प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
काल
[कालविषयकं उल्लेख म्हणजे वेदकालीन ज्योतिर्विषयक ज्ञान आणि कांही अंशी निरनिराळया ॠतूंतील क्रियांचें ज्ञान. त्या दृष्टीनें प्रस्तुत शब्द महत्वाचा आहे.]
वेदकालांत कालगणना पद्धतशीर झाली होती किंवा नव्हती हा प्रश्न आहे. अधिकमासाचा उल्लेख कालगणनेचा विकास पुष्कळ दाखवितो. ॠग्वेदकालीन ॠतुविषयक कल्पना स्पष्ट नाहीत.
१ॠतु.-ॠग्वेदकालानंतर ह्या शब्दाचा बराच वेळ उल्लेख आलेला आहे, परंतु त्यांची नांवें दिलेली नाहींत. ॠग्वेदांतील एका उता-यांत वसन्त, ग्रीष्म आणि शरद् अशीं नांवें आहेत. ॠग्वेद काळांत प्रावृष् (पावसाळा) आणि हिंवाळा (हिमा, हेमन्त) माहीत होते. वर्षाचे सर्वसाधारण विभाग (ॠग्वेदांत नसलेले) पांच असावेत: वसन्त, ग्रीष्म, वर्षा, शरद् व हेमन्त-शिशिर, कारणपरत्वें वर्षा-शरद् एक विभाग कल्पून हे पांच ॠतू दुस-या प्रकारानें विभागीत. कधी कधीं हेमन्त आणि शिशिर असे दोन ॠतू धरुन सहा ॠतु आहेत असें मानीत. तेणेंकरुन वर्षाचे दोन महिन्याचे सहा ॠतू होत असत. एका ठिकाणी सात ॠतू आहेत असें मानलें आहे. अशा ठिकाणीं कदाचित् अधिक महिना एक ॠतु मानीत असावेत असें वेबर आणि झिमर ह्यांचें मत आहे; अथवा रॉथच्या सूचनेप्रमाणें सात या आंकडयाची आवड जास्त, म्हणून सात ॠतु मानीत असावे. कधी कधी ॠतु हा शब्द महिन्याकरितांहि योजीत. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें शेवटचा ॠतु हेमन्त हा होय. जसजसे वैदिक आर्यन् पूर्वेकडे येत गेले तसतशी तीनपासून पांच ॠतूंची वाढ झाली असें झिमरचें म्हणणें आहे. ही वाढ ॠग्वेदांतील नाहीं; परंतु नंतर ज्या संहिता लिहिल्या गेल्या त्यांच्या वेळची आहे. वर्षाचे दोन विभाग उन्हाळा आणि हिंवाळा यांचा पत्ता ॠग्वेदांत सांपडत नाही. त्यांतील दोन शब्द, हिमा आणि समा हे वर्षाचे साधारण संकेत शब्द आहेत, आणि तेथील शरद् हा शब्द वरील दोन्हीपेक्षां वर्षाचें साधारण नांव आहे; कारण तो शेतक-याचा अतिशय महत्वाचा जो हंगामाचा काळ तो दर्शवितो. अथर्ववेदांतील एका उता-यांत वर्षाचे सहा महिन्यांचे असे जे दोन भाग केले आहेत ते फक्त औपचारिक असून कोणत्याहि त-हेनें जुन्या परंपरेचे द्योतक होऊं शकत नाहींत.
२हेमंत.-'हिंवाळा' हा शब्द एकदांच ॠग्वेदामध्यें आलेला आहे. पण मागाहून झालेल्या ग्रंथांत तो वारंवार येतो. झिमरनें ॠग्वेदामध्येंच हवामान बदलत गेल्याचे कसकसे दाखले आहेत, हे दाखविण्याची खटपट केली आहे. तो म्हणतो कीं, कांही सूक्तांमध्यें हिवाळयाचा बिलकुल उल्लेख नाहीं, पण पावसाळयाचें बरेंच वर्णन आहे. ह्यावरुन ज्या सूक्तांत हिमाच्छादित पर्वताचें वर्णन आहे तीं व हीं सूक्तें निरनिराळया स्थली व कालीं लिहिली गेली असली पाहिजेत असें सिद्ध होतें. पण ह्याच मुद्दयावर ॠग्वेदांतील सूक्तें निरनिराळया ठिकाणी रचली गेली असें मानणें चुकीचें होईल. ॠग्वेदांतील बहुतेक सूक्तें 'मध्यदेशांत' रचली गेली ह्याबद्दल शंका नाहीं. तेव्हां शीत व हिम ह्यांविषयी जे उल्लेख आलेले आहेत ते स्थानिक भेद सुचवितात एवढेंच म्हणतां येईल. पण पुढें तीन ॠतूंचे चार ॠतू झाले ही गोष्ट निराळी; त्यावरुन आर्य लोकांच्या प्रगतीची मनास खात्री पडते.
शतपथ ब्राह्मणांत (१.५,४,५) हिंवाळयाचें असें वर्णन आलें आहे की, त्या वेळी झाडेझुडें वाळतात, पानें गळून पडतात, पक्षी फार उंच न उडतां वारंवार घरट्याकडें येतात.
३आर्तव.- आर्तव म्हणजे एकापेक्षां जास्त ॠतू असणारा वर्षाचा भाग. परंतु झिमरनें सुचविल्याप्रमाणें हा शब्द 'अर्धवर्ष' दर्शवीत नाही. कारण हा शब्द नेहमीं अनेकवचनीं असतो; द्विवचनीं नसतो. अथर्ववेदांत ह्याची जागा ॠतु आणि वर्ष (हायन) ह्यांच्यामध्यें आहे. परंतु तो समाहारांत देखील आढळतो. जसें: 'ॠतु, आर्तव, मास, वर्ष (अथर्व ३.१०,१०); 'पंधरवडा. मास, आर्तव, ॠतु' (अथर्व ११.७,२०); किंवा 'ॠतु, आर्तव, महिना, पंधरवडा, अहोरात्र, दिवस' (अथर्व १६.८,१८). वाजसनेयि संहितेत (२२.२८) मास, ॠतु आर्तव, वर्ष असा अनुक्रम आहे अथवा अथर्व वेदांत फक्त ॠतूबरोबरहि हा शब्द आढळतो.
