प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
खेळ
खेळ व खेळसंबंधी (ॠग्वेद) |
१अक्ष- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें ह्या शब्दाचा एकवचनी आणि अनेकवचनी असा वारंवार उपयोग केलेला आढळतो. त्याचा अर्थ ‘फांसा’ आणि फांसे, असा एकवचनी आणि अनेकवचनीं अनुक्रमें केलेला आढळतो. घोडयांच्या शर्यतीबरोबर फांसे खेळणें हा वेदकालीन आर्याचा मुख्य खेळ होता; परंतु वाङ्मयांत ह्या खेळाचा पुष्कळ वेळां निर्देश केलेला असला तरी तो कोणच्या त-हेनें खेळत असत ह्याचें बरोबर चित्र काढणें फार कठीण आहे. अक्षाचे उपयोग पुढीलप्रमाणें आढळून येतात. (१) पदार्थ- हे फांसे “विभीदक” नांवाच्या कठीण कवचीच्या फळांचे केलेले असत. ह्या फाशांचा निर्देश ॠग्वेद आणि अथर्ववेद ह्या दोहोंतहि केलेला आढळतो. म्हणून ह्याला “पिंगट” (बभ्रू) आणि “उघडया जागेवर जन्मलेला” असें म्हणतात. अग्न्याधान्याच्या वेळीं फांशाच्या खेळाचें वर्णन आहे त्यांत आणि राजसूय यज्ञप्रसंगीहि फांसे कशाचे करतात हें सांगितलेलें नाहीं परंतु विभीदकाच्या फळासारख्या सोन्याच्या तुकडयांचा प्रसंगविशेषीं उपयोग होत असें हें शक्य आहे. अर्वाचीनकालीं कवडयांचा उपयोग फाशांकडे होतो पण त्याचा वैदिक वाङ्मयांत निर्देश केलेला आढळत नाहीं. (२) संख्या- ॠग्वेदांत फांसे खेळणारांचे “समहाचा अग्रेसर” (सेनानीर्महतो गणस्य) असें वर्णन केले आहे. आणि दुस-या वचनांत त्याची संख्या “त्रिपंचाशः” अशी दिली आहे. याचा अर्थ निरनिराळया ग्रंथकारांनीं निरनिराळा केला आहे. लुडविग, वेबर, आणि झिमर हे त्या शब्दाचा अर्थ पंधरा असा करितात. परंतु मॅकडोनेल तें व्याकरणदृष्टया क्वचितच संभवनीय आहे असें म्हणतो. रॉथ आणि ग्रासमन हे त्याचा अर्थ त्रेपन्न असा करितात व ल्यूडर्स दीडशें करतो तथापि तो म्हणतो कीं, अगणित संख्या दाखविण्याकरितां ह्या शब्दाचा उपयोग होत असावा लहान संख्या दाखविण्याकरितां ह्या शब्दाचा उपयोग करितात असा अर्थ आहे असें दर्शविण्याकरितां झिमर ॠग्वेदांतील “ज्याच्या जवळ चार त्याला भितो” हा उतारा देतो. परंतु तो उतारा खेळ खेळण्याच्या रितीविषयीं आहे. (३) खेळाची रीति- अर्वाचीन संहिता आणि ब्राह्मण ह्यांतील पुष्कळशा उता-यांत फांसे खेळण्यासंबंधी कांही शब्द सांपडतात. तैत्तिरीय संहितेंतील नांवे कृत, त्रेता, द्वापर, आस्कन्द आणि अभिभू हीं आहेत. पुरुषमेधामध्यें जे बळी देतात त्यांतील कितव हा अक्षराजाला, आदिनवदर्श कृताला, कल्पिन् त्रेताला, अधिकल्पी द्वापाराला, आणि सभास्थाणु आस्कन्दाला देतात असें वाजसनेयि संहितेंत म्हटलें आहे. त्याच प्रसंगीचें तैत्तिरीय ब्राह्मणांतील शब्द बलि, कितव, सभावी, आदिनवदर्श, बहिःसद, आणि सभास्थाणु हे आहेत आणि देवता अक्षराज, कृत, त्रेता, द्वापार आणि कलि या आहेत. कलींचे दुसरें नांव अभिभू असें असावें असें शतपथ ब्राह्मणावरून वाटतें आणि त्याच वेळच्या