प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.               

अभिचार

अभिचार (ॠग्वेद)

यातुधान- ॠग्वेदांत आणि इतरत्रहि हा शब्द येतो. ॠग्वेदोत्तर ग्रंथांत याचा मांत्रिक असा अर्थ आहे. यातुधानी हा स्त्रीवाचक शब्द ॠग्वेदांत आणि तदुत्तर वाङमयांत सापडतो.
विष- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांत ह्याचा नेहमीचा अर्थ तोडगा असा आहे. ह्या तोडग्याबद्दल अथर्ववेदामध्यें मंत्र दिलेले आहेत.
वलग- तैत्तिरीय संहिता, अथर्ववेद व त्यानंतर झालेलें ग्रंथ ह्यांमध्यें गुप्तमंत्र अशा अर्थानें हा शब्द येतो.
आंजन- अथर्ववेदांत हिमालयांतील त्रिककुभू शिखरावरून आणलेल्या या औषधाचा पुष्कळ वेळां उल्लेख आलेला आहे. त्याचा उपयोग अंजनाप्रमाणें करीत असत. कदाचित्  हें यमुना नदीच्या काठींहि होत असावें आणि हें अंजन कावीळ, यक्ष्मा, जायान्य आणि दुसरे रोग नाहींसे करित असे. पुरुषमेधांत जी बळींची यादी आहे तींत अंजन तयार करणा-या एका स्त्रीचा उल्लेख आहे.
जंगिड- जंगिड हा शब्द रोग बरा करणा-या एका वनस्पतीचें नांव या अर्थानें अथर्ववेदांतील सूक्तांमध्यें आलेला आहे. ह्याचा उपयोग अनेक (तक्मन्, बलास, असारीक, विसारीक, पृष्टयामय, संधिवात) रोगांवर व विल्कंद, सस्कंध, जंभ वगैरेवर तोडग्याप्रमाणें होत असे. इतकेंच नव्हें तर हा सर्व रोगांवर रामबाण उपाय म्हणून गणला जात असे व सर्व औषधांचा राजा अशी त्या वनस्पतीबद्दल ख्याती असे. कृषीच्या रसापासून ही वनस्पति होत असें म्हणतात, पण त्याचा अर्थ इतकाच कीं, लागवडीच्या जमिनीत ती उत्पन्न होत असे. तिची प्रत्यक्ष लागवड होत असें नव्हें. जंगिड शब्दानें कोणती वनस्पति ध्वनित होतें हें समजत नाहीं (सायणमतानें जंगिड हा मणि असून तो शेतांतील उगवणा-या वनस्पतीचा तयार केला जात असे.) कारण अथर्ववेदोत्तर ग्रंथांत हा शब्द येत नाही. कॅलेंडच्या मतें अर्जुनेय ह्या नांवाने कौशिकसूत्रांत हा शब्द आला आहे.
तस्तु व किंवा तस्त्रुव- अथर्ववेदाच्या पैप्पलाद संहितेंत हा शब्द सर्पविषावर असलेल्या तोडग्याचें नांव आहे व अथर्ववेदामध्यें ताबुव ह्याच्याबरोबर ह्याचा उल्लेख आलेला आहे.
ताबुव- अथर्ववेदामध्यें सर्पद वर असलेल्या तोडग्याचें हें नांव आहे. पैप्पलादशा व प्रतींत ताबुवाच्या ऐवजीं ताबुव हा शब्द आलेला आहे. वेबरच्या मतें ह्याचें मूळचें रूप ताथुब होतें व तें =उभे राहणें ह्यापासून आलेलें होतें व त्याचा अर्थ थांबणें असा असावा.पण हें असंभाव्य दिसतें.
त्रिवृत्- ह्याचा अर्थ तीन प्रकारचा असा असून अथर्ववेदामध्यें एका मंत्रसिद्ध ताईताचें किंवा तोडग्याचें हें नांव आहे.
दशवृक्ष- रॉथच्या मतानें हें एका झाडाचें नांव आहे व तें अथर्ववेदामध्यें आलेलें आहे. पण व्हिटने ह्या शब्दाला विशेषण समजून त्याचा अर्थ ‘दहा वृक्षांचा’ असा करतो.
१०प्रतिसर- अथर्ववेदांत हा शब्द पुष्कळ वचनांतून आलेला आढळतो. व तदनंतरच्या ग्रंथांतून रॉथच्या म्हणण्याप्रमाणें ताईत, तोडगा या अर्थाने उपयोगांत आलेला आहे. तें एक बंधनसाधन असून त्याच्या धात्वर्थावरून तें हलतें असावें. याचा अर्थ संशयात्मक आहे. कदाचित मूळ धात्वर्थ हल्ला करणें असाहि असावा. श्रौतककर्माच्या प्रयोगांत यज्ञदीक्षेच्या पूर्वी प्रतिसरबंध नामक एक कर्म केलें जातें व त्यांत एक दोरा मंत्रून दीक्षिताच्या हातांत बांधीत असतात.
११शंख- अथर्ववेदामध्यें कृशन्च्या विशेषणाबरोबर ह्याचा अर्थ ताईत किंवा तोडगा म्हणून उपयोगांत आणलेली मोत्याची शिंप असा आहे. अथर्ववेदात्तर ग्रंथांत ह्याचा वाजविण्याचा शंख असा अर्थ आलेला आहे.
१२स्रा क्त्य- अथर्ववेदामध्यें एका ताइताचें (मण्याचें) हें विशेषण आलेलें आहे. वेबरचे मतानें ह्याचा अर्थ स्फटिक (शब्दशः अर्थ बहुकोणाचा) असा आहे. टीकाकारांचे मतानें ह्याचा अर्थ तिलकवृक्षापासून झालेला असा आहे.
१३असुरविद्या- ‘असुरांचे शास्त्र’. शांखायन आणि आश्वलायन श्रौतसूत्रें म्हणतात कीं, शतपथ ब्राह्मणांत जो माया शब्द वापरला आहे तो आणि हा एकच आहे. आणि प्रोफेसर एगलिंगच्या मताप्रमाणे त्याचा स्पष्ट अर्थ “जादु” असा होतो.
१४भूतविद्या- हें एक शास्त्र आहे. याचा उल्लेख छांदोग्य उपनिषदांत एके ठिकाणीं आला आहे. हें बहुधा मनुष्यांस पीडा देणा-या “पिशाचांचे शास्त्र” असावें, व यांत त्याचे कसे निवारण करावे हें दिले असावें.
१५माया- हा शतपथ ब्राह्मणांत (१३.४,३,११) असुरविद्या (जादु) या अर्थाचा हा शब्द आहे.
१६यातुविद- अनेकवचनी ज्यांनां चेटकांची उत्तम माहिती आहे असे.शतपथ ब्राह्मणांत अथर्ववित या अर्थी यांचा उल्लेख आहे.
१७विषविद्या- आश्वलायन श्रौतसूत्रामध्यें इतर शास्त्रांबरोबर हिचा उल्लेख आलेला आहे.