प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
राजविशेष [ ऋग्वेद ] |
१उदन्कशौल्बायन -- प्राण आणि ब्रह्म एकच आहेत असें याचें विचार असल्याबद्दल बृहदारण्यक उपनिषदांत (४. १, ३.) वर्णन आलें आहें. तो विदेह देशाच्या जनकराजाचा समकालीन असावा असें वाटतें. तैत्तिरीय संहितेंत [ ७. ५, ४, २ ] सत्रांतील दशरात्रकतु हाच मुख्य भाग आहें असें त्याचें मत होतें असा उल्लेख आहें. उदंक हें नांव आहे व शौल्बायन हें पैतुक नांव आहें.
२केशिन्दार्भ्य अथवा दाल्भ्य -- 'दर्भाचा वंशज'. शतपथ ब्राम्हणांप्रमाणें तो राजा होता व जैमिनीय उपनिषदब्राह्मणाप्रमाणें तो उचै:श्रवस् याच्या बहिणीचा मुलगा होता. पांचाल हे त्याचें प्रजाजन होतें. म्हणून केशिन् ही त्यांचीच एकशाखा असावी, आणि त्यांचे तीन वर्ग ( व्यानीक ) होतें असें म्हणतात. धार्मिक विधीचें बाबतींत त्याचें षाण्डीक याच्याशीं पटत नव्हतें अशीं एक कथा मैत्रायणी संहितेंत आहे; हीच गोष्ट शतपथ ब्राह्मणांत दुस-या शब्दांत दिली आहे व मैत्रायणी आणि तैत्तिरीय संहिता यावरून केशिन् हा सात्यकामि याचा समकालीन होता असें वाटतें. पंचविश ब्राम्हणाप्रमाणें एक साम अथवा एक गीताचा हा द्रष्टा आहे असें दिसतें; व हें गीत याला सुवर्ण पक्ष्यानें कसें शिकवलें याचा कौषीतकि ब्राह्मणांत उल्लेख आहें. जुनें वाङमय दार्भ्य हा ऋषि आहे असें मानितें आणि म्हणून शतपथ ब्राह्मणावरील टीकेंत तो राजा असल्याबद्दलचा व त्याच्या प्रजेचा जो उल्लेख आला आहें. तो कितपत खरा मानावा याबद्दल शंका उत्पन्न होतें. कारण, तो ऋषि असावा हाच अर्थ चांगला लागू पडतो. शिवाय जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांवरहि जास्त भरंवसा ठेवतां येत नाही. काठक संहितेंत केशिन् लोक असा जो उल्लेख आहे तो राज्यपद दर्शवितो असें उत्तरकालीन ग्रंथकार ( जै. उ. ब्रा. ) गृहित धरून चालतात. परंतु तें अयोग्य आहें.
३परआट्णार -- ऋग्वेदोत्तर संहिताग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ यामध्यें एक विशिष्ट यज्ञ करून पुत्र मिळविणा-या पूर्वीच्या महान् राजांपैकी हा एक होय असा उल्लेख आहें. शतपथ ब्राह्मणांत हैरण्यनाभ व शांखायन श्रौतसूत्रांत 'परआट्णार वैदेह अशीं नांवे दिलेली आहेत. त्यावरून कोसल व विदेह यांचा निकट संबंध असल्याचें सिद्ध होतें. त्याच सूत्रांत उल्लेखिलेल्या यज्ञगाथेंत हिरण्यनाभ कौसल्य याचा उल्लेख 'परा' संबंधानें आलेला आहें. 'पर ' हें विशेष नाम असून 'आट्णार' हें पैतृक नांव आहें. हा ऋषि आहे असे सायणाचार्य म्हणतात. ४भालंदन -- भलंदनाचा वंशज. पंचविश ब्राह्मण आणि काठक व तैत्तिरीय संहिता यांत आलेल्या वत्सप्रीचें हें पैतृक नांव आहें. हा ऋग्वेदांतील एका सूक्तांचा द्रष्टा आहें.
५परिक्षित -- अथर्ववेदांमध्यें एका राजाचें हें नांव आलेलें आहें. याच्या म्हणजे कुरूंच्या राज्यांत सुबत्ता व शांतता यांचे साम्राज्य होतें. ज्या ऋचांतून यांचे गुणवर्णन आलेंलें आहे, त्या ऋचांना मागाहून 'पारिक्षित्य:' असें नांव पडलें. अग्नि मनुष्यांत राहतो म्हणून ब्राह्मण ग्रंथांत त्याला परिक्षित असें नांव दिलेंलें आहें. याच कारणास्तव या नांवाचा मानवी राजा झालाच नाहीं असें रॉथ व ब्लूमफील्ड यांचे जें मत तें कदाचित बरोबर असूं शकेल. पण निश्चित असें कांहीच सांगतां येत नाही. झिमर व ओल्डनबर्ग हें दोघेहि हा राजा होता हें कबूल करतात व या गोष्टीला आधार म्हणजे उत्तरकालीन वैदिक ग्रंथात जनमेजय राजा पारिक्षित हे पैतृक नांव धारण करतो ही गोष्ट होय. हें जर खरें असेल तर परिक्षित मागाहून झाला असावा. कारण, ज्या अथर्ववेदाच्या लेखांत त्याचें नांव आलेंलें आहे तो खात्रीनें मागाहून लिहिला गेला असावा. इतर कोणत्याहि संहिता ग्रंथांत हा शब्द आलेला नाहीं. महाभारतामध्यें या परिक्षिताला प्रतिश्रवस् याचा आजा व प्रतीपाचा पणजा असें म्हटलें आहे व झिमर अथर्ववेदांतल्या दुस-या एका मागाहूनच्या लेखांत आलेल्या प्रातिसुत्वन् व प्रतीप यांच्याशी यांची तुलना करतो व हें त्यांचे करणें बरोबर दिसतें. पण देवापि व शंतनु यांचा प्रतीपाशी संबध जुळविणें शक्य नाहीं.
६दिवोदास भैमसेनी -- भीमसेनाचा वंशज. हा शब्द काठक संहितेंमध्यें आरूषीचा समकालीन म्हणून आलेला आहें.
७अंगवैरोचन -- ऐतरय ब्राह्मणांत अभिपिक्त राजांच्या यादीत याचा उल्लेख आहें. याचा उदमय आत्रेय या नांवाचा पुरोहित होता.
