प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
राजकीय
अधिकारी (ॠग्वेद) |
१गृहप अथवा गृहपति - ॠग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथांत घराच्या मालकाच हें सामान्य नाम आहे त्याचप्रमाणें घरांतील मालकिणीला गृहपत्नी असें हटल्याचा ॠग्वेद अथर्ववेदादि सर्व ग्रंथांतून उल्लेख आहे.
२ पूर्पति- हा शब्द ॠग्वेदांत फक्त एकदाच आला आहे. याचा अर्थ नगरराज, नगरशेट, नगराधिपति, किल्ल्याचा स्वामी असा असावा. कदाचित् ही एक ग्रामणी प्रमाणें कायमची जागाच असावी अथवा कायमची व्यापलेली वसाहत असावी. पूर्पति याचा अर्थ किल्ल्याचा रक्षणकर्ता किंवा स्वामी असाहि असणें संभवनीय आहे शत्रूंनीं वेढा दिला असतां हा अर्थ संभवतो. ज्या अर्थी हा शब्द फार क्वचित स्थलीं उपयोगांत आणिलेला आहे. त्या अर्थी ह्याचा दुसराच अर्थ असावा असें वाटतें.
३मध्यमशी- हा शब्द ॠग्वेदाच्या एका ॠचेंत आला आहे व तेथें त्याचा अर्थ रॉथनें मध्यस्थ असा घेतला आहे. हा शब्द मध्यस्थ किंवा पंच या कायद्यातील अर्थानें उपयोगांत आणला असावा असें झिमर म्हणतो. लानमन असें सुचवितो कीं हा शब्द प्रतिस्पर्धी किंवा थांबविणारा या अर्थी असावा. व्हिटनेच्या मतें अर्थ अगदीं मधला मनुष्य किंवा पुढारी, मुख्य (म्हणजे ज्याच्या भोंवतीं त्याचे अनुयायी गोळा होतात तो) असा आहे. गेल्डनेरला मात्र याचा अर्थ परस्पर शत्रू अशा दोन राज्यांतील मध्यस्थ, ति-हाईत अथवा तटस्थ राजा असा वाटतो. सायणांनी ॠग्वेद भाष्यांत मध्यस्थानीं असलेला राजा असा अर्थ केला असून अथर्ववेदांतील याच मंत्रावरील भाष्यांत अंतरिक्षांतील वायु असा अर्थ केला आहे व वाजसनेयि संहितेतील याच मंत्रावरील भाष्यांत उवट व महीधर मध्यमशी शब्दाचा मर्मभागावर घाव घालणारा असा अर्थ करितात.
४विश्पति- विश या शब्दाप्रमाणेंच विश्पति या शब्दाचाहि अर्थ अनिश्चित आहे. झिमरच्या मतें ज्याला इंग्रजींत म्हणतात त्या स्थलभागाचा मुख्य असा अर्थ आहे. परंतु हा अर्थ लागू पडेल असें ठिकाण एक सुध्दां नाहीं हें त्यालाहि कबूल आहे व त्यानें स्वमतपुष्टयर्थ ज्या लेखाचा हवाला (ऋ. १. ३७, ८) दिला आहे तो लेख त्याच्या मतास खास पुष्टिकारक नाहीं. बहुतेक ज्या ज्या ठिकाणीं हा शब्द आला आहे त्या त्या ठिकाणी या शब्दाचा अर्थ गृहपति म्हणजे घराचा यजमान, सर्व गृहपतीमध्यें श्रेष्ठ असा अग्निदेव व सभेंतील किंवा लोकांच्या समितिगृहांतील अग्नि असा आहे. हा अर्थ ॠग्वेदांतील ५.५५, ५ या ठिकाणी चांगला जुळतो.कारण तेथें एका कुमारिकेच्या प्रियकराला तिच्या आईबापांनां व विश्पतीला निद्रावश करून त्या कुमारिकाच्या जवळ जावयाचें होतें. याठिकाणीं घरांतील सर्व मंडळीं म्हणजे अविभक्त कुटुंबच मानिलें पाहिजे व तसें मानिले म्हणजे विश्पति हा मुलीच्या बापाहून निराळा म्हणजे मुलीचा आजा किंवा चुलता असें मानतां येईल. दुस-या एका लेखांत (३.१३,१५) विश्पति म्हणजे विशां (परवश प्रजेचा) पति (राजा) असा अर्थ लागू पडतो. झिमर म्हणतो कीं या ठिकाणीं राजाच्या निवडणुकीचा उल्लेख आह. तैत्तिरीय संहितेतील (२.३,१,३) विश्पति शब्दाचा विशांपति (प्रजेचा स्वामी) असाच अर्थ घ्यावा लागतो.
५सेनानी- सैन्याचा पुढारी. ही पदवी राजाच्या सेनापतीला दिलेली होती. हा शब्द ॠग्वेदांत आलेला असून त्याचा उपयोग लक्षणेनें केलेला आहे. त्याचा निर्देश यजुर्वेद संहितेंतील शतरुद्रीय प्रकरण व ब्राह्मणग्रंथ यांमध्येहि आलेला आहे. तो राजाच्या (रत्निन्) रत्नांपैकी एक आहे. क्षुल्लक लढाईचे प्रसंगी स्वतः राजास जाण्याचा प्रसंग येत नसे. अशा वेळीं तो सेनापतीला स्वतः नेमीत असे. ऐतरेय ब्राह्मणांत सेनापति या पदवीचा उल्लेख आला आहे.
६अधिराज्- हा शब्द प्राचीन वाङ्मयांत राजांचा राजा ह्या अर्थी योजिलेला आढळतो. राजन् हा शब्द राजा, राजपुत्र किंवा राजवंशीय ह्या अर्थी योजिला जातो. पण कोणत्याहि उता-यावरून राजराजा असा स्पष्ट अर्थ होत नाहीं. सर्व बाजूंनीं विचार करतां त्या शब्दाचा अर्थ राजपुत्र नसून राजा असाच करावा लागतो.
