प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

विचार

 ब्रह्मविशेषणें (ॠग्वेद) / वेदान्त (ऋग्वेद ) /
ऋषि - ऋषिनामें (ऋग्वेद )

*ॠषि - या शब्दाची व्युत्पत्ति कठिण आहे.हा शब्द कदाचित अत्यंत पूर्वकालीन धातूपासून झाला असेल ॠषींचें मुख्य काम म्हणजे ईश्वरविषयक स्तोत्र तयार करणें. ॠग्वेदांत जुने आणि नवे अशा ॠषीचा उल्लेख आला आहे (अग्निः पूर्वेभिः ॠषिभिः ॠ. १.१,२) जुन्या ॠषींची स्तोत्र त्यांच्या कुलांतील लोक संरक्षण करीत असत व त्यांत भर घालीत असत. परंतु ॠषींचा मुख्य उद्योग म्हणजे स्तोत्रें करीत असणें हाच असे संहितीकरणकालापर्यंत ही स्तोत्ररचना सारखी चालू होती. उदाहरणार्थ गाथा. या गाथा आचार्य स्वतःच रचून पठण करीत असत.
असें ॠग्वेद (९,९६,६) व शतपथ ब्राह्मण (१२.४,४,६) यांवरून आढळतें. ब्राह्मणांमध्यें जे श्रेष्ठ असत त्यांनांच ॠषि ही पदवी दिली जात असे. व त्यांचें कौशल्य दैवी असे असें दर्शविलें आहे ॠषी बहुतेक राजे लोक यांच्या घरी पुरोहित या नात्यानें आश्रित म्हणून राहत असत. क्वचित् राजेलोकहि स्तोत्रकर्ते असल्याचे आढळतें. पंचविंश ब्राह्मणांत (१२,१२,६) स्तोत्रकर्त्या राजपुत्रांनां (ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणें हा शब्द जरी काल्पनिक असला तरी) राजन्यर्षि अथवा राजर्षि हा शब्द लावीत. स्तोत्रकर्त्यामध्यें जरी कांही राजे असले तरी बहुतेक सूक्ते ब्रह्मणांनीच केलेली आहेत. ॠषी हे पवित्रभूत अशा कालचे प्रतिनिधि म्हणून मानिले जात व त्यांनां साधु असेंहि म्हणत यांचे सप्तर्षि असे समुच्चयात्मक नांव ॠग्वेदांत चरवेळ व अथर्ववेद आणि वाजसनेयि संहिता या ग्रंथांतून आढळते. या सात ॠषीचा बृहदारण्यकोपनिषदांत (२.२,४) अनुक्रमे उल्लेख असून तेथे दोन नेत्र, दोन कर्ण, दोन घ्राणद्रियें आणि सातवी वाणी याशी त्यांचा संबंध जोडला आहे हे सात ॠषि म्हणजे गोतम, भरद्वाज, विश्वमित्र, कश्यप, वसिष्ठ, जगदग्नि व अत्रि हे होत. उपनिषदांतील उता-यांत अत्रीचा संबंध त्या शब्दाच्या व्यप्तत्तीवरून वाणीशी जोडला आहे. ॠग्वेदांत वरील सात ॠषीशिवाय आणखी ब-याच ॠषीचा उल्लेख आहे व त्यांच्या संबंधी माहिती याच भागातील दाशराज्ञयुद्धप्रकरणात आली आहे. अथर्ववेदांतील  एकाच ॠचेंत (४.२९,३) सुमारें अठरा ॠषींची नांवे आलीं आहेत व तीं सर्व ॠग्वेदांत आलेल्यापैकीच आहेत. भाटचारण्यादिकांच्या काव्याप्रमाणें ॠषींच्या स्तोत्रांत चढाओढीनें कूटस्तोत्रांची रचना होत असे. ही कूट वाक्ये अथवा भाग (ब्रह्मोद्य) अश्वमेध ॠतूतील एक मुख्य अंग म्हणून गणला जात असे. अशा प्रकराच्या कूट वाक्यांच्या संबंधी चढाओढ अथवा वादविवाद उपनिषद्वाङ्मयांत जास्त आढळतो. असले वाद जिंकणारे ॠषी त्याचा मोबदला म्हणून राजाकडून दक्षिणा मिळवित असत. ॠग्वेद १०.८२.२ यांतील सप्तर्षि व शब्द आकाशातील ता-यांचा वाचक आहे असें पाश्चात्य पंडिताचें मत आहे. ते याला मोठें अस्वल असें म्हणतात. याला पूर्वी सप्तॠक्ष असें म्हणत असत. परंतु पुढे वारंवार सप्तॠषि असा शब्द आल्यामुळें सप्तकक्ष याचा सप्तर्षि असा अर्थ होऊं लागला असावा असें मॅकडोनेलचें म्हणणे आहे. ॠग्वेदांत आलेल्या वरील उता-यांतील सप्तॠषि याचा मोठें अस्वल असा सायणांनीं अर्थ केला नाहीं परंतु ॠ. १.२४, १० मधील ॠक्ष शब्दाचा ॠक्षाः सप्तर्षयः असा अर्थ केला आहे आणि त्याला ॠक्षइति हा स्मवै पुरा सतॠपीनचक्षो असा वाजसनेयि संहितेंतील आधार दिला आहे.

