प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
धनुष्यबाण ( ऋग्वेद )
धनुष्यबाण ( ऋग्वेद ) |
१आत्नीं -- आत्नीं म्हणजे धनुष्याच्या ज्या टोंकाला ज्या ( दोंरी ) बांधलेली असतें तें टोंक. नेहमींच ज्या ( दोरीं ) दोनहि टोकांना अडकविलेली नसते. परंतु बाण मारण्याच्या वेळीं ती दुस-या टोंकाला ताणून अडकवितात. उत्तर संहिता आणि ब्राह्मणग्रंथ यांत जी विष्णूच्या निधनाची दंतकथा आहे तिच्यावरून असें वाटतें कीं, त्याला जें मरण आलें तें 'ज्या' तुटल्यामुळे दोनहि टोंकें एकदम उसळून त्याचे डोक्यांत बसून डोंकें फुटल्यामुळें आलें.
२इषु -- ऋग्वेद आणि तदुत्तर ग्रंथांत हा शब्द बाण या अर्थी योजिलेला आहे. दुसरीं नांवे शर्य, शारी, बाण हीं आहेत. ऋग्वेदांतील एका स्तोत्रात ज्यांत शस्त्रांची यादी आहे त्यांत दोन प्रकारचे बाण असतात असा उल्लेख आहे. एक विषारी ( आलाक्ता ) असून त्याला शिंगाचें शीर्ष्ण ( रूरूशीर्ष्णी ) असतें, आणि दुसरा तांब्याच्या, पंचधातूंच्या किंवा लोखंडांच्या फळाचा असतो. विषारी ( दिग्ध ) बाणांचा अथर्ववेदांतहि उल्लेख आहे. बाणांना पिसें लावीत असत. अथर्ववेदांत शल्य, पर्णधि, शृंग, कुल्मल, अपस्कंभ आणि अपाष्ठ अशी बाणाच्या निरनिराळया भागांच्या नांवाची यादी आली आहे. ऐतरेय ब्राह्मणांत बाणाच्या भागांची नांवे अनीक, शल्य, तेजन आणि पर्ण अशीं आहेत; शल्य म्हणजे बाणाचा वरचा ( अनीकाला लागूनच खालीं असलेला ) व तेजन म्हणजे खालचां ( पर्णाला लागूनच वर असलेला ) भाग होय; कारण हें एका संबंध बाणाचें अनुक्रमानें वर्णन आहे. त्याचप्रमाणें अथर्ववेदांत कामाच्या बाणाचें, पिसें, ( कांठीं ) शल्य, व कुल्मल घट्ट बांधण्याची जागा असलेला, असें वर्णन आहे. बाण, कानापर्यंत दोरी ओढून सोडीत असत आणि म्हणूनच कान हीं त्याची जन्मभूमि होय असें वर्णन ऋग्वेदांत आलें आहे. इषूची लांबी पांच विती म्हणजे तीन फूट असे. निव्वळ इषु करण्याचा धंदा अस्तित्वांत होता असें इषुकृत् व इषुकार ह्या शब्दांवरून मॅकडोनेलचें मत आहे. ऋग्वेद १. १८४. ३ मध्यें 'इषुकृत्' शब्द आलेला आहे. तेथें त्याचा अर्थ बाणकरणारा असा निघत नाहीं. त्याचा अर्थ बाणीकृत, बाणवत्शीघ्रकृत् असा 'वेदार्थयत्न' ग्रंथांत दिला आहे. सायणाचार्य आपल्या भाष्यांत तोच अर्थ देतात.
३ज्या -- ह्या शब्दाचा नेहमींचा अर्थ. ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत, धनुष्याची दोरी असा आहे. धनुष्याकरितां दो-या करणें हा एके काळीं धंदाच होता. यजुर्वेदामध्यें पुरूषमेधाचें वेळीं जे बली देण्यास योग्य गणले जात असत त्यांपैकी ज्या-कार ( धनुष्याच्या दो-या करणारा ) हाहि आहे. ही दोरी बैलाच्या कातडयाची बनविली जात असे असें मॅकडोनेल म्हणतो, पण सायणभाष्याप्रमाणें बैलाच्या कातडयाची असा स्पष्ट उल्लेख तेथें नाहीं. दोरी नेहमींच ताणलेली नसे. तर ज्या वेळीं धनुष्याचा उपयोग होत असे तेव्हांच ती ताणून बांधली जाई. अथर्ववेदांत धनुष्याच्या दोरीच्या आवाजाचा ( ज्या --घोष ) उल्लेख आलेला आहे.
४ज्याका -- ह्याचा 'धनुष्याची दोरी' असा तिरस्कार दर्शक अर्थानें ऋग्वेदांत उल्लेख आहे. हा शब्द नेहमीच्या साध्या अर्थानें अथर्ववेदांत आहे असें मॅकडोनेल म्हणतो. पण सायणाभाष्याप्रमाणें अथर्ववेदांत देखील तिरस्कारदर्शी अर्थानें हा शब्द आला आहे. अथर्ववेद १.२, २ यावरील भाष्यांत सायणाचार्य ज्याका याचा अर्थ 'अज्ञात ज्या' असा केला तरी चालेल असें म्हणतात.