४अहन्.- 'दिवस.' दुस-या राष्ट्रांप्रमाणें भरतभूमींत देखील प्राधान्येंकरुन जरी नाही तरी दिवस आणि रात्र हे दोन शब्द वेळ दाखविण्याकरितां उपयोगांत आणीत असत (ॠ. ४.१६,२६; ८.१९,३). रात्रीला कृष्ण आणि दिवसाला अर्जुन असें त्यांतील फरक दर्शविण्याकरितां म्हणत. 'रात्र आणि दिवस' हे अहोरात्र या शब्दांत आढळतात. दिवसाचे निरनिराळया त-हेनें भाग करीत. अथर्ववेदांत उद्यन् सूर्य:, संगव, मध्यंदिन, उपराह्ण आणि अस्तंयन् असे विभाग आहेत. तैत्तिरीय ब्राह्मणांतहि (१.५,३,१) तो क्रम आहे. परंतु पहिल्या आणि शेवटल्या शब्दाबद्दल अनुक्रमें प्रातर् आणि सायाह्व हे शब्द आहेत. त्याच्याहीपेक्षां लहान जी यादी आहे तीत फक्त प्रातर्, संगव आणि सायम् असेच भाग आहेत. मैत्रायणी संहितेंतील (४.२,११) क्रम उषस्, संगव, मध्यंदिन आणि अपराह्व असा आहे. प्रभाताला झिमरच्या मताप्रमाणें अपिशर्वर हें नांव आहे. संगवच्या पूर्वी ज्या वेळी गायीनां दूध काढण्याच्या आधी चारा वगैरे घालतात आणि पक्षी वगैरे किलकिल करतात त्या वेळेला 'स्वसर' असें म्हणत. त्या वेळेला झिमरच्या मतें 'प्रपित्व' असेंहि म्हणत. परंतु गेल्डनेर म्हणतो की, त्या काळाला मध्याह्नानंतरचा काळ असें म्हणतां येईल; आणि त्याला अपिशर्वर हेंहि नांव आहे कारण त्याचा अर्थ 'येणा-या रात्रीच्या मर्यादेजवळ' म्हणजे 'सूर्य मावळावयास जातो तेव्हां' असा आहे. दुस-या बाजूनें विचार केला असतां अभिपित्व हें संध्याकाळचें नांव आहे; कारण, त्या वेळेला सर्व स्थिरता असते. सकाळ आणि संध्याकाळ यांनां सूर्योदय (उदिता सूर्यस्य) अथवा सूर्यास्त (निम्रुच्) हेहि शब्द होते. मध्यदिवसाला मध्यम् अह्नाम्, मध्यें, अथवा मध्यं-दिन म्हणत. संगव म्हणजे सकाळ (प्रातर्) आणि दुपार (मध्यंदिन) ह्यांच्या मधील काळ. वेळेचे दिवसा पेक्षां लहान भाग दिलेले फारसे आढळत नाहींत. तथापि शतपथ ब्राह्मणांत (१२.३,२,५) रात्र आणि दिवस मिळून ३० मुहूर्त होतात असा उल्लेख असून १ मुहूर्त=१५ क्षिप्र; १क्षिप्र =१५ एतर्ही; १ एतर्हि =१५ इदानी; १ इदानि =१५ प्राण; १ प्राण =१ निमेष असें कोष्टक दिलें आहे. शांखायन आरण्यकांतील क्रम 'ध्वंसयो, निमेषा:, काष्ठा: कला:, क्षणा, मुहूर्ता, अहोरात्रा:' असा आहे. झिमरच्या मतें ॠग्वेदांतील एका वचनांत (१.१२३,८) दिवसांचे व त्याचप्रमाणे रात्रीचे ३० भाग केले आहेत, आणि त्यांची तो बाबिलोनमधील दिवसरात्रीच्या ६० भागांशी तुलना करतो. परंतु ३० योजनें हा शब्द फार संदिग्ध आहे. बर्गेन म्हणतो कीं, तो एक कोणतीहि विचारमाला तयार करण्याचा पाया आहे. या अनुक्रमांत अहोरात्राणि, नंतर अर्धमास, मास, ॠतु आणि संवत्सर हे कालाचे मोठे भाग आहेत.
५दोषा.-'संध्याकाळ' हा शब्द ॠग्वेद काळापासून पुढें झालेल्या ग्रंथांत 'उषा' या शब्दाच्या उलट अर्थी आलेला आहे. छांदोग्योपनिषदामध्यें ह्या शब्दाची प्रातर् ह्या शब्दाशी तुलना केलेली आहे.
६नक्ता.-'रात्र.' हा शब्द ॠग्वेदांत वारंवार व मागाहून झालेल्या ग्रंथांत कधीं कधीं सामान्यत: नक्तम् ह्या क्रियाविशेषणाच्या रुपांत आलेला आहे.
७परितक्म्या.-ॠग्वेदामध्यें अनेक ठिकाणी रात्र असा ह्याचा अर्थ आहे. सीजच्या मतानें याचा एका ठिकाणीं (१.११६,१५) तरी शर्यतीचा निकाल लागण्याचें ठिकाण म्हणजे प्रपित्वाच्या अर्थासारखा अर्थ आहे. पण ह्याबद्दल फार शंका आहे.
८काल.- हा वेळवाचक सर्व साधारण शब्द ॠग्वेदांतील दहाव्या मंडळांत एकदां आला आहे. अथर्ववेदांत हा शब्द 'नशीब, दैव' ह्या अर्थी आला आहे. ब्राह्मणांत ॠतु ह्या शब्दाच्या ठिकाणी काल हा शब्द पुष्कळ वेळां उपयोगांत आणिलेला आढळतो. वेळेचा व्यापक भाग म्हणजे 'भूत' वर्तमान (भवत्) आणि भविष्यत् हे होत व दुसरे इतर भाग म्हणजे अहन्, मास, संवत्सर हे आहेत.
९त्रियुग.- हा शब्द नपुंसकलिंगी असून ॠग्वेदामध्यें आलेला आहे, व तेथें असें म्हटलें आहे कीं, औषधी ह्या देवांच्या अगोदर तीन युगें निर्माण झाल्या (देवेभ्य: त्रियुगं पुरा). निरुक्तावरील भाष्यकाराचें असें मत आहे की, युग शब्दाचा अर्थ पुढें झालेल्या हिंदु कालगणनशास्त्राप्रमाणें ज्याला युग म्हणत असत तें युग असा होय; व एकंदर वाक्याचा असा अर्थ कीं, ओषधी पहिल्या युगांत निर्माण झाल्या. शतपथ ब्राह्मणांत (७.२,४,२६) त्रियुग ह्याचा अर्थ तीन ॠतू असा घेतला आहे. हे तीन ॠतू म्हणजे वसंत, शरद् व वर्षा हे होत. या ग्रंथांत पुरा व त्रियुगं हे शब्द निराळे घेऊन, 'पूर्वी तीन ॠतूंमध्यें' असा 'त्रियुगं पुरा' चा अर्थ केला आहे. तीन युगें हा सामान्य अर्थच येथें पुरेसा आहे. अशा ठिकाणी 'तीन' हा शब्द लोकांत प्रचलित असलेल्या दंतकथेमध्यें नेहमीं सांपडतो. लाटयायन श्रौतसूत्रांत याचा अर्थ त्रिवर्ष असा एका ठिकाणी केला आहे.
१०पितृयाण.- हा शब्द ॠग्वेद व मागाहूनचे ग्रंथ ह्यांमध्यें आलेला आहे. लो. टिळकांचें असें मत आहे कीं, देवयान ह्याचा मेळ सूर्याच्या उत्तरायणाशीं जमतो, व पितृयाण ह्याचा संबंध सूर्याच्या दक्षिणायनाशीं आहे. शतपथ ब्राह्मणांत वसंत, ग्रीष्म व वर्षा ॠतु ह्यांचा संबंध देवांशी लावलेला आहे; व बाकीच्या ॠतूंचा संबंध पितरांशी लावलेला आहे. त्यावरुन ते असें अनुमान करतात कीं, देवयानास सुरुवात मेषविषुवांत होत असे व पितृयाणास तुलाविषुवांत होत असे. ह्या गोष्टीचा ते तैत्तिरीय ब्राह्मणांतल्या देव यम या नक्षत्रांमधल्या भेदाशीं संबंध लावतात.
११प्रपित्व.- कालाचें नांव या अर्थानें ॠग्वेदांत हा शब्द बरेच वेळां आलेला आहे. एका वचनांत (८.१,२९) पूर्वापर संदर्भावरुन याचा अर्थ अगदीं स्पष्ट झाला आहे. सूर्योदयीं (सूर उदिते), मध्याह्नी (मध्यंदिने दिव:) आणि संध्यासमयीं प्रपित्व कालीं (अपिशर्वरे) दुस-या एका वचनांत (७.४१,४) 'दिवसाच्या शेवटी, बराच दिवस गेल्यानंतर' असा अर्थ बरा दिसतो. शिवाय 'अभिपित्वे अह्न:' 'दिवसाच्या शेवटीं,' यावरुन सुद्धां संध्याकाळ हाच अर्थ निघतो. गेल्डनेरप्रमाणें याचा अर्थ 'आणीबाणीचा प्रसंग,' 'निर्णयकारक प्रसंग' असा आहे. अर्थात् हा प्रसंग लढाईंतील किंवा शर्यतीतील असून त्यावरुन साहजिकच 'दिवसाचा शेवट' हा त्याचा अर्थ ठरतो.
