प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

 धननामें [ ऋग्वेद ]

दाय -- ऋग्वेदांत हा शब्द पारितोषिक-आणि तेहिं श्रमाबद्दल -- या अर्थानें आलेला आहे व पुढील ग्रंथांत वडिलांनी संपादन केलेली आणि त्यांच्या हयातीत अगर पश्चात मुलांमध्यें विभागली जाणारी दौलत अशा अर्थानें आढळतो. ही दौलत कुटुंबातील सर्व मंडळीचीं आहे ही कल्पना ऋग्वेदांत कोठेंहि मान्य नाहीं. या दौलतीवर फक्त कुटुबांतील कर्त्या माणसाची सत्ता असे. व कर्ते माणूस बहुतकरून बाप असे. इतरांचा या दौलतीवर फक्त नैतिक हक्क असे. हा नैतिक हक्क बाप एखादें वेळीं बाजूलां ठेऊं शके पण मुलें जर बलवान असतील तर तीं दौलतीचा भाग देण्यास बापास भाग पाडीत. उदाहरणार्थ, तैत्तिरीयसंहितेंत असें लिहिंलें आहे की, मनूनें आपली दौलत मुलांत वांटलीं. पण त्यानें नाभानेदिष्टाला वगळलें तरी पण मागाहून मनूनें आंगिरसांनां कसें तुष्ट करावें व गायी मिळावाव्या हें शिकविलें. यावरून एक होतें कीं, जी दौलत त्यानें वांटली ती जंगम होती, स्थावर नव्हती. ऐतरेयब्राह्मणांत असें आहे कीं, मनूच्या हयातींत त्याच्या पुत्रांनी दौलतीची वांटणी केली व आपल्या वृद्ध पित्याला नाभानेदिष्टाच्या ताब्यांत दिलें. जैमिनीयब्राह्मणांत एक गोष्ट अशी आली आहे कीं, चार पुत्रांनी आपला वृद्ध बाप अभिप्रतारिन् हा जिवंत असतांना वडिलोपार्जित दौलतीची वांटणी केली. दाय हीं कुटुबांतील सर्व मुलांनी वांटून घेण्याची दौलत असा अर्थ लवकरच रूढ झाला असेल; पण बापाची अप्रतिहत सत्ता जी कुटुंबावर लवकरच सुरू झाली-- हें शुन:शेपाच्या गोष्टीवरून सिद्ध होतें -- ती सत्ता, व मुलें दौलतीच्या वांटणीचा हक्क मिळविण्याच्या आधींहि बापाबरोबरच दौलतीची कायदेशीर वारस असत, या दोन गोष्टी विसंगत दिसतात. कदाचित् जमिनीची वांटणी होत नसावी. पण जी गुरेंढोरें व इतर जंगम दौलत यांची वांटणी होऊं लागली तशी जमिनीची वाटंणीहि होण्याचा प्रघात पडत चालला व हा प्रघात वाढण्याचें कारण लागवडीस आणतां येणा-या जमिनींचे क्षेत्र अकुंचित होऊं लागलें हें होय. आतां दौलतीची वाटंणी कोणत्या पद्धतीवर होत होती ते पांहू. तैत्तिरीयसंहितेंवरून असें स्पष्ट दिसतें कीं, वडील मुलास जास्त पसंत केलें जाई. कदाचित् ही चाल बापाच्या मृत्यूनंतरची असेल. बापाचें हयातींत वडील मुलापेक्षां दुस-या एखाद्यालाहि जास्त वांटा मिळें असें पंचविंशब्राह्मणांतील एका उल्लेखावरून दिसतें. शतपथब्राह्मण व निरूक्त हयांवरून असें वाटतें कीं, बायकांना वांटणी किंवा वडिलार्जित दौलत यांपैकी एकीवरहि हक्क नव्हता. त्यांचे भाऊ त्यांना पोटास देत, नाहीं असें नाहीं. पण त्यांचे बंधू जर हयात नसले तर त्यांनां वेश्यावृत्तीनें राहण्याची पाळी येई. सुत्रग्रंथांत वडिलार्जित मिळकतीसंबंधानें सविस्तर नियम दिलेंलें आहेत. वडिलार्जित मिळकतीच्या वारसदाराला दायाद व ती ज्याला मिळें त्याला आद अशा संज्ञा होत्या.
धन -- धन म्हणजे बक्षीस. हा शब्द ऋग्वेदांत अनेकदां, बहुतेक लढाईच्या लुटीपेक्षां शर्यतीचें बक्षीस या अर्थानें जास्त आला आहे. द्यृताच्या वेळीं लावलेला पण असाहि ह्याचा अर्थ आहे. कांही ठिकाणी खुद्द द्यूतांतील चुरस असाहि अर्थ अभिप्रेत आहे. सामान्यत: याचा अर्थ संपत्ति किंवा देणगी असा आहे. परंतु कधीं कधीं बक्षिसाच्या कल्पनेपेक्षां द्रव्याच्या कल्पनेवरून लढाईतली लूट असाहि ह्याचा अर्थ होतो.
मघ -- या शब्दाचा वैदिक अर्थ उदार देणगी व मघवान् म्हणजे उदार दाता, ब्राह्मणाला विपुल द्रव्य देणारा असा आहे. आतां मघवान् या शब्दांत यापेक्षां अधिक अर्थ अभिप्रेत होता किंवा काय व वैदिक कालच्या लोकांत त्याच्या कांही विशेष दर्जा होता कीं काय हा प्रश्न शंकास्पद आहे. मघ म्हणजे उदार देणगी असाच अर्थ वैदिककालीं होता असें वाटतें. कारण यास्कानीं ह्याचा धन हाच अर्थ केला आहे. सायणाचार्यहि तसाच करितात. वाजसनेयि संहितेंत मघ म्हणजे महनीय असा अर्थ केला आहे.  मघति म्हणजे घनप्राप्ति असा अर्थ सायणाचार्य मानतात. मघ शब्दाच्या अर्थाबद्दल मतभेद आहे आणि तो चुकीचा आहे. मघ म्हणजे घनच होय.
वसुरिक्थ -- ऋग्वेदांत आणि नंतर वंशपरंपरागत मालमत्ता या अर्थी हा शब्द आहे.
ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत या शब्दाचा अर्थ संपत्ति किंवा मालमत्ता असा आहे.
वस्न -- ऋग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ एखाद्या वस्तूबद्दल पैशाच्या रूपानें दिलेली किंमत, एखाद्या वस्तूची अंगची किंमत किंवा विकत घेण्याची वस्तु असा आहे.
वित्त -- ऋग्वेदांत व उत्तरकालींन ग्रंथांत ह्या शब्दाचा अर्थ संपत्ति, स्वत:च्या मालकीच्या वस्तु असा आलेला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्यें पृथ्वीला वित्तस्य पूर्णा ( संपत्तीनें भरलेली ) असें विशेषण दिलें आहे. तैत्तिरीयब्राह्मणांपासून माणसाचें मोठेपण पैशावर अवलंबून आहें हें तत्व प्रतिपादिलेंलें दिसून येतें. ऋषी ज्या गोष्टी त्याज्य मानतात त्यापैकीं विशेषणा ही एक आहे असें बृहदारण्यकोपनिषदांत म्हटलेंलें आहें.