प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.               

गृह
गृहनामें (ॠग्वेद)

गृहनामें (ॠग्वेद)  / गृहविशेष (ऋग्वेद )

गय - गय म्हणजे घर. ॠग्वेदांत नेहमी व तदुत्तर ग्रंथांत कधीं कधीं येणारा हा शब्द आहे. गय या शब्दाच्या अर्थात घर, घरांतील सामान् व मनुष्यें यांचाहि अंतभार्व होतो.
गृह- हा शब्द ब-याच वेळां एकवचनी व त्यापेक्षां अधिकवेळां अनेकवचनी आला असून त्यानें वेदकालीन आर्याच्या गृहरचनेचा बोध होतो. दम आणि दम या शब्दांचाहि तोच अर्थ आहे. परंतु पस्त्या आणि हर्म्य यांच्या अर्थात घर आणि भोवतालचें आवार यांचा समावेश होतो. घरांमध्यें मोठया थोरल्या कुटुंबाचाच समावेश होतो असें नसून गुरेंढोरे व मेंढया याचेहि ते रात्री आश्रयस्थान असे. अनेकवचनी प्रयोगावरून घराला पुष्कळशा खोल्या असाव्यात, तें चांगले बंदहि करिता येत असावें. दाराचा (द्वार, द्वार) उल्लेख पुष्कळ वेळा आला असून या द्वारावरूनच घराला दुरोण हें नांव मिळालें. प्रत्येक घरात अग्नि नेहमीं प्रदीप्त असे. गृहरचनेविषयी फारशीं माहिती मिळत नाहीं. कदाचित्  दगडाचा उपयोग न करितां  मेगॅस्थनजिच्या वेळेप्रमाणें लांकडाचा उपयोग करीत असावेत. अथर्ववेदाच्या ॠचांनीं जरी गृहरचनेवर थोडासा प्रकाश पडतो, तथापि बारीक सारीक गोष्टीचा चांगलासा बोध होत नाहीं. कारण पुष्कळसे उपयोगांत आणलेले गृहविषयक शब्द त्याच अर्थाने पुन्हां येत नसल्यानें त्यांचा अर्थ स्पष्ट होत नाहीं. झिमरच्या मताप्रमाणें चांगल्या जागेवर चार खांब (उपमित्) उभे करून त्यांनां टेंकू (प्रतिमित्) म्हणून त्यांच्याशी कोन करून तिरके सोट बसवीत. उभे खांब, त्या खांबावरच उभ्या असलेल्या उभ्या आडव्या तुळ्यांनी एकमेकांशी जोडले जात. घराचें छप्पर बांबूच्या (वंश)काबी, विषूवंत, नांवाची मधली बाजू (आढें) व अक्षु (जाळें) म्हणजे वरील शाकार किंवा केवळ यांचें बनवीत. गवताच्या बिंडयांनीं (पलद) भिंती बनविल्या जात असून तो सर्व डोलारा निरनिराळया प्रकारच्या बंधनांनीं (नहन, प्राणाह, संदेश, परिष्वंजल्य) एका ठिकाणीं स्थित केलेला असे. घराच्या संबंधानें हविर्धान (यज्ञिय हविर्द्रव्य ठेवण्याची जागा), अग्निशाला (अग्निची जागा), पत्नीनाम सदने (गृहीणींची खोली) आणि सदस्  (बसण्याची खोली) हे शब्द आले आहेत. हे शब्द जरी यज्ञसंबंधी असले तरी ते घराचे भाग असल्याचा त्याच्या नांवावरून बोध होतो. शिंकी किंवा लोंबती भांडी (शिक्य) याचाहि उल्लेख आहे. घराच्या भिंती पु-या करण्याकरिता वेतकामाचाहि (इट) उपयोग करीत असल्याबद्दल उल्लेख आहे. घराच्या वाजवांनां पक्ष असें म्हणत. चौकटीसह दरवाजाला ‘आता’ हें नांव आहे.