८अजातशत्रु -- हा काशीचा राजा काश्य असून बालाकी नामक एका अभिमानी ब्राह्मणाला आत्मविद्येचें मूलतत्व शिकवीत असें असें बृहदारण्यक व कौषीतकि उपनिषदांत वर्णन आहें. बौद्धधर्मीय पुस्तकांतील अजातशत्रु आणि हा एकच असें मानतां येत नाहीं.
९अत्यरातिजानंतपि -- हा राजा नसतांना वसिष्ठ सात्यहव्यानें याजकडून राजसूय यज्ञ करविला व त्यामुळें तो सर्व पृथ्वी जिंकण्यास समर्थ झाला. वसिष्ठ सात्यहव्यानें जेव्हां पौरोहित्याची आठवण देऊन त्याबद्दल बक्षीस मागितलें तेव्हां उत्तरकुरूंना जिंकल्यावर सर्व पृथ्वीचें राज्य आपणांस देऊन मी आपला सेनापति होईन असें त्यानें रागानें उत्तर दिलें. यावर अत्यराति म्हणालां तूं मला फसविलेंस. कारण उत्तरकुंरूनां जिंकणें मनुष्याच्या स्वाधीन नाहीं. नंतर सात्यहव्यानें आपल्या तप:सामर्थ्यानें अत्यरातीचें सामर्थ्य काढून घेऊन त्याला हतबल केलें आणि शिबिराजाचा मुलगा अमित्रतपन शुष्मिन् याजकडून त्याचा वध केला. ( ऐ. ब्रा. ८. २३)
१०अपाच्य -- नीच्य आणि अपाच्य ही पश्चिम दिशेच्या लोकांची नांवे आहेंत असा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहें.
११अभिप्रतारिनकाक्षसेनि -- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण, छांदोग्य उपनिशषद व पंचविश ब्राह्मण यांत हा तत्वज्ञान विवादांत निमग्न असें असा उल्लेख आहे हा कुरूवंशांतील एक राजपुत्र होता व तो जिवंत असतांच त्याच्या मुलांनी त्याची मालमत्ता वाटून घेतली असा जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख आहें.
१२अमित्रतपनशुष्मिन् शैब्य -- शिबीचा मुलगा यानें अत्यराति जानंतपिचा वध केल्याचा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहें. अमित्रतपन हें शत्रुतापन या अर्थी विशेषण आहें.
१३अश्वपति -- हा केकय देशाचा राजा असून यानें प्राचीनसाल यास व दुस-या कांही ब्राह्मणांनां शिक्षण दिल्याबद्दल छांदोग्य उपनिषद् व शतपथ ब्राह्मण या ग्रंथांत उल्लेख आहें.
१४असमातिराथप्रोष्ठ -- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत रथप्रोष्ठ कुलांतील इक्ष्वाकु राजा असमाति आणि त्याचे उपाध्याय गौपायन यांच्या भांडणाची गोष्ट आढळतें. ही आख्यायिका ऋग्वेदांतील एका उल्लेखावरून आली असावी. परंतु तेथें असमाति हें फक्त विशेषण आहें. नंतरची गोष्ट अशी आहे की, किरात आणि आकुलि या दोन असुरांनी कुलोपाध्यायास सोडून देण्याबद्दल राजांचे मन वळविलें आणि त्यांच्यापैकी सुबंधूचा वध करविला. परंतु त्याच्या भावांनी त्याला ऋग्वेदांतील १०.६० या सूक्ताच्या जपानें जिवंत केलें असा पंचविश ब्राह्मण व बह्द्देवता या ग्रंथांत उल्लेख आहें.
१५आंबाष्ट्य -- ऐतरेय ब्राह्मणांत या राजाच्या राजसूय यज्ञात नारद पुरोहित होता असा उल्लेख आहें. सेंट पीटर्स बर्ग कोशाच्या भाषांतराप्रमाणें हें 'आंबष्ट यांचा राजा' असें स्थानिक नांव असावें. नंतर 'आंबष्ट' म्हणजे ब्राह्मण जातीचा पुरूष आणि वैश्य जातीची स्त्री यांच्या पासून होणारी संतति असा अर्थ रूढ झाला.
१६इंद्रद्युम्नभाल्लवेयवैयाघ्रपद्य -- अग्निवैश्वानराचें धर्म काय आहेत या बाबतींत इतर पुरोहितांबरोबर याचें मतैक्य होत नसे. याला अश्वपति कैकेय यानें विद्या शिकविली होती. शतपथ ब्राह्मणांत याचा भाल्लवेय या नावानें धार्मिक विधींत ब-याच वेळा उल्लेख आला आहें.
१७इंद्रोतदैवाप शौनक -- यानें जनमेजयाच्या अश्वमेध यज्ञांत पौरोहित्य केल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणांत जनमेजयाचा पुरोहित तुर:कावषेय हा होता असा उल्लेख आहे. जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत हा श्रुत याचा शिष्य होता असा उल्लेख असून वंश ब्राह्मणांतहि याचा उल्लेख आला आहे. ऋग्वेदांतील देवापाचा व याचा काहीं संबंध नाहीं.
१८उग्रसेन -- शतपथ ब्राह्मण आणि गाथा यामध्यें हा भीमसेन, श्रुतसेन व जनमेजय यांचा भाऊ असल्याबद्दल उल्लेख आहे आणि अश्वमेध यज्ञ केल्यामुळें याची पापापासून मुक्तता झाल्याचाहि उल्लेख आहें.
१९उचै:श्रवसकौपयेय -- हा कुरूंचा राजा आणि केशिन् याचा मामा असल्याबद्दल जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख आहे. उपमश्रवस् हा कुरूश्रवणाचा मुलगा होता आणि ही नावें सारखी दिसतात म्हणून याचा कुरूंशीं संबंध असावा असें दिसतें.
२०ऋतुपर्ण -- बौधायन श्रौतसूत्रांतील ब्राह्मण ग्रंथासारख्या उता-यावरून हा भंगाश्विन् याचा मुलगा आणि 'शफाल, चा राजा असावा असें वाटतें. आपस्तंब श्रौतसूत्रांत 'ऋतुपर्ण कयोवधि भंग्याश्विनौ' असा उल्लेख आहें.
