प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
गृहांतील सामान (ॠग्वेद)
गृहांतील सामान (ॠग्वेद) |
१आसेचन - यूषन् अथवा तूप वगैरेसारखा पातळ पदार्थ ठेवण्याचें भांडें असा याचा अर्थ आहे. याचा आकार अथवा उपयोग याबद्दल माहिती उपलब्ध नहीं.
२आहाव- विहिरीतूंन पाणी वर काढण्याचा पोहरा ॠ. १.३४,८ येथें भाष्यांत वेदार्थयत्नकारानीं द्रोणकलश, असा याचा अर्थ केला आहे. याचा घागर अगर डोणी असाहि अर्थ केला आहे. याचा घागर अगर डोणी असाहि अर्थ होऊ शकेल. सायणांनी पाणी पिण्याचे पात्र व एका ठिकाणीं पाणी पिण्याची जागा असा अर्थ केलेला आहे.
३उदंचन- ॠग्वेदांत हा शब्द फक्त लक्षणारूपानें आला असून ब्राह्मण ग्रंथांत याचा पोहोरा असा अर्थ आला आहे.
४उपबर्हण- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द उशी, बहुधा आसंदीवरील गादी या अर्थी उपयोगांत आणिला आहे. ॠग्वेदांत हा शब्द उपबर्हणी अस स्त्रीलिंगी त्याच अर्थीं परंतु अलंकारिक भाषेंत पृथ्वी किंवा भूमि यांनां लाविला आहे.
५उलूखल- ॠग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथांत हा शब्द उखळ या अर्थी योजिलेला आढळतो आणि वारंवार तो ‘उलूखलमुसल’ असा समासांत असतो. सूत्रकालापर्यंत या उलूखलाचा आकार कसा असे याचा उल्लेख नाहीं.
६कलश- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द सामान्यतः ‘भांडे’, पात्र या अर्थी योजितात आणि हें पात्र भोपळ्याचें किंवा मातीचें केलें असावे, कारण दोन्हीहि प्रकार त्या वेळीं उपयोगांत असत हे आपल्याला माहीत आहे. सोम ठेवण्याच्या लांकडी डोणीचा (द्रोणक) उल्लेख विधींत नेहमी केलेला असतो.
७कारोतर- ॠग्वेदांत व तदुत्तरकालीं सुरा (दारू) शुद्ध करण्याकरितां जी गाळणी किंवा जो गालक असतो तो. कारोतरो नाम वैदलश्चर्मवेष्टितो भाजनविशेषः। यस्मिन् सुरायाःस्त्रावणं क्रियते असें सायणांनीं भाष्यांत स्पष्टीकरण केलें आहे.
८कुम्भ- ॠग्वेदांत आणि नंतरहि हा शब्द ब-याच वेळां ‘भांडे’, ‘पात्र’ या अर्थी आलेला आहे. बहुतकरून तो मातीचा केलेला असल्यामुळें लवकर फुटत असे.
९कूचक्र- ॠग्वेदांतील एका संदिग्ध ॠचेमध्यें एकदांच हा शब्द आला असून त्याचा झिमरच्या मतें विहिरीतून पाणी वर काढण्याकरितां चाक असा अर्थ आहे. रॉथ त्याचें भाषांतर ‘स्त्रीचे स्तन’ असें करितो, तें कांही अंशी बरोबर दिसतें.
१०कोश- ॠग्वेदांत याचा अर्थ विहिरीतून पाणी वर काढण्याचा ‘पोहरा’ असा आहे. धार्मिक विधींत हा शब्द आल्यास त्याचा अर्थ सोम ठेवण्याचें कलशापेक्षां मोठें भांडे असा आहे.
११तल्प- यचा बिछाना किंवा मंचक हा अर्थ ॠग्वेद, अथर्ववेद व नंतरचे ग्रंथ यांत स्वीकारला आहे. औदुंबराच्या नांवापासून बनलेला पलंग असा उल्लेख तैत्तिरीय ब्राह्मणांत आलेला आहे. छांदोग्योपनिषदांत गुरूचा बिछाना भ्रष्ट केल्याबद्दलचा (गुरुतल्पग) उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत तल्प्य (लग्नाच्या बायकोपासून झालेला मुलगा) या विशेषणाचा कायदेशीर (धर्मपत्नीपासून झालेला) या अर्थी उपयोग केला आहे.