७उपस्ति- ॠग्वेदांत आणि अथर्ववेदांत ह्याचा अर्थ ‘आश्रित’ असा केला आहे. तदनंतर महाभारतांतहि दुस-या दोन उच्च वर्णावरील वैश्यांची आश्रितावस्था दर्शविणारा शब्द ‘उपस्था’ म्हणजे ‘आश्रित’ असा योजला आहे. ॠग्वेदांत एकेठिकाणीं (७.१९,११) स्ति हाच शब्द उपस्ति ह्या अर्थी योजिला आहे. कोणच्या प्रकारचें आश्रितत्व ह्या शब्दानें दर्शविलें जातें ते नक्की सांगतां येत नाहीं. झिमर असा तर्क करितो कीं, ग्रीक, रोमन आणि जर्मन ह्यांमध्यें जुव्यामुळें जे लोक आपली स्वतंत्रता गमावित तसे लोक असा याचा अर्थ होतो. यावरून हे आश्रित म्हणजे जित आर्य जातींतील असून ते पुढें राजाची कुळें झाले असावे. अथर्ववेदांतील (३.५,६) उल्लेखावरून असें वाटतें कीं, ह्या शब्दामध्यें रथकार, तक्षन्, सूत आणि ग्रामणी ह्यांच्याहि समावेश होत असावा. परंतु ॠग्वेदांतील उता-यावरून असा ध्वनि नितो कीं, ‘स्ति’ याचा प्रजा अथवा सर्व राष्ट्र असा अर्थ नसावा. यावरून आश्रित म्हणजे सर्व साधारण प्रजा नसून राजाचे प्रत्यक्ष आश्रयाखालील लोक असावे. झिमरच्या वरील सूचनेप्रमाणें त्या शब्दांत विशिष्ट जातींचाच फक्त समावेश होतो असें नाहीं, तर उच्च जातींचाहि समावेश होत असावा. उदाहरणार्थ दुस-या राष्ट्रांतील परित्यक्त लोक किंवा काही एकांडे महत्त्वाकांक्षी लोक. खरोखर सूत आणि ग्रामणी हे राजगृहांतील अधिकारी असत. अथर्ववेदांत (३.५,७) वर्णन केल्याप्रमाणें जरी स्वतः राजे नव्हते तरी ते राज्यपद देण्याचें सामर्थ्य असलेले पुरुष असत. तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण आणि काठक संहिता व ॠग्वेदांतील एका उता-यांतहि ह्याचा केवळ लाक्षणिकरीत्या उपयोग केला आहे. अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेच्या ग्रंथांत (३,५,७) वैश्य शूद्र आणि आर्य ह्यांनां उपस्ति असें म्हटलें आहें. तेथें हा शब्द बहुतेककरून ‘प्रजा’ ह्या अर्थी योजिला असावा.
८क्षतृ- ॠग्वेद, तदुत्तरसंहिता आणि ब्राह्मण ग्रंथ ह्यांत हा शब्द आला असून त्याचा अर्थ राजपरिवारांतील एक मनुष्य असा आहे. परंतु हा अर्थ थोडा संशयास्पद आहे. ॠग्वेदांत आपल्या भक्तांनां चांगल्या वस्तू वाटणारा, (देणारा) ईश्वर असा अर्थ केला आहे आणि हाच अर्थ अथर्ववेदांत आणि इतरत्र सांपडतो. वाजसनेयि संहितेंत एका ठिकाणीं महीधराच्या टीकेवरून ‘द्वारपाल’ असा अर्थ निघतो, आणि हा अर्थ दुस-या उता-यावरून शक्य वाटतो. परंतु शतपथ ब्राह्मणांतील एका उता-यावरून सायण त्याचा अर्थ अन्तःपुराध्यक्ष असा करितो. दुस-या कांही ठिकाणीं सूत हा अर्थ संभवतो. पुढे क्षतृ म्हणजे मिश्रजातिसंभव मनुष्य असा अर्थ होऊं लागला.
९क्षोणि- अनेक वचनी उपयोग केला असतां, सेंटपीटर्सबर्ग कोश आणि लुडविगच्या मतें ॠद्वेदांत पुष्कळं ठिकाणी ह्याचा अर्थ राजांचे स्वतंत्र अनुयायी असा आहे. पहिल्यानें, अनेक स्त्रिया करण्याची मोकळीक असल्यामुळें गेल्डनेरला वाटलें की राजाच्या स्त्रिया असा याचा अर्थ आहे. परंतु नंतर विशिष्ट दैवी स्त्रिया असें त्यानें आपले मत दिलें आहे.
१०निधि- ॠग्वेदांत आलेल्या ह्या शब्दाचा मूळचा अर्थ ठेवण्याची जागा व नंतर सामान्यतः खजिना असा अर्थ झाला. छांदोग्य उपनिषदामध्यें निधि ह्याचा अर्थ एक प्रकारचें शस्त्र असा आहे.
११रम्भ- ॠग्वेदाच्या एका (८.४५,२०) सूक्तांत काठी किंवा काठीसारखाच आधार या अर्थानें हा शब्द आला आहे. दुस-या ठिकाणीं एका मनुष्याला रम्भिन् असें म्हटलें आहे व त्याचा वृद्धावस्थेत आधारसाठीं हातांत काठी घेणारा असा अर्थ असावा. सायणानीं तेथें त्याचा द्वारपाल असा अर्थ केला आहे. पुढील संस्कृत वाङ्मयांत दण्डिन् याचा असाच अर्थ आहे.
१२राजन् - ॠग्वेदांत आणि तदुत्तर वाङ्मयांत हा शब्द नेहमीं आढळतो. प्राचीन कालीं हिंदुस्थानांत साधारणरीत्या राजशासनपद्धति म्हणजे एकसत्ताक राज्यपद्धतीच अस्तित्वांत होती आणि याचे कारण आर्य लोक हे प्रतिपक्षीय आणि परराष्ट्रांतून हिंदुस्थानांत आलेले होते. व ग्रीसला पादांक्रांत करणा-या आर्य लोकांप्रमाणें किंवा इंग्लंडला पादाक्रांत करणा-या जर्मन लोकांप्रमाणें या लोकंच्या स्वा-यांचा परिणाम एकसत्ताक राज्यपद्धति दृढ करण्यांत झाला. वेदकालीन एकसत्ताक राज्यपद्धतीचा खुलासा करण्यास झिमरनें स्वीकारल्याप्रमाणें मूलपुरुषानुबद्ध कुटुंबव्यवस्था पुरेशी नाहीं.
एकसत्ताक राज्यपद्धतीची मुदत - वेदकालीं राजा हा वंशपरंपरागत असे असें झिमरचें मत आहे. आणि ही गोष्ट वैध्यश्च, दिवोदास, सुदास, पिजवन, पुरुकुत्स, त्रसदस्यु इत्यादि व्यक्तींच्या हकीकतीवरून सिद्ध होते. कित्येक प्रसंगी राजाची निवड करणारे लोक राजाच्या कुटुंबातीलच असत कीं सरकारापैकी असत हें निश्चयानें सांगतां येत नाहीं आणि हेहि कबूल पाहिजे कीं, निवडणुकीच्या राज्यपद्धतींबद्दल खात्रीलायक असा पुरावाहि नाहीं. झिमरनें असें ध्वनित केलें आहे कीं, या गोष्टीच्या पुष्टयर्थ जे उतारे दिले आहेत तें सर्व प्रजेनें केलेली निवड म्हणून मानितां येत नाहींत. परंतु प्रजेनें मान्यता दर्शविण्याच्या पद्धतीला पुष्टि देतात आणि हाच अर्थ जास्त संभवतो. परंतु या उता-यावरून राजा कधीहि निवडला जात नसे असें मात्र म्हणता येणार नाहीं. राजघराण्यांतील राज्यपदारूढ होण्यायोग्य अशा व्यक्तीला बाजूस सारून दुसरीच व्यक्ति राज्यपदारूढ होण्याची चाल प्रचलित होती हें यास्कानीं निरुक्तामध्यें (२.१०) दिलेल्या कुरुकुलोतपन्न देवापि आणि शन्तनु याच्या गोष्टीवरून सिद्ध होतें. राजाची सत्ता अत्यंत असुरक्षित होती ही गोष्ट स्पष्ट आहे. राजांनां राज्यातून हाकून दिल्याविषयीं व राजांनीं आपली सत्ता पुन्हा परत मिळण्याविषयीं खटपट केल्याबद्दल अनेक (अथर्व ३.३४; काठक संहिता २८, १; तैत्तिरीय सं. २.३,१; मैत्रायणी सं. २,२,१; पंचविंश ब्राह्मण १२, १२, ६; शतपथ ब्राह्मण २२.९, ३३; इत्यादि) उल्लेख आहेत. अथर्ववेदांत राजाच्या हितासंबंधी अनेक मंत्र आहेत.
