प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

 गोनामें [ॠग्वेद]

अष्टकर्णी.- ॠग्वेदांतील एका उता-यांत हा शब्द आहे आणि हें विशेषनाम असावें असें रॉथ म्हणतो. ग्रासमन म्हणतो कीं, याचा अर्थ मनुष्य असा न करितां गाय असा करावा आणि हा अर्थ सयुक्तिक दिसतो. गायीचेंच असें वर्णन कां असावें याचें कारण कांही बरोबर कळत नाहीं. परंतु रॉथ म्हणतो कीं, याचा अर्थ 'छिद्रित कानाची गाय' असा असावा आणि अशीं विशेषणें पाणिनीच्या सूत्रांतहि (५.३,१५) आढळतात (भिन्नकर्णा, छिन्नकर्णा). मैत्रायणी संहितेंस (४.२,९) विष्टयकर्ण्या:, कर्क रिकर्ण्या:, दात्रकर्ण्या:, स्थूणाकर्ण्या:, छिद्रकर्ण्या:; हीं जीं विशेषणें आलीं आहेत त्यावरुन 'आठाच्या आंकडयासारख्या चिन्हांकित कानाची' असा जो अर्थ ग्रासमन करतो तो ब-याच अंशी विशद असा आहे. 'चिन्हांकित कानाची' हा जो साधा अर्थ आहे त्यालादेखील मैत्रायणी संहितेंतील त्याच उता-यांत अक्ष हें जें क्रियापद आहे त्याचा आधार आहे. अथर्ववेदांत ही खूण मिथुनाची आहे; पुष्कळ उत्पत्ति व्हावी म्हणून ही बहुधा मांत्रिक खूण असावी. कानाला खुणा करणें ही सर्वसाधारण चाल होती. दोन वेळा अथर्ववेदांत त्याचा उल्लेख आहे. त्या खुणेला 'लक्ष्मन्' असें म्हणत आणि ती तांब्याच्या सुरीनें (लोहित) केलेली असे बाणाचें टोक अथवा लोखंड याचा उपयोग करुं नये पण इक्षुकाण्ड अथवा तांबें याचा उपयोग करावा असें मैत्रायणी संहितेंत वर्णन आहे.

उस्त्र, उस्त्रा, उस्त्रिक, उस्त्रिय.- ॠग्वेद आणि तदुत्तर ग्रंथ यांमध्यें हे शब्द पुष्कळ वेळां आलेले आहेत व त्यांचा अर्थ 'बैल' किंवा 'गाय' असा होतो. परंतु नेहमी त्यांचा संबंध प्रभाता बरोबर जोडलेला असतो. कांही उता-यावरुन अर्थबोधहि बरोबर होत नाही.

गृष्टि.-याचा अर्थ 'एकदांच व्यालेली गाय' असा आहे. ॠग्वेद, अथर्ववेद व मागाहूनचें सूत्रवाङ्मय यांमध्यें हा शब्द आला आहे.