१२तितउ- हा शब्द ॠग्वेदामध्यें एकदां आलेला आहे व त्याचा अर्थ ‘चाळणी’ किंवा सक्तु पाखडण्याचें सूप असा आहे.
१३दण्ड- याचा अर्थ सोटा असा आहे. या शब्दाचा सामान्य अर्थ म्हणजे जनावरांनां हांकण्याची काठीं अथवा शस्त्र या अर्थाने उपयोग केला आहे. राक्षसांनां घालवून देण्यासाठी अभिमंत्रित केलेली काठी यज्ञकर्त्या यजमानास देत असत असा शतपथ, तैत्तिरीय या ब्राह्मण ग्रंथांत उल्लेख आहे.उपनयनप्रसंगी या दण्डाचें बरेंच महत्त्व असे. थोडया फरकानें पळीसारख्या वस्तूची मूठ (स्त्रुवदंड) असाहि याचा अर्थ होतो. या शब्दावरून राजसत्तेचाहि बोध होतो व राजाचा शिक्षा करण्याचा अधिकार ध्वनित होतो. (राजप्रेषितो दण्डः) अलीकडील भाषेंत बोलावयाचें म्हणजे त्या वेळी राजा हा फौजदारी कायद्याचें उगमस्थान गणला जाई आणि पुढेंहि ही सत्ता त्यानें सर्वस्वी आपल्याकडे ठेविली होती. पंचविशं ब्राह्मणांत निरपराधी (अदण्डय) लोकांनां शिक्षा करणें हें ब्राह्मणेत्तर व्रात्यांचे लक्षण समजलें जाई.
१४दृति- ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत प्रवाही पदार्थ ठेवण्याकरितां असलेली कातडयांची पिशवी या अर्थी हा शब्द वारंवार आला आहे. एके ठिकाणी या पिशवीला ध्मात म्हणजे फुगलेला भाता असें म्हटलें आहे. आणि इच्याशीं जलोदरानें फुगलेल्या माणसाची तुलना केली आहे. क्षीर व सुरा या पिशवींत ठेवीत असल्याचाहि उल्लेख आहे.
१५दृषद्- ॠग्वेद व अथर्ववेद यांमध्ये याचा अर्थ धान्य वाटून बारीक करण्याचा धोंडा (पाटा) असा आहे (जात्याची तळी असा नाहीं) या दगडावर धान्य ठेवून वाटीत. पुढें जेव्हां याचा उपला याच्यासह उल्लेख आला आहे तेव्हां कदाचित त्याचा जात्याची खालची किंवा वरची तळी अगर खलबत्ता असा अर्थ होईल. परंतु हें निश्चित पणें सांगता येत नाहीं. एगलिंगच्या मतें त्याचा अर्थ लहानमोठया जात्याच्या तळ्या असा आहे.
१६द्रोणाहाव- ॠग्वेदांत अवत (विहीर) याला हें दुसरें नांव आहे. पाणी ओढण्याच्या संबंधांत जेव्हा हा शब्द येतो, तेव्हां याचा लाकडी पोहोरा असा अर्थ होतो.
१७पचन- ॠग्वेद व शतपथ ह्याप्रमाणें ह्याचा अर्थ अन्न शिजविण्याकरितां भांडे असा आहे.
१८पात्र- ह्याचा मूळ अर्थ(पाणी वगैरे) पिण्याचे भांडे (पा म्हणजे पिणें ह्यापासून) असा असून ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांमध्यें सामान्यतः भांडें अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. हें पात्र एक तर लाकडाचें केलेले असेल किंवा चिकण मातीचें केलेले असेल. रॉथच्या मतानें हा शब्द मोजण्याचें माप या अर्थानें कांही उता-यांत आला आहे. ह्याचें सत्रीलिंगी रूप पात्री असें असून त्याचा अर्थ भांडें असा आहे.
१९मन्था- याचा ॠग्वेदाच्या एका ॠचेंत उल्लेख आला असून तेथें त्याचा अर्थ ‘रवी’ असा आहे. त्याचप्रमाणें तैत्तिरीय संहितेंत ‘मध’ या धातूचा अर्थ घुसळणें असा दिला आहे. अथर्ववेदाच्या एका उता-यांत याचा अर्थ मंथ प्रमाणें एखादें पेय असा आहे.
