प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.                

राजकीय

अधिकारी (ॠग्वेद)

गृहप अथवा गृहपति - ॠग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथांत घराच्या मालकाच हें सामान्य नाम आहे त्याचप्रमाणें घरांतील मालकिणीला गृहपत्नी असें हटल्याचा ॠग्वेद अथर्ववेदादि सर्व ग्रंथांतून उल्लेख आहे.
पूर्पति- हा शब्द ॠग्वेदांत फक्त एकदाच आला आहे. याचा अर्थ नगरराज, नगरशेट, नगराधिपति, किल्ल्याचा स्वामी असा असावा. कदाचित् ही एक ग्रामणी प्रमाणें कायमची जागाच असावी अथवा कायमची व्यापलेली वसाहत असावी. पूर्पति याचा अर्थ किल्ल्याचा रक्षणकर्ता किंवा स्वामी असाहि असणें संभवनीय आहे शत्रूंनीं वेढा दिला असतां हा अर्थ संभवतो. ज्या अर्थी हा शब्द फार क्वचित स्थलीं उपयोगांत आणिलेला आहे. त्या अर्थी ह्याचा दुसराच अर्थ असावा असें वाटतें.
मध्यमशी- हा शब्द ॠग्वेदाच्या एका ॠचेंत आला आहे व तेथें त्याचा अर्थ रॉथनें मध्यस्थ असा घेतला आहे. हा शब्द मध्यस्थ किंवा पंच या कायद्यातील अर्थानें उपयोगांत आणला असावा असें झिमर म्हणतो. लानमन असें सुचवितो कीं हा शब्द प्रतिस्पर्धी किंवा थांबविणारा या अर्थी असावा. व्हिटनेच्या मतें अर्थ अगदीं मधला मनुष्य किंवा पुढारी, मुख्य (म्हणजे ज्याच्या भोंवतीं त्याचे अनुयायी गोळा होतात तो) असा आहे. गेल्डनेरला मात्र याचा अर्थ परस्पर शत्रू अशा दोन राज्यांतील मध्यस्थ, ति-हाईत अथवा तटस्थ राजा असा वाटतो. सायणांनी ॠग्वेद भाष्यांत मध्यस्थानीं असलेला राजा असा अर्थ केला असून अथर्ववेदांतील याच मंत्रावरील भाष्यांत अंतरिक्षांतील वायु असा अर्थ केला आहे व वाजसनेयि संहितेतील याच मंत्रावरील भाष्यांत उवट व महीधर मध्यमशी शब्दाचा मर्मभागावर घाव घालणारा असा अर्थ करितात.
विश्पति- विश या शब्दाप्रमाणेंच विश्पति या शब्दाचाहि अर्थ अनिश्चित आहे. झिमरच्या मतें ज्याला इंग्रजींत म्हणतात त्या स्थलभागाचा मुख्य असा अर्थ आहे. परंतु हा अर्थ लागू पडेल असें ठिकाण एक सुध्दां नाहीं हें त्यालाहि कबूल आहे व त्यानें स्वमतपुष्टयर्थ ज्या लेखाचा हवाला (ऋ. १. ३७, ८) दिला आहे तो लेख त्याच्या मतास खास पुष्टिकारक नाहीं. बहुतेक ज्या ज्या ठिकाणीं हा शब्द आला आहे त्या त्या ठिकाणी या शब्दाचा अर्थ गृहपति म्हणजे घराचा यजमान, सर्व गृहपतीमध्यें श्रेष्ठ असा अग्निदेव व सभेंतील किंवा लोकांच्या समितिगृहांतील अग्नि असा आहे. हा अर्थ ॠग्वेदांतील ५.५५, ५ या ठिकाणी चांगला जुळतो.कारण तेथें एका कुमारिकेच्या प्रियकराला तिच्या आईबापांनां व विश्पतीला निद्रावश करून त्या कुमारिकाच्या जवळ जावयाचें होतें. याठिकाणीं घरांतील सर्व मंडळीं म्हणजे अविभक्त कुटुंबच मानिलें पाहिजे व तसें मानिले म्हणजे विश्पति हा मुलीच्या बापाहून निराळा म्हणजे मुलीचा आजा किंवा चुलता असें मानतां येईल. दुस-या एका लेखांत (३.१३,१५) विश्पति म्हणजे विशां (परवश प्रजेचा) पति (राजा) असा अर्थ लागू पडतो. झिमर म्हणतो कीं या ठिकाणीं राजाच्या निवडणुकीचा उल्लेख आह. तैत्तिरीय संहितेतील (२.३,१,३) विश्पति शब्दाचा विशांपति (प्रजेचा स्वामी) असाच अर्थ घ्यावा लागतो.