xमुनि- हा शब्द ॠग्वेदांत दोन ठिकाणीं आला आहे. तेथें त्याचा अर्थ ईश्वरप्रेरित व अद्भुत शक्ती असलेला असा आहे. पहिल्या मंत्रांत मुनि हा शब्द अनेकवचनी असून ते पिशंगवणीची व मळकट वस्त्रें वापरीत असें म्हटलें आहे. सायणमताप्रमाणें हे मुनि म्हणजे वातजूति, विप्रजूति वगैरे नांवांचे ॠषि होत व ते विरक्त असून वल्कलें परिधान करीत असत. वर जें मुनींचें वर्णन दिले आहे तें ऐतरेय ब्राह्मणांत ऐतशप्रलाप नामक मंत्रकांड पठण करणा-या ऐतश नामक मुनीशी सदृश आहे. तेथें हें मंत्रकांड पठण करीत असलेल्या आपल्या पित्यास भ्रम झाला आहे असें समजून त्याच्या मुलानें विसंगत अशा प्रकारचें तें मंत्रकांड पठण बंद केलें. परंतु हें त्याचें करणें बरोबर नव्हतें. कारण ऐतश भ्रमिष्ट होऊन कांही तरी प्रलाप काढीत होता असे नसून तें मंत्रकांडच तसें होतें. वर ॠग्वेदांतील मुनि व ऐतशमुनि यांचे मॅकडोनेलनें दाखविलेलें साम्य सायणसंमत नाहीं. ॠग्वेदांत एका मंत्रात इंद्राला मुनीचा सखा असें म्हटलें आहे. अथर्ववेदांत (८.६,१७) मुनि शब्द सामासिक शब्दांत आला असून त्याचा वरीलप्रमाणेंच सायणांनीं अर्थ दिला आहे. उपनिषदग्रंथांत मुनि हे अधिक निग्रही असत असे दाखविले आहे. जो अभ्यासानें, यज्ञानें, तपाने, श्रध्देनें अथवा व्रतनियमांच्या योगानें पूर्णब्रह्माचें स्वरूप ओळखण्यास शिकतो अथवा ओळखतो त्याला मुनि असे म्हणत. वेदांतील मुनी व उपनिषदांतील मुनि यांच्यात फारसा भेद आहे असें म्हणता येणार नाहीं. दोहींमध्यें मुनि हे ब्रह्मानिदांत निमग्न असत असेच वर्णिले आहे. तरी पण वेदांतील मुनीपेक्षा उपनिषदांतील मुनींच्या ऐहिक आकांक्षा अगदीच कमी असत असें दिसतें. वेदवाङ्मयांतील मुनीच अध्यात्मज्ञानाकडे विशेष ओढ नसून ते वैद्यकी करीत असत. वेदग्रंथांत मुनीचा विशेषसा उल्लेख नाहीं. म्हणून त्या कलीमुनि कमी असत असें म्हणतां येत नाहीं. श्रौत धर्माचरण कणा-या कर्मठ लोकांनां या मुनींना फारसा मान दिलेला नाहीं. मुनीच्या व कर्मठांच्या ध्येयांत फरक होता. केवल सतति अथवा संपत्ति मिळविणें या कर्मठांच्या ध्येयापेक्षां मुनीचें ध्येय श्रेष्ठ प्रकारचें होतें.

अरुणऔपवेशिगौतम- हें एका आध्यापकाचें नांव आहे. तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत याचा वारंवार उल्लेख आला आहे. प्रसिद्ध उद्दालक आरुणि हा याचा मुलगा होय. हा उपवेशि गौतम याचा शिष्य व राजपुत्र अश्वपेतीच्या गुरुचा समकालीन असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१०.६,१,२) उल्लेख आहे.
आट्णार- पर याचा वंशज. यानें अग्निचयन केल्यामुळें याला संतति प्राप्त झाल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आहे.
कुसुरुबिन्द्र औद्दालकि- यानें आपणास पशूंचा लाभ व्हावा म्हणून एक यज्ञ केल्याबद्दलचा तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आहे. याचा आणखी उल्लेख  जैमिनीय (१.७,५) व पंचविशंब्राह्मणांत (२२.१५. १०) आला आहे.
केशिन- सात्यकामि- यानें केशिन् दार्भ्य याला शत्रूंचा नाश होण्यासाठीं आपल्या यज्ञांत एका विशिष्ट मंत्राची भर घालण्यास सांगितल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत (२.६,२,३) उल्लेख आहे.
कौसुरबिंदि-प्रोतिकौशंबेय- हा उद्दालकाचा शिष्य व समकालीन असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१२.२,२,३) उल्लेख असून तैत्तिरीय संहितेंत याला औद्दालकि म्हटलें आहे. या गोष्टीवरून अशा पितृवंशिक नांवांना फार थोडे महत्त्व दिलें पाहिजे हें उघड दिसतें. शिवाय अमुक मनुष्य अमक्याचा समकालीन होता या गोष्टीला सुद्धां विशेष महत्त्व देऊन चालावयाचें नाहीं. (असें मॅकडोनेल म्हणतो)
ॠतुजिज्जानकि - डोळे अधू असलेल्या रजनकौणेय याची दृष्टी साफ होण्याकरितां ॠतुजिज्जानकि यानें रजनकौणेय याजकडून एक त्रिहविष्का नामक दृष्टि करविल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत (२,३,८,१) उल्लेख आहे.
चैत्रियायण- हा यज्ञसेनाचा वंशज असून यानें छंदोभिद्  नामक इष्टकांच्या चितीच्या साधनानें पशूंची प्राप्ति करून घेतल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत (५.३,८,१) उल्लेख आहे.
जानकि- जनकाचा वंशज. हें तैत्तिरीय संहितेंत क्रतुजिताचें, ऐतरेय ब्राह्मणांत ॠतुविदाचें आणि बृहदारण्यकोपनिषदांत अयस्थूणाचें पितृप्राप्त नांव आहे. बृहदारण्यकोपनिषदांत याला चूलभागवित्तीचा शिष्य व सत्यकाम जाबालाचा गुरू असें म्हटले आहे. वरील सर्व स्थली उल्लेखिलेला जानकि एकच किंवा अनेक व्यक्ती याबद्दल खात्री नाहीं.