२०वह्य- ॠग्वेद व अथर्ववेद ह्यांमध्ये स्त्रियांनां सुखावह असा मंचक किंवा बिछाना अशा अर्थानें हा शब्द आला
आहे व मॅकडोनेलहि असेंच म्हणतो. परंतु सायणभाष्यांत याचा झोंपाळा असा अर्थ आहे. ‘वहत्यनेनेति वहनसाधनं’ आन्दोलिकादि वह्यम्। इ.
२१शंकु- ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें याचा अर्थ लाकडाची खुंटी असा आलेला आहे. उदाहरणार्थ शतपथ ब्राह्मणांत हा शब्द ज्या खुंटयांनी कातडे ताणलें जात असे त्या खुंटया किंवा खोडयाची मेख अशा अर्थानें आलेला आहे. छान्दोग्योपनिषदांत देंठ किंवा पानांतील तंतु असा याचा अर्थ होण्याचा संभव आहे.
२२शूल- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांमध्ये हा शब्द आला असून त्याचा अर्थ ज्यावर मांस भाजावयाचें तो लोखंडी खिळा असा आहे. सायणभाष्यांत याचा सुरी असा अर्थ आहे.
२३सूना- ॠग्वेद व अथर्ववेद ह्यांमध्यें मांस ठेवण्याकरितां विणलेली कळकाची टोपली असा याचा अर्थ आहे.
२४सूर्मि- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांमध्यें पीटर्सबर्ग कोशाप्रमाणें या शब्दाचा अर्थ दिव्याप्रमाणें जिचा उपयोग होतो अशी नळी असा आला आहे. ॠग्वेदांत एका ठिकाणीं या शब्दाचा अर्थ पाणी नेण्याची नळी असा असावा. सायणांनी भाष्यांत ‘ज्वाला’ असा अर्थ दिला आहे.
२५आसन्दी- ॠग्वेदेत्तर संहिता व ब्राह्मणग्रंथांत हा शब्द कशाचें तरी आसन ह्या अर्थी वारंवार उपयोगांत आणिला आहे. व्रात्याकरितां जें आसन किंवा पीठ दिलें जात होतें त्याचे अथर्ववेदांत विस्तारपूर्वक वर्णन केलें आहे. मॅकडोनेलच्या मतें त्याला दोन पाय होते. सायणभाष्याप्रमाणें ह्याला चार पाय असून मध्यें विणलेलें असें होतें. त्यावर गादी (आस्तरण), उशी (उपबर्हण) असून बसण्याची जागा (आसाद) व धरण्यास आधार (उपश्रय) हीं होती. अशाच पीठांचें वर्णन कौषीतकी उपनिषद् व जैमिनीय ब्राह्मण ह्यांमध्यें आलें आहे. राज्याभिषेकाच्या वेळी जें आसन उपयोगांत आणित त्याचें अथर्ववेदांत याच भाषेंत वर्णन केले आहे, त्यांत त्याच्या पायाची उंची एक वीत, लांबी व रुंदीचे तुकडे एक हात, विणकर (विवयन), मुंज गवताची आणि आसन उदुंबर लाकडाचें, असें वर्णन आलें आहे. अथर्ववेदांतील एका उता-यावरून लानमन म्हणतो कीं, ती बैठक आरामखुर्चीसारखी असावी. तेथें देखील उपधान व उपवासन या शब्दांचा उल्लेख आहे. शतपथ ब्राह्मणांतील वर्णनावरून ती मोठी भव्य बैठक असावीसें वाटतें. एके ठिकाणीं ती खदिर नामक लांकडाची, छिद्रित (वितृष्णा) पटयांनी जोडलेली, (भारतांत वर्णिल्याप्रमाणें) असें वर्णन आहे. सौत्रामणी नामक याग (इंद्राकरितां यज्ञ) करतेवेळी या आसंदीचें वर्णन उदुंबराची बैठक असलेली, गुढघ्याइतकी उंच, अमर्याद लांबी रुंदीची व वेतानें जाळीदार विणलेली, असें आलें आहे. राजसिंहासन खांद्याइतके उंच, उंदुबराचें, व वल्वज गवतानें विणलेले असें से. दुसरीकडे हीं आसनें एक वीत उंच, एक हात लांब रुंद, उदुंबर लांकडाची, गवताच्या दोरीनें विणलेली व मातीनें आच्छादिलेलीं, असत असा उल्लेख आहे.