तैत्तिरीय आणि वाजसनेयि संहितेंतील यादींवरून असें वाटतें कीं, अभिभू आणि अक्षराज हे दोन्हीहि एकच होत. पण तैत्तिरीय ब्राह्मणांतील यादींत दोहोंचाहि उल्लेख केलेला आहे. वरील डावांची कांहीं नांवें ॠग्वेद आणि अथर्ववेद ह्यांतहि आढळतात. कलीचा निर्देश अथर्ववेदांत केला आहे आणि ॠग्वेदांतील पुष्कळशा वचनांत कृत म्हणजे “डांव” (पण किंवा जिंकलेले धन नव्हे) असा अर्थ आहे असें ल्यूडर्स दाखवितो. आणि हाच अर्थ अथर्ववेदांतहि आहे. आणखी ॠग्वेदांतील एका वचनावरून एकापेक्षां पुष्कळ अधिक डावांची नांवें होंती असें दिसतें. देवांची तुलना धन देणारे आणि नाश करणारे डाव यांशीं केली आहे, यावरूनहि वरील गोष्ट स्पष्ट होते. डाव कोणच्या त-हेनें फेंकीत असत हें कांही कळत नाहीं, सेन्टपीटर्सबर्ग कोशावरून असें अनुमान निघतें कीं, वरील जीं नांवे आहेत तीं ४,३,२ अथवा १ अशा चिन्हांकित फाशांनां दिलेली असावी अथवा तशा खुणा केलेल्या फाशांच्या बाजूनां लावीत असत आणि हा अर्थ आधुनिक टीकाकारांनां मान्य आहे असें दिसतें. परंतु पहिल्या अर्थाला कांही आधार सांपडत नाहीं आणि दुस-या अर्थाविषयी विचार केल्यास विभीदक फळांचा उपयोग फाशाकडे होत असला तर आकारावरून त्या फळांची अमुक बाजू वरची असें सांगणें निश्चितपणें संभवत नाहीं. वरील शब्दांचा अर्थ अग्न्याधेयांतील खेळाच्या विधीचें वर्णन आणि राजसूयांतील विधीचें वर्णन यांच्या योगानें बराच विशद झाला आहे. खेळांतील बारीक सारीक गोष्ट जरी खात्रीलायक माहीत नाहीं तरी एवढे मात्र दिसतें की हा खेळ म्हणजे फाशांवरील समसंख्या बहुत करून जी चारनें भागिली जाईल अशी संख्या मिळविणें आणि अशाच संख्येला कृत असें म्हणतात. दुसरे तीन डाव म्हणजे चारनी भागून जर शेवटी तीन उरले तर त्याला त्रेता असें म्हणत, दोन उरले तर द्वापार एक उरला तर कलि. जर पांच हा भाजक असेल आणि ह्या भाजकानें भागून जर खालीं काहींच उरलें नाहीं तर त्याला कलि म्हणत, खालीं चार उरलें तर त्याला कृत आणि तीन उरले तर त्रेता आणि ह्याप्रमाणें फाश्यांवर कोणत्याहि त-हेचें आकडे खोदडेले नसत तर एकंदर फांश्यांच्या संख्येंची बेरीज करावी लागत असे. ॠग्वेदांत वर्णन केलेला खेळ त्याचप्रमाणें खेळत असले पाहिजेत. पण त्यांतील किरकोळ गोष्टींची माहिती मिळत नाही. फांसे खात्रीनें पुष्कळ असत आणि चार हा डाव टाकावयाचा व एक पडला की हरावयाचे या गोष्टीवरून कृत हा शब्द डाव जिंयण्याला कां वापरीत यांचा उलगड होतो. दुस-या पक्षीं अथर्ववेदांत कली हाच फासा खेळ जिंकावयास पाहिजे असा उल्लेख आहे, एका अर्थी व्कवहारांतील खेळ हा विधींतील खेळांत
