थ अस्पष्ट आहे. हा शब्द -हुड, -हूडु, रूडु वगैरे त-हेनी लिहिलेला आढळतो. पैप्पलाद संहितेंत हुडु असा शब्द आला असून त्याचा अर्थ एडका किंवा मेंढा असा आहे. हेनरीचे असें अनुमान आहे की, हा शब्द हरूडु ( प्रोटोसेमिट्रिक ) सोनें, ( असुरियन हुरकू व हिब्रु हरूक ) त्या शब्दांशीं सदृश आहे. याच्या उलट हेल्ब म्हणतो की ग्रीक भाषेंतल्या हिरवट पिंवाळा या अर्थाच्या शब्दाशी याचें साम्य आहे. पण या दोन्ही कल्पना असंभाव्य आहेत. वेबरच्या मतानें याचा अर्थ 'पायांत येणारा गोळा' असा असावा.
     ७६शल्यक -- वाजसनेयि संहिता व उत्तरकालीन ग्रंथ यामध्यें या शब्दाचा अर्थ साळ असा आहे. ऐतरेय ब्राह्मण ३. २६,३ या ठिकाणी जो शल्यक शब्द आहे त्याचा अर्थ तेथें साळ किंवा सायाळ असाच आहे. हा विशिष्ट प्राणी कशा प्रकारचा असतो याचें वर्णन सायणाने आपल्या भाष्यांत पुढीलप्रमाणे दिलें आहे. 'यस्य मृगस्य पुच्छसमीपे बहवो रोम विशेष: प्रादेशपरिमितास्तीक्ष्णाग्रा लोहमया उत्पद्यन्ते स शल्यक:'
     ७७ककुठ -- मैत्रायणी संहितेत हा शब्द आला असून त्याचा अर्थ एक प्रकारचा प्राणी असा असावा. बोथलिंग याच्या मताप्रमाणे तो प्राणी आणि कक्कट हे एकच आहेत.
     ७८खड्ग -- मैत्रायणी संहितेंत हें एका प्राण्याचें नांव आहे आणि वाजसनेयि संहितेंत खंग आणि खड्ग असे पाठ आहेत. बहुतकरून गेंडा असा याचा अर्थ असावा. शाखांयन श्रौतसूत्रांत गेंडयाच्या कातडयाचा उपयोग रथाच्या आच्छादनाकडे करीत असत असा उल्लेख आहे.
     ७९धेनुष्टरी -- काठकसंहितेमध्ये व मैत्रायणी संहितेमध्ये [ ३. ५, ४ ] जी दूध देईनाशी झाली आहे अशी गाय असा याचा अर्थ आहे.
     ८०आशिविष -- ऐतरेय ब्राह्मणांत फक्त एकदांच याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याचा अर्थ रॉथच्या मताप्रमाणे एका जातीचा सर्प असा आहे. बहुतकरून ' आशीमध्यें विष असणारा ' असा असावा.
     ८१इंद्रगोप – [ इंद्र रक्षित ] ' पुल्लिंगी ' हें नांव बृहदारण्यक उपनिषदांत [ २. ३, ६ ] किरमिजी रंग ज्याचा करितात तो कृमि या अर्थाने आलें आहें.
     ८२एडक -- शतपथ आणि जैमिनीय ब्राह्मणांत याचा नाठाळ एडका असा अर्थ आहे.
     ८३खर -- ' गर्दभ ' ऐतरेय आरण्यकांत एका गर्दभाच्या टोळीचा उल्लेख आहे. यज्ञपात्रें ज्या ओठयावर ठेवीत असत त्याचा आकार लंबकर्णाच्या आकारासारखा असल्यामुळें शतपथ ब्राह्मणांत त्या ओठयाला हा शब्द आला असेल.
      ८४गज -- आर्ष काव्यें आणि उत्तरकालीन संस्कृत काव्यग्रंथ यांत न आलेला हा हत्तीबद्दल शब्द उत्तरकालीन ब्राह्मणांत सापडतो.
     ८५गो-मायु -- ' गायीसारखे हंबरणे '. उत्तरकालीन अद्भुत ब्राम्हणापर्यंत हें ' खोंकड, कोल्हा ' याचे नांव आलेले नाही
     ८६चिल्वटी -- हें एका अप्रसिद्ध जनावरांचें नांव गोपथ ब्राह्मणांत आलेले आहे. हा कोणता प्राणी हें समजत नाहीं.