जामदग्निय- तैत्तिरीय संहितेंत जमदग्नीच्या दोन वंशजाचें म्हणून हें नांव आले आहे. जमदग्नीनें चतूरात्र नामक एक यज्ञ केल्यामुळे पुढें त्याच्या पिढींत दरिद्री निपजला नाहीं व एकदा प्रमादानें दरिद्रि झालाच तर लगेच दुस-याच पिढींत त्याचें दारिद्र्य नष्ट होत असे असा तेथें (तै.सं. ७.१,९,१) उल्लेख आहे.
१०पुलस्तिन् - हा शब्द तैत्तिरीय संहितेंत आला असून याचा अर्थ मोकळे केश ठेवणारा असा होतो व तो कपर्दिन् म्हणजे डोक्यावरील केसांच्या जटा बांधणें याच्या उलट आहे. वरील अर्थ सायणसंमत नाहीं.
११प्रयोग- तैत्तिरीय संहितेंत एक सूक्तांचा द्रष्टा म्हणून याचा उल्लेख आहे. ॠग्वेदाच्या सर्वानुक्रमणिकेप्रमाणें हा तैत्तिरीयांत उल्लेखिलेल्या ॠचांचा (ॠ. ८.१००) द्रष्टा आहे.
१२बंबाविश्वावयसौ - या समासग्रथित अशा नांवाच्या ॠषीचा तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आहे. यांनीं एका विशिष्ट देवतेला सोमरस अर्पण करण्याचा नवा संप्रदाय सुरू केला.
१३शण्ड- हा शब्द मर्क या शब्दाशीं जोडलेला आढळतो. यजुर्वेद संहितेंत यांचा उल्लेख असून शण्ड व मर्क हे दोघे असुरांचे पुरोहित होते असें म्हटलें आहे.
१४शौचेयसार्वसेनि- तैत्तिरीय संहितेंत हें एक पैतृक नांव आहे. सायणमतानें शुचा ही स्त्रीं असून शौचेय हें मातृक नांव आहे. यानें पंचरात्र नांवाचा एक यज्ञ करून पशूंची प्राप्ति करून घेतली.
१५श्रायस - याचा उल्लेख तैत्तिरीय संहितेंत दोन ठिकाणीं आला आहे. एका ठिकाणीं (५.४,७,५) हें कण्वाचें पैतृक नांव आहे असें म्हटलें आहे व दुस-या ठिकाणीं (५.६,५,३) हें वीतहव्याचें पैतृक नांव असें म्हटलें आहे. वरील दोन ठिकाणीं उल्लेखिलेला श्रायस हा एकच असेल असें म्हणतां येत नाहीं. कारण त्याचा दोन्ही ठिकाणी निरनिराळया प्रकारानें व निरनिराळया निमित्तानें उल्लेख आहे.
१६संश्रवस्-सौवर्चनस्- तैत्तिरीय संहितेंत याचा उल्लेख आहे. सत्रांतील होत्यानें करावयाच्या इडोपाव्हानासंबंधीं तुमिंज नामक एका ॠषीशीं याचा संवाद झाल्याबद्दल उल्लेख आहे.
१७सनातन- चितिसंबंधानें इष्टकांचें उपधानप्रसंगी पूर्वादि दिशांची स्तुति करतांना पूर्वादि दिशांच्या ठिकाणीं अनुक्रमें सानग,सनातन, अहंभूत, प्रत्न आणि सुपर्ण या ॠषींचा उल्लेख आला आहे. बृहदारण्यकोपनिषदांत सनग व सनारु यांचा गुरुशिष्यसंबंध आला आहे. (बृ.उं. २.५,२२).
१८सात्यहव्य- याचा तैत्तिरीय संहितेंत बहुयाजक सृंजयांनीं समिष्टयजु नामक मंत्र कोणत्या प्रकारें पठण करावा या विषयीं देवभाग नामक ॠषीला प्रश्न केल्याबद्दल उल्लेख आला आहे. ऐतरेय ब्राह्मणांतहि याचा उल्लेख आहे. याला वासिष्ठ असें म्हटलें आहे.
१९हविष्कृत् हविष्मत्- आंगिरस नामक कांही ॠषींनीं यज्ञानुष्ठानाच्या योगानें  स्वर्गप्राप्ति करून घेतली. परंतु त्यांच्यापैकी हविष्कृत्  व हविष्मत् नांवाचे दोघे स्वर्गातून च्युत झाले. तथापि स्वर्गप्राप्तीसंबंधी त्यांची अत्यंत उत्कट इच्छा असल्यामुळें द्विरात्र नांवाचा यज्ञ करून त्यांनी स्वर्ग मिळविला.
२०अगस्ति- ॠग्वेदांत येणा-या अगस्त्य या शब्दाचेंच हें दुसरें रूप असावें. याचा अथर्ववेदांत उल्लेख आला आहे. ॠग्वेदांत याला मित्रावरुणांचा  मुलगा म्हटलें असून अथर्ववेदांत याला मित्रावरुणांचा अत्यंत आवडता असें म्हटलें आहे. मरुतांनां उद्देशून उपाकरण केलेला यज्ञीय पशु ज्या वेळीं इद्रानें पळविला तेव्हां मरुत्  हे वज्र घेऊन इंद्राला मारण्यासाठी उद्युक्त झाले असतां अगस्त्यानें त्यांचें शांतवन करून इंद्राचें व मरुतांचें सख्य घडवून आणिलें अशी जी कथा तै.सं. (७.५,५,२), तै. ब्राह्मण (२.७,११,१) मैं. संहिता (२.१,८) काठक संहिता (१०.११), पंचविंश ब्राह्मण (२१.१४,५), ऐ. ब्रा.  (५.१६) या ग्रंथांतून आली आहे तिचें मूळ ॠग्वेद १.१६५, १७०,१७१ या सूक्तांतून आहे. ओल्डेंनबर्ग, सीज, हर्टेल व्हानश्राडर यांचे अगस्त्याच्या वरील कथेसंबंधी एकमत नाहीं. ॠग्वेदांत (१.१७९) लोपामद्रेबरोबर याचें जें संभोगाविषयक संभाषण झालें आहे त्यांत हा ज्ञानी असूनहि तिच्या प्रेमयाचनेस वश झाला असें म्हटलें आहे. व्हानश्रोडर याचें असें मत आहे कीं, हें वृषोद्भवविषयक रूपक असावें. सायणमतानें अगस्त्य हा खेल नामक राजाचा पुरोहित होता, परंतु पिशेल म्हणतो कीं, खल ही विवस्वत् देवता होय. अगस्त्याच्या बाबतींत सीजचें मत सायणाप्रमाणेंच आहे. तो वसिष्ठाचा भाऊ असून तृत्सूंनां वसिष्ठाची ओळख करून देतो असें अनुमान ॠग्वेद ७.३६,१०;१३ या ॠचांवरून निघतें असें गेल्डनेर म्हणतो.