२१ऋषभ -- हा याज्ञतुर याचा आनुवंशिक व श्विक्लसचा राजा असून, अश्वमेध करणारापैकी एक होता असा शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आला आहे. शतपथ ब्राह्मणांत गौरिवीति याच्या नांवावर जी गाथा आहे तिचा हाच बहूतेक जनक असावा आ त्या ग्रंथांत उल्लेख आहें.
२२एकादशाक्षमानुतंतव्य -- सुर्योदयाबरोबर होम करणा-या ( उदित होमी ) राजांचें हें नांव आहें असा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहे. हा नगरिन् जानश्रुतेय याच्या समकालीं होता.
२३ऐक्ष्वाक -- इक्ष्वाकूचा वंशज. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें पुरूकुत्स यांनें हें आनुवंशिक नांव धारण केंलें होतें. दुसरा ऐक्ष्वाक वार्ष्णि हा असून तो अध्यापक होता असा जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख आहें. राजा हरिश्चंद्र हा वैधस ऐक्ष्वाक असल्याचा ऐतरेय ब्राह्मणांत व त्र्यरूण हा ऐक्ष्वाक असल्याचा पंचविश ब्राह्मणांत उल्लेख आहें.
२४औग्रसैन्य -- ऐतरेय ब्राह्मणांत राजा बुधांश्रौष्टि याचें हें पैतृक नांव आहें.
२५औपतस्विनि -- शतपथ ब्राह्मणामध्यें राम याचें हें पैतृक नांव आहें.
२६कामप्रि -- ऐतरेय ब्राह्मणांत मरूत याचें हें पैतृक नांव आहे. सेंट पीटर्स बर्ग कोशांत असें सुचविलें आहे की तो पाठ 'काम प्रे' 'इच्छा पूर्ण करणारा' असा पाहिजें. सायणाचार्य काम प्रि हें मरूत यांचें विशेषण आहे असें भाष्यांत म्हणतात.
२७ काशि, काश्य -- काशि ( अनेकवचनांत ) म्हणजें काशीचें लोक आणि काश्य म्हणजे काशीचा राजा. धृतराष्ट्र हा शतानींक सात्राजिताकडून पराभूत झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की, पुन्हां ब्राह्मणांचे वर्चस्व होईपर्यंत काशी लोकांनी यज्ञ करावयाचें बंद ठेविलें असें शतपथ ब्राह्मणांत ( १३.५, ४, ९ ) म्हटलें आहें. सात्रजित हा भरत होता. अजातशत्रु हा काशीचा राजा होता असाहि उल्लेख आढळतो आणि उद्दालक याचा समकालीन भद्रसेन अजातशत्रह हाहि काशीचा राजा होता. काशि आणि विदेह हे जवळचें नातेवाईक होत. कारण भूगोलद्दया त्यांची जागा किंवा स्थान यांचा विचार केल्यास तसें होणें स्वाभाविक होतें. कौषीतकि उपनिषदांत 'काशि -- विदेह' हें सामासिक नांव आलें आहें. बृहदारण्यकोपनिषदांत गार्गी म्हणते कीं अजातशत्रु हा काशि किंवा विदेहचा राजा असावा. शांखायन सूत्रांत काशि कोसल आणि विदेह यांचा एकच पुरोहित होता असा उल्लेख आहें. बौधायन श्रौत सूत्रांत काशि आणि विदेह हे अगदी नजीक आहेत असें म्हटलें आहें. वेबर म्हणतों कीं. काशि आणि विदेह हे दोन्ही मिळून उशीनर होतात आणि हें नांव वैदिक वाङमयांत फारच क्वचित आलें आहें. ज्याप्रमाणें कोसल आणि विदेह यांचा निकट संबंध होता त्याप्रमाणें गोपथ ब्राह्मणांत काशि आणि कोसल हे काशि -- कौसल्य या सामासिक नांवात गोविले आहेत. काशि हें नांव जरी जूनें नसलें तरीं तें शहर मात्र जुनें आहें. कारण अथर्ववेदांतील वरणावती नदीचा वाराणषी ( काशि ) शी संबंध असावा. हें स्पष्टच आहे की, जर काशि-कोसल आणि विदेह हे एक होते तर त्यांचा कुरूपंचालांशी काहीतरीं वैरभाव संबंध असावा. या दोन मोठया राष्ट्रांत त्यावेळी राजकीय वैरभाव व त्याचप्रमाणें संस्कृतीमध्यें थोडयाफार प्रामाणांत भिन्नता होती हें अनुमान योग्य दिसतें. कोसल आणि विदेह या राष्ट्रांतील आर्य सुधारणेच्या प्रगतीच्या स्थितीबद्दल शतपथ ब्राह्मणांत या वेळची स्पष्ट दंतकथा सापडतें आणि ती ब्राह्मण संस्कृतीचें खरें केंद्रस्थान कुरूपंचाल देश होता याबद्दल एक आधार आहें. भूगोलदृष्ट्या स्थलावरून विचार केला असतां कोसल व विदेह हें कुरूपंचालांच्या अगोदरचे रहिवासी होतें, तरी ब्राह्मण संस्कृति त्यांनां कुरूपंचालांच्या कडूनच मिळाली. पश्चिमेपेक्षां पूर्वभाग जरा कमी संस्कृत होता हें संभवतें; आणि तो भाग ब्राह्मणांच्या धार्मिक वर्चस्वाच्या कमी आधीन होता कारण बुध्दाची चळवळ प्राच्य होती व बुद्धग्रंथात क्षत्रिय वरच्या पायरीचे होते असा उल्लेख आहें. मगधदेशांतील लोक कमी धार्मिक होते म्हणून त्यांनां वैरभावानें वागविलें जात असें. ही गोष्ट वरील विधानास पुष्टि देते, आणि ती वाजसनेयि संहितेंत आहेहि. कोसल, विदेह आणि काशि या खरोखर मागाहून माहित झालेल्या कुरू पंचालांच्याच शाखा असाव्या हें संभवतें; आणि त्यांच्यातील अंतर व मुळच्या रहिवाश्यावर ढिला ताबा यामुळें त्यांनी आपली ब्राह्मणसंस्कृति गमाविली. शतपथ ब्राह्मणांतील आर्यांच्या देशांतरासंबंधी दंतकथेचा शब्दश: भाषांतरानें वरील प्रमेयास जरी दुजोरा मिळाला तरी तें प्रमेय तितकें जोरदार नाहीं.