सेनानी- सैन्याचा पुढारी. ही पदवी राजाच्या सेनापतीला दिलेली होती. हा शब्द ॠग्वेदांत आलेला असून त्याचा उपयोग लक्षणेनें केलेला आहे. त्याचा निर्देश यजुर्वेद संहितेंतील शतरुद्रीय प्रकरण व ब्राह्मणग्रंथ यांमध्येहि आलेला आहे. तो राजाच्या (रत्निन्) रत्नांपैकी एक आहे. क्षुल्लक लढाईचे प्रसंगी स्वतः राजास जाण्याचा प्रसंग येत नसे. अशा वेळीं तो सेनापतीला स्वतः नेमीत असे. ऐतरेय ब्राह्मणांत सेनापति या पदवीचा उल्लेख आला आहे.
अधिराज्- हा शब्द प्राचीन वाङ्मयांत राजांचा राजा ह्या अर्थी योजिलेला आढळतो. राजन् हा शब्द राजा, राजपुत्र किंवा राजवंशीय ह्या अर्थी योजिला जातो. पण कोणत्याहि उता-यावरून राजराजा असा स्पष्ट अर्थ होत नाहीं. सर्व बाजूंनीं विचार करतां त्या शब्दाचा अर्थ राजपुत्र नसून राजा असाच करावा लागतो.
उपस्ति- ॠग्वेदांत आणि अथर्ववेदांत ह्याचा अर्थ ‘आश्रित’ असा केला आहे. तदनंतर महाभारतांतहि दुस-या दोन उच्च वर्णावरील वैश्यांची आश्रितावस्था दर्शविणारा शब्द ‘उपस्था’ म्हणजे ‘आश्रित’ असा योजला आहे. ॠग्वेदांत एकेठिकाणीं (७.१९,११) स्ति हाच शब्द उपस्ति ह्या अर्थी योजिला आहे. कोणच्या प्रकारचें आश्रितत्व ह्या शब्दानें दर्शविलें जातें ते नक्की सांगतां येत नाहीं. झिमर असा तर्क करितो कीं, ग्रीक, रोमन आणि जर्मन ह्यांमध्यें जुव्यामुळें जे लोक आपली स्वतंत्रता गमावित तसे लोक असा याचा अर्थ होतो. यावरून हे आश्रित म्हणजे जित आर्य जातींतील असून ते पुढें राजाची कुळें झाले असावे. अथर्ववेदांतील (३.५,६) उल्लेखावरून असें वाटतें कीं, ह्या शब्दामध्यें रथकार, तक्षन्, सूत आणि ग्रामणी ह्यांच्याहि समावेश होत असावा. परंतु ॠग्वेदांतील उता-यावरून  असा ध्वनि नितो कीं, ‘स्ति’ याचा प्रजा अथवा सर्व राष्ट्र असा अर्थ नसावा. यावरून आश्रित म्हणजे सर्व साधारण प्रजा नसून राजाचे प्रत्यक्ष आश्रयाखालील लोक असावे. झिमरच्या वरील सूचनेप्रमाणें त्या शब्दांत विशिष्ट जातींचाच फक्त समावेश होतो असें नाहीं, तर उच्च जातींचाहि समावेश होत असावा. उदाहरणार्थ दुस-या राष्ट्रांतील परित्यक्त लोक किंवा काही एकांडे महत्त्वाकांक्षी लोक. खरोखर सूत आणि ग्रामणी हे राजगृहांतील अधिकारी असत. अथर्ववेदांत (३.५,७) वर्णन केल्याप्रमाणें जरी स्वतः राजे नव्हते तरी ते राज्यपद देण्याचें सामर्थ्य असलेले पुरुष असत. तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण आणि काठक संहिता व ॠग्वेदांतील एका उता-यांतहि ह्याचा केवळ लाक्षणिकरीत्या उपयोग केला आहे. अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेच्या ग्रंथांत (३,५,७) वैश्य शूद्र आणि आर्य ह्यांनां उपस्ति असें म्हटलें आहें. तेथें हा शब्द बहुतेककरून ‘प्रजा’ ह्या अर्थी योजिला असावा.