राजाचें लढाईतील कर्तव्य- ॠग्वेदकालानंतर साहजिकपणें वैदिक वाङ्मयांत राजाच्या साहसी कृत्यांचा फारसा उल्लेख नाहीं. तैत्तिरीय ब्राह्मणांत कुरुपंचाल राजे दिसण्यांत ब्राह्मणासारखे दिसत व ते हिवाळयांत लढाईला निघत (१.८,४,१) असा उल्लेख आहे असे मॅकडोनेल म्हणतो. हे ब्राह्मणासारखे दिसत असा उल्लेख नाहीं. पण उदाज निदाज या शब्दांच्या अर्थावरून असें दिसतें. राजेलोक लढाईतील लुटीपैकी भाग स्वतः घेत असत. वैदिक कालांतील लढायांची माहिती ॠग्वेदांत अनेक स्थलीं आली आहे या विभागांतच दाशराज्ञयुद्ध प्रकरणांत ही हकीकत विस्तृत आहे.ज्याप्रमाणें ब्राह्मण आपल्या यज्ञयागादि कर्मात दक्ष असत त्याप्रमाणें क्षत्रियहि लढाईच्या कामांत दक्ष असत लढाईशिवाय देशाचें रक्षण करणें हेंहि राजाचें एक कर्तव्यच असे. त्याला जनतेचें रक्षण करणारा गोपाजनस्य किंवा राजसूय प्रसंगी म्हटल्याप्रमाणें ब्राह्मणांचें रक्षण करणारा असें म्हटलें आहे. राजाला लढाईत जय मिळावा म्हणून त्याचा पुरोहित मंत्र म्हणत असे व तो स्वतः लढाई करी. कौषीतकी उपनिषदांत प्रतर्दन नामक राजा लढाईत मारला गेल्याबद्दलचा उल्लेख आला आहे. राजसूयामध्यें राजाला शहरें उध्वस्त करणारा पुरीभेत्ता असें म्हटलें आहे.
शांततेच्या काळांतील राजा- लढाईच्या कामीं लोकानां आपल्या राजाची आज्ञ पाळावी लागे व ते ती पाळीत असत. राजत्वाचें रक्षण त्यांनां करावें लागे. लोकांचें भक्षण करणारा म्हणून राजाचा निर्देश (ॠ. १. ६५,४ अथर्व ४.२२,७) करीत, परंतु तो लोकांचा छल करीत असे या अर्थानें नव्हे तर लोकांच्या देणगीमुळें त्याचा व त्याच्या नोकरांचा खर्च चालत असे म्हणून होय. अशाच प्रकारची उदाहरणें दुसरीकडेहि सांपडतात. राजे आपले हक्क क्षत्रियांनां देत व अशा प्रकारें सरदारांचा वर्ग अस्तित्त्वात आला. साधारणतः क्षत्रियांना किंवा ब्राह्मणांना कर द्यावा लागत नसे.ब्राह्मणांना कर द्यावा लागत नसें असा शतपथ ब्राह्मणांत (१३.६,२,१८;) उल्लेख आहे. राजाचें बल लोकांमध्येच साठविलेलें असें. राजा हा न्यायाधीशाचीं कामेंहि पाहत असे. तो स्वतः कोणत्याहि शिक्षेपासून मुक्त (अदण्डय)असे. तो राजदंड धारण करीत असे असा उल्लेख आहे. फक्त फौजदारी गुन्ह्याचाच राजा निवाडा करीत असे. कारण अशा त-हेचे उल्लेख (गौतम धर्म सूत्र १२.४३:) सापडतात. राजाचे अधिकार केव्हा केव्हा त्याचे अधिकारी बजावीत किंवा एखादा प्रतिनिधि नेमीत असत. काठक संहितेंत (२७.४,) शुद्राला शिक्षा करण्यासाठीं राजन्याला अध्यक्ष म्हणून संबोधिले आहे. मुलकी न्यायाच्या बाबतींत राजाचे अधिकार बरेच संकुचित असत. आणि या बाबतींत राजा ही न्याय मिळण्याची शेवटची जागा म्हणून मनींत परंतु याबद्दल सबळ पुरावा नाहीं. ॠग्वेदांतील मध्यमशीं हा राजानें नेमिलेला न्यायाधीश नसून खाजगी न्यायाधीश किंवा पंच असावा. फौजदारी न्यायाच्या बाबतीत वरूणाच्या हेरांचा ब-याच वेळां उल्लेख आला आहे यावरून वैदिककालीं फौजदारी न्यायखात्यासंबंधी बराच विस्तार झाला होता असें दिसतें. बहुधा अशा प्रकारच्या हेरांचा लढाईच्या वेळींहि उपयोग केला जात असे (ॠ८.४७,११;) वेदकलीन वाङ्मयांत राजा कायदे करीत असे असा उल्लेख आढळत नाहीं परंतु पुढील वाङ्मयांत मात्र कायदे करणें हें त्याच्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्यें होतें असें दिसून येतें. प्रत्यक्ष राजाकडे कोणकोणती कामें असत हें नक्की सांगतां येत नाहीं. प्रत्येक कार्यामध्यें राजाला बहुतेक आपल्या पुरोहिताचा सल्ला घ्यावा लागत असे. राजाच्या दर्जाचीं बाहेरील चिन्हें म्हणजे त्याचा राजवाडा आणि मौल्यवान पौषाख हीं होत. जमीनीसंबंधानें राजाचे अधिकार काय होते हें सांगतां येत नाहीं. यासंबंधीं ग्रीकांचें उल्लेख विशेष स्पष्ट नाहींत. कित्येक वेळां ते म्हणतात राजाला प्रजेकडून कर मिळत असे व कित्येकवेळां म्हणतात कीं, राजाच फक्त जमिनीचा मालक असे. हॉपकिन्सचें असें मत आहे की, प्रजेला स्वरंक्षणाकरिता राजाला कर द्यावा लागत असे आणि केवळ बाह्यतः राजा जमिनीचा मालक असून खरी मालकी कुटुंबाच्या मुख्याकडेच असे. बेडन पॉवेलचें असें मत आहे कीं, राजा हा जमिनीचा मालक ही कल्पना नंतरची आहे. परंतु हापकिन्स म्हणतो कीं, वेदकली राजा हा लोकांचा भक्षक म्हणून उल्लेख आहे आणि ऐतरेय ब्राह्मणांत (८.१२) उल्लेखिल्याप्रमाणें राजाकडून वैश्याचा वाटेल तेव्हां अपहार केला जात असे आणि राजा त्यांनां मारूनहि टाकीत असत. परंतु शूद्राप्रमाणें ठार मारीत नसत. (ऐ. ब्राह्मणांत विशांअत्ता अशी पदें असून प्रजेचा उपभोग घेणारा असा त्याचा सायणांनी अर्थ दिला आहे. व्यवहार प्रकरणी सूत्रांत बृहस्पति आणि नारद व त्याचप्रमाणें मानवधर्मशास्त्रहि राजा हा सर्वसत्ताधारी असे ही गोष्ट मान्य करतात. (मानवधर्मशास्त्र ८.