२८कोक -- हा सत्रासह नामक पंचाल राजाचा पुत्र होता असें शतपथ ब्राह्मणांत सांगितलें आहें.
२९कौसल्य -- कोसल पुत्र शतपथ ब्राह्मणांत पर आट्नार यांचे आणि शांखायन श्रौतसूत्रांत हिरण्यनाम याचें हें नांव आहें. प्रश्नोपनिषदांत आश्वलायनाला (कोसलदेशचा म्हणून) कौसल्य आणि गोपथ ब्राह्मणांत काशि' याला 'काशीचे लोक' (काशि-कौसल्या:) असें म्हटलें आहें. प्रश्नोपनिषद १.१ या ठिकाणी याचें नांव आश्वलायन असावें असें दिसतें परंतु ६.१ या ठिकाणावरून हिरण्यनाम कौसल्य हा राजपुत्रहि असें दिसतें. पहिला राजपुत्र असावा किंवा नाहीं, याबद्दल शंका आहें.
३०गान्धार -- नग्नजित् नांवाचा एक गान्धार राजा ऐतरेय ब्राह्मणांत आहे. शतपथ ब्राह्मणांत याचा किंवा दुसरा स्वर्जित्राग्नजित याचा नग्नजित् असा उल्लेख आहें.
३१जनक -- विदेहाचा राजा. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मण, बृहदारण्यकोपनिषद, जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण व कौषीतकि उपनिषद् या ग्रंथांत प्रामुख्यानें आलेला आहें. हा जनक राजा याज्ञवल्क्य वाजसनेय व श्वेतकुतु आरूणेय यांचा व इतर ऋषींचा समकालीन होता. अजातशत्रु याच्या अमदानींत या जनक राजाची त्याच्या औदार्याबद्दल व मोक्षाचा पाया जें ब्रह्मज्ञान तें काय आहें यासंबंधी वादविवाद करण्याबद्दल फार प्रसिद्धि आहे. या जनक राजाचें कुरूपंचाल देशांतील ब्राह्मणांशी निकट दळणवळण होतें ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. कारण त्यावरून एक अशी गोष्ट सिद्ध होते की उपनिषदांर्गत तात्विक ज्ञानांचे माहेरघर कुरूपंचाळ देशच होता. पूर्वेकडील देश नव्हता. शतपथ ब्राह्मणांत असा एक उल्लेख आलेला आहें, कीं तो ब्रह्मपदास गेला. याचा अर्थ इतकाच की त्याची क्षत्रिय ही जात न बदलता तो ज्ञानानें ब्राह्मणत्व संपादिता झाला जनकाच्या नांवाचा उल्लेख ग्रंथांतहि आलेला आहें. तैत्तिरीय ब्राह्मणांत याला पुराणकालीन महापुरूषांचें महत्व आलेलें आहें. शांखायन श्रौतसूत्रांत त्याच्या नांवावर सप्तरात्र नांवाच्या एका ऋतूचा उल्लेख आलेला आहें. ज्या अर्थी जनक राजा अजातशत्रूच्या समकाली होता आणि हा अजातशत्रु व पालीग्रंथांतील अजातशत्रु या दोन्ही एकच व्यक्ती होत असें मानिलें तर जनक राजा ख्रिस्त शकापूर्वी ६०० वर्षे अगोदर होऊन गेला असें मानणें चुकींचें होणार नाहीं. पण या विचारसरणींत एक चूक होते ती अशी की, अजातशत्रु हा काशीचा राजा होता व अजातशत्रु हा मगध देशाचा राजा होता व त्याचा संबंध काशीशी फक्त कोसलाधिपति पसेनदि याच्या मुलींशी लग्न लाविल्यामुळें आला. शिवाय दुसरी एक अशी अडचण उपस्थित होतें कीं हें दोन्ही अजातशत्रू एकच मानले तर बुद्ध धर्माचा उदयकाल उपनि
षदांतील तत्वज्ञानाशी समकालीन होऊं लागेल. पण वस्तुस्थिति अशी आहे की, उपनिषदें अलीकडील असलीं तरी बुद्धजन्माच्या अगोदर खास लिहिलीं गेलीं. दुसरें असें कीं बिबिसार किंवा प्रसेनजित (पसेनदि) हें जें राजे होऊन गेलें व ज्यांची महति बौद्धग्रंथांत वर्णिली आहे त्यांचा वैदिक ग्रंथांत मागमूसहि नाहीं. कांही लोकांच्या मतें विदेहाचा जनक राजा हाच सीतेचा बाप होता. परंतु हें मत सुद्धां सर्वस्वी खरें मानतां येत नाहीं. सूत्रग्रंथांमध्यें जनकाचें असें वर्णन आहे की तो एक प्राचीन राजा होऊन गेला व तो अशा वेळीं कीं लग्नाच्या स्त्रीला पुढें जो मान मिळूं लागला तो त्यावेळी कमी मिळत असें.
३२जनमेजय -- 'मनुष्यास प्रवृक्त करणारा' असा या शब्दाचा अर्थ आहें. हें नांव एका राजाचें असून ब्राह्मण कालांत तो राजा पारिक्षित या नांवाने प्रसिद्ध होता. शतपथ ब्राह्मणांत या राजाबद्दल अशी माहिती आली आहे कीं, या राजाजवळ पुष्कळ अश्व होते व तें श्रांत झाले म्हणजे त्यांनां मधुर पेय देऊन तो ताजेतवाने करीत असें. शिवाय तो अश्वमेध यज्ञ करीत असें. याच्या राजधानींचें नांव शतपथ व ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथांत उध्दृत केलेल्या गाथेप्रमाणें आसंदीवत हें होंतें. त्याचें बंधू उग्रसेन, भीमसेन व श्रुतसेन यांनी अश्वमेध यज्ञ करून आपल्या पापाचें क्षालन करून घेतलें अशीं कथा आलीं आहें. ज्या पुरोहितानें या जनमेजयाकरितां अश्वमेध यज्ञ केला त्याचें नांव इंद्रोत दैवापि शौनक असें होते; परंतु ऐतरेयब्राह्मणाप्रमाणें ते नांव तुर:कावषेय असें होतें. या ब्राह्मणग्रंथांत अशी एक कथा आली आहे की, या राजानें एका यज्ञाच्या वेळीं कश्यपांनां न बोलावतां भूतवीरांकडून यज्ञ करविला. परंतु नंतर असितमृगांच्या आग्रहावरून पुन्हां त्यानें कश्यपांनांच बोलविलें. जनमेजय हा कुरू राजा होता. गोपथब्राह्मणांत त्याच्याबद्दल तो एक प्राचीन काळचा मोठा पुरूष होता अशा अर्थानें एक हास्यास्पद गोष्ट आली आहें.