३छदिस् - हा शब्द एकदां ॠग्वेदांत व ॠग्वेदोत्तर ग्रंथांत अनेक वेळ आला आहे, व त्याचा अर्थ चौचाकी गाडयावरील झांकण, घरावरील छप्पर किंवा अशाच प्रकारचा कांही पदार्थ, असा आहे. वेबरच्या मतानें अथर्ववेदाच्या एका उता-यांत या शब्दाचा अर्थ नक्षत्रगण असा आहे. व्हिटनेच्या मतें ह्याचा अर्थ नक्षत्रगण असा घेणें जरी आवश्यक नसलें तरी हा नक्षत्रगण कुंभराशीचा होय. कारण अथर्ववेदांत छदिस शब्द आहे त्यापुढील मंत्रांत ‘विचृतौ’ (वृश्चिक) नक्षत्रगणांचा उल्लेख आहे; आणि वृश्चिक राशि ही कुंभ राशीहून फारशी दूर नाहीं.
छर्दिस,- हा शब्द ॠग्वेदांत वारंवार व तदुत्तर ग्रंथांतहि आलेला असून ‘राहण्याची सुरक्षित जागा’ असा त्याचा अर्थ आहे. हा शब्दचुकीनें लिहिलेला दिसतो. कारण वृत्तावरून असें दिसते कीं, पहिलें अक्षर नेहमी लघु पाहिजे. याकरितां रॉथचें असें म्हणणें आहे कीं, छर्दिस्च्या ऐवजीं छदिस् हाच शब्द असावा, पण ह्याला एक अशी अडचण  आहे कीं, ‘छदिस्’  चा अर्थ छप्पर असा आहे व ‘छर्दिस्’ चा असा अर्थ कधी होत नाही. तेव्हां बार्थोलोमे जो छधिस् हा शब्द सुचवितो तें त्याचें म्हणणेंच कदाचित्  बरोबर असूं शकेल.
दम - ॠग्वेदांत अनेक वेळां घर असा अर्थानें हा शब्द आलेला आहे. रॉथच्या मतें ह्याचा अर्थ ज्या ठिकाणीं एखादा मनुष्य अनियंत्रित सत्ता उपभोगितो (दम म्हणजे ताब्यांत ठेवणें या धातूपासून) तें ठिकाण असा आहे.
६दुरोण- ॠग्वेदांत व पुढें झालेल्या ग्रंथांत घर अशा अर्थी व अलंकारिक अर्थानें हा शब्द आलेला आहे.
दुर्य- ‘दार किंवा घर ह्यासंबंधी’, संहिता ग्रंथाच्या ब-याच उता-यांत अनेकवचनी नाम म्हणून हा शब्द आला असून त्याचा अर्थ दराचे खांब किंवा घर असा आहे.
धामन्- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्ये राहण्याचे ठिकाण, घर किंवा कधीं कधीं घरातलें राहणारे लोक असा याचा अर्थ आहे. या शब्दाचा हुकूम, कायदा असाहि अर्थ आलेला आहे, व हा अर्थ आणि धर्मन् व विशेषतः ॠत या शब्दाबरोबर धर्मन्  शब्द आलेला असताना, दोहींचा अर्थ सारखाच आहे. ॠत म्हणजे चीरंतन कायदा. हिलेब्रँटच्या मतें एका उता-यांत ‘धामन्’चा अर्थ नक्षत्र असा आहे.
पस्त्या- (स्त्रीलिंगी अनेकवचनी) हा शब्द ॠग्वेदामध्यें अनेक ठिकाणीं आलेला आहे. रॉथ या शब्दाला घर किंवा राहण्याचे ठिकाण असा विस्तृत अर्थ देतो, त्याचप्रमाणें घरात राहणारे कुटुंब असाहि त्याचा अर्थ करितो. हा अर्थ झिमरला सुद्धा संमत आहे. उलटपक्षी पिशेलच्या मतानें दोन उता-यांत पस्त्याच्या ऐवजी पस्त्य असा नपुंसकलिंगी शब्द आहे आणि तो पस्त्यसद्  व पस्त्यावंत शब्दात आढळून येतो. ह्या पस्त्य शब्दाचा अर्थ ॠग्वेदात तरी लाक्षणिक अर्थानें नैघंटुकांत म्हटल्याप्रमाणें ‘राहण्याचें  ठिकाण’ असा अर्थ आहे. त्याच्या मतानें इतर उता-यांत या शबदाचा अर्थ ‘नद्या’ किंवा ‘पाणी’ असा आहे. विशेषतः पस्त्याच्या मध्यभागीं सोम असतो असें जेथें म्हटलें आहे तेथें कुरुक्षेत्र व तेथील नद्या असा त्याच्या मतानें अर्थ आहे. ह्या नद्या म्हणजे आपया, दृष्टद्वती, व सरस्वती या होत. कांही ठिकाणीं त्याच्या मतानें पस्त्याचा अर्थ एखाद्या नदीचे ठेविलेलें नांव असा आहे. उदाहरणार्थ सिंधु या शब्दाचा मूळचा अर्थ नदी असा होता व नंतर सिंधु नांवाची एक नदी असा झाला आहे.