३९;) राजाला सर्वांचा ईश असें म्हटलें आहे. बुलहर या उता-याचा राजा जमीनीचा मालक होता या मताच्या पुष्टयर्थ उपयोग करतो परंतु त्याचा पुरेसा उपयोग होत नाहीं. राजा हा जमीनीचा मालक ही कल्पना मूळांतील नसून इंग्लंडातील प्रमाणें या तत्त्वाची पुढें हळू हळू् क्रांति होत गेली असावी. लोकांच्या वित्ताचें हरण करतां येणें ही राजकीय सत्ता आहे मालकीचा हक्क नव्हे. याच तत्त्वाचें अनुकरण दक्षिण आफ्रिकेत आढळतें. तेथें मुख्य अधिका-याला जमिनीच्या मालकापासून जमीनीची मालकी हिरावून घेतां येते, परंतु खरी मालकी मूळच्या रहिवाश्यांचीच असत. हॉपकिन्स म्हणतो गुरूंनां द्यावयाच्या देणग्या म्हणजे जमीनीच असत. राजा नसला म्हणजे अराजकता उत्पन्न होत असे. असा ब्राह्मणग्रंथांवरून अंदाज होतो. (तै. ब्रा. १.५,९,१;ऐ. ब्रा. ११४). राजाशिवाय युद्ध कसलें, व आपल्याला राजा नाही म्हणून असुर आपला पराभव करतात, असे अनुक्रमें. तै. ब्रा. व ऐ. ब्रा. यात उल्लेख आहेत. राजन् हा शब्द ॠग्वेदांत (ॠ १.४०, ८;१०८, ७;१०. ४२, १०;९७,६) राजघराण्यांतील एकदा पुरूष अथवा सरदार या अर्थाने आला आहे. ॠग्वेदांतील कांही स्थळावरून (१०.९७,६;) झिमर असें म्हणतो कीं, लढाईसारख्या विशिष्ट प्रसंगीचे वैदिक कालीं राजा ही व्यक्ति अस्तित्वांत असे व शांततेच्या प्रसंगीं जर्मनीच्या राज्यव्यवस्थेप्रमाणें सर्व सरदारांनां सारखेच हक्क असत. सरदारांनां राजन् म्हणत परंतु झिमरनें लावलेला अर्थ बरोबर आहे असें मात्र म्हणतां येणार नाहीं.
१३राजन्य- वेदकालीन वाङ्मयात राजघराण्यांतल्या पुरुषाचें नांव. यांतच सरदारांचाहि समावेश होतो. हा अर्थ एखाद्या उता-यांतून स्पष्ट रीतीने निघत नाहीं. मुळात हा शब्द सर्व सरदारांनांहि लावीत. शतपथ ब्राह्मणांत (३,१,६,२) राजन्य आणि राजपुत्र यांचे निरनिराळे अर्थ दाखविले आहेत. राजपुत्राचा शब्दशः अर्थ राजाचा मुलगा असा होतो. राजन्यांचीं कार्ये आणि स्थान याचीं वर्णनें क्षत्रिय या सदराखालीं आलेली आहेत. तैत्तिरीय संहितेत त्याला ब्राह्मणाच्या आणि ग्रामणीच्या कोटींत बसविले आहे, आणि तो भाग्याच्या शिखरास पोहोचला होता म्हणून लिहिले आहे.
१४राष्ट्र- ॠग्वेंदांत आणि तदुत्तरवाङ्मयांत राज्य किंवा राजाचा प्रदेश या अर्थी हा शब्द आला आहे.
१५वसावि- ॠग्वेदांमध्यें एके ठिकाणीं रॉथच्या मतें ह्याचा अर्थ जामदारखाना असा होतो.
१६विराज्.- राज्यपददर्शक अशी ही पदवी असून ॠग्वेदामध्यें अनेकदां हा शब्द आलेला आहे. पण अलंकारिक अर्थानें एकदांच हा शब्द आलेला आहे. ही विराज पदवी प्रत्यक्ष अशी ऐतरेय ब्राह्मणांत उत्तर कुरू व उत्तरमद्र ह्यांनां लाविलेली आहे.
१७वैर व वैरदेय- हा शब्द वैरदेय असा ॠग्वेदांत आला आहे. या शब्दाचा अर्थ मागाहून झालेले संहिता ग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ ह्यामध्ये ज्याला इंग्रजीत (वेरगेल्ड) असें म्हणतात. (म्हणजे एखाद्या माणसाला ठार मारल्याबद्दल त्याच्या नातलगांनां नुकसानभरपाई दाखल दिलेला पैसा) त्या अर्थानें आलेला आहे. हा अर्थ आपस्तंब व बौधायन धर्मसूत्रांतसुद्धां मान्य आहे. दोन्ही सूत्रांत क्षत्रियाबद्दल एक हजारगायी, वैश्याबद्दल शंभर गायी, शुद्राबद्दल दहा गायी व ह्याशिवाय प्रत्येकाचे मृत्यूचे वेळीं एक बैल जास्त असें नुकसान भरून द्यावें असें लिहिलेले आहे हें नुकसान कोणास द्यावें त्याबद्दल आपस्तंब सूत्रात स्पष्ट उल्लेख आलेला नाहीं. पण बौधायन सूत्रात राजाला द्यावे असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. कदाचित गायी नातलगांना द्याव्या व गुन्हेगाराचे जीवित्व हिरावून घेऊं नये म्हणून खून झालेल्या माणसाच्या नातलगाशी रदबदली करणारा जो राजा त्याला नजर म्हणून एक बैल द्यावा अशी कल्पना करणें संयुक्तिक होईल. आपस्तंब सूत्रात बायकांचा खून झाला तर हेंच नुकसान भरून द्यावें असें म्हटलें आहे. पण गौतमसूत्रात स्त्रियांच्या मृत्यूची योग्यता शूद्राच्या वधाच्या योग्यतेबरोबर ठरविली आहे, व त्याला एकच अपवाद आहे. हें नुकसान जे भरून द्यावयाचे असतें ते वैरयातन किंवा वैरनिर्यासन म्हणजे वैरनिष्कृतीबद्दल कराव्याचे असतें. मनुष्यवधाबद्दल नुकसानभरपाई म्हणजे शंभर गायी होत अशाबद्दल ॠग्वेदांतहि उल्लेख आहे कारण त्यांत शतदाय (ज्याच्या नुकसानभरपाईची किंमत १०० आहे) असें एका माणसाला लाविलेले विशेषण आलेले आहे निरनिराळ्या माणसाच्या निरनिराळया किंमती असत ह्याबद्दल शंका नाहीं. पण शुनःशेपाच्या बाबतींत त्याची किंमत ऐतरेय ब्राह्मणाचें मताने १०० गायींचे दान ही होय यजुर्वेद संहितेमध्ये शतदाय हा शब्द पुन्हां आलेला आहे. अशी रीतने नुकसानीची किंमत ठरविणें ह्यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, ॠग्वेदकालांत व्यक्तिशः खासगी रीतीनें सूड किंवा नुकसानीची किंमत ठरविण्यापेक्षां समाजाचें मत किंवा राजसत्ता ह्यांचाच अधिकार शिक्षा देण्याचे कामीं लोक जास्त मानीत. उलटपक्षीं असेंहि म्हणतां येईल की, अशी पद्धत त्यावेळीं ज्या अर्थी होती त्या अर्थी राजाचा शिक्षा देण्याचा अधिकार फार दुर्बळ होता.