गो.- 'बैल' अथवा 'गाय'. हे वैदिक आर्यांच्या संपत्तीचे घटक असून ॠग्वेदानंतर याचा उल्लेख बराच वेळ आला आहे. दूध (क्षीर) ताजें पीत असत, किंवा तूप, दहिं अथवा सोम यांमध्यें मिसळीत असत, अथवा त्यांत तांदूळ शिजवीत असत (क्षीरौदन). सकाळीं (प्रातर्-दोह), दुपारीं (संगव) आणि संध्याकाळीं (सायं-दोह) अशा तीन वेळां गायीचें दूध काढीत असत. त्याच वेळेला म्हणजे दिवसांतून तीन वेळां (प्रात:, संगव, सायम् ) गायी चरावयास सोडीत असत असें तैत्तिरीय ब्राह्मणांत म्हटलें आहे. पहिल्या दोहनाच्या वेळीं पुष्कळ दूध मिळे आणि दुस-या दोन वेळेला थोडें मिळे. ऐतरेय ब्राह्मणाप्रमाणें भरताच्या गायीचें कळप संध्याकाळीं गोठयांत आणि दुपारीं 'संगविनी' मध्यें असत असें दिसतें. सायणाचार्यांचें स्पष्टीकरण असें आहे कीं, दूध देणा-या गायी रात्रीं गोठयांत असत आणि बाकीच्या उघडया मैदानांत असत; परंतु दुपारीं उन्हाचे वेळी दोन्ही एकाच ठिकाणीं गोठाणावर असत. गायी जेव्हां कुरणांत चरत असतात त्या वेळेला स्वसर असें म्हणतात. त्या जेव्हां बाहेर जात तेव्हां त्यांचीं वांसरें त्यांच्या बरोबर सोडीत नसत; त्यांनां संगर्ववेळी आणि कधीं कधीं संध्याकाळीं त्यांच्या जवळ सोडीत असत. गायी चरावयास गेल्या म्हणजे त्यांची काळजी घेण्याकरितां एक गोप, (गोपाल) हातांत पराणी घेऊन त्यांच्या बरोबर हिंडत असे; परंतु त्यांचें हरवणें, खड्डयांत पडणें, हातपाय मोडणें, चोरीला जाणें यासारखे सर्व त्रास त्याच्या मागें असत (ॠ.१.१२.) मालकी दर्शविण्याकरितां गायींच्या कानावर खुणा करीत असत (ॠ.६.२८,३). दानस्तुतींतील अतिशयोक्तीचा भाग जरी वगळला तरी त्यांवरुन गुरांचे मोठमोठे कळप असत असें दिसतें. गायींची भरभराट व्हावी म्हणून (ॠ.१.८,३) ईश्वरापाशीं जें वारंवार मागणें केलें आहे आणि गोरुप संपत्ति वाढावी म्हणून ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांवरुन गायींचें महत्व किती होतें हें दिसून येईल. म्हणूनच गायी करितां स्वा-या (गविष्टि) झालेल्या प्रसिद्धच आहेत. ॠग्वेदांत भरतांच्या मुख्याला 'गव्यन् ग्राम:' असें म्हटलें आहे; आणि गो-पाय (गायी राखणें) या पासूनच ॠग्वेदकाळांत गुप् -राखणें हा धातु निघाला आहे. वैदिक काळांतील कवी गायींच्या हंबरण्याशीं आपल्या कवनांची तुलना करीत व अप्सरांचें गायींशी साम्य कल्पीत. वैदिक काळांतील गुरें निरनिराळया रंगाचीं (रोहित, शुक्ल, पृश्नि, कृष्ण.) असत. झिमर म्हणतो कीं, ॠग्वेदांत एका ठिकाणीं (१.८७,१) गायींच्या तोंडावर एकप्रकारचा झगझगीतपणा असतो असें लिहिलें आहे परंतु तें अनिश्चित आहे गाडया ओढणें आणि नांगराला जुंपणें हीं साधारण दोन कामें बैलांचीं असत. हे बैल बहुधा बडवलेले असत. गायीनां गाडी ओढण्याचें काम नेहमीं करावें लागत नसे पण कधीं कधीं त्यांनां गाडीला जुंपीतहि असत. गायीचें आणि बैलांचें मांस कधीं कधीं खाल्लें जाई. गुरें हीं प्रत्येकाच्या मालकीची वस्तु असे; आणि तें एक चलनी नाण्याचे प्रमाण मानून सर्व वस्तूंची किंमत त्याच्यावरुन ठरविली जात असे. साधारणपणें गो हा शब्द गायींपासून मिळणारे पदार्थ दर्शविण्याकरितांहि उपयोगांत आणीत. हा शब्द नेहमी दूध व क्वचित्प्रसंगीं गोमांस असाहि अर्थ दर्शवितो. पुष्कळ ठिकाणीं या शब्दाचा उपयोग 'निरनिराळया कारणाकरितां उपयोगांत आणलेलें कमावलेलें कातडें' अशा अर्थानें करितात. उदाहणार्थ धनुर्ज्या, गोफण, रथाचा भाग बांधण्याकरितां वादी, लगाम, चाबकाची पट्टी या ठिकाणीं साधारणपणें गो शब्दाचा अर्थहि तोच आहे.