वेश्मन्- ह्याचा अर्थ ‘घर’ आहे. हा शब्द ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें आलेला आहे. या ठिकाणी याचा अर्थ मनुष्य वसति करून (विश्) राहतों तें घर असा आहे.
११आवसथ- (घर) तैत्तिरीय संहितेंत ह्या शब्दाचा बरोबर अर्थ पाहुण्यांचें आगतस्वागत करण्याची जागा; मुख्यत्वेकरून मेजवान्या आणि यज्ञ, ब्राह्मण आणि इतर मंडळीं यांनां बसण्याकरितां जागा, यात्रेकरू लोकांनां राहण्यासाठीं धर्मशाळा असाहि अर्थ होईल. हा अर्थ वसतिस्थान ह्या व्यापक अर्थावरून निघाला असावा.
१२प्राचीनवंश- यजुर्वेदांत व शतपथ ब्राह्मणांत या विशेषणाचा अर्थ घराला आधारभूत असलेलें व ज्याचें टोंक पूर्वेकडे असून बुंधा पश्चिमेकडे आहे असें आढें असलेलें घर असा आहे. हें आढें कदाचित् बाजूंच्या तुळयांहून उंच असावें.
१३प्रतिष्ठा- हा शब्द अथर्ववेदांत एका ठिकाणीं आढळतो. तेथें हा कायद्यासंबंधी पारिभाषिक शब्द आहे असें झिमर म्हणतो. कदाचित्  याचा अर्थ पवित्रस्थान, देवालय, असा असावा. परंतु रॉथनें दिलेला ‘घर’, ‘राहण्याची जागा’ हा अर्थ नीट लागूहि पडत नसून त्याबद्दल बरीच शंका वाटते असें मॅकडोनेल म्हणतो. झिमरच्या कल्पनेला आधार म्हणजे त्याच ॠचेंत प्रतिष्ठा शब्दापूर्वी ‘ज्ञातार’ म्हणजे साक्षिदार, जामीन हा कायद्यांतील शब्द आला आहे एवढाच. सायणाचार्य याचा अर्थ ‘आवासभूमि,’ ‘आश्रयस्थान,’ असा करितात.
१४बृहच्छंदस्- हा शब्द अथर्ववेदाच्या एका उता-यांत आला आहे. तेथें हा शालाचें (घराणें) विशेषण आहे.  हें स्पष्टपणें ‘बृहत्छदिस्’ चे रूप दिसतें. ‘बृहत्छदिस्’ म्हणजे विस्तृत छप्पर असलेलें. आणि हाच अर्थ या शब्दाचा असावा असें दिसतें.
१५शाला- अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें ह्या शब्दाचा स्पष्ट अर्थ म्हणजे घर असा आहे. या शब्दांत अर्थात जनावरांचा गोठा, धान्याची कोठी, वगैरेंचाहि अंतभाव होतो. अथर्ववेदांत गृहपतीला शालापति असेंहि म्हटलें आहे.
१६अगार- हा क्वचित आढळणारा शब्द कौषीतकी उपनिषदांत ‘घर’ ह्या अर्थानें आढळतो.
१७प्रासाद- याचा अर्थ राजवाडा. परंतु हा शब्द अलीकडील ‘अद्भुत ब्राह्मणाशिवाय’ कोठेंहि  या अर्थानें सांपडत नाहीं.
