प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

ॠग्मंत्रांत दिसणारा समाज.- हा सविस्तरपणें विवेचिण्याचें येथें प्रयोजन नाही. येथें एवढेच सांगितले पाहिजे की ॠग्मंत्रांत स्पष्टपणें इतिहास असा दिला नसून स्तोत्रांत जीं विधानें उपलब्ध होत आहेत त्यांतून इतिहास गोळा करावयाचा आहे. या विधानांत देशप्रवेशाचा बिलकुल उल्लेख नाहीं. आर्यन् लोकांच्या देशप्रवेशाविषयीं ॠग्वेदावरुन जी कल्पना करण्यांत आली ती एवढयाच वरुन कीं बहुतेक उल्लेख पंजाबकडचे सांपडतात आणि गंगेच्या पूर्वेकडील उल्लेख थोडे सांपडतात.

यांत उल्लेखिलेल्या दस्यूंच्या आर्याशी असलेल्या विरोधोक्ती वरुन आणि अनास, असें एके ठिकाणी दस्यूंचे वर्णन आहे त्यावरुन आर्य व दस्यू या निरनिराळया जाती आहेत आणि ॠग्वेदांत आर्यप्रवेश वर्णिला आहे अशी कल्पना प्रचलित झाली. तथापि वस्तुस्थिति निराळी आहे. आर्य आणि दस्यु ही दोन निरनिराळीं राष्ट्रे अगर जाती आहेत असें खात्रीनें म्हणतां येत नाहीं, आणि आर्य आणि दस्यू यांचे सामुच्चयिक शत्रुत्व मुळींच वर्णिले नाही, वगैरे विवेचन मागें सविस्तर केलेंच आहे.

ॠग्वेदांत जे युध्यमान पक्ष दिसतात त्यांत,
(१)    इंद्र व तद्विरुद्ध वर्ग,
(२)    दाशराज्ञ युध्दांतील परस्परविरुद्ध वर्ग,

यांपैकी पहिल्या वर्गात मोडणा-या विरुद्धता वगळल्या पाहिजेत. त्यांचे स्पष्टीकरण हा सामान्य इतिहासाचा विषय नसून पौराणिक कथा तयार कशा होतात या संशोधनक्षेत्राचा विषय आहे. त्याचें विवेचन दुस-या विभागांतील दैवतेतिहासांत केलेंच आहे. ॠग्वेदांत अनेक युध्यमान पक्ष दृष्टीस पडतात त्यांचा दाशराज्ञ युध्दांतील व्यक्तीशी म्हणजे दाशराज्ञ युध्दाशीं म्हणजे पैजवनांच्या गांधारापासून यमुनेपर्यंत झालेल्या चालीशी संबंध दिसून येतो.

ॠग्वेदांतील आगमन कोणाचें? ''आर्यांचे'' म्हणजे सभ्य लोकांचें की यजनशीलांचें ? आर्यांचे आगमन झालें असें म्हणणारा वर्ग आर्य या शब्दाचा तो अर्थ घेतच नाहीं. तो वर्ग ''आर्य'' या शब्दाला भाषाशास्त्रज्ञांनी लावलेला अर्थ म्हणजे ग्रीक, लाटिन या भाषांशी नातें असलेली भाषा बोलणारांची जात असा घेतो आणि त्यांचें आगमन म्हणजे संस्कृत भाषेचें कोणतें तरी प्रकृतिस्वरुप बोलणारांचे आगमन असें समजतो आणि तें ॠग्वेदांत वर्णिले आहे अशी कल्पना करतो, विशेषसा पुरावा न देतां लेखक अशी कल्पना करतात की, मंत्रांत जे स्थानांतर दिसतें तोच ''आर्यन्'' लोकांचा हिंदुस्थानांत प्रथम प्रवेश होय. या त-हेचे स्पष्ट विधान कोणीं केलेलें नाहीं पण गृहीत धरलेंले आहे. वरील प्रकारच्या गृहीत मतास पुरावा नाही एवढयावरच तें मत टाकून देतां येईल; तथापि हें मत धरुन बसणारांचा संघ मोठा आहे म्हणून त्या मतास अधिक सन्मानानें वागविलें पाहिजे म्हणजें तें उलट प्रमाणें देऊन खोडलें पाहिजे.

