प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
दळणवळण
नौकानामें (ॠग्वेद) | ||
१अरित्र | ३नद | नौका) |
अरित्रपरणी | नित्यरित्रा | पतत्रिन् |
खनित्र | ४नौ | ५प्लव |
द्युन्म | पक्षिण(प्लव, सपक्ष | शतारित्रा |
(तैं.सं.) | ||
तरणि | नाव | प्लव |
(अथर्ववेद) | ||
अप्लव | पर्षणि | सामन् |
तरी | प्लव | स्वरित्रा |
नाव्य | शतारित्रा | हिरण्यबन्धना |
नौ | ||
(संहितेतर) | ||
६नावाज् | ७मण्ड |
१अरित्र - नावा किंवा होडया ज्यांच्या योगानें चालवितात त्या वल्ह्यांनां हें नांव आहे. ॠग्वेद आणि वाजसनेयि संहिता यांत शंभर वल्ह्यांनीं वल्हविलेल्या जहाजाचा उल्लेख आहे आणि नाव वल्ह्यांनीं वल्हवितात असाहि उल्लेख आहे (अरित्रपरण). ॠग्वेदांत दोन उता-यांत हा शब्द आलेला आहे त्यावरून से.पी. कोश म्हणतो कीं,रथाचा एक भाग असा अर्थ ध्वनित होतो. नावेच्या वल्हीवणा-याला किंवा खलाशाला अरितृ असें म्हणतात.
२द्युम्र- ॠग्वेदांतल्या एका लेखांत पिशेलच्या मतानें याचा अर्थ तराफा असा आहे.
३नद(ड)- ॠग्वेदांत हा शब्द अनेकदां आलेला असून त्याचा निश्चित अर्थ समजत नाहीं. पिशेलच्या मतानें नद व नड हे शब्द एकच आहेत व या नद शब्दाचा अर्थ एके ठिकाणी तो वेताची नांव असा करितो. ही नाव भंगून हिच्यावरून पाणी गेलें असेंहि तिचे वर्णन तो करितो. दुस-या एका लेखांत या नदाचा अर्थ वेताचा चाबूक असा तो करितो. याचीं तीक्ष्ण टोकें (कर्ण) घोडयांनां जोरानें पळविण्यास उपयोगी पडतात. दुस-या लेखांत लक्षणेनें याचा अर्थ पुरुषाचें जननेंद्रिय असा केलेला आहे. रॉथ याचा अर्थ साथा किंवा लक्षणेनें बैल असा घेतो. एकदां तरी इंद्राच्या घोडयासबंधानें खेंकाळणारा असा या शब्दाचा अर्थ होतो. नदस्यकणैः या शब्दसमुच्चयांत याचा रथाच्या (बाजूच्या) घोडयाच्या वानांमुळे (म्हणजे हुकूम ऐकणयाची त्याची तयारी असल्यामुळें) मरुत लोक आपल्या चपळ घोडयावर बसून जलदीनें जातात असा अर्थ होतो (तुरयन्त आशुभिः)
४नौ. ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें हा शब्द नेहमी येतो. बहुतेक ठिकाणीं हे तारू म्हणजे नद्या ओलांडण्याकरितां केलेली लहानशी नाव होय. तरी पण यमुना, गंगा व पंजाबमधील नद्या या ओलांडण्याचें काम मोठया जहाजाशिवाय भागत नासे. पुष्कळ वेळां ही नौ म्हणजे लांकडाची कोरलेली होडी असे. वैदिक काळी समुद्रमार्गानें हिंदुस्थानचा मोठा व्यापार चालत असे ही गोष्ट जर गृहीत धरली तर जहाजाचे जे भाग उदाहरणार्थ, शीड व शीडकाठी यांचा (वल्हे, अरित्र याखेरीज वैदिक वाङ्मयात) उल्लेख नाहीं ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तरी पण असे कांही उल्लेख आलेले आहेत कीं, त्यांवरून नद्या ओलांडून जाणा-या बोटींनीं जो व्यापार चालावयाचा त्यापेक्षा जास्त विस्तृत प्रमाणावर व्यापार हिंदुस्थानांतून चालत असे ही गोष्ट सिद्ध होते. अथर्ववेदांत ज्या राज्यांत ब्राह्मणावर जुलूम होतो त्या राज्याच्या नाशाची तुलना फुटलेल्या जहाजाच्या बुडण्याशीं केलेली आहे. जरी या ग्रंथांत आलेल्या भाषेवरून जहाज म्हणजे होडी असा अर्थ निघण्याचा संभव आहे तरी असा अर्थ करणें इष्ट होणार नाहीं. शिवाय माणसें नफा किंवा द्रव्य मिळविण्याकरितां (सनिष्ययः) समुद्राकडे जातात असा ॠग्वेदांत (१.५६,२;४.५४,६) उल्लेख आलेला आहे. झिमर म्हणतो कीं, हा समुद्र म्हणजे पंजाबमध्यें सिंधु नदीला इतर लहान नद्या मिळाल्यावर जो मोठा सिंधु नद होतो तो होय. पण समुद्राचा असा संकुचित अर्थ करणें बरोबर होणार नाहीं. ॠग्वेदांत सुद्धां अश्विनांनीं भुज्यूचें समुद्रामध्यें शंभर वल्हीं असलेल्या जहाजाच्या योगानें रक्षण केलें अशी वर्णनें आलेली आहेत. तेव्हा वैदिक काळीं अनेक वल्हीं असलेलीं मोठे जहाजें
होतीं हे नाकबूल करणें इष्ट नहीं. बौधायन धर्मसूत्रामध्यें (१.२,४) तरी निदान समुद्रमार्गानें जलपर्यटण करण्याचा उल्लेख आलेला आहे (ॠ. १०.१५५,३). याठिकाणीं सायण दारु म्हणजे पुरुषोत्तमाख्य देवताशरीर असा अर्थ करितो. त्याच भाष्यांत दुस-याचा उतारा दिला आहे त्यांत दारू म्हणजे दारुमयी नौ लांकडाची नाव असा अर्थ आहे.
५प्लव- तरंगणारा पदार्थ. याचा अर्थ होडी. हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर वाङ्मयांत आला आहे.
६नावाज- नावाडी. शतपथ ब्राह्मणांत (२.३,३,५) हा शब्द आलेला आहे.
७मण्ड-हा शब्द नौ-मण्ड या सामासिक शब्दांत द्विवचनी येतो व त्याचा अर्थ शतपथ ब्राह्मणांत (२.३,३,१५) जहाजाचें सुकाणूं असा आहे.