२६उपला- ब्राह्मण ग्रंथांत ह्याचा अर्थ दगडाचा बत्ता व दृषद शब्दाचा खल असा होऊं शकेल. परंतु संहितेंत उपर म्हणजे खल व दृषद म्हणजे बत्ता असा अर्थ आहे. तैत्तिरीय संहितेंत याचा अर्थ वरंवटा असा आहे.
२७उपानह् - संहितानंतर ब्रह्मणग्रंथांत हा शब्द जोडा या अर्थी योजिला आहे. डुकराचें कातडें जोडयाकरितां उपयोगांत आणीत असत असें शतपथ ब्राह्मणांत वर्णन आलें आहे. दण्डोपानह (जोडा काठी) हा शब्दसमुच्चय कौषीतकी ब्राह्मणांतहि उपयोगांत आणिला आहे.
२८कट- वेताची केलेली चटई असा याचा अर्थ आहे. वाजसनेयि संहितेंत बुरुडाला बिडल-कारी असें म्हटलें असून अथर्ववेदांत या कामांकरिता वेत चिरण्याचा उल्लेख आला आहे.
२९क्रुमुक- हें एका लांकडाचें नांव असून कृमुक याचें हें बदललेलें रूप असावें.
३०गुग्गुलु- गुल्गुलु असा हि पाठभेद आहे. याचा अर्थ गुग्गुळ किंवा देवधूप. अथर्ववेदांत एकेठिकाणीं हा सिंधु आणि समुद्र यांपासून उत्पन्न झाला असें म्हटलें आहे. यावरून झिमर म्हणतो कीं हा दर्यावरील व्यापाराचा उल्लेख आहे, कारण गुग्गुळ समुद्रापासून होत नसून तो झाडाचा चीक आहे. कदाचित् येथें या शब्दानें दुसराच कांही पदार्थ अभिप्रेत असावा. या रूपांत हा शब्द अथर्ववेद व ऐतरेय ब्राह्मण ह्यांत असून गुल्गुलु हें जुनें रूपहि वरचेवर आढळतें. या दोन रूपासंबंधी पाहतां हस्तलिखित प्रतींत केव्हांहि मेळ नसतो.
३१पल्पूलन- तैत्तिरीय संहितेंत व अथर्ववेदांत हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ ‘क्षारजल’ कोणता तरी झोंबणारा पदार्थ मिसळलेलें पाणी, असा असून यांत कपडे धूत असत. अथर्ववेदांत याचा मूत्र असा अर्थ आहे. पल्पूलय हें क्रियापद (पल्पूलयति जले प्लावयति शरीरं प्रक्षालय प्रीत्यर्थः) तैत्तिरीय संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण ह्यांमध्यें आलेले आहे. सूत्रांत चर्में व वस्त्रें अशा पाण्यानें धुतलीं जात असा उल्लेख आलेला आहे.
३२पारीणह्य- तैत्तिरीय संहितेमध्यें ह्या शब्दाचा अर्थ घरगुतीं भांडी असा आहे व पत्नीच्या ताब्यांत ही भांडी असत असें त्या संहितेंत म्हटलें आहे.
३३प्लेंख- हें प्रेख यांचे दुसरें रूप असून याचा अर्थ झोका, झोला, झोपाळा,दोला असा आहे. व तैत्तिरीय संहितेंत व तैत्तिरीय ब्राह्मणांत हा शब्द आला आहे.
३४मुसल- ॠग्वेदोत्तर संहितांमध्यें व ब्राह्मणांत हा शब्द आला असून याचा अर्थ मुसळ असा आहे.
३५वंश- बांबूचे केलेले घराचें वांसे अशा अर्थानें हा शब्द ॠग्वेदोत्तर संहिता ग्रंथांत आलेला आहे.
३६विवध किंवा वी-वध- एखादें ओझें वाहून नेण्याकरितां खांद्यावर घेतलेलें जूं असा याचा अर्थ दिसतो. पण ब्राह्मण ग्रंथांत ह्या शब्दाचा फक्त अलंकारिक रीत्या उपयोग केलेला दिसतो, जसें ‘वि-विवध’ म्हणजे विषम प्रमाणांत विभागलेल्या ओझ्यासहित, आणि ‘संवीवधता’ म्हणजे ओझ्याचा सारखेपणा.
३७शल्क- उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द अग्नि पेटविण्याकरितां उपयोगांत आणण्याची ढलपी अशा अर्थानें आला आहे.