''वेद'' हे आर्यांच्या आगमनाचें ग्रंथ लोकांस वाटतात यांचे कारण त्या ग्रंथांत वर्णन केलेल्या क्रियांची रंगभूमि पंजाब ही आहे. आमचें मत असें आहे की, वेदोक्त क्रियास्थान पंजाब आहे तरी ॠग्वेद हे आर्यन् भाषा बोल  णा-यांच्या प्रथम देशप्रवेशाचे ग्रंथ नाहींत. त्यांत उल्लखिलेलीं राष्ट्रे पंजाबांत वसलेली दिसतात एवढयावरुनच ॠग्मंत्र हे आर्यन् महावंशाच्या आगमनाचें दर्शक वाङमय आहे असें म्हणावें काय ? तेवढीच कसोटी लावावयाची असेल तर आज पंजाबांतील गाणी गोळा करावींत म्हणजे त्यांतील जाती देखील पंजाबांत दिसतील. म्हणजे त्यावरुन तें विशिष्ट जातीचें देशप्रवेशवाङमय कसें म्हणतां येईल ?

संस्कृत भाषा किंवा ती ज्या भांषांपासून झाली तिच्या प्रकृतिरुपी भाषा यांतील वाङमयाचें अत्यंत जुन्या काळचे अवशेष ॠग्मंत्र होत. यावंरुन अशी कल्पना झाली कीं आर्यन् भाषा बोलणारांचे हें प्रवेशवाङमय होय आणि यजुर्वेदादि वाङमय त्याच लोकांच्या उत्तरकालीन क्रियांचें द्योतक होय.

म्हणजे वाङमयाची वाढ व आर्यन् भाषा बोलणाराकडून देश व्यापला जाणें या गोष्टी अन्योन्याश्रयी धरल्या जातात. भूमि व्यापण्याची क्रिया अगोदर होणें आणि वाङमयवाला वर्ग तेथें मागाहून जाणें या क्रियेची शक्यता लोक विसरतात.

वाङयविस्तार लोकविस्ताराच्या आश्रयानें झाला असेल ही कल्पना स्वाभाविक आहे; पण अधिक विचार केला असतां या कल्पनेंत काहीं चुका असण्याचा संभव आहे असें दिसून येतें. आर्यन् महावंशाचें प्रथम आगमन ॠग्वेदांत वर्णिलें आहें असें समजणा-यांनी नवीन वसाहतीच्या क्रियेचें स्वरुप लक्षांत घेतलें होतें कीं नव्हतें असा संशय उत्पन्न होतो.

प्राचीन कालीं झालेलें व मंत्रांत उल्लेखिलेलें आर्य लोकांचें आगमन हें पहिलेंच काय हा पश्न प्रथम विचारणीय आहे. तें पहिलें खास नाहीं असें वाटतें. वेदामध्यें ज्यांचा उल्लेख येतो ते सर्व लोक एकच होते काय? पुढें सरकूं पहाणा-यास प्रतिकार करणारे नॉन् आर्यन् होते काय ? ते तसे असावे असें दिसत नाहीं. पुढें सरकूं पहाणा-या लोकांच्या शत्रूंमध्यें कांही सदृश जातीचें आणि कांही विसदृश जातीचे असें दोन्ही प्रकारचे लोक असणें शक्य आहे, एवढेच नव्हे तर युद्ध सदृशांशीच झालें असावें असें मनुष्य भ्रमणाच्या अत्यंत सामान्य पद्धतीवरुन म्हणावें लागेल. अमेरिकेंतील वसाहतीच्या इतिहासांत गो-यांची आणि तांबडयांची युद्धें आहेत एवढेंच नव्हे तर निरनिराळया गो-या राष्ट्रांची परस्परांतील युध्दे आहेत. ॠग्वेदांत उल्लेखिलेल्या राष्ट्रांपैकी अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञांनी वापरलेल्या ''आर्यन्'' नांवानें संबोधिलेलीं राष्ट्रें कोणती याविषयी विचार पाहिजे.