२१असित- याचा अर्थवेदांत गय आणि जमदग्नि यांच्यासह घटस्फोटप्रकरणांत उल्लेख आला आहे. शतपथांत याला असितधान्व असें म्हटलें असून शांखायन श्रौतसूत्रांत अश्वमेध प्रकरणांत अनुक्रमें दहा दिवस चालावयाच्या पारिप्लवाख्यानांतील सातव्या दिवशीच्या पारिप्लवाख्यानांत असितधान्वन् हा राजा व असुरविद्या हा त्यांचा वेद असा उल्लेख आहे. पंचविश ब्राह्मण व काठक संहिता यांमध्ये याला असित देवल म्हटलें आहे.
२२नारद- अथर्ववेदांत ब्राह्मणानें वशा धेनूचें मांस भक्षण करावें कीं, नाहीं या संबंधीच्या सल्ल्यांत याचा उल्लेख आला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत पुरुषमेधयज्ञाची हरिश्चंद्राला यानेच सल्ला दिली आणि नारद व पर्व्त यांनी आंबाष्ठय व युधांश्रौष्टि यांनां महाभिषेक केल्याचा उल्लेख आहे.
२३प्रतिबोध- अथर्ववेदांत बोध याच्या बरोबर या ॠषीचा उल्लेख आला आहे.
२४बृहत्सामन्-अथर्ववेदांत आंगिरस म्हणून याचा उल्लेख आला आहे. तेथें त्याला क्षत्रियांनीं अतिशय त्रास दिला व शेवटी क्षत्रियांचा नाश झाला असा उल्लेख आलेला आहे.
२५मात्स्य- अथर्ववेदांत याचा उल्लेख आला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत (१.५,२,१) उल्लेखिलेला मांत्स्य व हा एकच असावा असें वाटतें. तैत्तिरीय ब्राह्मणांत या मात्स्यानें  कोणतेंहि यज्ञकर्म पुण्यकारक अशा वेळीं सुरू करण्याचा सांप्रदाय शतद्युम्र यांच्याकडून अमलांत आणिला.
२६ॠष्टिषेण- याचा निरुक्तांत उल्लेख आहे. पण तेथें जास्त माहिती नाहीं. कदाचित ॠग्वेदांतील आर्ष्टिषेणाचा हा बाप असावा.
२७कहोड कौषीतकि- यांनां उल्लेख शतपथ ब्राह्मणांत व्रीहियवादि नवीं धान्यें हीं वृष्टीपासून उत्पन्न होणारीं असल्यामुळें ती प्रथम देवतांनां अर्पण (आग्रमण नामक नवन्नाचा याग) करून भक्षण करावीं ही चाल यानें सुरू केल्याबद्दल उल्लेख आहे. आश्वलायन गृह्यसूत्रांतील ब्रह्मयज्ञांग तर्पणांत याचा उल्लेख आहे.
२८कात्यायनी- बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याच्या दोन स्त्रियांपैकी एक म्हणून इचा उल्लेख आहे. याज्ञवल्क्याचा संसारत्यागाचा विचार ठरल्यावर प्रपंचविषयक वस्तूंची मैत्रेयी आणि कात्यायनी यांनां सारखी वाटणी करण्याबद्दल याज्ञवलक्यानें सांगितले परंतु मैत्रेयी अध्यात्मज्ञानांत  पारंगत असल्याचें आढळून आल्यामुळें प्रापचिक व्यवसाय कात्यायनीकडेच राहिला.
२९कानान्ध- हा वध्ऱ्यश्वाचा मुलगा असल्याबद्दल बौधायन श्रौतसूत्रांत (२१. १०) उल्लेख आहे.
३०कुण्डपायिन्- पंचविंशब्राह्मण आणि आश्वलायन श्रौतसूत्र या (१२.४) ग्रंथांत याचा उल्लेख आहे. सूत्रग्रंथांत याच्या नांवाचें एक सत्र असल्याचा उल्लेख आहे.
३१कृष्णहरित- ऐतरेय आरण्यकांत (३.२,६) यचा उल्लेख आहे व तो यानें एक आपल्या शिष्याला वागदेवतेसंबंधी उपासनेचा प्रकार सांगितल्याबद्दल आहे. शांखायन आरण्यकात कृत्स्न हारित असा पाठ आहे.
३२कौरव्य- यानें अक्षरोपासना अथवा अक्षरासंबंधी माहिती अमलांत आणल्याबद्दल ऐतरेय आरण्यकांत (३.२,२) उल्लेख आहे.
३३कौलकावती- या नांवाच्या दोघां ॠषींनीं रथप्रोत दार्भ्य याच्याकडून एक विशिष्ट याग केल्याबद्दल मैत्रायणी संहितेंत (२.१,३) उल्लेख आहे.