     ८७झष -- शतपथ ब्राह्मणांत सांगितलेल्या मनूच्या कथेंत हा शब्द आलेला आहे, व त्या ठिकाणी अर्थ ' महामत्स्य ' असा भाष्यकाराच्या मतानें आहे. एगलिंगच्या मताने सशृंग मत्स्य हा अर्थ असावा; कारण तैत्तिरीय संहितेंत त्याला गाईचें स्वरूप् दिलेलें आहे. व याच कल्पनेंवरून जुन्या दंतकथेच्या पुढे बनलेल्या रूपांत सशृंग मत्स्याची कल्पना आली असावी असें तों म्हणतों.
     ८८दक्षिणापृष्टि -- याचा अर्थ उजवे बाजूकडील घोडा असा आहे. शतपथ ब्राह्मणांत आलेल्या दोन उल्लेखांवरून असें दिसतें की, एके काळी रथाला चार घोडे जुंपीत असत.पैकी उजव्या व डाव्या बाजूला एक एक घोडा असे मध्ये असत व एक एक बाजूला पण जूंला न जुंपलेले दोन मोकळे घोडे, असें ठेवण्याची चाल होती.
     ८९दुर्वराह -- याचा अर्थ बहुतकरून रानटी डुकर असा आहे. शतपथ ब्राह्मण व जैमिनीय उपनिषद्ब्राम्हण यांमध्ये या शब्दाचा उल्लेख आलेला आहे.
     ९०नाग - शतपथ ब्राह्मणांत महानाग या रूपांत हा शब्द आला आहे व तेथें त्याचा अर्थ मोठा हत्ती किंवा मोठा सर्प असा आहे. वृहदारण्यकोपनिषदामध्ये व ऐतरेय ब्राह्मणांत आलेल्या उता-यांत हत्ती असा अर्थ स्पष्ट दिसतो. सूत्र ग्रंथांत प्राचीन काल्पनिक नाग याचा उल्लेख अगोदरच आलेला आहे.
     ९१निवान्यवत्सावनिवान्या -- शतपथ ब्राह्मणांत हे शब्द आलेले असून त्यांचा अर्थ जिचे पहिलें वासरूं मेलेले आहे व या मृत वासराच्या बदली ठेवलेल्या दुस-या वासरावर जिचें प्रेम बसावयाचें आहें अशी गाय, असा आहे. निवान्यवत्साप्रमाणेंच अभिवान्यवत्स, अभिवान्या, वान्या व अपिवान्यवत्सा असे इतर शब्द आहेत.
     ९२पूर्वा -- हा शब्द घोडयांनां ( अश्वांस ) लावलेला आहे. त्याचा उपयोग तैत्तिरीय ब्राह्मण व नंतरचे ग्रंथ यांत केलेला आढळतो. त्याचा ' नेता ' म्हणून पुढे जुंपलेला घोडा, किंवा नुसता पहिल्याच वेळेस रथ ओढणारा घोडा असा अर्थ तैत्तिरीय ब्राह्मणांत भाष्यकार घेतात.
     ९३प्रयोग्य -- छांदोग्य उपनिषदांत ( ८. १२, ३ ) याचा अर्थ ' गाडीला जुंपलेला प्राणी ' ' वाहतुकीचे जनावर' असा आहे.
     ९४मंथावल -- ऐतरेय ब्राह्मणांत हें एका प्राण्याचें नांव आले आहें. सेंटपीटर्सबर्ग कोशाप्रमाणे हें एका सर्पाचे नांव आहे. सायणमतानें हें खाली डोकें वर पाय करून झाडास लोंबणा-या अशा एका प्राण्याचें बहुधा वटवाघुळाचें नांव आहे.
     ९५वाहनं -- ( नपुसकलिंगी ) ब्राह्मण ग्रंथांत याचा अर्थ ओझे वाहणारें जनावर व कधी कधी गाडी असा आहे.