१८शेवधि- ॠग्वेद व तदुत्तरकालीं झालेले ग्रंथ ह्यांमध्यें खजिना असा ह्या शब्दाचा अर्थ आलेला आहे.
१९ सम्राज- ॠग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथ ह्यामध्यें ह्याचा अर्थ श्रेष्ठ राज्यकता म्हणजे राजापेक्षां जास्त सत्तेचा उपभोग घेणारा असा आहे. शतपथ ब्राह्मणांत वाजपेय व राजसूय ह्यांबद्दलची जी उपपत्ति दिली आहें. तीत असें म्हटले आहे की समाजाला राजापेक्षा जास्त सत्ता असते. कारण तो वाजपेय यज्ञ करुन सम्राज बनतो. त्यावेळीं बादशहा म्हणजे राजाधिराज असा शब्द प्रचारांत नसावा. कारण तशी राजकीय स्थिती-जी स्थिती तिस-या शतकांत (ख्रिस्ती शकापूर्वी) अशोकाचे वेळीं हिंदुस्थानांत होती तशी असण्याचा संभव नाहीं. पण सम्राज ही पदवी विदेहाच्या जनकाला त्यावेळी लावीत असत. ऐतरेय ब्राह्मणांत ही पदवी पूर्वेकडील राजांनां लाविली आहे.
२०अभिषेक- वैदिक कालामध्यें राजाची निवडणूक झाली म्हणजे त्याला मोठया समारंभाने अभिषेक करीत, असें तैत्तिरीय, पंचविश, शतपथ आणि ऐतरेय ब्राह्मण ह्या ग्रंथांमध्यें सविस्तर वर्णन आहे. आणि संहितेतहि त्याविषयी मंत्र दिले आहेत. अभिषेकांत पाणी सिंचन करीत असतें (अभिषेचनीयाआपः) फक्त राजांनांच अभिषेक केला जात असे, कारण प्रजा अभिषेकाच्या योग्य (अभिषेचनीयः) नाहीं. पुरुषमेधीय बळींच्या यादींत अभिषेक्तृचा उल्लेख आहे. अभिषेक हा राजसूयामधील एक मुख्य भाग आहे.
२१ग्राम्यवादिन्.- सामान्यतः ग्रामन्यायाधीश या अर्थी हा शब्द यजुर्वेदांत आला आहे व ग्राम्यवादिन् याच्या सभेचा उल्लेख मैत्रायणि संहितेंत (२.१,२) आहे.
२२राज्य- तैत्तिरीय संहितेंत, अथर्ववेदांत व तदुत्तर ग्रंथांत सार्वभौमसत्ता या अर्थी हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांत (५.१,१,१२) ब्राह्मणांला सार्वभौम सत्ता मिळत नसें असें लिहिलें आहे. राज्याबरोबरच सार्वभौमसत्तेबद्दलचे दुसरे शब्द आढळतात. शतपथ ब्राह्मणांत असें म्हटले आहे की राजसूय यज्ञ राजानें करावा आणि वाजपेय सम्राटानें करावा सम्राटाचा दर्जा राजापेक्षां श्रेष्ठ आहे. त्याच ब्राह्मणांत सिंहासनावर बसणें हें साम्राटाचें लक्षण मानलें जात असे असें सांगितलें आहे. इतरत्र राज्याच्या उलट स्वराज्य शब्द योजिला आहे. राजसूयाच्या विधीत ऐतरेय ब्राह्मणांत पुष्कळ शब्द दिले आहेत. राज्य, साम्राज्य, भौम, स्वाराज्य, वैराज्य, परिमेष्टय, महाराज्य आणि आधिपत्य हे शब्द इतरत्रही सापडतात. हे शब्द निरनिराळे अधिकार दर्शवितात. ह्या म्हणण्याला आधार नाहीं. नृपाधीश असल्याशिवायहि एखाद्या राजाला महाराज किंवा सम्राज् म्हणतां येईल. तो श्रेष्ठ राजा असल्यास किंवा त्यानें आपणास म्हणवून घेतल्यास (विदेहाच्या जनकाप्रमाणें) महाराज किंवा सम्राज ही पदवी त्याला लागत असे. गुप्तासारखे किंवा अशोकासारखे महाराजे वेदकाळीं होते असें मानता येत नाहीं.
२३व्राजपति- यजुर्वेद संहितेंत गणपति शब्दाबरोबर हें एक विशेषण आहे. ह्याचा खरा अर्थ अगदीं अनिश्चित आहे. पण झिमर म्हणतो त्याप्रमाणें ह्या शब्दाचा अर्थ चोराच्या टोळीचा नायक असाहि असूं शकेल.
२४संग्रहीत- ॠग्वेदोंत्तर संहिताग्रंथ व ब्राह्णग्रंथ ह्यामध्यें हा शब्द आलेला आहे. राजाचे जे कोशाधिकारी असत त्यापैकी हा एक कामगार होता. प्रत्येक ठिकाणीं जेथें हा शब्द आलेला आहे. तेथे तेथें सारथी हा अर्थ लागू पडतो. पण सायणाच्या मतें काही ठिकाणीं ह्याचा अर्थ राजाचा खजिनदार असा आहे.
२५संधा- ॠग्वेदोत्तर संहिता व ब्राह्मण ग्रंथांत ठराव किंवा करार या अर्थानें हा शब्द आला आहे.
२६अराजानः- शतपथातील दोन उता-यांत आणि ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द लोक या अर्थी योजिला आहे. वेबरला सुद्धां हा शब्द अथर्ववेदांत आढळला असून तेथें त्याचा संबंध सूत (सारथी) आणि ग्रामणी (सेनानी) याच्याशीं आला आहे म्हणून त्याला असें वाटतें कीं ह्या लोकांना अराजनः म्हणत असावेत; कारण ते स्वतः जरी राजपुत्र नसले तरी त्याचा राजपुत्राच्या अभिषेकाशीं संबंध आहे.
२७ज्ञातृ- हा शब्द अथर्ववेदामध्यें दोन ठिकाणीं व शाखायन आरण्यकांत एके ठिकाणी अस्पष्ट अर्थानें आलेला आहे. झिमरच्या मतें हा शब्द मूळचा कायद्याच्या परिभाषेतील असून त्याचा अर्थ साक्षीदार असा आहे. प्राक्कालीन समाजात साक्षी ठेवून कामे करण्याची जी चाल होती तिला उद्देशून हा शब्द आला असावा. रॉथच्या मतें ह्या ज्ञातृ शब्दाचा अर्थ तारण असा आहे पण ब्लूमफील्ड व व्हिटने ह्यांना हे दोनहि अर्थ संमत नाहींत.
२८राजकर्तृ अथवा राजकृत- राजकर्तृ अथवा राजकृत् म्हणजे राजाची स्थापना करणारा, त्यांना अभिषेक करणारा. जे स्वतः राजे नसत पण राजांना अभिषेक करण्यांत मदत करीत अशा लोकांस अथर्ववेदात आणि ब्राह्मणांत हा शब्द लाविला आहे. सूत आणि ग्रामणी हे अभिषेकप्रसंगी हजर असत असें शतपथांत (६.४,१,१) म्हटलें आहे. एगलिंगचेहि असेंच मत आहे. ऐतरेय ब्राह्मणावरील टीकाकारांच्या मताप्रमाणे याचा बाप, भाऊ असा अर्थ निघतो. मूलांत शब्दाचा अर्थ स्पष्ट नाहीं.
