प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
हविर्नामें व विशेषणें ( ऋग्वेद )
हविर्नामें व विशेषणें ( ऋग्वेद ) /यजन पूजन करणें, क्रियापदे (ऋग्वेद) |
१अमिश्री -- ( मिसळ, मिश्रण ). देवतांना सोमरस अर्पण करण्यापूर्वी त्यांत जें दूध घालीत असत त्याला हा शब्द योजीत असावेत.
२आशिर -- ( मिश्रण ) मुख्यत्वेंकरून देवांनां अर्पण करण्यापूर्वी दुधामध्यें सोमरस मिसळीत असत त्या मिश्रणाचें हें संबोधक आहे. ऋग्वेदांत व तदनंतरच्या ग्रंथांत ह्या अर्थी योजिलेला हा शब्द पुष्कळ वेळा येतो. फक्त दुधाचाच ह्या कार्याकडे उपयोग करीत होतें असें नाहीं. सोमाचें 'तीन पदार्थ मिसळलेला' असें दुस-या विशेषणांनी स्पष्टीकरण केलें आहे. जसें गवाशिर, दध्याशिर आणि यवाशिर.
३करम्भ -- ऋग्वेदापासून पुढें ह्याचा अर्थ 'कोंडा न काढलेल्या, साधारण भाजलेल्या आणि मळलेल्या यवाची लापशी असा आहे. क्षेत्र देवतां जी पूषन् तिचें हें यज्ञांतलें आवडतें हविष्यान्न होतें. जव ( उपवाक ) अथवा तीळ ( तिर्य ) ह्यांचाहि करंभ करीत असत.
४गवाशिर -- ( दुधांत मिसळलेला ) हें सोमाचें विशेषण ऋग्वेदांत आहे.
५पुरोडाश् -- ऋग्वेदांत व नंतर यज्ञप्रसंगीं देवतांनां अर्पण करण्यासाठी उपयोगांत आणलेल्या एका प्रकारच्या भाजलेल्या पिठाच्या गोळयाचें हें नांव आहे.
६पृषदाज्य -- ( शिंपडलेंलें तूप ); म्हणजे दह्यांत मिसळलेंलें तूप ( आज्य ) असा याचा ऋग्वेदांत: व तदनंतरच्या ग्रंथांत अर्थ होतो.
७यूषन् -- हा शब्द ऋक् आणि यजु:संहिंतेंत अश्वमेधाच्या वर्णनांत आला आहे. मेध्य पशूच्या मांसापासून तयार केलेल्या पेया ( रस्सा ) बद्दल हा शब्द वापरीत आणि त्याचा अन्नासारखा उपयोग करीत. तें ठेवण्यास भांडी म्हणून 'पात्र' आणि 'आसेचन' यांचा उपयोग केलेला आहे. तैत्तिरीय संहिंतेंत सांपडणारें दुसरें रूप् 'यूस्' आहे.
८हविष् -- देवांनां दिलेल्या नैवेद्याला हें नांव आहे, मग ह नैवेद्य धान्याचा, सोमाचा, दुधाचां किंवा तुपाचा असो, ऋग्वेदांपासून पुढील ग्रंथांत हा शब्द प्रचारांत आहे.
९आमीक्षा -- घट्ट दह्याचें अन्न. हा शब्द ऋग्वेदांत नाहीं, परंतु पुढील संहिता, ब्राह्मण वगैरेमध्यें आढळतो आणि तैत्तिरीय अरण्यकांत हा शब्द वैश्य संबंधांत आहे.
१०नवनीत -- ( ताजें लोणीं ) नंतरच्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द वारंवार आलेला आहे. ऐतरेय ब्राह्मणाच्या मतानें हें गर्भाला माखावयास उपयोगी पडणारें लोणीं देवांना आज्य, मनुष्यांना घृत, व पितरांना आयुत असा उपयोग केला जाई. इतरत्र हा शब्द घृत व सर्पिस् यांच्या विरोधीं अर्थानें आला आहे.
११पयस्या -- उत्तरकालीन संहिता ग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ ह्यांमध्यें दही अशा अर्थानें हा शब्द आला आहे. हें दही ताजें किंवा तापविलेलें दूध व ताक वगैरे यांचे मिश्रण होऊन झालेंलें विरजण होय असेहि त्यांत म्हटलें आहे.
१२परिवाप -- उत्तरकालीन संहिता व ब्राह्मणग्रंथांत ह्याचा अर्थ भाजलेंलें तांदूळ-म्हणजे पोहे असा अथवा भाताच्या लाह्या असा अर्थ आहे.
१३ब्रह्मौदन -- यज्ञप्रसंगीं यज्ञांत भाग घेतलेल्या ऋत्विजांकरितां शिजविलेला भात ह्या अर्थानें हा शब्द ऋग्वेदोत्तर संहिता व ब्राह्मण ह्यांमयें आला आहे.
१४मस्तु -- यजु:संहितेंत व ब्राह्मणांत याचा अर्थ आंबट दही ( अथवा लोणी ) असा आहे.
१५यवागू -- यवागू म्हणजे जवाची पेज. इतर धान्यांची सौम्य लापशी या अर्थी सुद्धां हा शब्द सांपडतो.
१६वाजिन् -- उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ग्रंथांत ह्याचा अर्थ ताजें गरम दूध व नासलेंलें दूध ह्यांचे मिश्रण असा आहे.
१७सक्तु -- उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ग्रंथ ह्यांमध्यें भरभरीत पिठाचें किंवा सत्तूचें अन्न असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. ऋग्वेदांत ज्या ठिकांणी एकदांच हा शब्द आला आहे. त्या ठिकाणीं 'तितौ'नें पाखडण्यापूर्वीचें धान्य असा या शब्दाचा अर्थ असावा. 'तितौ' ह्याचा अर्थ चाळणी असा धरला तर सक्तु ह्याचा अर्थ भरभरीत रवा असा होऊं शकेल.
१८पृषातक -- हें पृषदाज्याप्रमाणें एका मिश्रणाचें नांव आहे. जुन्या गृह्यसंग्रहाप्रमाणें तें दहीं, मध आणि आज्य ह्यांचे मिश्रण असें. याचा अथर्ववेदांच्या एका जुन्या वचनांत व सूत्रांत उल्लेख आला आहे.