खेळणारे बहुधा फक्त जितके फांसे जरूर असत तितकेच घेत असत असें वाटतें. यामुळें खेळ खेळलें असतां कांही अशुभ गोष्टी होण्याचा संभव असे व तो टाळावा म्हणून असें करीत असावें असें दिसतें. व्यावहारिक खेळांत पुढीलप्रमाणें खेळत असत असें ल्यूडर्स सुचवितो. एकजण खेळण्याच्या जागेवर फांसे टाकून कांही दान घेत असे, नंतर दुसर चारांनीं किंवा पांचांनीं भाग जाणारी संख्या होईल अशी त्या दानांत फांसे टाकून भर घालण्याचा प्रयत्न की. खेळणा-यांमध्यें अजमास करण्याची शक्ति पाहिजे ह्यावर जे पुढील ग्रंथांत (उ. नलकथेंत) जोर दिलेला आढळतो. त्यावरून हा खेळ असाच खेळत असावे असें वाटतें. खेळामध्यें फळी वगैरेचा उपयोग करीत नसत परंतु फांसे टाकण्याकरितां जमिनींत एक खोलगट जागा करीत असत (अधिदेवन, देवन, इरिण). फांसे फेंकण्याकरितां पेटी नसे परंतु फांसे ठेवण्याकरितां मात्र असे (अक्षावपन). डावाला अथवा फेंकीला प्राचीन ग्रंथांत ग्रह अथवा ग्राभ असें म्हणत. पणाला विज असें म्हणत. जुगारामध्यें अतीशय नुकसान होत असे. जुगार खेळणारा आपलें सर्व धन आणि त्याची बायको देखील गमावली म्हणून शोक करीत असल्याचें ॠग्वेदांत वर्णन आहे. छांदोग्य उपनिषदांत खेळाचा दुसरा प्रकार उल्लेखित आहे असें ल्यूडर्स म्हणतो.
२इरिण- ॠग्वेदोत्तर संहिता आणि ब्राह्मणें यांत हा शब्द जमिनींतील भेग ह्या अर्थी बराच वेळ उपयोगांत आणिला आहे. पिशेल म्हणतो कीं, हाच अर्थ ॠग्वेदांतील तीन स्थलीं लागू पडतो. एका ठिकाणी ती भेग पाण्याने होत असावी (अपाकृतम्) असें दिसतें. ॠग्वेदांतील दुस-या उता-यांत ह्या शब्दाचा अर्थ अक्ष फेंकण्याची जागा असा आहे. आणि म्हणूनच अक्षफलकाला हें नांव देत असत असें पिशेल म्हणतो. कारण त्याला भोकें असून त्यांत फांसे टाकण्याचा प्रयत्न करीत असत असें त्यांस वाटतें. पण अक्षफलक पूर्वी उपयोगांत नसे. ल्यूडर्स म्हणतो कीं पिशेलचा हा अर्थ चूक आहे. अक्ष इरिण ह्या नांवाच्या खड्डयांत फेंकीत असत आणि तो खड्डा जमिनींत असला तरीतो स्वाभाविक नसे तर मुद्दाम करीत असत. हा अर्थ सायण व टीकाकार दुर्गाचार्य यांस मान्य आहे.
३कार्ष्मन् - शब्दशः अर्थ खांच, तास, फणी, असा आहे. हा शब्द ॠग्वेदांत फक्त आला असून तेथें रथांच्या शर्यतीच्या अवसानभूमीचें नांव असा त्याचा अर्थ आहे. बहुतककरून शर्यत खेळणारे त्या अवसानस्थानाला वळसा देऊन पुन्हां पहिल्या जागेवर येत असत.
४देवन- ॠग्वेदांमध्यें जुगारसंबंधानें हा शब्द एकदांच आला आहे. ज्याठिकाणीं फांसे टाकीत ती जागा असा ह्याचा अर्थ असला पाहिजे (याला अधिदेवन असेहि म्हटलेलें आहे) व निरुक्तावरील टीकेंत दुर्गाचार्यानें ह्या देवनचा असाच अर्थ दिलेला आहे. सायणभाष्यांत देवनद्यूत असा अर्थ आहे. निरुक्ताच्या टीकेंत ‘देवन’ याचा अर्थ आस्तार आंथरी असा केला आहे. म्हणजे हें द्यूतस्थान असावें.
६परिषद- ॠग्वेदामध्यें पकडल्यास केलेली गर्ता असा ह्याचा अर्थ आहे.
७प्रहा- हा शब्द ॠग्वेदांत, अथर्ववेदांत आणि पंचविंशब्राह्मणांत आला असून याचा अर्थ ‘जयनिक्षेप’ असा फांशाच्या खेळांत घ्यावयाचा. याचा सामान्यतः ‘फायदा’ किंवा ‘लाभ’ असा अर्थ होतो. ॠग्वेदांत सायणभाष्यांत प्रहा म्हणजे प्रहंता असा अर्थ केला आहे.