प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
भारतेतिहास व भारतीयेतिहास.- भारताचा इतिहास आणि भारतीयांचा इतिहास या दोन गोष्टी भिन्न आहेत. भारतांत जे लोक आले असतील त्यांची भारतांतील चळवळ तेवढी द्यावयाची हा भारतेतिहास होय. भारतीयांचा इतिहास द्यावयाचा म्हटला म्हणजे कोणत्या विशिष्ट लोकांस 'भारतीय' हें नांव द्यावयाचें हें प्रथम ठरवावें लागेल आणि त्यांचा इतिहास - मग ते भारतांत असतांना असोत किंवा भारताबाहेर असोत - द्यावा लागेल. भारतांत जे अनेक मानववंश दृष्टीस पडतात त्यांपैकी एकास भारतीय म्हणावयाचें व दुस-यास म्हणावयाचें नाहीं हा हट्टवाद होईल. तथापि केवळ सोय म्हणून भारतीय हा शब्द मुसलमानांच्या आगमनापूर्वीच्या लोकांस लावून भारतीयेतिहास मुसलमानी इतिहासापासून निराळा करतां येईल. ज्यांस भारतीय म्हणतां येईल त्यांतहि आर्यन् आणि द्राविड असे दोन महावंश अनेक भाषाशास्त्रज्ञ महत्वाचे मानतात. आणि ''आर्यन्'' लोकांच्या आगमनापासून भारतीयांचा इतिहास ज्ञात आहे असें समजतात. वेदांत ज्या लोकांचे कार्य दिसून येतें आणि वेदभाषा ही ज्या लोकांची भाषा होती त्या लोकांचा हिंदुस्थानांत येण्यापूर्वीचा इतिहास द्यावयाचा हा 'आर्यन' इतिहासाचा भाग होय. हा इतिहास निरनिराळया राष्ट्रांतील उत्तरकालीन अवशेषांच्या तौलनिक अभ्यासानें तयार करण्यांत आला आहे. त्या अभ्यासाकडे वेदभाषी अथवा मांत्र (वेदभाषा व मंत्रवाड्·मय हीं ज्या लोकांचीं होती ते) लोकांच्या हिंदुस्थानांतील कार्याकडे अगोदर लक्ष देऊन मग गेलें पाहिजे.