१८गोत्र- ॠग्वेदांतील इंद्राच्या अतिप्राचीन अद्भुत कृत्यांत ह्याचा ब-याच वेळां उल्लेख आला आहे. रॉथच्या मतानें त्याचा अर्थ गोठा असा आहे. गेल्डनेर ‘कळप’ असा अर्थ करितो व हाच ग्राह्य दिसतो; कारण ॠग्वेदोत्तर वाङ्मयांत ‘कुल’ अथवा कुटुंब असा अर्थ केला आहे, आणि  छान्दोग्योपनिषदांतहि तोच अर्थ आहे. गृहयसूत्रांत सगोत्रविवाह व वराच्या  मातेचे जे सपिण्ड असतील त्यांच्याशी विवाह निषिद्ध मानण्यावर विशेष जोर दिला आहे. सेनर्ट म्हणतो कीं हें जातीचें मूळ आहे.कारण ‘क्युरिआ फ्रेट्रोआ’ अथवा वर्ण  यांतील विवाह म्हणजे इण्डो यूरोपीय विवाहपद्धतीय होय. त्याचप्रमाणें पितृगोत्र व मातुल सपिंड हे विवाहास वर्ज्य करण्याची चालहि त्यांचीच होय परंतु ही चाल इण्डोयूरोपीयनांची होती असें म्हणण्यास मुळींच पुरवा नाहीं. शिवाय शतपथ ब्राह्मणाप्रमाणें बापाच्या व आईच्या बाजूनें तिस-या अगर चवथ्या पिढीनंतर विवाहास पवानगी आहे. सायणभाषयाप्रमाणें तिस-या पिढींतील विवाह कण्वांस मान्य, चवथ्या पिढींतील सौराष्ट्रांस मान्य, व वज्रासूची नामक टीकाकार म्हणतो कीं ‘कण्वाप्रमाणेंच आंध्रांची व दाक्षिणात्यांची पद्धत असून वाजसनेयि शाखेचे लोक मामाच्या मुलीशीं लग्न करण्यास विरोध करितात, मॅकडोनेल म्हणतोकीं पूर्वी चुलत बहिणीशीं लग्न करीत असत. पण पुढें ती चाल मोडली. परंतु या विधानास तो कोणताच आधार देत नाहीं. पूर्वी गोत्र बदलतां येत असे; शुनःशेपानें ते बदललें होतें. तो पूर्वी गृत्समद आंगिरस होता तो नंतर भार्गव झाला.
१९व्रज- ॠग्वेदांमध्यें ह्याचा मूळ अर्थ जनावरें ज्या ठिकाणीं आश्रयार्थ जातात ती जागा आणि दुभती जनावरें गांवातून सकाळीं जेथे चरण्यास जातात व दुभती नसलेली रात्रंदिवस जेथें राहतात तें चराऊ रान असा आहे. त्यावरून पुढें या शब्दाचा गुरांचा कळप असा अर्थ झाला असें गेल्डनेरचें मत असून तें रॉथच्या मतापेक्षां अधिक योग्य दिसतें. रॉथ म्हणतो की वृज याचा मूळ अर्थ (वृजपासून) कुंपण व नंतर त्या पासून कळप असा झाला. परंतु व्रज ह्याचा नेहमीचा अर्थ कांही कुंपण असा होत नाहीं. वैदिक कालांतील जनावरें सामान्यतः कांही गोठ्यांत पोसलीं जात नसत; तथापि कांहीं ठिकाणी गोठा व कांही ठिकाणीं तबेला असा या शब्दाचा अर्थ निःसंशय आहे.गोहरणाच्या आख्यायिकेंत हा शब्द वारंवार उपयोगांत आणला आहे. कधीं कधीं ह्याचा ‘हौद’ असा अर्थ होतो.