१२मास.- याचा अर्थ 'महिना' असा आहे. ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द अनेक वेळां येतो. महिन्यांतले विशेष दिवस (किंवा जास्त सयुक्तिक म्हणावयाचे म्हणजे 'रात्री') म्हणजे 'अमावास्या' (घरीं राहण्याची रात्र) व पूर्णचंद्राची 'पौर्णमासी' हे होत. अथर्ववेदाच्या दोन सूक्तांत या दोन दिवसांचे वर्णन अनुक्रमें आलें आहे. चंद्राच्या निरनिराळया अवस्थेंतील दिवसांनां देवता मानल्याचें सिनीवालि - अमावास्येच्या आधींचा दिवस, कुहु अथवा गुंगु- अमावास्येचा दिवस, अनुमति-पौर्णिमेच्या आधींचा दिवस व राका-पौर्णिमेचा दिवस या चार नांवांत दिसून येतें. राका याचा अर्थ मॅकडोनेल यानें अमावास्या असा दिला आहे तो चूक आहे. पौर्णिमा आणि अमावास्या या दिवसांचें महत्व दर्श-पूर्णमासौ या अनुक्रमें त्या त्या दिवशीं केल्या जाणा-या यागांमध्यें दिसून येतें. प्रत्येक महिन्यांत एकाष्टका म्हणजे वद्य अष्टमी महत्वाची मानीत असत. पंचविंश ब्राह्मणामध्यें (१०.३,११) वर्षांत पौर्णिमा आणि अमावास्या यांच्यामध्यें अशा बारा एकाष्टका असतात असें म्हटलें आहे. यजुर्वेदांत आणि इतरत्र एकाष्टकेचें विशेष महत्व गणिलें आहे. कित्येकांच्या मतें ही महत्वाची अष्टमी माघ वद्य अष्टंमी होय. हा दिवस म्हणजे वर्षाचा शेवट अगर नूतन वर्षारंभ होय. कौषीतकि ब्राह्मणांत (१९.२३) जरी माघांतल्या अमावास्येला दक्षिणायनान्त होतो असें म्हटलें आहे, तरी कदाचित् हा दक्षिणायनान्त माघी पौर्णिमेच्या आधींच्या अमावास्येस होत असेल; माघ पौर्णिमेच्या नंतरच्या अमावास्येस होणार नाहीं. वर्षारंभानंतरची पहिली अष्टका म्हणून या एकाष्टकेला महत्व प्राप्त झालें असें मानण्यास हरकत नाहीं. पौषांतल्या पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून माघ सुरु होतो असें जें भाष्यकाराचें मत आहे तें वेबर यास मान्य आहे. परंतु कोणताहि महिना अमावास्येनंतर सुरु होऊन पुढील अमावास्येच्या आधल्या दिवशीं संपतो असा अर्थ करणें अधिक सोपें आहे. बौधायन श्रौतसूत्रांमधील कित्येक उतारे (२.१२; ३.१; २६.१८; ३०.३), आणि कौषीतकि ब्राह्मण (१.३), शतपथ ब्राह्मण (९.१,१,७) हीं सर्व स्थलें पौर्णिमा ही महिन्याच्या मध्यें असून अमावस्या ही महिन्याच्या आरंभी अगर शेवटी आहे असें दाखवितात. हॉपकिन्सच्या मतें कौषीतकि ब्राह्मण (५.१) व शतपथ ब्राह्मण (६.२,२,१८) महिन्याला पौर्णिमेपासून सुरुवात होते असें दाखवितात. हें मत ग्राह्य धरलें तर माघांतल्या दक्षिणायनान्ताच्या एक आठवडा आधीं म्हणजे माघ वद्य अष्टमीस अष्टका येईल. अमावास्येच्या पुढील दिवसापासून अमावास्येपर्यंत-ज्याला अमांत असें म्हणतात-, अगर पौर्णिमेच्या पुढील दिवसापासून पौर्णिमेपर्यंत-ज्याला पौर्णिमांत म्हणतात-महिना गणला जात असे याविषयी खात्रीलायक आधार नाहीं. दुसरी पद्धत उत्तर हिंदुस्थानांत उचलली गेली, व पहिली दक्षिणेंत रुढ झाली. याकोबी म्हणतो कीं, फाल्गुनपौर्णिमेपासून वर्षारंभ होत असे; आणि ज्या नक्षत्राशीं पौर्णिमेच्या चंद्राचा संयोग झाला असेल त्या नांवानें महिना ओळखला जात असे. ओल्डेनबर्गच्या मतें अमावास्या हा पौर्णिमेपेक्षां बराच जास्त निश्चित विभागदर्शक काल आहे. ग्रीक, रोमन आणि यहुदी वर्षे अमावास्येलाच सुरु होतात; आणि ह्यास वैदिक पुरावा म्हणजे महिन्याची शुक्ल आणि कृष्ण ही विभागणी पूर्व आणि अपर पक्ष या नांवांनीं संबोधिली जात असे हा होय. वेदांत पौर्णिमान्त पद्धति होती असें मानणें जरी शक्य असलें तरी तें अनवश्यक आहे असें थीबोचें मत आहे.
वेबर म्हणतो कीं, भाष्यकारांच्या म्हणण्याप्रमाणें पौर्णिमांत महिन्याचा उल्लेख कौषीतकि ब्राह्मणांत येतो. परंतु त्या उता-यावर भर देणें, किंवा अमांत पद्धत वेदांस अक्षरश: मान्य होती असें मानणें चूक होईल. परंतु हें संभवनीय आहे की, महिनारंभ अमावास्येपासून मानला जात असे व पौर्णिमा महिन्यामध्यें येत असे. प्रत्येक महिन्याचे तीस दिवस धरीत ही गोष्ट कित्येक उता-यांवरुन सिद्ध झाली आहे. ह्या महिन्याचा उल्लेख प्राचीनतम ग्रंथांतून प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीत्या दिसून येतो. हा ब्राह्मणांतला सर्वमान्य महिना आहे आणि हा वैदिक काळीं मान्य झालेला महिना होता असें कबूल केलें पाहिजे. ब्राह्मण वाड्·मयांत दुस-या कोणत्याहि महिन्याचा उल्लेख केलेला नाहीं. सूत्रांमध्यें फक्त निरनिराळया महिन्यांचा उल्लेख- केलला आहे. सामवेदावरील लाटयायन श्रौत सूत्रांमध्यें (४.८) पुढील गोष्टींचा उल्लेख केलेला आढळतो: (१) प्रत्येकी २७ दिवस असे बारा महिने म्ह० ३२४ दिवस मिळून एक वर्ष. (२) ३५१ दिवसांचें वर्ष-म्हणजे २७ दिवसांचें बारा महिने आणि २७ दिवसांचा एक (अधिक) महिना. (३) ३५४ दिवसांचे वर्ष-म्हणजे ३० दिवसांचे सहा महिने आणि २९ दिवसांचे सहा महिनें, किंवा दुस-या शब्दांत म्हणावयाचें म्हणजे चांद्र वर्ष. (४) ३६० दिवसांचें वर्ष म्हणजे सावन वर्ष. (५) ३७८ दिवसांचें वर्ष. थीबोनें स्पष्ट दाखविलें आहे कीं, हें (३७८ दिवसांचें) वर्ष तिस-या वर्षी येत असे. सौर आणि सावन वर्षांमध्यें जुळतें घेण्यासाठीं १८ दिवसांची तिस-या वर्षी भर टाकण्यांत येत असे. सामसूत्रांमध्यें ३६६ दिवसांच्या वर्षाचा उल्लेख नाही. ह्याची माहिती पहिल्यानें ज्योतिषांत आणि गर्गसंहितेंत आली आहे. वैदिक कालांत ३५४ दिवसांचे वर्षे होतें किंवा नाहीं याची खात्रीलायक माहिती नाहीं. झिमरच्या मतें गर्भावस्थेचा काल केव्हां केव्हां दहा महिने (ॠ.५.७८, ७-९; अथर्व १.११,६; काठक सं. २८.६; शत. ब्रा. ४.५,२,४ इ.) व केव्हां केव्हां एक वर्षाचाहि (पंच. ब्रा. १०.१,९; कां.सं. ३३.८; शतपथ. ६.१,३,८; ऐ. ब्रा. ४.२२) उल्लेखिलेला असतो, ह्यावरुन ह्याची सिद्धता होते. परंतु हा महिना म्हणजे २७ दिवसांचा नियतकालिक महिना होय. कारण वर्ष (३० दिवसांचा महिना व १२ महिन्यांचें वर्ष असें) घेतलें तर हा काल फार मोठा होतो. हें वेबरचें म्हणणें कदाचित् बरोबरहि असूं शकेल. दुसरे पक्षीं दहाव्या महिन्यांत जन्म होतो असें गृहीत धरलें तर दहा महिन्यांचा काल गर्भधारणेच्या कालाशीं जुळतो. म्हणून तीस दिवसांचा महिना हा अर्थ येथें होऊं शकेल.