३३जानक -- ( जनकाचा वंशज ) हा शब्द वडिलांच्या नांवावरून आलेला असून ऐतरेय ब्राह्मणांत ऋतुविदांचे नांव म्हणून आलेला आहें. तैत्तिरीय संहितेत क्रतुवित् जानकि हें नांव आले आहें. जानक हें बृहदारण्यकोपनिषदाप्रमाणें अयस्थूण याचें पितृप्राप्त नांव म्हणून आलेलें आहें. पण या उपनिषदांत जानक हा जानकि या शब्दाचा नि:संशय अपपाट आहें.
३४जैत्रायणसहोजित -- काठकसंहितेंत राजसूय यज्ञ करणा-या राजाचें हें नांव आहे श्राडरच्या मतें हें विशेष नाम आहे व त्यानें स्वमतपुष्ट्यर्थ जैत्र याचा वंशज जैत्रायणि ( पाणिनीनें केलेल्या गणकादि ) या रूपात उल्लेख केला आहे. पण हें लक्षांत ठेविलें पाहिजे की, कापिष्ठल संहितेंच्या तत्सदृश लेखांत हा पाठ निराळा आहे व तेथें हा शब्द विशेषनामार्थी वापरला आहे असें दिसत नाहीं. कारण तेथें वर्ण्यविषय इंद्र हा असावा. हाच पाठ एकंदरीत बरोबर असावा; कारण सर्व ऋचा सर्वसामान्य असून प्रत्येक अश्वमेध करणा-या राजाला लागू पडणारी आहें.
३५जैवल किंवा जैवलि -- हा शब्द बृहदारण्यक व छांदोग्य उपनिषदांत प्रवाहणांचे पितृप्राप्त नाम म्हणून आला आहे. जैमेनीय उपनिषद्ब्राह्मणांत जैवलि म्हणून जो राजा आला आहे तो हाच होय.
३६दक्षपार्वति -- ( पर्वताचा वंशज ) शतपथब्राह्मणांत कोणतेसें एक व्रत केल्याबद्दल याच्या नांवाचा उल्लेख आला आहें. हें व्रत त्याचें वंशज दाक्षायण हे पुढें चालवीत असत. कारण त्यामुळें ब्राह्मण-कालापर्यंत त्यांनां राजाचा मान मिळत होता. या दक्षाचें नांव कौषीतकि ब्राह्मणांतहि आलेलें आहें.
३७दुर्मुख -- 'कुरूप् चेहरा असलेला' असा याचा अर्थ असून हें नाव ऐतरेयब्राह्मणांत एका पांचालाचें ( पंचाल देशाच्या राजाचें ) आहें. या पांचाल राजानें सर्व जग जिंकून टाकल्याबद्दल व त्याचा पुरोहित बृहदुक्थ नांवाचा असल्याबद्दल ऐ. ब्राह्मणांत उल्लेख आहें.
३८दुष्टरीतु -- ज्याचा पराभव करणे अवघड आहे असा. हें सृंजय नामक लोकांच्या राजाचें नांव आहें. याच्या वंशांत दहा पिढयापर्यंत असलेल्या राज्यावरून तो च्युत झाला. पण शतपथ ब्राह्मणांत सांगितल्याप्रमाणें बाल्हिक प्रातिपीय याच्या प्रतिकारास न जुमानतां चकास्थपतीनें पुन्हां त्याच्या गादीवर त्याची स्थापना केली.
३९देवकीपुत्र -- देवकीचा मुलगा कृष्ण. हें नांव छांदोग्योपनिषदांत आलें आहें. महाभारतांत असें म्हटलें आहें की, कृष्णाची आई देवकी इचा बाप देवक या नंवाचा होता. रॉथचें असें मत आहे की,, देवक हा गंधर्वांचा राजा असावा व अशाच अर्थी महाभारतांत त्याचा उल्लेख आहे (?).
४०देवराजन्:- याचा उघड अर्थ ब्राह्मणवंशांतला राजा असा आहे. हा शब्द पंचविंश ब्राह्मणांत ‘ देवराजाचें साम ’ या समुच्चयांत आला आहे.
४१दैवाप :- ‘ देवापीचा वंशज ’ हें नांव जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण व शतपथ यांत इंद्रोताचें पैतृक नांव म्हणून आलें आहे. या देवापीचा व ऋग्वेदांतील देवापीचा कांही संबंध नाहीं.
४२दैवावृध :- ‘ देवावृधाचा वंशज ’ ऐतरेयब्राह्मणांत हें बभ्रूचें पैतृक नांव आलेलें आहे.
४३दैवोदासि :- ‘ दिवोदासाचा वंशज ’ हें कौषीतकि ब्राह्मण व उपनिषद् यांमध्ये प्रतर्दनाचें नांव म्हणून आलें आहे. हा दिवोदास म्हणजे ऋग्वेदांतील प्रसिद्ध दिवादासच की काय समजत नांही.
४४दौ:षंति :- ‘ दु:षंताचा वंशज ’ हें ऐतरेय व शतपथब्राह्मणांत भरताचें पैतृक नांव म्हणून आलें आहे.
४५द्वैतवन :-‘ द्वितवनाचा वंश ’ शतपथ ब्राह्मणांत उल्लेखिलेल्या अश्वमेधाचा कर्ता व मत्स्य देशाचा राजा जो ध्वसन् त्याचें पैतृक नांव आहे.
४६धानंजय :- धनंजयाचा वंशज. वंशब्राह्मणाप्रमाणें अंशु याचें पैतृक नांव आहे.