आर्यन् म्हणून म्हटलेल्या एकाच लोकसमूहाचें एकच वेळेस आगमन होऊन त्यांनी देश जिंकला किंवा वसविला ही गोष्ट शक्यच नाहीं. बोलन घाटांतून किंवा खैबर घाटांतून एकदम कितीसे लोक येणार? जे येतील त्यांनां भक्ष्य मिळविण्यास तात्पुरती तरी वसाहत करावी लागणार. जी माणसें येणार ती प्रथम जवळचाच प्रदेश व्यापणार आणि एकदां एखादा प्रदेश व्यापिला म्हणजे त्या प्रदेशापासून स्वच्छेनें लोक इतरत्र भ्रमण कशाकरितां करतील. नवीन येणार त्यांस व्यापिलेल्या प्रदेशांतून रस्ता काढून दूर गेलें पाहिजे किंवा जुनीच वसाहत हिसकावून घेऊन जुन्या वसाहतवाल्यांस दूर ढकललें पाहिजे, म्हणजे नवीनांचें भांडण युद्ध किंवा मारामारी व्हावयाची ती प्रथम जुन्या स्वजनांशीच होणार. दस्यु, राक्षस, दास, इत्यादि शब्द शत्रुत्ववाचक असले तर ते द्राविडी किंवा दुसरी भिन्नवंशीय भाषा बोलणा-या विशिष्ट लोकांसच लावले कशावरुन? देशांतील काळया लोकांना जिंकून त्यांस शूद्र बनविलें या विधानाच्या मुळाशीं समजूत दिसते ती अशी की मंत्रकाली उत्तर हिंदूस्थान काळया लोकांनी वसलें होतें आणि लक्षावधि किंवा कोटयावधि गोरे आर्य आले आणि त्या सर्वांनीं शिस्तवार इतक्या लोकांशीं युद्ध करुन अर्धा लक्ष चौरस मैल जमीन व्यापून टाकली. ही कल्पना हिंदुस्थानचा लहानसा दोनचार फुटांचा नकाशा हातांत असला म्हणजे सोपी दिसते पणं त्या क्रियेचें यथार्थ स्वरुप लक्षांत आणूं लागले म्हणजे त्या विधानाची असत्यता भासूं लागते. यासाठीं आर्यन् लोकांनी द्राविड लोकांस हांकून हिंदूस्थान काबीज केलें त्याचा इतिहास वेदांत वर्णिला आहे असल्या त-हेची इतिहास सोपा करणारी विधानें जितकी दूर टाकतां येतील तितकीं दूर झुगारुन दिली पाहिजेत, आणि संशोधनामध्यें प्रत्यक्ष युद्धें काय झाली, प्रत्यक्ष संघ कोणकोणते दिसतात, याविषयीं शांतपणें संशोधन केलें पाहिजे. ज्या आर्यन् लोकांनी वेदमंत्र आणले त्या आर्यन् लोकांनी काळया द्राविड लोकांना जिंकून हिंदूस्थान काबीज केलें हें विधान आपण प्रथमच शिशुसंशोधकाच्या मनोहर कल्पनासृष्टींतलें आणि केवळ अजिबात खोटें असें धरुन चालूं आणि इतिहासाचें सूत्र सांपडण्यास काय काय गोष्टी उपलब्ध होतात हें पाहूं.

पूर्वीच्या ग्रंथकारांचें आर्यदस्युयुद्धविषयक मत आणि आमचें मत यांतील भेद आम्ही येणेंप्रमाणें दर्शवितो.

 

 

पूर्वीचें मत. आमचें आजचें मत.
  (१) आर्य हें जाति वाचक किंवा महावंश
   वाचक नांव होतें.

 

  (१) आर्य हें शिष्टवर्ग वाचक व
  यजनशीलजनवाचक नांव होतें

 

  (२) हिंदुस्थानांत वेद भाषी (आर्यन्) लोक
  आले त्यांचे आगमन वेद दाखवितात. 

 

  (२) हिंदुस्थानांत भरतांचे  आगमन किंवा
  स्थानांतर  तेवढे ॠग्मंत्रांतील उल्लेखांवरुन
  स्पष्ट होतें. आर्यन् लोकांचे आगमन
  वेदांवरुन स्पष्ट होत नाही. भरत लोक
  तेवढेच आर्यन् होत असें मुळीच दिसत नाहीं.

 

  (३) आर्यन् आले त्यावेळीं देशांतील काळ्या
  लोकांबरोबर त्यांचे युद्ध झालें.
 

 

  (३) भरत हिंदुस्थानांत आले तेव्हांत्यांना देशांत
  प्रवेश सर्व प्रकारच्या लोकांशी लढाया
  करीत करावा लागला.
 

  (४) आर्यन् राष्ट्राचे सामान्य शत्रु देशांतील
  मूळचे लोक होते ते काळे होते.म्हणजे
  आर्यन् लोकांचें हें आगमन पहिलेंच होय.