गौर.-ॠग्वेद व नंतर गवय या शब्दाबरोबर एक बैलाच्या जातीचें नांव म्हणून हा शब्द आला आहे. वाजसनेयि संहितेंत जंगली (आरण्यक) गौर आहेत त्याअर्थी माणसाळलेले देखील गौर असले पाहिजेत. स्त्रीवाचक गौरी शब्द देखील आहे व गौरमृगी हा सामासिक शब्दहि आढळतो.
त्र्यवि.-ॠग्वेद व मागाहून झालेल्या संहिता यांमध्यें या शब्दाचा अर्थ अठरा महिन्यांचें वासरुं असा आहे.
दुघा.- या शब्दाचा अर्थ दूध देणारी असा असून संहितामधील कांहीं मंत्रांत त्याचा अर्थ गाय असा आहे.
धेना.-या शब्दाचा अर्थ दुभती गाय असा आहे. अनेक-वचनीं या शब्दाचा अर्थ दुधाचे घोट असा होईल. दोन ठिकाणीं रॉथ याचा अर्थ 'घोडी' असा करतो; व दुसरें एके ठिकाणीं 'वायूच्या रथांचे घोडे' असा करतो. उलटपक्षीं, बेनफे एके ठिकाणीं सायण व निरुक्तावरील दुर्गाचार्याची टीका यांनां अनुसरुन याचा अर्थ ओठ असा करतो. गेल्डनरेचे मतें या शब्दाचे अर्थ 'ओठ,' 'वाणी,' 'गाय,' 'आडवता,' व 'ओढा' किंवा 'प्रवाह' असे होतात.
धेनु.-दुभती गाय या अर्थानें हा शब्द ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ यामध्यें आलेला आहे. हा शब्द अनेक वेळां आलेला असून तिच्या दूध देण्यासंबंधानें तो विशेष येतो. तिची बैलाशींहि (वृषभ,पुमांस्, अनडुह्) तुलना केलेली आहे. या शब्दाचा अनेक वचनीं अर्थ दुधाचे घोट असा आहे. या शब्दापासून बनलेला शब्द म्हणजे धेनुका हा होय व त्याचा अर्थ नुसता 'स्त्री,' असा आहे.
१०पृषती.- कांही ठिकाणीं याचा अर्थ 'ठिपके असलेली गाय' असा आढळतो. परंतु हा शब्द सामान्यत: मरुतांच्या समूहाला लावलेला आढळतो व अशा वेळीं त्याचा अर्थ संशयात्मक असतो. भाष्यकारांच्या मताप्रमाणें त्याचा नेहमींचा अर्थ ठिपके असलेले हरिण असा आहे. परंतु महीधराचा अनुवाद करुन रॉथ म्हणतो कीं, या शब्दाचा अर्थ 'ठिपके असलेली घोडी' असा करणें जास्त श्रेयस्कर आहे. आतां ही गोष्ट खरी कीं, मरुतांनां नेहमीं पृषदश्व असें म्हणतात व त्याचा अर्थ 'ठिपकें असलेले घोडे' असा करणें जास्त सरळ दिसतें पुढील वाङ्मयांत आलेला अर्थ म्हटला म्हणजे 'ठिपके असलेली मूगी' हा होय. हाय अर्थ ग्रासमनलाहि पसंत पडला आहे.
११मर्यक.- हा शब्द ॠग्वेदांत येतो. याचा अर्थ गायीपासून दूर केलेला सांड असा असावा.
१२वत्स.-ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत वासरुं अशा अर्थानें हा शब्द वारंवार आलेला आहे. गायीनां पान्हा फुटावा म्हणून वासरांचा उपयोग करण्याबद्दल व गायीनां कांही ठराविक वेळीं वासरापासून वेगळें करण्याबद्दलचा उल्लेख वैदिक वाङ्मयांत आलेला आहे.
