प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
                   
काल
[कालविषयकं उल्लेख म्हणजे वेदकालीन ज्योतिर्विषयक ज्ञान आणि कांही अंशी निरनिराळया ॠतूंतील क्रियांचें ज्ञान. त्या दृष्टीनें प्रस्तुत शब्द महत्वाचा आहे.]

 ॠतु, महिने व युगें  / दिवसनामे / रात्रिनामें /
काल व कालसंबंधी [ॠग्वेद]

वेदकालांत कालगणना पद्धतशीर झाली होती किंवा नव्हती हा प्रश्न आहे. अधिकमासाचा उल्लेख कालगणनेचा विकास पुष्कळ दाखवितो. ॠग्वेदकालीन ॠतुविषयक कल्पना स्पष्ट नाहीत.

ॠतु.-ॠग्वेदकालानंतर ह्या शब्दाचा बराच वेळ उल्लेख आलेला आहे, परंतु त्यांची नांवें दिलेली नाहींत. ॠग्वेदांतील एका उता-यांत वसन्त, ग्रीष्म आणि शरद् अशीं नांवें आहेत. ॠग्वेद काळांत प्रावृष् (पावसाळा) आणि हिंवाळा (हिमा, हेमन्त) माहीत होते. वर्षाचे सर्वसाधारण विभाग (ॠग्वेदांत नसलेले) पांच असावेत: वसन्त, ग्रीष्म, वर्षा, शरद् व हेमन्त-शिशिर, कारणपरत्वें वर्षा-शरद् एक विभाग कल्पून हे पांच ॠतू दुस-या प्रकारानें विभागीत. कधी कधीं हेमन्त आणि शिशिर असे दोन ॠतू धरुन सहा ॠतु आहेत असें मानीत. तेणेंकरुन वर्षाचे दोन महिन्याचे सहा ॠतू होत असत. एका ठिकाणी सात ॠतू आहेत असें मानलें आहे. अशा ठिकाणीं कदाचित् अधिक महिना एक ॠतु मानीत असावेत असें वेबर आणि झिमर ह्यांचें मत आहे; अथवा रॉथच्या सूचनेप्रमाणें सात या आंकडयाची आवड जास्त, म्हणून सात ॠतु मानीत असावे. कधी कधी ॠतु हा शब्द महिन्याकरितांहि योजीत. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें शेवटचा ॠतु हेमन्त हा होय. जसजसे वैदिक आर्यन् पूर्वेकडे येत गेले तसतशी तीनपासून पांच ॠतूंची वाढ झाली असें झिमरचें म्हणणें आहे. ही वाढ ॠग्वेदांतील नाहीं; परंतु नंतर ज्या संहिता लिहिल्या गेल्या त्यांच्या वेळची आहे. वर्षाचे दोन विभाग उन्हाळा आणि हिंवाळा यांचा पत्ता ॠग्वेदांत सांपडत नाही. त्यांतील दोन शब्द, हिमा आणि समा हे वर्षाचे साधारण संकेत शब्द आहेत, आणि तेथील शरद् हा शब्द वरील दोन्हीपेक्षां वर्षाचें साधारण नांव आहे; कारण तो शेतक-याचा अतिशय महत्वाचा जो हंगामाचा काळ तो दर्शवितो. अथर्ववेदांतील एका उता-यांत वर्षाचे सहा महिन्यांचे असे जे दोन भाग केले आहेत ते फक्त औपचारिक असून कोणत्याहि त-हेनें जुन्या परंपरेचे द्योतक होऊं शकत नाहींत.

हेमंत.-'हिंवाळा' हा शब्द एकदांच ॠग्वेदामध्यें आलेला आहे. पण मागाहून झालेल्या ग्रंथांत तो वारंवार येतो. झिमरनें ॠग्वेदामध्येंच हवामान बदलत गेल्याचे कसकसे दाखले आहेत, हे दाखविण्याची खटपट केली आहे. तो म्हणतो कीं, कांही सूक्तांमध्यें हिवाळयाचा बिलकुल उल्लेख नाहीं, पण पावसाळयाचें बरेंच वर्णन आहे. ह्यावरुन ज्या सूक्तांत हिमाच्छादित पर्वताचें वर्णन आहे तीं व हीं सूक्तें निरनिराळया स्थली व कालीं लिहिली गेली असली पाहिजेत असें सिद्ध होतें. पण ह्याच मुद्दयावर ॠग्वेदांतील सूक्तें निरनिराळया ठिकाणी रचली गेली असें मानणें चुकीचें होईल. ॠग्वेदांतील बहुतेक सूक्तें 'मध्यदेशांत' रचली गेली ह्याबद्दल शंका नाहीं. तेव्हां शीत व हिम ह्यांविषयी जे उल्लेख आलेले आहेत ते स्थानिक भेद सुचवितात एवढेंच म्हणतां येईल. पण पुढें तीन ॠतूंचे चार ॠतू झाले ही गोष्ट निराळी; त्यावरुन आर्य लोकांच्या प्रगतीची मनास खात्री पडते.