२९सभासद्.- लोकसभेत न्यायनिवाडा करण्याकरितां जे पंच असत त्यांना हें नांव आहे. अथर्ववेदांत व मागाहून झालेल्या ग्रंथांत जेव्हां हा शब्द येतो तेव्हां ह्याचा अर्थ एक सभासद एवढाच होणें शक्य नाहीं. कोणत्याहि सामान्य मनुष्यापेक्षां कुटुंबाचा पुढारीच सभेस सभासद म्हणून हजर असण्याचा अधिक संभव आहे. ह्या सभेच्या बैठकी सामान्य विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा त्यांजवर निकाल देण्यासाठी होण्यापेक्षां न्यायदानाकरितांच वरचेवर भरत असतील.
३०स्थपति- अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांमध्यें राजाचा अधिकारी ह्या अर्थी हा शब्द आला आहे. सृंजय लोकांच्या दुष्टरीतु पौस्यायन ह्या हद्दपार केलेल्या राजाचा रेवोत्तरसूचाक्र हा स्थपति होता व ह्यानेंच त्या राजाला पुनः राज्यपद मिळवून दिलें (श.ब्रा. १२.८,११, १७). ह्या शब्दाचा अगदी बरोबर अर्थ समजणें कठिण आहे. प्रांताधिकारी किंवा सुभेदार असाहि अर्थ होईल. पण सरन्यायाधीश हा अर्थ अधिक संभाव्य आहे. कारण ह्याच्याकडे पूर्वीच्या इंग्लिश लोकांतील न्यायाधीशाप्रमाणें न्याय व अम्मलबजावणी ह्या दोन खात्यांतील कामें असण्याचा संभव आहे. ह्याचा दर्जा राजभ्रात्यापेक्षां कमी असे.
३१उदाज- मैत्रायणी संहितेत (१.१०,१६) हा शब्द आला असून लढाई जिंकल्यानंतर मिळालेल्या लुटींतील राजाचा वाटा असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. व्हॉन श्रोडर व बोथलिक यांच्या (लढाईकरिता) बाहेर (पडणें ह्या जुन्या) अर्थापेक्षां वरील अर्थच अधिक योग्य असून डेलब्रूकहि तोच अर्थ घेतो. हा शब्द होमरच्या गेरास् ह्या शब्दाच्या अर्थाचाच आहे. काठक (२८.३) व कपिष्ठल ह्या संहितांमध्यें पाठभेदानें आलेला निराज हा शब्द देखील ह्याच अर्थाचा आहे.
३२प्रत्येनस्.- काठक संहितेंत व बृहदारण्यकोपनिषदांत (माध्यंदिन ४.३,४३) उग्र व सूतग्रामणी ह्यांच्या बरोबरच हा शब्द आला असून स्पष्टपणें त्याचा अर्थ पोलिसअधिकारी असा आहे. परंतु ह्याचा अर्थ राजाचा हलक्या दर्जाचा नोकर असा असावा, आणि मॅक्समुल्लर म्हणतो त्या प्रमाणें ‘कोतवालासारखा बडा अधिकारी’ असा नसावा. पीटर्सबर्गकोशाप्रमाणे काठक संहितेंत (८.४) व शांखायन श्रौतसूत्रांत (४.१६,१७) ह्या शब्दाचा अर्थ मयताचा लगेच होणारा व त्याच्या कर्जफेडीची जबाबदारी घेणारा वारस असा आहे.
३३ब्लेष्क- काठकसंहितेंत (४३.६) ह्याचा अर्थ दोर किंवा गळफास असा दिला आहे. मैत्रायणी संहितेंत यांचें ब्लेष्क असेंहि रूप दिलें आहे.
३४शतपति- मैत्रायणी संहितेंत व तैत्तिरीय ब्राह्मणांत एका ॠचेंत हा शब्द इंद्राचें विशेषण म्हणून आला असून मनुष्यांतील एकटाच शंभरांचा अधिपति म्हणून याचे वर्णन केलें आहे. तैत्तिरीय ब्राह्मणावरील टीकेंत जो शंभर देवांचा अधिपति असा याचा अर्थ केला आहे. तो अगदी असंभाव्य हे. मागाहून झालेल्या स्मृति ग्रंथांत ज्याला शतग्रामाधिपति असें म्हटलें आहे. त्यासारखाच हा कोणी मनुष्यकोटींतील अधिकारी असावा. प्राचीन काळीं हा अधिकारी न्याय व जमाबंदी यावरील राजप्रतिनिधि असावा.
३५समान्त- समान्त म्हणजे एकच मर्यादा असलेले. शेजारी राहणारे म्हणूनच. शत्रू अशा अर्थी हा शब्द मैत्रायणी संहितेंत आला आहे.
३६उग्र- बृहदरण्यकोपनिषदांतील एका उता-यांत अधिकारी मनुष्य अशा अर्थी हा पारिभाषिक शब्द असून मॅक्समुल्लरच्या मतानें त्याचा शिपाई असा अर्थ आहे. रॉथनें एका ॠग्वेदांतील उता-यायांत हाच अर्थ केला हे. परंतु सशक्त मनुष्य असा तेथें सामान्य अर्थ आहे. बोथलिंक हा वरील उपनिषदाच्या भाषांतरांत याचा विशेषणासारखा उपयोग करतो.
३७दशपुरुषराज्य- शतपथांत (१५.९,३,१) हा शब्द आला असून स्पष्टपणें ह्याचा अर्थ दहा पूर्वजांपासून चालत आलेली सार्वभौम सत्ता असा आहे. ह्यावरून पूर्वी वंशपरंपरेनें राजसत्ता चालत होती असा बोध होतो. वेबरचें एकदां असें मत होतें कीं, ह्याचा अर्थ दशपुरुंचे राज्य असा होय. ह्या दशपुरूंची तो कालिदासाच्या मेघदूतांतील दशपूर, व मध्यदेशांतील दशार्णया शब्दांशी तुलना करतो.
३८द्वारप- ऐतरेय ब्राह्मणांत (१.३०) विष्णूला देवांचा द्वारपाळ (विष्णूवै देवानां द्वारपः) असें अलंकारिक भाषेंत म्हटलें आहे. तेथें एकदां व छन्दोग्योपनिषदांतहि (३.१३,६) हा शब्द आलेला आहे.
३९धनधानी- तैत्तिरीय आरण्यकांत (१०.६७) कोशागार म्हणजे जामदारखाना अशा अर्थी हा शब्द आला आहे.
४०परिदा- शतपथांतील (२.४,१,११) काहीं उता-यांत दुस-यास शरण जाणारा असा ह्याचा अर्थ आहे.
४१पालागली- पालागली म्हणजे राजाची चवथी व जिच्याबद्दल सर्वात कमी आदर आहे अशीं बायको.