प्रत्येक महिना तीस दिवसांचा; व अशा बारा महिन्यांचें मिळून एक वर्ष हें मत शास्त्रीय रीत्या बरोबर नसल्यामुळें झिमरचें असें ठाम मत आहे कीं, एक अधिक महिना धरावा लागतो हें जाणूनच ही वर्षयोजना उपयोगांत आणली जात होती, आणि हें वर्ष पांच वर्षांच्या युगाचा अगर चक्राचा एक भाग बनलें.
ही पद्धति ज्योतिषावरुन चांगली कळते. प्रत्येकी २९ १६/३१ दिवसांच्या ६२ महिन्यांचें मिळून एक युग बनतें; म्हणजे, १८३० दिवस मिळून एक युग होतें. यांत एक मध्यें आणि एक शेवटीं असे दोन महिने मिळवावयाचे असतात. अथवा ३० दिवसांच्या ६१ महिन्यांचें, अथवा ३० १/२ दिवसांच्या ६० महिन्यांचें हें युग बनतें. ३६६ दिवसांचे सौर वर्ष हें स्पष्टपणें यांतील वर्षमान होय. हें वर्ष वास्तविक वर्षापेक्षां थोडें मोठे असल्या कारणानें ही पद्धति निर्दोष म्हणतां येणार नाही. ब्राह्मणकालामध्यें ही पद्धति रुढ होती असेंहि म्हणतां येत नाहीं. कारण, त्या वेळेस ख-या वर्षाच्या कालाविषयी नक्की निर्णय झालेला दिसत नाहीं. ॠग्वेदामधून झिमरनें दाखविलेल्या उल्लेखांत (१.१६४,१४; ३.५५,१८) फारसें तथ्य नाहीं असें मॅकडोनेल म्हणतो व पंचविंश ब्राह्मणामधून (१७.१३,१७) त्यानें पंचक युगांविषयीं दाखविलेला उल्लेख फक्त टीकेंत असून मूळांत आढळत नाहीं. फार तर असें म्हणतां येईल कीं, अधिक महिने घालण्याकरितां सोयीचा काल म्हणजे पांच वर्षे होय असें मानण्याची प्रवृत्ति होती, व तिचीच प्रगति ज्योतिषांत झाली. परंतु ३६६ दिवसांचें वर्ष त्या वेळेस माहीत होतें असें मात्र आपणांस म्हणतां येणार नाहीं असें मॅकडोनेल म्हणतो. दुसरे पक्षीं ३६० दिवसांचें चांद्र वर्ष ख-या वर्षाशी मिळतें घेण्याचा प्रयत्न त्या वेळेस झाला होता यांत कांही शंका नाहीं. ह्या वर्षालाच लाटयायन श्रौतसूत्रानें (४.८) सौर वर्ष लेखिलें आहे. व सुर्य प्रत्येक नक्षत्रांतून १३ १/३ दिवसांत परिक्रमण करतो असें म्हटलं आहे. चांद्र वर्ष आणि वास्तविक सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी दर तिस-या वर्षी १८ दिवस जास्त घालण्याचा क्रम स्वीकारलेला आहे. महिन्याचा काल निश्चित करण्याविषयींच्या अडचणीचें प्रतिपादन ॠग्वेदांत व नंतरच्या सर्व वाड्·मयांत आढळतें. महिन्याचा काल कोळें. ३० दिवस (अथर्व १३.३,८) कोठें ३५ दिवस (शतपथ १०.५,४,५) व कोठें ३६ दिवस (शतपथ ९.१,१,४३) दिला आहे. शेवटची संख्या सहा वर्षांनीं धरावयाच्या अधिक महिन्याचा काल दाखवीत असेल, परंतु तसें म्हणण्यास आपणांजवळ विशेष पुरावा नाहीं. १२ अगर १३ महिन्यांचें वर्ष होतें ह्याबद्दल यजुर्वेदावरील सर्व संहिता व ब्राह्मणग्रंथ यांत उल्लेख सांपडतो. महिन्यांची नांवे फारशीं प्राचीन नाहींत ही गोष्ट मात्र जास्त आश्चर्यकारक दिसते. अग्निचयनाचें वर्णन देतांना यजुर्वेदांत या महिन्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ही नांवें खालीलप्रमाणें आहेत: (१) मधु, (२) माधव (मधुमास, वासन्तिकावृतू), (३) शुक्र, (४) शुचि (ग्रीष्मकाळ, ग्रीष्मावृतू), (५) नभ (नभ:), (६) नभस्य (पावसाळयांतील महिने, वार्षिकावृतू), (७) इष, (८) ऊर्ज (शारदावृतू), (९) सह (सहस्) (१०) सहस्य (हिंवाळयांतील महिने, हैमन्तिकावृतू), (११) तप (तपस्) व (१२) तपस्य (थंड महिने, शैशिरावृतू). सोमयाग व अश्वमेध यांमध्येंहि मुख्यत: अशाच महिन्यांच्या याद्या दिलेल्या आहेत. इतरत्रहि कांही निराळयाच नांवांच्या याद्या सांपडतात (तै.सं. १.७,९,१). प्रचलित असलेल्या नांवांशी ही नांवे मुळीच जुळत नाहींत. पुरोहितांनीं महिन्यांनां नांवें देण्याचा कांही तरी केलेला प्रयत्न, यापेक्षां जास्त महत्व या याद्यांस देतां येईल कीं नाही ह्याबद्दल शंकाच आहे. वेबरनें असें दाखविलें आहे की, मधु आणि माधव ही वसंत कालाची नांवे म्हणून आढळतात आणि यांचा तैत्तिरीय आरण्यकांत उल्लेख केलेला आढळतो. परंतु दुसरीं नांवें प्रचारांत असल्याबद्दल विशेष पुरावा सांपडत नाही.