३८शूर्प- तैत्तिरीय संहिता, अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्ये हा शब्द आला असून त्याचा अर्थ धान्य पाखडण्याचें सूप असा आहे. ह्याला ‘वर्षवृद्ध’ पावसानें फुगलेलें असें अथर्ववेदांत म्हटलें आहे. यावूरन झिमर म्हणतो त्याप्रमाणें हें सूप वाळलेल्या लाकडांचेंच नव्हे तर कधीं कधीं वेताचें बनवीत असें दिसतें.
३९संन्नहन- नंतरच्या संहिता व ब्राह्मण ह्यांत हा शब्द आला असून याचा अर्थ पट्टी, पट्टा किंवा बांधण्याचा दोर असा आहे.
४०स्थली- तैत्तिरीय संहिता, अथर्ववेद व मागाहूनचे ह्यांमध्यें स्वयंपाकाचें भांडें या अर्थी हा शब्द आहे.
४१अभिषवणी- अथर्ववेदांतील ह्या शब्दाचें भाषांतर झिमर दाबण्याचें यंत्र असें करितो. परंतु तें फक्त विशेषण दाबण्यास उपयोगी या अर्थी असावें.
४२आसाद- अथर्ववेदांत हा व्रात्याच्या वेळचा आसंदीचा भाग आहे असें वर्णन आहे. व्हिटने म्हणतो, तो आसनाचा भाग नसून आसनच आहे असें मानणें बरें. अफ्रेट, झिमर आणि रॉथ म्हणतात कीं, याचा अर्थ आसनावर ठेवण्याचा तक्या. परंतु हा अर्थ व्यक्त करण्यास आस्तरण हा शब्द आहेच.
४३आस्तरण- व्रात्यांच्या वेळीं ज्या आसन्दीचा उपयोग करीत तिच्यावर घालण्याचें जें आच्छादन तें. राजसूयाच्या वेळचें राजाचें आच्छादन व्याघ्रांबर असले तरी चालतें. कौषीतकी उपनिषदांतील शब्द उपस्तरण हा आहे.
४४उपधान- अथर्ववेदांत हा शब्द आसन्दीवरील उशी या अर्थानें आला आहे. दुस-या ग्रंथांत याला उपबर्हण असें म्हटलें आहे.
४५उष्यल- अथर्ववेदांतील पर्यकाच्या किंवा वैवाहिक रथाच्या वर्णनांत हा शब्द आला असून याचा अर्थ चौकटीची चार लांकडें असा आहे. या पाठाबद्दल संशय आहे. बहुतेककरून उष्पल असा पाठ असावा.
४६कंस- अथर्ववेदांत व इतर ठिकाणीं हा शब्द धातूंचे पात्र या अर्थानें आला आहे.
४७कशिपु- कशिपु म्ह. चटई किंवा उशी. अथर्ववेदांत म्हटलें आहे कीं, स्त्रिया दगडानें वेत फोडून त्याच्या चटया करीत. उलटपक्षीं शतपथांत सोन्याच्या चटईचा उल्लेख आहे.
४८कुल्मल- अथर्ववेद, मैत्रायणी संहिता व शतपथ ब्राह्मण यांत हा शब्द असून याचा अर्थ बाणाच्या फळाच्या ज्या भागांत बाणाचा दांडा घालतात तो बाणाच्या मानेसारखा भाग.
४९नृति- अथर्ववेदाच्या एका लेखांत याचा अर्थ कातडयांची पिशवी असा आहे. पैप्पलाद शुद्ध प्रतीत जरी हाच शब्द असला तरी रॉथ व व्हिटने म्हणतो त्याप्रमाणे हा शब्द दृति असा आपण समजला पाहिजे. लुडविग या नृतीचा अर्थ नर्तक असा करतो. पण तो संदर्भास जमत नाहीं.
५०बंधन- बंधन म्हणजे दोर किंवा दुसरें बांधावयाचे साधन. हा शब्द अथर्ववेदांत व नंतरच्या ग्रंथांत आढळतो.
५१वर्घ्र- विणलेला पलंग जिनें बांधतात ती वादी किंवा पट्टी. हा शब्द अथर्ववेद व शतपथ ब्राह्मण ह्यांत आढळतो.
५२शयन- अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यांत याचा अर्थ मंचक असा आहे.
५३शिक्य- अथर्ववेद व तदुत्तर ग्रंथांत याचा अर्थ दोराचें शिकें असा आहे.
