प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.                   

ज्योतिषविषयक [ॠग्वेद]

 अहर्विद  ध्रुव  पितृयान
 त्रिचक्र  नवग्व  षळर
 दशग्व  नानारथ  सप्तचक्र
 द्वादशाकृति (बारा- महिने)  पंचपाद   सप्तरश्मि
 पंचार (संवत्सर)  सप्ताश्व
 द्वादशार  पर्व (पक्ष)  सप्ति

अघा.- ॠग्वेदांत पाणिग्रहणासंबंधी जें सूक्त आहे त्यांत असें वर्णिले आहे की अघामध्यें गाईचा वध केला जातो व लग्न अर्जुनी- मध्यें होतें. अथर्ववेदांत अघाबद्दल मघा हा शब्द उपयोगांत आणिला आहे. ॠग्वेदांतील मूळ शब्द मघा हाच असावा व तो मुद्दाम बदलून अघा केला असावा असें तर नसेलना ? वध करण्यास अयोग्य (अघ्न्या) ज्यांना म्हणतात अशा गाईचा वध हा विरोध आणि या वधाचा व पाप (अघ). यांचा संबंध स्पष्ट करण्याचा वरील पाठभेदाचा उद्देश असावा.

अर्जुनी.- ॠग्वेदाप्रमाणे हें एका नक्षत्राचें नांव आहे. अथर्ववेदांत याला फल्गुनी असें म्हटल आहे. ज्याप्रमाणें मघा शब्दाबद्दल अघा शब्द लिहिला आहे त्याप्रमाणेंच या शब्दांत मुद्दाम फरक झाला असावा. हा शब्द पाणिग्रहण करण्याप्रीत्यर्थ जीं सूक्तें आहेत त्यांत अघा शब्दाबरोबर आला आहे.

तिष्य.- हा शब्द ॠग्वेदांत एका ता-याचें नांव या अर्थानें दोनदां आला आहे. सायणाचार्यांच्या मतें याचा अर्थ सूर्य असा आहे. हा नि:संशय अवेस्ता ग्रंथांतल्या तिस्य या शब्दाशीं समानार्थी आहे. पुढें पुढें याला पुष्य नक्षत्र म्हणूं लागलें.

नक्षत्र.- या शब्दाचें मूळ काय व तो कसा बनत गेला याबद्दल खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. प्राचीन पंडितांत याच्या मूळ अर्थाबद्दल बराच मतभेद आहे. शतपथ ब्राह्मणांत या शब्दांचे न व क्षत्र असे दोन भाग पाडून त्याचा अर्थ एका गोष्टीनें स्पष्ट केला आहे. निरुक्त व तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथांत हा शब्द नक्ष् म्हणजे मिळविणें या धातूपासून बनला आहे असें प्रतिपादन केलें आहे. ऑफ्रेक्ट वगैरेंच्या मतें हा शब्द नक्त-त्र (रात्रीचा रक्षणकर्ता) या शब्दापासून बनलेला आहे. अलीकडील कांही पंडितांच्या मतानें नक्-क्षत्र (रात्रीवर राज्य करणारा) हेंच या नक्षत्र शब्दाचें मूळ असावें. या शब्दाचा सामान्य अर्थ तारा असा दिसतो.

ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ यांमध्यें 'तारे' अशा अर्थानें आलेली नक्षत्रे.- ॠग्वेदांत ज्या ठिकाणी नक्षत्र हा शब्द आला आहे त्या ठिकाणी तारा हा अर्थ नव्याण्णव हिश्शानीं जमतो. मागाहून झालेल्या संहिता ग्रंथांत हाच अर्थ घ्यावा लागतो. सूर्य व नक्षत्रें यांचा कधीं कधीं एकत्र उल्लेख आलेला आहे. कधी सूर्य. चंद्र व नक्षत्रें, कधीं चंद्र व नक्षत्रें आणि कधीं नुसतीं नक्षत्रें असे उल्लेख आले आहेत. पण या सर्व ठिकाणीं नक्षत्र याचा अर्थ चंद्रमार्गस्थ सत्तावीस नक्षत्रांपैकीं एक असा घेण्याची बिलकुल अवश्यकता नाही असे मॅकडोनेल म्हणतो. उलटपक्षीं मागाहून जो नक्षत्र याचा अर्थ आलेला आहे तो ॠग्वेदामध्यें तीन नक्षत्रांनां लागू पडतो. तथापि तिष्य याचा उल्लेख नक्षत्रपुंज या अर्थानें आलेला नाहीं. अघा: (अनेक वचनी) व अर्जुनी (द्विवचनी) यांच्या संबंधानें गोष्ट निराळी आहे. ज्यांना पुढें मघा: व फल्गुनी अशा संज्ञा मिळाल्या तेच हे पुंज असावेत असें वाटतें. हीं नावें ॠग्वेदांत मुद्दाम बदललेली आहेत. ज्या सूक्तांत ही नांवे आलीं आहेत व ज्यांत सूर्याच्या लग्नाचें वर्णन आलेलें आहे तें सूक्त असलेलें दहावें मंडल फार जुनें नाही ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. लुडविग व झिमर यांच्या मतें ॠग्वेदांत सत्तावीस नक्षत्रें आहेत अशाबद्दल उल्लेख आलेले आहेत.पण ही गोष्ट अगदीं अशक्य आहे. दुस-या एका सूक्तांत रेवती व पुनर्वसू (श्रीमंत व पुन: संपत्ति आणून देणारी) अशीं जीं विशेषणें आलीं आहेत यांचा संबंधहि नक्षत्रांशीं दिसत नाही.