शतपथ ब्राह्मणांत (१.५,४,५) हिंवाळयाचें असें वर्णन आलें आहे की, त्या वेळी झाडेझुडें वाळतात, पानें गळून पडतात, पक्षी फार उंच न उडतां वारंवार घरट्याकडें येतात.
३आर्तव.- आर्तव म्हणजे एकापेक्षां जास्त ॠतू असणारा वर्षाचा भाग. परंतु झिमरनें सुचविल्याप्रमाणें हा शब्द 'अर्धवर्ष' दर्शवीत नाही. कारण हा शब्द नेहमीं अनेकवचनीं असतो; द्विवचनीं नसतो. अथर्ववेदांत ह्याची जागा ॠतु आणि वर्ष (हायन) ह्यांच्यामध्यें आहे. परंतु तो समाहारांत देखील आढळतो. जसें: 'ॠतु, आर्तव, मास, वर्ष (अथर्व ३.१०,१०); 'पंधरवडा. मास, आर्तव, ॠतु' (अथर्व ११.७,२०); किंवा 'ॠतु, आर्तव, महिना, पंधरवडा, अहोरात्र, दिवस' (अथर्व १६.८,१८). वाजसनेयि संहितेत (२२.२८) मास, ॠतु आर्तव, वर्ष असा अनुक्रम आहे अथवा अथर्व वेदांत फक्त ॠतूबरोबरहि हा शब्द आढळतो.

अहन्.- 'दिवस.' दुस-या राष्ट्रांप्रमाणें भरतभूमींत देखील प्राधान्येंकरुन जरी नाही तरी दिवस आणि रात्र हे दोन शब्द वेळ दाखविण्याकरितां उपयोगांत आणीत असत (ॠ. ४.१६,२६; ८.१९,३). रात्रीला कृष्ण आणि दिवसाला अर्जुन असें त्यांतील फरक दर्शविण्याकरितां म्हणत. 'रात्र आणि दिवस' हे अहोरात्र या शब्दांत आढळतात. दिवसाचे निरनिराळया त-हेनें भाग करीत. अथर्ववेदांत उद्यन् सूर्य:, संगव, मध्यंदिन, उपराह्ण आणि अस्तंयन् असे विभाग आहेत. तैत्तिरीय ब्राह्मणांतहि (१.५,३,१) तो क्रम आहे. परंतु पहिल्या आणि शेवटल्या शब्दाबद्दल अनुक्रमें प्रातर् आणि सायाह्व हे शब्द आहेत. त्याच्याहीपेक्षां लहान जी यादी आहे तीत फक्त प्रातर्, संगव आणि सायम् असेच भाग आहेत. मैत्रायणी संहितेंतील (४.२,११) क्रम उषस्, संगव, मध्यंदिन आणि अपराह्व असा आहे. प्रभाताला झिमरच्या मताप्रमाणें अपिशर्वर हें नांव आहे. संगवच्या पूर्वी ज्या वेळी गायीनां दूध काढण्याच्या आधी चारा वगैरे घालतात आणि पक्षी वगैरे किलकिल करतात त्या वेळेला 'स्वसर' असें म्हणत. त्या वेळेला झिमरच्या मतें 'प्रपित्व' असेंहि म्हणत. परंतु गेल्डनेर म्हणतो की, त्या काळाला मध्याह्नानंतरचा काळ असें म्हणतां येईल; आणि त्याला अपिशर्वर हेंहि नांव आहे कारण त्याचा अर्थ 'येणा-या रात्रीच्या मर्यादेजवळ' म्हणजे 'सूर्य मावळावयास जातो तेव्हां' असा आहे. दुस-या बाजूनें विचार केला असतां अभिपित्व हें संध्याकाळचें नांव आहे; कारण, त्या वेळेला सर्व स्थिरता असते. सकाळ आणि संध्याकाळ यांनां सूर्योदय (उदिता सूर्यस्य) अथवा सूर्यास्त (निम्रुच्) हेहि शब्द होते. मध्यदिवसाला मध्यम् अह्नाम्, मध्यें, अथवा मध्यं-दिन म्हणत. संगव म्हणजे सकाळ (प्रातर्) आणि दुपार (मध्यंदिन) ह्यांच्या मधील काळ. वेळेचे दिवसा पेक्षां लहान भाग दिलेले फारसे आढळत नाहींत. तथापि शतपथ ब्राह्मणांत (१२.३,२,५) रात्र आणि दिवस मिळून ३० मुहूर्त होतात असा उल्लेख असून १ मुहूर्त=१५ क्षिप्र; १क्षिप्र =१५ एतर्ही; १ एतर्हि =१५ इदानी; १ इदानि =१५ प्राण; १ प्राण =१ निमेष असें कोष्टक दिलें आहे. शांखायन आरण्यकांतील क्रम 'ध्वंसयो, निमेषा:, काष्ठा: कला:, क्षणा, मुहूर्ता, अहोरात्रा:' असा आहे. झिमरच्या मतें ॠग्वेदांतील एका वचनांत (१.१२३,८) दिवसांचे व त्याचप्रमाणे रात्रीचे ३० भाग केले आहेत, आणि त्यांची तो बाबिलोनमधील दिवसरात्रीच्या ६० भागांशी तुलना करतो. परंतु ३० योजनें हा शब्द फार संदिग्ध आहे. बर्गेन म्हणतो कीं, तो एक कोणतीहि विचारमाला तयार करण्याचा पाया आहे. या अनुक्रमांत अहोरात्राणि, नंतर अर्धमास, मास, ॠतु आणि संवत्सर हे कालाचे मोठे भाग आहेत.