२०स्वसरं- सेंटपीटर्सबर्गकोशाप्रमाणें ह्याचा अर्थ जनावरांचा गोठा, अथवा अधिक सामान्य अर्थ म्हणजे वसतीची जागा, घर आणि नंतर पक्ष्याचें घरटें, असा आहे. गेल्डनेर म्हणतो कीं जनावरांचे बाबतींत त्याचें ‘मोकळें हिंडणे’ किंवा ‘सकाळचें’ चरणें व पक्ष्यांच्या बाबतींत त्याचें प्रातःकाळी घरटयाबाहेर उडणें, असा याचा अलंकारिक अर्थ ‘सोमवल्लीचा रस सकाळी काढणें’ किंवा ‘कोणत्याहि वेळीं रस काढणें’ असाहि होतो.
२१हर्म्य- ह्या शब्दानें वेदकालीन गृहाचा बोध होतो. ह्यांत गोठा, भोवतालचें कुंपण अथवा भिंत यांचा समावेश होतो. याचा ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत पुष्कळ वेळा उल्लेख आला आहे.
२२अग्निशाला-अथर्ववेदांत एका शालेचे विशेषतः जेथें अग्नि ठेवीत अशा घराच्या एका भागाचें नांव अशा अर्थी हा शब्द आला आहे.
२३आता - ॠग्वेदाप्रमाणें या शब्दाचा अनेक  वचनांत उपयोग केला असतां घराच्या दरवाज्याची चौकट (जरी हा शब्द आकाशाचे दरवाजे या अर्थानें योजिला आहे तरी) असा अर्थ होतो. वाजसनेयि संहितेंतहि याच अर्थानें हा शब्द आढळतो.  झिमर म्हणतो हा शब्द लॅटिनप्रमाणें आहे व व्युत्पत्तिदृष्टया तो अर्थ बरा दिसतो.
२४उपमित् - घराचें नांव या अर्थी ॠग्वेदांत दोनदां व अर्थववेदांत एकदां हा शब्द सांपडतो. ॠग्वेदांतील उता-यावरून याचा व अर्थ सरळ खांब असा असावा असें वाटतें. अथर्ववेदांत हा शब्द परिमित् व प्रतिमित् या शब्दांशी जोडलेला आहे. यावरून साहजिक असें अनुमान निघतें कीं, प्रतिमित् म्हणजे परिमित्  यांनां आधारभूत तुळजा (बहुधा परिमित् याच्याशी कोनाकार असलेल्या) आणि परिमित् म्हणजे उपमित्  याच्याशी आडव्या येऊन मिळणा-या तुळया. परंतु हीं भाषांतरें तार्किकच आहेत.
२५ऊर्दर- हा शब्द ॠग्वेदांत धान्याचें कोठार ज्याप्रमाणें कोठार धान्यानें भरतात त्याप्रमाणें इन्द्रास, सोमरसानें भरावयाचा अशा अर्थानें आला आहे. सायणांनीं याचा कोठार असा अर्थ केला आहे. परंतु झिमर व रॉथ हे धान्य ठेवण्याचें माप असें त्याचें भाषांतर करतात. ग्रिफिथचा अर्थ सायणाप्रमाणेंच आहे.
२६दुर्- ॠग्वेदांत हा शब्द मूळच्या अर्थानें व अलंकारिक रीतीनें दरवाजा या अर्थानें आला आहे.
२७(द्वा) द्वार्- ॠग्वेदापासून पुढें झालेल्या ग्रंथांत घराचें दार या अर्थानें हा शब्द आहे. मागाहून प्रचारांत आलेला द्वार हा शब्द याच अर्थी आला आहे. शतपथ ब्राह्मणांत द्वार बंद करणें याला द्वारपिधान हा शब्द योजिला आहे.
२८द्रुपद- लांकडी खांब या अर्थी ॠग्वेद व पुढील ग्रंथांत हा शब्द आला आहे. शुनःशेपाला यज्ञांमध्यें तीन खांबांला बांधिलें होतें. चोरांना चोरी करण्याबद्दल शिक्षा म्हणून बांधीत असत असा उल्लेख आहे.
२९मयूख- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत याचा खुंटी असा अर्थ आहे. ती मुख्यतः जाळें ताणण्यासाठी उपयोगांत आणीत असत.
३०स्थाणु- ॠग्वेद व तदुत्तरं ग्रंथांत लांकडी खांब असा याचा अर्थ आहे.