५४सूत्र- अथर्ववेद व उदुत्तर ग्रंथांत सूत, धागा असा या शब्दाचा अर्थ आहे. बृहदारण्यकोपनिषदांत हा शब्द ‘यज्ञासंबंधी नियमांचे पुरतक’ अशा अर्थाने आला आहे.
५५सेहु- अथर्वात एका तुलनेच्या प्रसंगी हा शब्द आला असून त्याचा अर्थ रसहीन पदार्थ असा आहे.
५६चप्य- वाजसनेयि संहिता आणि शतपथ ब्राह्मण यांत हें एका यज्ञपात्राचें नांव आहे.
५७तुला- याचा अर्थ तराजू असा आहे व हा शब्द वाजसनेयि संहितेमध्यें आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत सुध्दां या जगांत व पारलौकिक जगांत मनुष्याची बरीवाईट कृत्यें मापण्याकरितां तागडीबद्दल उल्लेख आलेला आहे. ही तागडी व मागाहून वर्णन केलेलें दिव्य याकरितां जी तागडी लागत असे ती तागडी या दोन्ही निराळ्या आहेत. मनुष्य अपराधी किंवा निरपराधी हें ठरविण्याकरितां संशयित माणसाला तागडींत घालून ब्राह्मणग्रंथोत्तरकालांत त्याचें दोनदा वजन करीत. व दुस-या वेळी त्या माणसाचें पहिल्या वेळेच्या वजनापेक्षां जसें कमीजास्त वजन भरेल तसा तो अपराधी किंवा निरपराधी ठरवीत असत. ही मागाहून सुरू झालेली चाल पूर्वीच्या कालीं होती असें मानणें शक्य नाहीं.
५८नड्वला- ‘वेताचा बिछाना’. हा शब्द वाजसनेयि संहिता (३०,१६) व तैत्तिरीय ब्राह्मण (३,४,१२,१) यांमध्यें आलेला आहे.
५९वाल- मागाहून झालेल्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांत केसाची चाळणी असा याचा अर्थ आहे.
६०शलली- केस वेगळे करण्याकरितां व डोळयांत काजळ घालण्याकरितां या साळपिसाचा उपयोग होतो व अशा अर्थानेंच हा शब्द शतपथ व तैत्तिरीय ब्राह्मणांत आलेला आहे.
६१सत- एका यज्ञामध्यें उल्लेखिलेल्या एक प्रकारच्या भांडयाचें हें नांव आहे.
६२स्तुप- वाजसनेयि संहितेंत (३,२,२५,२) केसांचा गोंडा असा याचा अर्थ आहे. हाच अर्थ शतपथ ब्राह्मणांत आहे.
६३अंगारावक्षयण- बृहदारण्यकोपनिषदांतील अनिश्चित अर्थाचा शब्द. मॅक्समुल्लर आणि बोथलिंक यांच्या भाषांतरांत त्याचा अर्थ सांडशी असा केला आहे. सें.पी. कोशांत त्याचा अर्थ कोळसे विझविण्याकरितां भांडें असा केला आहे. आणि मॉनिअर विल्यम्स् हा कोळसे विझविण्याकरितां यंत्र असा अर्थ घेतो. लहान सें.पी.कोशांत त्याचें भाषांतर कोळसे उचलण्याचा चिमटा असें केलें आहे.
६४आदर्श- ‘आरसा’. हा शब्द उपनिषदें आणि आरण्यकें यांतच सांपडतो.
६५उच्छीर्षक - कौषीतकी उपनिषद् (१,५) यांतील पर्यंकाच्या वर्णनांत आल्यामुळें याचा अर्थ उशी असा असावा.
६६उपमन्थनी- बृहदारण्यकोपनिषदांत ‘रवी’ या अर्थी हा उपयोगांत आणिला आहे. वाजसनेयि संहितेंत उपमंथितृ हा पुरुषमेधांतील बळींच्या यादींत आहे आणि क्रियापद, उपमन्थू म्हणजे घुसळण्याकरितां द्रव्यें अशा अर्थी योजिला आहे.