कांही याद्यांत अधिक महिन्याचाहि उल्लेख केलेला आढळतो. वाजसनेयि संहितेंत अंहसस्पति असें त्यास म्हटलें आहे, आणि तैत्तिरीय व मैत्रायणी संहितेंत 'संसर्प' असें नांव त्यास दिलें आहे. काठक संहितेंत 'मलिम्लुच' हें नांव आढळतें, आणि एका यादींत संसर्प व मलिम्लुच या दोनहि नांवांचा उल्लेख केलेला आढळतो. अथर्ववेदानें त्या महिन्याच्या स्थानाच्या अनिश्चिततेमुळें त्याला 'सनिश्रस्' हें नांव दिलें आहे. महिन्यांनां नांवें देण्याची दुसरी पद्धति नक्षत्रांवरुन आहे. ती प्रचलित होण्यास सुरुवात झाली होती, परंतु पुराणांत आणि नंतर ती सररास रुढ झालेली दिसते, माघ आणि तप एकच असें ज्यातिष म्हणतें. कारण असा अर्थ केला म्हणजेच मधु आणि चैत्र एकच असें निघतें; आणि चित्रा नक्षत्रांत पूर्ण चंद्र असतांत वर्षारंभ होतो, फाल्गुनांत होत नाही ह्या ब्राह्मणांत प्रदर्शित केलेल्या मताशीं हें तंतोतंत जुळतें. फाल्गुनानंतर येणारा चैत्र महिना हा वसंत कालाचा आरंभ होय हें वेबरचें मत अर्थातच चूक होय, कारण संपाताच्या चलनामुळें फाल्गुन वसंत ॠतूचा वास्तविक पहिला महिना झाला, आणि चैत्र मागील ॠतूचा शेवटचा महिना झाला. वर्षाचे सहा ॠतू मानणें ही अशास्त्रीय पद्धत आहे. चैत्र किंवा फाल्गुन यांपैकी कोणताहि वसंत कालाचा आरंभ मानण्यास विशेष हरकत असण्याचें कांहीहि कारण दिसत नाहीं. शतपथ ब्राह्मणांत महिन्याचा आरंभ शुकरू पक्षापासून धरलेला असून शुक्ल आणि कृष्ण पक्षांकरितां यव आणि अयव हीं नांवें आढळतात. एग्लिंगच्या मताप्रमाणें ह्या शब्दांची उत्पत्ति यु म्हणजे दूर करणें (वाईट ग्रहांनां दूर करणें) या धातूपासून असावी. पर्व हा शब्द महिन्याचा अर्ध या अर्थी योजिलेला दिसतो; व त्याचा उल्लेख ॠग्वेदांत केलेला आढळतो. पहिला पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष. ह्यास पूर्व पक्ष म्हणतात आणि दुस-यास अपर पक्ष म्हणतात. ह्या दोघांसहि अर्धमास म्हणतात.
१३मुहूर्त.- मुहूर्त म्हणजे दिवसाचा १/३० भाग (४८ मिनिटांचा तास) असा तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.१०,१,१) उल्लेख आहे. ॠग्वेदांत क्षण या अर्थी हा शब्द आहे.
१४ युग.- ॠग्वेदांत पिढी या अर्थी हा शब्द आलेला आहे. एका ठिकाणीं दीर्घतम्याबद्दल योजिलेल्या दशम युगाचा अर्थ आयुष्याचें दहावें दशक असा मॅकडोनेल करतो. लोकमान्य टिळक दहावा महिना असा अर्थ करतात, व दीर्घतमा याचा अर्थ दहा महिन्यांच्या रात्रीनंतर उगवणारा सूर्य असा देतात. पंचवार्षिक युगाचा उल्लेख प्राचीन संहितेंत आढळत नाहीं. सेंट पीटर्सबर्ग कोशांत आलेलें आणि झिमरनें दिलेलें पंचविंश ब्राह्मणांतलें अवतरण त्या ग्रंथावरील टीकेंत एखाद्या अर्वाचीन ग्रंथांतून घेतलेला उतारा आहे. अथर्ववेदांत क्रमानें शत वर्षे, अयुत (१००००? वर्षे), आणि नंतर दोन, तीन व चार युगें असा उल्लेख केलेला आहे. यावरुन युग अयुतापेक्षां जास्त असावें असें दिसतें, परंतु याबद्दल खात्री नाहीं. झिमरनें ॠग्वेदांतून एक उतारा (८.१०१,४) दिलेला आहे, परंतु तेथें चतुर्युगांबद्दलचा उल्लेख खास नाहीं. तैत्तिरीय ब्राह्मणामध्यें कालाचे विभाग फार मोठे (उ० एक लाख वर्षांचा एक) कल्पिलेले आढळतात. कलि, द्वापर, त्रेता आणि कृत या चार युगांचा खात्रीलायक निर्देश वेदकालीन वाड्·मयांत नाही. तथापि हे शब्द अक्षांच्या दानांनां लावलेले आढळतात. ऐतरेय ब्राह्मणांत ही नांवें येतात, परंतु त्यांचा युग या अर्थी उपयोग केलेला दिसत नाहीं. हौच्या मतें याचा फाशांचें दान असाच अर्थ असावा; व हा अर्थ वेबर, रॉथ, विल्सन, मॅक्समुल्लर आणि सूर यांनीं शक्य मानिला आहे. रॉथचें असें म्हणणें आहे कीं, हा मंत्र प्रक्षिप्त आहे. परंतु हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, हा उतारा ऐतरेय ब्राह्मणांतल्या जवळ जवळ शेवटल्या भागांतील आहें. पुष्य, द्वापर, खार्वा आणि कृत हीं चार युगें नंतरच्या षडिंश ब्राह्मणांत, आणि द्वापर हें गोपथ ब्राह्मणांत उल्लिखित असलेलें आढळतें.
१५वर्ष.- याचा मूळचा अर्थ पाऊस, पण नंतर पावसाळा, व नंतर वर्ष असे अर्थ होत आले आहेत.