क्षतृ- ॠग्वेद, तदुत्तरसंहिता आणि ब्राह्मण ग्रंथ ह्यांत हा शब्द आला असून त्याचा अर्थ राजपरिवारांतील एक मनुष्य असा आहे. परंतु हा अर्थ थोडा संशयास्पद आहे. ॠग्वेदांत आपल्या भक्तांनां चांगल्या वस्तू वाटणारा, (देणारा) ईश्वर असा अर्थ केला आहे आणि हाच अर्थ अथर्ववेदांत आणि इतरत्र सांपडतो. वाजसनेयि संहितेंत एका ठिकाणीं महीधराच्या टीकेवरून ‘द्वारपाल’ असा अर्थ निघतो, आणि हा अर्थ दुस-या      उता-यावरून शक्य वाटतो. परंतु शतपथ ब्राह्मणांतील एका उता-यावरून सायण त्याचा अर्थ अन्तःपुराध्यक्ष असा करितो. दुस-या कांही ठिकाणीं सूत हा अर्थ संभवतो. पुढे क्षतृ म्हणजे मिश्रजातिसंभव मनुष्य असा अर्थ होऊं लागला.
क्षोणि- अनेक वचनी उपयोग केला असतां, सेंटपीटर्सबर्ग कोश आणि लुडविगच्या मतें ॠद्वेदांत पुष्कळं ठिकाणी ह्याचा अर्थ राजांचे स्वतंत्र अनुयायी असा आहे. पहिल्यानें, अनेक स्त्रिया करण्याची मोकळीक असल्यामुळें गेल्डनेरला वाटलें की राजाच्या स्त्रिया असा याचा अर्थ आहे. परंतु नंतर विशिष्ट दैवी स्त्रिया असें त्यानें आपले मत दिलें आहे.
१०निधि- ॠग्वेदांत आलेल्या ह्या शब्दाचा मूळचा अर्थ ठेवण्याची जागा व नंतर सामान्यतः खजिना असा अर्थ झाला. छांदोग्य उपनिषदामध्यें निधि ह्याचा अर्थ एक प्रकारचें शस्त्र असा आहे.
११रम्भ- ॠग्वेदाच्या एका (८.४५,२०) सूक्तांत काठी किंवा काठीसारखाच आधार या अर्थानें हा शब्द आला आहे. दुस-या ठिकाणीं एका मनुष्याला रम्भिन्  असें म्हटलें आहे व त्याचा वृद्धावस्थेत आधारसाठीं हातांत काठी घेणारा असा अर्थ असावा. सायणानीं तेथें त्याचा द्वारपाल असा अर्थ केला आहे. पुढील संस्कृत वाङ्मयांत दण्डिन् याचा असाच अर्थ आहे.
१२राजन् - ॠग्वेदांत आणि तदुत्तर वाङ्मयांत हा शब्द नेहमीं आढळतो. प्राचीन कालीं हिंदुस्थानांत साधारणरीत्या राजशासनपद्धति म्हणजे एकसत्ताक राज्यपद्धतीच अस्तित्वांत होती आणि याचे कारण आर्य लोक हे प्रतिपक्षीय आणि परराष्ट्रांतून हिंदुस्थानांत आलेले होते. व ग्रीसला पादांक्रांत करणा-या आर्य लोकांप्रमाणें किंवा इंग्लंडला पादाक्रांत करणा-या जर्मन लोकांप्रमाणें या लोकंच्या स्वा-यांचा परिणाम एकसत्ताक राज्यपद्धति दृढ करण्यांत झाला. वेदकालीन एकसत्ताक राज्यपद्धतीचा खुलासा करण्यास झिमरनें स्वीकारल्याप्रमाणें मूलपुरुषानुबद्ध कुटुंबव्यवस्था पुरेशी नाहीं.