४२भोज- ऐतरेय ब्राह्मणांत कित्येक ठिकाणीं हा शब्द राजाची पदवी या अर्थानें उपयोगांत आणलेला दिसतो. भोज म्हणजे भोक्ता. अभिषिक्त राजाला भोज म्हणत. (ऐतरेय ब्राह्मण) (८.१४)
४३भौज्य- हा एक राजाचा दर्जा आहे. या दर्जास पोचलेल्या राजास भोज ही पदवी होती. ऐतरेय ब्राह्मणांत कित्येक ठिकाणीं हा शब्द आला आहे.
४४महाभिषेक- हा शब्द ऐतरेय ब्राह्मणांत आला आहे आणि त्याचा अर्थ महाराजांच्या प्रीत्यर्थ केलेला अभिषेकसमारंभ असा आहे. हा महाभिषेक ज्यांनां केला होता अशा मोठमोठया महाराजांची यादीहि दिली आहे.
४५महाराज- महाराज म्हणजे मोठा राजा. त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथांतून वारंवार येतो. याचा अर्थ राजाहून विशेष निराळा असा नाहीं.कदाचित् याचा अर्थ सामर्थ्यवान् राजा असा असावा. विजितवान् राजा महाराज: असें सायण भाष्यांत म्हटलें आहे. सामान्य राजा व सामर्थ्यवान् राजा ह्यांतील भेद दर्शविण्यासाठींच हा शब्द उपयोगांत आणीत असावेत याला राजन् असेंहि म्हटलें आहे.
४६मातृवध- हा अत्यंत घोर अपराध आहे, पण ब्रह्मज्ञानप्राप्तीनें ह्याचें क्षालन होतें असें कौषीतकी उपनिषदांत (३.१) म्हटलें आहे.
४७माहाराज्य- महाराज्य म्हणजे मोठया राजाचें ऐश्वर्य. ऐतरेय ब्राह्मणांत याचा उल्लेख आला आहे. राज्यापेक्षां माहाराज्यांत ऐश्वर्य फार, असें महाभाष्यांत म्हटलें आहे.
४८राजकुल- राजकुल म्हणजे राजघराणें. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत (३.२८,४) हा शब्द आला असून तेथें त्याचा दर्जा ब्राह्मणकुलाच्या वरचा नसून खालचा आहे असें म्हटलें आहे.
४९राजन्यर्षि- राजन्यर्षि याचा अर्थ राजर्षि-पंचविंश ब्राह्मणांत सिंधुक्षिताला हा शब्द लाविला आहे. परंतु हा तेथील अर्थ केवळ काल्पनिक आहे.
५०राजन्यबंधु- राजन्यच परंतु बहुधा हलक्या दर्जाचा असा याचा अर्थ आहे. शतपथांत (५,१,६,२) जनकाकडून वादांत पराभूत झालेल्या ब्राह्मणांनी त्याला राजन्यबंधु म्हटल्याचा उल्लेख आहे. बृहदारण्याकामध्यें (६.१,५) अशाच कारणाकरितां प्रवाहण जैवलीला याच नांवानें संबोधिलें आहे. उलटपक्षीं एका उता-यांत (शतपथ १.५,२,१० येथें) पुरुष व स्त्रिया पृथक् पृथक् भोजन करितात असा उल्लेख आहे व तेथें ही चाल राजन्यबंधूंत विशेष असल्याचें म्हटलें आहे. याठिकाणीं हा शब्द तिरस्कारदर्शक नाहीं. परंतु दुस-या उता-यांत (शतपथ ८.१,४,१०) नग्नजिताला वागविण्याच्या पद्धतीवरून असें स्पष्ट होतें कीं ब्राह्मणांचा राजांबद्दलचा तिरस्कार दाखविणारा हा शब्द आहे. पुन्हा एका उता-यांत (शतपथ १.१,४,१२ येथें) चार जातींचा उल्लेख आहे. तेथें वैश्य आधीं व नंतर, राजन्यबंधु अशा नेहमीच्या क्रमाचा भंग चमत्कारिक रीतीनें झाला आहे.
५१राजपितृ- ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द आला असून तेथें त्याचा अर्थ, राजसूययज्ञाच्या वेळी राजाला दिल्या जाणा-या पदव्यांपैकी एक, असा आहे. याचा अर्थ राजपिता हा आहे. ह्यावरून राज्यपद वंशपरंपरागत असे असें दिसतें. राज्यकारभारांत राजपुत्राचा प्रवेश प्राचीनकाळीं सुद्धां होत असे. ऐतरेय ब्राह्मणा (८.१२) मधील राजपिता शब्दाचा अर्थ सायणमतानें सर्व राजांचा पालक असा आहे.
५२राजपुरुष- राजपुरुष म्हणजे राजाचा नोकर. निरुक्तांत याचा उल्लेख आलेला आहे.
५३राजभ्रातृ- याचा अर्थ राजाचा बंधु. पंचविंश ब्राह्मणांत (१०.१,५) आठ वीरांपैकी एक किंवा राजसत्तेच्या आधारस्तंभांपैकी एक म्हणून उल्लेख आलेला आहे. इतरत्रहि याचा उल्लेख आलेला आहे.
५४राजमात्र- कौषीतकि ब्राह्मणांत (२७.६) आणि शांखायन श्रौतसूत्रांत (१७.५३) हा शब्द आला आहे. ह्यामध्यें सर्व राजन् यांचा (म्हणजे राजपुत्र व राजन्य यांचाहि) समावेश होतोसें दिसतें.
५५राजाधिराज- याचा अर्थ राजांचा राजा. पुढें सार्वभौमत्वाची पदवी, अस आहे. वैदिक वाङमयांत फक्त तैत्तिरीय आरण्यकांतच हा शब्द आला आहे.
५६राष्ट्रगोप- राष्ट्रगोप म्हणजे राष्ट्राचा रक्षक. ऐतरेय ब्राह्मणांत पुरोहिताला हें नांव दिलें आहे आणि त्याचें विशेष कर्तव्य म्हणजे मंत्रतंत्रांच्या योगानें राजाचें व राष्ट्राचें रक्षण करणें हें असे.
५७संश्रावयितृ- कौषींतकि उपनिषदांत (२.१) वर्दी देणा-या नोकराच्या म्हणजे द्वारपालाच्या अर्थी हा शब्द आला आहे.
५८सचिव- सचिव म्हणजे मित्र, अनुचर (सच् म्हणजे अनुसरणें) हा शब्द वेदोत्तर वाङ्मयांत आलेला आहे व त्याचा अर्थ राजाचा मित्र, त्याचा प्रधान, असा आहे. पण वैदिक वाङ्मयांतहि ऐतरेय ब्राह्मणांत (३.२०) हा शब्द आलेला असून तो इंद्रानें मरुतांनां लावलेला आहे. हा शब्द जर्मन कोम्स व इंग्रजी गेसिथ या शब्दांशी सदृश आहे.
५९सभापाल- तैत्तिरीय ब्राह्मणांत (३७,४,६) हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ सभागृहाचा रक्षक असा आहे.
६०स्थाप्य- पंचविश ब्राह्मणांत (१७.११,६) स्थपतीचा दर्जा असा याचा अर्थ आहे.