१६संवत्सर.- हा शब्द ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत वारंवार आलेला आहे. एका वर्षाचे ३६० दिवस असतात व त्या वर्षांत १२ महिने असतात असें संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांचें एकमत आहे. हें वर्ष म्हणजे चांद्रवर्ष होय व या वर्षामध्यें सहा दिवस अधिक येतात. सौरवर्ष या अर्थी हा शब्द फक्त सामवेदाच्या निदानसूत्रांत आलेला आहे. त्यांत असें विधान आलेलें आहे कीं, सूर्य सत्तावीस नक्षत्रांपैकीं प्रत्येक नक्षत्रांत १३ १/३ दिवस घालवितो. चांद्रवर्ष व सौरवर्ष (मग तें नाक्षत्र वर्ष असो किंवा सांपातिक सौरवर्ष असो) यांचा मेळ बसणें शक्य नसल्यामुळें या दोन वर्षांचा मेळ घालण्याचे प्रयत्न नि:संशय झाले होते. ब्राह्मणकालांत सुद्धां अधिक मास धरुन हा मेळ घालण्याचा प्रयत्न चांगलासा सफल झाला नव्हता. दर सहा किंवा पांच वर्षांनीं एक अधिक मास धरण्याबद्दल उल्लेख सांपडतात, पण हे अधिक मास लोक पाळीतच याबद्दल निश्चित पुरावा नाहीं. झिमरच्या मतें या बद्दल पुरावा वर्षांच्या ज्या याद्या आहेत त्यांवरुन उपलब्ध झालेला आहे. त्या याद्या पांच आहेत व त्या अशा: संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, इद्वत्सर व वत्सर; किंवा संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, इदुव्त्सर, वत्सर; किंवा संवत्सर, इदावत्सर, इदुवत्सर, इद्वत्सर, वत्सर; किंवा संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर, उद्वत्सर; किंवा संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर; पण ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे कीं इतर कांही ग्रंथांतून या वर्षांच्या नांवांत फरक आहे इतकेंच नव्हे, तर पंचविंश ब्राह्मण (१७.१३,१७) व तैत्तिरीय ब्राह्मण (१.४,१०,१) यांत चार; अथर्ववेदांत (६.५५,३) तीन; त्याच ग्रंथांत (८.८,२३) व तैत्तिरीय आरण्यकांत (१०.८०) दोन; आणि वाजसनेयि संहितेंत (३०.१५) सहा; अशा त-हेच्या संवत्सरनामांच्या याद्या आहेत. परंतु या नांवांचा अधिक मासगणनेच्या पद्धतीशीं कोठेंहि संबंध असल्याचा उल्लेख नाहीं. तेव्हां वरील वर्षांच्या नांवांच्या यादीवरुन एवढेंच अनुमान निघतें की साध्या वत्सर शब्दाचीं जुन्या संवत्सर व परिवत्सर या शब्दांवर आधारलेलीं पर्यायनामें यज्ञपुरोहितांनीं उपयोगांत आणिलीं होती. ही जी नवीन नांवें शोधून काढिलीं त्यांचे मूळ पंचविंश ब्राह्मणांतल्यासारख्या उल्लेखांत सांपडतें. या ब्राह्मण ग्रंथांत निरनिराळया चातुर्मास्य यागांचें निरनिराळया वर्षांशीं साम्य दाखविलेंलें आहे. झिमर जेव्हां 'द्वैवार्षिक मालेंत प्रत्येक वर्षांत ३५४ दिवस अशीं लागोपाठ दोन वर्षे असतात व दर दुस-या वर्षी एक अधिक मास असतो' असें सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हां त्याचें समर्थन करणें फारच कठिण जातें. कारण ३५४ दिवसांचें एक वर्ष अशी स्थिति सूत्रकालाच्या अगोदर मुळींच नव्हती. झिमरचें असेहि म्हणणें आहे कीं जे बारा दिवस ॠभू अगोह्याच्या घरीं निजले होते असा ॠग्वेदांत (४.३३,७) उल्लेख आहे ते १२ दिवस अधिक म्हणून धरण्यांत आले होते. तो असेंहि म्हणतो कीं हे बारा दिवस ३६६ दिवसांच्या सौर वर्षाशी ३५४ दिवसांच्या चांद्रवर्षाचें समीकरण करण्याकरितां दक्षिणायनान्ताच्या वेळीं मिळवीत असत, व ज्या अर्थी प्राक्कालीन जर्मनीमध्यें 'द्वादशरात्रींनां' लोक पुज्य मानीत त्या अर्थी ही अधिकमासगणनापद्धति इंडो जर्मानिक कालांतील आहे. परंतु हें मत सर्वस्वी चुकीचें आहे. कारण हे बारा दिवस म्हणजे संवत्सराची प्रतिमा होय ('संवत्सरस्य प्रतिमा' कठ सं. अथर्ववेद वगैरे). म्हणजे बारा दिवस द्वादशमासांचे दर्शक होत. या बारा दिवसांचा कालगणनेशीं बिलकुल संबंध नाहीं' असें मॅकडोनेल म्हणतो. पांच वर्षांच्या फे-यांत संवत्सर हेंच पांचवें वर्ष यावें अशा त-हेनें शामशास्त्री यांच्या मतानें बौधायन श्रौतसूत्रामध्यें (२.१२; ३.१; २६.१८) कांही गोष्टीचा काल दाखविला आहे. त्यांत कांही तरी कालगणनेचा व्यवस्थित प्रयत्न असावा असें त्यांचें मत आहे.
१७संगव.-चरणा-या गायी दूध काढण्यासाठीं जेव्हां हांकून नेतात ती वेळ असा याचा अर्थ आहे. दिवसाची जी वांटणी केली आहे तीत ज्याला 'तूर्वाह' म्हणतात तो हा भाग होय. हा शब्द ॠग्वेदांत व इतर संहितांतहि आढळतो.
१८सिनीवालि.- हा शब्द ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत वरचेवर आला आहे. याचा 'अमावास्या व तदधिष्ठित देवता' असा अर्थ आहे. लोकांमध्यें त्या कालीं अशी कल्पना होती की ही देवता म्हणजे धनवान्याची समृद्धि व सुपीकता यांची देवता आहे. कारण, चंद्र व वनस्पति यांचा निकट संबंध आहे. दृष्टचंद्रा (म्हणजे ज्या अमावास्येस अल्प काल चंद्रदर्शन होईल-जी चतुर्दशीयुक्त आहे त्या) अमावास्येचें नांव सिनीवालि आहे; व नष्टचंद्रा (ज्या अमावास्येस चंद्र मुळींच दिसणार नाहीं-जी प्रतिपदेनें युक्त आहे-त्या) अमावास्येला कुहू असें म्हणतात. अशी सिनीवालि व कुहू यांची व्याख्या आहे.
१९हिम.- याचा अर्थ थंडी-थंड हवा-असा असून ॠग्वेदांत वारंवार व तदुत्तर ग्रंथांत कमी येणारा असा हा शब्द आहे. हा शब्द तैत्तिरीय ब्राह्मणांत बर्फ या अर्थानें पुल्लिंगी आला असून षड्विंश ब्राह्मणांत नपुंसकलिंगी आला आहे.