 

  (४) आर्यन् राष्ट्रांचे काळ्यांशी सामुच्चयिक वैर
  दिसत नाहीं. आर्यन् लोकांचे सामान्य
  शत्रुमूलक ऐक्य असल्याचें कोठें दिसत
  नाही. देशांत आर्यन् लोक प्रथमच येत होते
  व त्यांच्या अगोदर काळे लोक देशांत
  होते. अशा बद्ल पुरावा नाहीं.

 

  (५) दस्यु यांचा अर्थ देशांतील मूळचे लोक.

 

  (५) दस्यु म्हणजे जे यजनशील नव्हत ते.
  दस्यु हा शब्द फार तर शत्रुत्व वाचक असावा.
  तो शब्द पर्शुभारतीय असल्यामुळें त्यानें भारतीय
  विश्ष्टि जात दर्शविली जात नाही. एके ठिकाणी कांही
  चपट्या नाकाच्या लोकांस दस्यु म्हटलें आहे, ते
  आर्याचे शत्रु  होते असें नाहीं.

 

 

  (६) दस्यूंशी युद्धप्रसंग वर्णिला नाही. दिवोदास व
  सुदास यांचे अनेक राष्ट्रांशी युद्धप्रसंग ॠग्वेदांत
  वर्णिले आहेत. जी राष्ट्रें सुदास व दिवोदास यांच्या
  विरुद्ध लढलीं(उ.यदु, तुर्वश,पुरु इ.)ती दिवोदासापेक्षां
  भिन्न वंशाची किंवाभिन्न धर्माचीं होतीं असें   समजण्यास मुळीच
  पुरावा नाही.

 

 आमचा पूर्वीच्या लेखकांशी असलेला दुसरा मतभेद असा आहे कीं मंत्रकालीं झालेलें आगमन आर्यन् लोकांच्या भारतीय इतिहासांत प्राचीन नसून अर्वाचीन आहे.

ॠत्विक्कर्मवैशिष्ट्ययुक्त अगर ब्राह्मणयुक्त समाज ही समाजाची उत्तरकालीन स्थिति होय. यज्ञविकासाबरोबर ॠत्विक्कर्म भिन्न झालें. ॠत्विक्कर्माचें भिन्नत्व म्हणजे विशिष्टीकरण स्थापन झाल्यानंतर ब्राह्मणांची वेदशाखाभिन्नतात्मक जात तयार झाली. मंत्रभागांतच ॠत्विक्कर्माचें बरेंच विशिष्टीकरण व यज्ञविकास ही दिसत आहेत. यज्ञसंस्था तयार होण्याच्या पूर्वी ब्राह्मणांची जात तयार झाली नव्हती. आणि त्यामुळें ब्राह्मणजातीविरहित तथापि आर्यन् भाषेनें व्यापलेला, असा जर कांही प्रदेश असेल तर, तो यज्ञसंस्था संवर्धनापूर्वीचा आर्यन् लोकांचा प्रसार दर्शवितो. उत्तरेकडील ब्राह्मणांत अत्यंत पौर्व ब्राह्मण म्हणजे सारस्वत होत. तथापि संस्कृत भाषेशी संबद्ध अशा आर्यन् भाषेंनें व्यापिलेला देश सरस्वतीच्या पूर्वेकडे पुष्कळ आहे. सिंहलद्वीपाची कथा पंजाबप्रमाणेंच आहे. हा प्रदेश भाषेनें आर्यन् आहे. पण येथें ब्राह्मणांची वसति नाही. आणि या परिस्थितीचे कारण आर्यन् राष्ट्रांकडून ब्राह्मणजाति विकासापूर्वी द्वीपाची वसाहत होणें असावें असें मागें सांगितलेंच आहे (विभाग १पृ. १४३). मंत्रकाल आणि ब्राह्मणजातिविकासकाल हा एकमेकांपासून फारसा दूर नसावा. मांत्रसंस्कृतीची ब्राह्मणसमाजयुक्त संस्कृति ही अत्यंत निकटची पायरी असल्यामुळे ब्राह्मणहीन समाज हा मांत्र संस्कृतीचा भाग नसला पाहिजे.

या प्रकारच्या विवेचनांत प्रवेश करतांना प्रथम ग्रंथांत उल्लेखिलेल्या राष्ट्रांपैकी प्राचीन राष्ट्र कोणतें आणि अर्वाचीन राष्ट्र कोणतें हें ठरविण्याच्या पद्धतीविषयीं विचार व्यक्त केले पाहिजेत.