प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
सूक्त व सामद्रष्टे (संहितेतर) |
१अप्रतिरथ - अंजिक्य व ज्याचा युद्धांत पराभव होत नाही अशा इद्राचें ज्या ॠग्वेदसूक्तांत वर्णन आहे. (१०.१०३) त्या सूक्ताचा हा द्रष्टा असल्याबद्दल ऐतरेय (८.१०) व शतपथ (९.२,३,१) ब्राह्मणांत याचा उल्लेख आहे.
२अश्वसूक्ति- ॠग्वेद (८.१४;१५) या दोन सूक्तांचा द्रष्टा. पंचविंश ब्राह्मणांतहि (१९.४,१०) हा समद्रष्टा असल्याचा उल्लेख आहे.
३कल्याण- स्वर्गप्राप्तीसाठी सत्रानुष्ठान करणा-या आंगिरसांनां देवांच्याकडे जाण्याचा दो देवयान मार्ग तो सांपडेना. त्या सत्रानुष्ठान करणारांपैकीच एक कल्याण नामक ॠषि या देवयानासंबंधी विचार करीत ऊर्ध्व मार्गानें जात असतां वाटेंत त्याला अप्सरांच्यासह झोंपाळयावर बसून क्रीडा करीत असलेला एक ऊर्णायु नामक गंधर्व आढळला. त्या गंधर्वाला यानें देवयानासंबंधी माहिती विचारली असतां देवयान मार्ग साधनभूत अशा एका सामाचा त्यानें उपदेश केला. नंतर त्या कल्याणानें सत्र करणा-या आंगिरसांकडे येऊन देवयान प्राप्त करून देणारें एक साम मला सांपडलें आहे असें तो म्हणाला. त्यावर तुला हें साम कोणी सांगितलें असें त्याला आंगिरसांनीं विचारलें असतां हें साम मलाच प्राप्त झालें असें तो म्हणाला. इतर आंगिरसांनां त्या गंधर्वानें सांगितलेल्या और्णायुव नामक सामांच्या योगानें स्वर्गप्राप्ति झाली. परंतु कल्याण हा या सामासंबंधी खोटें बोलला म्हणून तो मात्र स्वर्गास गेला नाही.
४तुरश्रवस्- पारावत नामक ॠषी इंद्राप्रीत्यर्थ सोमयाग करीत असतां त्यांतील एला तुरश्रवस नामक ॠषीनें दोन सामांच्या योगानें यमुनानदीवर इंद्राला प्रसन्न केलें असतां इद्रानें फक्त तुरश्रवस्चा हविर्भाग स्वीकारला व इतरांचा स्वीकारला नाहीं.
५देवातिथिकाण्व- एकदां अत्यंत दुर्भिक्ष प्राप्त झालें असतां देवातिथि आपल्या मुलांसह अरण्यांत कंदमुळें आणण्यासाठीं गेला होता. तेथें त्याला काकडीची (कर्कटी) फळें आढळलीं. त्यानें तेथें एक साम पठण केलें असतां त्या सामाच्या प्रभावानें त्या फलांच्या गाई बनल्या अशी कथा पंचविश ब्राह्मणांत (९.२,१९) आली आहे. ॠग्वेद (८.९) या सूक्ताचा हा द्रष्टा आहे.
६द्विगतभार्गव- हा एका सामाच्या पठणानें स्वर्गास गेला व तेथून मृत्युलोकीं परत येऊन त्याच सामाच्या योगानें पुन्हां स्वर्गलोकास गेला असा पंचविंश ब्राह्मणांत (१४.९, ३६) उल्लेख आहे. त्या सामाचा हाच द्रष्टा होय.
७परुच्छेप- हा ॠग्वेदांतील पहिल्या मंडळांतील ब-याच सूक्तांचा द्रष्टा असल्याबद्दल ऐतरेय व कौषीतकी ब्राह्मण आणि निरुक्त यांत उल्लेखिलें आहे. आपणां दोघांपैकीं मंत्रसामर्थ्य कोणाचें श्रेष्ठ आहे याविषयीं परुच्छेप व नृमेध यांच्यामध्यें वाद उपस्थित झाला. ओल्या लांकडांत जो अग्नि उत्पन्न करील त्याचें सामर्थ्य श्रेष्ठ असें ठरल्यावर नृमेधानें ओल्या काष्टांत धूर उत्पन्न केला व परुच्छेपानें लांकडाशिवाय अग्नि उत्पन्न केला अशी कथा. तै. सैहितेमध्यें (२.५,८,३) आली आहे.
