प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.   

( अवस्था )

 मानवी अवस्था ( ऋग्वेद )

पलित -- पलित म्हणजे पांढ-या केसाचा. हा शब्द ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांत वारंवार आढळून येतो. मनुष्य पलित झाला म्हणजे तो वृद्ध झाला म्हणून समजावें. जमदग्नीच्या कांही वंशजाप्रमाणें जें लोक वृद्ध होत नाहींत त्यांना पलित हा शब्द लाविलेला नाहीं. ऐतरेय ब्राह्मणांत एका ठिकाणी भरद्वाजाचें वर्णन तो वृद्धावस्थेंत कृश व पलित झाला असे आलेंलें आहे. शतपथ ब्राह्मणांत एका ठिकाणी डोक्याचें केस प्रथम पांढरें होतात असें वर्णन असून दुस-या ठिकाणीं हातांवरील केस पांढरें झाल्याचा उल्लेख आहे.

ऋग्वेदांत वांरवार याविषयी उल्लेख आलेला आहे; आणि नंतर भीतिदायक स्थिति अशा अर्थी हा शब्द योजिला आहे. मृत्यूचें प्रकार १०१ आहेत; पैकी वृद्ध होऊन मरणें हें स्वाभाविक आहे; बाकीचें शंभर प्रकार टाळतां येण्यासारखे आहेत. वृद्ध होण्याच्या अगोदर ( पुरा जरस: ) मरण येणें म्हणजे अकालीं ( पुरा आयुष: ) मरणें होय. आयुष्याची सर्वसाधारण मर्यादा शंभर वर्षे असल्याचें वैदिक वाङमयात उल्लेख आहेत. शारीरिक शक्ति गेल्यामुळें वृद्धपणांत होणा-या हालांचीहि स्पष्ट कल्पना दाखविली गेली आहे. अश्विनांच्या अद्भुत कृत्यांपैकी वृद्ध च्यवनास तारूण्य परत देणें व कलींस पुन्हा तारूण्य देणें हीं होत. अथर्ववेदांत मृत्यु टाळण्याबद्दल आणि आयुष्य वाढविण्याच्या प्रकाराबद्दल पुष्कळ मंत्र आहेत. मृतशरीराची विल्हेवाट लावण्याच्या दोन त-हा होत्या. एक पुरणें व दुसरी दहन करणें. वैदिक काळांत दोन्हीहि त-हा ग्रीक देशांतल्या प्रमाणें प्रचलित होत्या. परंतु पुरण्याच्या पद्धतीविषयीं विशेष पसंती दर्दविली जात नव्हती. दग्ध केलेल्या अगर अदग्ध अशा मृतांची हाडें पुरून त्यावर छत्र्या ( श्मशान ) बांधीत. या छत्र्या कशा त-हेचा असाव्या या बद्दल शतपथ ब्राह्मणांत बरेंच विवेचन आहे. मृतमनुष्याला जळणा-या होडींत घालून ती होडी समुद्रांत सोडण्याच्या उत्तर देषांत प्रचलित असलेल्या चालीचा थोडा किंवा मुळींसुद्धां वैदिक वाङमयात उल्लेख नाहीं. नावेंचा निर्देश जो आहे तो मृत्यूनंतर भोगाव्या लागणा-या आपत्तीचें सूचक आहे. पुरण्याच्या पद्धतीविषयी नाहीं. मॅकडोनेलनें दिलेल्या स्थलीं सायणमते तें द्यूचें रूपक आहे मृत्यूसंबंधी नाहीं. वेद कालीन आर्य लोकांस मृत्यूनंतरचें जीवत म्हणजे या जगांतील आयुष्याची पुनरावृतीच होय असें वाटत असें. मनुष्य मृत्यूनंतर सर्वदेहासहित ( सर्वतनु: सांगा: ) स्वर्गात जातो व पृथ्वीवरचीं सर्व सुखें भोगतो अशीं त्यांची समजूत असें. ऋग्वेदांत वाईट कृत्य करणारांचे मृत्यूनंतर हाल होतील असा संदिग्ध निर्देश आहे. परंतु अथर्ववेदांत आणि शतपथ ब्राह्मणांत मात्र शिक्षेदाखल नरकाची कल्पना आली आहे. त्या ग्रंथांतच असें म्हटलें आहे कीं या जन्मांतील सत्कृत्यें अगर दुष्कृत्यें मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीस अगर नरकवासास कारण होतात. रॉथ म्हणतो त्याप्रमाणें दुष्टांचा शेवट म्हणजे त्यांचा पूर्ण नाश असा निर्देश ऋग्वेदांत नाहीं. वैदिक काळीं नीतिमत्तेच्या कल्पना निश्चित नसल्यानें त्यामध्यें परलोकी मिळणा-या शासनाचा विशेषसा उल्लेख नसणें स्वाभाविक आहे.
स्वप्न -- ऋग्वेदांत व उत्तरकालीन ग्रंथांत ह्याचा उल्लेख आलेला आहे. दुष्ट स्वप्नाचाहि उल्लेख आहे. ऐतरेय आरण्यकामध्यें स्वप्नें व त्यांचे अर्थ आणि प्रत्यक्ष डोळयांनी पाहिलेल्या गोष्टी ( प्रत्यक्ष दर्शनानि ) ह्यांची यादी आलेली आहे.
प्रत्यक्ष दर्शन -- ह्याचा अर्थ 'स्वत:च्या डोळयांनी पहाणें. शिवाय हा शब्द स्वप्न ( ऐतरेय ब्रा. ) शब्दाच्या विरूद्ध अशा अर्थी आहे. ऋग्वेदाच्या आरण्यकाचा एक भाग असल्यास्वप्नासंबंधी आहे.
पूर्व वयस् -- म्हणजे 'आयुष्याचें पहिले दिवस'; 'आयुष्याचा पहिला काल'. हा शब्द ब्राह्मणांत तारूण्य या अर्थानें योजिला आहे.
प्रेत -- प्रेत म्हणजे गेलेला. याचा मृत मनुष्य असा अर्थ शतपथ ब्राह्मणांत आलेला आहे. परंतु पिशाच अर्थानें याचा उल्लेख केलेला आरण्यकांत आढळतो.
बाल -- म्हणजे मुलगा. याचा उपनिषदांत लहान मूल असा अर्थ आहे. नंतरच्या वाङमयात बालपण १६ वर्षांपर्यंत गणलें आहे.
स्थविर -- याचा शब्दार्थ वयानें मोठा असा आहे. अनेक माणसांनां विशेषण या अर्थीहि हा शब्द लाविला आहे. 'स्थविर शाकल्य' ह्याचा उल्लेख ऐतरेय आरण्यक व शांखायन आरण्यक ह्यामध्यें, व स्थविर जातूकर्ण्याचा उल्लेख कौषीतकी ब्राह्मणांमध्यें आलेला आहे.