४७धृतराष्ट्रवैचित्रवीर्य :- ‘विचित्रवीर्याचा वंशज’ काठकसंहितेंत हें नांव एका ठिकाणी आलें आहे. पण हा लेख अत्यंत दुर्बोध आहे. हा कुरूपंचाल देशाचा राजा नसून त्या देशांपासून कांही अंतरावर रहात असावा. हा धृतराष्ट्र आणि ज्याचा पराभव अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी शतानीक सात्राजितानें केला तो काशीचा राजा व शतपथ ब्राह्मणांत उल्लेखिलेला धृतराष्ट्र हे सर्व एकच होत असें न मानण्यास कांही सबळ कारणें नाहींत असें मॅकडोनेल म्हणतो. सत्राजित हा भरत होता यावरून कुरूपांचाल हा धृतराष्ट्र नसावा असा त्यास संशय येतो. काठकसंहितेंत धृतराष्ट्राचा बकदाल्भ्य यांशी वादविवाद झाल्याचा उल्लेख आहे ही गोष्ट खरी; पण शतपथब्राह्मणांत उल्लेखिलेला धृतराष्ट्र राजा हा पंचाल होता असें जरी गृहीत धरलें तरी प्रथम उल्लेखिलेला धृतराष्ट्र कुरू होता. किंवा या तंट्यावरून कुरू व पंचाल यांमध्यें पूर्वीपासून वैर होतें अशा प्रकारची अनुमानें करणें चुकीचे होइल अशी त्याची विचारसरणी आहे. आतां महाभारतांत शंतनु विचित्रवीर्य धृतराष्ट्र यांचे संबंध दाखविले आहेत. पण हे संबंध पूर्वकालीन मोठ्या विभूतीसंबधानें जो घोटाळा केलेला असतो त्यामुळें येतात असें त्याचें म्हणणें आहे. परंतु महाभारतांतील परंपराहि अधिक जुनी असण्याचा संभव आहे.
४८ध्वसन् द्वैतवन :- ‘ द्वितवनाचा वंशज ’ शतपथब्राह्मणांत सरस्वती नदीचे कांठी यज्ञ करणाया मत्स्य लोकांच्या राजांचें हें नांव आहे.
४९नग्नजित :- हा गान्धार देशाचा राजा असून एतरेय ब्राह्मणांत पर्वत, व नारद यांनीं याला राज्याभिषेक केला अशी कथा आली आहे. शतपथ ब्राह्मणांत या राजाचें नांव स्वर्जित् याच्या पुत्राबरोबर आलें आहे व त्याच ग्रंथांत या दोघांपैकी एकानें दिलेल्या एका धार्मिक विधीची बरीच थट्टा केली आहे.
५०नडनैषध :- शतपथब्रह्मणांत याचा उल्लेख आला आहे. हा मानवी राजा असावा व त्यानें जे विजय संपादिले त्यामुळें त्याची यमाशी तुलना केली असावी. याच ब्राह्मणग्रंथांत याला दक्षिणेकडील यज्ञांतील अग्नि असें म्हटल्यावरून हा बहुतकरून दक्षिण दिशेचा राजा जसा यम हा मानिला आहे त्याप्रमाणें हाहि दक्षिणेकडील राजा असावा नड आणि दमयंतीपति नल हे एकच असावेत.
५१नाग्नजित् :- ‘ नग्नजिताचा वंशज.’ शतपथ ब्राह्मणांत स्वर्जिताचें हें पैतृक नांव आहे.
५२नैषिध :- शतपथब्राह्मणांत हें नांव आलें आहे व तें दक्षिणेकडील राजाचें विशेषण म्हणून आलें आहे. याच नांवाचें पुढें प्राचारांत आलेलें नैषध हें रूप होय व तें सें. पी. कोशीलाहि मान्य आहे. नड आणि नल हे एकच होत. कारण ‘ डलयोरभेद: ’ असा नियमहि आहे. कदाचित याला निषध देशाचा राजा म्हणून नैषिध म्हटलें असावें. कदाचित् नैषिध हेंच रूप बरोबर असावें.
५३पांचाल :- या शब्दाचा अर्थ पंचाल लोकांचा राजा असा आहे. ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द दुर्भुखाला लाविलेला आहे व शतपथ ब्राह्मणांत शोणास लाविलेला आहे. जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांतहि हा शब्द आलेला आहे.
५४पारक्षित :- परिक्षिताचा वंशज. ऐतरेय व शतपथ ब्राह्मणांत जनमेजयाचें पैतृक नांव म्हणून हा शब्द आलेला आहे. हे पारिक्षितीय, शतपथब्राह्मणांत व शांखायन श्रौतसूत्रांत अश्वमेधयज्ञकर्ते म्हणून आलेले आहेत. त्यांत जी गाथा आहे तीत जनमेजयाचे उग्रसेन, श्रुतसेन व भीमसेन या नांवांचे भाऊ होते व त्यांनां पारिक्षित हें नांव देत असल्याचा उल्लेख आहे. बहदारण्यकोपनिषदांत ते कोठें गेले याबद्दल बरीच तात्त्विक चर्चा केलेली आहे. या उपनिषद्कालाच्या अगोदरच हें घराणें नामशेष झालें होतें असें स्पष्ट दिसतें. हें घराणें जें उच्च पदवीला पोंचलें होतें त्या बरोबरच कांहीतरी विशेष जनप्रवाद होता व त्याची निष्कृति ब्राह्मणांच्या मतानें त्यांनी अश्वमेध करून व उपाध्यायास मुबलक दक्षिणा देऊन केली असावी हेंहि स्पष्ट आहे. वेबर म्हणतो या कथेंतच महाभारतांत वर्णिलेल्या कथेंचें बीज असावें. अथर्ववेदांत आलेल्या परिक्षितासंबंधीच्या मंत्रांनांच पुढें ‘ पारिक्षित्य:’ हें नांव दिलें असावें.
५५प्रतीदर्शश्वैक्न :- याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत आला आहे. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत आला आहे. याचा उल्लेख दाक्षायणाबरोबर यज्ञांत हवन करतांनां व सुफ्लन साञर्जय याला शिकवितांना आढळतो. नंतर हाच सहदेव साञर्जय झाला असावा. दुस-या एका उता-यांत याला सुप्लन् साञर्जय याच्या संबंधांत आणिलें आहें. एगलिंगच्या मताप्रमाणें याला श्विक्रांचा राजा ठरविलें पाहिजें तो इभावताचा वंशज होता. एका प्रतीदर्शाचा उल्लेख जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत आढळतो.