३४गर्ग- याचा उल्लेख जरी कोणत्याहि संहिताग्रंथांत नाहीं तर काठक संहितेंत (१३.१२) गर्गाच्या वंशजांचा उल्लेख आला आहे. पुढें सूत्रग्रंथांत याच्या नांवावर एका यज्ञाचा (गंर्गत्रिरात्र) उल्लेख आहे.
३५गर्दभीविपीत अथवा विभीत- बृहदारण्यकोपनिषदांत (४.१,५) जनक व याज्ञवल्क्य यांच्या तात्त्विक संवादांत याचा उल्लेख आला आहे. तेथे श्रोत्र हेच ब्रह्म असल्याबद्दल  यानें मला उपदेशिलें असें जनक म्हणतो.
३६गाथिन् - हें विश्वामित्राच्या बापाचें आणि कुशिकाच्या मुलाचें नांव  सर्वानुक्रमणींत आढळतें. ही परंपरा बरोबर आहे की काय हें सांगणें कठीण आहे. ऐतरेय ब्राह्मणांत गाथीच्या दैव वेदा चा उल्लेख केला आहे. विश्वामित्रानें शुनःशेपाला दत्तक घेतल्यानें शनःशेपास त्या गाथींच्या “दैववेदंत” भाग घेतां आला. एवढयाच उल्लेखानें वरील वंशानुक्रमास जो कांही आधार मिळतो तोच.
३७गार्गीवाचक्नवी - बृहदारण्यकोपनिषदांत (३.८,१) याज्ञवल्क्याशीं वाद चालू असतां गार्गीनेहि याज्ञवल्क्याला दोन प्रश्न केले होते असा उल्लेख आहे.
३८गोबलवार्ष्ण- तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.११,९.३) यानें नचिकेताग्निसंबंधानें इष्टका (विटा) पूर्वादि पांच दिशांचे ठिकाणीं प्रत्येक पांच पांच इष्टका मांडल्या. त्यामुळें त्याला पशूंची प्राप्ति झाली असा उल्लेख आहे.
३९गौश्र- गुश्राचा वंशज. याला मधुक नांवाच्या एका ॠषीनें सोमवल्लीची देवता कोण असा प्रश्न विचारल्याबद्दल कौषीतकी ब्राह्मणांत (१६.९)उल्लेख आहे.
४०गौश्ल- याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत (१६.३०) आहे. तेथें यज्ञामध्यें शस्त्रें पठण करण्याचा बुलिल आश्वतर याचा संप्रदाय यानें चुकीचा ठरवून आपल्या संप्रदायाप्रमाणें त्यांनां शस्त्रें पठण करवयास लाविले.
४१चक्र - पंचविंश ब्राह्मणातील (२५.१५,३) सर्पसूत्रामध्यें उन्नेतृत्व नामक आर्त्विज्य करणारा हा एक ॠत्विज होता. याच्याबरोबर पिशंगाचा उल्लेख आला आहे.
४२जन्हु- शुनःशेपाच्या आख्यायिकेंत हा शब्द अनेक वचनी आलेला आहे. ह्या शुनःशेपानें देवरात ह्या नात्यानें जन्हूंचें आधिपत्य व गाथीचा दैवीवेद ही दोन्ही संपादन केली. जन्हूंचा वंशज जान्हन हा पंचविंश ब्राह्मणात आलेल्या उल्लेखावरून विश्वामित्र ठरतो. त्याने चतुरात्र व्रत करून जन्हू लोकांना ते वृचीवंताशी झगडत असताना राज्य मिळवून दिलें अशी कथा आहे, व त्याचें राजा म्हणून वर्णन आलें आहे. शिवाय ऐतरेय ब्राह्मणात विश्वामित्राला राजपुत्र व भरतर्षभ अशा संज्ञा आहेत तेव्हा गोष्ट स्पष्टच आहे कीं, संहिताच्या मतानें नसले तरी ब्राह्मण ग्रंथांप्रमाणें जरी अलीकडील ग्रंथांतील तो राजपुत्र होता त्यानें ब्राह्मण्य मिळविले ह्या आख्यायिकेचा त्या ग्रंथांत मागमूस नाहीं, तथापि विश्वामित्र हा एका कालीच पुरोहित व राजवंशीय होता. जन्हत्वी हा शब्द ॠग्वेदांत दोनदा आलेला आहे व त्याचा अर्थ जन्हूची बायको, किंवा सायणाचार्य म्हणतात त्याप्रमाणें, जन्हूचा वंश, असा असावा. हें घराणें एकेकाळी मोठे असावें व पुढें भरतवंशात अंतर्भूत झालें असावें.
४३जानशकायन - याचा काठक संहितेंत (२२.७) कर्मातील एका विशिष्ट संप्रदायाचा प्रवर्तक म्हणून उल्लेख आहे. हा शंखाच्या समकालीं होता.
४४जान्हव- याचा अर्थ जन्हूचा वंशज.  पंचविंश ब्राह्मणांत हें विश्वामित्राचें पैतृक नांव म्हणून आले आहे. ही गोष्ट मुद्दाम लक्षांत ठेवण्यासारखी आहे. कारण तीवरून ऑफ्रेक्टचा, शुनःशेपाचा पिता अजीगत ह्याच्याच गोत्रापैकी जन्हू हे होत हा सिद्धंत बाधित होतो.
४५जीवलचैलकि- शतपथ ब्राह्मणांत (२.३,५,३१- ३५) याचा उल्लेख असून अग्निहोत्रहोमासंबंधी माहिती यानें तक्षांनां सांगितली असें म्हटलें आहे.