६१विदथ- हा शब्द ॠग्वेदामध्यें आलेला असून त्याचा अर्थ स्पष्ट आहे. रॉथच्या मतें ह्याचा मुळचा अर्थ हुकूम व नंतर हुकूम सोडणारा मनुष्य आणि मग धार्मिक किंवा ऐहिक गोष्टींकरितां किंवा लढाईकरितां भरणारी सभा असा आहे. ओल्डेनबर्गचें एकदां असें मत होतें कीं, विदथ ह्या शब्दांतली मूळ कल्पना म्हणजे शास्त्रोक्त कर्म (विधू या धातूपासून) व नंतर यज्ञ असा अर्थ झाला. लुडविगच्या मतें ह्या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सभा, विशेषतः मध्यवन् व ब्राह्मण ह्यांची सभा हा होय. गेल्डनेरच्या मते ह्या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान, शहाणपण, उपाध्याय वर्गाची विद्या, आणि नंतरचा यज्ञ आणि धार्मिक सत्ता असा आहे. उलटपक्षी ब्लूमफील्ड असें म्हणतों की ह्याचा मूळचा अर्थ घर (विद् म्हणजे संपादणें यावरून) वनंतर यज्ञ; कारण यज्ञ घरांत होतो. हाच अर्थ सर्व उता-यांनां नीट लागू पडतो. विदथ्य हा शब्द एकदां राजाला (सम्राट) लावलेला आहे त्यावरून ब्लूमफील्डचा अर्थ
सर्वस्वी बरोबर नाहीं असें वाटण्याचा कदाचित संभव आहे. पण विदथ्य म्हणजे पुष्कळ राजवाडयांच्या जागा असलेला असा अर्थ केला म्हणजे ही अडचण दूर होते आणि सभा शब्दाशीं विसगंत दिसणारा स्त्रियांचा संबंध विदथ शब्दांशीं ज्या अर्थी आला आहे त्यावरून ब्लूमफील्डच्या अर्थासच पुष्टि येते. ह्या शब्दाचा अर्थ ब्राह्मणाच्या घराप्रमाणें आश्रयस्थान किंवा धर्मशाळा असा लुडविग करितो पण हें संभवनीय नाहीं.
६२सभा- वेदकालीन आर्याच्या सभेला व ती सभा ज्या जागेंत होईल त्या जागेंला हें नांव होतें. ह्या शब्दाचा उल्लेख ॠग्वेद व तदुत्तरकालीनग्रंथ ह्यांत वारंवार येतो. परंतु ह्या सभेचें निश्चित स्वरूप काय होतें हें समजत नाहीं. ज्या वेळी त्या ठिकाणी सार्वजनिक कामकाज चालत नसे त्यावेळीं या सभागृहाचा उपयोग फांसे खेळण्याकडे होत असावा असे स्पष्ट दिसते. फांसे खेळणाराला सभास्थाणु असे म्हटले आहे. ह्यावरुन त्याचे सभेतील सतत वास्तव्य हे निश्चित होते. ह्या सभागृहाचा उपयोग सामाजिक चर्चेस, त्याचप्रमाणे गाई वगैरेसंबंधीं साधारण संभाषणाकडें होत असावा. कदाचित् वादविवाद व वाग्युद्वेहि येथें होत असावीत. लुडविगच्या मतानें ही सभा सर्व लोकांची नव्हती तर फक्त ब्राह्मण व मघवन् म्हणजे श्रीमंत लोकांची होती. ह्या मताला सभेय (सभेस बसण्यास योग्य अशा एका ब्राह्मणाचें विशेषण) व रयिःसभावान (सभेस शोभणारी अशी संपत्ति) अशा शब्दांनीं पुष्टि येते. पण ब्लूमफील्डचें असें मत आहे कीं, हे शब्द सभेला न लावतां एखाद्या गृहाला लावलेले असले पाहिजेत आणि कित्येक उता-यासंबंधी हेंच म्हणणें पीटर्सबर्गकोशास संमत आहे. झिमर एवढेंच म्हणतो कीं, ही सभा म्हणजे ग्रामपंचायतीची जागा असून या पंचायतीचा अध्यक्ष ग्रामणी असे. पण ह्या म्हणण्यास बिलकुल आधार नाहीं. हिलेब्रँट म्हणतो कीं, सभा व सीमति यांत फरक करितां येणार नाहीं आणि चांगल्या कुळात जन्मलेल्या (सुजात) लोकांबद्दल जो उल्लेख आहे तो त्या लोकांनां दास किंवा शूद्र ह्यांच्याहून निराळे असें दाखविण्यासाठी असून, आर्याच्या एका वर्गाहून आर्याचा दुसरा निराळा वर्ग, असें दाखविण्यासाठीं नाहीं; आणि हें त्याचें म्हणणें बरोबर दिसते. हिलेब्रँट असेहि म्हणतो की सभेतला (सभ्य) अग्नि हा शब्द जो आला आहे त्यावरून जेव्हा सभा भरत असें त्यावेळीं तिच्या तर्फे होणा-या यज्ञांतला अग्नि असा अर्थ होतो. ह्या सभांनां स्त्रिया जात नसत कारण त्यांनां राजकीय चळवळींत भाग घेऊं देत नसत. सभेंत काय काम चाले ह्याबद्दल एकहि उल्लेख नाहीं.
६३समिति- ह्या शब्दानें वेदकालीन जातसभेचा बोध होतो. हा शब्द ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत वारंवार आला असून तो कधी कधी सभेच्या संबंधांतहि आला आहे. लुडविगच्या मुतानें समितींत सर्वांचा, मुख्यतः ‘विशः’ (प्रजा) ह्यांचा आणि जर त्यांची ईच्छा असेल कतर श्रीमंत लोकांचा (मघवन) व ब्राह्मणांचाहि समावेश होई. तथापि ब्राह्मण व श्रीमंत लोकांचा स्वतंत्र सभाहि असेल पण हे मत बरोबर नाहीं आणि झिमर सुद्धां ही सभा म्हणजे ग्रामसभा असे जें म्हणतों तें बरोबर नाहीं. हिलेब्रँटचे असें मत आहे की, दोनहि शब्द जवळ जवळ एकच आहेत, मूळचा अर्थ समिति म्हणजे जमलेले लोक व सभा म्हणजे जमण्याची जागा असा असावा; व हें म्हणणें बरोबर दिसतें. ज्याप्रमाणें राजा सभेला जाई तसा तो समितीला सुद्धां जाई. झिमर म्हणतो कीं येथेंच राजाची निवडणूक होईल. पण ह्या समितींत तर राहूंद्याच. पण वस्तुतः राज्यपदाकरितां निवड होत असे की नाहीं याबद्दल शंकाच आहे. पण एवढी गोष्ट खरी कीं राजाला जर आपला उत्कर्ष व्हावासा वाटत असेल तर राजा व समिति ह्यामध्ये ऐक्य असणें जरूर असे. ह्या समितींत सर्व गोष्टीबद्दल धोरण ठरविण्यांत येत असे; उदाहरणार्थ, कायदे करणें व न्याय देणें. पण ह्याबद्दल वैदिक ग्रंथांत प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही. देवांची ज्याप्रमाणें सभा असे त्याप्रमाणें त्यांची समिती सुद्धां असें; आणि म्हणूनच तिला दैवी समिति असें म्हणत असत. बौद्धग्रंथ, महाभारत व स्मृतिग्रंथ ह्यांतून समितीचे राज्यकारभारांतील प्रभावी वजन कमी झालेलें दिसतें.