     ९६शफ -- ब्राह्मण ग्रंथांत हें एका लांडकी हत्याराचें ( द्विवचनी ) नांव आलें आहे. हें चिमटयाप्रमाणे चुलीवर भाडें उतरण्यास सोयीचे असते. याला शफ हें नांव पडण्याचे कारण तें गाईच्या पसरलेल्या खुराप्रमाणे दिसतें.
     ९७शाकल -- ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द आला असून याचा अर्थ सेंटपीटर्सवर्ग कोशांत शाकल्याची विद्या असा दिलेला आहे. पण बोथलिंगचा अर्थ-एक प्रकारचा सर्प हाच बरोबर दिसतो.
     ९८स्नावन्य -- हा शब्द अनेकवचनी आलेला असून तैत्तिरीय आरण्यकांत (७,२३,१) घोडयाच्या शरीराचे विशिष्ट भाग असा याचा अर्थ आहे.
     ९९उभयादत् -- 'दोन्ही जबडयांमध्ये छेदक दांत असलेला.' हा शब्द घोडा, गाढव इत्यादि पाळीव जनावरांना, बकरे मेंढें आणि इतर जनावरें यांमध्ये फरक दाखविण्याकरितां योजिले आहे. हा फरक ऋग्वेदांतील उत्तरकालीन सूक्तांत आणि बरेच वेळां उत्तरकालीन संहिता व ब्राह्मणें यांतहि केला आहे. तैत्तिरीय संहितेंत एका ठिकाणी मनुष्य आणि घोडा यांची बरोबरी केली आहे. उभयादत् या शब्दाच्या विरुद्ध अन्यतोदत् एकाच बाजूस दांत असलेला' हा शब्द गुरेंढोंरे यांनां लावितात. यांना आठ दांत असतात आणि ते फक्त खालच्या जबडयांतच असतात. अथर्ववेदांत गर्दभाला उभयाद असें म्हटलें आहे. तथापि अथर्ववेदांतील एका वचनांत हा शब्द एडका याचें विशेषण म्हणून योजिला आहे. परंतु ज्याप्रमाणे ऋग्वेदांत एडका एका सिंहिणीला मारतो या चमत्काराचा उल्लेख आहे त्याप्राणेंच हा शब्द येंथें एका चमत्कारीक अर्थानें उपयोगांत आणिला आहे. ब्लूमफील्ड म्हणतो की, अथर्ववेदांत दुस-या एका ठिकाणी याचा घोडा असा अर्थ आहे. तैत्तिरीय आणि वाजसनेयि संहितेंत 'एकशफ' आणि 'शुद्र' अशा जनावरांच्या जाती किंवा भाग केले आहेत. ग्रीक आणि लॅटिन शब्दांवरून झिमर असें दर्शविण्याचा प्रयत्न करतो की, इंडोयूरोपीय यज्ञपशूंच्या पांच जातीचें दोन वर्ग असत. एक मनुष्य व घोडा आणि दुसरा बकरे, मेंढें आणि दुसरी जनावरें. परंतु ही क्लृप्ति अयोग्य आहे.
     १००त्वच् -- कातडे किंवा जनावरांचे चामडें असा या शब्दाचा अर्थ आहे. विशेषत: ऋग्वेदांमध्ये चामडें अशा अर्थानें या शब्दाचा उपयोग केलेला आहे व सोमरस काढतांना या चामड्याचा उपयोग होत असे असें म्हटलें आहे. सोमवल्ली दाबावयाच्या फलकांवर ( अधिषवण फलक ) पसरलेल्या कातडयावर दगडांनी कुटीत असत (या फलकांचा उल्लेख ऋग्वेदांत केलेला नाही), अथवा जरी खलबत्याचा उपयोग होत असला तरी सोमरसाचे थेंब धरण्याकरितां त्या खलबत्याच्या खाली-पिशेल म्हणतो त्याप्रमाणे वर नव्हे--कातडे ठेवण्याचा प्रघात होता. सोमवल्लीचा रस काढून घेतल्यावर मागें जी साल किंवा सालपट राहते त्यासहि त्वचा म्हणण्याचा परिपाठ आहे. अलंकारिकरीत्या ' कृष्णत्वच् ' हा शबदसमूह हिंदुस्थानावर चाल करून येणा-या सार्य लोकांच्या शत्रूंनां म्हणजे मूळच्या अनार्य लोकांना लावीत असत.