६७उपश्री-उपश्रय- एकाच शब्दाचे हे दोन पाठ आहेत. पहिला शब्द कौषीतकी उपनिषद् या ग्रंथांत सांपडतो आणि दुसरा पाठ इतर उपनिषदांमध्यें आढळतो आणि खरोखर अथर्ववेदांतील उता-यांतहि जरी मूळ अपश्रयः असा पाठ आहे तरी उपश्रय या अर्थीच असावा असें रॉथ म्हणतो. दोनहि ठिकाणीं त्याचा अर्थ पर्यक याशी संबंध असलेला (अथर्ववेदांत आसन्दी आणि कौषीतकी उपनिषदांत पर्यंक) असा होतो. आफ्रेट, रॉथ आणि मॅक्समुल्लर उशी किंवा आच्छादन असा अर्थ करितात. परंतु व्हिटने म्हणतो कीं, त्याचा अर्थ ‘आधार’ किंवा ‘स्तंभ’ असा आहे.
६८उल्मुक- ब्राह्मणांमध्यें जळतें लांकूड या अर्थी हा शब्द सर्वसाधारणपणें उपयोगांत आणितात आणि त्यापासून कोळसा(अंगार) काढितां येतो.
६९उल्मुका वक्षयण- शतपथ ब्राह्मणांत हा शब्द पुष्कळ वेळा आला असून त्याचा अग्नि शमविण्याचा उपाय अथवा निश्चितपणें त्याचा अर्थ चिमटा असा आहे.
७०करीष- शतपथ ब्राह्मणांत गोव-या या अर्थी हा शब्द आला आहे. अथर्ववेदावरून असें कळतें कीं, शेंतांतील प्रांण्यांच्या नैसर्गिक खताची फार प्रशंसा करीत.
७१चूर्ण- चूर्ण याचा अर्थ चूर्णहस्ता या समासावरून सुगंधि पूड असा होतो. चूर्णहस्ता हें विशेषण कौषीतकी उपनिषदांत अप्सरांनां दिलेलें आहे.
७२तर्कु- याचा अर्थ चाती असा आहे. यास्काच्या निरुक्ताव्रूनच (२,१) हा शब्द फक्त वैदिक वाङ्मयांत आलेला आहे असें म्हणता येईल. निरुक्तांत येण्याचें कारण शब्दांच्या स्थानविनिमयाचें उदाहरण म्हणून हा शब्द यास्कानें दिलेला आहे. त्याच्या मतें हा शब्द कर्त् कातणें या धातूपासून आलेला आहे.
७३तेजनी- याचा अर्थ उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ग्रंथांत वेताची जुडी असा आहे व कांही ठिकाणीं या जुडीचा बनलेला दोर असाहि आहे. कारण तेजनीच्या दोन्ही टोकांचा उल्लेख केलेला आहे.
७४धृष्टि- तैत्तिरीय आरण्यकांत द्विवचनी आलेलें त्याचप्रमाणें शतपथ ब्राह्मण व सूत्रग्रंथ ह्यांत आलेलें हें रूप निखारे उचलण्याचे चिमटे अशा अर्थानें आलेलें आहे.
७५निनाह्य- शतपथ ब्राह्मणांत (३,९,२,८.) पाण्याचा घडा असा अर्थ आहे व टीकाकाराचे मतानें ह्याला निनाह्य म्हणण्याचें कारण तो जमीनित पुरलेला असे. एगलिंग ह्या शब्दाचा पाणी थंड होण्याकरितां जमीनींत पुरलेला हौद किंवा भांडे असा अर्थ करतो.
७६पर्यंक- कौषीतकी उपनिषदामध्यें ब्राह्मणाच्या आसनाचें हें नांव आहे. इतरत्र ज्याला ‘आसंदि’ असें नांव आहे तें व हा पर्यक एकच होत. उपनिषदांत ह्याचा जो उपयोग आलेला आहे त्यावरून अंग टाकण्याकरितां लांबट आसन असा ह्याचा क्वचितच अर्थ होतो व ह्याचा अर्थ सिंहासन असाहि दिसतो.
७७परिचर्मण्य- कौषीतकी ब्राह्मण (६,१२) व शां. आरण्याक (२,१) ह्यांमध्यें कातडयाची वादी असा ह्याचा अर्थ आहे.
७८परिपवन- निरुक्तामध्यें (४,९,१०) धान्य चाळण्याचें यंत्र असा याचा अर्थ आहे.
७९पान्नेजन- शतपथ ब्राह्मणांत पाय धुण्याकरितां एखादे् भांडे असा ह्याचा अर्थ आहे.