२०चातुर्मास्य.- या शब्दाचा अर्थ 'चार महिन्यांचा' असा आहे व हा शब्द एक याग अशा अर्थानें तैत्तिरीय संहितेंत वापरलेला आहे. हा याग ज्या चार चार महिन्यांच्या तीन ॠतूंत वैदिक वर्ष विभागलेलें असे त्या ॠतूंच्या आरंभी होत असे. यांग प्रत्येक ॠतूच्या आरंभी सुरु होत याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे; वैश्वेदेव फाल्गुनी पौर्णिमेला, दुसरें वरुणप्रघास पर्व आषाढी पौर्णिमेला व तिसरें साकमेध पर्व कार्तिकी पौर्णिमेला होत असे. या तिथींनां जर ही यज्ञकर्मे झाली नाहींत तर चैत्री पौर्णिमेला, श्रावणी पौर्णिमेला व आग्रहायणी (मार्गशीर्षी) पौर्णिमेला हे याग करण्यास सवलत होती. एवढेंच नव्हे तर वैशाखी, भाद्रपदी व पौषी पौर्णिमेला सुद्धां हे याग केल्यास चालत असत. या वैकल्पिक तिथी ब्राह्मणग्रंथांत प्रशस्त मानलेल्या नाहीत,पण ज्या अर्थी तैत्तिरीय संहिता व पंचविंश ब्राह्मण या दोन्ही ग्रंथांत फाल्गुनी पौर्णिमेऐवजी चैत्री पौर्णिमा विकल्पानें संमत मानलेली आहे व तेथूनच वर्षारंभ गणला आहे, त्या अर्थी या सर्व वैकल्पिक तिथी पूर्वी संमत असाव्या हें उघड आहे. याकोबीच्या मतानें फल्गुनी नक्षत्रांत असलेल्या पूर्ण चंद्रापासून वर्षारंभ ज्या अर्थी समजला जात असे-व असा समजला जाई अशाबद्दल पुरावाहि आहे-त्या अर्थी एकदां चंद्र फल्गुनी नक्षत्राजवळ असतांना दक्षिणायनान्त होत असे व तेव्हां पासून वर्षारंभ धरीत. या काळी उदगयनान्त सूर्य फल्गुनी नक्षत्राजवळ असे तेव्हां होत असे. ही व्यवस्था ॠग्वेदकालामध्यें असावी व तशी ती खिस्त्री शकापूर्वीच्या चवथ्या सहस्त्रकामध्यें होती. ही कल्पना जर खरी धरली तर याकोबी म्हणतो की, वर सांगितलेल्या वैकल्पिक तिथी ज्या काळीं चैत्री किंवा वैशाखीं पौर्णिमेस दक्षिणायनान्त होत असे त्या वेळच्या बोधक असाव्या. पण ओल्डेनबर्ग व थीबो यांचें असें मत आहे की-व तेंच मत ग्राह्य आहे-फाल्गुनी पौर्णिमा व वसंत ॠतूचा आरंभ हीं एकच होतीं ही गोष्ट सर्वांस मान्य आहे, व ही गोष्ट जर खरी मानली तर याकोबीचें म्हणणें आपोआपच चुकीचें ठरतें. शिवाय माघ महिन्याची अमावास्या ही दक्षिणायनान्ताची तिथि म्हणून जें कौषीतकि ब्राह्मणांत विधान आहे व ज्यावर ज्योतिष गणित आधारलेलें आहे त्यांतील तिथीशीं वरील तिथि ही सुसंगतच आहे. फाल्गुनांतील पौर्णिमा दक्षिणायनान्ताच्यानंतर दीड महिन्यानें येत असावी व हीच तिथि म्हणजे फेब्रुवारीतील पहिल्या आठवडयांतला दिवस हाच थीबोच्या मतानें हिंदुस्थानांत ख्रि. पू. ८०० वर्षांपूर्वी नवीन ॠतूचा आरंभदर्शक असावा. पण आपण ही सुद्धां गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, वर सांगितलेली तिथि कृत्रिमरीत्या गृहीत धरावी लागत असावी; कारण वैदिक कालांत संबंध वर्षाचे तीन ॠतू मानलेले होते व प्रत्येक ॠतु चार महिन्यांचा गणला जात असे. पण वस्तुस्थिति पाहिली तर हिंदुस्थानांतल्या वर्षामध्यें तीन सारखे ॠतू नसतात. तेव्हां कांही लोकांनी वसंत ॠतूंतील करावयाचा वैश्वेदेव याग जर तो ॠतु पूर्ण प्रगट होईपर्यंत करण्याचें लांबविलें तर त्यांत अस्वाभाविक असें कांहीच होणार नाहीं, व याप्रमाणें इतरहि वैकल्पिक तिथींची संगति लावतां येईल.
२१एकाष्टका.- अष्टका म्हणजे वद्य अष्टमी असें अथर्व वेदावरुन स्पष्ट सिद्ध होतें. एकाष्टका कोणती तरी अष्टमी दर्शवीत नसून एक विवक्षित अष्टमी दर्शवीत असावी. अथर्व वेदांतील एका सूक्तांत एकाष्टकेचेंच वर्णन आहे; आणि त्यावरील भाष्यांत सायण म्हणतो कीं ही एकाष्टका म्हणजे माघ महिन्यांतील वद्य अष्टमी. तैत्तिरीय संहितेंत असें सांगितलें आहे कीं एकाष्टका हा वर्षभर चालणारा यज्ञ करण्याकरितां दीक्षा घेण्याचा दिवस आहे (७.४,८,१).
२२दर्श (दिसणें).- याचा अर्थ, पूर्णमासाच्या दिवसाच्या उलट अमावास्येचा दिवस असा होतो. हा शब्द नेहमी 'दर्शपूर्णमासौ' असा द्वंद्व समासांत येंतो, व हे दिवस व्रताला मोठे महत्वाचे गणलेले आहेत. या द्वंद्व समासांत दर्श शब्दाला जें अग्रस्थान दिलेलें आहे तें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. कारण त्यावरुन पूवी महिन्याचा आरंभ अमावास्येच्या दुस-या दिवसापासून होऊन शेवट अमावास्येस होई-पौर्णिमेस नव्हे-ही गोष्ट पूर्णपणें सिद्ध जरी झाली नाही तरी उघडपणें सुचविली जाते.
२३दशमी.-अथर्ववेदव पंचविंश ब्राह्मण ह्यांमध्यें ९० व्या वर्षापासून १०० व्या वर्षापर्यंतचा जो अवधी त्याला हें नांव दिलेलें आहे. यालाच ॠग्वेदामध्यें 'दशम युग' (आयुष्याची दहावी अवस्था) असें नांव दिलें आहे. वैदिक काळांतल्या आर्य लोकांमध्यें चिरायुत्व हें फारसें अपरिचित नव्हतें; कारण शंभर पावसाळे काढण्याबद्दल (शरद:शतम्) ॠषीनीं अनेक वेळां आपली इच्छा प्रकट केलेली आहे. दीर्घतमा १०० वर्षे जगल्याबद्दल व महिदास ऐतरेय ११६ वर्षे जिवन्त राहिल्याबद्दल उल्लेख आलेला आहे. ओनेसिक्रिटोस यानें असें लिहून ठेविलें आहे की, त्या कालचे लोक कधीं कधीं १३० वर्षेपर्येत जगत असत. हे म्हणणें व जातकांत १२० वर्ष जिवन्त राहण्याबद्दल प्रकट केलेली इच्छा ही जुळतात. कदाचित् १३० वर्षे ही अतिशयोक्ति असेल. परंतु हिंदुस्थानांत हल्ली जें अल्पायुष्य दिसून येतें त्याचें कारण ॠग्वेदकालीं ज्याचें नांवहि ठाऊक नव्हतें त्या तापाचा हळू हळू सांचलेला परिणाम होय.
२४पौर्णमासी.- 'पूर्णचंद्र असलेली रात्र' अथर्ववेदांत हिला पवित्र मानून हिचा मोठा उत्सव केला आहे. तदनंतरच्या ग्रंथांमधूनमुध्दां हिचा वारंवार उल्लेख आला आहे. गोभिल सूत्रांत (१.५,७) चंद्र व सूर्य यांमध्यें या दिवशीं सर्वांत जास्त अंतर (विकर्ष) असतें, असें म्हटलें आहे.
२५याम.- अनेकवचनी. अथर्व वेदांत एका ठिकाणीं रॉथच्या मताप्रमाणें याचा अर्थ ज्यामध्यें सूर्य (भग) फिरतो ते ग्रह, असा होतो. परंतु ब्लूमफील्ड आणि व्हिटने हे दोघेहि याचा अर्थ 'रात्रीचे प्रहर' हाच करितात.
२६समा.- याचा मूळ अर्थ उन्हाळा असा असावा, व तो अर्थ अथर्व वेदामध्यें कांही ठिकाणीं आहेसा दिसतो. त्यावरुनच याचा अर्थ ॠतु असा क्वचित् होतो, पण तो फारसा प्रचारांत नाहीं. विशेष प्रचारांतला अर्थ म्हणजे वर्ष असा आहे. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें (६.२,१,२५) एके ठिकाणी वाजसनेयि संहितेमध्यें (२७.१) महिना असा अर्थ घेतलेला आहे; पण या अर्थाबद्दल संशय आहे.
२७हायन.- समासांत हा शब्द आला असतां याचा अर्थ वर्ष असा होतो. काठक संहिता (१५.५) व शतपथ ब्राह्मण (५.३,३,६) यांमध्यें याचा अर्थ तांबडया तांदुळाची जात असा आहे. हा शब्द विशेषणार्थी उपयोगांत आणला म्हणजे याचा अर्थ दर वर्षी होणारा किंवा वर्षभर टिकणारा असा होतो व अशा अर्थानें हा शब्द अथर्व वेदामध्यें तापाला लावलेला आहे (१९.३९,१०).