     १०१पशु-- या शब्दाचा सामान्यपणे प्राणी हा अर्थ असून त्यांत मनुष्याचाही अंतर्भाव होतो.  यज्ञाचे वेळी उपयोगी पडणा-या पांच जनावरांचा नेहमी निर्देष होत असतो.  अश्रु, धेनु, अज, मेश आणि नर अशी ही पांच नांवे आहेत.  अशा प्रकारच्या सात पाळीव जनावरांचा उल्लेख अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यांमध्ये आलेला आहे. सात ही संख्या धरण्याचे कारण व्हिटने म्हणतो त्याप्रमाणें ती संख्या पवित्र व गूढ मानीत असत हे असावें.  वर सांगितलेलीं पाच जनावरे आणि गर्दभ व उष्ट्र मिळून सात होतात हें भाष्यकाराचे स्पष्टीकरण कांही पंडितास मान्य नाही.  जनावरांनां उभयादत् व अन्यातोदत् अशीहि नांवें दिलेली  आढळतात.  जनावरांचें वर्गीकरण हस्तादामा: ( हातानें जिन्नस उचलणारे ) उदाहरणार्थ, मनुष्य, हत्ती व मर्कट आणि मुखादाना:      ( मुखानें जिन्नस उचलणारे ) असेंहि केलेलें सांपडतें.  ट्ठिपादप चतुष्पाद असें दुसरें एक वर्गीकरण केलेलें आहे.  मनुष्य हा द्विपाद प्राणी असून तो पशुपेक्षां श्रेष्ठ गणला गेला आहे. तो 'शतायु:' असून पशुंचा राजा आहे. इतर पशूंशिवाय त्याला वाचा आहे. ऐतरेय आरण्यकांत वनस्पतिवर्ग, पशुवर्ग व मनुष्यवर्ग यामध्ये असलेला बुद्धीच्या बाबतीत सविस्तर भेद दाखविला आहे. मनुष्यविरहित प्राण्यांची ऋग्वेदामध्ये तीन प्रकारची विभागणी केलेली आहे. हवेंतील ( वायव्य ), जंगलांतील ( आरण्य ) आणि गांवातील ( ग्राम्य ) पाळीव प्राणी, ग्राम्य व आरण्य अशी पशूंची केलेली विभागणी सर्वत्र आहे. यजुर्वेदसंहितेमध्ये 'एकशफ', 'क्षुद्र' व 'आरण्य' असें वर्गीकरण आलेलें असून त्यांपैकी एकशफ आणि क्षुद्र हे माणसाळलेले प्राणी असत. अश्व व गर्दभ हे एकशफ प्राणी असून क्षुद्र प्राणी म्हणजे अज, मेष व वृषभ हे होत. दोन जातींच्या प्राण्यांतला हा फरक उभयदंत व अन्यतो. दंत या फरकाप्रमाणें आहे. झिमरच्या मतानें अथर्ववेदांत एकेठिकाणी आरण्य प्राण्यांमध्ये पांच वर्ग केले आहेत. (१) अरण्यांत राहणारे हिंस्त्र पशू (मृगा भीमा वने हिता:); (२) हंस, सुपर्ण, शकुन वगैरे पंख असलेले प्राणी; (३) जलचर प्राणी, शिंशुमार व अजगर; (४) मासे, पुरीकय, जष व मत्स्य आणि (५) कृमिकीटक यांनां राजसा: असें म्हटलेलें आहे. ही विभागणी खुबीने केलेली आहे पण ती संभाव्य कोटीतील दिसत नाही. ब्लूमफील्डनें व व्हिटनेनें ही विभागणी त्याज्य ठरविली आहे.
     १०२शकृत, शकन -- ऋग्वेदांमध्ये व उत्तरकालीन ग्रंथांत याचा अर्थ विष्टा असा आलेला आहे. खताची किंमत पूर्वीपासून लोकांना कळलेली होती हें यावरून स्पष्ट दिसून येते. वाळलेल्या शेणाचा उपयोग किंवा हवा कशी असेल हें सुचविणा-या जळणा-या शेणाचा उपयोग याबद्दल शकधूम या शब्दाने स्पष्ट कल्पना येते.