८०पिन्वन- शतपथ ब्राह्मणांत (१४,१,२,१७, २,१,११,३,१,२२;) एखाद्या व्रताचे वेळीं उपयोगी पडणारे भांडे अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे,
८१पिशील- शतपथ ब्राह्मणांत (२,५,३,६) लांकडी भांडे किंवा ताट असा ह्याचा अर्थ दिलेला आहे. लाटयायन श्रौतसूत्रामध्यें (४,२,४,५) एका पिशील वीणेचा उल्लेख आलेला आहे व ही वीणा एक प्रकारची सतार असली पाहिजे.
८२प्रणेजन- हा शतपथ ब्राह्मणांत (१,२,२,१८) शब्द येतो. याचा अर्थ ‘धुण्यासाठी पाणी’ असा आहे.
८३प्रेंख- ‘झोला’ झोंपाळा ‘पाळणा’, महाव्रत विधीच्या वेळीं येणा-या वर्णनांत याचा उल्लेख येतो. हा उल्लेख काठक संहिता, ऐतरेय आरण्यक आणि पंचविंश ब्राह्मण आणि इतर ठिकाणीं सुद्धां आला आहे. उपलब्ध माहितीवरून असें म्हणावें लागतें कीं, सध्यांच्या झोंपाळयाप्रमाणेंच पूर्वीहि तो करीत असावेत.
८४प्रोष्ठ- हा शब्द तैत्तिरीय ब्राह्मणांत आढळतो. तेथें त्याचा समासांत उपयोग केलेला नाहीं. ॠग्वेदांत ‘प्रोष्ठेशय’ या विशेषणांत स्त्रियासंबंधी हा शब्द उपयोगांत आणलेला आहे. यावरून याचा अर्थ कदाचित बांक, हाच असावा. पहिल्या उता-यांत हा शब्द ‘तल्प,’ आणि ‘वह्य’ यांहून अगदीं वेगळा (अर्थात) आहे असें दाखविलें आहे. परंतु तेथें त्यांतील अगदीं पूर्ण अंतर काय असावें हें सिद्ध करण्यास कांही पुरेसा पुरावा सांपडत नाहीं.
८५फलक- ह्याचा अर्थ ‘फळी’, हा शब्द गाडी किंवा रथ तयार करण्याच्या प्रसंगी उपयोगांत आणतात. किंवा सोम पिळून काढण्याकरितां (अधिषवण फलक) किंवा इतर कामांकरिता लागणारी फळी.
८६बृसी- याचा अर्थ गवताची उशी. हा शब्द सूत्रांतून व ऐतरेय आरण्यकांत आला आहे. वृशी व वृषी हीं याचीं चुकीचीं रूपें मधून मधून आढळतात.
८७भस्त्रा- शतपथ ब्राह्मणांत याचा अर्थ चामडयाची बाटली किंवा थैली असा आहे. (१.१,२,७;६,३,१६).
८८मणिक- जुन्या अद्भुत ब्राह्मणांत आणि सूत्रांत याचा अर्थ पाण्याची बाटली असा आहे.
८९मूत- ॠग्वेदोत्तर संहितेंत आणि ब्राह्मणांत विणलेली टोपली या अर्थी हा शब्द येतो. मूतक म्हणजे एक लहान टोपली.
९०वालदामन् - शतपथ ब्राह्मणांत घोडयाच्या केसांची वादी अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
९१शुंबल- शतपथ ब्राह्मणांत हा शब्द आलेला आहे. ह्या शब्दाचा अर्थ अनिश्चित आहे. हरिस्वामी आपल्या टीकेंत ह्याचा अर्थ गवताची पेंढी असा करितो. एगलिंग हा कापसाचा धागा किंवा कोशाचा धागा असें अर्थ सुचवितो. कांहीहि असलें तरी लवकर पेट घेणारा पदार्थ असा ह्याचा अर्थ असला पाहिजे.
९२श्लेष्मन्- ह्याचा अर्थ ज्याच्यावर एखाद्या वस्तूचे भाग जोडले जातात तें असा आहे. चामडे असेल तर बारिक तारा, रथ असेल तर दोर व लांकूड असेल तर सरस (चिकटवावयाचा) असा ह्या शब्दाचा अर्थ होईल.
९३हिरण्यकशिपु- ब्राह्मण ग्रंथांत ह्या शब्दाचा अर्थ सोन्याचें म्हणजे सोनेरी वस्त्रानें बनविलेलें आसन असा आहे.