३१मेथि- हा शब्द तैत्तिरीय संहितेंत खुंटी या अर्थी आला आहे. अथर्ववेदांतील लग्नासंबंधीच्या मंत्रांत याचा उल्लेख असून ‘रथाच्या दांडयाला आधारभूत’ असा त्याचा अर्थ असावा असें सेंटपीटर्सबर्ग कोशाचें मत आहे. ॠग्वेदांत ८.५३,५ येथें गजांचा कठडा करण्यासाठी या खांबाचा उपयोग करीत असत असें लिहिलें आहे. मेथीला यज्ञांतील गाय बांधीत असत असा पंचविंश ब्राह्मणांत उल्लेख आहे.
३२पक्ष- अथर्ववेदांमध्ये घराच्या कांही भागाला; रॉथ व ग्रील यांच्या मतें बाजूच्या खांबाला; व्हिटने व ब्लूमफील्ड यांच्या मतानें घरांच्या वाजवांनां हा शब्द लाविला आहे. अथर्ववेदांत छपरांचे (छदिस्चें) चतुष्पक्ष-चार वाजवा असलेलें असें जे वर्णन आलें आहे. त्यावरून व्हिटनेचा अर्थ बरोबर दिसतो. तैत्तिरीय ब्राह्मणांत रथाच्या बाजूनां पक्ष हा शब्द लावला आहे व महिन्याचा अर्धा भाग असाहि त्याचा अर्थ आहे.
३३परिमित्- अथर्ववेदांत हा शब्द आला असून घराचे उभे खांब जोडण्याकरितां उपयोगांत आणलेले आडवे खांब किंवा तुळ्या असा त्याचा अर्थ आहे.
३४पलद- अथर्ववेदांतील घराच्या वर्णनासंबंधीच्या एका सूक्तांत हा शब्द दोनदां आला असून वारा व पाऊस यांपासून छपरांचा बंदोबस्त होण्याकरितां उयोगांत आणावयाच्या वेताच्या किंवा गवताच्या पेंढ्या (ताठया) असा त्याचा अर्थ आहे.
३५प्रतिमित् अथर्ववेदांत घराच्या वर्णनांत हा शब्द आला आहे. याचा अर्थ एक प्रकारचा धिरा असाच असावा. उपमितांवर कोन करून ओळंबणारे हे खांब असावेत असें वाटतें.
३६अर्गल- हा शब्द आरण्यकांत ‘अर्गलेषीके’ या समासांत गोठयाच्या दरवाजाला जो आडवा दांडा लावतात त्या अर्थी योजिलेला आढळतो. नंतर त्याचा अर्थ दरवाज्याला अडकविण्याचा खिळा (अडसर) असा झाला.
३७परिधि- छांदोग्य उपनिषद्  व नंतरहि लोखंडी गज किंवा अडसर असा याचा अर्थ आहे.
३८प्राकार- शांखायन श्रौतसूत्रांत प्रेक्षकांनां बसण्याकरितां उभारलेल्या प्रासादाला आधारभूत अशा भिंतीच्या भागाला हा शब्द लाविला आहे.
३९भित्ति- शतपथ ब्राह्मणांत याचा अर्थ वेत नामक गवताच्या पिंजून विणलेल्या चटया असा अर्थ होतो.
४०वृत्रशंकु- याचा शब्दशः अर्थ वृत्राची खुंटी असा अशून शतपथ ब्राह्मणांत हा शब्द आला आहे. कात्यायन श्रौतसूत्रावरील टीकाकाराच्या मतें दगडी खांब असा त्याचा अर्थ आहे. हा अर्थ थोडा असंभवनीय दिसतो. परंतु शतपथ ब्राह्मणाचा (४.२,५,१५) या अर्थास दुजोरा आहे.
४१शीर्षण्य- ऐतरेय ब्राह्मण व उपनिषद्  ग्रंथ यांत मंचकाचा (आसंदीचा) पुढील भाग असा याचा अर्थ आहे.
४२स्तम्भ- सूत्रग्रंथात खांब या अर्थी हा शब्द आला आहे. ॠग्वेदांतहि हा शब्द आला आहे परंतु तो लक्षणेनें आला आहे.