८बृहद्गिरि- इंद्रानें यतींनां लांडग्याकडून खावविलें असतां त्यांतील शिलक राहिलेल्या तीन यतींनीं आतां आमचें रक्षण कोण करील असे उद्गार काढले असतां तुमचें रक्षण मी करतों असें इंद्र म्हणाला व त्यानें त्या तिघांनां आपल्याजवळ ठेवून वाढविलें आणित्या प्रत्येकाला ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्या विद्या शिकविल्या. वरील तिघांपैकी एक बृहद्गिरि असून तो इंद्राजवळ ब्रह्मविद्या शिकला असा उल्लेख पंचविश ब्राह्मणांत (१३.४,१५) आहे.
९युक्ताश्व- यानें नुकत्याच जन्माला आलेल्या दोन मुलांनां पळवून नेलें व त्यांचा घात केला. या त्यांच्या दुष्कृत्यामुळें त्याला येत असलेलें वैदाध्ययन नष्ट झालें. नंतर त्यानें वेदाध्ययन पूर्ववत येण्यासाठीं तपश्चर्या केली असतां एका सामाच्या योगाने त्याला वेदाध्ययन पूर्ववत् येऊं लागलें.
१०वत्सप्री- भालंदाजाचा वंशज. ॠग्वेदांतील एका सूक्ताचा हा द्रष्टा आहे. याचा उल्लेख पंचविंश ब्राह्मणांत (१२.११,२५) तो एका सामाचा द्रष्टा म्हणून आहे. याच्या नांवावर असलेल्या सामाला वात्सप्र असें नांव असून त्या वात्सप्र सामाचा शतपथ ब्राह्मणांत (६.७,४,१) त्या सामाच्या योगानें यानें प्रजापतीनें निर्माण केलेल्या प्रजा दीर्घायुषी केल्या असा उल्लेख आहे.
११वसुक्र- हा ॠग्वेद (१०.२,७,२९) या सूक्तांचा द्रष्टा असून तो या सूक्तांचा द्रष्टा असल्याबद्दल ऐतरेय (१.२,२) व शांखायन आरण्यकांत (१.३,) उल्लेख आहे.
१२ वैखानस- अनुक्रमणींत हे शंभर असून ॠग्वेदांतील एका सूक्ताचे द्रष्टे असल्याचा उल्लेख आहे. यांच्यापैकीं एकाचें पुरुहन्मन् नांव होतें.
१३शक्ति- सर्वानुक्रमणीप्रमाणें ॠग्वेदांतील सूक्तांचा द्रष्टा. याचा वसिष्ठपुत्र असा जै. ब्राह्मणांत उल्लेख आहे. याच्या संबंधी कथा भाष्यांत शाटयायन ब्राह्मणांतील आली आहे ती अशीः- शक्तीनें विश्वामित्राच पराभव केला. नंतर त्याला जमदग्नीकडून ससर्परी नामक वाणी प्राप्त झाली. पुढें विश्वामित्रानें शक्तीला अग्नींत ढकलून जाळलें आणि पूर्वीचा सूड उगविला. ॠग्वेदांत याकथेला थोडासा आधर सांपडतो. (३, ५२, २२). गेल्डनेर यास ही गोष्ट संमत आहे. पंचविंश ब्राह्मणांत (१२.५,१६) एका आंगरिस (कुलांतील) शक्तीचा उल्लेख आहे.
१४शार्ङ्ग- सर्वानुक्रमणीप्रमाणें ॠ. १० १४२ या सूक्ताचे शार्ङ्ग जरितृ, द्रोणं, सारिसृक्व व स्तंबमित्र असे पांचद्रष्टे आहेत. मंडपाल नामक ॠषीच्या शार्ङ, जरितृ इत्यादि मुलांची त्यांच्या प्रार्थनेमुळें खांडववनांतील अग्नीपासून कशी मुक्तता झाली ती हकीकत महाभारतांत (१.८,३,३४) आली आहे. सीगनें या भारतांतील कथेचा ॠग्वेदांतील वरील सूक्ताशीं संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांत त्याला यश आलें नाही. ओल्डेनबर्ग म्हणतो कीं, ही भारतांतील कथाच वरील ॠग्वेदांतील सूक्ताधारें रचिली असावी.