४६जैमिनी- याचा उल्लेख आश्वलायन सूत्रापर्यंत नाहीं. (३.४) तेथें मात्र ब्रह्मयज्ञांत जें पितृतर्पण आहे त्यांत याचा उल्लेख आहे. सामवेदाचा जैमिनीय संहिता म्हणून एक भाग आहे व तो कॅलेंडनें छापून त्यावर बरीच चर्चा केली आहे. शिवाय सामवेदाचे एक जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण आहे. यावर ओअरटलनें अनेक निबंध लिहिले आहेत.
४७तपोनित्य- पुरुशिष्टाचा वंशज. याचा उल्लेख तैत्तिरीय उपनिषदांत (१.९,१) आला आहे. तपानुष्टानाबद्दल याचा विशेष आग्रह असल्याचें तेथे म्हटलें आहे.
४८ताण्ड- सामगानासंबंधी गायत्री छंदाचा अष्टाक्षरी प्रस्ताव असावा असें ताड याचें मत असल्याचा लाटयायन श्रौतसूत्रांत (७.१०,१७) उल्लेख आहे. तेथें याला पुराणताण्ड असें म्हटलें आहे. ताण्डय या नावाचें सामवेदावरील एक ब्राह्मण आहे. त्याचा प्रवर्तक हा ताण्डच होय.
४९तारुक्ष्य, तार्क्ष्य- ऐतरेय आरण्यक (२.१,६) आणि शांखायन अरण्यकांत  (७.१९) याचा उल्लेख आहे. यानें एक विशिष्ट ज्ञान संपादन करण्यासाठी एक वर्षभर गुरगृही वसंती करून गुरूची गाय रक्षिल्याचा आरण्यकांत उल्लेख असून तेथें तारुक्ष्य व तार्क्ष्य असे दोन पाठ आहेत. शाखांयनात मात्र तार्क्ष्य असाच पाठ आहे. ॠग्वेदांतील १०.१७ या सूक्ताचा द्रष्टा तार्क्ष्य आहे तो व हा तार्क्ष्य कदाचित्  एकच असावा.
५०त्रिशंकु- तैत्तिरीय आरण्यकात याचा उल्लेख असून तेथें (१.१०,१) तो आपणास मी सर्वज्ञ मी ब्रह्मज्ञ, मी तेजस्वी, (अध्यात्मज्ञानामुळें) असें म्हणत आहे. महाभारतांत त्रिशंकूला वसिष्ठाचा शापामुळे विश्वामित्राचा आश्रय करावा लागला व तो पुढें नभोमंडळात नक्षत्ररूपानें अधिष्ठित झाला अशी जी कथा आहे तिचा संदर्भ वैदिक वाङ्मयांत आढळत नाहीं. भारतातील त्रिशंकूला राजा असें म्हटलें आहे तेव्हा त्याचा व याचा संबंध असणें असंभाव्य, शिवाय एकाच नावाच्या राजा व ॠषि अशा दोन निरनिराळया व्यक्ती असणें संभवनीय आहे.
५१दाशर्म- काटक संहितेंत (७.६) याचा उल्लेख असून तो आरूणीचा समकालीन असल्याचें म्हटलें आहे.
५२नचिकेतस्- तैत्तिरीय ब्राह्मणांत एका प्रसिद्ध कथेंत याचा उल्लेख आला आहे. (६.११,८) . त्याचप्रमाणें कठोपनिषदांतहि (१.१) उल्लेख आला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत याला गौतमकुलोत्पन्न वाजश्रवस् याचा मुलगा असें म्हटलें असून कठोपनिषदांत त्याच कथेंत याला औदालकि  आरुणि असें म्हटलें आहे.
५३नाक- जैमिनीय उपानिषद ब्राह्मणांत (३.१३,५) याचा उल्लेख आला आहे. तसेंच शतपथ ब्राह्मण (१३.५,१,१) तै्त्तिरीयोपनिषद् (१.९,१) यात उल्लेखिलेला व बृहदारण्यकोपनिषदांत (६.४,४) आलेला नाक मंद्गल हे सर्व एकच होत. याचा ग्लाव मैत्रेयाशी वादविवाद झाल्याबद्दल गोपथ ब्राह्मणांत (१.१,३१) उल्लेख आहे.
५४नेमिषि- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत (१०.३६,१) शितिबाहु एष्कृत् याला हे विशेषण लावलें आहे. यावरून शितिबाहु हा नैमिषारण्यांतील असावा असें दिसतें.
५५पंचालचंड- ऐतरेय आरण्यकांत (३.१,६) वाणीच्या योगानेंच सर्व संहित केलें जाते या मताचा प्रवर्तक म्हणून याचा उल्लेख आहे.
५६पर्वत- ऐतरेय ब्राह्मणांत अनेकवेळां नारदाबरोबर ह्याचा उल्लेख आला आहे. अनुक्रमणीमध्यें ह्याच्या नांवावर ॠग्वेदांतली अनेक सूक्तें आलेली आहेत.
५७प्लक्ष दय्यांपति- तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.१०,९,३) याला अत्यंत आरुणि यानें आपल्या शिष्याकडून सावित्राग्निसंबंधी कांही प्रश्न कुत्सित भावनेनें केल्याबद्दल उल्लेख आहे.
५८पिप्पलाद- प्रश्नोपनिषदांत भरद्वाज, गार्ग्य व आश्वलायन इत्यादी ॠषींनीं अध्यात्मज्ञानासंबंधी याला कांही प्रश्न केल्याचा उल्लेख आहे. अथर्ववेदाची पिप्पलाद या नांवाची एक शाखा उपलब्ध आहे त्या शाखेचा प्रवर्तक कदाचित्  हाच असावा. गार्बे व ब्लूमफील्ड यांनीं अथर्ववेदाच्या या पैप्पलादसंहितेचा कांही भाग छापला आहे.
५९प्रागहि- कौषीतकी ब्राह्मणांत (२६.४) याचा उल्लेख यज्ञांतील काही कर्म करावयाचें राहिल्यास तें अंतरित कर्म केव्हा करावें याच्याबद्दल विचार करणारा म्हणून आला आहे.