५६बाल्हिक प्रातिपीय -- हें नांव शतपथ ब्राह्मणांत एका कुरू राजांचे म्हणून आलें आहे. सृंजयाचा दुष्टरीतु पौस्यायन हा पुन्हा राजा होऊ नये म्हणून यानें बराच अडथळा आणला. परंतु त्यांत त्याला अपयश आलें व पौस्यायन हा ' रेवोत्तरस् पाट व चाक्रस्थपति' याच्या मदतींनें आपल्या पूर्वजांच्या गादीवर बसला. प्रतिपीय हें विशेषण जरा चमत्कारिकच आहें. जर याचा संबंध प्रतीपाशी लावावयाचा असेल ( याचाच तो इतिहास ग्रंथांत (भारतांत) मुलगा आहें. ) तर हें रूप् चमत्कारिक ( चूक या अर्थी ) आहें. झिमर याचें 'प्रातीपीय' असें रूप करतों. महाभारतांत हा बाल्हिक या रूपांत आहे व त्याला देवापि आणि शंतनु यांचा भाऊ बनविलें आहें व प्रतीपाचा मुलगा असेंहि म्हटलें आहे. या कथेवरून यांच्या कालाचा निर्णय करणें फार कठिण आहे कारण वास्तविक देवापि हा ऋष्टिषेणाचा मुलगा असून एक ऋषि होता व शंतनु हा कुरूंचा राजा असून त्याच्या वंशाचा पत्ता लागत नाहीं. परंतु तो बहुधा प्रतीपाचा मुलगा असावा. प्रतीप हा वेदांत परिक्षिताच्याहि मागाहून आला आहे व तो परिक्षित तर त्याचा पणतू आहें. बहुधा बल्हिक हा प्रतीपाचा वंशज असावा. त्यानें बाल्हिक हें नांव कां धारण केलें हें सांगणें कठिण आहें. कारण त्याबद्दल कांही पुरावा सांपडत नाहीं. परंतु बाल्हिक हें देशाचें नांव असून त्यावरून 'तात्स्थ्यात्तत्वं' या न्यायानें हें नांव पडण्याचा संभव आहें.
५७भगीरथ ऐक्ष्वाक -- इक्ष्वाकुवंशज. हें गांव जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत एका राजाचें म्हणून आलें आहें. हा कुरूपांचालाबरोबर मित्रत्वानें वागत होता ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहें. यावरून इक्ष्वाकू हें कुरूपांचाल लोकांबरोबर मित्रत्वानें संबद्ध होते असें ठरतें व ते बुद्ध ग्रंथांत लिहिल्याप्रमाणें हिदुस्थानच्या पूर्वेकडील नव्हते.
५८भंगाश्विन -- बौधायन श्रौतसूत्रांत ऋतुपर्णाच्या बापाचें हें नांव आलेलें आहें. महाभारतांत याला भांगांसुरि असें नांव दिलें आहें. ऋतुपर्णकयोवधि हेंच भंग्यश्विनौ होत असा उल्लेख आपस्तंब श्रौतसूत्रांत आला आहें.
५९भयद आसमात्य -- असमातीच्या वंशज जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत हें एका राजाचें नांव आहें. ओरटेल याच्या मतानें हें नांव 'अभयद' असें असावें. परंतु हें शक्य दिसत नाहीं. कारण 'भयद' हें नांव पुराणांत आलें आहें.
६०बाष्किह -- बष्किहाचा वंशज. पंचविशब्राह्मणांत हें शुन:स्कर्णाचें पैतृक नांव म्हणून आलें आहें. बौधायन श्रौतसूत्रांत याला शिबीचा वंशज म्हटलें आहें.
६१भीमसेन -- जनमेजय पारिक्षित याच्या भावाचें हें नांव शतपथ ब्राह्मणांत आलें आहें. शौनकांनी भीमसेनाकडून यज्ञ करविल्याचा शांखायन श्रौतसूत्रांत उल्लेख आहें.
६२भीम वैदर्भ -- विदर्भाचा राजा. सोमरसाच्या ऐवजी दुसरा पदार्थ घेण्याबद्दल याला पर्वत आणि नारद यांच्या पासून गुरूपरंपरागत माहिती मिळाली होती. असा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहें. सायणाचार्य या ठिकाणी भीम आणि वैदर्भ हे भिन्न आहेंत असें म्हणतात.
६३भौवन -- भुवनाचा वंशज. हें निरूक्त, ऐतरेय व शतपथ ब्राह्मणं यांत ऐतिहासिक पैतृक नांव आलें आहें.
६४मरूत आविक्षित -- कामप्रीचा मुलगा हें एका राजाचें नांव आहें. ऐतरेय ब्राह्मणांत याला संवर्ताकडून राज्यभिषेक झाल्याचा उल्लेख आहें. शतपथ ब्राह्मणांतील या राजाच्या चरित्रावरून याला 'आयोगव' म्हणत असत असें दिसतें.
६५मान्घातृयौवनाश्व -- युवनाश्वाचा वंशज. गोपथ ब्राह्मणांत एक राजा म्हणून याचा उल्लेख आला आहें. कबन्ध आथर्वणाचा शिष्य विचारिन् याचा हा शिष्य होता.
६६मार्गवेय -- हें राम याचें पैतृक नांव ऐतरेय ब्राह्मणांत आलें आहे व तेथें त्याला श्यापर्ण म्हटलें आहें. कदाचित हा मृगवु नामक स्त्रीचा मुलगा असून श्यापर्ण हें त्याचें कुलनाम असावें.
६७भुंज सामश्रवस् -- हें एखाद्या मनुष्याचें अथवा राजाचें नांव असावें. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत व षड्विश ब्राह्मण यांमध्यें याचा उल्लेख आहें.
६८युधांश्रौष्ठि-औग्रसैन्य -- उग्रजेनाचा वंशज. पर्वत आणि नारद यांनी राज्याभिषेक केलेल्या ऐतरेय ब्राह्मणांतील एका राजाचें हें नांव आहें.