५धनुस् -- हा शब्द ऋग्वेद व मागाहून झालेलें ग्रंथ ह्यांत वारंवार आलेला आहे. हें धनुष्य वैदिक काळच्या लोकांचे मुख्य शस्त्र होतें. एखाद्या माणसाचें शेवटलें और्ध्वदेहिक कृत्य होत असे त्या वेळीं त्याच्या उजव्या हातांतून धनुष्य काढून घेत असत. हें धनुष्य एक बळकट लांकूड वाकवून बनविलेंलें असे. धनुष्याची दोन टोकें जोडणारी 'ज्या' गाईच्या कातडयाची असें. दोरी बांधल्यावर धनुष्याच्या दोन्हीं टोकांना आत्नीं असें म्हणत. प्रत्यक्ष उपयोगांत जेव्हां हें धनुष्य नसे तेव्हां त्याची ज्या दुस-या टोकांशीं बांधलेली नसे परंतु बाण सोडण्याच्या वेळीं ती दुस-या टोकांस ताणून बांधीत. वाजसनेयि संहितेंत धनुष्याचा उपयोग करण्याच्या वेळच्या एका पुढील एक क्रिया सविस्तर दिल्या आहेत, उदाहरणार्थ धनुष्यावर गुण चढविणें ( आतन् ) बाण लावणें ( प्रतिधा ), धनुष्य वाकविणें ( आयम् ) आणि बाण सोडणें ( अस् ). दोरी आकर्ण म्हणजे कानापर्यंत ओढल्यावर बाण सोडीत म्हणून त्याला कर्णयोनि, ( कर्ण हेंच ज्याचें उगमस्थान आहे, ) असें म्हटलें आहे.
६धन्वन् -- धन्वन् म्हणजे धनुष्य. हा शब्द ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत वारंवार आलेला आहे. तो इषुधन्वा आज्यधन्वा, अधिज्यधन्वा ह्या समासांतहि आलेला आहे.
७पिंगा -- ऋग्वेदांत एका ठिकाणीं हा शब्द आला असून सायणाचार्यानीं व पीटर्सबर्गकोशकारानें याचा अर्थ धनुष्याचा गुण ( दोरी ) असा केला आहे. हिलेब्रँटच्या मतानें तें एक प्रकारचें वाद्य आहे.
८बाण -- ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ तीर किंवा शर असा आहे.
९बुंद -- ऋगवेदांतील कांही उता-यांत याचा बाण या अर्थानें उपयोग केला आहे.
१०शरव्या -- हा शब्द ऋग्वेदांत व मागाहून झालेल्या ग्रंथांत आहे. मॅकडोनेल याचा 'बाणाचा टप्पा' असा अर्थ करितो. ऋगवेद ६. ७५. १६ व १०. ८७, १३ या ठिकाणीं ह्या शब्दाचा अर्थ बाण असा आहे. 'बाणाचा टप्पा' असा घेण्याचें कारण नाहीं. अथर्ववेद १. १९. १. या ठिकाणीं या शब्दाचा अर्थ बाण असा सायणाचार्यानीं दिला आहे; पण त्यांनीच पुढें अथर्व १. १९, ३ या ठिकाणीं शरव्या शब्दाचा अर्थ 'हिंसा करणा-या आयुधांचा समुदाय' असा सामान्यपणें दिला आहे. तैत्तिरीय संहितेंत असलेल्या शरव्या शब्दाचा अर्थ 'बाणाचा भाता' असा सायणाचार्यानीं दिला आहे.
११शर्य किंवा शर्या -- ऋग्वेदांत ह्यांचा अर्थ बाण असा असावा पण कदाचित् शर्य व शर्या यांचा अर्थ सोम गाळतांना उपयोगांत आणिलेल्या डाहाळयांच्या टोपल्या असा असावा. पण हें शब्द असलेल्या उता-याचा अर्थ अनिश्चित आहे.
१२शारि -- ऋग्वेदांत एका ठिाकणीं हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ सायणभाष्याप्रमाणें बाण असा आहे. मॅकडोनेलची या अर्थाबद्दल खात्री नाहीं.
१३सायक -- ऋग्वेदांमध्यें याचा बाण असा अर्थ आहे.
१४अपाष्ठ -- बाणाचें टोंक ह्या अर्थी हा शब्द अथर्ववेदांत दोन वेळा योजिला आहे.
१५पर्णधि -- अथर्ववेदांत हा शब्द 'ज्याला पिसें घट्ट लावलेलीं असतात असा बाणाचा भाग' अशा अर्थानें आला आहे असे मॅकडोनेल म्हणतो. ग्रिफिथ पर्णधि याचा अर्थ 'पिसें असलेंलें टोक' असा करितो. परंतु सायणाचार्यांनी 'पर्णधि' चा अर्थ 'इषुकांड' किंवा 'विषारीं पानांचे झाड' असा केला आहे.