६०बकदाल्भ्य- याचा उल्लेख जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत (१.९,२) आला असून त्यानें ओंकार व वाक यांच्या साहायानें आजकेशीकडून इंद्राला वर्जिले, (वगळिलें) असा उल्लेख आहे.
६१बाध्व- ऐतरेय आरण्यकांत (३.२,२) अभ्यासाचे मुख्य विषय वेद, छंद, शरीर व महापुरुष हे होत असें म्हणणारा म्हणून याचा उल्लेख आहे.
६२भंगीर- गाईसंबंधी हा शब्द वैतान आणि दुस-या सूत्रांत आला आहे. हा शब्द मनुष्याचा अथवा नदीचा बोधक आहे हें निश्चित समजत नाहीं. ज्या ॠचेंत याचा उल्लेख आहे तेथेंच गंगा व यमुना या नद्याचा उल्लेख आहे,
६३भार्म्यश्व- निरुक्तांत मुद्गलाच्या बापाचें नांव म्हणून हा शब्द आला आहे. (९.२४)
६४मधुछंदस- ॠग्वेदाच्या पहिल्या मंडळांतील पहिल्या दहा सूक्ताचा हा प्रसिद्ध ॠषि. हा द्रष्टा होता असें ऐतरेय आरण्यकात व कौषीतकि ब्राह्मणांत म्हटले आहे. ऐतरेय ब्राह्मणांत हा विश्वामित्राचा एकवन्नावा मुलगा म्हणून गणला गेला आहे. आणि त्याचे ‘प्रउग’ (सकाळीं गावयाचे स्तोत्र) शतपथात उल्लेखिले आहे.
६५मंदीर- याचा उल्लेख कात्यायन श्रौतसूत्रांत (१३.३, २१) असून तेथे यांच्या गाई गंगेचें पाणी प्याल्या नाहींत असें म्हटलें आहे.
६६महर्त्विज- हें नांव तैत्तिरीय (३.८,२,४) व शतपथ ब्राह्मणांत (१३.१,१,४) आणि शांखायन श्रौतसूत्रांत (१६.१-२) अध्वर्यु, ब्रह्मा, होता न उद्गाता या ॠत्विजानां उद्देशून आलें आहे.
६७महर्षि- तैत्तिरीय आरण्यकांत (१.९,६) हें विशेषण जमदग्नीला लावलेलें आढळतें.
६८माध्यम- हें नांव कौषीतकी आरण्यक (१२.३)व ऐतरेय आरण्यक (२.२,२) यात ॠग्वेदाच्या  दुस-या मंडळाच्या द्रष्टयांनां लावल्याचे आढळतें.
६९मुण्डिभऔदन्य- अश्वमेधप्रसंगी होणा-या अनेक भ्रूणहत्यादि पातकांचा नाश होण्यासाठी अबमृथापूर्वी प्रायश्चिताहुति घालावयास सांगणारा म्हणून याचा उल्लेख तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.९,१५,३) व शतपथ ब्राह्मणांत (१३.३,५,४) आला आहे.
७०मैत्रायणीय ब्राह्मण- याचा उल्लेख बौधायन शुल्बसूत्रांत आला आहे. (३२.८)
७१रहस्युदेव मलिम्लुच- यानें मुनिमरण नामक स्थलीं वैखानसांनां मारल्याबद्दल पंचविंश ब्राह्मणांत (१४.४,७) उल्लेख आहे.
७२राममार्गवेय- यानें विश्वंतर नामक राजाला क्षत्रियांनीं यज्ञामध्यें सोमरसाच्या ऐवजीं उदुंबरफलांचा उपयोग करावा असें सांगितल्याचा ऐतरेय ब्राह्मणांत (७,२७) उल्लेख आहे. तेथें याच्याबद्दल बरीच मोठी कथा आहे.
७३वातवंत- पंचविंश ब्राह्मणांत हें एका ॠषीचें नांव आलें आहे. (२५.३,६) यानें व दृति नामक ॠषीने एक सत्र आरंभिले  परंतु वातवंतानें ते सत्र मध्येंच मोडल्यामुळें त्याच्या संततीला पुढें अत्यंत निकृष्ट दशा प्राप्त झाली.
७४वालखिल्य- ॠग्वेदांतील आठव्या मंडलापैकी कांही (४९.ते ५९) सूक्तांना ही संज्ञा आहे. ॠग्वेदांत ही सूक्तें प्रक्षिप्त मानिली आहेत. या सूक्ताचें द्रष्टे वालखिल्य नसून दुसरेच ॠषी सर्वानुक्रमणीकारांनीं दिले आहेत. तैत्तिरीय आरण्यकांत (१.२३,३) प्रजा उत्पन्न करण्याच्या इच्छेने तप करणा-या प्रजापतीच्या वंशापासून हे वालखिल्य नामक  ॠषि उत्पन्न झाले असें म्हटलें आहे.
७५विदग्ध शाकल्य- बृहदारण्यकोपनिषद् (३.९,१) व शतपथ ब्राह्मणांत (११.६,३,३) विदेह जनक याच्या दरबारी याज्ञवल्क्याशीं वादविवाद करणारा म्हणून याचा उल्लेख आहे.
७६वैयारक- ॠग्वेद प्रातिशाख्यामध्यें ॠग्वेदांतील वृत्तांवर प्रमाणभूत म्हणून याचा उल्लेख  आला आहे. रॉथच्या मतें हा व निरुक्तकार यास्क हे एकच होत.
७७शंखकौष्य- काठक संहितेंत (२२.७) ज्याच्यावर जातशांखायन यानें टीका केली आहे त्यांचे हें नाव.