१३वशा.- ॠग्वेदांत व मागाहून झालेल्या ग्रंथांत या शब्दाचा अर्थ गाय असा आहे. भाष्यकारांच्या मतें याचा अर्थ वांझ गाय असा आहे. पण हा अर्थ कांही ठिकाणींच आढळतो.
१४वन्हि.- याचा अर्थ ओझी वाहणारा प्राणी असा आहे. उदाहरणार्थ, घोडा, बकरा किंवा बैल.
१५वाह.- ॠग्वेदामध्यें (४.५७,४-८) व अथर्व वेदामध्यें (६.१०२,१) याचा अर्थ नांगर ओढणारा असा आहे.
१६वृषभ.-ॠग्वेदामध्यें याचा अर्थ बैल असा आहे. पण बहुतकरुन अलंकारिक अर्थानें हा शब्द आलेला आहे.
१७सूददोहस्.-सूद देणारें म्हणजे पिशेलच्या मतें सोमरस पिण्यास योग्य करणारें जें दूध तें देणारी व रॉथच्या मतें विहिरीप्रमाणें दूध देणारी, अशा अर्थानें हा शब्द ॠग्वेदांत आलेला आहे.
१८तुर्यवाट् (पु.) तुर्यवाही (स्त्री.)-ॠग्वेदोत्तर संहितांमध्यें 'चार वर्षांचा वैल' किंवा 'गाय' अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
१९त्रिवत्स व त्रिवत्सा.-'तीन वर्षांचा.' हा शब्दसमूह ॠग्वेदोत्तर संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत गुरांनां लावलेला आहे. तीन वर्षांचा बैल तो 'त्रिवत्स' व तितक्याच वयाची गाय ती 'त्रिवत्सा,' असें वर्णन तैत्तिरीय संहितेंत (४.७,२०.) आलें आहे.
२०दित्यवाट् (पु.) दित्योहि (स्त्री)_या शब्दाचा अर्थ 'दोन वर्षांचा बैल किंवा गाय' असा असून ॠग्वेदोत्तर संहिता ग्रंथांत व ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द आलेला आहे.
२१निरष्ट.-'खच्ची केलेला' असा या शब्दाचा अर्थ असून ॠग्वेदोत्तर संहिता ग्रंथांत हा शब्द बैलांनां व शतपथ ब्राह्मणांत घोडयांनां लावलेला आहे.
२२पंचावि.-वाजसनेयि व तैत्तिरीय संहितेमध्यें हा शब्द अनेकदां आला असून त्याचा अर्थ पांच कोंकरांच्या आयुष्यकाला इतका, म्हणजे ३० महिन्यांच्या वयाचा असा आहे. अडीच वर्षांचा बैल तो 'पंचावि' आणि तितक्याच वयाची गाय ती 'पंचावी' होय.
२३पष्ठवाह्._यजुर्वेद संहितामध्यें हा शब्द आलेला असून याचा अर्थ (भाष्यकारांच्या मतें चार वर्षांचा) बैल असा आहे. चार वर्षांचा हा अर्थ संशयास्पद दिसतो; कारण पष्ठौहि (म्हणजे गाय) हा वारंवार येणारा शब्द आहे, व या ठिकाणीं या शब्दाबरोबर प्रथमगर्भा असाहि शब्द आलेला आहे. यावरुन चार वर्षाचा हा अर्थ अगदीं चुकीचा ठरतो असें मॅकडोनेल म्हणतो.
२४महानिरष्ट.- 'खच्ची केलेला मोठा बैल.' सूताच्या घरीं झालेल्या राजसूय यज्ञामध्यें दक्षिणा म्हणून याचा उल्लेख यजुर्वेद संहिता (१.८,९,१) व काठक संहिता १५.४,९,मै.सं.२.६.५ यांत आला आहे.