नक्षत्रें (पुंजार्थी-ग्रहरुप तारका पुंज या अर्थी) सत्तावीस.- मागाहून झालेल्या संहिताग्रंथांत नक्षत्र व चंद्र यांचा संबंध लग्नाच्या संबंधाप्रमाणें मानला आहे. उदाहरणार्थ तैत्तिरीय व कठ संहितेंत असें स्पष्ट म्हटलें आहे की सोमाचें लग्न प्रजापतीच्या दुहितांबरोबर झालें पण तो फक्त रोहिणीबरोबरच रहात असे. पुढें इतर नक्षत्रपुंज रागावल्यामुळें त्याला सर्वांबरोबर सारखें राहावें लागलें. वेबरनें यावरुन असें अनुमान काढले आहे की नक्षत्रें हीं सारख्याच विस्ताराचीं आहेत. परंतु अशा रीतीनें संहिता ग्रंथांचा अर्थ करणें मॅकडोनेल मान्य न करितां एवढेंच म्हणतो कीं ही नक्षत्रें जवळ जवळ सारखी आहेत. दोनहि संहितांमध्यें आलेल्या गोष्टीत नक्षत्रे सत्तावीसच होती असें म्हटलेलें नाहीं. तैत्तिरीय संहितेंत तेहेतीस ही संख्या आहे, व कठ संहितेंत मुळी संख्याच दिलेली नाही. पण तैत्तिरीय संहिता व इतर ग्रंथ यांत जी यादी आलेली आहे तीवरुन नक्षत्रांची संख्या सत्तावीस असावी असें वाटतें. नक्षत्रांची संख्या अठ्ठावीस होती असें फार थोडया ठिकाणी म्हटलें आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत अभिजित् हें नवीनच आलेले आहे. तरी पण मागाहून झालेल्या ग्रंथांत (मैत्रायणी संहितेंत व अथर्ववेदाच्या यादीतं) या अभिजिताचा स्वीकार केलेला आहे. कदाचित् असेंहि असण्याचा संभव आहे की पहिली नक्षत्रांची संख्या अठ्ठावीस असावी. पण अभिजित् हें फार अंधुक असल्यामुळे म्हणा किंवा तें फार उत्तरेंस असल्यामुळें म्हणा गळलें गेलें अथवा सत्तावीस ही संख्या (३X३X३) जादूच्या गूढ संख्येपैकी असावी. चीन व आरबी लोकांत नक्षत्रांची संख्या अठ्ठावीस आहे पण वेबर असें म्हणतो की हिंदुस्थानांत नक्षत्रांची २७ ही मानलेली संख्या प्राचीनतर असावी. या सत्तावीस संख्येचा अर्थ आपण जर एक गोष्ट लक्षांत ठेवली तर आपणास ताबडतोब समजेल. ती ही कीं नियतकालिक (ग्रंहांच्या प्रदक्षिणाविषयक) महिना हा सत्तावीस किंवा अठ्ठावीस दिवसांचा, बहुतकरुन सत्तावीस दिवसांचा असतो. हा सत्तावीस दिवसांचा महिना लाटयायन व निदान या सूत्रांना मान्य आहे व त्या सूत्रांच्या मतें एका वर्षाचे दिवस १२ X २७ म्हणजे ३२४ होतात व एक अधिक मास धरिला तर ३५१ होतात निदान सूत्रांत ३६० दिवसांचे सौर (सावन) किंवा व्यावहारिक वर्ष यामध्यें नक्षत्र गणना सुरु करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्या सुत्राच्या मतें सूर्य प्रत्येक नक्षत्रांत १३ ⅓ (१३ ⅓ X २७) दिवस असतो. पण वैदिक कालगणनेंत २७ किंवा २८ या संख्येस बिलकूल महत्व नाही.