एकसत्ताक राज्यपद्धतीची मुदत - वेदकालीं राजा हा वंशपरंपरागत असे असें झिमरचें मत आहे. आणि ही गोष्ट वैध्यश्च, दिवोदास, सुदास, पिजवन, पुरुकुत्स, त्रसदस्यु इत्यादि व्यक्तींच्या हकीकतीवरून सिद्ध होते. कित्येक प्रसंगी राजाची निवड करणारे लोक राजाच्या कुटुंबातीलच असत कीं सरकारापैकी असत हें निश्चयानें सांगतां येत नाहीं आणि हेहि कबूल पाहिजे कीं, निवडणुकीच्या राज्यपद्धतींबद्दल खात्रीलायक असा पुरावाहि नाहीं. झिमरनें असें ध्वनित केलें आहे कीं, या गोष्टीच्या पुष्टयर्थ जे उतारे दिले आहेत तें सर्व प्रजेनें केलेली निवड म्हणून मानितां येत नाहींत. परंतु प्रजेनें मान्यता दर्शविण्याच्या पद्धतीला पुष्टि देतात आणि हाच अर्थ जास्त संभवतो. परंतु या उता-यावरून राजा कधीहि निवडला जात नसे असें मात्र म्हणता येणार नाहीं. राजघराण्यांतील राज्यपदारूढ होण्यायोग्य अशा व्यक्तीला बाजूस सारून दुसरीच व्यक्ति राज्यपदारूढ होण्याची चाल प्रचलित होती हें यास्कानीं निरुक्तामध्यें (२.१०) दिलेल्या कुरुकुलोतपन्न देवापि आणि शन्तनु याच्या गोष्टीवरून सिद्ध होतें. राजाची सत्ता अत्यंत असुरक्षित होती ही गोष्ट स्पष्ट आहे. राजांनां राज्यातून हाकून दिल्याविषयीं व राजांनीं आपली सत्ता पुन्हा परत मिळण्याविषयीं खटपट केल्याबद्दल अनेक (अथर्व ३.३४; काठक संहिता २८, १; तैत्तिरीय सं. २.३,१; मैत्रायणी सं. २,२,१; पंचविंश ब्राह्मण १२, १२, ६; शतपथ ब्राह्मण २२.९, ३३; इत्यादि) उल्लेख आहेत. अथर्ववेदांत राजाच्या हितासंबंधी अनेक मंत्र आहेत.

राजाचें लढाईतील कर्तव्य- ॠग्वेदकालानंतर साहजिकपणें वैदिक वाङ्मयांत राजाच्या साहसी कृत्यांचा फारसा उल्लेख नाहीं. तैत्तिरीय ब्राह्मणांत कुरुपंचाल राजे दिसण्यांत ब्राह्मणासारखे दिसत व ते हिवाळयांत लढाईला निघत (१.८,४,१) असा उल्लेख आहे असे मॅकडोनेल म्हणतो. हे ब्राह्मणासारखे दिसत असा उल्लेख नाहीं. पण उदाज निदाज या शब्दांच्या अर्थावरून असें दिसतें. राजेलोक लढाईतील लुटीपैकी भाग स्वतः घेत असत. वैदिक कालांतील लढायांची माहिती ॠग्वेदांत अनेक स्थलीं आली आहे या विभागांतच दाशराज्ञयुद्ध प्रकरणांत ही हकीकत विस्तृत आहे.ज्याप्रमाणें ब्राह्मण आपल्या यज्ञयागादि कर्मात दक्ष असत त्याप्रमाणें क्षत्रियहि लढाईच्या कामांत दक्ष असत लढाईशिवाय देशाचें रक्षण करणें हेंहि राजाचें एक कर्तव्यच असे. त्याला जनतेचें रक्षण करणारा गोपाजनस्य किंवा राजसूय प्रसंगी म्हटल्याप्रमाणें ब्राह्मणांचें रक्षण करणारा असें म्हटलें आहे. राजाला लढाईत जय मिळावा म्हणून त्याचा पुरोहित मंत्र म्हणत असे व तो स्वतः लढाई करी. कौषीतकी उपनिषदांत प्रतर्दन नामक राजा लढाईत मारला गेल्याबद्दलचा उल्लेख आला आहे. राजसूयामध्यें राजाला शहरें उध्वस्त करणारा पुरीभेत्ता असें म्हटलें आहे.