२८तिथि.-चांद्र दिनाचें नांव, म्हणजे सत्तावीस दिवसांहून किंचित् जास्त असलेल्या चांद्रमासाचा १/३० वा भाग. हा शब्द उत्तरकालीन सूत्रग्रंथांत आलेला आहे; पण ब्राह्मणग्रंथांत तो पूर्ण अज्ञात आहे. कारण ब्राह्मणांत ज्या दिवसाचा उल्लेख आहे तो नैसर्गिक सावन दिवस होय.

ॠतु, महिने व युगें [ॠग्वेद]
१ॠतु वर्षा, शरद) प्रावृष्
ॠभु त्र्युधस् (वसंत, युग
ग्रीष्म शरद्, हेमंत) वसंत
त्रिपाजस्य (ग्रीष्म, नानासूर्य (नाना- शरद्
वर्षा, हेमंत) विधै: सूर्यैरधि- हिम
त्र्यनीक (ग्रीष्म,) ष्ठिता ॠतव:) २हेमन्त
[तै. सं.]
अंहसस्पति (अधिक मास) त्रेता (युग) वसन्त
द्वापर (युग) शरद्
अयावस् (ग्रीष्म) नभ (श्रावण) शुक्र (ज्येष्ठ)
आस्कंद (कलि युग) नभस्य (भाद्रपद) शुचि (आषाढ)
पापसम शैशिर
इष (आश्विन) पूर्णमास संसर्प
ऊमस् (शरद्) प्राणायन (वसंत) सगर
ऊर्ज (कार्त्तिक) फल्गुनी पूर्णमास सब्द
ॠतु (फल्गुन) सह (मार्गशीर्ष)
एनप् (वर्षाॠतु) मधु (चैत्र) सहस्य (पौष)
कृत (कृतयुग) माधव (वैशाख) हेमन्
ग्रीष्म यावस् (वसंत) हेमना
तप (माघ) वर्षा हेमन्त
तपस्य (फाल्गुन)
[अथर्व वेद]
अशाढ वैश्वकर्मण शारद
३आर्तव शतंहिम शिशिर
ग्रैष्म शतशारद शौशिर
नैदाघ शतहिम हिम
वसन्त शरद् हेमन्त
वासन्तिक
दिवसनामें [ॠग्वेद]
अहन् तिरोअहन् द्युम्
४अहर्दिव दिन पक्थ
अहर्द्दश् दिव पुरुदिन
अहोरात्र दिवा भानु
कल्प दिवातर वस्तु
घृण दिवेदिवे वासर
घ्रंस द्यविद्यवि स्वसर
रात्रिनामें [ॠग्वेद]
अक्तु ऊधस्
अद्यूत्य (प्रकाश रहित) असिक्नी ऊर्म्या
ॠच्यमाने (अहो रात्र) ६नक्ता रजस्
नम्या रात्रि
कृष्णयामा निम्रुच् (अस्त समय) राम्या
कृष्णी (कृष्णवर्णा) वज्रिनी
क्षपा पयस् वस्वी
घृताची पयस्वती शर्वरी
तमस् ७परितक्म्या शिरिणा
तमस्वती प्रदोष शोकी
तमिस्त्रा मोकी श्यावी
५दोषा यम्या हिमा
काल व कालसंबंधी [ॠग्वेद]
अनूची (उषारात्रि) घाता शतयामन्
अनेहस् (काल) नित्य शतशारद
अपरी (सर्वकाल) निमिष शतहिम
अपिशर्वर (मध्य रात्र) निम्रुच् (सायंकाल) संवत्स (संवत्सर)
पंचयाम ६सवत्सर
अप्रपित्व (सायं काल) परिवत्सर संवत्सरीण(संव त्सरेभवं पय:)
पर्वन् (पौर्णिमा, अमा)
अमा (तिथि) १७संगव (प्रात:- कालोत्तर काल)
आमेम्याने (अहो रात्रे) १०पितृयाण
आयति (दिर्घ काल) पूर्वाहृ सप्तचक्र
११प्रपित्व सप्तरश्मि
प्रातर् सप्ताश्व
इन्द्रद्विष्टा (रात्रि) प्रावृषीण सप्ति
उषसोव्युष्टि (उदयकाल) मध्यंदिन सहस्त्रयामन्
१२मास १८सिनीवालि
कला १३मुहूर्त सुयामन्
८काल यामन् १९हिम (संव त्सर)
चंद्रमस् (अमावास्या व पौर्णिमा) १७युग
राका हिम्य
९त्रियुग १५वर्ष ह्यस्
दशमास्य वस्तु
दिर्घ वृषभ
[तै. सं.]
अग्निकेतु इदावत्सर दर्श
अद्याश्वस् (अद्य, श्व:) इदुवत्सर दोषा
उत्तरेद्यु दोषावस्त
अपरपक्ष उदयन नक्त
अपराहृ उदित नक्तोषसा
अब्द उषासानक्ता निमिष
अमावास्या ग्रीष्म परिवत्सर
अयन २०चातुर्मास्य परुस्
अर्धमास चित्रापूर्णमास पर्व
अष्टमी छंदस्वती पूर्णमास
अहन् जारी (जीर्णरात्र) पूर्वपक्ष
अहोरात्र तिरोअह्निय प्रवा (उष:काल)
आकल तिष्या पूर्णमास प्रातस्
आस्कंद (कलि युग) तीर्थ (दु:खोत्तरणकाल) प्रातस्तन
मध्यन्दिन
मध्यरात्र
राका शुक्रॠषभा समानमूर्ध्नि
रात्र संवत्सर सायं
वत्सर संवत्सरसाति सायंप्रात:
वार्षिक संवत्सरस्वदित साह्न
वार्षी सद्यस् सुदिन
विधान्या (तिथि) समा (वर्ष) सुमेक
व्यष्टका (कृष्ण प्रतिपदा) समानप्रभृति (समानोदर्क)
[अथर्व वेद]
अतिशर्वर त्रिंशदरा वार्षिक
अनिमेष त्रेहायण वार्षिकी
अनेह २२दर्श विश्वशारद्
अपर्तु दशपक्ष व्युष्टि
अमा २३दशमी व्रत्या (व्रतार्ह रात्रि)
अमावास्या दोषा
अर्धमास दोहा शतयामन्
असुतपा (रात्रि) द्यु (दिवस) शतहायन्
अहन् द्वादशाकृति षट्पक्ष
अहर्द्यु द्वादशार षडर
अहोरात्र नक्त संवत्सर
आयती पंचार संगव
आयन परिवत्सर समय
इदावत्सर परिवत्सरीण समवती (रात्रि)
उदयन २४पौर्णमासी २६समा (वर्ष)
ॠत्विय प्रदिश् सहस्त्राह्नय
एकज (अधिकमास) प्रोष्ठपदा सायकप्रनुत्त
एकमूर्धन् भद्राह सायंभव
एकर्तु भूतभव्य सुकल्प
२१एकाष्टका (अष्टमी) मास् (मास) सुदिन
कल्प मास सूषा
काल २५याम २७हायन
क्षपा रजनी हायनी
क्षामन् वर्ष हैमन
चतुर्थी
[संहितेतर]
२८तिथि मलिम्लुच (अधिकमास)
निदाघ (उन्हाळा) यव्य (मास)
पंचदशी (१५वा दिवस) महारात्र (उत्तर रात्र) रथाहव्य (रथानें होणारा एक दि-
वसाचा प्रवास)
मध्यवर्ष (पावसाळयाचा मध्य) महाह्न (दुपार)
मात्रा (-हस्वस्वरो चारणकाल)