६९रथप्रोत-दार्भ्य: -- दर्भाचा वंशज. मैत्रायणी संहितेंत राजा या अर्थानें आणि विशेषत: गुरू या नात्यानें याचा उल्लेख आला आहें.
७०रोहित -- ऐतरेय ब्राह्मण व शांखायन श्रौतसूत्र यांत वर्णिलेल्या शुन:शेपाच्या प्रसिद्ध गोष्टित हरिचंद्राच्या मुलांचें हें नांव आलें आहे
७१वारकि -- वारकाचा वंशज, जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत कंसाचें पितृप्राप्त नांव म्हणून याचा उल्लेख आहें
७२विदेघ -- शतपथ ब्राह्मणांत माथव नांवाच्या एका मनुष्याचें हें नांव आहें. मागाहून ज्यांनां विदेह लोक म्हणूं लागले त्या विदेह देशाच्या राजाला हें नांव दिलें होतें. असें मानणें गैरशिस्त होणार नाहीं
७३वृद्धद्युत्र-अभिप्रतारिन् -- हें ऐतरेय ब्राह्मणांत एका राजाचें ( राजन्याचें ) नांव आलें आहें. व त्यांत त्याचा उपाध्याय शुचिवृक्ष गौफलायन याची स्तुति आली आहें. शांखायन श्रौतसूत्रांत असा उल्लेख आहे की बृद्धद्युम्न अभिप्रतारिन् यानें 'त्रिष्टोमक्षनक्षत्रवृति' नांवाचा यज्ञ केला. त्रिष्टोम म्हणजे स्तुतिरूप् मंत्रांची ( सामांची ) तीन तीन वेळां आवृत्ति करणें. अशा प्रकारचा राजानें केलेंला हा 'त्रिष्टोमक्षत्रधृति' यज्ञ एका पुरोहितास पसंत पडला नाहीं.त्याच्या मतानें फक्त क्षत्रधृति यज्ञच करावा, त्रिष्टोम करूं नयें असें होतें. आणि या पातकामुळेंच या संग्रामात कुरूचें करूक्षेत्रांतून उच्चाटन होईल असा शाप दिला, आणि त्याचप्रमाणें पुढें घडून आलें (वरील स्थली या ठिकाणी शाप देणा-या पुरोहिताच्या नांवाचा उल्लेख नाहीं व भविष्याचाहि संबंध नाहीं).
७४शतानीक-सात्राजित -- ऐतरेय व शतपथ ब्राह्मणांत काशीचा राजा धृतराष्ट्र याचा पराभव करून त्याच्या अश्वमेध यज्ञांतील घोडा घेऊन जाणा-या एका राजाचें हें नांव आहें. हा नि:संशय भरत होता. याचा अथर्ववेदांतहि उल्लेख आलेला आहे. व तेथें दाक्षायणासंबंधानें ' दाक्षायण ब्राम्हणानें ज्याप्रमाणें शतानीकाला बांधिलें त्याप्रमाणें आम्ही तुला सुवर्णानें बांधितों ' असा उल्लेख आहें.
७५शिबि -- हा उशीनराचा मुलगा होता. हा इंद्राचा आश्रित असल्याबद्दल बौधायन श्रौतसूत्रांत उल्लेख आहें. इंद्रानें ' वर्षिष्ठीय ' नामक भूप्रदेशावर यज्ञ करून परचक्रापासून याची मुक्तता केली.
७६शुन:कर्ण -- बौधायन श्रौतसूत्रांत हें एका राजाचें नांव आलें आहें. हा शिबि किंवा बष्किह याचा मुलगा होय. यानें सर्वस्वार नांवाचे एक कर्म आचरून रोगाशिवाय मृत्यु संपादिला अशी कथा पंचवीश ब्राह्मणांत आली आहें.
७७शैव्य -- शिबीचा वंशज. ऐतरेय ब्राह्मणांत 'अमित्रतपन शुष्मिन' नामक राजाचें हें नांव आहें. प्रश्नोपनिषदांत सत्यकाम जाबालाचें हें पैतृक नांव आहें.
७८शोणसात्रासाह -- हा पंचाल देशाचा राजा असून याचें नांव शतपथ ब्राह्मणांत आलें आहें. यानें अश्वमेध यज्ञ केला त्या वेळी तुर्वश देखील आलें होतें, असें त्याच ब्राह्मणांत म्हटलें आहें.
७९सनश्रुतअरिदम -- ऐतरेय ब्राह्मणांत एका महाराजाचें हें नांव आलें आहें. सनश्रुत व अरिंदम हे गुरूशिष्य अथवा कदाचित् एकच व्यक्ति असावी असें सायणाचार्य भाष्यांत म्हणतात.
८०सुश्वन-कैरिशि-भार्गायण -- ऐतरेय ब्राह्मणांत हे एका राजाचें नांव असून याला मैत्रेय कौषारव यानें मंत्र शिकविल्यामुळें यानें पांच राजे ठार मारून महत्पद प्राप्त करून घेतलें.
८१सुल्पन-सार्ञ्जय -- प्रतीदर्शानें ज्याला दाक्षायण यज्ञ शिकविला त्या सृंजय लोकाच्या राजाचें हें नांव शतपथ ब्राह्मणांत आलें आहें. या यज्ञांत याला यश मिळालें म्हणून यानें सहदेव हें नांव धारण केलें.
८२हरिश्चंद्र-वैधस-ऐक्ष्वाक -- एका कथेतील राजाचें नांव. यानें अविवेकानें आपला रोहित नामक मुलगा वरूण राजास बलि देण्याचे कबूल केले, या संक्षिप्त गोष्टीवरून ऐतरेय ब्राह्मण व शांखायन श्रौतसूत्रांत शुन:शेपाची विस्तृत गोष्ट आली आहें.
८३हिरण्यनाभ -- हें कोसल देशच्या राजाचें नांव आहें. यानें अश्वमेध केल्याचा शांखायन श्रौतसूत्रांत उल्लेख आहें. याचा प्रश्रोपनिषदांत उल्लेख आला असून परआट्णाराशीहि त्याचा संबंध असावा.
८४हैरण्यनाभ -- हिरण्यनाभाचा वंशज. शतपथ ब्राह्मणांतील एका गाथेंत कोसल राजा परआट्णार याचें पैतृक नांव म्हणून याचा उल्लेख आहें.