शांततेच्या काळांतील राजा- लढाईच्या कामीं लोकानां आपल्या राजाची आज्ञ पाळावी लागे व ते ती पाळीत असत. राजत्वाचें रक्षण त्यांनां करावें लागे. लोकांचें भक्षण करणारा म्हणून राजाचा निर्देश (ॠ. १. ६५,४ अथर्व ४.२२,७) करीत, परंतु तो लोकांचा छल करीत असे या अर्थानें नव्हे तर लोकांच्या देणगीमुळें त्याचा व त्याच्या नोकरांचा खर्च चालत असे म्हणून होय. अशाच प्रकारची उदाहरणें दुसरीकडेहि सांपडतात. राजे आपले हक्क क्षत्रियांनां देत व अशा प्रकारें सरदारांचा वर्ग अस्तित्त्वात आला. साधारणतः क्षत्रियांना किंवा ब्राह्मणांना कर द्यावा लागत नसे.ब्राह्मणांना कर द्यावा लागत नसें असा शतपथ ब्राह्मणांत (१३.६,२,१८;) उल्लेख आहे. राजाचें बल लोकांमध्येच साठविलेलें असें. राजा हा न्यायाधीशाचीं कामेंहि पाहत असे. तो स्वतः कोणत्याहि शिक्षेपासून मुक्त (अदण्डय)असे. तो राजदंड धारण करीत असे असा उल्लेख आहे. फक्त फौजदारी गुन्ह्याचाच राजा निवाडा करीत असे. कारण अशा त-हेचे उल्लेख (गौतम धर्म सूत्र १२.४३:) सापडतात. राजाचे अधिकार केव्हा केव्हा त्याचे अधिकारी बजावीत किंवा एखादा प्रतिनिधि नेमीत असत. काठक संहितेंत (२७.४,) शुद्राला शिक्षा करण्यासाठीं राजन्याला अध्यक्ष म्हणून संबोधिले आहे. मुलकी न्यायाच्या बाबतींत राजाचे अधिकार बरेच संकुचित असत. आणि या बाबतींत राजा ही न्याय मिळण्याची शेवटची जागा म्हणून मनींत परंतु याबद्दल सबळ पुरावा नाहीं. ॠग्वेदांतील मध्यमशीं हा राजानें नेमिलेला न्यायाधीश नसून खाजगी न्यायाधीश किंवा पंच असावा. फौजदारी न्यायाच्या बाबतीत वरूणाच्या हेरांचा ब-याच वेळां उल्लेख आला आहे यावरून वैदिककालीं फौजदारी न्यायखात्यासंबंधी बराच विस्तार झाला होता असें दिसतें. बहुधा अशा प्रकारच्या हेरांचा लढाईच्या वेळींहि उपयोग केला जात असे (ॠ८.४७,११;) वेदकलीन वाङ्मयांत राजा कायदे करीत असे असा उल्लेख आढळत नाहीं परंतु पुढील वाङ्मयांत मात्र कायदे करणें हें त्याच्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्यें होतें असें दिसून येतें. प्रत्यक्ष राजाकडे कोणकोणती कामें असत हें नक्की सांगतां येत नाहीं. प्रत्येक कार्यामध्यें राजाला बहुतेक आपल्या पुरोहिताचा सल्ला घ्यावा लागत असे. राजाच्या दर्जाचीं बाहेरील चिन्हें म्हणजे त्याचा राजवाडा आणि मौल्यवान पौषाख हीं होत. जमीनीसंबंधानें राजाचे अधिकार काय होते हें सांगतां येत नाहीं. यासंबंधीं ग्रीकांचें उल्लेख विशेष स्पष्ट नाहींत. कित्येक वेळां ते म्हणतात राजाला प्रजेकडून कर मिळत असे व कित्येकवेळां  म्हणतात कीं, राजाच फक्त जमिनीचा मालक असे. हॉपकिन्सचें असें मत आहे की, प्रजेला स्वरंक्षणाकरिता राजाला कर द्यावा लागत असे आणि केवळ बाह्यतः राजा जमिनीचा मालक असून खरी मालकी कुटुंबाच्या मुख्याकडेच असे. बेडन पॉवेलचें असें मत आहे कीं, राजा हा जमिनीचा मालक ही कल्पना नंतरची आहे. परंतु हापकिन्स म्हणतो कीं, वेदकली राजा हा लोकांचा भक्षक म्हणून उल्लेख आहे आणि ऐतरेय ब्राह्मणांत (८.१२)