प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
वज्रानामें (ॠग्वेद)
वज्रानामें (ॠग्वेद) / सैनिकांचे प्रकार ( ऋग्वेद) / सैन्यनामें (ऋग्वेद) / सेनाप्रकार ( अथर्ववेद) |
१अद्रि- ॠग्वेदांत एका उता-यांत हा शब्द “खडक” दगड या अर्थी योजला आहे. म्हणून झिमर वैदिक काळांत युद्धांत गोफणीनें दगड फेंकीत असत असें अनुमान काढतो. परंतु तो उतारा इंद्राची मदत किंवा साहाय्य ह्या संबंधानें लिहिला आहे. म्हणून तो काल्पनिक आहे. आणि मनुष्यांचीं युद्धें याचा कांहीं संबंध त्या उता-यांत नाहीं. ब-याच अंशी तो शब्द इंद्राचें वज्र या अर्थी योजिला असावा.
२अशनि- ॠग्वेदांवरून हा शब्द गोफणीचा दगड अशा अर्थी आहे. असें झिमर म्हणतो. त्याची तुलना अद्रि शब्दाशीं केली आहे. कोणत्याहि बाबतींत हीं आयुधें इंद्राच्या पराक्रमांच्या वर्णनांत उपयोगांत आणिली आहेत. म्हणून काल्पनिक आहेत. श्राडर हा अशन् हा शब्द ह्याच अर्थी योजितो परंतु कोणच्याहि वेदाच्या उता-यांत हा अर्थ नाहीं.
३ॠष्टि- मरुत् ह्यांच्या हातांतील अस्त्रांचा द्योतक असा हा शब्द ॠग्वेदांत बराच वेळ उपयोगांत आणिला आहे आणि म्हणूनच तो विद्युल्लतेचा दर्शक असावा. ‘प्राणघातक युद्धांतील भाला’ असा अर्थ ॠष्टि शब्दाचा होतो असें झिमर म्हणतो पण तसा अर्थ कोणत्याहि उता-यावरून दिसत नाहीं ॠ. १.१६९, ३ यांत इंद्राच्या प्रसिद्ध वज्राला ॠष्टि असें सायणाचार्य म्हणतात.
४वधर्- ह्याचा अर्थ सामान्यत्वें शस्त्र असा आहे व ॠग्वेदामध्यें हा शब्द दैवी शस्त्राला लाविला आहे एवढेंच नव्हे तर मानुष शस्त्रालाहि लाविला आहे.
५सृक- ॠग्वेदामध्यें दोन ठिकाणीं ह्याचा अर्थ इंद्राचें शस्त्र कदाचित् भाला असा आलेला आहे.
ॠ. १०,१८०,२ सृक म्हणजे इंद्राचें वज्रा व वा.सं. १६. २१ या ठिकाणीं भाष्यांत सृक याचा अर्थ वज्रा असा दिला आहे.
६स्वधिति- ॠग्वेदामध्यें ह्याचा अर्थ कु-हाड किंवा सुरा असा आहे. हा सुरा यज्ञांतील (घोडयाच्या शरीराचे निरनिराळे भाग करण्याकडे उपयोगी पडे) ह्याचा ॠग्वेद संहितेंत, इतर सर्व ठिकाणीं लांकूड कापण्यास योग्य अशी कु-हाड असा अर्थ जमतो. एके ठिकाणीं कु-हाड क्ष्णोत्रावर तीक्ष्ण करण्याचा उल्लेख आलेला आहे. अथर्ववेदामध्यें जनावरांच्या कानावर खूण करण्याकरितां उपयोगीं पडणारी तांब्याची सुरी असा ह्याचा अर्थ आहे. सुताराच्या कु-हाडीचा दोनदां उल्लेख त्याच ठिकाणीं आलेला आहे व पुढें कु-हाड असा सामान्य अर्थ आहे. शस्त्र असा अर्थ मुळींच प्रचारांत नाहीं.
७जूर्णि- ह्याचा अर्थ कोलीत असा आहे व तें झिमरच्या मतें वैदिक काळच्या आर्य लोकांचे एक शस्त्र होतें. पण ज्या अर्थी हें शस्त्र राक्षसांनीं उपयोग केल्याचा फक्त ॠग्वेदांतच उल्लेख आलेला आहे त्या अर्थी इतर युद्धाचे वेळीं ह्याचा उपयोग केला जात असें असें खात्रीनें म्हणतां येत नाहीं. ॠ. १.१२९,८ या ठिकाणीं येणा-या “जूर्णि” शब्दाचा अर्थ सायण “सेना” म्हणजे सैन्य असा करितो. वेदार्थयत्नकारहि त्या शब्दाचा अर्थ “सेना” असाच करतात. ग्रिफिथ व इतर यूरोपिय पंडित “जूर्णि” याचा अर्थ “कोलीत” असा करतात; परंतु तो फारसा लागू पडत नाहीं. निरुक्त ६.४ या ठिकाणीं जूर्णि याचा अर्थ शक्तिः असा दिला आहे.
८व्र.- रॉथचें मतानें ॠग्वेदांत व अथर्ववेदांत सैन्य अशा अर्थानें आलेला आहे. झिमरच्या मतानें व्र (व्र चें स्त्रिलिंगी रूप) ह्याचा अर्थ एके ठिकाणीं विश ह्याचा भाग व (सुंबधु) नात्यांतल्या लोकांचे बनलेलें खेडेगांवांतलें सैन्य असा अर्थ आहे. उलटपक्षीं पिशेल म्हणतो कीं, जेथें जेथें हा शब्द आलेला आहे तेथें तेथें स्त्री मग ती सामान्य असो किंवा समन नांवाच्या मेजवानीला जाणारी असो किंवा लोकांनी ठेवलेली वेश्या असो किंवा अलंकारिक रीतीनें ह्या वेश्याशीं तुलना केलेलीं सूक्तें असोत हें अर्थ बरोबर दिसतात.
९सेना- ह्या शब्दाचा मूळचा अर्थ अस्त्र् असा असून ह्याच अर्थानें तो ॠग्वेद व अथर्ववेद ह्यांमध्यें आलेला आहे. व नंतर त्याचा सैन्य असा नेहमींचा अर्थ झाला. ॠग्वेदांतील सर्व उता-यांत सायणानें सेना याचा अर्थ अस्त्र असा कोठेंहि केला नाहीं. सैन्य असाच केला आहे. वेदार्थयत्न ग्रंथांत वरील उता-यापैकी बहुतेक ठिकाणीं सेना शब्दाचा बाण असा अर्थ केलेला आहे. अथर्ववेद ८.८,७ येथें सेनायाचा अर्थ सैन्य असा ग्रिफिथनें केला आहे, व तोच बरोबर दिसतो.
१०पत्ति- अथर्ववेदांमध्यें रथी ह्याच्या उलट पायदळांतला शिपायी असा अर्थ ह्या शब्दाचा आहे. रथी पत्तीचा पराभव करतो असेंहि वर्णन आहे. वाजसनेयि संहितेंतील शतरुद्रीय प्रार्थनेमध्यें रुद्राला जीं विशेषणें दिलेलीं आहेत त्यांपैकीं पत्तीनांपति असें एक विशेषण दिलेलें आहे. अथर्ववेद ७. ६४,१ या ठिकाणीं पत्तीम् याबद्दल पत्नीम् असाहि पाठ आहे व हाच पाठ सायणानें घेतला आहे. वा. सं. १६.१९ या ठिकाणीं येणा-या पत्ति शब्दाचा अर्थ त्यावरील भाष्यांत हत्त्यश्वरथ पदाति संख्या पत्तिः असा दिला आहे.