७८शतबलाक्षमौद्गल्य- निरुक्तात (११.६) याचा उल्लेख आला आहे व त्यावरून हा कोणी व्याकरणकार असावा असें दिसतें.
७९शिशुमार- याचा उल्लेख पंचविंश ब्राह्मणांत (१४.५.१५) आहे तेथे त्याचे दुसरें नांव शर्कर असे आहे.
८०शुनःपुच्छ- ऐतरेय ब्राह्मणांत (७.१५) शुनःशेपाचा भाऊ म्हणून याचा उल्लेख आला आहे. शुनःशेपाचा शुनोलांगूल नामक आणखी एक भाऊ असल्याचा उल्लेख आहे.
८१शूषवार्ष्णेय- तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.१०,९,१५) याला आदित्यानें सावित्राग्नीसंबंधी उपदेश केल्याबद्दलचा उल्लेख आहे.
८२संगप्रयोगि- याचा उल्लेख मैत्रायणी संहितेंत (३.१.९) आला आहे. याच नांवाच्या (आसंग प्लायोगि) एका राजाचा ॠग्वेदांत उल्लेख आहे. त्याचा व याचा कांही संबंध कदाचित्  असावा.
८३सत्ययज्ञ- शतपथ  ब्राह्ममांत (३.१,१,४) यज्ञभूमीसंबंधी याज्ञवल्क्याशीं झालेल्या संवादांत याचा उल्लेख आला आहे.
८४सत्यवचस् राथीतर- तैत्तिरीय उपनिषदांत सत्याची महती वर्णन करणा-या एका ॠषीचें हें नांव आहे.
८५सनत्कुमार- छांदोग्य उपनिषदांत (७.१,१,२६;२) याचा उल्लेख आला आहे. येथें यानें नारदास उपदेश केल्याचा उल्लेख आहे.
८६सर्पिर्वात्सि- यानें शिल्पनामक वालखिल्यशस्त्राच्या शंसनानें आपला  आपला यजमान सौबल याला पशूंची प्राप्ति करून दिली. याला व वत्सपुत्र (वात्सि) म्हटलें आहे. याचा उल्लेख ऐ. ब्राह्मणांत (६.२४) आहे.
८७सामश्रवस्-सामाकरितां प्रसिद्ध, हें नांव बृहदारण्यकोपनिषदांत (३.१,२) आलें आहे. मॅक्समुल्लरच्या मतें हें याज्ञवल्क्याचें विशेषण आहे परंतु बोथलिंक म्हणतो हा निराळाच मनुष्य असावा. भाष्यकारांचें व मॅक्समुल्लरचें या बाबतींत मतैक्य आहे. कुषीतक याचेंही हें पितृप्राप्त नांव असल्याचा पंचविंश ब्राह्मणांत (१७.४,३)उल्लेख आहे. हा व्रात्यांचा मुख्य स्थपति होता. यानें कांही अविधियुक्त कर्म केल्यामुळें यथार्थ कर्म जाणणा-या लुशाकपीनें याला शाप दिला व तेव्हांपासून याच्या आश्रयास कोणी येईनासें झाले.
८८सामुद्रि- शतपथ ब्राह्मणांत (१३.२,२,१४) अश्व नामक ॠषीचें दुसरें नांव म्हणून या नांवाचा उल्लेख आहे.
८९सुकेशिन्  भारद्वाज- याचा उल्लेख ज्ञानप्राप्तिसाठी पिप्पलाद ॠषीकडे जाणा-या ॠषीत (प्रश्नोपनिषद्  १-१) आहे.
९०सुदेवकाश्यप- याचा उल्लेख तैत्तिरीय आरण्यकांत (२.१८) ब्रह्मचारी याच्या हातून कांही व्रतभंग झाल्यास त्याबद्दल प्रायश्चित सांगणारा म्हणून आला आहे.
९१सुधन्वन्आंगिरस- बृहदारण्यकोपनिषदांत (३.३.१) हा मद्र देशांत राहणा-या कपि गोत्रोपन्न पतंजलीच्या कन्येच्या अंगांत येत असे असें लह्मपुत्र भुज्यु व याज्ञवल्क्य यांच्या संवादांत उल्लेखिलें आहे. अशा प्रकारच्या अंगात येण्याबद्दलचा उल्लेख ऐ.ब्रा. यांत आला आहे. तेथें ज्याच्या अंगांत संचार होतो त्याला गंधर्वगृहीत असें म्हटलें आहे. यावरून अंगांत येणें ही कल्पना प्राचीन आहे असें दिसतें.
९२सनाच्चव- काठक संहितेंत (२०.१) एका अध्यापकाचें म्हणून हें नांव आलें आहे. कपिष्ठल संहितेंत (३१.३) सहनाश्चिव असा पाठ आहे. परंतु दोन्ही  शब्दांची रूपें चांगली नाहींत.
९३सोमदक्षकोश्रेय- काठक (११.९) व मैत्रायणी (३.२,७) संहितेंत एका अध्यापकाचें म्हणून हें नांव आलें आहे मैत्रायणी संहितेंत यानें साहस्त्रेष्टवाचें उपधान श्यापर्णास सांगितल्याचा उल्लेख आहे.
९४सोदंति- याचा उल्लेख पंचविंश ब्राह्मणांत (१४.५,१३) आहे. हे लोक विश्वामित्रसमकालीन होते. विश्वामित्रानें यांच्याबरोबर एक शर्यत जिंकल्याचा उल्लेख आहे.
९५हिरण्यदन्वैद- बिदाचा मुलगा याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मण (३.६,३) व ऐतरेय आरण्यक (२.१,३) यांत आहे. यानें वषट्काराचें वर्णन केल्याबद्दल ऐतरेय ब्राह्मणांत व प्राण हा वाक अग्न्यादि रूप असल्याबद्दल आरण्यकांत उल्लेख आहे.